पर्सनॅलिटी टेस्ट
| Labels: लेख | Posted On 11/12/09 at 1:30 AM
आज सकाळी सकाळीच एका हलकट मित्राने एक 'पर्सनॅलिटी टेस्ट' असणारी मेल पाठवली. सहसा मी अशा टेस्ट्स सोडवायच्या भानगडीत पडत नाही. कारण त्याचे रिझल्ट्स मला हवे तसे कधीही लागत नाहीत. ‘तुम्ही अतिशय माजोरडे आहात, स्वतः पलिकडे बघायला शिका’ पासून ते Go out and get a life अशी वेगवेगळ्या टोकाची उत्तरं येतात. ह्या टेस्ट कोण बनवतं आणि त्याला मानसशास्त्रीय आधार काय हे प्रश्न मला नेहमी सतावतात. पण गंमत म्हणूनच ह्या टेस्ट सोडवायच्या असतात हे ही तितकंच खरं आहे.
आज पण नेहमीप्रमाणे ऑफीसमधे काम नव्हतं आणि कंपनी आपल्याला ऑर्कूटींग आणि ब्लॉगींगचा पगार देते तर काही तरी नवं लिहू म्हणून मी सुद्धा एक पर्सनॅलिटी टेस्ट बनवायची ठरवली. काही प्रश्न, काही चित्र, त्या खाली उत्तरं आणि ती 'आधीच बघायची नाहीत बरं का' ही अट असं इतर पर्सनॅलिटी टेस्ट सारखंच माझ्याही टेस्टचं स्वरूप आहे. तर मग सोडवा हे प्रश्न आणि जाणून घ्या तुम्ही खरे कसे आहात.
प्रश्न १
तुम्ही एका सुलभ मधे गेल्यावर तुम्हाला ही तीन भांडी दिसतात. तुम्ही त्यातलं कोणतं भांडं निवडाल? तुमचा पर्याय ठरवा आणि मगच तुमच्या पर्यायासमोरचं विवरण वाचा. पर्याय ठरवण्याआधी विवरण वाचू नका.
पर्याय 'अ' - पहिलं भांडं
तुम्ही कायम सगळ्यांच्या पुढे पुढे करणारे आहात. काहीही करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याची तुमची प्रवॄत्ती आहे. त्यामुळे कुठल्याही संधीवर सगळ्यात आधी तुम्ही झडप घालता. आपण सतत काही ना काही कारणाने लोकांच्या डोळ्यासमोर रहायला हवं ही तुमची सुप्त इच्छा आहे. तुम्ही एक पाऊल मागे येऊन आयुष्याबद्दल विचार करा की तुम्हाला जे हवंसं वाटतंय ते खरंच तुम्हाला हवंय की तुम्हाला हवंय असं नुसतंच वाटतंय.
पर्याय 'ब' - दुसरं भांडं
तुम्ही रिस्क घेत नाही. सेफ गेम खेळण्यावर तुमचा भर असतो. तुम्हाला कायम आपल्या कोषात रहायला आवडतं. पण ते करणं चुकीचं आहे हे ही तुम्हाला समजतं. म्हणून तुम्ही सगळ्यांच्या पुढे नको की सगळ्यांच्या मागे नको असा मधला पर्याय निवडता. आता वेळ आली आहे हे सगळं बदलण्याची. उठा आणि स्वतःच्या आयुष्याचा ताबा घ्या.
पर्याय 'क' - तिसरं भांडं
तुम्ही अगदीच हे आहात. तुम्ही जबाबदारी टाळणारे आहात. शक्यतो कुणाच्या नजरेस पडायचं नाही असा तुमचा प्रयत्न असतो. जबाबदारी पडली की ती पार पाडावी लागते, नाही पाडली की वाट लागते. त्यामुळे शक्यतो कुणाच्याही लक्षात येणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही वावरत असता. तुमच्यात महत्त्वाकांक्षा नाही. खरं तर इतकी वर्ष तुम्ही जगलात कसे हाच प्रश्न आहे. आणि 'का' हा त्याहून मोठा प्रश्न आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न २
आता आपण लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेऊ. खाली तीन फळांची चित्रं आहेत. त्यातलं कुठचं फळ तुमच्या मित्रांच्या दृष्टीने तुमच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वाधीक जवळ येतं ते सांगा. पर्याय ठरवण्याआधी उत्तरं वाचू नका. तुमचा पर्याय ठरवा आणि मगच तुमच्या पर्यायासमोरचं विवरण वाचा. पर्याय ठरवण्याआधी विवरण वाचू नका.
पर्याय 'अ' - आंबा
आंब्यातला अ की आंब्यातला आं? असो. तुम्ही आंब्यासारखे आहात असं लोकांना वाटतंय असं तुम्हाला वाटत असेल तर खरंच तुम्ही तसे आहात. वरून छान, रसाळ, गोड दिसणारे. पण आतून मात्र बाठीसारखे टणक. तुम्हाला बघून लोकांना तुमच्याशी मैत्री करावीशी वाटते. पण मैत्रीचा सुरुवातीचा गर संपला की त्यांना तुमची बाठ टोचू लागते. रायवळ आंब्यासारखीच तुमच्या दुर्गुणांची तुसं त्यांच्या दातात अडकू लागतात आणि लवकरच तुमची गच्छंती होते. तसेच पिकलेल्या आंब्यासारखी तुमची मैत्री नासतेही लवकर.

पर्याय 'ब'- फणस
वरून कठोर दिसणारे तुम्ही आतून मात्र एकदम... गोड नाही, गिळगिळीत आहात. एकदा का तुमचं टणक कवच गळून पडलं की तुम्ही गर्यासारखे कुठेही कुणाच्याही गळ्यात सळ्ळ्कन उतरता. आणि गर्यातली आठी जशी घशात अडकून फणस सोलणार्याचेच प्राण फटकन कंठाशी आणते तशी अवस्था तुमच्याशी मैत्री करणार्यांची तुम्ही करता. थोडक्यात सांगायचं तर जेवणासाठी तुम्हाला आमंत्रणाची गरज नाही. तुम्ही ती पडूच देत नाही. फुकट ते पौष्टीक आणि फुकट तिथे फॅमिलीसकट ही वाक्य तुम्हाला तंतोतंत लागू पडतात.
पर्याय 'क' - संत्र
संत्र्यातला क? जाऊ दे. तुम्ही संत्र्यासारखे आहात. म्हणजे अगदीच मिळमिळीत. उगाच आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून आत नावापुरती कडू बी. बाकी सगळा गरच. तुम्ही नॉर्मल मूडमधे असता तेव्हाच तुमचे मित्र तुम्हाला झेलू शकतात. पिकलं नाही तर पाणचट आणि जास्त पिकलं की आंबट ढाण अशी संत्र्याची जी अवस्था होते तीच तुमचीही आहे. पण साल चिमटीत दाबून दुसर्याचे डोळे झोंबवण्यासाठी तुमचे मित्र तुमचा वापर करतात. काम झालं की टाकून देतात. थोडक्यात, लोकं तुमचा कामापुरता मामा करतात. आणि तुम्ही त्यातच सुखी रहा.
संत्र्यातला क? जाऊ दे. तुम्ही संत्र्यासारखे आहात. म्हणजे अगदीच मिळमिळीत. उगाच आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून आत नावापुरती कडू बी. बाकी सगळा गरच. तुम्ही नॉर्मल मूडमधे असता तेव्हाच तुमचे मित्र तुम्हाला झेलू शकतात. पिकलं नाही तर पाणचट आणि जास्त पिकलं की आंबट ढाण अशी संत्र्याची जी अवस्था होते तीच तुमचीही आहे. पण साल चिमटीत दाबून दुसर्याचे डोळे झोंबवण्यासाठी तुमचे मित्र तुमचा वापर करतात. काम झालं की टाकून देतात. थोडक्यात, लोकं तुमचा कामापुरता मामा करतात. आणि तुम्ही त्यातच सुखी रहा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ३
ह्या शेवटच्या पर्याय निवडीमधे आपण तुम्ही स्वतः स्वतःचं मूल्यमापन कसे करता ते आपण पाहू. खालील चित्रांपैकी एका चित्राची निवड करा. तुमचा पर्याय ठरवा आणि मगच तुमच्या पर्यायासमोरचं विवरण वाचा. पर्याय ठरवण्याआधी विवरण वाचू नका.
पर्याय 'अ' - गोमय
प्रत्यक्ष गायीच्या दृष्टीने टाकाऊ पण जगासाठी अत्यंत उपयोगी. तुम्ही स्वतःला अगदीच युसलेस समजता. पण जगाला तुमची किंमत माहिती आहे. अडल्या-नडल्याला ते हक्काने पहिली हाक तुम्हालाच मारतात. पण इतर वेळी मात्र तुम्ही समोर आलात की नाक धरून बाजूने निघून जातात.
पर्याय 'ब' - झुरळ
लोकांना तुम्हाला बघून किळस येते. पण तुम्हाला फरक पडत नाही. ह्याचं कारण असं की झुरळाप्रमाणे तुम्हीही महाविनाशाच्या लाटेत टिकून राहिले आहात. आजूबाजूच्या परिस्थितीचा तुम्ही स्वतःवर काहीही परिणाम होऊ देत नाही. जगणे हेच तुमच्या जगण्याचे ध्येय आहे. जिथे डायनॉसोर सारखे मोठ मोठे ताकदवान प्राणी गळपटले तिथे तुम्ही टिकून राहिलात. बाकिच्या प्राण्यांची उत्क्रांती झाली. म्हणजे माकडाचा माणूस झाला वगैरे. पण झुरळ मात्र लाखो वर्षापूर्वी होतं तसंच आजही आहे. त्यामुळे जग काही म्हणो तुम्ही आहात त्यात समाधानी रहाता.
पर्याय 'क' - रिकामी बंदूक
तुम्हाला बघून लोकं घाबरतात, म्हणजे तुमच्या विषयी आदर वाटतो, पण फक्त चाप ओढेपर्यंतच. तुमचं फर्स्ट इंप्रेशन दबदबा निर्माण करणारं असतं. पण तोंड उघडलं की 'बोल तो क्यों बोला' अशी अवस्था होऊन बसते. उदाहरण द्यायचं तर लम्हे मधल्या हिरो ने भावनतिरेकाने 'पल्लो' म्हटल्यावर लोकं भावनाविवश होण्याऐवजी त्याचा आवाज ऐकून थेटर हस्यकल्लोळात बुडालं तसंच काहीसं. (त्याच्याहून श्रीदेवीचा आवाज मॅनली होता असं एका परीक्षणात वाचलं.) कशातही आपल्याला प्रचंड गती आहे हा तुमचा समज ह्या स्वभावाला कारणीभूत आहे. तर, थोडक्यात सांगायचं तर तुम्ही झाकली मूठ आहात. त्यामुळे लोकांना तुमच्याविषयी जे गैरसमज व्हायचेत ते होऊ दे. तोंड उघडून अवलक्षण नको. अन्यथा 'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ' असं म्हणायची पाळी येईल.
------------------------------------------------------------------------------------------------------------
आता ह्या सगळ्यातून जो सही-सलामत पार पडेल आणि जास्तीत जास्त अचूक उत्तरं शोधेल त्याला आमच्यातर्फे ही छानशी गोंडस भेट:
बबन चड्डी