चाळ तशीच आहे

| Labels: | Posted On 5/10/20 at 8:09 PM


आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच.

१०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही.

पण चाळ तशीच आहे. पायर्‍या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात.

चाळीतले ते बोळ आणि जिनेही तसेच आहेत. दोन्ही हात पसरून चालता येणार नाही इतक्या अरुंद बोळात काय काय उद्योग केले आम्ही. कॅरम, क्रिकेट, गोट्या... कधी कधी सगळं एकाच वेळी. त्यावेळी आम्ही लहान होतो म्हणून त्या जागेत मावायचो. त्यावेळचे मोठेही मावायचे हे विशेष. घरात चपला नको म्हणून दरवाज्याबाहेर चपलेचा स्टँड ठेवायचा अगोचरपणा बोळासमोर दरवाजे असलेल्यांनी कधी केला नाही हे उपकारच. चपला घराबाहेर बोळात कुणीच ठेवायचं नाही कारण एखादा हौशी कलाकार जाता जाता उगाच म्हणून चपलेचा फुटबॉल करायचा. मध्यंतरी बोळातला कोबा काढून तिथे लाद्या बसवण्यात आल्या. पण जिथे उखडलंय तितकंच पॅचवर्क करून ठीक करता येण्याचा गुण लादीत नसल्याचे लक्षात आल्याने काही वर्षांनी पुन्हा कोब्याचे आगमन झाले.

चाळीत घरांची दारं सतत सताड उघडी असल्याने लोकांच्या घरात जाऊन खेळायला कुणाला कधी लाज वाटली नाही आणि लोकांनाही कधी मुलांची अडगळ वाटली नाही. दारं सतत उघडी ठेवावी लागायची कारण माणसांप्रमाणेच हवा आणि प्रकाश ह्यांनाही आत येण्याचा तो एकच मार्ग होता. खिडकीची चैन फक्त कोपर्‍यातल्या घरांना. पण त्या खिडकीचा मुख्य उपयोग खालच्या हाऊसगल्लीचे गार्बेज-शूट म्हणूनच जास्त व्हायचा. कारण ६ फुटावरील समोरच्या चाळीतले घर हे काही खिडकीत बसून बघण्यासारखे विहंगम दॄष्य नव्हे.

लहानपणी आवडलेल्या आणि हव्याशा वाटणार्‍या अनेक गोष्टी आपण सहज विसरून जातो. आमच्या चाळीत काही स्वतंत्र स्वतःची गच्ची असलेली घरं होती. म्हणून नाव 'गिरगाव टेरेसेस'. जेव्हा आम्ही स्वत:चं 'गच्चीसह' घर घेतलं तेव्हा अचानक आठवलं 'लहानपणी गिरगावात राहताना आपल्याला कायम वाटायचं आपलंही गच्ची असलेलं घर असावं'. हे तेव्हा आठवल्याने एकदम छान वाटलं आणि उगाचच एक क्लोजरचं फिलिंग आलं. गणपती बाप्पा मोरया..

चाळीच्या मालकाशिवाय अनेकजण इथे राहून गेले. इथेच जन्म होऊन इथूनच वैकुंठस निघालेलेही अनेक आहेत. सगळं आयुष्य त्या १०-१५ च्या खोलीत. आता तिथे त्यांची मुलं. ती सुद्धा रिटायरमेंटला आली. आजोबांची गॅलरीतली खुर्ची आता नातू चालवतो.

आज स्वखुशीने परत चाळीत रहायला जाईन का? माहिती नाही. बहुतेक तरी नाहीच. एकटाच असतो तर गेलोही असतो कदचित. आज गॄहीत धरत असलेल्या अनेक बेसिक गोष्टींची चाळीत जाणवण्याइतपत कमतरता आहे. पण चाळीत रहायची खरी मजा ही तिथल्या वैयक्तीक कमतरेत आणि सार्वजनीक मुबलकतेतच तर आहे.

अनेकांच्या चाळींविषयी अनेक आठवणी आहे, आमच्याही आहेत. हजारो चाळींसारख्याच त्याही हजारातल्या एक आहेत.

चाळही तशीच आहे.
.

आपला,

आदि जोशी पण तसाच आहे.
-----------------------------------

त. टी. १: लेख अर्थातच 'चाळीचे चिंतन' वरून प्रेरित आहे. पण एका महान लेखकाने लिहून ठेवलंय - 'राजहंसाचे चालणे, जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कवणे...'

त. टी. २: कुणाला लेख दुसर्‍याला पाठवायचा असेल तर नावासकट/नावाशिवाय/स्वतःच्या नावाने हवा तसा पाठवा. विचारायची गरज नाही. आमाला प्रॉब्लेम नाय. जिथे प्रतेक्ष ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी कॉपिराईट नाही घेतला तिथे आपण कोण कवण?

बोळा निघाला, पाणी वाहतं झालं :-)

| Labels: | Posted On 10/31/18 at 12:24 PM

मराठी भाषा दिनानिमित्त झी मराठी दिशामधे प्रकाशित झालेला लेख

सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्‍याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस्य आहे.
नवी पिढी मराठीत बोलत नाही, रोजच्या जगण्यातून आणि व्यवहारातून मराठी हद्दपार होत आहे अशी ओरड सुरु आहे. आणि ही ओरड मराठीतच सुरु आहे. पण खरंच तशी परिस्थिती आहे का? काही वर्षांपूर्वी थोड्याफार प्रमाणात होती. आणि आता बर्‍याच प्रमाणात नाही. पण हे जे काही मागच्या काही वर्षात होतं ते मराठी माणसाच्या मराठी विषयीच्या आटत चाललेल्या किंवा पातळ होत असलेल्या मायेमुळे नव्हे.
सामान्यपणे व्यक्त व्हायला गरज असते माध्यमाची आणि पूर्वी ती फारच कमी प्रमाणात उपलब्ध होती. म्हणजे एखाद्याला काही लिखाण करायचं असेल तर डायरी, कवितांची वही ह्या पलिकडे शक्यता नसायची. जगापर्यंत पोचायचं तर काही मासिकं आणि वाचकांचा पत्रव्यवहार हीच साधनं होती, पण ती ०.०१ लोकांनाही सहज उपलब्ध नव्हती. स्वतःला वेगवेगळ्याप्रकारे सिद्ध करून, खपेल असं लिखाण करून, प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढून, पुस्तक विकले जाण्यासाठी नवस बोलून लेखक होणे ही प्रक्रिया अतिप्रचंड वेळखाऊ आहे.
पण काही काळापूर्वी क्रांती झाली. संवाद माध्यमांची क्रांती. आंतरजालाने केवळ माहितीचा रूक्ष स्त्रोत हे स्वतःचे रुपडे पालटून मनोरंजनाचे साधन हा अवतार धारण केल्यापासून लोकांना व्यक्त होण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध झाली. त्यात भर पडली फोनेटिक युनिकोड फाँट्सची. इंग्रजी किबोर्ड वापरून मराठी अक्षरं उमटायला लागल्यावर लोकांच्या प्रतिभेला अक्षरशः नवा बहर आला.
पूर्वी आंतरजालाची भाषा जी मुख्यत्वे इंग्रजी होती ती आता प्रत्येकासाठी वेगळी झाली. सोशल मिडियाने केवळ लोकांना एकत्रच आणले नाही तर त्यांना त्यांच्या भाषेत संवाद साधायचाही पर्याय दिला. आणि हे झाल्यावर जनता सुटलीच. जगाच्या कानाकोपर्यात वसलेल्या मराठी जनांना ह्या www ने मराठी भाषेच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र आणलं.
ह्या जगात वावरणारी लोकं बघितली, नवी पिढी अथवा जुनी, तर एक गोष्ट सहज लक्षात येते की इथे मराठी माणूस मुख्यत्वे मराठीतच व्यक्त होतो. अनेक संस्थाळं, ब्लॉग्स, फेसबुक पेजेस ह्यांनी मराठी माणसाला मराठीतून संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. लोकांना व्यक्त व्हायला आणि त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवायला नवी माध्यमं उपलब्ध झाली. आता एखाद्याला त्याची कथा, कविता, संपादकांकडून साभार परत यायची धाकधूक न बाळगता आपल्या फेसबुक पेज, ब्लॉगवर लगेचच टाकता यायला लागली.
अनेक वर्षांनी माळे साफ करताना एखादी जुनी वही सापडून साक्षात्कार व्हायचा 'अरे, आपली आई किती छान कविता करायची'. मराठीत अशा उत्तम लेखक, कवयित्री असलेल्या अनेक जणी आहेत. पण हे त्यावेळी स्वतःपुरतं मर्यादीत होतं कारण दुसरा पर्यायच नव्हता. मासिकं आणि पेपरवाले तरी कुणाकुणाचं आणि किती छापणार? साहित्य सेवा करायचा उदात्त हेतू असला तरी आर्थिक गणित जुळवताना नवोदितांपेक्षा प्रस्थापितांना झुकतं माप मिळणं स्वाभाविकच होतं. क्षमता असूनही संधी न मिळालेले अनेक लेखक आणि त्यांच्या लिखाणाला डायरीतून बाहेर काढायला ही क्रांतीच कारणीभूत आहे.
महत्त्वाचं म्हणजे 'राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कवणे चालोची नये?' ह्याप्रमाणे प्रत्येकालाच उत्तम लेखक होता येत नसले तरी व्यक्त होणे ही प्रत्येकाचीच गरज असते. त्यामुळे 'सुघटीत लिहिता येत नाही म्हणून लिहूच नये की काय?' ह्या प्रश्नाला सामोरे जायचे बळही सोशल मिडियानेच दिले. वर्तमानपत्र अथवा अजून कुठे लिहून ते लोकांना आवडेल का? लोकं काय म्हणतील? ही भीड चेपली जाऊन नवे प्रयोग करून बघायचा आत्मविश्वास वाढीला लागला. अक्षरास हसू नये टाईप लाज जाण्याची भीती चेपून माझ्या वॉलवर मी न लाजता काहीही लिहेन हा आत्मविश्वास निर्माण झाला. थोडक्यात मुक्तछंदाने अनेक कवींची जी सोय केली तीच सोय ह्या नव्या माध्यमाने लेखकांची केली.
आज मराठी साहित्य विश्वात ही नव्या लेखकांची, नव्या वाचकांची पिढी फार मोठे बदल घडवत आहे. एक वैयक्तीक ब्लॉग लेखक ते प्रत्यक्ष पुस्तकांचे लेखक हा प्रवास बर्‍याच जणांनी परंपरेने चालत आलेल्या पायर्‍या ओलांडून अल्पावधीत पार केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुस्तकांची विक्रीही सुद्धा पूर्णपणे ह्याच माध्यमातून होत आहे. उदाहरणार्थ, आपल्या फेसबुकवरील ललित कथांचे पुस्तक ते भयकथा आणि गुन्हेगारी कथांचे संग्रह प्रकाशीत करणारे सचिन परांजपे ह्यांनी आपले लिखाण लोकांपर्यंत पोचवून आपला स्वतःचा असा वाचक वर्ग ह्याच सोशल मिडियातून उभारला आहे. मंदार जोग ह्यांनीही ह्याच माध्यमाच्या ताकदीचा प्रभावी उपयोग करून आपल्या पुस्तकांचे लेखन, जाहिरात आणि प्रकाशन केले. पुस्तकांच्या अर्ध्याहून अधीक प्रती प्रकाशनापूर्वीच ह्याच माध्यमातून विकल्या. आणि ही दोन केवळ प्रातिनिधिक उदाहरणं झाली.
सार्वजनीक लेखनाचा श्रीगणेशा इथून करणारे जसे अनेक इथे आहेत तसेच नवोदित लेखकांना समजून घेऊन चार युक्तीच्या गोष्टी सांगणारे ज्येष्ठ लेखकही आहेत. लेखकांसोबतच अनेक नवे वाचकही इथे निर्माण झाले कारण त्यांनाही आता साहित्य सहजपणे उपलब्ध होऊ लागले. फेसबुक, ब्लॉग्ज, वेबसाईट्स ह्यांनी लेखक आणि वाचक ह्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर उभे केले. पूर्वी लेख लिहिला तर वाचकांचे पत्र येईपर्यंत तो लोकांना कसा वाटला हे लेखकाला समजायची सोय नसे. आता मात्र लेख वाचला की लगेच तो कसा वाटला हे सांगण्याचीही सोय निर्माण झाली आहे.
आणि एकदा इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठीतून संवाद होऊ लागल्यावर नव्या पिढीली ही आपली भाषा आहे आणि आपणच ती जपायला हवी हे सुद्धा मनापासून पटले. त्यामुळेच स्वतःच्या ब्लॉगवर आवर्जून फक्त आणि फक्त मराठीतच लिहिणे असो की मराठी दिनानिमित्त वाचक कट्टे भरवणं असो, सगळं काही इथे नव्याने सुरू झालं. नवी पिढी भलेही जुन्या पिढीसारखं खिडकीत बसून कादंबर्‍या वाचत नसेल, पण ह्या आंतरजालाच्या खिडकीत आवर्जून मराठीच वाचली जाते.
अर्थात ह्या सगळ्या मंथनातून सुंदर सुप्रभातचे रतीब घालणारे, J1 झालं का? च्या जिलब्या पाडणारे, बॅनर मंत्री, मीम सम्राट अशी रत्नही बाहेर आली हा वेगळा भाग. पण लोकं मराठीत लिहिती झाली, बोलती झाली ही फार मोठी गोष्ट आहे. लोकं आपल्या मातॄभाषेत व्यक्त होऊ लागली. संवादाच्या माध्यमाचा बोळा निघाला, पाणी वाहतं झालं.
-
आदि जोशी

थंडी गॉन… घाम ऑन!!!

| Labels: | Posted On at 12:19 PM

चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो?
लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही. पण आजकाल कसलाच भरवसा राहिला नाही हेच खरं.
काही गोष्टींसाठी मुंबईकर एकदम अनप्रिपेअर्ड असतात. उदा.: पहिल्याच रिक्षा/टॅक्सी चालकाने आपल्यालं हवं तिथे यायला हो म्हणणे, कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळी ट्रेन रिकामी दिसणे, फुटपाथवर चक्क चालायला जागा असणे... ह्यातच थंडी अनुभवणे ह्या गोष्टीचा समावेश आहे. मुंबईकरांनी थंडीची अजिबात म्हणजे अजिबातच सवय नाही. नाही म्हणजे इतकी नाही की मुंबईकरांचे एसी सुद्धा कधी २०-२२ डिग्रीच्या खाली चालत नाहीत.
जगबुडी होत असताना मुंबईकर अगोचरपणा करून पाण्यातून चालत घरी जातील, रॅकवर ठेवलेल्या बॅगेत बाँब असू शकतो ही सूचना ऐकत उभ्या उभ्या झोप काढतील, इतकंच नव्हे तर ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर घाबरत नाही कारण 'वॉर्मींग झालंच तर फार फार तर अजून थोडा घाम येईल, त्यात काय...'.
पण... पण... पण... थंडीत करायचं काय हे मात्र त्यांना कळत नाही. पंखा लावायचा नाही तर झोप कशी येणार? गरम हवा खोलीभर फिरवण्यासोबत मुंबईतल्या पंख्याचे मुख्य काम म्हणजे एका लईत आवाज करून माणसांना गाढ झोपवणे. ही अंगाई बंद झाल्यापासून झोपही उडाली.
असे एकंदरीत कठीण दिवस सुरू होते. खिशातले रुमाल कोरडे राहत होते. पंख्यावर जळमटं साठत होती. 'फिलींग कूल इन मुंबई' असे अपमानास्पद हॅशटॅग फिरवले जात होते. 'मुंबईत ॠतू दोनच' हे ब्रह्मवाक्य बदलावं लागतं की काय अशी वेळ आली होती. स्वतःच्याच घरात 'बबन चड्डी आणि बनियान' ह्या जागतीक युनिफॉर्मवर वावरायची सोय राहिली नव्हती. स्वेटर, शाली, दुलया ह्या शोभेच्या वस्तूंची घडी मोडावी लागते की काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कॄपेने शेवटी आज तो आलाच.
ऑफिसला जात असताना कानामागून ओघळणारा, आपण मुंबईतच असल्याची खात्री पटवणारा, माझा नवसाचा घामाचा थेंब.

-
अट्टल मुंबईकर,
आदि जोशी

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

| Labels: | Posted On 3/15/18 at 5:25 PM


.
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
.
अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे.
रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते.
प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो. साबणालाही भावना असतात. मन स्वच्छ करणारा साबण मात्र कुणी बनवला नाही. पण काहीही असलं तरी 'नाही निर्मळ मन, काय करील साबण...' असं म्हणून अंघोळ टाळणं हा पलायनवाद आहे. पाणी वाचवायचे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं. भावना उचंबळत्या, विचार प्रगल्भ आणि जाणीवा टोकदार असल्या की आयुष्याला नवी दिशा मिळते.
आयुष्य फार सुंदर आहे. फक्त नजर हवी. सकाळी जेव्हा चहा पितो तेव्हा त्यातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच अस्तीत्व एकमेकांत विरघळवून टाकलेलं असतं. चहा पावडर, दूध, साखर, आलं, गॅस... प्रत्येकानी स्वतःची चव जपली तर चहाची चव येणार कशी? आणि चहाची चव आली नाही तर किक न बसल्याने सुखाच्या प्रत्येक अनुभुतीसाठी कुंथावं लागणार. तसंच आयुष्याचं आहे. कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच वेगळं अस्तीत्व जपलं तर घरात आणि लोकल ट्रेनच्या डब्यात फरक तो काय? सगळे एकत्र बसणार, जाणारही एकाच ठिकाणी... पण कुणाचा कुणाशी संबंध नाही. मोटरमनरुपी आई आणि गार्डरुपी बाप ह्यांच्यामधे पोरं चेन खेचायची वाट बघत बसतील. गंमत बघायला जमणारे पाकिटमार नातेवाईक वेगळेच.
सकाळी पेपर पूर्ण वाचून झाल्यावर त्या २०-२२ पानांमधल्या ठळक बातम्याच केवळ लक्षात राहतात, फाफट पसारा विस्मॄतीत जातो. तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्‍या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या. वर्तमानपत्राचा उपयोग दुसर्‍या सकाळी कशासाठी केला जातो ते माहिती आहेच. जशा आपल्याला आठवणी असतात तशाच लोकांनाही असतात. त्यामुळे लोकं आपल्याला कसं आठवतात हे सुद्धा महत्वाचं आहे. काही गोष्टींचा वापरानंतर कचरा होतो, पण फुलांचं मात्र निर्माल्य होतं.
आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्‍या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे. शेणावरून आठवलं, गाईच्या शेणाला पंचगव्यात स्थान आहे; बैलाच्या शेणाला मात्र बुलशीट म्हणतात.
अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं.
आठवणींची अंडी मात्र उबवू नये.

आपला,
आदि जोशी

दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेचे उमाळे

| Labels: | Posted On at 5:24 PM


आज कैक वर्षांनी शाळेच्या गॄपने त्यांच्या बॅचचे स्नेहसंमेलन करायचे ठरवले होते. तसा बाब्या इतक्या वर्षांनी सगळ्यांना परत भेटण्यास शष्पभरही उत्सुक नव्हता. प्रत्यक्ष शाळेत असतानाही बाब्याची शाळेत जायची अजिबात इच्छा होत नसे.
एक तर ह्या शाळेच्या गॄपने त्याला वात आणला होता. रोज सकाळी गुरु = देव, शाळा = देवालय, विद्यार्थी = दगड, शिक्षक = मूर्तीकार असले मेसेज वाचून त्याचं डोकं सरकायचं. लोकांना शाळेच्या आठवणीने भरून वगैरे यायचं, आपण आज आहोत ते शाळे मुळे वगैरे जिलब्या तर नेहेमीच्याच होत्या. पण आपल्या आजच्या कारकुनी आयुष्यात शाळेचे योगदान नक्की काय हे बाब्याला न सुटलेले कोडे होते. बाब्याच्या शाळेच्या आठवणी एक तर अत्यंत त्रासदायक अथवा न्युट्रल ह्या प्रकारात मोडणार्‍या होत्या.
सगळ्यात त्रासदायक आठवण म्हणजे तो नववीत असताना शाळेने सुरु केलेला सार्वजनीक रक्षाबंधनाचा आचरटपणा. ज्या वयात वॅलेंटाईन डे साजरा करायचा त्या वयात जबरदस्तीने सगळे सगळ्यांचे वर्गबंधू आणि वर्गभगीनी. पुढे जाऊन ह्यातल्याच २-४ वर्गबंधू-भगिनींनी लग्नही केले होते.
जसजसा दिवस जवळ येऊ लागला तशी गॄपवर स्नेहसंमेलनाची चर्चा जोरात रंगू लागली. अमेरिकेत नोकरीला असलेला एक वर्गमित्र आणि अमेरिकेत नोकरीला असलेल्या मुलाशी लग्न करून अमेरिकेत गेलेली एक वर्गमैत्रीण हे खास ह्या संमेलनासाठी येणार असल्याने खास त्यांच्या सोयीची तारीख ठरवण्यात आली. ह्यावर 'आम्ही काय रिकामे पडलोय काय?' असा प्रश्न बाब्याने अर्थातच मनातल्या मनात विचारला. खरं तर ते दोघं भलत्याच कामासाठी इथे येणार असल्याने एकाच मांडवात दोन्ही लग्न उरकून घेऊ असा विचार करून त्यांनी संमेलनाची तारीख त्यांच्या सोयीने ठरवायला भाग पाडलं होतं.
पण एका गोष्टीसाठी बाब्याला शाळेत जायचं होतं ते म्हणजे मास्तरांना भेटणे. ज्यांनी आपले शालेय जीवन अत्यंत असह्य केले ते सगळे मास्तर आता नक्की कसे आहेत आणि इतक्या वर्षांनी आपल्याला सर ओळखतील का हे त्याला जाणून घ्यायचं होतं. कैक वर्षांपूर्वी एकदा त्याला समोरून येताना बघून मराठीच्या सरांनी रस्ता बदलला होता हे त्याला अजूनही आठवत होतं. गणिताचे सर पाढे विचारतील ह्या भीतीने तो त्यांना बघून स्वतःच रस्ता बदलत असे.
होता होता तो दिवस उजाडला. बाब्या तसा शाळेसमोरून बर्‍याच वेळा जात असे पण आज जवळपास २० वर्षांनी त्याने शाळेत पाऊल ठेवलं. सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. ह्या पायरीवर आपटलो होतो, ह्या कोपर्‍यात उभे असायचो, ह्या बाल्कनीमधे ओणवे असायचो, ह्या खिडकीची काच आपण फोडली होती मग सरांनी आपल्याला तडकवले होते...
अमेरिकेहून आलेल्या मैत्रीणीने ऐनवेळी टांग दिल्याने दोन चार मित्र गळले होते. अमेरिकेहून आलेल्या मित्राच्या भोवती सगळे गोळा होऊन सिंदबादच्या सात सफरी ऐकत होते. मित्रही आपल्याला अमेरिकेत असल्याचा अभिमान नसल्याचा आव आणून जसं बोलता येईल तसं बोलत होता.
मुलांचा, आम्ही अजून कसे फिट आहोत हे दाखवण्याचा आणि मुलींचा, आम्ही अजून कशा अवखळ आहोत हे पटवण्याचा आटापिटा सुरु होता.
एका बाजूला सगळे शिक्षक होते. त्यातल्या एक सरांच्या समोर बाब्या जाऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सर अत्यंत आनंदाने म्हणाले... अर्थातच ओळखलं. कसा आहेस? काय चाललंय सद्ध्या? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX?
बाजूच्या इतर मुलांनाही त्यांनी तेच प्रश्न विचारल्याने बाब्या काय ते समजला.
पुढे दिसले त्यांचे मुख्याध्यापक. इतकं वय होऊनही ते आले होते. ह्यांचं आणि बाब्याचं साताजन्माचं वैर असल्यागत ते बाब्याला कुदवायचे.
त्यांच्या समोर जाऊन बाब्या उभा राहिला आणि त्यांना विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सरांनी त्याला एकदा न्याहाळलं आणि प्रेमाने विचारलं... कसा आहेस काशी?
बाब्याची तार सटकली. काशी हा शाळेचा घंटा बडवणारा प्यून होत. काशी समजल्याचा राग नाही, पण, ज्याला तुम्ही इतकी वर्ष घंटेसारखं बडवलत त्याला तुम्ही ओळखू नये ह्याचा बाब्याला प्रचंड सात्विक संताप आला. राग आणि अपमान गिळून बाब्या पुढे गेला.
दोन शिक्षिका गप्पा मारत बसल्या होत्या. त्यातल्या एक भुगोलाच्या शिक्षिका होत्या, दुसर्‍या त्याला आठवत नव्हत्या. बाब्याने बाईंना वाकून नमस्कार केला आणि तसाच शेजारच्या बाईंनाही केला. त्या बरोब्बर त्या दुसर्‍या बाई उठून उभ्या राहिल्या, बाब्याच्या पाठीत एक जोरात गुद्दा घातला आणि वैतागून म्हणाल्या 'अरे डुकरा नमस्कार कसला करतोस... वर्गात होते मी तुझ्या...' लगेच त्याच्याही डोक्यात प्रकाश पडला. इतकी वर्ष होऊनही आपल्या वर्गमैत्रीणी तशाच हिंसक आहेत हे जाणवून त्याला जरा बरे वाटले.
नंतर भाषणं झाली. त्यात आपल्याला शाळेने कसं घडवलं, शाळा नसती तर मी नसतो, आई वडिलांपेक्षाही शिक्षकांनी कसं समजून घेतलं, शाळेचा बिल्ला अजून कसा जपून ठेवलाय, एमबिएपेक्षा शाळेत मॅनेजमेंट जास्त शिकलो, शाळेतल्या खेळाची मजा ऑलिंपिक गेम्सनाही कशी नाही... असे कैक मुद्दे मांडले गेले. चॅलेंज गेम मधे एकाने दोन एक्के टाकल्यावर पुढच्याने ३ एक्के म्हणावं तसला प्रकार होता सगळा. एका भाषणात तर इतकी गोल गोल भाषा होती की हे आपले शिक्षक अर्जुनाला गीता सांगणार्‍या कॄष्णाचेच अवतार आहेत ह्याची बाब्याला खात्री पटली. शिक्षकांना हे आधीपासून माहिती होतेच.
एकदंरीत आजचा दिवस फुकट गेला असं बाब्याच्या मनात आलं. त्यापेक्षा ४ तास घरी झोपलो असतो.
संमेलन संपता संपता एक सर भेटले. इतर शिक्षकांप्रमाणेच हे सुद्धा आपल्याला नक्की ओळखणार नाहीत ह्याची खात्री बाळगून बाब्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
त्यावर ते ओळखीचं हसून म्हणाले... अजूनही पेन्सिल खातोस का?
हे ऐकल्यावर मात्र बाब्याचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडायला लागला. 'ओळखलंत का सर मला?' ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला एकदाचं मिळालं होतं.

आपला,
आदि जोशी

दवणीय अंडी - अंडे २रे - नात्यांची श्रीमंती

| Labels: | Posted On at 5:22 PM


एसीने थंडगार झालेल्या आपल्या रूममधल्या गुबगुबीत गादीवर ब्लँकेट ओढून झोपलेल्या बंड्याने अजून एकदा कूस बदलली. त्याला काही तरी टोचल्याची भावना झाली. अर्धवट झोपेत असल्याने 'सुख टोचत असेल' असा विचार मनात येऊन त्याने ब्लँकेटखाली हात घातल्यावर टोचणारी वस्तू सुख नसून चार्जरची पीन आहे हे त्याच्या लक्षात आले.
आजकाल बंड्या जरा अस्वस्थच असे. ह्याच्याशी त्याला पडलेल्या केट्यांचा काही संबंध नव्हता. इन जनरच आयुष्य वैराण आहे अशी भावना त्याच्या मनात दाटून येत असेल. सद्ध्या फेबु आणि वॉअॅ वर वाजवीपेक्षा जास्तच पडीक असल्याने ही भावना वरचेवर त्याला छळत असे. भरीस भर म्हणून वयाच्या १२-१५ व्या वर्षी कंपनी काढून अब्जोपती होणार्‍या मुलांच्या गोष्टी वाचल्यापासून तर आपले आयुष्य अगदीच फुकट आहे अशी त्याची खात्री होत चालली होती. कारण अजूनही त्याला विडी काडीचा खर्च सोडवायला मधून मधून बाईक पंक्चर करावी लागत असे.
सगळं काही असूनही नसल्यासारखं होतं. बेडवर लोळत त्याने वॉअॅ उघडून एक एक गॄप चाळायला सुरुवात केली. एका गॄपवरचा एक मेसेज वाचून बंड्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो क्षण त्याची युरेका मोमेंट होती. मेसेजमधे अत्यंत गहन मेसेज होता - ""पैसा कुणीही कमावतो, खरा श्रीमंत तोच ज्याने माणसं कमावली. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा नात्यांची श्रीमंती महत्वाची"".
बंड्या उठून बसला. ब्लँकेट खाली घरंगळल्यावर त्याची उब जाऊन आता त्याला एसीची थंडी बोचू लागली. मगासचा मेसेज डोक्यात होताच. ह्यावरून त्याला कल्पना सुचली... अरे आपल्या आयुष्याचंही असंच आहे... पैशाची ऊब गेली की सत्याची थंडी बोचू लागते*...
*कुठल्याही गोष्टीचा जीवन विषयक तत्वज्ञानाशी बादरायण संबंध जोडण्याची ग्यानबाजी करण्यासाठी हा फॉर्मॅट हमखास उपयोगी पडतो. हे वाचून ते जाणवलं... कशामुळे कशाची आठवण व्हावी ह्याला बंधन नाही. उदा.: पेपर वाचताना जाणवलं आयुष्य वाचायचं राहून गेलं, जात्यातले गहू पाहून जाणवलं आपल्या आयुष्याचंही असंच पीठ होतंय, बँक स्टेटमेंट वाचून जाणवलं आयुष्य टॅली झालंच नाही, ठेवणीतले कपडे घडीवर खराब झालेले पाहून जाणवलं मधून मधून मनाच्या घड्याही उलगडायला हव्यात, कुत्रा आणि खांबाला बघून जाणवलं नियतीने आपल्यावरही असाच पाय वर केलाय...
तर, हा साक्षात्कार झाल्यामुळे आता बंड्या स्वस्थ बसणे शक्य नव्ह्ते. त्याला आयुष्याची गोळाबेरीज नव्याने करायची होती. नात्यांची श्रीमंती वाढवायची होती. त्याने लगेच घर सोडून जायचा निर्णय घेतला. आई वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट त्याने घरी ठेवली. फक्त मोबाईल आणि पॉवरबँक आठवणीने खिशात टाकली. जाताना बाबांच्या स्टडी टेबलवर एक चिठ्ठी लिहून ठेवली "स्वतःचा शोध घ्यायला घर सोडून जातोय. माझा शोध घेऊ नका." घराबाहेर पडल्यावर त्याला आठवले की आपण चिठ्ठीखाली सही न केल्याने, मी/ताई/आई/सखू बाई ह्या पैकी नक्की कोण घर सोडून गेलंय, हे वडिलांना कळणार नाही. पण तरीही तो मोठ्या निर्धाराने निवडलेली वाट चालू लागला.
घराजवळच्या बसस्टॉपवर त्याला एक बाई बसची वाट बघत असलेली दिसली. बायका पुरुषांच्या मानाने जास्त मायाळू असल्याच्या समजुतीतून त्याने इथूनच नवी नाती जोडायला सुरुवात करायचे ठरवले. त्या पाठमोर्‍या बाईंच्या मागे उभे राहत छप्पन सशांची व्याकूळता चेहर्‍यावर आणून बंड्याने सुरुवात केली ‘नमस्कार...' हे ऐकल्यावर ती बाई चटदिशी वळली आणि आपले खरखरीत हात त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली... 'क्या रे चिकने...'
बंड्या तीन ताड उडाला. इथे धोका आहे आहे जाणवून लगेच तिथून सटकला.
थोडं पुढे गेल्यावर त्याला एक मासेवाली दिसली. तिच्यासमोर उभा राहून तो प्रेमाने म्हणाला... 'आजपासून तुम्हीच माझ्या आई...' उत्तराच्या अपेक्षेत असताना अगदीच अनपेक्षीत ते घडलं. मासेवालीने कोयता काढून त्याला शिव्याच घालायला सुरुवात केली... 'साले सकाळी सकाळी नवटाक मारून येतात नी धंद्याची खोटी करतात... पुन्हा आलास तर उभा चिरेन...'
बंड्या भलताच गडबडला. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. जीव वाचवून तो पळाला. अजून एक प्रयत्न फसला होता. पण… 'तुम्ही अपयशी तेव्हाच होता जेव्हा तुम्ही प्रयत्न करायचे थांबता' ही ओळ आठवून त्याने दुसरा रस्ता धरला.
थोड्या वेळाने त्याला एक भाजीवाल्या आज्जी दिसल्या. म्हातारी प्रेमळ वाटत होती. त्यामुळे इथे रिस्क कमी आहे असं वाटून तो त्यांच्या समोर बसला आणि मगासचाच डायलॉग टाकला... 'आजपासून तुम्हीच माझ्या आई...' म्हातारीने एक क्षण त्याच्याकडे बघितलं आणि मायेने म्हणाली 'असं म्हणतोस??? बरं...' मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा आणि एकमेकांच्या चौकशा झाल्यावर बंड्याला कळले की म्हातारीला स्वतःची आणि सवतीपासून अशी एकंदरीत ४ मुलं आणि ३ मुली आहेत. त्यातल्या दोघा मुलांचं लग्न होऊन त्यांनाही प्रत्येकी २-२ मुलं आहेत. त्यामुळे म्हातारी भलतीच श्रीमंत असल्याचा साक्षात्कार झाल्यावर बंड्या तिला म्हणाला 'चला आई, मी आजपासून तुमच्यासोबत राहणार...' हे ऐकून म्हातारी म्हणाली 'अरे माझ्या घरात आधीच डझनभर माणसं आहेत. उलट मीच तुझ्याकडे रहायला यायचा विचार करत होते.' आता बंड्या गडबडला. म्हणाला 'मीच स्वतः घर सोडून आल्याने तुम्हालाच मला तुमच्या घरी न्यावं लागेल...' ह्यावर म्हातारीने 'लैच शाना हैस...' असं म्हणून त्याला एक काकडी फेकून मारली.
बंड्याचा आता फार म्हणजे फारच भ्रमनिरास झाला होता. सकाळपासून नात्यांची श्रीमंती सोडाच चव्वनीही त्याच्या नजरेस पडली नव्हती. रेडिमेड इतका मोठा मुलगा मिळूनही कुणी आई व्हायला तयार नाही ह्याचं त्याला फारच वैषम्य वाटलं. तितक्यात त्याला जाणवलं की त्याला भूक लागली आहे आणि अशक्य घाम आला आहे. फिरता फिरता तो एका हॉटेलसमोर आला. हॉटेल बर्यापैकी महाग वाटत होतं. इतर वेळी तो विचार न करता आत गेलाही असता, पण आज खिशात पैसे नसल्याने आता ह्या हॉटेलवाल्याला मामा बनवून काही मिळते का बघावे असा विचार त्याने केला.
तितक्यात 'अरे बंड्या!' अशी हाक ऐकू आली. ती त्याची शैला मावशी होती 'कॉलेजच्या वेळेत इथे काय करतोयस रे?' त्यावर भूक लागली होती म्हणून हॉटेल शोधत होतो असं उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. मग मावशी त्याला हॉटेलात घेऊन गेली, यथेच्छ जेऊ घातलं, बील भरलं, गाडीने घरी सोडलं, वगैरे वगैरे सगळं झालं.
आई बाबा अजून घरी आले नव्हते. गुपचूप बंड्या त्यांच्या रूममधे गेला आणि सकाळी लिहिलेली चिठ्ठी फाडून टाकली. आपलं हस्ताक्षर इतकं गचाळ असल्याची त्याला आज पहिल्यांदाच लाज वाटली.
चिठ्ठी फाडून बंड्या त्याच्या रूममधे गेला. एसी लाऊन, दुलई ओढून, गुबगुबीत गादीवर लोळत त्याने वॉअॅ उघडले आणि सकाळच्या मेसेजला रिप्लाय केला 'नात्यांची श्रीमंती शोधण्यापेक्षा श्रीमंत नातेवाईक शोधा...'
आज बंड्या बर्‍याच दिवसानी शांतपणे झोपला. झोपण्यापूर्वी ती टोचणारी चार्जरची पीन बाजूला करायला तो विसरला नाही. आता बंड्या आतून-बाहेरून सुखी आहे.

आपला,
आदि जोशी

दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला

| Labels: | Posted On 11/2/17 at 7:15 PM

'दवणीय अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्‍या समस्त गुरुजनांच्या उलट्या पायांना कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले अंडे आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला
फार दिवसांनी परवा कट्ट्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही कार्यमग्न असल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या... अण्णाचे चहाचे ग्लास अजून थोडे खरपूस झाले होते, वडे तळायच्या तेलाने आता ग्रीसची तैलता धारण केली होती, पाखरांची एक अख्खीच्या अख्खी नवी बॅच भिरभिरत होती... पण बाकी सगळं तसंच होतं... अण्णासकट...
पण लवकरच कारण लक्षात आलं. संपर्क कमी झाल्यामुळे आमचे विषय आणि त्यांचे विषय हे समान राहिले नव्हते. जे होते ते जुने झाले होते. त्यामुळे एकेकाळी ज्यांच्यासोबत आम्ही आयुष्यातले अमूल्य क्षण शून्यप्रकारे सार्थकी लावत होतो तेच मित्र आज अपरिचीत वाटत होते. बंड्याला पूर्वी टक्कल होतं की नव्हतं हे आठवेना... भैय्या आमचा ब्रँड विसरला होता...
निघताना सगळ्यांची गळाभेट घेतली आणि किमान आठवड्यातून एक तरी फोन करायचे वचन देऊन त्यांची रजा घेतली. कॉल करेन हे वाक्य मनात अडकून राहिलं होतं. थोडं पुढे गेल्यावर मला जाणवलं... जाणवलं नव्हे... साक्षात्कार झाला... अरे हे असंच आपलं स्वतःच्या बाबतीतही घडतं... आणि आपलंच आयुष्य स्वतःलाच अपरिचीत वाटू लागतं.
आठवा बरं, तुम्ही खास स्वत:साठी असा वेळ शेवटचा कधी काढला होता? तुमच्या आवडी, छंद जपण्यासाठी कधी शेवटची सुट्टी घेतली होती? एकटेच... स्वतःसोबत शेवटचे कधी फिरायला गेलात? एखादा विकेंड धुणी-भांडी केर-वारे बाजूला ठेऊन फक्त स्वतःसाठी जगलात? नाही आठवत ना? खरी मेख इथेच आहे. लोकांसाठी जगताना आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो. अंतर पडत जातं... हळू हळू वाढत जातं... आपल्या आयुष्याबद्दलच्या कल्पना परक्या वाटू लागतात आणि मग आपण दुसर्‍याच कुणाचं तरी आयुष्य जगतो आहोत ही भावना वारंवार सतावते.
तर मग ज्या प्रकारे आपण मित्रांना कॉल करून चौकशी करतो, खबरबात ठेवतो... त्याच प्रकारे एक कॉल आजच स्वतःला करा. मनाशी संवाद साधा. कुठे काय साचलंय ते बघा... मन मोकळे होऊ द्या... आकाश आपोआप निरभ्र होईल.
अर्धवट वाचलेल्या पुस्तकातला तो बुकमार्क अजूनही तुमची वाट बघत आहे. फक्त एक कॉल करायचा अवकाश आहे. करताय ना मग एक कॉल... स्वतःला?

आपला,
आदि जोशी

मिथुनायण भाग ३ - शेरा

| Labels: | Posted On 8/25/11 at 9:51 AM

प्रभुजींचा जो अवतार आता आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे शेरा. ह्या अवतारात ते एक नाही तर तीन तीन खलनायकांचा सामना करतात.

सिनेमाच्या सुरुवातीला एक मुलगी कुठल्या तरी पार्कींग लॉट मधे एकटीच गाडीच्या दिशेने जाताना दिसते. ती गाडीत बसते तितक्यात तिला समोर काही मास्क घातलेली मंडळी दिसतात. ती प्रचंड घाबरते. घाबरणारच, कारण त्यांनी मिकि माऊस चे मास्क घातलेले असतात. तिची गाडी काही सुरू होत नाही. समोर बघते तर सगळे माऊस गायब. पुन्हा वर बघते, सगळे हजर लगेच पुन्हा गायब. ती गाडीतून बाहेर पडून पळायला लागते, तितक्यात सगळे उंदरासारखे कुठून तरी अचानक प्रकट होतात. ते आता तिला काही तरी करणार इतक्यात दोन हात त्यांना बडव बडव बडवतात. चेहरा दिसत नाही कारण त्या मुलीच्या मागूनच सगळ्यांची पिटाई चाललेली असते. सगळ्यांना पिटुन झाल्यावर मुलीच्या मागून बाहेर येतात मिथुनदा. मुलीच्या मागून लढणे ह्याचा नवीनच अर्थ मिथुनदांमुळे आपल्याला कळतो. सगळ्यांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून पुन्हा एकदा पिटाई सेशन सुरू होतं.

पण ह्यावेळी एक गुंड मिथुनदांना भारी पडतो. तो मिथुनदांना झोडायला सुरूवात करतो. मिथुनदा खाली पडतात. तो गुंड पुढे येत स्वतःच्या चेहर्‍यावरचा मिकी माऊसचा मास्क काढतो (पण एक क्षण आपल्याला मास्क काढल्याचं कळतंच नाही) त्या मास्कच्या मागे असतो साक्षात मिथुनदा. उभा मिथुनदा पडलेल्या मिथुनकडे रागाने बघतो, एक तलवार काढतो आणि मिथुनदाच्या पोटात खुपसतो. आणि मिथुनदा आपल्या स्वप्नातून जागे होतात. हुश्श्श..

ते आपल्या खोलीतून बाहेर पडतात, दुसर्‍या खोलीत जातात. तिथे एका बाईला चेनने बांधून ठेवलेलं असतं. ती असते मिथुनदांची बायको. ती ड्रग ऍडीक्टही असते. म्हणूनच तिला बांधलेलं असतं. तिला प्रेमाने भरवून मिथुनदा एका माणसाकडे जातात. त्याचं नाव चंडोला. बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर ने हा रोल केला आहे. मिथुनदा त्याला ड्रग माफियाला संपवायचं वचन देतात. चंडोला त्याला सगळ्या ड्रग माफियांची माहिती असलेली एक फाईल देतो.

ती फाईल घेऊन मिथुनदा घरी येतात. हॉलच्या लालभडक भिंतीवर त्यांच्या स्वर्गवासी बहिणीचा चंदनाचा हार घातलेला फोटो असतो. फोटोच्या बाजुला भिंतीवर खडूने लिहिलेलं असतं "डर इंसान को कमजोर करता है".

ग्रॅफिटी


मिथुनदा फ्लॅशबॅकमधे जातात.

त्यांचं कुटुंब, म्हणजे ते, बायको, बहिण आणि एक पोपट (पक्षी) खूप खूप खुश असतात. त्यांची बहिण एक अत्यंत लाडावलेली, बिंडोक, मठ्ठ आणि अति आगाऊ मुलगी असते. बायको सोज्वळ वगरे. फ्लॅशबॅक मधे आपण पोचतो तो दिवस मिथुनदांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस असतो. बहिण गिफ्ट म्हणून त्यांच्या कडे एक प्लेट कांदा भजी मागावी तसा एक भांजा मागते. आढेवेढे घेत मिथुनदा तयार होतात. तयार होता म्हणजे हो म्हणतात, उगाच कल्पनाशक्ती ताणू नका. त्यांनी हो म्हटल्याबरोबर ती आचरट कार्टी भैय्या आणि भाभीला बेडरून मधे ढकलते आणि म्हणते "तो जाओ...". घ्या मारुतीचं नाव आणि व्हा सुरू.

बेडरूममधे अर्थातच एक गाण्याचा सिक्वेन्स पार पडतो. ह्या गाण्यात "जीस लडकी पे दिल आया है वो बडी पटाखा है" असं मिथुनदा स्वतःच्याच बायको विषयी म्हणतात.

दुसर्‍या दिवशी कळतं की मिथुनदांची बायको पोलिस इंस्पेक्टर आहे. इंस्पेक्टर शिवानी. ती पोलिस स्टेशन मधे जायला निघते. इकडे असरानीने एका हवालदाराचा रोल केला आहे. तो सायकल वरून येतो. सायकल स्टँडला लावताना कैक वेळा पडते. शेवटी तो वैतागुन तिला म्हणतो "अरी ओ १८५७ की छप्पन छुरी तेरा कोई कॅरेक्टर है के नहीं? क्यों सरकार की तरह गिरती है बार बार?". ह्यात गिरणारी म्हणजे गिरी हुई आणि गिरणारी म्हणजे सरकार असे दोन विनोद आहेत. तसेच, गिरे हुए लोग मतलब सरका असा छुपा विनोदही असू शकतो. हम है अंग्रेजोंके जमाने के जेलरका बेटा अंग्रेजोंके जमानेका हवालदार अशी तो स्वतःची ओळख करून देतो.

पोलिस स्टेशन मधे हिरवीणीच्या कॉलेजचे प्रिंसिपल तक्रार करतात की आमच्या कॉलेज मधे सर्रास ड्रग विकी सुरू आहे. कमिशनपसून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना सांगितलं, कुणीच ऐकत नाही.  बाई बंदोबस्त करायचं वचन देते आणि साध्या वेषात कॉलेजात पोचते. तिकडे ड्रग विकी करणार तरूण दिसतो.

शिवानी त्याच्याकडे ड्रग्ज मागते तर तो तिलाच जवळ ओढतो. आणि नंतर पुढची २० सेकंदं मिथुनची बायको त्याला फक्त गुद्दे मारते. पोटावर, पाठीवर, पायावर, डोक्यात, मानेवर.. बसून, उभं राहून, उडी मारून... गुद्देच गुद्दे. मिथुनच्या बायकोशी पंगा घेतल्यावर अजून काय होणार? लग्नाला ३ वर्ष झाली तरी प्रत्यक्ष मिथुनदांनी सुद्धा अशी गुस्ताखी केली नाही तर हा कोण उपटसुंभ? भोग लेका आता कर्माची फळं. इंस्पेक्टर शिवानी त्या ड्रग विकणार्‍याला पुन्हा गुद्देच गुद्दे मारते आणि यथेच्छ कुदवून झाल्यावर बेड्या ठोकते. तो चिडून तिला धमकी देतो "देख लुंगा तुझे, तुम जानती नहीं मै बल्लू बकरा का भाई हुं". मिथुनचीच बायको ती, डायलॉग हे तर तिचं हक्काचं कुरण. ती आता त्याला शब्दाचा मार देते "बकरा का भाई है ह्या बकरी की औलाद... blah blah blah blah"

इथे एंट्री होते व्हिलन, बल्लू बकराची "कानून हमारे लिये एक रब्बर की गुडिया है और पुलिस कठपुतलीयां. कानून सरकार ने बनाया और अपराध शैतान नें". बकराची आयटम त्याच्याहून महान "जब १००० इंसान मरते है तो अंडरवर्ल्ड में एक बकरा पैदा होता है". बकरा टाळ्या वाजवतो.

बकराला खबर मिळते की शिवानीने त्याच्या भावाला पकडलंय. ह्या बकराचं वैशिष्ट्य म्हणजे तो दारू पीत असताना त्याला काही वाईट खबर मिळाली की तो हातातला ग्लास संपवतो आणि मग दचकतो. उगाच ग्लास हातातून सटकून दारू नको वाया जायला.

मिथुन बागेत झाडांना पाणी घालत असतो. तितक्यात बकराची माणसं त्याला एक गिफ्ट देऊन जातात. मिथुनदा गिफ्ट उघडतात. त्यात असतो त्यांचा लाडका पोपट (पक्षी). बहीण किंचाळून घरात पळते. पोपटाच्या पिंजर्‍यावर डोकं आपटून रडू लागते. पिंजर्‍यात तिला एक चिठ्ठी दिसते. ती घेऊन बाहेर येते. तोवर इकडे मिथुन त्या पोपटाला बागेतच गाडून वगरे मोकळा झालेला असतो.

(पोपट गाडताना मिथुनदा)



चिठ्ठीत लिहिलेलं असतं की माझ्या भावाला सोड नाही तर अशीच अवस्था तुझ्या बायकोची होईल. हे ऐकून मिथुनदा चवताळतो, त्याच्या एका हाताचा पंजा नागाच्या फण्यासारखा वर वर येऊ लागतो. हे बघून त्यांची बहीण त्यांना मानेनेच नाही म्हणते. मिथुनदा सावरतात. हताशपणे मिथुनदा चिठ्ठी टाकून घरात जातात.

सिनेमात व्हि. सि. आर. नावाचा अजून एक व्हिलन आहे. त्याची दोन मुलं मिथुनदा आणि त्यांच्या बहिणीसमोर एकाचा खून करतात. शिवानी साक्षीदार म्हणून म्हणून मिथुनला बोलावते. पण बहिणीला व्हि. सि. आर. ने किडनॅप केल्यामुळे मिथुनदा खोटी साक्ष देतात आणि व्हि. सि. आर. ची मुलं सुटतात.

पुढे बकराचा भाऊ त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मिथुनदांच्या बहिणीला ड्रगचा ओव्हरडोस देऊन ठार करतो. मिथुनदांचा फणा पुन्हा वर येतो. पण आता थांबवणारं कुणी नसतं बहिणीची चिता मिथुनदांच्या डोळ्यात पेटते.

मिथुनदा नागासारखे कराटे खेळून, सुपरमॅन सारखे उडून बकर्‍याच्या भावाला मारतात.

(मिथुनदांचा अजून एक अवतार - सुपरमॅन)



त्याच्या ह्या पराक्रमामुळे चंडोला त्यांना बोलावून घेतो आणि म्हणतो की मी तुला ओळखलं. तूच शेरा आहेस. कारण ज्या प्रकारे बकराचा भाऊ मेला तसं कराटे स्किल जगात कुणाकडेच नाही. प्लीज ड्रग्ज माफियांना संपवण्यासाठी मला मदत कर. मिथुनदा त्याला नम्रपणे नकार देतो.

आत व्हिलनची माणसं शिवानीला पकडून नेतात आणि तिला ड्रग्जची सवय लावतात. ह्यामुळे पेटून उठलेले मिथुनदा एकेकाचा खून करायला सुरुवात करतात. व्हि. सि. आर. आणि बकराला आपले सापाचे कराटे खेळून ठार करतात. संपूर्ण मारामारीच्या दरम्यान मिथुनदांच्या हातवार्‍यांना नागांच्या फुत्कारण्याचा आवाज बॅकग्राउंड साउंड म्हणून वापरला आहे.

तर, ह्या दोघांना मारल्यावरही बराच वेळ शिल्लक असल्याने अजून एका व्हिलनची एंट्री होते. तो दुसरा तिसरा कुणी नसून असतो आपला बॅड बॉय गुलशन उर्फ चंडोला उर्फ ब्लॅकी - द बिग बॉस. आपल्या मार्गातील काट्यांना हटवण्यासाठी त्याने चंडोला बनून शेराचा उपयोग केलेला असतो.

शिवानी हळू हळू बरी होत असते. असरानी एकदा जयला पकडून लेक्चर देतो की असा कसा तू नामर्द की बायकोवर अत्याचार केलेल्यांना काहीच करत नाहीस. त्यावेळी जय त्याला आपली कहाणी ऐकवतो. पुन्हा फ्लॅशबॅक.

इथे आपल्याला कळतं की मिथुनदा पूर्वश्रमीचे गुन्हेगारी जगताचे बादशाह शेरा होते.



प्रतिस्पर्ध्यांनी आई आणि भावाचा खून केल्यावर ते वाममार्ग सोडून सन्मार्गाला लागलेले असतात. शेरा आता मेलेला असतो. त्याच्या जागी जय खुराना जन्म घेतो. मरणार्‍या आईला त्यांनी खूनखराबा न करण्याचं वचनही दिलेलं असतं. म्हणूनच ते चंडोला ला नकार देतात.

ह्या सिनेमात इतके फ्लॅशबॅक आहेत की वर्तमानात येण्या ऐवजी भूतकाळातच सिनेमा का उरकत नाहीत असा प्रश्न पडतो.

शिवानी बरी होत असल्याने ब्लॅकीला टेंशन येतं की ती आपल्या माणसांना ओळखेल, म्हणून तो तिला मारण्याचा प्लॅन करतो. पण तिथे ऐन वेळी जय उर्फ शेरा पोचतो. पुढे काय होतं ते सांगायला नकोच.      

मिथुनचा सिनेमा असल्याने त्याचा शेवटही साजेशा डायलॉगने होतो जो फक्त मिथुनच्या बाबतीतच ऐकवला जाऊ शकतो "शेरा ने अपने आप को कानून के हवाले कर दिया. उसे उम्रकैद की सजा हुई. मगर अच्छे बरताव के कारण उसे पांच साल में ही छोड दिया गया." उम्रकैद वरून डायरेक्ट ५ वर्ष? काय बोलणार आपण पामर?

नेहमीप्रमाणेच ह्या चित्रपटातही डायलॉग्ज की खैरात आहे:

१. अब मौत का ऐसा खेल होगा के मौत का भी कलेजा काप जाएगा.

२. अपना नाम जय से बदलकर पराजय कर दो.

३. मां की लाशपर दिया वचन मैने बहन की लाशपर तोड दिया.

४. ये अगर नंगा होकर गरम तव्वे पर बैठ जाये तो भी उसकी बात का यकीन मत करना.

५. सबर के फल नसीब के झाड पर लटक लटक के सड गये.



आता सिनेमातली काही निवडक दॄष्य:

(नागराज मिथुनदा)








आणि हे सिनेमाचं पोस्टर




पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः

आपला

(मिथुनभक्त) ऍडी जोशी















मिथुनायण भाग २ - आग ही आग

| Labels: | Posted On 8/23/11 at 8:21 AM




साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत, उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. दुसर्‍या क्षणी ती एका माणसाला खंडणीसाठी फोन करते. हिचं नाव डायना. तो हिम्मतवान व्यापारी तिला उत्तर देतो "तुम डायना हो या डायन, लेकीन मेरा खून नहीं चूस सकोगी". काही वेळातच त्या माणसाला त्याच्या बाणेदारपणाचं फळ मिळतं. त्याला त्याच्या घराच्या पार्कींग लॉट मधेच गोळी घालून ठार करण्यात येतं. मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो.

डायना टायगर गँग नावाच्या एका खुँखार गँगची मेंबर असते. त्यांच्यासोबत भ्रष्ट पोलिस अधिकारी, एक मंत्री, अशी पिलावळही असते.

आता, टायगर गँग मुलाला जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्या विधवेकडून खंडणी मागते. नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे. ती खंडणी देणार इतक्यात तिथे असलेल्या सगळ्या गुंडांना एक बंदुकधारी हात धडाधड गोळ्या घालून ठार करतो. तो हात असतो अर्थातच मिथुनदांचा. ह्या सिनेमात त्यांच्या अवताराचं नाव आहे 'इन्स्पेक्टर अजय'. ह्या मारामारीच्यावेळी तिथे एक पिकनिकला आलेलं जोडपं आणि एक फोटोग्राफरही असते.

ह्या खुनखर्‍याब्याबद्दल मंत्री कमिशनरकडे जाऊन त्याला अजयला थांबवायला सांगतो. (आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.) त्यावेळी तिथे अजय पोचतो आणि मंत्र्याची कानउघाडणी करतो "अरे तू तो वो सियासी दलाल है जो मुर्दे का कफन छीनकर अपनी खाल पर ओढ लेता है". कमिशनर पुढे मंत्र्याला ऐकवतो "मगरमछ के आंसू, कुत्ते का भोंकना, लोमडी की चालाकी ये सारी चीजें लेकर तू पैदा हुवा है गोपाल भारती". इतकं सुंदर व्यक्तीचित्रण पु.लं. ना तरी जमलं असतं का? कमिशनर आणि अजय नी केलेल्या अपमानामुळे चवताळलेला मंत्री त्या दोघांची बदली करायची धमकी देतो. अजय उत्तर घेऊन तयारच असतो "तू हमारी बदली करवाएगा? अरे तीन साल में तू पांच पार्टीयां ऐसे बदल चुका है जैसे बेघर बंदर जिंदगीभर डालींया बदलता रहता है".

ह्या सिनेमान आपला लक्ष्या सुद्धा आहे. त्याच्या जोडीला आहे जॉनी लिव्हरचा डुप्लीकेट. ते दोघे जासूद असतात आणि टायगरला शोधत असतात. "मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है" असं लक्ष्या स्वतःच वर्णन करतो. आता बोला.

मधे मधे सिनेमात जॅकी श्रॉफही दर्शन देत असतो. ते कशासाठी हे अर्धा सिनेमा होईपर्यंत कळत नही.

कमिशनर आता अजयला सरकारी ट्रेझरीच्या संरक्षणाची जबाबदारी देतो. इकडे टायगर गँग ही ट्रेझरी लुटायचा प्लॅन बनवत असते. तितक्यात तिथे कमिशनर पोचतो. सगळे पळू लागतात इतक्यात कमिशनर त्यांना थांबवतो "ओ बेवकूफी के अंडों से निकले कबुतरों, मैं कमिशनर नहीं टायगर हुं". टायगर जेंव्हा जवळ येतो तेव्हा कळतं की तो कमिशनरचा विद्रुप हमशकल आहे. ह्या टेझरी मधे २५० कोटींचे हीरे असतात. एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात.

ह्या सिनेमातला अजयचा दुखरा कोपरा म्हणजे त्याची स्वयंघोषीत प्रेयसी. ही दुर्दैवाने त्याच्या स्वर्गवासी बायकोसारखीच दिसत असते. मिथुनदा आणि त्याच्या सुखी कुटुंबाची वाताहात होण्याआधीच्या त्यांच्या संसाराची ओळख आपल्याला करून दिली जाते. "जो तेरा इश्क मिला, प्लॅटिनम डिस्क मिला" अशा मधुर शब्दांतून आपल्या भूतकाळात चक्कर मारून आणली जाते. मिथुनच्या बायकोचा गुंडांनी बलात्कार करून खून केलेला असतो. मिथुनदा शेवटी नव्या मैत्रीणीच्या प्रेमात पडतोच.

टायगर, डायना, मंत्री आणि त्यांची पिलावळ मिथुनदांना लगाम घालण्यासाठी त्यांना विधवेच्या खुनाच्या आरोपाखाली जेल मधे टाकते. इथे कळतं जॅकी दादा म्हणजे मिथुनदाला खबरा पुरवणारा खबरीलाल. कमिशनरचं अपहरण करून त्याच्या जागी टायगर जातो. मिथुनदा आणि जॅकी बाबा ह्या नव्या कमिशनरला घोडा लाऊन जेल मधून सुटतात आणि एकेका गुंडाचा खात्मा करायला सुरुवात करतात.

सिनेमाचा मुख्य व्हिलन "टायगर" आहे. पण त्याला घाबरायचं की त्याच्यावर हसायचं हेच कळत नाही. कारण डायना, मंत्री आणि गँगमधले अजून १-२ मेंबर्स टायगरला सिनेमाभर येता जाता हिडीस फिडीस करत असतात. त्याला "देख लुंगा टायगर के बच्चे" अशा धमक्याही देतात. हे कमी की काय म्हणून त्याला ब्लॅकमेलही करतात. धन्य आहे.

सिनेमाच्या मधेच कधी तरी आपल्याला टायटल साँग  ऐकवण्यात येतं "क्या क्या संभालोगी जवानी में, आग ही आग है पानी में". आश्चर्य म्हणजे ह्या गाण्यात डायना, मिथुनदांची प्रेयसी आणि एजून एक अशीच आयटम ह्या मिळून मिसळून नाचतात. ह्या गाण्यात प्रेक्षकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात - लटके संभालू के झटके संभालूं? झुमका संभालूं के ठुमका संभालू? दिलकी लगी क्या बुझाये बुझेगी? आजु संभालूं के बाजू संभालूं? चुम्मा संभालूं के जुम्मा संभालूं, या अपने दिलका कबुतर संभालूं?

प्रेक्षकांना प्रश्नात टाकून सिनेमा पुढे सरकतो.

यथावकाश हिरे लुटले जातात. मिथुनदांची प्रेयसी मिथुनदांवर नाराज असते. तिचा असा समज झालेला असतो की मिथुनदांनीच विधवेचा खून केला आहे हिरेही पळवले आहेत. पण त्यांच्यातला गैरसमज लवकरच दून होतो आणि आपल्याला अजून एक सुंदर गाणे ऐकवले जाते "जब मिले दो जवानी, बने एक प्रेम कहानी, बजते हैं दिल के तार".

हळू हळू सगळ्यांना कळतं की हा कमिशनर तोतया आहे आणि तोच टायगर आहे. व्हिलन गँग पैकी एक मिथुनदांच्या प्रेयसीचा मामा असतो. तो टायगरला चुना लाऊन हिरे भाचीच्या घरात लपवतो. हिर्‍यांच्या मोहापाई आता मिथुनदांची प्रेयसी, आधीची उगाच आयटम ह्यांना कमिशनरसोबत बांधलं जातं. इतके दिवस बंदीवासात असूनही कमिशनर त्याच वर्दीतल्या कडक इस्त्रीच्या शर्ट मधेच असतो.

हिरे घेऊन टायगर पळणार इतक्यात मिथुनदा अड्ड्यावर पोचतात. शेवटची हाणामारी होते, मिथुनदा आणि जॅकी बाबा आपल्या अक्षय बंदुकांनी गुंडांचा खात्मा करतात, सगळीकडे आनंदी आनंद होतो.


सिनेमातले निवडक यादगार संवाद:

१. चोट खाते खाते फौलाद भी चिखने लगता है, तो तू क्या चीज है.

२. जो हमारी बात मानता है वो हसता है, जो नहीं मानता वो खून के आंसू रोता है.

३. मौत कभी ठोकर खा कर वापस नहीं जाती टायगर, आती है तो जान लेकर ही जाती है.

४. मेरा सबसे बडा खजाना मेरी बेटी है.

५. हम कानून को जिंदा रखने के लिया कानून का गैर कानूनी ऑपरेशन करते हैं.

६. जब कभी मैं जुर्म का जुआं खेलता हुं तो जोकर हमेशा अपनी जेब में रखता हुं.

७. टाईम कम है. सोचना शुरू करदे अब उपर वाले को क्या जवाब देना हैं.

८. मेरे लिये किसी की जान लेना उतनाही आसान है जितना टेलिफोन पे बात करने के लिये रिसिव्हर उठाना.


शेवटची हाणामारी झाल्यावर "आग ही आग है पानी में" ह्या सुमधुर गाण्याने सिनेमाची सांगता होते. इथे आपल्याला कळतं की ही आग इंतेकामची नसून इश्काची आहे. किंवा "आग ही आग" मधली एक आग इंतेकामची आणि दुसरी आग इश्काची असंही असू शकतं. मधला "ही" म्हणजे अर्थातच मिथुनदा हे वेगळं सांगायला नकोच.

पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः  


मिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल सरकार)

| Labels: | Posted On 8/21/11 at 11:23 AM



दुर्जनांचे निर्दालन जितक्या सातत्याने मिथुनदा करत आले आहेत तितकं सातत्य पोलिसांना दाखवलं असतं तर आज गुन्हेगार स्वस्त साखर, मनमिळावू बायको आणि कामसू सरकारी कर्मचारी ह्यांचा इतकीच दुर्मीळ गोष्ट झाली असती. पण तसे होणे नाही. त्यामुळे आपल्या चित्रपटांतून, विविध अवतार घेऊन मिथुनदा त्यांच्या भक्तांना अन्याय निर्मुलनाचं मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांच्या सहस्त्रावतारांपैकी एक 'जस्टीस चौधरी' आज पुन्हा पाहिला आणि त्याचे परीक्षण करायचा इच्छा अनावर झाली. अर्थात मिथुनदांच्या कुठल्याही कॄतीचं परीक्षण करायची प्रत्यक्ष मिथुनदांशिवाय दुसर्‍या कुणाचीही लायकी नाही. अपवाद फक्त आद्य दुर्जन निर्दालक सुपरस्टार भगवान रजनीकांत ह्यांचा.

जस्टीस चौधरी सिनेमाची सुरुवात होते एका खुनापासून. एका सद्गुणी माणसाला संपवण्यासाठी काही गुंड पोलिसालाच सुपारी देऊन त्याचा काटा काढतात. त्याची बहीण वेगवेगळ्या पोज मधे खूप रडते. कानून के रखवालेच कानून से खिलवाड करत असल्याने तिला कुणी तरी खरा न्याय मिळवण्यासाठी जस्टीस चौधरी कडे जायचा सल्ला देतो.

मिथुनदांची एंट्री. मिथुनदा डोळ्यांतून अंगार ओकत भगवान शंकराची पूजा करतायत. केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत. पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो. मिथुनदा तयार होऊन बाहेर येतात. एक माणूस त्याच्या भावाला वाचवायची विनंती त्यांना करतो. जजशी सेटींग करून त्याच्या भावाला शिक्षा द्यायची दुष्टांची योजना असते. मिथुनदा त्याच्या भावाला अभय देतात. माणूस निघून जातो. मिथुनदांचा सहकारी, छोटन, त्यांना विचारतो की त्याचा भाऊ खरंच निर्दोष आहे का ते चेक करूया का. ह्यावर मिथुनदा त्याला एक युनिव्हर्सल ट्रुथ ऐकवतात "माई के दूध और मजबूर इंसान के आंसुओंमें मिलावट नाही होत है". ऐकणारा धन्य होतो.

पुढे मिथुनदा त्या दुष्ट पोलिस अधिकार्‍याला यमसदनी धाडतात. त्यांच्या हाणामारीच्या दृष्यांच्या वेळी 'टर्मीनेटर' चे पार्श्वसंगीत वाजते हा योगायोग नाही. टर्मीनेटर मधे कोणकोणते गुण असावेत, तो नक्की किती ताकदवान असावा, त्याच्याकडे कोणत्या पॉवर असाव्यात ह्याची कल्पना जेम्स कॅमरूनने मिथुनदांवरूनच घेतली आहे.

तर मिथुनदा आपली अशी अनेक अवतारकार्य पार पाडत असतात. त्यांच्यामुळे बरंच नुकसान सोसावं लागल्याने त्यांचा दुश्मन 'अजगर ठकराल' दुबईहून परत येतो. येऊन मिथुनदांची भेट घेतो. म्हणतो दोस्ती करू, मिळून मिसळून राहू आणि वाटून खाऊ. अर्थातच मिथुनदा त्याला नकार देतात. त्यावर तो क्षुद्र किटक त्यांना म्हणतो 'मेरा नाम है अजगर ठकराल, मै दुश्मन को काटता नही, सीधा निगलता हूं'. त्या अजाण बालकाला मिथुनदांच्या पावरचा अंदाज नसल्याने तो असं बरळतो. त्यावर मिथुनदा त्याला शांतपणे सांगतात 'जस्टीस चौधरी अपने दुश्मनको निगलता नहीं, पालता है, खेलता है'.

अशा कठोर माणसाचा एक हळवा कोपराही असतो. मिथुनदांनी जिच्या पोटी अवतार घेतलेला असतो त्या आईला वाटतं की ते गुन्हेगार आहेत. म्हणून ती त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसते. मिथुनदांना एक भाऊही असतो, तो मात्र त्यांचा भक्त असतो.

सिनेमाच्या सुरुवातीला ज्या मुलीला मिथुनदांनी मदत केलेली असते तिला ते पुढेही सतत मदत करत राहतात. बेरहम जमाना आणि बस्तीवाले तिला मिथुनदांची रखेल समजून तिच्या चारित्र्यावर शक घेतात. मुलीचं चारीत्र्य म्हणजे एक काच असल्याने तिला असल्या दगडांपासून वाचवण्यासाठी आणि पुन्हा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी मिथुनदा तिथल्या तिथे तिला प्रपोज करतात 'मुझसे शादी करोगी?'. मुलगी पार गोंधळते, काहीच बोलत नाही. तिला कळलं नसावं म्हणून ते पुन्हा विचारतात. ह्या वेळी इंग्रजीत 'विल यु मॅरी मी?'. तिचा होकार बघून मिथुनदा तिच्या भांगेत सिंदुर भरून तिच्याशी लग्न केल्याचं घोषीत करतात. लग्नाच्या निमित्ताने एक बेली डांस सदृश सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतो.

इथे अजगर ठकरालची पाचावर धारण बसल्याने तो त्याच्याहून मोठा भाई, डोग्रा - उर्फ शक्ती कपूर, ह्याला आवताण धाडतो. ह्या डोग्राला रक्ताचा वास आवडत असल्याने तो येता जाता स्वतःचीच नस कापून रक्ताचा वास घेत असतो. तो येतो त्या दिवशी त्याचा वाढदिवस असल्याने केक आणलेला असतो. तो केक कापणार इतक्यात ठकरालचा एक माणूस मोठ्या आवाजात बडबड करू लागतो. डोग्राला ऊंची आवाज से नफरत असल्याने तो केक वर डोकं आपटून आपटून आणि गळा कापून त्या माणसाला जीव घेतो.

डोग्रा व्यापाराच्या नावा खाली ड्रग्स आणि हत्यारांचे वितरण करायचा प्लॅन बनवत असतो. त्याला टिव्ही वर मुलाखत देताना बघून मिथुनदा टिव्ही फोडतात आणि भुतकाळात जातात. ते फ्लॅशबॅक मधून आपल्याला त्यांचे वडील, आई, भाऊ, बहीण आणि ओरिजिनल बायको ह्यांचे दर्शन घडवतात. एकच खटकतं ते म्हणजे त्यांच्या बायकोचा एक डायलॉग - 'दिनभर तो आप अदालत में रेहते हैं, और घर आने पर टिव्ही लगाके बैठ जाते हैं' अशी मर्त्य मानवांबद्दल करायची तक्रार मिथुनदांची बायको त्यांच्या बद्दल करते. मूर्ख, अजाण बाई.

त्यावेळी मिथुनदा खरोखरच न्यायालयात जस्टीस असतात. न्यायनिष्ठूर मिथूनदा डोग्राच्या भावाला त्याच्या गुन्ह्यांसाठी सजा ए मौत सुनावतात. बदला म्हणून डोग्रा त्यांची बायको, बहीण आणि वडिलांची हत्या करतो त्यांच्या डोळ्यादेखत करतो. घरासमोरच्या लॉनवरच तिघांच्या चिता पेटवण्यात येतात. मिथुनदांच्या भावाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत असतात. पण त्याचा चेहरा पाहून हे कळत नाही की डोळ्यात पाणी दु:खामुळे आलंय की चितेच्या धूरामुळे.

सुडाने पेटून मिथुनदा आता डोग्राची माणसं मारू लागतात. तेव्हा त्यांना जहांगीर नावारा एक डॉन भेटतो आणि इथूनच मिथुनदांचा न्यायाधीश ते समांतर सरकार असा प्रवास सुरू होतो.

बॅक टू वर्तमान. मिथुनदा डोग्राला भेटून आधी त्याच्या दोन भावांना आणि मग त्याला मारणार असल्याचं सांगतात. त्यानुसार ते एका भावाला मारतात. डोग्रा त्यांची सुपारी एक शार्प शूटरला देतो, जो मिथुनदांवर गोळी झाडतो. मिथुनदा त्याच्या मेल्याचं नाटक करतात. मिथुनदा मरत नाहीत त्यांना लागून गोळीच मरते. आता ते डोग्राच्या दुसर्‍या भावाला मारतात.

इथे डोग्राची माणसं मिथुनदांच्या भावाला जखमी करून त्याच्या प्रेयसीला पळवून नेतातत. अजगरचा भाउ तिच्याशी पाट मांडणार इतक्यात मिथुनदा तिथे पोचतात. आपल्या अक्षय बंदुकीने दुष्टांना नाश करतात आणि डोग्राला पकडून भाऊ ऍडमीट असलेल्या हॉस्पिटल मधे पोचतात. इथे ते त्यांची आई, बायको आणि भावाची प्रेयसी ह्यांना सांगतात की मी गुंड झालो कारण डोग्रापर्यंत पोचायचा तो एकच मार्ग होता. आता त्याला मारून ते स्वतःला कानूनच्या हवाले करणार असतात.

शेवटी ते डोग्राला गोळी घालतात आणि आईच्या हातात पिस्तुल देऊन आपण गुन्हेगारी सोडल्याचं घोषीत करतात. सिनेमा संपतो.

सिनेमाभर आपल्याला मिथुनदांच्या अनेक लीला पहायला मिळतात. सिनेमा संपला तरी मिथुनदांचे काही मौलीक विचार मोती मात्र मनात घर करून राहतातः
१. माई के हाथ का खाना हर बेटे को नसीब नहीं होता.
२. जस्टीस चौधरी सिर्फ एक ही बार माफ करता है, दुसरी बार माफी नहीं मौत मिलेगी.
३. आग और बारूद एक दुसरे से हाथ मिला ही नहीं सकते.
४. मेरे सामने तेरी औकात इतनी भी नहीं के मै तुझे अपना दुश्मन समझुं.
५. मै जिसे रेकमेंड करता हुं उसे इंटरव्ह्यु देने की जरूरत नहीं पडती.
६. जस्टीस चौधरी जुर्म के भयानक जंगल का शेर है. और जो एक बार शेर की पनाह में आ जाता है, भेडिये उसकी तरफ आंख उठाकर भी नहीं देखतें.


माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे दर्शवणारी, अन्यायाविरुद्ध लढायची प्रेरणा देणारी, मनोरंजन करणारी, राग लोभ माया मत्सर काम क्रोध ह्यांचा उत्कट आविष्कार असणारी कलाकॄती म्हणजे जस्टीस चौधरी. आपण नक्की बघा आणि अभिप्राय कळवा. सिडी नाही मिळाली तर पूर्ण सिनेमा आंतरजालावर उपलब्ध आहेच. लवकरच भेटू मिथुनदांच्या अजून एका अवताराची माहिती घेऊन.


आपला,

(मिथुनभक्त) आदि जोशी

श्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी

| Labels: | Posted On 8/12/11 at 11:19 AM


सद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल लिखाण करायचे योजिले आहे.
त्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यांना अर्पण.
झिंगलेल्या बाबाची कहाणी
आपण बघतो की साधारण पणे बेवड्या माणसांच्या संसाराची, मुलांची अवस्था फार वाईट असते. बाबा दारू पिऊन घरी येतो, शेष नागासारखं घर डोक्यावर घेतो. पण ह्या सगळ्याला दुसरी बाजूही असते. दारूच्या बाबतीत बापसे बेटा सवाई असं घडलं तर काय होईल हेच बघण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत.
सोफ्यावर निजलेला एक बंडू बाळ
संपलेली दारू ओठा सुकलेली लाळ
कामवली सखू बाई आली आज नाही
धुतलेला ग्लास एक उरलेला नाही
झोपेतच आता तुला पाजतो बशीत
निजतच तरी पण ढोसशी खुशीत
सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
आटपाट नगरात बार होते भारी
दररोज राजा करी एकेकाची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
आंटी कडे जाणे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल जाणे मला जरी
आज परी जाणार मी वेळेतच बारी
स्वप्नातल्या बार मधे मारू मग फेरी
खर्या खुर्या पेगमधे दारू भरू भारी
पाजीन मी थकलेल्या हातानी तुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
बारमधे उशिरा तू असतो बसून, भंडावला बाबा गेला दारूत बुडून. तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक पेग जातो हळूच संपून. वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे, तुझ्या सोबत मी ही पुन्हा बसायला घ्यावे. उगाचच बेट काही लावावी तुझ्याशी, चिमुकले टकिला शॉट्स वाटावे तुझ्याशी.
बरळत अडखळत बोलतोस काही
ढोसताना भान तुला उरतच नाही
चोरूनिया तुझा ग्लास संपवाया पाही
दुरुनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
चादरीला ग्लास देई ओलसर ठसा
सांगायची आहे माझ्या बेवड्या मुला
झिंगलेल्या बाबाची या कहाणी तुला
ट्रे मधे लुकलुकलेला पहिला ग्लास, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा ओठी एक लार्ज. सोडा घालण्याआधी सुद्धा संपवलास तू खंबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा बारचा तू ताबा. लुटू लुटू उभं रहात भरलास नवा ग्लास, तुझा अचाट स्टॅमीनासमोर बाबा हरला आज.
असा गेलो आहे बाळा पुरा घाबरून
हल्ली तुला ढोसताना पाहतो दुरून
असा कसा बाळ देव बाबाला ह्या देतो
खंबा घेऊन येतो आणि एकटाच पितो
हातातून ग्लास तुझ्या जाई निसटून
उरे काय तुझ्या माझ्या बाटली मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी शिवी
दारू साठी वाटे मला जणू एक ओवी
माझ्यासाठी थोडी तरी ठेवशील का रे
ढोसताना बाबा तुला आठवेल का रे
बारला तू जाता जाता उंबरठ्यामधे
बाबासाठी येईल का दारू ग्लास मधे
-----x-----
- आदि जोशी
(कवितेतला बाबा मी नव्हे.)

-----
सूचना - लिखाण आवडले आणि जर ते कुणाला पाठवावेसे वाटले तर नाव गाळून पाठवू नये. स्वतःचे लेख दुसर्‍याच्या नावावर मेल मधे बघायचा कंटाळा आलाय आता.

अरेरे तुझे काय झाले हे जोश्या

| | Posted On 5/27/11 at 11:40 PM

हे आमचे मनाचे श्लोक. शेवटच्या कडव्यातल्या शेवटच्या वाक्याशी बायको सहमत आहे.





अरेरे तुझे काय झाले हे जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.

कुर्‍हाडीवरी पाय मारोनी घेशी,

तरी दात वेंगाडुनी हसतोस जोश्या.



अशी बुद्धी तू टाकली का गहाण,

कपाळावरी मारुनी घे वहाण.

उपयोग त्याचा परी शुन्य जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



पाजी जगाला जो बुद्धीचे डोस,

करी देव पोपट त्याचाच खास.

स्वतःहून खड्ड्यात पडलास जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



सगे सोयरे मग्न पार्टीत खास,

मनी हासती ते तुझ्या धाडसास.

इथे वाट परतीची नसते रे जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



जरा आठवी तो दिवस तू भयाण,

जगाच्या समक्ष तुझे शीरकाण.

अजाच्या गळी माळ पडली रे जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



कशी घोडचूक ही केलीस छान,

स्वतः खाटीका हाती देतोस मान.

असा बुद्धीभेद तुझा होई जोश्या,

खुला सांड होतास फसलास जोश्या.



पुन्हा पारतंत्र्यात गेलास जोश्या,

विनाशर्त शरणागत झालास जोश्या,

तुझी लावली तू स्वतः वाट जोश्या,

कसा मूर्ख, बिंडोक आहेस जोश्या.





-------------------------------------------समाप्तच-------------------------------------------





पाचवी खोली

| Labels: | Posted On 3/29/11 at 9:54 AM


गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही. कुणी लेख लिहावा इतकी ही उदात्त वस्तू अथवा वास्तू नाहीच. पण चाळकर्‍यांच्या जीवनात हिचं महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही.

जे चाळीत राहिले नाहीत त्यांच्यासाठी सांगायचं तर ही पाचवी खोली साधारण सिनेमात दिसणार्‍या पोलिसांच्या टॉर्चर रूम सारखी दिसते. फक्त इथे सत्य शोधक पट्टा नसतो. साधारण ६x६ ची खोली. जास्त जोरात लावली तर तुटेल अशी भीती वाटणारी कडी. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. भरीसभर म्हणून त्या खिळखिळ्या दरवाजातून किलकिलत आत येणारा प्रकाशाचा झोत पाचव्या खोलीत एक गूढ-भयाण वातावरण निर्माण करत असे.

दरवाजाच्या त्या फटीखेरीज हवा येण्याजाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने खोलीतल्या ह्या भयाण वातावरणाला कुंद कारूण्याची झालरही लागत असे. कुणी जास्तवेळ आत राहिल्यास लोकं बाहेरून 'मेलास का रे?' असं ओरडत. ह्या ओरडण्याचे कारण चेष्टा नसून आतल्या माणसाविषयी कळकळ असे. कारण माणूस फार वेळ आत राहिला तर गुदमरून मरण्याचीच शक्यता जास्त. कदचित त्यामुळेच लोकं बाहेरही पटापट येत. आणि ती तशी यावीत ह्यासाठीच कुणी तिथे एग्झॉस्ट फॅन वगरे बसवले नसावेत. कोण जाणे, एखादा आत रमला तर इतरांची पंचाईत व्हायची. फ्लश, एग्झॉस्ट फॅन सारख्या चैनी त्या काळी नव्हत्या. आणि असत्या तरी त्या नळासारख्या शोभेपुरत्याच राहिल्या असत्या.

मुंबईचं प्रतिबिंब मुंबईकराच्या आयुष्यात दिसतं असं म्हणतात. आणि ते बघायला पाचव्या खोली सारखी दुसरी उत्तम जागा नाही. गर्दी, भयानक उकाडा, खूप घाम, कोंदट हवा, मान टाकलेला नळ ही मुंबईची सगळी लक्षणं ह्या ६x६ च्या खोलीत दिसून येतात.

पाचव्या खोलीतली भित्तीचित्रे आणि लिखाण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आफ्रिकेतल्या गुहेत सापडणार्‍या चित्रांशी साधर्म्य असलेल्या ह्या चित्रांचे चित्रकार आफ्रिकन चित्रकारांप्रमाणेच अनाम आहेत. माणसाच्या शरीराचं इतकं तपशीलवार चित्रण खजुराहोच्या शिल्पांनंतर इथेच दिसतं. कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण कशी चालू आहे, कोण एकाचवेळी अनेकांसोबत फिरत आहे अशा जिव्हाळ्याच्या विषयांवर इथे साधकबाधक चर्चा होऊन त्याची तपशीलवार नोंद ह्या भिंतीवर करून ठेवलेली आढळते. तसंच चाळीत घडणार्‍या भांडणांपासून ते मॅचच्या टाईमटेबलपर्यंत सगळ्या लेटेस्ट घडामोडीही ह्या भिंतीवर कोरून ठेवलेल्या आढळत. काही इतिहास संशोधकांच्या मते सद्ध्या प्रचलीत असलेल्या फेसबूक मधील वॉलची जननी हीच पाचव्या खोलीतली वॉल आहे. एका भिंतीवर तर "माझी होशील का" असा प्रश्न आणि त्याखाली "नाही" असं उत्तरही वाचायला मिळालं होतं.

ह्या पाचव्या खोलीने आम्हाला काय काय शिकवलं हे लिहायला लागलो तर यादी फार मोठी होईल. हठयोग्यांसारखं एका पायावर उभं राहून रांगेत तप करायला शिकवलं. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावर असे अनेक ध्यानमहर्षी दिसत. शेअरींग आणि वेटींगचे प्रात्यक्षिक इथे दिसे. एक माणूस माणूस आत गेला की तो जाताना पेपर दुसर्‍या माणसाकडे पास करत असे आणि तो पुढच्याकडे. रांगेचा फायदा सर्वांना ही ओवी इथे प्रत्यक्षात अनुभवली जात असे. इतकी शिस्तबद्ध रांग मुंबईत दुसरीकडे कुठेही दिसणार नाही.

अनेक जण तर सकाळी सकाळी बायकोची कटकट नको म्हणून शांत चित्ताने विडी शिलगावून रांगेत उभे राहत आणि नंबर आला की लोकांना पास देऊन पुढे पाठवत. माणसं उठली की आधी देवापुढे हात जोडायचे सोडून तोंडात ब्रश खुपसून रांगेत उभे राहत. घरात २ पेक्षा अधीक मुलं असली तर एक दुधाच्या रांगेत आणि एक इथल्या रांगेत असं चित्र दिसे.

इथे आम्ही पाण्याची बचत करायला शिकलो. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. 'हा नळ मालकाने टाकीला जोडलेलाच नाही, नुस्ताच पाईप टाकलाय' असंही एकदा एकाने मला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सगळी भिस्त घरून आणलेल्या बादलीवर असे. घरून निघून मधल्या वाटेत पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता, बादली अजिबात डचमळू न देता मुक्कामी पोचणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.

पाचव्या खोलीने आम्हाला विजेची बचत करायला शिकवली. प्रत्येकाच्या घरात इथल्या दिव्याचा वेगळा स्विच असे. घरून निघताना तो सुरू करून निघावा लागे. कार्यभाग आटपून माणूस बाहेर पडला की दरवाज्याची बाहेरची कडी लावल्याचा आणि घरून दिव्याचा स्विच ऑफ केल्याचा आवाज एकदमच येत असे. लोकांचे कुले धुवायला आपली वीज का जाळा? असे साधे सोपे तत्व त्या मागे असे. आजकालच्या मुलांना एखाद्या खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करावे हे शिकवावं लागतं. इथे तो आमच्या चाळीच्या संस्कारांचाच भाग होता. कारण 'जरा जाऊन येतो, जोशांचा दिवा सुरू आहे' असे संवादही केवळ आणि केवळ चाळीतच ऐकू येत.

अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्‍यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी.

अशा ह्या आखुडशिंगी, बहुगुणी पाचव्या खोलीपासून एकेकाळी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. आणि शेवटही.

चाळीवर आणि चाळकर्‍यांवर अनेकांनी अनेक लेख लिहिले पण ही पाचवी खोली मात्र उपेक्षितच राहिली आणि म्हणूनच आमचा हा लेखन प्रपंच.


-------X-------

रावसाहेब

| Labels: | Posted On 3/14/11 at 6:30 PM


रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणं रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवीशी वाटणारी उब देत होती. म्हणजे, दिवस थंडीचे नव्हते, ती थंडी ए.सी.ची होती. मुंबईत राहून हिवाळा अनुभवायचा असेल तर एसी शिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. पुन्हा एकदा रावसाहेबांनी स्वतःला मऊ दुलईत गुरफटून घेतलं. मागचे काही दिवस हा त्यांचा नेहेमीचा उद्योग झाला होता. आताशा पूर्वीसारखे कुणी त्यांना सकाळी सकाळी उठवायच्या मागे लागलेले नसायचे. पूर्वी सकाळी घराचं जणू रणांगण झालेलं असायचं. ८ च्या आत आवरून घराबाहेर पडायची सगळ्यांची घाई असे. घरात २ बाथरूम्स असली तरी सकाळच्या घाईगडबडीत घरातल्या ५ माणसांना कमीच पडत. का कोण जाणे अप्पांनासुद्धा ८ वाजता देवळात हजर रहायची सवय होती. 'देव तिथे दिवसभर असतो, आमच्या ऑफिसच्या गडबडीनंतर तुम्ही तुमचं आवरत जा' ही तात्यासाहेबांची विनंती अप्पांनी कमी ऐकू येत असल्याच्या बहाण्याने अनेक वर्ष कानावरून घालवली होती.
एक एक जण स्वतःचं आवरून टेबलवर येऊन न्याहारी संपवत होता. रावसाहेब सगळ्यात शेवटी अंघोळीला जायचे. कावळ्याच्या अंघोळीसारखी अंघोळ उरकणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. आधी छान पैकी २ बादल्या उन पाणी काढून घेणे, हळूहळू प्रत्येक तांब्या मनापासून अंगावर ओतणे, मग निवांतपणे शँपू, बॉडी वॉश चोळणे, पुन्हा अंगाला छान मसाज करणे, २ बादल्या पाणी संपलं की शेवटी पुन्हा बाजूला काढून ठेवलेले १-२ तांबे डोक्यावरून ओतणे अशी साग्रसंगीत अंघोळ रावसाहेब रोज करत. तोवर सगळ्यांची न्याहारी होऊन सगळे घराबाहेर पडायला एकदम तय्यार असत. माई सोडून. रिटायर झाल्यापासून माई सहसा घराबाहेर पडत नसत. पण सकाळी ७ ला सगळं आवरून तयार होण्याची त्यांची गेल्या ४० वर्षांची सवय त्यांना मोडायची नसल्याने सकाळच्या गडबडीस त्यांचाही हातभार लागे. तयारी करून माई ऑफिसची पर्स धरून सोफ्यावर बसून असत.
रावसाहेबांची न्याहारी गाडीतच होत असे. माई नेहमी त्यांना भरपूर डबे देत. न्याहारीचा डबा, मधेच भूक लागली तर काही तरी जवळ असावं म्हणून एक डबा आणि दुपारच्या जेवणाचा ४ खणी डबा. ह्यातला एखादा डबा जरी भरलेल्या अवस्थेत परत आला तर संध्याकाळी रावसाहेबांना हजार प्रश्न विचारून माई भंडावून सोडत. 'आवडलं नाही का? वेळ मिळाला नाही का? भूक नव्हती का? दुसरं काही देत जाऊ का? बाहेरचं खाऊन खाऊन घरचं जेवण आवडेनासं झालं वाटतं?' इत्यादि प्रश्नांच्या भडिमारामुळे रावसाहेब नेहमी सगळे डबे संपवूनच परत आणत असत.
तात्या स्वतः गाडी चालवत. तात्या आणि अक्का दोघेही रग्गड कमावत असून ड्रायव्हर का नाही ठेवत असा विचार रावसाहेबांच्या मनात वरचेवर येत असे. रावसाहेब आरामात मागच्या सीटवर बसत, तात्या ड्रायव्हर सीट वर आणि अक्का तात्यांच्या बाजूच्या सीटवर. गाडीत बसल्यापासून तात्या ट्रॅफिकला शिव्या घालायला सुरुवात करत असत. रिक्षावाले हा त्यांचा शिव्या घालण्याचा हक्काचा आयटम. शिवी घातली की मागे रावसाहेब बसलेत हे जाणवून तात्या जीभ चावत आणि आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या रावसाहेबांकडे बघत. रावसाहेब खिडकीतून बाहेर बघत आहेत हे बघून त्यांनी शिवी ऐकली नसावी असं स्वतःच समाधान करून घेत. पण रावसाहेबांना आता शिव्या अंगळवाणी पडलेल्या असल्याने ते तात्यांकडे दुर्लक्ष करत. किंबहून तात्यांना अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून रावसाहेब मुद्दामच लक्ष नसल्याचं सोंग आणत.
माईने बांधून दिलेली न्याहारी संपवेपर्यंत रावसाहेबांची उतरण्याची जागा आलेली असे. आपण उतरलो की अक्का अंमळ तात्यांजवळ सरकून बसते हे रावसाहेबांनी बघितलं होतं. ते हसूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. अक्कांना सोडून तात्या त्यांच्या ऑफिसला जात असत. घरी सगळ्यात आधी रावसाहेबच परत येत असत. घर जवळ असल्याने निघाल्यापासून ३० मिनिटात ते घरी असत. माई त्यांची वाटच बघत असे. आल्या आल्या त्यांना काही तरी खायला करून देणे हा माईच्या दिवसातला हायपॉइंट असे. दुपारचं जेवण नुकतंच झालं असल्याने फारशी भूक नसली तरी प्रश्न नकोत म्हणून रावसाहेब समोर येईल ते गपगुमान गिळून आपल्या खोलीत जात असत.
घरी सगळ्यात उशीरा तात्या येत. किमान एकवेळचं जेवण सगळ्यांनी एकत्र घ्यावं असे तारे तात्यांनी एकदा तोडल्यापासून रावसाहेब तात्यांवर बारीक लक्ष ठेऊन होते. आणि हे तात्यांनाही माहित असल्याने तात्या जेवण्याच्या वेळेपर्यंत तरी पोचायचा प्रयत्न करत. कधी कधी उशीर होत असे पण तेव्हढं रावसाहेब चालवून घेत. जेवता जेवता सगळे जण आजच्या दिवसात काय काय घडलं हे इतरांना सांगत. जेवण झालं की मग सगळे समोरच्या बागेत चक्कर मारायला जात. रावसाहेबांन खरं तर झोप अनावर झाली असे. पण तरी ते कसे बसे पाय ओढत सगळ्यांसोबत फिरत. रावसाहेबांची पावलं अडखळू लागली की सगळे माघारी फिरत.
असा एकंदरीत रावसाहेबांचा दिवस असे. पण मागचे काही दिवस सगळं बदललं होतं. तात्या आणि अक्काची गडबड मात्र पूर्वीसारखीच होती. एकमेकांमुळे उशीर झाल्याचा आरोप एकमेकांवर करणेही पूर्वीसारखेच होते. रावसाहेब आपल्या खोलीत पडल्यापडल्या त्याची मजा घेत.
सद्ध्याचा हा दिनक्रम त्यांना मनापासून आवडत होता. माईसुद्धा आताशा त्यांच्या फार मागे लागत नसे. स्वप्नवत वाटावं असं आयुष्य रावसाहेब सद्ध्या जगत होते. पण हे सगळं लवकरच संपणार ह्याची जाणीव असल्याने ते मधूनच अंमळ दु:खीही होत. जमतंय तितके दिवस मजा करून घ्यावी असा विचार करून ते मनावर साचलेलं मळभ झटकत आणि पुन्हा कूस बदलत. रावसाहेबांच्या ह्या बदललेल्या आयुष्याचं कारण त्यांना माहित होतं. खरं तर ते ह्या दिवसांची मनापासून वाट बघत होते. रावसाहेब आनंदात होते. अजून थोडावेळ अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी पुन्हा एकदा कूस बदलली. आता तात्या आणि अक्कासोबत आवरून तयार व्हायची घाई नव्हती. आता त्यांना उठवायला कुणीही येणार नव्हतं. आता लवकर अंघोळ करायला कुणीही सांगणार नव्हतं.
कारण रावसाहेबांची वार्षीक परीक्षा संपून आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती.