निर्लज्ज व्हा - भाग २

| Labels: | Posted On 10/2/10 at 9:55 AM

निर्लज्जपणाचे फायदे केवळ ऑफिसमधेच नव्हे तर इतरत्रही होतात. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लोकल ट्रेन्स. इथे तर निर्लज्जपणाचा कळस करावा लागतो. मुंबईतल्या माणसांना पडणार्‍या स्वप्नातही ते स्वतःला विंडो सिट वर बसलेलं बघत नाहीत. किमानपक्षी दोन सिट्सच्या मधल्या जागेत धक्के न खाता उभं राहता यावं इतकीच माफक अपेक्षा मुंबईकराची असते. पण ती सुद्धा अनेकवेळा पूर्ण होत नाही.

दरवाजातच मुर्खासारखे लटकणारी लोक, उतरायचं नसूनही मधेच उभे राहणारे, भयाण वासाची तेलं डोक्यावर थापून आलेले भैय्ये, अशक्य गोंगाट करणारे गुजराथी, आपल्या मित्रांसाठी जागा अडवून ठेवणारे कंपू आणि साक्षात गणपती, विठ्ठल, श्री राम इत्यादि देवाधिकांना कानात बोटं घालायला लावणारी भजनी मंडळं ह्यांच्या सोबत प्रवास करणं आणि लोकांचे घाम पुसत पुसत इच्छितस्थळी पोहोचणं ही काय सर्कस आहे ते मुंबई बाहेरच्या लोकांना कळणार नाही. पण हा अनुभव लाखो मुंबईकर रोजच घेत असतात. ट्रेनमधे शिरण्यापासून आपल्याला संघर्ष करत करत मुक्कामी पोहोचायचे असते.घटना २ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - फलाट

वेळ - सकाळी ८:३० ते १० आणि संध्याकाळी ५:३० ते रात्रीची शेवटची ट्रेन जाईपर्यंत कधीही

पार्श्वभूमी - तुम्ही ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे आहात. नलाने दमयंतीची केली नसेल इतकी लोकलची प्रतीक्षा करणारा जनसागर. तुम्ही धावत्या ट्रेनमधे उडी मारून चढण्यासाठी तयार आहात. ट्रेन येते. इतक्यात कुठून तरी एक माणूस तुम्हाला धक्का मारून तुमच्या पुढे येतो आणि तुमच्या ऐवजी तो गाडीत चढतो. तुम्ही ट्रेनच्या सोबत धावत धावत दरवाज्यापाशी येता. दरवाज्यात खांब धरून उभा असलेल्या माणसाला विनंती करता.

तुम्ही - अंदर चलो अंदर चलो...
खांबधारी माणूस - अरे जगा नहिये भैय्या...
तुम्ही - अरे अंदर जगा है, मेरेको दिख रहा है इधरसे...
खांबधारी माणूस - इधरसे दिखता है तो उधरसे जाओ...
तुम्ही - अरे ऐसा कैसा बात करता है तुम... कमसेकम पैर तो अंदर रखने दो...
(आता ती पाय ठेवायची २ इंच x २ इंच जागा त्याने पुढल्या स्टेशनवर चढण्यार्‍या मित्रासाठी ठेवलेली असते.)
खांबधारी माणूस - अरे किधर दिखताय तुमको जगा?
तुम्ही - यार कबसे खडा हुं, दो ट्रेन छोडा इसके पहलेका.
खांबधारी माणूस - तो एक ट्रेन और छोड. नेक्स्ट ट्रेन पूरा खाली हे, उसमे चढो...
(तरी तुम्ही कसे बसे दांडा पकडता. पण पाय कुठे ठेवायचा हा प्रश्न उरतोच. ट्रेन सुटते. भूतदयेने लोकं तुम्हाला वर खेचून घेतात.)
खांबधारी माणूस - साला मरने का है क्या? खाली फोकट हमारा खोटी करेगा...

लोकांनी आपला जीव वाचवल्याचं ओझं डोक्यावर घेऊन तुम्ही अख्खा प्रवास उभ्याने करतात. काही लोकं पार शेवटच्या स्टेशनवर उतरायचं असूनही तुमच्यापुढे पॅसेजमधेच उभी राहतात. त्यामुळे चढणारी-उतरणारी सगळी मंडळी तुम्हाला धक्के देत, शिव्या घालत चढतात-उतरतात. तुम्ही फुकटात कंप्लीट बॉडी मसाज मिळाला (आजूबाजूला भैय्ये असतील तर ऑईल मसाज) असं समजून गप गुमान आपल्या स्टेशनवर उतरून मान खाली घालून घरी जाता.

-----------------------------------------------------------------------------------------------------

घटना २ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - फलाट

वेळ - सकाळी ७:३० ते १० आणि संध्याकाळी ५:३० ते रात्रीची शेवटची ट्रेन जाईपर्यंत कधिही

पार्श्वभूमी - तुम्ही ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे आहात. नलाने दमयंतीची केली नसेल इतकी लोकलची प्रतीक्षा करणारा जनसागर. तुम्ही धावत्या ट्रेनमधे उडी मारून चढण्यासाठी तयार आहात. ट्रेन येते. इतक्यात कुठून तरी एक माणूस तुम्हाला धक्का मारून तुमच्या पुढे जाऊ पाहतो. तुम्ही त्याला आणि तुमच्या पुढच्याला कोपर मारून अजून पुढे जाता. धावत्या ट्रेन मधे चढता. दरवाज्याचे हँडल धरून उभे राहता. आत जाण्याची मोहीम सुरू होते.

तुम्ही - चले ए शाहरूख, अंदर चल...
खांबधारी माणूस - अंदर जगा नहिये
तुम्ही - बंदर की तरह खंबे पे क्या लटकता है, अंदर चल...
खांबधारी माणूस - अरे भैय्या बोलाना जगा नहीं है...
तुम्ही - ए भैय्या कोणाला बोलतो रे... च्यायला उतर प्लॅटफॉर्मवर दाखवतो तुला...
खांबधारी माणूस - अरे वैसा भैय्या नहीं रे...
तुम्ही - अंदर चल अंदर चल...
(तुमच्या पुढे एक भैय्या उभा आहे)
तुम्ही - ए भैया तेरेको किधर उतरने का है?
भैय्या - अंधेरी...
तुम्ही - तो अभिसे इधर कायको खडा है? बगिचे में आया क्या घुमने को? पिछे हट...
भैय्या - अरे मगर अंदर जगहा नही है...
तुम्ही - तुम साला हजारो लोग रोज आताय फिरभी मुंबई में जगा होताय ना...
भैय्या - कितनी भीड है...
तुम्ही - साला तुम लोग काई भीड है... अब गाव में खत डाल और बोल की और भैय्ये मत भेजो...

तुमचा आवेश बघून एक दोन माणसं तुम्हाला जागा करून देतात. दरवाज्याच्या पॅसेज मधून सिट जवळच्या पॅसेजमधे पोहोचायचा पहिला टप्पा पार पडला. हळू हळू सरकत सरकत तुम्ही सिट्स जवळ येता. तीन जणांच्या सिट वर चक्क तीनच माणसं बसलेली आहेत. त्यातला एक अंगाने जरा रूंद असल्याने बाकिचे लोक 'कसं सरकायला सांगायचं?' असा विचार करून दुसरं कुणी उठायची आशाळभूतपणे वाट बघत उभे असतात.

तुम्ही - थोडा सरकके लो...

विंडोवाला बाहेर बघत असल्याचे दाखवून अथवा झोपेचे सोंग घेऊन तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. २-३ नंबरचे केवळ जागच्याजागी हलतात.

तुम्ही - थोडा सरकके लो...
बसलेला - और कितना सरकेगा? इतनाही जगा है...

ह्या अशाच उत्तरांमुळे लोकं बसायचा नाद सोडून बाजुला उभे राहिलेले असतात. त्या सगळ्यांचा नजरेत 'आता काय करशील लेका' हे स्पष्ट दिसत असतं. अशावेळी पुढचा मागचा विचार न करता सरळ त्या उरलेल्या १ इंचाच्या पट्टीवर टेकून घ्यावे. बसताना तिसर्‍या सिटवरच्या माणसाला नीट घासून, दाबून बसावे.

बसलेला - अरे क्या करताय...
तुम्ही - बस थोडासा सरको... (असं म्हणून त्याला अजून थोडे आत दाबावे)
बसलेला - अरे धक्का क्यों मारताय...
तुम्ही - धक्का खानेका नै है तो फर्स्ट क्लास में जाओ. टिकीट हमने भी निकाला है.

एकदा टेकायला जागा मिळाली की मग बसायला मिळण्याचे चान्सेसही वाढतात. बाजुच्याला दाबत रहायचे विसरू नये. अन्यथा त्या १ इंचाच्या पट्टीवर फार वेळ बसल्यास अर्धशिशिचा त्रास संभवतो.

गाडी थोडी जरी हकली तरी निर्लज्जपणे मिलीमिटर मिलीमिटर लढवत सिटवर हळू हळू पसरायला लागायचं. १-२ स्टेशन्स गेली की तुम्हाला किमान टेकायला तरी मोप जागा झालेली असते. आणि मधेच कुणी उठला तर मधे उभ्या असलेल्या माणसाला सिट ऑफर करण्याचा अगोचरपणा न करता उठणारा माणूस पूर्ण उठायच्या आधीच आतच जागा ताब्यात घावी. मोहीम फत्ते.

अशाप्रकारे प्लॅटफॉर्मवर शिरायच्या आधीच आपला भिडस्त स्वभाव बाजूला ठेवावा आणि निर्लज्जपणा अंगी बाणवूनच गाडीत चढावे, म्हणजे प्रवास कुठचाही असो, सुखाचा होईल.


(निर्लज्जपणे) पुन्हा क्रमशः

Comments:

There are 13 comments for निर्लज्ज व्हा - भाग २