(बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४

| Labels: | Posted On 10/14/10 at 10:31 AM

'निर्लज्ज व्हा'च्या मागील भागात आपण बघितलं की नवरे कुठल्या पातळीपर्यंत घसरून आपला कार्यभाग साधू शकतात. 'मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधी सांगता येत नाही' अशी एक म्हण आहे. ह्या यादीत नवरा हा प्राणीही जोडायला हरकत नाही. खरं म्हणजे नवर्‍यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू दिलं तर बायकांचं आयुष्य फार सुकर होईल. पण तसं होणे नाही. बायका गोष्टींकडे स्वतःच्या दॄष्टीकोनातून बघत असल्याने नवर्‍यांचं मन त्यांना कळत नाही आणि ह्यातूनच पुढे वांधे होतात.

बायकोकडे जसं रडण्याचं हुकमी हत्यार असतं तसंच नवर्‍यांकडेही भावनेला हात घालायचा जालीम उपाय असतो. एरवी नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे अंगाला काहीही लाऊन न घेणारा, भावनेचा लवलेशही नसलेला आपला दगड अचानक भावूकपणे बोलायला लागला की बायका १०००००००% विरघळतात. मी स्वतः अनेक मोठे मोठे लोचे करून घरी जाताना दाराबाहेरच्या तगरीच्या एका फुलाच्या जिवावर स्वतःची कातडी कैक वेळा वाचवली आहे. त्यामुळे बायकांना असा सल्ला आहे की ह्या गोड-गोड बोलण्याला अजिबात फसू नये. नवरे सुधारक चळवळ जोमाने आणि नेटाने सुरू ठेवावी.

शतकानुशतकं नवरे भावनांना हात घालून आपल्या बायकांचा मामा करत आले आहेत. तर ह्यावर उतारा म्हणून नवरे काय म्हणतात आणि त्यांना काय अभिप्रेत असतं हे आता मी काही उदाहरणं देऊन समजावतो.

प्रकटः तुला बघितलं की एका क्षणात दिवसभराचा थकवा गायब होतो.
गर्भितार्थ: च्यायला आज पुन्हा उशीर झाला. ज्या दिवशी हिला जेवायला घेऊन जाणार असतो नेमकी त्याच दिवशी मित्रांची पार्टी ठरते.

प्रकटः तुझ्या हातचा डबा खाताना तुझ्यासोबत बसून जेवल्यासारखं वाटतं.
गर्भितार्थ: उगाच त्या डबेवाल्या बाईच्या डोंबलावर हजार-दोन हजार आदळायची गरज नाहिये. दोघांचा स्वयंपाक करणं जड नाहिये तुला. आणि सिगरेटचे भाव किती वाढलेत अंदाज आहे का?

प्रकटः हा विकेंड फक्त तू आणि मी, बाकी कोणीच नाही.
गर्भितार्थ: दोन दिवस मी मकरासनात लोळत पडणार आहे. इथे चल तिथे चल, शॉपिंग करू, फिरायला जाऊ असं म्हणून प्लीज माझं डोकं खाऊ नकोस.

प्रकटः तुला हवं तिथे फिरायला जाऊ आपण ह्या सुट्टीत.
गर्भितार्थ: च्यायला एक तर जागा शोधा, हॉटेलचं बुकींग करा, तिकिटं काढा आणि हॉटेलवाल्यांनी हिरव्या चादरीवर निळ्या उशा ठेवल्या म्हणून आपणच शिव्याही खा. अजिबात गरज नाही. तूच कर सगळं, मी बघतोय गंमत.

प्रकटः अगं तुझ्या आईला इथे यायचं म्हणजे किती दगदग होईल, त्यापेक्षा तूच जाऊन ये. भेटही होईल आणि त्यांना थकवाही येणार नाही
गर्भितार्थ: अर्थ सांगायची गरज आहे???


ही अशी आणि इतर अनेक वाक्य बायका येता जाता ऐकत असतात आणि येता जाता अशा वाक्यांना भुलतही असतात. त्यामुळे आता पुढल्यावेळी वाक्याची सुरुवात 'राणी, सोनू, डिअर' अशा शब्दांनी झाली की सवधपणाचा पावित्रा घ्यावा.

तर असे हे (माझ्यासारखे) निर्लज्जपणा, निगरगट्ट्पणा आणि कोडगेपणा कोळून प्यायलेले तुमचे नवरे अनेकवेळा तुम्हाला कोड्यात टाकण्यासारखं वागतात. वाल्याच्या वाल्मिकी होतो, पण इतका इंस्टंट? इतक्या पटकन तर मॅगीही बनत नाही. अनेकींना अंदाज येत नाही की नक्की चाललंय काय. नवर्‍याला वठणीवर आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश आलं असं समजून त्या बिचार्‍या खूष होतात. पण लवकरच ये ये माझ्या मागल्या सुरू होते. आता ह्या कोड्याची उकल आपण करू. नेहमीच घडणार्‍या घटना आपण आता बघू.

त्याचं असं आहे की ह्या घटना आपल्या आयुष्यात नेहमीच घडतात. पण जेव्हा आपण त्या दुसर्‍याच्या नजरेतून पाहतो तेव्हा जाणवतं की ह्या प्रचंड सेंटीमेंटल वाटणार्‍या घटना प्रत्यक्षात किती विनोदी आहेत.


घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

वेळ - गुरुवार अथवा शुक्रवार रात्र

पार्श्वभूमी - तुम्ही रविवारी रात्री नवर्‍यासोबत शॉपिंग आणि नंतर डिनर असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम बनवलाय. प्लॅनींग सुरू आहे. इतक्यात नवर्‍याला मित्राचा फोन येतो. (फक्त नवरा काय बोलतोय हे ऐकू येतं)


"काय रे डुकरा कसा आहेस? (इथे बायको नवर्‍याला नीट बोल असं डोळ्यांनी दटावून चापटी मारते.) मी मजेत रे. फॅमिली लाईफ एकदम फर्स्ट क्लास. साल्या तू पण लग्न कर आता. खरं सांगतो तुला लग्न झाल्यावर आयुष्य कसं झकास होऊन जातं बघ. बरं बरं...फोन कशासाठी केलास? काय सांगतोस काय? कधी? काँग्रॅट्स बॉस. बघ आता प्रमोशनपण मिळालं, लग्न करायला काहीच हरकत नाही. हॅ हॅ हॅ... सॉरी यार मी नाही येऊ शकणार पार्टीला. अरे माझ्या बायकोनी छान प्लॅन बनवलाय विकेंडचा. तिचं मन नाही मोडवत. अरे किती तरी दिवसानी आम्हाला एकमेकांसाठी इतका वेळ मिळतोय. I don't want to miss it. मनापासून सॉरी यार. नेक्स्ट टाईम नक्की भेटू."

आता नवरा आनंदाने हसून बायकोकडे वळतो 'काय करायचं राणी रविवारी आपण?'

हे सगळं ऐकताना बायकोच्या चेहर्‍यावर आनंदाच्या २-५ हजार छटा झळकून जातात. तिने मनातल्या मनात जगातल्या यच्चयावत वडांना दोरे गुंडाळलेले असतात, गायींना मणभर चारा भरवलेला असतो. पण नवर्‍याने फोन ठेवतेवेळी मित्राला म्हटलेलं सॉरी तिच्या मनात अडकून राहतं. मग न राहवून ती विचारते.

बायको - काय झालं रे?
नवरा - काही नाही गं?
बायको - फोन कुणाचा होता?
नवरा - अगं आपला शिर्‍या गं...
बायको - कोण शिर्‍या?
नवरा - अगं असं काय करतेस? माझा जुन्या कंपनीतला मित्र. जरासा उंच आणि गव्हाळ आहे.
माझी बायको - तुझ्याहून गव्हाळ? (हे वाक्य इथे गैरलागू आहे पण स्वानूभव लेखनात उमटलाच पहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. त्यामुळे आधीचं वाक्य पुन्हा घेऊन पुढे जाऊ.)
नवरा - अगं असं काय करतेस? माझा जुन्या कंपनीतला मित्र. जरासा उंच आणि गव्हाळ आहे.
बायको - अरे हो, आपल्या लग्नाला आले होते ना ते?
नवरा - बरोब्बर (गुलाबजामावरून पाक ओघळावा तसं चेहर्‍यावरून कौतूक ओघळतंय नवर्‍याच्या. बघून घ्या.)
बायको - काय झालं त्यांना? कसली पार्टी देतायत ते?
नवरा - अगं त्याचं प्रमोशन झालं मागच्या आठवड्यात
बायको - हो का? अरे वा...
नवरा - आणि आता कंपनी त्याला लगेच पुढल्या महिन्यात पुण्याला पाठवतेय, किमान १ वर्षासाठी.
बायको - अच्छा…
नवरा - म्हणून तो म्हणत होता की जायच्या आधी सगळ्यांना एकदा भेटायचंय. लग्नाआधी दिड-दोन वर्ष आमची भेटच नव्हती. आता आहे पुन्हा टच मधे.
बायको - आणि लग्नात कुठे काय बोलणं होतं. (इथे बायकोला लग्नाच्यावेळी हिला विसरून कोंडाळं करून फिदी-फिदी हसत आईसक्रीम झोडणार्‍या तिच्या जिवलग मैत्रीणी आठवत असतात.)
नवरा - आणि आता चालला बेटा पुण्याला.
बायको - अरे मग इतकं म्ह्णतोय तर भेट की, पुन्हा कधी योग येईल सांगता येतं का?
नवरा - काहीही काय अगं? आपला प्लॅन कधी पासून ठरलेला आहे. मागच्या शनिवारी पण असंच काही तरी झालं आणि आपला बेत रद्द करावा लागला. मला नाही आवडत असं. एक तर आपण एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही.
बायको - अरे ठीक आहे. आता रोज रोज का कुणी जुन्या मित्रांना भेटतं. जा तू... आपण पुढल्या विकेंडला बाहेर जाऊ...
नवरा - नको, मी त्याला आधीच नाही सांगितलंय. मला माझी बायको सगळ्यात महत्वाची आहे.
बायको - तुझी बायकोच सांगतेय तुला जा म्हणून.
नवरा - नाही म्हणजे नाही
बायको - हो म्हणजे हो... तुला माझी शप्पथ आहे.
नवरा - तू पण ना... शप्पथ नको घालूस. जातो मी.

बायको 'आपला नवरा कसला लय भारी आज्ञाधारक, माझं मन जपणारा, भावनाप्रधान, वगरे वगरे आहे' ह्या समजूतीत रमते आणि नवरा मनातल्या मनात हसत पण वरवर दु:ख दाखवत झोपी जातो.




----------------------------------------------------------------------------------------


घटना १ - बायकोचा दॄष्टीकोन

वेळ - गुरुवार अथवा शुक्रवार रात्र

पार्श्वभूमी - तुम्ही रविवारी रात्री नवर्‍यासोबत शॉपिंग आणि नंतर डिनर असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम बनवलाय. प्लॅनींग सुरू आहे. इतक्यात नवर्‍याला मित्राचा फोन येतो. (फक्त नवरा काय बोलतोय हे ऐकू येतं) पुढचं सगळं बोलणं आधीसारखं होतं.

बायको - कुणाचा फोन होता रे?
नवरा - अगं आपला शिर्‍या गं...
बायको - हो का? कसा आहे तो?
नवरा - तू ओळखतेस त्याला?
बायको - अरे, आपल्या लग्नाला आले होते ते.
नवरा - बरोब्बर, पण तुझ्या लक्षात आहे म्हणजे कमाल झाली (इथे नवर्‍याच्या डोक्यात प्रचंड वेगाने आकडेमोड सुरू आहे.) (पहिला पॉइंट सर)
बायको - काय झालं त्याला?
नवरा - अगं त्याचं प्रमोशन झालं मागच्या आठवड्यात
बायको - हो का? अरे वा...
नवरा - आणि आता कंपनी त्याला लगेच पुढल्या महिन्यात पुण्याला पाठवतेय, किमान १ वर्षासाठी.
बायको - अच्छा…
नवरा - म्हणून तो म्हणत होता की जायच्या आधी सगळ्यांना एकदा भेटायचंय. लग्नाआधी दिड-दोन वर्ष आमची भेटच नव्हती. आता आहे पुन्हा टच मधे.
बायको - अरे वा. मग बोलाव ना सगळ्यांना आपल्या घरी, मस्त पार्टी करू.
नवरा - घरी??? अगं तो बाहेर जायचं म्हणत होता.
बायको - बाहेर कशाला? मी करीन घरीच सगळं. शिर्‍याच्या बायकोला बोलावेन तयारीला आधी.
नवरा - तिला कशी ओळखतेस तू? (दुसरा पॉइंट सर)
बायको - झाली रे ओळख. माझ्या फ्रेंडलिस्ट मधे पण आहे ती. आम्ही खूप गप्पा मारतो. पण हा प्लॅन फिक्स्ड. सगळ्यांना उद्याच कॉल करून टाक.
नवरा - नको अगं तुला किती त्रास होईल... (तिसरा पॉइंट सर)
बायको - त्रास कसला अरे. आणि तू आहेसच ना मदतीला. सकाळी लवकर उठून करू सगळं पटापट.
नवरा - पण मग आपल्या प्लॅनचं काय?
बायको - आपण जाऊ रे पुढल्या आठवड्यात. पटकन कॉल कर शिर्‍याला आणि सांगून टाक.
नवरा - हो हो...

(नवरा फोन लावतो.)

अरे बायको म्हणतेय की घरीच पार्टी करूया आमच्या. तुझ्या बायकोला सकाळी बोलावून घेणार आहे मदतीसाठी. काय सांगतोस काय? हे कधी घडलं? ओके ओके. सांगतो मी बायकोला.

नवरा - अगं ऐकलंस का? शिर्‍याची ट्रांसफर रद्द झाली आहे. आता इथेच असणार आहे.
बायको - वा... मग आपला प्लॅन फिक्स्ड?
नवर - (काय बोलणार बिचारा) (मोहिम फत्ते)

घटना १ समाप्त.


समोरच्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्यात काय मजा असते. आणि तो समोरचा जर नवरा असेल तर अजूनच धमाल येते. ह्या वानगीदाखल घह्याल्या उदाहरणा वरून नवर्‍यांची सर्वसाधारण मेंटॅलिटी समजायला हरकत नाही.

ह्या भागात इथेच थांबू. पुढल्या भागात नवर्‍यांचे काही प्रताप, आजमावलेले हातखंडे आणि त्यावरचे पहिल्या धारेचे उतारे बघू. तोवर निर्लज्ज होण्याचा सराव सुरू असू द्या.



निर्लज्जपणे (पुन्हा क्रमश:)

Comments:

There are 20 comments for (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४