आयुष्याचे नाटक - प्रवेश सातवा

| Labels: | Posted On 8/26/08 at 3:05 PM

प्रवेश सातवा - हम होंगे कामयाब



कोंकणात फिरून आल्यावर एकदम फ्रेश वाटत होतं. काही न करता पंखा फुल्ल स्पीड वर टाकून एकात एक दोन पांघरुणं घेऊन झोपून राहावंस वाटतं होतं. पण कोंकणातल्या डोंगरांत फिरून सिमेंटच्या जंगलात परत आल्यावर आमच्या वनवास पुन्हा सुरू झाला.

फिटनेसचं पिल्लू आमच्या घरी अजून अंड्यातच असलं तरी मध्याच्या घरी मात्र त्याचा टमटमीत कोंबडा झाला होता. आणि आता तर तो भल्या पहाटे आरवायलाही लागला होता. मध्या दाद देत नव्हता आणि संध्या काही हार मानायला तयार नव्हती. मध्याने तिला "बॅंका कधी कधी कर्ज परत यायची आशा नसल्याने काही काही कर्ज राइट-ऑफ करून टाकतात, तसंच तूही माझ्या व्यायामाच्या बाबतीत कर" असं समजवायचा प्रयत्न केला. पण संध्या म्हणजे कर्ज राइट-ऑफ करणारी बँक नसून गुंड पाठवून कर्ज वसुली करणारी बँक होती ह्याचा प्रत्यय मध्याला लवकरच आला.

संध्या - मध्या ऊठ...
मध्या - अगं अजून ६ पण नाही वाजले.
संध्या - लवकर ऊठ, आपल्याला बागेत जायचंय.
मध्या - बागेत कशाला अगं? लग्न झालंय आता आपलं.
संध्या - आचरटपणा नकोय. "स्वस्थ भारत समाज" तर्फे आज पासून बागेत योगासनांचे क्लासेस भरणार आहेत. आपल्याला जायचंय.
मध्या - अगं त्यासाठी क्लास कशाला हवा? हे बघ, माझं शवासन चाललंय.
संध्या - आता तू पुढच्या पाच मिनिटांत उठला नाहीस ना तर तुला आज डब्यात शेपूची भाजी.

शेपू म्हटल्यावर मध्या ताडकन उठला. कसाबसा संध्याचा टेकू घेऊन योगासनं करायला गेला.


हे शेपूच्या भाजीचं प्रस्थ आजकाल आम्हा दोघांच्याही घरात जास्तच वाढलं होतं. व्यायाम नाही तर किमान हेल्थ फूड तरी खावंच लागणार अशी तडी आम्हाला मिळाल्याने तिन्ही त्रिकाळ बाहेर जेवणारे आम्ही आजकाल ऑफिसला गुपचुप डबा घेऊन जात होतो. त्यातच अजून आमचं बजेटींग सुरू असल्याने जिभेला लगाम लागला होता. चायनीजच्या गाड्या, भुर्जी-पावच्या टपऱ्या, वडा-पावचे कोपरे आता आम्हाला खिजवत होते. आणि हे सगळं बघत बघत घरी आलो की कसल्या कसल्या उकडलेल्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्यं, तेल तूप न लावलेले फुलके आणि दूध-साखर नसलेला चहाचा काढा प्यावा लागत होता. हे म्हणजे उर्मीलाचा फोटो बघून मुलगी पसंत करावी आणि ऐन वेळी बोहोल्यावर निरूपा रॉय दिसावी ह्यातला प्रकार होता. पुन्हा उ. न. क. ची बैठक भरवावी लागणार अशी लक्षणं दिसत होती.

दुपारी मध्याचा फोन आला.
मध्या - कुठायंस बे?
ऍडी - ऑफिस. तू?
मध्या - मी पण. संध्याकाळी कट्ट्यावर भेट.
ऍडी - यस सर.
मध्या - अरे आज आपल्या टाम्या चा वाढदिवस आहे. सगळ्यांना जेवायला घेऊन जाणार आहे. काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणाला.
ऍडी - अरे जेवणावरून आठवलं. च्यायला आज मी नेहमी प्रमाणे देवळाबाहेर गायवालीला डबा दिला. डबा उघडून ती म्हणाली "वो सायेब, गायीला काय करायचाय मलई-कोफ्ता? मी उडालोच. बघितलं तर खरंच डब्यात मलई कोफ्ता होता. मी डबा परत घेणार होतो पण तोवर माझ्या डब्यातला माल तिच्या डब्यात ट्रांस्फर झाला होता.
मध्या - हो का? म्हणजे हा आपल्या बायकांचा गेम दिसतोय. काल आमच्या प्यून मला म्हणाला "साहेब, वहिनींना सांगा भरली वांगी मस्त झाली होती. " मी बसल्या जागी ठार. पण नंतर वाटलं बरं झालं बायको सुधारली. कालचा अनुभव लक्षात घेऊन आज स्वतःच डबा खायचं ठरवून मेस मध्ये गेलो. मोठ्या अपेक्षेने डबा उघडला तर आज पुन्हा उकडलेले मूग.
ऍडी - आयला, आपल्या बायका आपल्या एक स्टेप पुढे आहेत म्हणजे.
मध्या - तुला खरं सांगतो ऍडी, ही उकडलेली कडधान्य खाऊन खाऊन मला आजकाल माझ्याच अंगावर मोड आल्या सारखं वाटतंय यार.
ऍडी - हाहाहा
मध्या - हसू नकोस. अरे परवा गंमतच झाली. आमचा पाट्या ऑफिसला येणार नव्हता. त्याने मला सांगितलं बॉसला सांग माझ्या पायाला लागलंय. मी काय सांगितलं माहिती आहे?
ऍडी - काय?
मध्या - मी बॉसला म्हणालो पाट्याच्या पायाला मोड आल्यामुळे तो आज येणार नाहीये.
ऍडी - खॅ खॅ खॅ खॅ
मध्या - असो. आज भेट तू कट्ट्यावर. थोडं डोकं चालवायला लागणार आहे आता आपल्याला.

संध्याकाळी भेटलो कट्ट्यावर. कट्ट्यावर गेलो तर जनता शबरी मध्ये कार्यमग्न आहे असा निरोप मिळाला म्हणून तिकडे कुच केली. गंट्या पण येणार होता, पण अजून आला नव्हता. विन्या, विज्या नि साने काका असे तीन पांडव बसल्या जागेला जागत होते.

ऍडी - गंट्या कुठाय रे?
विज्या - तो सूक्ष्मात गेलाय.
ऍडी - काय? म्हणजे नक्की कुठाय?
विज्या - अरे मला काय माहिती. मगाशी त्याला फोन केला तर म्हणाला "मी सूक्ष्मात आहे, प्रहर भरात बाहेर आलो तर भेटूच".
मध्या - हा गंट्या आजकाल जास्तच माजलाय असं नाही का वाटत तुला.
विज्या - हो ना. काल मी त्याला आजच्या पार्टी बद्दल मेसेज पाठवला तर त्याने मला "ब्रह्म सत्यं, जगन मिथ्या" असा रिप्लाय दिला यार.
ऍडी - ह्म्म्म्म्म. मला एक डाऊट आहे.
विज्या - काय?
ऍडी - हा गंट्या प्रेमात पडलाय?
विन्या - अरे काय सांगतोस? कुणाच्या?
ऍडी - तुला १०५, श्री निवास मधली भिड्यांची मंदा माहिती आहे का?
मध्या - ती अंबाडा? रुपारेल ला बि. ए. फायनल ला आहे ती?
(कॉलेज सुटून तपं लोटली असली तरी आजू-बाजूच्या तमाम प्रेक्षणीय स्थळांची इथ्यंभूत माहिती आम्ही अजून इमाने-इतबारे ठेवत असतो. )
ऍडी - तीच. हा गाढव तिच्या प्रेमात पडलाय असा मला डाऊट आहे.
मध्या - आयला... कशावरून?
ऍडी - अरे तिच्या घरी हा आजकाल तिची शिकवणी घेतो.
मध्या - काय सांगतोस काय? अरे पण गॅसवाल्याला सुद्धा गॅस दरवाज्याबाहेर ठेवायला सांगणाऱ्या भिडे काकांनी ह्याला कसा आत घेतला?
ऍडी - भिडे काका गंट्याच्या बाबांचे मित्र आहेत रे. असो. रोज दुपारी अडीच ते साडेचार हा तिची समाजशास्त्रावर शिकवणी घेतो. आणि ती सुद्धा फुकट.
मध्या - आयला, ह्याची चहा-सिगारेटची बिलं आपण भरायची आणि हा जगाला फुकट शिकवतोय.
ऍडी - अजून गंमत ऐक. हा मंदावर टप्पे टाकतोय अशी खबर मला मिळालीच होती. त्यात हा चांगला चान्स चालून आला. मंदाच्या वडिलांनीच ह्याला विचारलं शिकवशील का म्हणून. हा एका पायावर तयारच होता. फी विचारली तर म्हणाला "ज्ञानदाना सारखं पवित्र काम पैसे घेऊन करण्याचं पाप मी करणार नाही. " बुढ्ढा खूश. असो. तिथेच काहीतरी लोचा झाल्याने हा सूक्ष्मात गेल्याचा मला डाऊट आहे.

तेव्हढ्यात मान खाली घालून गंट्या अवतरला

मध्या - या या या गंटेश्वर... आलात का सूक्ष्मातून बाहेर?
गंट्या - सूक्ष्म गेलं सूक्ष्मात... लार्ज भर.
(ग्लासमधल्या द्रव्याचं आम्हा क्षुद्र जिवांवर प्रोक्षण करून एक मोठ्ठा घोट घेऊन गंट्या बोलता झाला. )

गंट्या - साला आयुष्य व्यर्थ आहे. जगात खऱ्या प्रेमाची किंमतच नाही हेच खरं.
ऍडी - मंदानी पण राखी बांधली वाटतं?
गंट्या - राखी नाही रे तसंच काहीतरी.
विन्या - हा तुझा कितवा प्रेमभंग रे?
गंट्या - सतरावा
ऍडी - व्वा... दर वेळी कसं जमतं रे तुला खरं प्रेम करायला?
मध्या - ते सोड. नक्की झालं काय? ही तुला... ही पण तुला नाही का म्हणाली?
गंट्या - अरे इतक्या वेळा प्रेमात पडल्याने मला आता मुलींच्या मानसिकतेचा चांगलाच अंदाज आलेला आहे. आत जी माझ्याशी लग्न करेल तिला ह्या अनुभवाचा फायदा होऊन ती नक्कीच सुखी होईल.
मध्या- मग?
गंट्या - अरे हेच मी तिला सांगितलं...
ऍडी - काय??? तू माझं सतरावं प्रेम आहेस हे तू तिला सांगितलंस? अरे बरा आहेस ना तू गंटुड्या???
गंट्या - हो रे. पण प्रॉब्लेम असा झाला की त्या सोळा मधल्या ३ जणी हिच्या मैत्रिणी निघाल्या. त्यामुळे मी अगदीच 'ह्यॅ... ' आहे असं ती म्हणाली.
ऍडी - 'ह्यॅ... ' म्हणजे? चमडी का?
गंट्या - जाता जाता ती अजून एक हृदयद्रावक वाक्य फेकून गेली. मी म्हणे... मी म्हणे प्रेमाच्या आकाशातली अमावस्या आहे...
मध्या - उगी उगी गंट्या...
गंट्या - माझं सोडा... तुमचं कसं चाललंय?
ऍडी - आमचं पण सोडा...
साने काका - चला रे आवरा पटापट.

काकांच्या आज्ञेवरून आम्ही पटापट आवरलं. आणि उद्या दुपारी पुन्हा उ. न. क. ची बैठक भरवायची असं ठरवून दबकत दबकत आप-आपल्या घरी परतलो.

गटारी स्पेशल

| Labels: | Posted On 8/3/08 at 12:10 PM




गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.

सोयरे खास, मित्रही जमले
संपती बाटल्या, हिंदकळती पेले.
पडू द्या त्यातच बर्फाचा गोटा,
गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.


आज घरी जाणे नाही, विश्वची घर मानू,
झाडाखाली बागेमधे, दिसेल तिथे ताणू.
प्रशस्त बारही वाटे आज छोटा,
गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.


हाणा कोंबड्या, चापा बकरे,
घोटां सोबतच, दुखःही विरे.
अम्रुताचा कुंभही वाटे मज थिटा,
गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.


-
ऍडी म्हणे आता,
उरलो झिंगण्या पुरता.