रावसाहेब

| Labels: | Posted On 3/14/11 at 6:30 PM


रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणं रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवीशी वाटणारी उब देत होती. म्हणजे, दिवस थंडीचे नव्हते, ती थंडी ए.सी.ची होती. मुंबईत राहून हिवाळा अनुभवायचा असेल तर एसी शिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. पुन्हा एकदा रावसाहेबांनी स्वतःला मऊ दुलईत गुरफटून घेतलं. मागचे काही दिवस हा त्यांचा नेहेमीचा उद्योग झाला होता. आताशा पूर्वीसारखे कुणी त्यांना सकाळी सकाळी उठवायच्या मागे लागलेले नसायचे. पूर्वी सकाळी घराचं जणू रणांगण झालेलं असायचं. ८ च्या आत आवरून घराबाहेर पडायची सगळ्यांची घाई असे. घरात २ बाथरूम्स असली तरी सकाळच्या घाईगडबडीत घरातल्या ५ माणसांना कमीच पडत. का कोण जाणे अप्पांनासुद्धा ८ वाजता देवळात हजर रहायची सवय होती. 'देव तिथे दिवसभर असतो, आमच्या ऑफिसच्या गडबडीनंतर तुम्ही तुमचं आवरत जा' ही तात्यासाहेबांची विनंती अप्पांनी कमी ऐकू येत असल्याच्या बहाण्याने अनेक वर्ष कानावरून घालवली होती.
एक एक जण स्वतःचं आवरून टेबलवर येऊन न्याहारी संपवत होता. रावसाहेब सगळ्यात शेवटी अंघोळीला जायचे. कावळ्याच्या अंघोळीसारखी अंघोळ उरकणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. आधी छान पैकी २ बादल्या उन पाणी काढून घेणे, हळूहळू प्रत्येक तांब्या मनापासून अंगावर ओतणे, मग निवांतपणे शँपू, बॉडी वॉश चोळणे, पुन्हा अंगाला छान मसाज करणे, २ बादल्या पाणी संपलं की शेवटी पुन्हा बाजूला काढून ठेवलेले १-२ तांबे डोक्यावरून ओतणे अशी साग्रसंगीत अंघोळ रावसाहेब रोज करत. तोवर सगळ्यांची न्याहारी होऊन सगळे घराबाहेर पडायला एकदम तय्यार असत. माई सोडून. रिटायर झाल्यापासून माई सहसा घराबाहेर पडत नसत. पण सकाळी ७ ला सगळं आवरून तयार होण्याची त्यांची गेल्या ४० वर्षांची सवय त्यांना मोडायची नसल्याने सकाळच्या गडबडीस त्यांचाही हातभार लागे. तयारी करून माई ऑफिसची पर्स धरून सोफ्यावर बसून असत.
रावसाहेबांची न्याहारी गाडीतच होत असे. माई नेहमी त्यांना भरपूर डबे देत. न्याहारीचा डबा, मधेच भूक लागली तर काही तरी जवळ असावं म्हणून एक डबा आणि दुपारच्या जेवणाचा ४ खणी डबा. ह्यातला एखादा डबा जरी भरलेल्या अवस्थेत परत आला तर संध्याकाळी रावसाहेबांना हजार प्रश्न विचारून माई भंडावून सोडत. 'आवडलं नाही का? वेळ मिळाला नाही का? भूक नव्हती का? दुसरं काही देत जाऊ का? बाहेरचं खाऊन खाऊन घरचं जेवण आवडेनासं झालं वाटतं?' इत्यादि प्रश्नांच्या भडिमारामुळे रावसाहेब नेहमी सगळे डबे संपवूनच परत आणत असत.
तात्या स्वतः गाडी चालवत. तात्या आणि अक्का दोघेही रग्गड कमावत असून ड्रायव्हर का नाही ठेवत असा विचार रावसाहेबांच्या मनात वरचेवर येत असे. रावसाहेब आरामात मागच्या सीटवर बसत, तात्या ड्रायव्हर सीट वर आणि अक्का तात्यांच्या बाजूच्या सीटवर. गाडीत बसल्यापासून तात्या ट्रॅफिकला शिव्या घालायला सुरुवात करत असत. रिक्षावाले हा त्यांचा शिव्या घालण्याचा हक्काचा आयटम. शिवी घातली की मागे रावसाहेब बसलेत हे जाणवून तात्या जीभ चावत आणि आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या रावसाहेबांकडे बघत. रावसाहेब खिडकीतून बाहेर बघत आहेत हे बघून त्यांनी शिवी ऐकली नसावी असं स्वतःच समाधान करून घेत. पण रावसाहेबांना आता शिव्या अंगळवाणी पडलेल्या असल्याने ते तात्यांकडे दुर्लक्ष करत. किंबहून तात्यांना अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून रावसाहेब मुद्दामच लक्ष नसल्याचं सोंग आणत.
माईने बांधून दिलेली न्याहारी संपवेपर्यंत रावसाहेबांची उतरण्याची जागा आलेली असे. आपण उतरलो की अक्का अंमळ तात्यांजवळ सरकून बसते हे रावसाहेबांनी बघितलं होतं. ते हसूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. अक्कांना सोडून तात्या त्यांच्या ऑफिसला जात असत. घरी सगळ्यात आधी रावसाहेबच परत येत असत. घर जवळ असल्याने निघाल्यापासून ३० मिनिटात ते घरी असत. माई त्यांची वाटच बघत असे. आल्या आल्या त्यांना काही तरी खायला करून देणे हा माईच्या दिवसातला हायपॉइंट असे. दुपारचं जेवण नुकतंच झालं असल्याने फारशी भूक नसली तरी प्रश्न नकोत म्हणून रावसाहेब समोर येईल ते गपगुमान गिळून आपल्या खोलीत जात असत.
घरी सगळ्यात उशीरा तात्या येत. किमान एकवेळचं जेवण सगळ्यांनी एकत्र घ्यावं असे तारे तात्यांनी एकदा तोडल्यापासून रावसाहेब तात्यांवर बारीक लक्ष ठेऊन होते. आणि हे तात्यांनाही माहित असल्याने तात्या जेवण्याच्या वेळेपर्यंत तरी पोचायचा प्रयत्न करत. कधी कधी उशीर होत असे पण तेव्हढं रावसाहेब चालवून घेत. जेवता जेवता सगळे जण आजच्या दिवसात काय काय घडलं हे इतरांना सांगत. जेवण झालं की मग सगळे समोरच्या बागेत चक्कर मारायला जात. रावसाहेबांन खरं तर झोप अनावर झाली असे. पण तरी ते कसे बसे पाय ओढत सगळ्यांसोबत फिरत. रावसाहेबांची पावलं अडखळू लागली की सगळे माघारी फिरत.
असा एकंदरीत रावसाहेबांचा दिवस असे. पण मागचे काही दिवस सगळं बदललं होतं. तात्या आणि अक्काची गडबड मात्र पूर्वीसारखीच होती. एकमेकांमुळे उशीर झाल्याचा आरोप एकमेकांवर करणेही पूर्वीसारखेच होते. रावसाहेब आपल्या खोलीत पडल्यापडल्या त्याची मजा घेत.
सद्ध्याचा हा दिनक्रम त्यांना मनापासून आवडत होता. माईसुद्धा आताशा त्यांच्या फार मागे लागत नसे. स्वप्नवत वाटावं असं आयुष्य रावसाहेब सद्ध्या जगत होते. पण हे सगळं लवकरच संपणार ह्याची जाणीव असल्याने ते मधूनच अंमळ दु:खीही होत. जमतंय तितके दिवस मजा करून घ्यावी असा विचार करून ते मनावर साचलेलं मळभ झटकत आणि पुन्हा कूस बदलत. रावसाहेबांच्या ह्या बदललेल्या आयुष्याचं कारण त्यांना माहित होतं. खरं तर ते ह्या दिवसांची मनापासून वाट बघत होते. रावसाहेब आनंदात होते. अजून थोडावेळ अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी पुन्हा एकदा कूस बदलली. आता तात्या आणि अक्कासोबत आवरून तयार व्हायची घाई नव्हती. आता त्यांना उठवायला कुणीही येणार नव्हतं. आता लवकर अंघोळ करायला कुणीही सांगणार नव्हतं.
कारण रावसाहेबांची वार्षीक परीक्षा संपून आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती.

Comments:

There are 6 comments for रावसाहेब