निर्लज्ज व्हा - भाग ३

| Labels: | Posted On 10/12/10 at 11:56 AM

'निर्लज्ज व्हा' च्या ह्या तिसर्‍या भागात आपण जे काही बघणार आहोत त्याला समर्थपणे तोंड द्यायला किंवा त्यातून निव्वळ निभावून जायला निर्लज्जपणा सोबतच कमालीचा अफाट डांबरटपणा, थोडाफार निगरगट्टपणा आणि कोडगेपण आवश्यक आहे. त्याचं असं आहे की बॉस आणि नोकरी कोणत्याही क्षणी बदलू शकतात. ट्रेनमधे आपण रोज फार फार तर जाऊन-येऊन ३-४ तास घालवतो. पण बायको हा असा विषय आहे की जो भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवून फेस आणतो. मी मी म्हणणारे आणि बाहेर गर्जना करणारे नरसिंह घरात शिरायच्या आधीच आपली नखं आणि दात काढून ठेवतात. आमच्या एका कर्दनकाळ मास्तरांना सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालताना पाहून मला बायको हा विषय काही तरी वेगळा आहे ह्याची बालपणीच जाणीव झाली होती. आमचे मास्तर सकाळी सकाळी केवळ धोतर नेसून कपडे वाळत घालत होते ह्यात काही वावगं नाही. पण त्यांची ती कसरत सुरू असताना त्यांची धर्मपत्नी समोर खुर्चीत बसून चहा पित होती हे महत्त्वाचं आहे. लग्न झालेल्या सगळ्याच पुरुषांच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच असं नाही. काही काही बायका मोठ्या मनाने कामवाली बाई ठेवायची परवानगी देतातही. पण ह्या पलिकडेही अनेक मानसीक ताण आहेत. सगळ्यात महत्त्वाचा ताण म्हणजे आपल्याला वेळेवर उठवायचा त्यांचा अट्टाहास.

'घड्याळ हे माणसाने वेळ मोजण्यासाठी तयार केलेलं यंत्र आहे. जगन्नियंता हाताला घड्याळ बांधत नाही. सकाळी ९ वाजून पंधरा मिनिटांनी पॄथ्वी निर्माण करीन. दुपारच्या जेवणानंतर हलकेच वामकुक्षी आटपून साधारण ५ च्या सुमारास माणूसाला जन्म देईन असं ब्रम्हदेवाने ठरवलं नव्हतं.' हे मी बायकोला लक्षवेळा ऐकवूनही ती त्यातून बोध घेत नाही. इतक्या स्ट्राँग अर्ग्युमेंटवर ती 'तू ब्रम्हदेव नाहीस' ह्या एका वाक्यात बोळा फिरवते.

बायकोसोबत आयुष्य काढायचं असल्याने असे कैक समर प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. त्यातले काही आता आपण बघू.

घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

वेळ - रविवार सकाळी कधीही

पार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायको तुम्हाला उठवायच्या प्रयत्नात आहे.

बायको - ऊठ बघू...
तुम्ही - ५ मिनिटं...
बायको - तो गजर बोंबलून बोंबलून शांत झाला...
तुम्ही - खरंच ५ मिनिटं
बायको - ५ मिनिटं ५ मिनिटं करत करत तास झाला. कितीवेळ झोपायचं ह्याला काही सुमार आहे की नाही. उठ बरं लवकर, मला मदत कर पटापट. किती कामं पडलेयत.
तुम्ही - झोपू दे गं थोडावेळ. आज सुट्टी आहे.
बायको - मलाही सुट्टी आहे, तरी मी उठले ना?
तुम्ही - ह्या आठवड्यात मर मर काम केलंय. दमलोय मी. झोपू दे मला.

(सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी हे वाक्य जर तुम्ही उच्चारलं तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.)

बायको - काम केलंय म्हणजे? मी काम नाही करत? मी नाही दमत.
तुम्ही - अगं पण...
बायको - तू आपला घरी आलास की बसतोस तंगड्या पसरून. मला ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळावं लागतं.
तुम्ही - मी सुद्धा मधून मधून मदत करतोच की तुला.
बायको - डोंबलाची मदत. शेवटचं काम तू कधी आणि काय केलं होतंस सांग बघू.
(खूप प्रयत्न करूनही आठवत नाही. आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात.)
बायको - नाही ना आठवलं. कसं आठवेल? आठवण्यासाठी मुळात कामं करावी लागतात. जरा इकडची काडी तिकडे करायला नको.
तुम्ही - हे बघ, मला काड्या करायची सवय नाहीये. हॅ हॅ हॅ...

(सुजाण नागरीकांनो आणि अजाण बालकांनो, तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी अशा प्रसंगी विनोदबुद्धीला आवर घातला नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रम्हदेवही वाचवू शकत नाही.)

बायको - फालतू विनोद केलेस तर पातेलं घालीन डोक्यात...
तुम्ही - मान अडकेल अगं तुझी... (विनोद नकोत)
बायको - हे बघ, मी मस्करीच्या मूड मधे अजिबात नाहिये. बायको म्हणजे काय कामवली बाई वाटली तुला? आत्ताच्या आता उठ आणि पटापट मला आवरायला मदत कर.

बायको आपल्याला बळजबरीने खेचून बेडवरून उठवते. रवीवार सकाळ लोळत घालवण्याच्या तुमच्या मनसुब्यांबर पाणी फिरवलं जातं. बेडवरून खेचून उठवण्याव्यतिरिक्त तोच इफेक्ट देणारे काही वेगळे उपायही बायको वापरू शकते - आईला फोन लावून आपल्याशी बोलायला लावणे (ह्याला पाहुण्याच्या काठीने साप मारणे असेही म्हणतात), पंखा बंद करणे, कुकरमधे नुसतंच पाणी घालून शिट्या होऊ देणे आणि सगळ्यात जालीम उपाय म्हणजे रडणे + बट्ट्याबोळ झाला माझ्या आयुष्याचा हे ऐकवणे. ह्या सगळ्याचा शेवट आपल्या मनासारखा व्हावा अशी इच्छा असेल तर उपाय फार सोपा आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------


घटना १ - माझा दॄष्टीकोन

वेळ - रविवार सकाळी कधीही

पार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायकोच्या पहिल्या हाकेलाच तुम्ही उठता.

बायको - ऊठा... ८ वाजले.
(तुम्ही ताडकन उठून बसता.)
तुम्ही - अरे यार... इतका वेळ कसा झोपलो? गजर वाजलेलाही समजला नाही. जाग कशी नाही आली मला.
बायको - काय झालं रे?
तुम्ही - काही नाही गं, आज जरा आवराआवरी करायचा विचार होता. पण तू कशाला उठलीस इतक्यात? झोप अगं थोडा वेळ. किती दमतेस आठवडाभर. ऑफिस घर दोन्ही सांभाळता सांभाळता पिट्ट्या पडतो अगदी तुझा.
बायको - असू दे रे, त्यात काय इतकं. सगळ्याच बायका करतात.
तुम्ही - सगळ्यांचं मला माहिती नाही. तू पड जरा. मी पटकन कामं संपवतो. चहा टाकतो आणि तुला उठवतो.
बायको - वेडा आहेस का अरे. खरं म्हणजे तूच झोप थोडावेळ. ह्या आठवड्यात खूपच काम होतं तुला.
तुम्ही - अगं पण...
बायको - माझं होईल आवरून इतक्यात. मग उठवते तुला. मस्त आलं घालून चहा करते.
तुम्ही - बरं. लवकर उठव पण. तू कामं करत असताना लोळत पडणं आवडत नाही मला.


हाय काय अन् नाय काय. द्या ताणून आता सुखाने. जे काम कितीही आदळाअपट केली असती तरी झालं नसतं ते केवळ १ मिनिटाच्या डांबरटपणाने झालं. पण ह्या युक्तिचा उपयोग मर्यादित प्रमाणात करावा. अन्यथा एके दिवशी बायको खरंच कामाला लावेल आणि तुमचा सप्तरंगी पोपट होईल.


(निर्लज्जपणे) पुन्हा क्रमशः

Comments:

There are 6 comments for निर्लज्ज व्हा - भाग ३