बोळे

| Labels: | Posted On 10/25/09 at 8:28 PM

माणूस म्हटलं की बोळे आले. बोळे आले की पाणी तुंबणं आलं. अडकलेल्या बोळ्यामुळे अलीकडच्या बाजूला जरी सगळं कोरडं ठणठणीत, स्वच्छ, उत्तम, सुरळीत दिसत असलं तरी पलीकडच्या बाजूला तुंबलेल्या पाण्यावर वॅट ६९ च्या बाटली प्रमाणे गारेगार हिरवंकंच शेवाळं जमलेलं असतं हे बर्‍याच जणांना कळत नाही. दिसत नाही. बहुतेक जणांना असा एखादा बोळा आपल्यालाच तुंबवतोय हेच माहिती नसतं. किंबहुना, असा एखादा बोळा आपल्या आत सुखाने नांदतोय आणि शेवाळं जमवतोय हे त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. त्यामुळे हा बोळा काढून पाणी वाहते करायचे असेल तर त्यासाठी आधी बोळा कुठला हे शोधून काढणं आवश्यक आहे. ह्या लेखात आम्ही बोळ्यांचे ढोबळ मानाने काही प्रकार आणि ते काढण्यावरील उपाय देत आहोत. स्वतःचे व लोकांचे बोळे काढण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होण्याची बरीच शक्यता आहे. 


मानसिक बोळा - हा बोळा अडकलेल्या लोकांचं मन मुसळधार पावसानंतर उसळणार्‍या झर्‍याप्रमाणे असतं. म्हणजे आनंदी, उत्साही नव्हे, तर वेडं-वाकडं धावणारं. ह्यांचं मन कुणाचं ऐकत नाही. अगदी ह्यांचंही नाही. मन एकीकडे आणि चित्त एकीकडे अशी अवस्था होऊन बसते. मनावर कंट्रोल राहत नाही. मनाला प्रश्न पडू लागतात. मन विचार करू लागतं. पण हे सगळं ह्यांच्या अपरोक्ष. मग हळू हळू अशा मनाची भीती वाटू लागते. मन कधी कुठला विचार करील हे माहिती नसल्याने मनाला वार्‍यावर सोडलं जातं. मन मनास उमगत नाही अशी परिस्थिती उद्भवते. मन आणि हे स्वतः अशा दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती एकाच शरीरात नांदू लागता. मग सुरू होतो मनाशी झगडा. स्वत:च्या मनाला प्रश्न विचारणं. त्यात बर्‍याचदा मनाची सरशी होते. ही लोकं कधीही एक व्यक्ती म्हणून वावरत नाहीत. आतला मी, बाहेरचा मी, आतल्या-बाहेरच्या मधला मी, ऑफिसातला मी, घरातला मी, गुत्त्यावरचा मी असे वेगवेगळे 'मी' ह्यांच्यात असतात. प्रत्येक 'मी'चं मनही वेगळं असतं आणि ते स्वतंत्र विचार करतं. बरीच वर्ष हा बोळा अडकून राहिला की मग अशा दुभंगलेल्या वागण्याची पुढची पायरी येते. मी नाही माझं मन म्हणतं इथून सुरुवात होते. मनाचा वेगळा विचार केला जातो, ऐकला जातो. पुढे सगळे अवयव स्वतःला हवं तसं वागू लागतात. मी लिहीत नाही, माझा हात लिहितो. मी चालत नाही, मनाची हाक ऐकून पायच चालू लागतात अशा भयाण अवस्थेपर्यंत हा बोळा नेऊ शकतो. 'रे पोटा तुला भूक लागली तर गुरगुरून मला का त्रास देतोस? हात आणि तोंडाला सांगून तुझी काय ती व्यवस्था लाव' अशी आज्ञा मन देतं. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ते तुझ्या आणि फक्त तुझ्याच मनाचे खेळ आहेत'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग मन आणि चित्त ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि मानसिक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


वैचारिक बोळा - हा सर्वात भयानक बोळा. ह्या माणसांना आंतरजालीय मराठीत 'उच्चभॄ' म्हटले जाते. हा बोळा ज्याच्यात अडकला तो माणूस म्हणून जगणं बंद करून वैचारिक पातळीवर जगू लागतो. अशा लोकांना शरीर म्हणजे अडचण वाटू लागते. शरीर हा विचारांना जखडून ठेवणार पिंजरा वाटू लागतो. बिर्याणी चापणे ह्या क्रियेला शरीराचे भोग असं म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीत विचार, त्या गोष्टीच्या आधीचा-मागचा विचार सुरू होतो. त्यामुळे होतं काय की कृती करणं बंद पडतं. एखादी गोष्ट करण्याचा विचार करण्यापुढे ह्यांची गाडी जातच नाही. विचार संपले की माणूस संपला, विचारमग्न मन म्हणजे म्हणजे जिवंतपणाची खूण, अशी वाक्य फेकली जातात. अती विचाराने ह्यांना नको नको ते भ्रम होऊ लागतात. शब्दांमधले शब्द दिसू लागतात. सूर्याला 'रवी' हे नाव दिलं कारण सूर्योदयाबरोबर पृथ्वीवर पोचणारा त्याचा प्रकाश चराचर घुसळून काढतो अशा कल्पना सुचू लागतात. ही लोकं सर्वसाधारणपणे कायम अगम्य बडबडतात आणि उर्वरित जगाला निर्बुद्ध समजतात. मुख्यतः आपलं बोलणं कुणाला समजू नये ह्या पातळीवर ते नेऊन ठेवतात. आपले विचार हे काळाच्या पुढे असून ते समजण्यासाठी लागणारी विचारांची प्रगल्भता आपल्याकडेच आहे ह्या विचारावर ते विचारपूर्वक शिक्कामोर्तब करतात. हा बोळा अडकलेल्या व्यक्ती कायम अस्वस्थ असतात. सतत तगमग सुरू असते. ही तगमग आपल्याला दूध देण्यासाठी भैय्याला इतक्या पहाटे उठावं लागतं इथपासून ते जे पाणी रिसायकल करायला निसर्गाला ८ महिने लागतात ते आपण ८ मिनिटाच्या अंघोळीत वाया घालवतो इथपर्यंतही असू शकते. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ते तुझ्या आणि फक्त तुझ्याच विचारांचे खेळ आहेत'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग विचार आणि कृती ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि वैचारिक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


तात्त्विक बोळा - निरर्थक तात्त्विक वाद-विवाद हे ह्या बोळ्याचं वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्टीत वाद घालून आपलं बुद्धीजिवीत्व सिद्ध करण्याकडे ह्यांचा कल असतो. 'पण मला काय वाटतं' ह्या शब्दांनी वाक्याची सुरुवात झाली की समजावं हा बोळा अडकलाय.  अशा लोकांपासून शक्यतो चार हात दूर राहावं.  ह्या बोळ्याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी म्हणतोय ते बरोबरच असेल असं नाही असं हे स्वतःच कबूल करतात आणि पुढे 'पण मला असं वाटतं' अशी पुस्ती जोडतात. उद्या ही लोकं शरद पवारांशी राजकारणावर, सचिन तेंडुलकरशी क्रिकेटवर आणि लता मंगेशकरशी गाण्यावर वाद घालायलाही मागे पुढे बघणार नाहीत. हा बोळा अडकलेल्या लोकांमध्ये मानसिक बोळा आणि वैचारिक बोळा ह्या दोघांची लक्षणं विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे ह्याच्या मीमांसेत फार वेळ दवडत नाही.


असंतुष्ट बोळा - हा बोळा तसा ओळखायला सोपा आहे. कुठल्याही गोष्टीत समाधान मिळेनासं झालं की समजावं ह्या बोळ्याने तुंबवलंय. हा बोळा अडकलेल्या व्यक्ती कधीही दिलखुलास पणे हसत नाही. पु. लं. चं 'म्हैस' ऐकतानाही गॅस झाल्याप्रमाणे आंबट्ट चेहरा करून बसतात. तुमचा विनोद होतो पण म्हशीचा जीव जातो असे विचार मनात येत असावेत बहुतेक.  मनमोकळेपणे एखाद्या  गोष्टीचा आनंद  घेणं ह्यांना जमत नाही.  सतत कसल्या ना कसल्या चिंतेत हे असतात. शिवसेना निवडून आली तर प्रादेशिक पक्ष म्हणून नाखूष आणि काँग्रेस आली तर महाराष्ट्राला कोण विचारणार ह्याची चिंता. ह्या चिंतेत आपण मत द्यायला विसरलोय हे विस्मृतींत जातं. ह्यांना 'चिंतातुर जंतू' संबोधता येईल. हा बोळा अडकलेल्या व्यक्ती तशा निरुपद्रवी असल्याने त्यांचा बोळा काढण्याचे कष्ट घेऊ नयेत. चाव्या मारून गंमत बघावी. झालीच तर दोन घटका करमणूकच होईल.


सुधारक बोळा - जे विज्ञानाला माहिती नाही ते अस्तित्वात नाही अशी धारणा असलेल्या व्यक्तींमध्ये हा बोळा आढळून येतो. टिकेचे मुख्य विषय असतात देव-धर्म, भारतीय संस्कृती, पुराणे,  परंपरा आणि सगळ्याच जुन्या गोष्टी. आपली संस्कृती पाच हजार वर्षांची आपलं वय पन्नासही नाही हा सारासार विचारही टिका करताना ह्यांच्या मनात येत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला ह्या चालीवर देव दाखव नाही तर नास्तिक हो असा ह्यांचा आवेश असतो. लोकांच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणताना आपण विज्ञानावर अंधपणे श्रद्धा ठेवत आहोत ह्याचा त्यांना विसर पडतो. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून बघण्याचा ह्यांचा आग्रह असतो. सवय चांगली आहे, पण विज्ञानाचा कक्षा अजून तरी माणसाच्या विचारशक्ती इतक्याच रुंद आहेत हे लक्षात घेतलं जात नाही. रामायण महाभारत कालीन घटनांचे पुरावे नाहीत म्हणून त्या घडल्याच नाहीत असे ठासून सांगितले जाते. राम कृष्णाने स्वतःच्या हस्ताक्षरात सहीसकट जरी आपलं आत्मचरित्र लिहून ठेवलं असतं तरी हे हस्ताक्षर त्यांचेच आहे ह्याला पुरावा नाही म्हणून ते मान्य झालं नसतं. जगात देव नावाची वस्तू अस्तित्वात नाही ह्यांवर हे ठाम असतात. पण 'देवळात शांत का वाटतं - तिथे लोकांची पॉझिटिव्ह एनर्जी असते - मग त्याच पॉझिटिव्ह एनर्जीला मी देव म्हटलं तर काही प्रॉब्लेम आहे का? ' असे वाद विवाद झाले की मात्र ह्यांची गोची होते. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ज्या विज्ञानाला माणूस माकडापासून झाला की असाच भांगेच्या झाडाप्रमाणे उगवला हे अजून नक्की सांगता येत नाही त्याच्या नादी इतका लागू नकोस'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग सारासार विचार आणि विज्ञानावरील अंधश्रद्धा ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि सुधारक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


भारतीय बोळा - लोकमान्य टिळक, सावरकर, भगतसींग ह्यांच्या नंतर आम्हीच अशा भ्रमात ह्या व्यक्ती असतात. जे जे भारतीय ते ते सगळंच उत्तम अशी ह्यांची ठाम समजूत असते. येत्या दहा पाच वर्षात भारतच जागतिक महासत्ता होणार असा दावा दर दहा पाच वर्षानंतर केला जातो. आधीचा दावा फुटल्यावर 'अरे विचारतोय कोण जगाला? गरज नाही आम्हाला जगाची' अशा वल्गना केल्या जातात. भारत सोडून परदेशात गेलेल्या लोकांवर पळपुटे म्हणून टिका करताना परदेशातून येणार्‍या मित्राला 'जॅक डॅनियल्स आण रे' सांगायला हे विसरत नाहीत. आपण घालत असलेली पँट, आपला मोबाईल फोन ते काँप्यूटर ह्यातल्या कुठल्याही गोष्टीचा शोध भारतात लागला नाही ह्याचा विसर ह्यांना पडतो. 'अरे आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला म्हणून तर तुमच्या काँप्यूटरची ०१०१० ची भाषा तरी जन्मली आणि काँप्यूटर अस्तित्वात आला' अशा वल्गना केल्या जातात. प्रत्येक भारतीय गोष्टीचा जाज्वल्य अभिमान ह्या व्यक्तींना असतो. धारावीतून जाताना नाक झाकण्याऐवजी 'आहे असा वास तुमच्या अमेरिकेत? ' असा प्रश्न केला जातो. पान खाऊन पचापच थुंकताना 'परदेशातली स्वच्छता म्हणजे कुठेही थुंकण्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला आहे' असा आरोप केला जातो. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि एक कडकडीत पहिल्या धारेची पाजणं. ती घेतल्यावर डोकं भिरभिरून 'गड्या आपली स्कॉचच बरी' ह्यावर त्यांचा पुन्हा विश्वास बसतो. स्कॉचचे २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की नको त्या गोष्टींचा गर्व आणि योग्य त्या गोष्टींचा अभिमान ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि भारतीय बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.

.
आता लास्ट बट नॉट द लिस्ट, एक आंतरजालीय मराठी स्पेशल बोळा
.

प्रतिसाद बोळा - लेखापेक्षा मोठा प्रतिसाद आढळला की समजावं हा बोळा अडकलाय. नुसते मोठे प्रतिसाद देऊन ह्या व्यक्ती थांबत नाहीत, तर लेखातल्या प्रत्येक ओळीचं पोस्ट मार्टेम केलं जातं. नवनवे संदिग्ध अर्थ शोधले जातात. साध्या साध्या ओळींमध्ये ह्यांना दृष्टांत होतात.  लेखकाच्या विचारशक्तीचे पृथक्करण केले जाते आणि त्या लेखकाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवले जाते. 'फुटपाथवरील भिकार्‍याकडे बघून एका सिगारेटचा शेवटचा झुरका घेतला आणि तिच्यावर दुसरी सिगारेट पेटवली' ह्या वाक्याचा अर्थ 'लेखकाला भिकार्‍याला असे सुचवायचे आहे की ह्या सिगारेटच्या शेवटच्या झुरक्याप्रमाणे तुझीही शेवटची घटका जवळ आली आहे. लवकरच काही तरी कर आणि माझ्याप्रमाणे दुसरी सिगारेट शिलगाव अदरवाईज तुझं काही खरं नाही' असा लावला जातो तेव्हा प्रत्यक्ष लेखकही गोंधळात पडतो. तिच्यायला माझ्या लेखांचे मला न कळलेले अर्थ ह्याच्या डोक्यात कुठून येतात म्हणून हैराण होतो. पण दरवेळी ह्या बोळ्याकडून चांगले प्रतिसाद येतीलच असं नाही. कधी कधी टिकाही केली जाते. 'फुटपाथवरील भिकार्‍याकडे बघून एका सिगारेटचा शेवटचा झुरका घेतला आणि तिच्यावर दुसरी सिगारेट पेटवली' ह्या वाक्यावर 'इथे त्या भिकार्‍याला एकवेळच्या जेवणाची भ्रांत आणि तुम्ही मारे त्याच्या समोर एकावर एक सिगारेटी फुंकताय. त्या पैशात त्याच्यासाठी २ वडापाव आले असते. मन मेलं काय तुमचं' असेही प्रतिसाद येऊ शकतात. हा बोळा ओळखण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ही लोकं कधीही एकही नवी ओळ लिहीत नाहीत. लेखांवरच्या प्रतिसादांवर आपलं पांडित्य सिद्ध करण्याकडे ह्यांचा कल असतो. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, इतके मोठे प्रतिसाद देतोस पण स्वतः कधी तरी किमान एका ओळीचा धागा / पोस्ट टाक की रे'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग धागे आणि प्रतिसाद ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि प्रतिसाद बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


विनम्र सूचना - आमच्या ह्या खटाटोपाला खाजवून खरूज काढण्याचे उद्योग न समजता आम्ही आमच्या परीने केलेला समाजाचं ऋण चुकवायचा एक छोटासा प्रयत्न समजावा ही नम्र विनंती.