निर्लज्ज व्हा - अंतिम भाग

| Labels: | Posted On 10/28/10 at 10:07 AM

मुली जेव्हा नुकतंच लग्न होऊन सासरी जातात तेव्हा पहिले काही दिवस त्यांची पार गंमत उडालेली असते. काही म्हणजे काही कळत नाही. नवं घर, नवी माणसं आणि लग्नापूर्वी आपला वाटणारा आणि लग्नानंतर अचानक सासरच्या गोटात सामील झालेला नवरा अशा वेगवेगळ्या लेव्हल्सवर तिचा सामना सुरू असतो. गाडं पहिल्यांदा अडतं ते स्वयंपाक करण्यावरून. लग्नाआधी आईने महिन्यांचा क्रॅशकोर्स करून घेतलेला असतो. पण लग्नापूर्वीच्या महिन्याभरात लग्नाच्या तयारीमुळे सगळ्यावर छान बोळा फिरवला जातो. त्यात आजकालच्या मुलींना मी नोकरी करत असूनही घर उत्तम सांभाळते हे दाखवून द्यायची भारीच हौस असते. आणि इथेच लोचा होतो. भरीसभर म्हणून काही नवरे पावलो पावली बायकोची तुलना त्यांच्या आईशी करतात. सगळ्याच बाबतीत. तर अशी एक घटना आपण बघू.

घटना - सामान्य दॄष्टीकोन
वेळ - मंमं करायची
पार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.


नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का रे? काय झालं? बटाट्याची आहे ही.
नवरा - ते कळलं गं, पण ही अशी? अशी बटाट्याची भाजी मी मागच्या ३० वर्षात खाल्ली नव्हती.
बायको - मीठ जास्त पडलं का?
नवरा - नाही... मीठ बरोबर आहे, भाजीत बटाटे कमी पडलेत.
बायको - अरे काय झालं नीट सांगशील का?
नवरा - खाऊन बघितलीस तू मला वाढण्याआधी?
बायको - हो...
नवरा - मग कळलं नाही तुला? साधी बटाट्याची भाजी करता येऊ नये म्हणजे कमाल आहे.
बायको - अरे पण...
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
बायको - असं रे काय करतोस? मी पण नुकतीच सुरुवात केली आहे ना?
नवरा - पण साध्या पोळ्या येऊ नयेत म्हणजे कमाल झाली. एकदा माझ्या आईच्या हातचं खाऊन बघ म्हणजे कळेल फरक खाकरे आणि पोळ्यांमधला
(
बायको मुसमुसायला लागते)
नवरा - आता रडू नकोस. एव्हढं काही झालं नाहिये...
बायको - मग तू किती ओरडतोस माझ्यावर...
नवरा - ओरडू नाही तर काय करू...
(
नवर्याचं आई पुराण पुन्हा सुरू होतं.)

आता ह्या समर प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी उत्तम स्वयंपाक शिकणे अथवा स्वयंपाकाला बाई ठेवणे हे दोनच उपाय आहेत. पण तोपर्यंत किल्ला लढवण्यासाठी निर्लज्जपणाच तुमच्या मदतीला धाऊन येईल


----------------------------------------------------------------------------------------


घटना - निर्लज्ज दॄष्टीकोन
वेळ - मंमं करायची
पार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.


नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस?
नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का?
बायको - बघितली, मीठ जास्त वाटलं म्हणून पुन्हा थोडे बटाटे घातले तर भाजी अळणी झाली. म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं तर तू म्हणतोस भाजी खारट झालेय.
नवरा - खरंच झालेय अगं. साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.
बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते?
नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.
बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.
नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं?
बायको - नाही रे...
नवरा - मग?
बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...
नवरा - ते आहेच गं. पण...
बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.

नवरा - हे कुणी सांगितलं तुला?
बायको - अरे परवा तुला तिसर्‍यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास?
नवरा - अगं ते वेगळंबायको - काही वेगळं नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...
नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)
बायको - नाही तर अजून 
एक आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ,००० घेतात
नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ,०००त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ,०००)
बायको - पण त्याला वेळ लागेल रे...
नवरा - वेळ सगळ्यालाच लागतो अगं. जाऊ दे, ये जेवायला...


घटना समाप्त

अशा साध्या साध्या घटनांतून आपल्याला निर्लज्जपणाचं महत्त्व संसारात पावलोपावली पटू लागेल.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------


निर्लज्जपणा जर सगळ्यात जास्त कुठे उपयोगी पडत असले तर तो संसारात. A perfect marriage is based on perfect mutual misunderstanding असं कुणी एक थोर तत्त्ववेत्ता सांगून गेला ते खरंच आहे. पण ह्या पलिकडे जाऊन आपल्या नवर्याच्या मर्कटलिलांकडे दुर्लक्ष करण्यासाठी निर्लज्जपणाच उपयोगी पडतो. "किती वेळा सांगितलं तरी हा काही सुधारत नाही" ही जगातल्या समस्त बायकांची तक्रार आहे. आणि त्यावर कुणालाही अजूनही सोल्यूशन शोधणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्या फंदात पडूच नये.


नवर्यांचं सुधारणं हे सिनेमात नितंब उडवत नाचणार्या (शब्दप्रयोग कणेकरांकडून साभार) बार बाला कम आयटम गर्लला एके दिवशी होणार्या "अरे, आपण अभिनयाशी संबंधीत क्षेत्रात काम करतो" ह्या साक्षात्कारासारखं असतं. ते फारसं मनावर घेऊ नये. एखाद्या सिनेमात - मिनिटं मेक-अप शिवाय दर्शन देऊन आणि अंगभर खादीची साडी गुंडाळून गंभीर आवाजात संवाद म्हटल्यावर त्या जशा पुन्हा नितंब उडवायला मोकळ्या होतात तसंच नवर्यांचंही आहे. अचानक एके दिवशी ह्यांना 'अरे, संसाराचा गाडा दोन चाकांवर चालतो आणि आपल्या चाकाची गती दुसर्या चाकाच्या मानाने जरा कमी आहे" हा साक्षात्कार होतो. आणि त्यावर उपायही सुरू होतो. पण तो रुमाल जागेवर ठेवणे, सोसायटीच्या वॉचमनला दळण आणायला पाठवणे इत्यादि पुरता मर्यादित असतो. ह्या दोघांमधलं अजून एक साम्य म्हणजे ह्या बार बाला / आयटम गर्ल जशा त्या मिनिटांच्या भुमीकेची आठवण पुढल्या प्रत्येक मुलाखतीत काढतात तसेच नवरेही एखाद्यावेळी जागेवर ठेवलेला रुमाल, ऑफिस बॉयला पाठवून भरलेलं बिल, इत्यादी कामांची आठवण प्रत्येक भांडणात काढतात. त्यामुळे नवर्यांच्या सुधारित आवॄतीला फारसं मनावर घेऊ नये. नवरा आणि तेरड्यातलं साम्य ओळखावं.


मुळात लग्न झालं तरी नवर्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच. "त्यामुळे लग्नानंतर तू बदललास" म्हणजे नक्की काय झालं हेच नवर्यांना कळत नाही. उलट "मी होतो तसाच आहे, मग आता कसला त्रास होतोय" हे त्यांना कळत नाहीह्यावर उपाय म्हणून नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवायला हवा. हा नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवून संसार सुखाचा कसा करावा हे कळण्यासाठी नवर्यांचे काही गुण आणि खास सल्ले इथे देत आहे.


संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना काही सल्ले:
.  "कल्पवॄक्ष कन्येसाठीह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे.
. नवर्यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.
. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.
. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.
. नवर्यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे
. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्यांना अजिबात त्रास होत नाही.
. नवर्यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.
. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही.
. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी.
१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. 



ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील


आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्यांना एकमेव सल्ला:
"
आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका."