चाळ तशीच आहे

| Labels: | Posted On 5/10/20 at 8:09 PM


आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच.

१०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही.

पण चाळ तशीच आहे. पायर्‍या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात.

चाळीतले ते बोळ आणि जिनेही तसेच आहेत. दोन्ही हात पसरून चालता येणार नाही इतक्या अरुंद बोळात काय काय उद्योग केले आम्ही. कॅरम, क्रिकेट, गोट्या... कधी कधी सगळं एकाच वेळी. त्यावेळी आम्ही लहान होतो म्हणून त्या जागेत मावायचो. त्यावेळचे मोठेही मावायचे हे विशेष. घरात चपला नको म्हणून दरवाज्याबाहेर चपलेचा स्टँड ठेवायचा अगोचरपणा बोळासमोर दरवाजे असलेल्यांनी कधी केला नाही हे उपकारच. चपला घराबाहेर बोळात कुणीच ठेवायचं नाही कारण एखादा हौशी कलाकार जाता जाता उगाच म्हणून चपलेचा फुटबॉल करायचा. मध्यंतरी बोळातला कोबा काढून तिथे लाद्या बसवण्यात आल्या. पण जिथे उखडलंय तितकंच पॅचवर्क करून ठीक करता येण्याचा गुण लादीत नसल्याचे लक्षात आल्याने काही वर्षांनी पुन्हा कोब्याचे आगमन झाले.

चाळीत घरांची दारं सतत सताड उघडी असल्याने लोकांच्या घरात जाऊन खेळायला कुणाला कधी लाज वाटली नाही आणि लोकांनाही कधी मुलांची अडगळ वाटली नाही. दारं सतत उघडी ठेवावी लागायची कारण माणसांप्रमाणेच हवा आणि प्रकाश ह्यांनाही आत येण्याचा तो एकच मार्ग होता. खिडकीची चैन फक्त कोपर्‍यातल्या घरांना. पण त्या खिडकीचा मुख्य उपयोग खालच्या हाऊसगल्लीचे गार्बेज-शूट म्हणूनच जास्त व्हायचा. कारण ६ फुटावरील समोरच्या चाळीतले घर हे काही खिडकीत बसून बघण्यासारखे विहंगम दॄष्य नव्हे.

लहानपणी आवडलेल्या आणि हव्याशा वाटणार्‍या अनेक गोष्टी आपण सहज विसरून जातो. आमच्या चाळीत काही स्वतंत्र स्वतःची गच्ची असलेली घरं होती. म्हणून नाव 'गिरगाव टेरेसेस'. जेव्हा आम्ही स्वत:चं 'गच्चीसह' घर घेतलं तेव्हा अचानक आठवलं 'लहानपणी गिरगावात राहताना आपल्याला कायम वाटायचं आपलंही गच्ची असलेलं घर असावं'. हे तेव्हा आठवल्याने एकदम छान वाटलं आणि उगाचच एक क्लोजरचं फिलिंग आलं. गणपती बाप्पा मोरया..

चाळीच्या मालकाशिवाय अनेकजण इथे राहून गेले. इथेच जन्म होऊन इथूनच वैकुंठस निघालेलेही अनेक आहेत. सगळं आयुष्य त्या १०-१५ च्या खोलीत. आता तिथे त्यांची मुलं. ती सुद्धा रिटायरमेंटला आली. आजोबांची गॅलरीतली खुर्ची आता नातू चालवतो.

आज स्वखुशीने परत चाळीत रहायला जाईन का? माहिती नाही. बहुतेक तरी नाहीच. एकटाच असतो तर गेलोही असतो कदचित. आज गॄहीत धरत असलेल्या अनेक बेसिक गोष्टींची चाळीत जाणवण्याइतपत कमतरता आहे. पण चाळीत रहायची खरी मजा ही तिथल्या वैयक्तीक कमतरेत आणि सार्वजनीक मुबलकतेतच तर आहे.

अनेकांच्या चाळींविषयी अनेक आठवणी आहे, आमच्याही आहेत. हजारो चाळींसारख्याच त्याही हजारातल्या एक आहेत.

चाळही तशीच आहे.
.

आपला,

आदि जोशी पण तसाच आहे.
-----------------------------------

त. टी. १: लेख अर्थातच 'चाळीचे चिंतन' वरून प्रेरित आहे. पण एका महान लेखकाने लिहून ठेवलंय - 'राजहंसाचे चालणे, जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कवणे...'

त. टी. २: कुणाला लेख दुसर्‍याला पाठवायचा असेल तर नावासकट/नावाशिवाय/स्वतःच्या नावाने हवा तसा पाठवा. विचारायची गरज नाही. आमाला प्रॉब्लेम नाय. जिथे प्रतेक्ष ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी कॉपिराईट नाही घेतला तिथे आपण कोण कवण?