इथे जोशी रहातात

| Labels: | Posted On 2/5/09 at 12:27 AM

नमस्कार. मी भाई जोशी. हे आमचं घर - जोशी वाडा. मला मरून जवळ जवळ २० वर्ष झाली. भूत भूत म्हणून ओरडू नका. खरी भूतं भेटायचीत तुम्हाला अजून. ह्यांच्या सोबत राहाण्यापेक्षा वर गेलो हे फार बरं झालं असं वाटतंय. पहिल्याच बाळंतपणाच्यावेळी माझी बायको मला सोडून गेली. माझा मुलगा अप्पा, स्वभावाला अतिशय गरीब. इतका... की बिचारा बायकोलाही अहो म्हणायचा. त्याचा मुलगा तात्या, प्रमाणाबाहेर आळशी. ह्याचा जन्म बैलपोळ्याच्या दिवशीचा. जास्त झोपल्याबद्दल एकदा कुणीतरी ओरडलं तर झोपून झोपून कंटाळा आला म्हणून झोपलो होतो असं उत्तर दिलं ह्याने. पण मुळात ह्याचाही स्वभाव अतिशय साधा आणि सरळ. इथपर्यंत जोशांच्या घरात सगळं ठिक चाललं होतं. आणि त्या नंतर चंद्या जन्मला. त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर विष्णू सहस्त्रनामासारखी सहस्त्र शिव्यांची यादी तयार होईल. जन्मल्याबरोबर सर्वसाधारण मुलासारखा न रडता तो ख्यॅक् करून हसला तेव्हाच मला संशय आला होता. त्यात त्याला डॉक्टरांनी उलटा धरला असता वळवळ केल्याने तो डोक्यावर पडला. गरिब बाप आणि राक्षसगुणी मुलगा ह्यांच्यामधे आमच्या बिचार्‍या तात्याचा मात्र उस झालाय.

बाप तोंडावर पेपर ठेऊन झोपलाय. मुलगा घरच्या कपड्यांत खांद्यावर टॉवेल घेऊन एंट्री घेतो. बापाला झोपलेलं पाहून हैराण होतो.

मोनोलॉग (चंद्या) -


ह्या घरात जोशी रहातात. घर फार मोठं नाहिये. पण माणसंही फार नाहियेत. सर्वसाधारण मध्यमवर्गीयांसारखी बेतशुद्ध संतती असल्याने आहे त्या खोल्या पुरतायत. आता आपण ह्या जोश्यांच्या घरातली महत्वाची पात्र बघू. हे टेबल, ही खुर्ची आणि हा टिपॉय. असो. ते पाठमोरे दिसतायत ते भाई जोशी आणि त्यांच्या बाजूला आहेत त्या माई जोशी. त्यांचे फोटो हे असे पाठमोरे कसे ह्याची कहाणी अथवा अफवा सॉल्लीड इंटरेस्टींग आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हे दोघे फोटो काढायला स्टुडीयो मधे गेले होते. फोटोग्राफरचं फोकसींग चुकलं आणि मागच्या आरशाचा फोटो काढला गेला. त्यात हे दोघे असे पाठमोरे होते.

भाई जोशी तरूणपणीच कोंकणातून मुंबईला आले. नोकरीत जम बसल्यावर लग्न झालं. मधून मधून कोंकणात जात असत पण इस्टेटीवरून चुलत्याशी वाजल्याने मरेपर्यंत कोंकणात पाऊन ठेवणार नाही अशी ह्यांनी प्रतिज्ञा केली आणि ती खरी करून दाखवली. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्यावर कटाक्ष असणार्‍या भाईंना लग्नानंतर दहा महिने व्हायच्या आतच एक गोंडस मुलगा झाला. त्याचं नाव अप्पा जोशी. सद्ध्या जोश्यांच्या घरातलं सर्वात सिनीयर आणि एकमेव सरळमार्गी कॅरेक्टर. त्यांच्या मुलाचं नाव तात्या जोशी. आणि मी त्यांचा दिवटा चंद्या जोशी.

मुलगा - बाबा उठा. आजोबांची संध्या संपायची वेळ झाली.
बाप - काय रे. ह्या वेळी तू घरी कसा? आणि टॉवेल घेऊन कुठे चाललायस?
मुलगा - अंघोळीला.
बाप - आत्ता??? संध्याकाळी ६ वाजता???
मुलगा - अहो मी पण आत्ताच उठलो.
बाप - अरे तुला काही लाज लज्जा???
मुलगा - हॅ हॅ हॅ हॅ ... बाबा...
बाप - काय??
मुलगा - थोडे पैसे देता का? आज मित्रांसोबत पिक्चर टाकायला प्लॅन आहे...
बाप - अरे काय हे? २५ वर्षाचा घोडा झालास आणि बापाकडे पैसे मागतोस. आजूबाजूला बघ जरा. तुझ्या वयाची मुलं नोकरीला लागून घरखर्चाला हातभार लावायला लागली. आणि तू कोडग्यासारखा अजून बापाकडे पैसे मागतोयस??? कसं होणार अरे तुझं?
मुलगा - मला नोकरी सारखी शुल्लक कामं करून आयुष्य फुकट घालवायचं नाहिये. माझं अवतार कार्य फार मोठं आहे.
बाप - हो का? काय आहे तुमचं अवतार कार्य?
मुलगा - ते मी ठरवतोय अजून. बाबा, तुम्हाला आठवतं?
बाप - काय?
मुलगा - तुम्ही म्हणायचात की लहानपणी मी खूप हुशार होतो?
बाप - होतास बर्‍यापैकी... त्याचं आत्ता काय?
मुलगा - मग लहानपणी हुशार असलेला मुलगा मोठेपणी असा कसा झाला ह्याचा विचार कधी केलाय तुम्ही???

(बाप गोंधळतो)

मुलगा - मुलातले सुप्त गुण हेरून त्यांना वाव देणं हे आई-बापाचं कर्तव्य नाहिये का? कबीराने पण सांगितलंय 'लहान मुल म्हणजे फिरत्या चाकावर ठेवलेला मऊ मातीचा गोळा. त्याला आकार देणं हे आई-बापाचं काम आहे ना...

(बाप अजूनच गोंधळतो)

मुलगा - मग तुमच्या ह्या मातीच्या गोळ्याचं छान सुबक मडकं नं होता त्याचा असा दगड झाला हा माझा दोष आहे का?
बाप - व्वा...
मुलगा - व्वा काय?
बाप - तू निदान मी दगड आहे हे स्वतः कबूल तरी कलंस.
मुलगा - मुलगा असा निघाला हे तुमच्यातल्या पालकाचं अपयश नाहिये का?
बाप - कानफटवीन आता.
मुलगा - बाबा तुम्ही मला वेळीच जर घरातल्या एका कोपर्‍यात नेऊन विचारलं असतं की 'बाबारे तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू असा भैसाटल्या सारखा का वागतोस' तर मी आज नक्कीच वेगळा असतो.
बाप - अरे तुला कोपर्‍यात घेऊन घेऊन घरातले सगळे कोपरे संपले. लहानपणी केलेले तुझे अती लाडच नडलेत.
मुलगा - बाबा काय हवं ते म्हणा, दगड म्हणा, बैल म्हणा, डुक्कर म्हणा... लहानपणी माझे लाड झालेत हा आरोप मला अजीबात मान्य नाहिये. असो. चला मी आता अंघोळीला जातोय. २०० रुपये तयार ठेवा. तुमच्याकडे १० मिनीटं आहेत.
बाप - २०० रुपये? अरे पिक्चर बघायला जातोयस की पिक्चर काढतोयस?
मुलगा - अहो हे कमीच आहेत. त्यानंतर जेवणाचा पण प्लॅन होता. तुम्हाला परवडणार नाही म्हणून पोस्ट्पोन केला...

(बाप पेपर फेकून मारतो. मुलगा आत पळतो. बाप पेपर उचलतो आणि पुन्हा झोपतो. आतून आजोबा बाहेर येतात.)

आजोबा - हल्या SSSSS.... धिर्रर्रर्रर्रर्र धिर्रर्रर्रर्रर्र धिर्रर्रर्रर्रर्र
बाप - या या या पिताश्री या... झाली का संध्या.
आजोबा - हो आमची संध्या झाली. तुमची आज दुपारीच आचमनं झालेली दिसतायत...
बाप - नाही हो... का??
आजोबा - काही नाही. चिकूचा वास येतोय म्हणून सहज आपलं वाटलं.
बाप - छे छे काहिही... दुपारी काय??? बाबा...
आजोबा - काय?
बाप - बाबा...
आजोबा - अरे काय???
बाप - थोडे पैसे देता का?
आजोबा - अरे काय हे? ५० वर्षाचा म्हातारा घोडा झालास आणि बापाकडे पैसे मागतोस. आजूबाजूला बघ जरा. अरे तुझ्या वयाची मुलं आता काही वर्षात रिटायर होतील. आणि तू कोडग्यासारखा बापाकडे पैसे मागतोयस??? तू आणि तुझा तो नालायक कार्टा. अरे तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडणार आहे की नाही. तुम्ही दोघे... तुम्ही दोघे चांगले धडधाकट असून माझ्या पेंशन वर जगता. काही म्हणजे काहीच लाज नाही वाटत तुम्हाला ह्या म्हातार्‍याच्या जिवावर जगायला?
बाप - बाबा... अहो तुम्ही म्हातारे आहात ह्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? होतं असं कधी कधी.
आजोबा - नालायका सारखी उत्तरं देऊ नकोस. अरे तुला नोकरी लागावी म्हणून मी कमी प्रयत्न केले का? माझ्या ऑफीसात सुद्धा शब्द टाकला होता. पण तू इंटरव्ह्यूला ही गेला नाहीस.
बाप - अहो कितीवेळा सांगितलं तुम्हाला त्या दिवशी मी घरून निघालो होतो. पण चर्चगेटला पोचल्यावर आठवलं की आज वानखेडेवर भारत - वेस्ट इंडीज ची मॅच आहे. आता मॅचपेक्षा का नोकरी महत्वाची आहे?
आजोबा - त्या एक वेळचं सोड. नंतर पण कमी प्रयत्न केले का मी? पण तू ढिम्म हलशील तर ना. शेवटी आमचा साहेब कंटाळून मला म्हणाला 'जोशी, ह्यापुढे मुलाला नोकरी लावा म्हणून अजून एकदा जरी मला सांगितलंत तर तुम्हालाच नोकरी वरून काढीन'.
बाप - बाबा मला नोकरी सारखी शुल्लक कामं करून आयुष्य फुकट घालवायचं नाहिये. माझं अवतार कार्य फार मोठं आहे.
आजोबा - अरे अवतार संपायची वेळ आली तुझी. कधी कार्याला लागणार आहेस?
बाप - बाबा, तुम्हाला आठवतं?
आजोबा - काय?
बाप - तुम्ही म्हणायचात की लहानपणी मी खूप हुशार होतो?
आजोबा - खूप हुशार वगैरे नव्हतास... पण आत्ताच्या इतका मठ्ठही नव्हतास.
बाप - मग लहानपणी बर्‍यापैकी हुशार असलेला मुलगा मोठेपणी असा कसा झाला ह्याचा विचार कधी केलाय तुम्ही???

(आजोबा गोंधळतो)

बाप - मुलातले सुप्त गुण हेरून त्यांना वाव देणं हे आई-बापाचं कर्तव्य नाहिये का? शिवाजी महराजांनी पण सांगितलंय 'लहान मुल म्हणजे फिरत्या चाकावर ठेवलेला मऊ मातीचा गोळा. त्याला आकार देणं हे आई-बापाचं काम आहे ना...

(आजोबा अजूनच गोंधळतो)

बाप - मग तुमच्या ह्या मातीच्या गोळ्याचं छान सुबक मडकं नं होता त्याचा असा दगड झाला हा माझा दोष आहे का?
आजोबा - व्वा
बाप - व्वा काय?
आजोबा - तू निदान मी दगड आहे हे स्वतः कबूल तरी कलंस.
बाप - बाबा तुम्ही मला वेळीच जर घरातल्या एका कोपर्‍यात नेऊन विचारलं असतं की 'बाबारे तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू असा भैसाटल्या सारखा का वागतोस' तर मी आज नक्कीच वेगळा असतो.
आजोबा - अरे तुला कोपर्‍यात घेऊन घेऊन घरातले सगळे कोपरे संपले. हॉलच्या मध्यभागी घेऊन चाबकाने फोडायला हवा होता तुला म्हणजे आज ही परिस्थीतीच नसती उद्भवली.

(चंद्या अंघोळ करून बाहेर येतो)

आजोबा - या महाराज
मुलगा - तथास्तू
आजोबा - कानफाट फोडीन... तथास्तू म्हणे... कुठे चाललायस नटून थटून???
मुलगा - पिक्चर बघायला जातोय
आजोबा - व्वा... टिकीट कोण काढतंय तुझं?
मुलगा - बाबा...
बाप - बाबा???
मुलगा - हो... बाबा... पैसे
बाप - आजोबांकडे माग
मुलगा - आजोबा... पैसे
आजोबा - तुझं वय काय रे???
मुलगा - २५
आजोबा - नालायका... २५ वर्षाचा घोडा होऊनही कमवत नसल्याबद्दल लाज नाही वाटत का?
मुलगा - बाबा... आजोबा बघा काय म्हणतायत...

फोन वाजतो...

मुलगा - कोणॅ????
मुलगी - हॅलो...
मुलगा - कोण हवंय आपल्याला?
मुलगी - जोशी आहेत का?
मुलगा - आमच्या इथे घरात ३ आणि भिंतीवर २ असे ५ जोशी रहातात. त्यातलं नेमकं कोण हवंय आपल्याला?
मुलगी - कुणीही चालेल. सर मी अमुक अमुक बँकेतून बोलतेय. तुम्ही आमचे एकदम स्पेशल कस्टमर असल्याने तुमच्यासाठी एक मस्त स्किम आहे...
मुलगा - हो का?
मुलगी - हो ना... तुम्ही कमीत कमी ५ लाख रुपये किमान २ वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला त्यावर २५% इंटरेस्ट मिळेल. प्लस लाईफ इंशुरंस, ऍक्सीडंट कव्हर आणि पेस्ट कंट्रोल एकदम फ्री...
मुलगा - काय सांगता काय???
मुलगी - हो ना... मग कधी पाठवू आमच्या माणसाला...
मुलगा - एक सांगू का? माझ्याकडे तुमच्यासाठी ह्याहून भारी स्किम आहे...तुम्ही ५ लाख रुपये १ वर्षासाठी मला दिलेत तर वर्षाला ४०% व्याज मिळेल... बोला कधी येऊ पैसे न्यायला...
मुलगी - सर... तुमचा आवाज कट होतोय. नेटवर्क नाहिये बहुतेक...
मुलगा - अहो तुम्ही लँडलाईन वर कॉल केलाय... नेटवर्क कसं नसेल... कधी येऊ पैसे घ्यायला???
(फोन आपटल्याचा आवाज येतो)

आजोबा - काय रे का उगाच त्या बिचारीला छळत होतास.
मुलगा - हॅ हॅ हॅ हॅ
आजोबा - आणि ४०% इंटरेस्ट देईन म्हणे. कुठून देणार होतास?
मुलगा - अहो मी तिला इंटरेस्ट देईन असं म्हणालो. मुद्दल थोडीच परत देणार...
आजोबा - धन्य आहेस...
मुलगा - परवा असाच लोन हवंय का म्हणून फोन आला होता...
आजोबा - मग?
मुलगा - आजोबा... मला नाही वाटत आपल्याला कुणी कशासाठीही लोन देईल
आजोबा - का रे?
मुलगा - का रे काय? अहो तुमचं पेंशन किती कमी आहे... कोण लोन देईल
आजोबा - अरे मग स्वतः नोकरी कर नी घे की हवं तेव्हढं लोन... लाज नाही वाटत म्हातार्‍याच्या जिवावर जगताना?
मुलगा - अहो त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? आता ह्या वयात तुम्ही पैशाचं काय करणार आहात?
आजोबा - धन्य आहेस...
मुलगा - आजोबा... मला माझं आयुष्य नोकरी सारखी शुल्लक कामं करण्यात वाया घालवायचं नाहिये.
आजोबा - अरे मी गेल्यावर तुमचं काय होणार ह्याचा विचार केलाय का तुम्ही?
बाप - असं कसं बोलवतं बाबा तुम्हाला??? तुमच्या शिवाय आमचं आहेच कोण ह्या जगात???
आजोबा - अरे पण मी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे का? कधी ना कधी मी पण भिंतीवर लटकणारच आहे? तेंव्हा काय कराल?
मुलगा - चला, तुमच्या ह्या फालतू गप्पांमधे माला लेट झाला. मी निघतो. आजोबा... मी येई पर्यंत थांबा, इतक्यात लटकायची घाई करू नका.
आजोबा - तात्या, हाण त्याच्या एक मुस्कटात.
बाप - चिडू नका हो बाबा. तुम्हालाच त्रास होईल. हा कधी सुधारणार आहे असं वाटतं का तुम्हाला?
आजोबा - अरे तुझं एकंदरीत कर्तुत्व पाहिल्यावर मला वाटलं होतं की तू जोश्यांचा घरातला निच्चतम बिंदू आहेस. पण तुझा मुलगा तुझ्याहून कोडगा निघाला.
मुलगा - मी केवळ बाबांचा वारसा पुढे चालवतोय.
बाप - बाबा, हाणा त्याच्या एक मुस्कटात.
आजोबा - जाऊ दे रे, लहान आहे तो. वर तुझाच मुलगा.
बाप - अहो तुम्ही काही तरी समजवा ना त्याला.
मुलगा - मी गेलो...

क्रमशः

Comments:

There are 11 comments for इथे जोशी रहातात