बंगलोर मिसळपाव (सात्विक) ओसरी अहवाल

| Labels: | Posted On 5/27/08 at 6:45 PM

मिपा च्या पहील्या सात्विक ओसरी चा अहवाल लिहीताना मला अत्यंत आनंद होत आहे. मागच्या दोन वादग्रस्त (?) ओसर्‍यांनंतर यंदाची ओसरी मद्यपानरहीत करायचे वचन आम्ही दिले होते. आणि ते पाळायचेही ठरवले होते.

ठरल्या दिवशी संध्याकाळी मला डॉनचा फोन आला. अबबला काँफरंस मधे घेतलं. बराच वेळ बोलूनही कुठे भेटायचे हे काही केल्या ठरत नव्हते. कारण मद्यपान करायचे नाही तर बँगलोर मधे नुस्ते जेऊ घालणारी साधी हॉटेल्स आहेत का हे तिघांपैकी कुणालाही माहित नव्हते. शेवटी माझ्या घरी या मग ठरवू काय ते असं सांगून मी फोन ठेवला. दारावची बेल वाजली. मी दार उघडायला दाराजवळ गेलो तेवढ्यात मला उदबत्तीचा वास आल्याचा भास झाला. ह्या सात्विक ओसरीला डॉन आणि अबब (अभिज्ञ) सोवळं नेसून आणि केळ्यात खोचलेली उदबत्ती घेऊन आलेत की काय असा मला वाटलं. पण तसं काही झालं नाही. शेजारच्या घरात कसली तरी पुजा होती.

सुरुवातीचा अर्धा तास खारेदाणे खात खात (नुस्ते) हॉटेल्स शोधण्यात गेला. आपल्या हातात असलेल्या मुबलक वेळाचं करायचं काय ह्याचं उत्तर कही मिळेना. त्यामुळे अबब (तोच तो अभिज्ञ) ने वेळ घालवण्यासाठी माझे कपडे घुवायचेत, घर झाडायचंय, बिलं भरायची आहेत हे उपाय सुचवून बघितले. पण अर्थातच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

फिरता फिरता अम्हाला एक रसपान ग्रुह सापडलं. तिथे उभे रहून बर्‍याच वेगवेगळ्या फळांचे (ताजे) रस पिण्यात थोडा वेळ घालवला. त्या रसवल्याने एकच ज्युस कालाखट्टा म्हणून डॉनला, कालाद्राक्ष म्हणून अबबला (अभिज्ञला) आणि मिक्स्ड फ्रुट म्हणून मला दिलं (असा मला संशय आहे).

त्या नंतर अचानक डॉनला कोरमंगला नावाच्या भागात एक सॅफ्रॉन नावचे हॉटेल आहे व तिथे बसून आपल्याला मोठ्या स्क्रीन वर मुंबईची मॅच बघण्यात वेळ घालवता येईल असा साक्षात्कार झाला. नी मुंबई जिंकली तर विजयाची धुंदीही चढेल असा एक पिजे त्याने मारून घेतला. हॉटेल जवळ पोचल्यावर मी 'सॅफ्रॉन - वा नावच किती सात्विक आहे' असं म्हणालो. त्यावर डॉन ने मला 'सॅफ्रॉन म्हणजे केशर बरं का जोश्या' असा डायलॉग चिकटवला.

आम्ही पोचेस्तोवर मुंबईची फलंदाजी सुरू झाली होती. आम्ही मोक्याची जागा पकडून बसताच वेटर बाजूला येऊन उभा राहीला. त्याला अबब ने ऑर्डर दिली 'मेतकूट भात, साजूक तुप, पोह्याचा भाजलेला पापड आणि सोलकढी'. डॉन म्हणाला 'मला साबुदाणा वडा'. माझी सटकली . 'अरे मेल्यांनो तुम्ही प्रकाश मधे असल्या सारखे वागू नका' असे मी ओरडल्यावर दोघांनी कोरस मधे 'अरे पण आज सात्विक ओसरी आहे ना' अशी प्रुच्छा केली.

वेटरने 'का माझा वेळ फुकट घालवताय राव' असे लुक्स दिल्यावर फायनली पंजाबी खायचे ठरले. सत्विक ओसरी वर अभक्ष भक्षण चालणार का ह्यावर थोडा वादविवाद झाला. मी अभक्ष भक्षण करत नसल्याने तुम्ही काय हवं ते खा असं सांगितलं.

खाता खाता 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' स्थापन करायची कल्पना डॉनने मांडली. कल्पना माझी असल्याने मी अध्यक्ष असेही घोषीत केले. त्यावर अबबने तो संचालक पद सांभाळेल असे कळवले. मी कोणते पद घ्यावे असा विचार करत असताना त्या दोघांनी 'सगळेच पदाधिकारी झाले तर आपण वट कोणाला दाखवणार?' असे ठरवून मला सभासद म्हणून नोंदवून घेतले. वर आजीवन नोंदणी शुल्क म्हणून रु. १००० (फक्त) दे असेही सांगितले. मी विचार करून सांगतो म्हणून विषय टाळला.

जेवण झाल्यावर करण्या सारखे काही नसल्याने थोडा वेळ शतपावली करायचे ठरवले. शतपावली करता करता अबब ने अम्हाला समग्र गीतरामायण म्हणून दाखवले. ते झाल्यावर डॉनने आम्हाला कुणी 'दाऊद चालिसा' ऐकली आहे का असे विचरताच आम्ही घरी जायचा निर्णय घेतला.

तर अशा प्रकरे पहिली बंगलोर मिसळपाव (सात्विक) पार पडली आणि लोकं पहिल्यांदाच सरळ पावलं टाकत आप-आपल्या घरी रवाना झाली.

धोबीपछाड

| Labels: | Posted On 5/21/08 at 9:06 PM

'डुक्कर आणि बॉस ह्यांच्याशी कुस्ती करण्यातलं साम्य म्हणजे आपण चिखलाने बरबटतो नि तो ते ऍक्चुअली एन्जॉय करत असतो' अशा अर्थाचं एक इंग्रजी वचन आहे. काही लोकं हे जाणून बॉस पासून चार हात लांब राहतात. पण 'चिखल साफ करायचा असेल तर चिखलात उतरावे लागते' ह्या वचनावर माझी श्रद्धा असल्याने मी येता जाता बॉसच्या पायात पाय घालत असतो. तशी मला खाजवून खरूज काढायची सवय नाहीये. पण आमचा बॉस म्हणजे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान... ' ह्या कॅटेगरीतला आहे. आणि मी त्याच्याहून हुशार असूनही मला त्याच्या हाताखाली काम करावे लागते ह्याचे दुःख तर आहेच आहे. इतर सगळ्या ऑफीसमधील बॉसेस प्रमाणे ऑफिस मधला सर्वात ढ मनुष्य आमचा बॉस आहे. त्याच्या निर्बुद्धपणामुळे आणि दूरद्रुष्टीच्या अभावामुळे आमचे टॅलेंट मारले जात आहे ह्यावर आमच्या टीम मधल्या सगळांचं एकमत आहे. ह्या सगळ्यात मी सीनियर. वयाने, अनुभवाने आणि कंपनीतही. त्यामुळे आपसूकच सगळ्यांचं अघोषित नेतृत्व माझ्याकडे आलंय. आमच्या कंपू मध्ये पम्या, शऱ्या, दही (वैदेही) आणि मी असे चार जण आहोत.

कमीत कमी लोकांकडून जास्तीत जास्त काम कमीत कमी मोबदला देऊन करून घेणे ह्यात आमच्या बॉसचा हातखंडा आहे. अरे थांबलात तासभर जास्त तर तुमचे कुले झिजतील काय??? हा त्याचा आवडता डायलॉग आहे. मॅनेजमेंट चे शिक्षण घेतलेल्या यच्चयावत बॉसेस प्रमाणे तोसुद्धा आम्हाला रिसोर्सेस म्हणतो. जोशी आज तुझ्या केबीन मधला एक रिसोर्स आला नाहीये, ह्या प्रोजेक्ट साठी तुझ्या सोबत किमान अजून 2 रिसोर्स लागतील, तू तुझ्या बाजूच्या रिसोर्सला रिक्वेस्ट कर, वगैरे वगैरे. म्हणजे माझ्या टाळक्यावर ग्रुप हेडची जबाबदारी, पण पगार मात्र सीनियर रिसोर्सचा अशी गोची आहे.

इतके दिवस आम्ही बॉसच्या बाळलीलांकडे दुर्लक्ष करत होतो. पण एक दिवस कहरच झाला. आमच्या पम्याची डेट होती लंच टाईम मधे. आणि नेमके त्याच दिवशी पुर्वसुचना न देता बॉसने त्याला काही कामासाठी म्हणून थांबवले. गरीब कोकराचे भाव चेहऱ्यावर आणून पम्या म्हणाला 'सर, मला थोडं बाहेर जायचं होतं, तुम्हाला सांगितलं होतं मी'. ह्यावर निर्विकार पणे 'रिसोर्सेसनी बाहेर जेवायला जाऊन वेळ वाया घालवू नये म्हणून कंपनीने कँटिनमध्ये फुकट जेवणाची सोय केली आहे, त्याचा वापर करा' असं सांगितलं. आज ना उद्या हा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो ह्याची जाणीव आम्हाला होऊन आम्ही ह्या बॉसच्या समस्येवर तोडगा काढायचं ठरवलं.

रविवारी दहीचे आई-वडील कुठेतरी लग्नाला जाणार असल्याने तिच्या घरी जमायचं ठरवलं. आपसूकच खाण्या-पिण्याची सोय करायचे काम तिच्यावर आले. तिने लगेच स्पष्ट केलं 'मी काहीही बनवणार नाहिये. ज्याला जे खायचंय ते त्याने घेऊन यावे, आणि एक एक प्लेट माझ्यासाठीही आणावे. ' बरीच खलबतं झाल्यावर आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवली 'असहकारीत सहकार'. म्हणजे काम करायचं पण जेव्हढ्यास तेव्हढं. पगार वाढवताना किंवा प्रमोशन देताना बॉस जसा नियमांवर बोट ठेवतो तसंच आता आपण कामाच्या बाबतीत करायचं. आपली कंपनी म्हणजे एक कुटुंबच आहे, यू गाईज आर लाईक फ़्रेंड्स वगैरे डायलॉग्सना न भुलता दुसऱ्या दिवशी पासून त्याची अंमलबजावणी करायची असं ठरलं. त्यातल्या त्यात आमच्या बाजूची बाजू होती ती म्हणजे ह्या बॉसला आम्हाला डायरेक्ट शाल-श्रीफळ द्यायची पॉवर नव्हती. भरती आणि ओहोटी दोन्ही सेंट्रलाईज्ड.

सोमवार सकाळ असून सगळे १० च्या ठोक्याला हजर झाल्याचे पाहून बॉस थोडा गडबडलाच. पण त्याला काही संशय येण्याचं कारणच नव्हतं. आत आल्या-आल्या माझा हसरा चेहेरा पाहून एका प्युनने विचारलं 'काय भाऊ, खूश दिसताय. काय झालं? ' मी दिवार मधल्या विजयचा डायलॉग चिकटवला 'आज एक और कुली हफ्ता देनेसे मना करने वाला है. ' (तसं बघायला गेलं तर एक बिल्ला सोडून विजय नि आमच्यात फार फरक नाहीये. )

'मंडे मॉर्निंग जॉब स्टेटस मीट' नावाचा वाह्यातपणा झाल्यावर आम्ही कामाला लागलो. १ वाजता लंच टाइम झाला. मी डबा उघडून पहिला घास तोंडात टाकणार इतक्यात नेहमी प्रमाणे इंटरकॉम वर बॉस 'पटकन ये, काम आहे. ' सर मी जेवायला बसलोय. येतोच' असे सांगून मी फोन ठेवला. नंतर बॉसला भेटलो, काम वगैरे केलं आणि साडे-पाचला बॅग भरून निघालो. बॉस उडालाच. 'जोशी... कुठे??? ' 'घरी. आज लंच अर्धा तासच घेतला ना. आठ तास भरले. अब मिलेंगे ब्रेक के बाद. ' असं म्हणून सुटलोच. बॉस अवाक झाला असणार ह्यात शंकाच नाही.

दुसऱ्या दिवशी पम्याने इंगा दाखवला. बॉस आमच्या बाजूने जात असताना कुठल्यातरी वेबसाईट वर 'मोबदला न देता जास्तीचे काम करून घेणाऱ्या कंपनीवर सरकारची कार्यवाही' असा लेख मोठ्ठ्याने वाचला. पुढच्या विकांताला दहीला बॉसचा थोडावेळ कामासाठी यावं लागेल असा फोन आला. त्यावर तिने 'सर माझी आठवड्याभराची धुणी भांडी राहिली आहेत. कंपनीने मला त्यासाठी एखादा रिसोर्स दिला तर मी लगेच येते' असं उत्तर दिलं. शऱ्या आमच्याही १ पाऊल पुढे गेला. नारायण मुर्तींनी लिहिलेलं म्हणून १ मेल आंतरजालावर फेरफटका मारत होतं. त्यात लेट थांबण्याचे वाईट परिणाम वगैरे वगैरे होतं. ते मार्क ऑल करून पाठवून दिलं. वर बॉसला 'सर चुकून मार्क झालं तुम्हाला, न वाचता डिलीट करा. ' असं सांगितलं.

असा हा आमचा 'असहकारीत सहकार' साधारण महीना भर सुरू होता. आम्ही टेक्नीकली बरोबर असल्याने बॉस आतल्या आत चरफडत होता. आमचा इलाज कसा करावा ह्यासंबंधी त्याने इतर जुन्या मंडळींशी चर्चा केल्याचं आमच्या प्युनने २०० रुपये घेऊन सांगितलं. आम्ही आनंदात होतो. बॉस दुःखात होता. आणि नेमकं त्याच वेळी आमच्या बॉसचं मुंबई हेड म्हणून प्रमोशन झालं. आता झाली ना भानगड. आता सर्वशक्तिमान झालेला बॉस बदला घेणार अशा विचारात असतानाच मला 'सायेबाने बोलावलंय' असा निरोप आला. सगळे जण जाम टेंशन मध्ये आले. मी केबिन मध्ये गेलो. गेल्या गेल्या बॉसचं तोंडदेखलं अभिनंदन केलं. छद्मीपणे हसत बॉस ने मला एक लेटर दिले आणि तूच सांग सगळयांना असं म्हणून माझ्या खांद्यावर हात टाकून मला बाहेर घेऊन गेला. ते लेटर वाचत वाचत मी आमच्या केबिन मध्ये आलो. माझा पडलेला चेहेरा आणि बाजूला बॉस बघून सगळे अजुनच टेंशन मध्ये आले. बॉस माझ्याकडे बघून असा का हसतोय ह्याचा कुणलाच उलगडा होईना. पम्याने धीर करून विचारलं काय झालं रे. ह्यावर माझ्या तोंडून चारच शब्द बाहेर पडले... 'आजपासून मी तुमचा बॉस. '

हॉर्न - ओके - प्लीज - २

| Labels: | Posted On 5/19/08 at 8:21 PM
"संथ वाहते क्रुष्णामाई" अशी ओळ पाठीवर वागवत त्या क्रुष्णामाई प्रमाणेच संथ चालणाऱ्या ट्रकला ओवरटेक करून मी पुढे गेलो. बाजूनी पास होताना "बोले तैसा चाले" ही उक्ती आठवल्याने त्या ट्रकच्या टायरला हात लाऊन नमस्कार करायचा मोह मी कसाबसा टाळला. ओतप्रोत भरणे म्हणजे काय ह्याचा योग्य नमूना असलेला आणि तारीख जवळ आलेल्या गर्भवती स्त्री प्रमाणे तो चालणारा तो ट्रक नि त्याचा चालक ह्यांना मनातल्या मनातच नमस्कार केला नि ढाब्याची वाट धरली.
दुसरा चहा संपवतोय इतक्यात ती क्रुष्णामाई आमच्या ढाब्याच्या अंगणातच डुलत डुलत अवतीर्ण झाली. त्या ट्रकला पाहून मला पुन्हा एक उपमा सुचली. गवळणीच्या कमरेवर डचमळणारी घागर.

ट्रक थांबला नि त्यातून एक किरकोळ शरीरयष्टीचा माणूस उतरला. उतरला म्हणजे त्याने दार उघडून उडी मारली. आत आल्या आल्या त्याने डोक्यावरची टोपी टेबलावर आपटली नि ओरडला 'ए परी, चाय आन रे'. ह्या परी शी समस्त ट्रकवाले आप-आपल्या मात्रुभाषेत बोलतात. आणि तो त्यांना त्याच्या हिंदीत उत्तरं देतो. त्याची हिंदी असं म्हटलं कारण तशी हिंदी तो नि त्याचा मालक सोडून दुसरं कुणीही बोलत नाही. ह्यानी नुस्ता चहा मागवूनही चहा सोबत परी ने बैदा रोटी पण आणून ठेवली.

---------------------

इट्टल...
विठ्ठल???...
इट्टल... इSSS ट्टSSS लSSS
बरं...
कुठचे?
माणगाव जवळ वेरली गाव हाय, तिथला...
काय करता?
माचीस द्या...

---------------------


वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडून पळालो. आमचा बाप विडीच्या कारखान्यात सुपरवाईझर होता. त्याला मलाबी विड्या वळायला बसवायचं होतं. पन आपल्याला स्वोताचा धंदा करायचा होता. साला माझा बाप मर मर मरायचा नि महिन्याच्या शेवटी माने शेट १२० टिकल्या टिकवायचा. मी सांगलं, आपून फुकटचोट दुसऱ्यासाटी मरणार न्हाय. बाप उचकटला. नोकरीला लावल्यावर त्याला माझं लगीन करायचं होतं. मुलगीबी पाहीली होती. बक्कल हुंडा नि सायकल मिळणार होती. त्या पैशातून बईनीच्या लग्नाचं कर्ज उतरणार होतं. बापाला बोल्लो, मला कायतरी बनायचय, त्या शिवाय लगीन न्हाय. बापाने मार मार मारला. तेव्हाच ठरवलं इथनं पळायचं.

रात्री सगळी झोपल्यावर आई बापाला नमस्कार केला नि पिशवी घेऊन निघालो. घराच्या दरवाज्याजवळ पोचलो नी एकदम पोटात तुटल्या सरखं झालं. आईची कूस आटवू लागली. जत्रेत फिरवणारा बापाचा खांदा आठवला. एक वेळ मागे बघितलं. दोघंबी दमलेत आता. त्यांना सांभाळायचं सोडून मी त्यांना स्वतासाठी सोडून चाललोय म्हणून रडू फुटलं. थांबावसं वाटलं. पन मन आवरलं. आपला बाप नि आपान जिथे सडलो तिथे आपली पोरं सडणार न्हायत. डोळे पुसले. बाप अजून १५-२० वर्ष तरी खपत न्हाय. बापाच्या पायला हात लावला नि म्हणालो 'मला १० वर्ष द्या बापू'. दारातनं बाहेर पडलो नि तडक धावायलाच लागलो. कुटे जायचं माहीत नवतं. जाता जाता चावडी वर झोपलेल्या गनप्याला सांगीतलं घर सोडून जातोय. सकाळी बापाला सांग.

---------------------

नगरला आलो. चार मईने हमाली केली. हाता पायाच्या काड्या होत्या. वजन झेपत नसे. ट्रकमदे माल टाकायचा नि गिऱ्याईका कडे उतरवून द्यायचा. २ फ़ेऱ्यांचे ४ आणे मिळत. पण झोपायला जागा व्हती. रोजची कमाई १ रुपया. पोटास पुरेना म्हणून रात्री रिक्षा चालवायला घेतली. पहिल्याच रात्री एका पोलीसाला भाडं मागीतलं म्हणून मला कस्टडीत घेऊन गेला. बाकावर बसवलं. कोपऱ्यात एका चोराला उभं केलं व्हतं. ह्या हवालदाराने सट्ट करून आवाज काढला त्याच्या कानाखाली. १७ वर्साचा सुद्धा नवतो मी. बाप बेता-बेतानं मारायचा. पन आमचा बाप पन सापळाच होता. लागायचं नाई काई. कानाखाली खाल्ल्यावर चोर रडाया लागला आनी ते बघून इथे मी लेंगा ओला केला. सगले हसाया लागले. आवाज ऐकून साहेब जागा झाला. दया आली त्याला माजी नि सोडलं मला.

---------------------
आम्ही कट्ट्यावर (आणि इतर ठिकाणी) जसे खातो तसे इट्टल बोलत होता. न थांबता. जणू कुणी विचारायची वाट बघत असल्या सारखा. मी सुद्ध त्याला न थांबवता वाहू दिलं.
---------------------

तिथून एक दिवस मुंबई गाटली. पुन्हा हमाली नि रात्री रिक्षा. एक दिवस एक मानूस बसला. थोडं बोलनं झाल्यावर म्हनाला जास्त पैसे कमवायचे का? मी खुश. त्यानी कार्ड दिलं म्हनाला उद्या संध्याकाली ये. काय काम हाय म्हनल्यावर हसला नि बोल्ला आलास की सांगतो. कुलाब्यातली कुटली तरी बिल्डिंग व्हती. दुसऱ्या माल्यावर गेलो तर माज्या सारकी अजून ७-८ पोरं व्हती तिते. कुनालाच म्हायती म्हवतं का आलेत पन पैसे मिलनार होते. तवड्यात मला भेटलेला मानूस (मन्नू) आला. त्याच्या सोबत अजून ५-६ लोकं व्हती. त्यातला एक माज्या कडे पाऊन हसला. म्हनला चल. एका खोलीत घेऊन गेला. म्हनाला २०० देइन. म्हनलं द्या. त्याने शर्टाच्या खिशात २ नोटा कोंबल्या नि एक ग्लास देऊन म्हनाला 'आता हे पी'. त्यानंतर जाग आली तेवा पोलीस चौकीतल्या बाकावर होतो. नि ती सगली लोकं समोर जेल मंदी. समोर एक सायेब काय तरी लीत व्हता. म्हनाला 'वेलेवर आलो आमी म्हनून वाचलात'. उटला तो जागे वरून नि मन्नूला जेल मदून काडून दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. तितून त्याच्या वरडन्याचे आवज येउ लागले. नि सायेब पन मारता मारत ओरडत व्हता 'पोरं विकतोस साल्या भाडखऊ... थांब तुजी आता XXXXXXXXXX.... XXXXX.... XXXXX... नं २२० एक बांबू आन रे, दाखवतोच आता भXXला.
थोड्या वेलाने साहेब घामाघून होऊन बायेर आला. मी पायावर डोकं ठेऊन म्हनलो 'लई उपकार झाले सायेब'.

---------------------

त्याच सायेबाच्या वलखीने एका हाटेलात नोकरी लागली. २ वर्स तिथे नोकरी केली. रात्री रिक्शा होतीच. पैका जमा केला. थोडे पैसे उधार घेऊन स्वोताची रिक्शा घेतली. हाटेल वाला चांगला व्हता. त्याच्या वलखीने पोरांना शालेतून आना पोचवायचं काम मिलालं. बक्कल पैका मिलत व्हता. पन मला अजून पुडे जायाचं व्हतं. २ वर्सानी पुन्हा उधारी काढली, रिक्शा विकली नि एक लहान टेंपू घेतला जुना. नि त्यानंतर हलू हलू जम बसाया लागला. एका कंपनीकडे लावला टेंपू. खात्रीचं काम मिलालं. रात्री रिक्शा सुरुच होती. ३ वर्सानी त्या कंपनीचा मॅनेजर म्हनाला पाच वर्सासाटी लावत असशील तर तुला ट्रक साटी कंपनी कडून कर्ज मिलवून देतो. होता तो टेंपू विकला नि कर्ज घेऊन हा ट्रक घेतला.

ट्रक घेतला नि पयली गोस्ट केली म्हंजे गावाला गेलो. ट्रकवर आईचं नाव लिवलं व्हतं 'भाग्यलक्शुमी'. बापाला १० मागीतली होती, २ वर्स आधीच गेलो.

---------------------

१२ वर्स झाली आज ह्या गोस्टीला. ट्रक वरचं कर्ज बी फिटलंय नि ह्याच्या जीवावर अजून एक ट्रक बी घेतलाय. आता आई बाप माज्या सोबतच असतात. घरातून पलालो नसतो तर आज नि पन बापासोबतच विड्या वलत बसलो असतो.

---------------------

बरं येक सांगा पाव्हणं, तुमचं नाव काय???

हॉर्न - ओके - प्लीज

| Labels: | Posted On 5/16/08 at 7:02 PM
ट्रकवाले हा तसा जगाने वाळीत टाकलेला विषय. पण का कोण जाणे मला दिवस दिवस रस्त्यावर प्रवास करणाऱ्या ह्या लोकांविषयी कुतूहल वाटत आलंय. सुदैवाने मला ह्यांचं आयुष्य जवळून बघायची संधी मिळाली. कधी काळी माझा आणि ह्यांचा संबंध येईल आणि त्यांच्यावर मी चक्क एक लेख लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण संबंध आला आणि आता मी लेखही लिहितोय.

दारुडे, बेजबाबदार पणे सुसाट गाड्या हाकणारे, दिवसचे दिवस घरापासून दूर राहणारे, शरीराची गरज भगवण्या साठी वेश्यांकडे जाऊन पाठीशी रोग लावून घेणारे, अशिक्षित, मॅनरलेस, गलिच्छ. अशी बरीच विशेषणं त्यांच्या फार जवळ न जाता जगानी त्यांना चिकटवली आहेत.

जुन्या मुंबई पुणे महामार्गा सारखाच मुंबई - अहमदाबाद हा सुद्धा माझा अतिशय आवडता रस्ता आहे. रात्री अपरात्री, धो-धो पावसात, टळटळीत दुपारी, अशा प्रत्येक वेळी मी इथे गेलोय. आणि दर वेळी वेगवेगळ्या लोकांना भेटलोय. असंच एकदा हौस म्हणून बाईक वरून मुंबई - अहमदाबाद महामार्गावर फिरता फिरता मला विरारच्या पुढे साधारण १०-१५ किलोमीटर वर एक ढाबा दिसला. आज काल कुत्राच्या छत्र्यांप्रमाणे महामार्गांवर असणाऱ्या ढाब्यांसारखा हा 5 Star AC ढाबा नव्हता. साध्या सरळ मध्यमवर्गीय माणसा प्रमाणे संस्कृतीशी इमान राखून असणारा ढाबा होता.

समोर गाड्या पार्क करायला मोकळी जागा आणि आत मध्ये साधारण २५-३० माणसं बसू शकतील इतका हॉल, त्या पलीकडे किचन असा आटोपशीर पसारा होता. पावसाळा सोडल्यास बाकीचे दिवस बाहेर खाटाही टाकलेल्या असत. तिथे अजूनही खऱ्या तंदुरी मध्ये जेवण बनवलं जातं. विजेवर चालणाऱ्या तंदुरीत नाही. त्यामुळे पराठ्यानं शुद्ध तुपासोबतच कोळशाचा रांगडा स्वादही येतो. लस्सी अजूनही हाताने घुसळूनच बनवली जाते. अगदी ऑथेंटीक ढाबा.

मला भेटलेला पहीला ट्रक वाला म्हणजे अर्जुन. जुलै महिन्यात एके रात्री प्रचंड पाऊस पडत असताना मी साधारण २ च्या सुमारास ढाब्यावर पोचलो. ढाब्या समोरच्या मोकळ्या जागेत पावसामुळे लहानसं तळं तयार झालं होतं. मी नेहमी प्रमाणे अगदी दरवाज्या पाशी जाऊन बाईक पार्क केली. बाजूच्या रामचंदर पान वाल्याला हात दाखवला. हा पान वाला २४ तास सुरू असतो. सकाळी भाऊ बसतो आणि रात्री हा. त्या दिवशी पाऊस जरा जास्तच जोरात पडत असल्याने ढाब्यावर बरीच गर्दी होती. आत शिरण्या इतकीही जागा नव्हती. लोकं (ट्रक वाले) वाफाळता चहा पीत पीत पाउस कमी होण्याची वाट बघत होती. आता पर्यंत बऱ्याच वेळा तिथे गेल्याने ढाब्याचा मॅनेजर 'परी' माझ्या चांगला ओळखीचा झाला होता.

आता काय करावं ह्या विचारात असतानाच परी एका हातात छत्री नि दुसऱ्या हातात चाहाचे तीन ग्लास घेऊन आला नि म्हणाला चल. कुठे, कशासाठी, वगैरे न विचारता त्याच्या मागून गेलो. तो एका ट्रक पाशी जाऊन थांबला. दार वाजवलं. दार आतून उघडल्या गेलं. ह्याने कप आत दिले, स्वतः चढला आणि मलाही आता यायची खूण केली. आत जाऊन सिट वर बसलो आणि हा ट्रक कुणाचा असा विचार करत असतानाच मागच्या बाका वरून आवाज आला 'मै अर्जुन'. ट्रकचा मालक आरामात मागच्या अरुंद बाकावर बसरला होता. 'मै जोशी' 'ऐसी बारीश बरसोंके बाद लगी है, रात भर चलेगी शायद' असं म्हणून त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहीलं.'

मी मनात म्हटलं असं नको म्हणू मेल्या, तू इथेच आडवा पडून राहशील. मला ३५-४० किलोमीटर बाईक हाकत जायचंय घरी.
क्या करते हो आप.
मला त्याला ऍड एजन्सी मध्ये कॉपीरायटर म्हणजे काय हे कसं समजवावं हे न सुचल्याने मी म्हणालो 'प्रायवेट कंपनी में हूं'
हं...
हं...
ये ट्रक आपका है?
ह्या वर तो हाहाहा करून हसला.
अगर मेरा ट्रक होता तो और क्या चाहिये था...
बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणे हा सुद्धा दुसऱ्या कुणाचा ट्रक चलवत होता. आणि बहुसंख्य ट्रक वाल्यांप्रमाणेच आपल्याही मालकीचा एखादा ट्रक असावा हे त्याचं स्वप्न होतं.
कबसे चला रहे हो ट्रक?
कुछ ६-८ साल हो गये. छोटा था तब पिताजी के साथ घुमता था. वो भी ट्रक चलाते था. बडा होने पर उन्होने अपने मालीक की ट्रांसपोर्ट कंपनी मे लगा लिया. और तबसे घर छूट गया.

आता हा पुढे ट्रक ऍक्सीडंट मध्ये वडील गेले असं सांगतो की काय असं वाटलं. पण सुदैवाने ते जिवंत होते. पण आता वयामुळे असं ट्रक चलवणं जमत नव्हतं. म्हणून त्याच्या वडिलांनी गावातून जाणाऱ्या हायवे वर ट्रकचं गॅरेज काढलं होतं. घरी आई, वडील, बायको आणि एक ३ वर्षाचा मुलगा होता. इतर ट्रक चालवणाऱ्या लोकांप्रमाणे हा सुद्धा आयुष्यावर नि गरिबीवर वैतागलेला असेल असं मला वाटलं. पण हा तर एकदम जॉली माणूस निघाला. त्याने आता रस्ता म्हणजेच आपलं घर हे सत्य स्वीकारला होतं.

तुम ऐसे हमेशा घर से बाहर रहेते हो, बिवी कुछ बोलती नहीं?
पेहले बोलती थी, मगर उसके पिताजी भी ट्रक चलाते थे. सो उसे आदत है. मुझे भी शुरुवात में बहुत याद आती थी घर की. पर अब एहसास भी कुछ धुंधलेसे हो गये है.
आप कहांसे हो?
कहांसे मतलब? यहीं से हुं. जनम बंबई मे ही हुवा है.
मुंबई
हां. अब मुंबई. मगर मेरा जनम हुवा तब वो बंबई ही थी. हा हा हा हा
मी पण हा हा हा हा

मनात विचार आला हा तर साला ओरिजीनल ट्रकवाला नाहीये. ट्रकवाला म्हटलं की उंचा पुरा मध्यमवयीन पंजाबी माणूस, छाती पर्यंत वाढलेली पिकलेली धाढी, डोक्यावर फेटा, असा अवतार डोळ्या समोर येतो.

तेवढ्यात हा बोलला 'वैसे गांव पंजाब में है. पिताजी और मां अब वहीं रेहते है.' मी जरा खुश झालो.
कभी जाते हो उनसे मिलने.
कभी कभी डिलीवरी के लिये गांवसे गुजरता हुं तब मिल लेता हुं.

अर्जुन अशिक्षीत असला तरी असंस्कृत नव्हता हे मला त्याच्याशी झालेल्या पुढल्या भेटींतून उलगडत गेलं. हॉर्न - ओके - प्लीज चा अर्थ त्यानीच मला समजावला. हॉर्न (डावीकडे) - ओके (मध्यभागी) - प्लीज (उजवीकडे) असं लिहिलेलं असतं. ह्याचा अर्थ म्हणजे डाव्या बाजुने ओवरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवा, मागे मागे यायचं असेल तर ठीक आहे, नि उजव्या बाजूने जायचं असेल तर प्लिज जा. हॉर्न ची गरज नाही.

गपा मारता मारता त्यानी मला विचरलं लग्न झालंय का? मी नाही म्हणाल्यावर तो एकदम आश्चर्य चकीत झाला. त्याच्या लग्नाला ४ वर्ष झाली होती. नि मी त्याच्यापेक्षा मोठा असून अजून एकटाच होतो. नालायक परी ने ही त्याची बाजू घेतली. माझी सुटका करून घेण्यासाठी त्याच्या लग्नाचा विषय काढला.

त्याचा प्रेम विवाह होता. पण बायको मुसलमान होती. तिचे वडील सुद्धा ह्याच्याच ट्रांसपोर्ट कंपनीत ट्रक चालवायचे. त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ह्याची तिच्याशी ओळख झाली. ह्याला ती बघता क्षणीच आवडली. हळू हळू भेटी गाठी वाढत गेल्या नि दोघे प्रेमात पडले. एकत्र जगण्या मरण्याच्या शपथा घेऊन झाल्या. एके दिवशी अर्जुन ने घाबरत घाबरत वडीलांसमोर विशय कढला. सांगीतलं मला शहीदा आवडते. शांतपणे विचार करून ते म्हणाले 'बेटा, तेरे खुशी में ही हमारी खुशी है. मगर मै रफीक को जानता हुं. वो कभी नही मानेगा.' ह्याने एकदा घरून परवानगी मिळाल्यावर तिला तिच्या वडीलांशी बोलायला सांगितलं. अपेक्षे प्रमाणेच ते भडकले. घरी येऊन हात पाय तोडायच्या धमक्या देऊन गेले.

मग महिना भर शहीदा घरात बंद होती. तिची आई मात्र नशिबाने त्यांच्या पाठीशी होती. तिला हाताशी घेऊन ह्यांनी एक प्लॅन बनवला. दोघांनी ह्याच्या गावाला पळून जाऊन लग्न करायचं. इथलं शांत होई पर्यंत त्याच्या भावाच्या घारी रहायचं. पोटा पाण्या साठी त्याच्या भावाने तिथल्या एका हॉटेल मध्ये ह्याच्या नोकरी विषयी बोलुनही ठेवले. ठरल्या प्रमाणे हे दोघे मध्य रत्री घरून निघाले. पण नशीब आडवं आलं. तिचे वडील त्या दिवशी ड्युटी संपवून लवकर घरी आले नि ह्यांना बघितलं. आरडा ओरडा करून मोहोल्ल्यामधली माणसं जमवली नि ह्याला बेदम मारलं.

पोटच्या पोराची ही अवस्था बघून ह्याच्या वडीलांचं पंजाबी खून सळसळून उठलं. रफ़ीकच्या घरी जाऊन त्याला 'दिन दहाडे तेरी बेटी को तेरे आखोंके सामने ले जाउंगा, जो उखाडना है वो उखाडले' असं सांगून आले. नि अर्जुन बरा झाल्यावर खरंच एके दिवशी त्याच्या घरी ६ ट्रक भरून माणसं घेऊन गेले. निघण्यापुर्वी शहीदाला विचरलं 'बेटा, तुझे इस शादी से कोइ ऐतराज तो नहीं.' ती नाही म्हणाल्यावर दोघांना घेऊन तडक रजिस्ट्रार ऑफीस गाठलं नि लग्न लाऊनच परत आणलं. माणसं जमवणं, पोलिसांना पुर्व सुचना देणं, रजिस्ट्रार ऑफीस मध्ये तारीख घेणं ह्या सगळ्या तयाऱ्या त्याच्या वडीलांनी आधीच केल्या होत्या. भारी माणूस.

त्या नंतर तिच्या वडीलांनी तिच्याशी बोलणंच टाकलं. आई मधून मधून दर्ग्यात भेटायची. वडीलही मुलीच्या भेटीसाठी मनतल्या मनात झुरत होते. तिला ह्या काफिरांच्या घरी त्रास होउ नये म्हणून अल्लाला सकडं घालायचे. पण सरळ बोलायला इगो आड येत होता. तोही एके दिवशी गळून पडला. शहीदा ला ६ वा महीना चालू असतान ती एकदा दर्ग्यात गेली होती. बाहेर पडताना समोरून तिचे वडील आले. तिला तसं बघून ते क्षणभर थांबले नि मग तिला एकदम मिठी मारून मनाचा बांध फुटल्या सारखे रडायला लागले. अश्रुंसोबत मनातली जळमटंही वाहून गेली.

थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि मी घरी जायला निघालो. तर हा म्हणाला 'अब इतनी रात गये कहां घर जा रहे हो? यहीं सो जाओ ट्रक में. पिछे कंबल डाल के देता हुं. चाहो तो यहां बाकडे पे सो जाओ' मी म्हटलं 'रात का डर नही भाई. रात अपनी सहेली है. फिर मिलेंगे.'


क्रमशः

आयुष्याचे नाटक - पात्र परिचय

| Labels: | Posted On 5/6/08 at 9:31 PM

माझ्या आयुष्यातल्या नाटकात बरीच पात्रं आहेत. त्यांच्या शिवाय हे नाटक होणे शक्य नव्हते. त्यातल्या काही पात्रांची आता मी आपल्याशी ओळख करून देत आहे.साने काका - श्रीहरी साने

आमच्या पांडव गँगचे धर्मराज. अनुभवाने नि वयाने सर्वात मोठे. ३-४ वर्षात निवृत्त होतील. एकदा मी चुकून आमच्या इथल्या ब्राह्मण सभेच्या मीटिंगला गेलो. गेलो म्हणजे बाबा घरी नसल्याने आणि त्या दिवशी कमिटीची निवडणूक असल्याने मला जावं लागलं. निघताना बाबांनी मला फोन करून 'भिड्यांनाच मत दे, मतदान झालं की लगेच सटकू नकोस, शेवट पर्यंत थांब आणि घरी आलास की तिथे काय काय झालं ते फोन करून मला सांग' असे बजावले. पहिल्या १५-२० मिनिटांत मतदान झाल्यावर नंतर वेग-वेगळी भाषणं सुरू झाली. अर्थातच, मी स्वतः विषयी च्या स्वतः च्या अपेक्षांना जागलो आणि मला लवकरच डुलक्या येऊ लागल्या. तेवढयात मला कुणी तरी कोपर मारून जागे केले. बायको तर घरी होती मग आता इथे आपल्या झोपेवर उठणारे कोण हे बघण्यासाठी मी मान न उचलताच नुसते डोळे फिरवून बघितलं तर एक पन्नाशीचे काका होते. म्हणाले 'चल खाली जाऊन चहा घेऊन येऊ. ' मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच त्यांच्या सोबत निघालो. थोडं पुढे गेल्यावर एका गल्लीत 'रसवंती रस गृह' लागले. काका आत शिरले. एका बाकासमोर आम्ही बसलो. दारापाशी ठेवलेले ऊस आणि आत जागोजागी टांगून ठेवलेली फळं बघून मी म्हणालो 'अहो काका इथे चहा नाही मिळणार'. काका 'मला मिळतो. तुक्या २ चहा आण रे. ' आणि अर्जुन जसा कुठेही बाण मारून गंगा अवतरवत असे तसे काकांच्या आज्ञे वरून चहाचे २ ग्लास आमच्या समोर आले. माझ्या चेहेऱ्या वरचे प्रश्नचिह्न बघून काका म्हणाले 'अरे ह्या तुक्याचा बाप जेव्हा इथे किराणा मालाचं दुकान चालवत होता तेव्हा पासून येतोय मी इथे. '
काका - तुम्ही केव्हा पासून बोरिवलीत?
मी - १९८४
काका - छान. त्या आधी.
मी - गिरगावात. पोर्तुगीज चर्च च्या मागच्या गल्लीत...
काका - अरे वा वा वा, म्हणजे तू तर आमचा गाववाला. आम्हीही आधी गिरगावातच राहायचो. गाय वाडी वरून थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला चौथ्या गल्लीत कुमठेकराची चाळ आहे. तिथे. नाव काय तुझ्या बाबांचं.
मी सांगितलं
काका - अरे वा, आम्ही दोघे एकाच शाळेत होतो. म्हणजे तू तर माझ्या मित्राचा मुलगा. बरं झालं भेटलास. त्याला किती वर्षात भेटलो नाहीये. तो बोरिवलीला राहायला आलाय हे कळलं होतं, पण भेटायचं राहून गेलं हे खरं. पत्ता नि फोन नंबर दे, घरी येईन एकदा.
म्हटलं नक्की या.

अशा प्रकारे आमची पहिली भेट संपली. दुसरी भेट झाली तेव्हा आमची चांडाळ चौकडी कट्ट्यावर बसून नेहमीप्रमाणे पक्षी निरीक्षणात आणि कुचाळक्या करण्यात मग्नं होती. तेवढ्यात मागून पाठीवर थाप पडली. बघतो तर साने काका. बाबांचा मित्र आला म्हणून हातातली सिग्रेट लपवली. तेवढ्यात काकाच म्हणाले 'अरे वा, तू पण अग्नीहोत्री का? सांगायचं नाहीस का? त्या दिवशी चहा प्यायल्यावर धूर सोडायची हुक्की मित्राच्या मुलासमोर नको म्हणून दाबून ठेवली. पुढचे दोन तास कसे तळमळत काढलेत हे माझं मलाच माहिती. ' मी म्हणालो 'मी पण. ' 'तू पण काय? पुढल्या ५ मिनिटांत फोन आला म्हणून खाली जाऊन सिग्रेट ओढून आलास ना? मी हसलो. 'त्या दिवशी फार म्हणजे फारच बोअर झालो बाबा. सगळे म्हातारे कसले तावा-तावाने भांडतात अरे. म्हणजे मी पण त्यांच्यातलाच आहे. पण मनाने अजून तुमच्यातच आहे. ' असं म्हणून काकांनी मला कोपरखळी मारून मागे बघायला सांगितले. वळून बघितलं तर एक विलक्षण प्रेक्षणीय स्थळ चालत येत होतं. 'काय काका तुम्ही? ' ह्यावर काका भलतेच खूश झाले नि जोरदार हसले 'साली तुम्ही आजकाल ची पोरं भारीच बाबा शामळू. अरे तुझ्या वयाचा असताना मी, आमच्या चाळीतला बोक्या आणि तुझे पिताश्री ह्यांनी गिरगावातला प्रत्येक कट्टा गाजवलाय. असो. तर काय करता आपण भिडू लोग? ' आणि त्या दिवशी नंतर साने काका आमच्या गँगचे रेग्युलर मेंबर झाले.मध्या - माधव रानडे

मध्या माझा बालमित्र. पूर्णं नाव माधव रमाकांत रानडे. मध्या चौथीत असताना त्याच्या वडिलांची मुंबईत बदली झाली आणि मध्या आमच्या शाळेत आला. माझ्या बाकावर एक जागा रिकामी होती म्हणून मास्तरांनी त्याला माझ्या बाजूला बसवला. मास्तर गेल्यावर मी त्याला बजावला 'हे बघ, बसायचं तर बस, पण कडेला मी बसणार. तुला कोपऱ्यात बसावं लागेल. ' तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी वर्गात आलो तर मध्या माझ्या जागेवर बसलेला. त्या दिवशी शाळा सुटल्यावर आमची बम्म मारामारी झाली. कुणीच थांबत नाही म्हटल्यावर आमच्या मध्ये बसणारा मुलगा म्हणाला 'भांडू नका, आलटून पालटून बसा. ' तो प्रश्न तेवढ्या पुरता निकालात निघाला. त्या नंतर हळू हळू माझी आणि मध्याची दोस्ती वाढत गेली. अभ्यासा विषयी प्रचंड तिटकारा आणि उचापत्या करण्याची आवड ह्या समान गुणांमुळे आम्ही एकदम घट्ट मित्र झालो. एकमेकांची साथ मिळाल्याने आम्हा दोघांची न्युसंस व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढतच गेली. बाईंनी आम्हाला वेग-वेगळ्या बाकावर बसवण्याचे बरेच विफल प्रयत्न केले पण वर्गातली बाकीची जनताही आमच्या मैत्रीला जागून होती. १-२ दिवसात काही ना काही खोट्या तक्रारी करायचे. मग आम्ही आपले पुन्हा एकत्र. शाळेत असताना आम्ही अगदी दहावी पर्यंत एकाच बाकावर बसत असू.

शाळेनंतर आम्ही एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिला दिवस अजून आठवतो. गेट वरच सीनियर्स नि रॅगिंग करायला पकडलं. नाव काय, कुठे राहतोस वगैरे विचारून झाल्यावर त्यांनी मध्याला विचारलं 'बाबा काय करतात रे तुझे. ' मध्या ने शांतपणे उत्तर दिलं 'कांदिवली पोलिस स्टेशन मध्ये सीनियर इन्स्पेक्टर आहेत. ' मुलांनी गुपचुप पणे जा म्हणून सांगितलं. पुढे त्याच मुलांशी आमची मैत्री वगैरे झाली. कॉलेज मध्ये आम्ही आमच्या किडेगिरीला नवीन पैलू पाडले. उचापत्यांमधल्या वेग वेगळ्या लेवल्स पार केल्या. पुढे कधीतरी त्या मुलांना कळलं की मध्याने त्यांना बाबांच्या बाबतीत गंडवलंय पण तोवर आम्ही त्यांच्यातलेच एक झाल्याने सोडून दिलं.

आम्ही आमच्या वर्गातल्या मुलांबरोबर कधीही नसायचो. कायम सीनियर्स सोबतच. कारण ते सगळ्याच बाबतीत आमच्या १ लेवल पुढे होते. म्हणजे, वर्गात न बसता प्यून करवी हजेरी लावणे, कँटिनवाल्या कडून फुकट नाश्ता उकळणे, कॉलेज मध्ये पालकांना बोलावल्यावर कुठूनतरी मोठा भाऊ पैदा करणे, अभ्यासाची वेगवेगळी पुस्तकं आणि कॅसेट्स मिळवणे, इत्यादी. ती मुलं पास होऊन बाहेर पडल्यावर आम्ही तो वारसा पुढे चालवला आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदाही करून दिला.

आत्ता पर्यंतच्या आमच्या मैत्रीत आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. सायकल चालवायला एकत्र शिकलो, बाइक सुद्धा एकत्रच चालवू लागलो, पहिली सिगरेट एकत्र ओढली, पहिली बियर सुद्धा एकत्र प्यायलो. सिनेमे, नाटकं, मारा-माऱ्या वगैरे फुटकळ गोष्टी तर खूपच. ह्यावर कळस म्हणजे प्रेमातही एकत्रच पडलो. नशिबाने वेगवेगळ्या मुलींच्या. त्याचं झालं असं की आम्ही फायनल इयर ला असताना फर्स्ट इयर ला २ अत्यंत आगाऊ कार्ट्यांनी प्रवेश घेतला. मध्या सांस्कृतिक मंडळावर असल्याने त्यांची आमच्याशी ओळख झाली. पुढे यथावकाश आम्ही त्यांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी आमचं लग्न झालं. (ही कथा पुन्हा केव्हातरी)

ह्या मागच्या १५-१६ वर्षांत बऱ्याच मुला-मुलींशी मैत्री झाली पण आमच्या दोघांत तिसरा आला नाही. तो यायला बराच काळ लोटला. तर अशी ही आमची मैत्री अजूनही तशीच आहे आणि दिवसेंदिवस अजूनच घट्ट होते आहे.विन्या - नरेंद्र विनायक दामले

ह्याला विन्या हे नाव कशावरून पडलं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. विन्या खरं म्हणजे माझ्या बायकोचा लांबचा लहान भाऊ. मुळचा नागपुराचा पण आता पोटापाण्यासाठी मुंबईला असतो. ह्याला नोकरी लागली तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. पण तरी आधीच मला मनाने नवरा मानल्याने बायकोने त्याचे राहा-खायची व्यवस्था करायचं काम माझ्यावरच टाकलं. एकदा ह्याला आपल्या घरीच राहायला सांगावं असा एक आळशी विचार मनात आला होता. पण घरात लग्ना नंतर जागा उरणार नव्हती. म्हणून ह्याची एका मित्राच्या घरात, जे तो भाड्याने देतो, सोय केली.

माझा होणारा साला असल्याने पहिल्या दिवशीच मी त्याची सगळी चौकशी केली. तेव्हा तो ही आमच्या प्रमाणेच सर्व गुण संपन्न असल्याचे कळलं. मग काय, हा घोडाही आमच्या कळपात सामील झाला. पण ताईला टरकून असल्याने त्याने माझ्या विषयी जास्त लिहू नकोस म्हणून विनंती केली. मी त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला 'अरे काय साल्या (द्वयर्थी संवाद) आता मोठा झालास आता तू. अजून ताईला कसला घाबरतोस. ती काय वाघ आहे का तुला फाडून खायला? तुझ्या ताईला मी पण घाबरतो पण ते ताई म्हणून नाही. ' असो.
का उगाच बिचाऱ्याला टेंशन द्या असा एक परोपकारी विचार करून मी त्याची ओळख इथेच थांबवत आहे.
विज्या - विक्रम जयकर

विज्या - माझ्या नि मध्याच्यात आलेला तो तिसरा प्राणी म्हणजे विज्या उर्फ विक्रम जयकर. हा प्राणी आम्हाला अपघातानेच भेटला. आमची पहिली भेट झाली माझ्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यूच्या वेळी कुलाब्यामध्ये. इंटरव्ह्यू माझा होता पण मध्याही माझ्या सोबत असंच म्हणून आला होता. मी आत गेल्यावर मध्या घसा शेकायला बाहेर पडला. मी थोड्या वेळाने केबिन मधून बाहेर आलो तर तो दिसला नाही. बिल्डिंग खाली असेल म्हणून बाहेर बघितलं तर तिथेही नाही. म्हणून त्याला सेल वर फोन केला तर साहेब म्हणाले अरे आम्ही माँडेगार मध्ये बसलोय. आम्ही? मी जाताना ह्याला एकटा सोडून गेलो होतो. माँडीज मध्ये गेलो तर एका टेबलवर मध्या कुणासोबत तरी बसला होता. त्यानेच ओळख करून दिली 'मी विज्या'. स्वतःची अशी अनौपचारिक ओळख करून देणारा प्राणी तसाच मोकळा ढाकळा असला पाहिजे हा माझा अंदाज खरा ठरला आणि ३ तासांनी आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा तिघे अगदी जुने मित्र असल्यागत गप्पा मारत होतो. पण हे दोघे भेटले कसे? त्याचं झालं असं की मध्या खाली ज्योत धरून उभा असताना विज्याने त्याला पाहिलं. लगेच ओळखलं. विज्या आमच्या कॉलेज मध्ये आम्हाला ज्युनियर होता. तेव्हा आमची मैत्री वगैरे नव्हती पण आम्ही त्याच्यावर एकदा उपकार केले होते. (२०० रुपये घेऊन प्यून करवी त्याची हजेरी पूर्णं करवली होती. काय काय करावं लागतं सीनियर्स ना आपल्या ज्युनियर्स साठी) त्यामुळे त्याच्या आम्ही लक्षात होतो. ह्याने लगेच मध्याला ओळख दिली. गप्पा टप्पा झाल्यावर विज्याने इंटरव्ह्यू नंतर प्रोग्राम काय असे विचारले आणि मला तिकडेच बोलवून घेऊ असे म्हणून दोघे माँडीज कडे रवाना झाले.

विज्या सुद्धा बोरिवलीतच राहत असल्याने तोही आमच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कट्ट्यावर हजेरी लावायला लागला. आता ह्या गोष्टीला साधारण ५-६ वर्षं झाली. ह्या काळात विज्या ने आमची आणि आम्ही विज्याची प्रत्येक प्रसंगात साथ दिली. मध्याच्या वडिलांना अटॅक आला तेव्हा माझ्या आधी विज्या तिथे पोचला होता. मध्याच्या बहिणीच्या लग्नात माझ्या सोबत हा सुद्धा न सांगता सगळं करत होता. विज्याचं एका गुजराथी मुलीवर प्रेम बसलं. घरून परवानगी मिळणार नाही म्हणून ह्याने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. तेव्हा त्याला 'असं करू नको, आई बाबांपासून पळून कुठे जाणार? ' असं समजावून आम्ही त्याच्या घरच्यांशी बोलायला गेलो होतो. त्याच्या बाबांना हे प्रकरण आधीच माहिती होतं आणि मुलगी परजातीय असली तरी चांगल्या वळणाची आणि चांगल्या घरची असल्याने त्यांची काहीच हरकत नव्हती. हाच बिंडोक मनात धरून बसला होता की आई बाबा नाही म्हणतील. त्याच्या बायकोला भाऊ नसल्याने लग्नात आम्ही विज्याचे कान सुद्धा अगदी ताकद लाऊन पिळले होते.

आता मित्र म्हटल्यावर हे सगळं आपण न सांगताच करतो. पण माणूस म्हणून एखादा माणूस कसा आहे हे कळण्यासाठी अशा गोष्टी सांगाव्या लागतात.
आता सर्वात शेवटी मी - ऍडी जोशी

मी स्वतःच स्वतः बद्दल लिहिणार हे कळल्यावर विज्या आणि मध्या सटकलेच.
विज्या / मध्या: साल्या म्हणजे तू जगाला आमची आतडी काढून दाखवणार आणि स्वतःचा मात्र गुळगुळीत दाढी केलेला फोटो लावणार. हे जमेश नाय. तुझ्या बद्दल आम्हीच लिहिणार.
मी - अरे असं काय बोलता मित्रांनो, तुमचा माझ्यावर विश्वास नाही?
विज्या आणि मध्या - हे हे हे हे.

(इतक्या वर्षांच्या मैत्री नंतर आमचा अशा प्रसंगी एकमेकांवर अजिबात विश्वास नसतो ह्यापेक्षा आमच्या मैत्रीचा मोठा पुरावा अजून काय देऊ? ज्यांना खरे मित्र आहेत त्यांना हे वाक्य नक्की कळेल. अशा नाजूक प्रसंगी आपल्याला काही वाटणार नाही हे माहिती असल्याने आपले सख्खे मित्रच आपला गेम कसा करतात हे अनुभवानेच कळतं. आणि असे असंख्य गेम पचवूनही खंबीरपणे उभी असते तिच खरी मैत्री. )

मी - बरं. ठिकाय. लिहा साल्यांनो.
असं मी म्हणताच त्यांनी माझ्या समोरच माझं पोस्ट-मॉर्टेम करायला घेतलं. त्यांना लिहायची कष्टं घ्यायचे नसल्याने त्यांनी बोलावं आणि मी ते नंतर लिहावं असं त्यांनी ठरवलं. 'नीट ऐक रे साल्या आम्ही काय बोलतोय ते' असं म्हणून सुरुवात केली. मी धन्य धन्य जाहलो.

तर आता मी - ऍडी जोशी, विज्या आणि मध्याच्या नजरेतून अथवा संवादातून.

मध्या - ऍडी हरामखोर आहे.
विज्या - मला वाटतं नालायक हा शब्द जास्त योग्य आहे.
मध्या - तसा मधून मधून आम्हाला मदत वगैरे करतो. पण तशी आम्हाला जास्त कुणाच्या मदतीची गरज भासत नसल्याने आमचेच त्याच्यावर जास्त उपकार आहेत.
विज्या - आणि ऍडी प्रचंड माजखोर आहे.
मध्या - येस्स्स. ऍडी प्रचंड माजखोर आहे. हा, पण विज्या एक मात्र मान्य करावंच लागेल, साला आळशीपणात ह्याचा हात धरणारा माणूस मी तरी अखंड विश्वात पाहिला नाहीये. तू पाहिलायस का रे?.
विज्या - नाही बॉ. हा माणूस सलग कितीही तास झोपू शकतो. दिवसचे दिवस एकच जिन्स न धुता वापरतो. दाढी महिन्या दीड महिन्या आड केस कापतानाच करतो.
मध्या - अजून काय रे?
विज्या - आठवतोय रे. हां. आपण लै भारी असा त्याचा समज आहे. पण त्यात त्याचा दोष नाही. आमच्या सारखे मित्र मिळाल्यावर कुणालाही असंच वाटेल. मी अजून एका बाबतीत ह्याला मानतो.
मध्या - कोणती रे?
विज्या - आठवत नाही.
मध्या - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
विज्या - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
आपली इतकी स्तुती सहन न होऊन मी मध्येच तोंड उघडलं - अरे मेल्यांनो मी इथेच बसलोय. जरा तरी ठेवा माझी. जगा समोर काढताच. आता मी असतानाही? मला मी असण्याचा इतका कॉम्प्लेक्स देऊ नका.
मध्या - हे बघ, जे तोंडावर खरं बोलतात तेच खरे मित्र हे कायम लक्षात ठेव.
मी - चला, लय फुटेज खाल्लंत. शाल श्रीफळ द्या आता.

मध्या + विज्या - ठिकाय. तर लोकहो ऍडी विषयी एका वाक्यात सांगायचं तर 'ऍडी एक प्रचंड नालायक, उद्धट, उर्मट, आळशी, ऐतखाऊ, (अजून काय रे? ) हां, निर्लज्ज, कोडगा आणि माजोरडा माणूस आहे तरी त्याला आम्ही आपलं म्हटलंय ह्या वरून आम्ही किती चांगले आणि महान आहोत ह्याची तुम्हाला कल्पना येईलच. '

मी - झालं?
विज्या - इतक्यात?? अरे अजून हाफ पण संपली नाही ना राव. (साल्यांच्या प्रायॉरिटीज क्लियर आहेत)
मी - अरे बैलांनो, माझ्या विषयी ओकून झालं का?
मध्या - होय बा. आत्ता इतकंच आठवतंय.

कोरस - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ...

आयुष्याचे नाटक - प्रवेश तिसरा

| Labels: | Posted On 5/5/08 at 11:09 AM

प्रवेश तिसरा - वेसण
मी - अगं ए, तुझ्या कडे थोडे पैसे असतील तर दे, मध्या कडे जातोय.
ही - नाहियेत.
मी - अग काल बँकेत गेली होतीस ना पैसे काढायला, काढले नाहीस का?
ही - काढले पण ते घर खर्चाला आहेत.
मी - अगं मग काय झालं, मी नवरा आहे तुझा, विसरलीस का?
ही - तू परवाच ATM मधून २००० रुपये काढलेस, विसरलास का?
मी - आयला... तुला कसं कळलं?
ही - तुझ्या अकाउंट चे Transaction Alerts आज काल माझ्या मोबाईल वर येतात.
मी - अगं ते पैसे संपले.
ही - संपले? ३ दिवसात २००० रुपये संपले? हिशोब दे, त्या शिवाय काहीही मिळणार नाही.
(एक संध्याकाळ मित्रांसोबत घोट घोट घालवल्यावर हिशोब कोण ठेवतो? )
मी - मी कधी बाबांना पण हिशोब दिला नाही.
ही - मग बाबांकडूनच माग तुझ्या. बाबा, ह्याला १० रुपये द्या हो.
मी - काय??? फक्त १० रुपये???
ही - अरे तुम्ही बाइक वरून भटकणार. बाइक मध्ये पेट्रोल आहेच. हे १० रुपये तुला वर खर्चाला देतेय, नवरा म्हणून.
मी - अगं पण... बाबा हिला काही तरी सांगा ना.
बाबा - तुका म्हणे ठकासी मिळे महा ठक.
मी - बाबा तुकारामांनी असं काहीही म्हटलेलं नाहीये. पण हिच्या सारख्या आवड्या असल्यावर नवरे भजनाला लागणारच.
ह्यावर बाबांनी मला टाळी दिली. ते बायकोने बघितलं. ती त्यांच्यावर घसरली. आणि अनवधानाने बोलून गेली
'बाबा, टाळी काय देताय त्याला? आपलं काय ठरलंय? '
नकळत आपण काय बोलून गेलो हे कळून तिने जीभ चवली.
मी - अच्छा, म्हणजे हे तुम्हा सगळ्यांचं कारस्थान आहे होय. हे बघ, मी कुणालाही कुठलेही हिशोब देणार नाहीये.
ही - नको देऊस, आता तुझ्या कडे उधळायला पैसेच नसणारेत.
मी - म्हणजे?
ही - म्हणजे माझा राजा, तुला आठवतंय का एका रम्य रविवार सकाळी तू लोळत पडला असताना मी तुझ्या कडून तुझं Account Joint करायच्या फॉर्म वर सही घेतली.
मी - आठवतंय अंधुकसं.
ही - त्यात एक ECS चा फॉर्म पण होता. आता तुझ्या account मध्ये पगार जमा झाला की आपोआप ३ तारखेला ५००० सोडून बाकी सगळे पैसे माझ्या account मध्ये जमा होणार. कर चैन. खा, रोज मटार उसळ खा, शिकरण खा. ही ही ही
मी - आयला, हा अन्याय आहे.
बाबा - हा हा हा हा
ही - हा हा हा हा
मी - बाबा हसताय काय, हिला सांगा ना काही तरी.
बाबा - बाळा. ये, बस इथे.
मी बसल्यावर माझ्या डोक्यावर हात फिरवत बाबा शांतपणे म्हणाले -
आता पर्यंत उभ्या आयुष्यात आपण एकदाही बापाच न ऐकून सुद्धा आता बाप आपलं ऐकेल असं खरंच तुला वाटतं का?
असं म्हणून बाबांनी हिला टाळी दिली. ही गाणं गुणगुणत आत निघून गेली. आता शेवटचा जालीम उपाय म्हणजे आई. पण ती घरी नव्हती. आणि आमचा बाप सुद्धा जिला टरकतो ती आमची आजी कोंकणात आंबे खायला गेली होती. त्यामुळे टेम्पररी पराभव मान्य करून मी घराबाहेर पडलो. वाटेत २-३ रिक्षावाल्यांना शिव्या घातल्या. तेवढंच जरा बरं वाटलं.

मध्या कडे आलो. मध्या माझा बालमित्र. त्याचंही माझ्या २ आठवड्या आधीच लग्नं झालंय. त्याची बायको, संध्या, ही सुद्धा मला आधी पासून ओळखते, त्यामुळे ती ही मला मूड आला की झापत असते. मध्याच्या बिल्डिंग खाली येऊन खुणेची शीळ वाजवली. संध्या बाल्कनीत आली 'टवाळ मुलांसारख्या शिट्या काय वाजवतोस? वर ये. ' मी वर गेलो तर मध्या हॉल मध्ये TV समोर सुन्न पणे चॅनल बदलत बसला होता. कालच्या घोटांच्या गोटात हा ही होता. मी म्हटलं 'काय रे साल्या उतरली नाही का अजून? ' इतक्यात आतून हॉल मध्ये एंट्री घेत संध्या म्हणाली 'तू नि मध्या (ही नवऱ्याला मध्या च म्हणते. लग्नं आत्ता झालं. गेली १० वर्षं ह्याच नावाने ओळखतेय. आत्ताच का बदलू. इति संध्या) तू नि मध्या आता वारा प्यायलेल्या वासरांसारखं उंडारणं बंद करा. ' 'आम्ही वारा कुठे पितो???... ' तेवढ्यात मी एक विनोदाचा क्षीण प्रयत्न करून बघितला. संध्या लगेच तिच्या मूळ स्वभावावर येऊन म्हणाली 'PJ नकोयत. तू नि मध्यानी आता गुपचूप थंड घ्यायचं, कळ्ळं नं. नाही तर मला नि विद्द्याला (माझं सौभाग्य) काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील. आता ह्यातलं पहिलं ठोस पावूल नुकतंच घरी उचलल्या गेल्याने मी मध्या ला सावध करण्या साठी तोंड उघडलं तेवढ्यात संध्या म्हणाली 'त्याने कालच फॉर्म वर सही केली. ' मी कपाळावर हात मारून मध्या कडे बघितलं. त्याने पुन्हा एकदा चॅनल बदललं.

चहा पिऊन दोघे बाहेर पडलो. मध्या अजून उदासच होता. मी म्हटलं 'उदास नको होऊस प्यारे, काही तरी आयडिया काढतो. '२-३ महीने असेच गेले. काहीही आयडिया आली नाही. हालाखीचं जीवन तसंच सुरू होतं. चायनीज च्या गाड्या तशाच होत्या, बारही तसेच होते. फक्त आता आम्ही नव्हतो.

एके रविवारी मध्यरात्री ९ वाजत हिने अचानक मला उठवलं.
ही - ऍडी ऊठ, ९ वाजले.
मी - अगं ९ ही काय रविवारी उठायची वेळ आहे का?
ही - माणसाला ८ तास झोप पुरेशी असते. तुझी १० तास झाली आहे. आज पासून १२-१२ तास लोळणं बंद.
मी - मी माणूस आहे का? मी तुझा नवरा आहे. तुझ्या साठी मी देव आहे.
ही - हो का? मग उद्या पासून तुला नैवेद्याच्या वाटीतच जेवायला वाढते. ऊठ आता.
असं म्हणून ही पंखा बंद करून निघून गेली. ही आईची सवय हिला कशी लागली? मी उठत नसलो की आई अशीच पंखा बंद करून जाते. मग उकाड्याने हैराण होऊन थोड्या वेळाने उठावच लागतं.

चहा नि सिग्रेट घेऊन बाल्कनीत आलो. मध्या ला फोन करावा असा विचार मनात आला. पण म्हटलं झोपला असेल हरामखोर. तेवढ्यात हिने कॉर्डलेस आणून दिला. पलीकडे मध्या. मी उडालोच.
मी - काय रे भXX, इतक्या लवकर कसा उठला तू?
मध्या - जसा तू उठलास तसाच मी उठलो.
मी - ह्म्म्म्म...
मध्या - ह्म्म्म्म...
मी - मध्या, आपला गेम झाला यार.
मध्या - हौ ना भौ.
मी - पण साला मी काय म्हणतो, थोडे दिवस वागून बघायचं का बायकांच्या मना प्रमाणे?
मध्या - अरे पण आपण आहोत तसे वाईट आहोत का? वाईट असतो तर ह्यांनी आपल्याशी लग्नं केलं असतं का?
मी - खरंय रे. पण तसंही त्या आपल्याला त्यांच्या मना प्रमाणे वागायला लावतातच. त्यापेक्षा, थोडे दिवस वागू त्यांना हवं तसं. जरा वातावरण निवळलं की आहेच पुन्हा जैसे थे.
मध्या - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
मी - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
तेवढ्यात पलीकडून २ स्त्रियांचा आवाज आला. क्रॉस कनेक्शन लागलं असेल असं मला वाटलं. पण आवाज ओळखीचे वाटले. मग लक्षात आलं ही आमच्या बायका पॅरेलल लाईन वरून आमच्यावर हेरगिरी करत होत्या.
ही - मध्याSSSS
संध्या - ऍडीSSS
कोरस - तुम्ही दोघेही अतिशय नालायक आहात. खटाक...
चाहूल लागली म्हणून मागे वळून बघितलं तर आमची रखुमाई विठ्ठला सारखी कमरेवर हात ठेवून उभी होती.

त्या संध्याकाळी आमची उ. न. क. (उपेक्षीत नवरे कमिटी) ची मीटिंग ठरली. मंथ एंड असल्याने शबरी मध्ये भेटलो. १-१५ समाधान मध्ये बसतो. १५-३० आम्ही 'शबरी रेस्टोरेंट अँड फॅल्मीली बार आणि शुधा शांती ग्रुह इथे वीज आणि फोन ची बिले भरली जातील प्रो. बाळा काळे' मध्ये भेटतो. ठरल्या प्रमाणे ७ वाजता नेहमीच्या टेबल वर नुकतेच लग्नाळलेले मी, मध्या, नि विज्या, लग्न ठरलेला विन्या आणि गेली १५-२० वर्षं बायकोच्या गोलंदाजीवर यशस्वी पणे पॅडींग करणारे साने काका जमलो. आमच्या ह्या गँगला चांडाळ चौकडीच्या तालावर साने काकू 'पाचकळ पांडव' म्हणतात. त्यांच्यामुळे आमची ही गँग सगळी कडे पांडव गँग म्हणूनच फेमस आहे.

आम्ही बसल्यावर कौंटर वरून बाळा काळे ओरडला 'अरे गोट्या (तो प्रत्येक वेटर ला गोट्याच म्हणतो) अरे गोट्या पांडवांची द्रौपदी आण रे... (म्हणजे मॅकडोवेल चा खंबा आण)

दोन पेग पोटातून डोक्यात गेल्यावर काकांची ओघवती वाणी सुरू झाली.
- सालेहो तुमच्या बेसिक मध्येच लफडा आहे. बायकोला शत्रू समजू नका. तिला सुखात भागीदार करा. तिचं मधून मधून कौतुक करा.
मध्या - च्यायला म्हणजे आता पुढल्या बैठकीला बायकांना पण आणायचं का? आधीच दारू चे भाव किती वाढलेत. त्यात बायकाही पिऊ लागल्या तर आपल्यालाच सोडावी लागेल.
काका - मध्या... मी बोलत असताना पुन्हा तू मध्येच विनोदाचा प्रयत्न केलास तर हा तुझा शेवटचा पेग.
तर, तुम्हाला बायकांना हँडल नाही करता येत. तापलेला तवा पेटलेल्या गॅस वर ठेवला की तो अजून तापणारच. पहिलं म्हणजे बायको रागावली की आपण शांत राहायचं. आणि ती ज्या कारणा साठी रागावली आहे ते चूक आहे हे माहिती असूनही चुकलो हे लगेच कबूल करायचं. बायकोचा अर्धा राग इथेच शांत होतो.
दुसरं म्हणजे बायकोला घर कामात मदत करायची.
कोरस - क्काय???
काका - म्हणजे तसं दाखवायचं.
कोरस - हुश्श्श...
काका - एखाद्या रविवारी उगाच बटाटा हातात घेऊन चिरून देऊ का म्हणून विचारायचं. मग बायकोच म्हणते, असू दे रे, करते मी. बायकोने आठवड्या भराचं सामान आणून ठेवलंय हे पाहून कट्ट्यावर जाताना उगाच विचारायचं 'काही आणायचंय का गं बाहेरून? ' की बायको खूश.
आणि आता सर्वात महत्त्वाचे. तुमची बायको कारकून असो वा प्राईम मिनिस्टर, तिला करियर च्या कौतुका पेक्षा भाजी छान झाली आहे ह्या कौतुकाचं जास्त अप्रूप असतं. त्यामुळे मधून मधून तेही करत राहायचं. पोळी जरा जास्त भाजल्या गेली की लगेच 'अरे वा, आज जेवायला खाकरे वाटतं' असं नाही म्हणायचं. आणि तुमचं तर अजूनच बरं आहे. ह्या मॉडर्न मुलींना मी नोकरी करत असूनही घर देखील उत्तम सांभाळते हे दाखवून कौतुक करून घेण्याची हौस असतेच. त्या मुळे त्या फ्रंट वर फार चिंता नाही. असं जवळ जवळ २ तास काका बरंच काही बोलत होते. त्यांचं लक्षं नाही हे पाहून मधूनच मध्या त्यांचा ग्लास उचलत होता. नि तो त्यांचा ग्लास पीत असताना काका मध्याच्या ग्लास संपवत होते. शेवटी एकदा बार बंद व्हायची वेळ आली तेव्हा काकांनी समारोप केला.

- त्यामुळे बाळांनो, संसार सुखाचा करायचा असेल तर बायकोला कंट्रोल मध्ये ठेवायला शिका. चला आता उचला आप-आपले मद्याचे चषक आणि सुखी संसाराच्या नावाने होऊन जाऊ द्या बॉटम्स अप...

चियर्स...

चियर्स...

अताशा असे हे मला काय होते - विडंबन

| Labels: | Posted On at 11:05 AM

अताशा असे हे मला काय होते
जरा स्ट्राँगशी दारू ग्लासात येते
बरा ढोसता ढोसता स्तब्ध होतो
जशी शांतता एका खंब्यात येते

कधी वाटू घेता विड्यांचा पसारा
कसा सावळा रंग होतो धुराचा
असे हालते आत जोरदार काही
असे हालते आत जोरदार काही
जसा नाच गुत्त्यावरी बेवड्यांचा

जसा ऐकू येतो पिण्याचा इशारा
क्षणी धुंध होतो पिऊनी बिचारा
गटारात ज्या रोज जातो बुडोनी
गटारात ज्या रोज जातो बुडोनी
गटारास त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले ना अवधान काही, किती घेतली सांडली भान नाही,
जसा टुन्न निघतो घराच्या प्रवासा, न कुठले नकाशे न अनुमान काही.

कशी ही अवस्था, कशाला धरावे,
कसे सावरावे, कसे उभे राहावे,
किती झोक जातो तरी घेत जातो,
किती झोक जातो तरी घेत जातो,
असे घेत जाता कुणी थांबवावे.


अताशा असे हे मला काय होते
जरा स्ट्राँगशी दारू ग्लासात येते

नसतेस घरी तू जेव्हा - विडंबन

| Labels: | Posted On 5/4/08 at 12:06 PM

नसतेस घरी तू जेव्हा
पेग मोठा मोठा होतो
शेवेचे भरतो बकाणे
अन सोडा संपत जातो

बुच सुटून बियर उडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन मी ही बरळत जातो

येतात पेग ओठाशी
संपुनच जाती मागे
सोड्या वीन पेग बिचारा
थोडासा स्ट्राँगच होतो

क्वार्टरीत झिंगवणार्या
मज स्मरती लाघव वेळा
चकण्या वीन पिणे अडावे
मी तसाच अगतीक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू ह्या बर्फाला
व्हिस्कीचा जीव उदास
सोड्या वीन मिण मिण मिटतो

ना अजून चढली झिंग
ना टाईट अजूनी झालो
चकण्या वीन चढतच
चकण्या वीन गॅसही होतो

नसतेस घरी तू जेव्हा
पेग मोठा मोठा होतो
शेवेचे भरतो बकणे
अन सोडा संपत जातो

गोष्टी सांगेन युक्तीच्या चार - ब्लॉग लिहीण्या विषयी थोडेसे

| Labels: | Posted On 5/2/08 at 4:57 PM

मी कोण, मी कुठे, मी कसा, मीच का म्हणून... अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी ब्लॉग लिहीत नाही. विश्वाच्या सुरुवातीपासून माणसाला पडणार्‍या ह्या प्रश्नांची उत्तरं ब्लॉग लिहून मिळणार नाहीत हे मला माहिती आहे. मुळात मला असे प्रश्नच पडत नाहीत. तसंच मी का लिहीतो हा प्रश्नही मला पडत नाही (लोकांना पडत असेल कदाचीत). मी ब्लॉग का लिहितो हा प्रश्न मी सिगरेट का ओढतो ह्या प्रश्ना इतकाच कूट किंवा गहन आहे. आणि ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तरही एकच आहे. मला आवडतं म्हणून. तसा मी ह्या ब्लॉग विश्वात नवीनच आहे. काही महिनेच झालेत लिहायला सुरुवात करून. खरं सांगायचं तर मी मुंबई सोडून इथे बँगलोरला राहायला आलो तेव्हा पासून मला प्रचंड मोकळा वेळ मिळू लागला. मग नुसतंच घरी बसून लोळण्यापेक्षा थोडं लिहिलेलं काय वाईट असा एक वाईट विचार मनात आला आणि मी सुद्धा की बोर्ड बडवायला सुरुवात केली.

माझ्या ह्या काही महिन्यांच्या भटकंतीत ह्या ब्लॉग विश्वा विषयी आलेले माझे अनुभव आणि मी केलेलं निरीक्षण मी येथे देणार आहे. हा उद्योग करायचे मुख्य कारण म्हणजे जे माझ्या नंतर नवीन ब्लॉग सुरू करतील त्यांना इथे रुळण्यासाठी काही मार्गदर्शन करणे हा आहे. यशस्वी ब्लॉग ले़खक / लेखिका होण्या साठी काय करावे ह्याचे हे (सुलभ शौचालया सारखे) सुलभ गाईड. आता माझ्या सारख्या नव्या लेखकाने हे सगळं करणं म्हणजे नुकतीच एफ्. वाय. बी. ए. ला ऍडमिशन घेतलेल्या मुलाने डायरेक्ट शेक्सपियरच्या कासोट्याला हात घालण्यासारखं आहे. पण ठीक आहे.

ब्लॉग यशस्वी पणे सुरू करायचा असेल तर पाहिला नियम म्हणजे स्वतःच खर्‍या नावाने कधीही लिहायचं नाही. एक झक्कास पैकी abstract नाव निवडायचं. मी ब्लॉग सुरू केला आणि तो सुद्धा माझ्या खर्‍या नावाने हे बघून बर्‍याच लोकांना धक्का बसला. नकळतपणे मी आल्या आल्या एक अलिखित नियम मोडला होता. आता हे तुमच्या ब्लॉगचं abstract नाव कसं असावं? तुलना करायची तर एकदम प्रायोगिक नाटकांच्या नावासारखं असावं. माझ्यातला मी, शून्यातलं जग, दुपारचा चंद्र, अंधाराचा किरण, माणसातला माणूस, कुपोषितांची ढेकर, वगैरे वगैरे वगैरे. नाव वाचून काहीही कळत नही. पण नाव जितकं अगम्य आणि हटके तितका लिहिणार माणूस क्रिएटीव असा एक सर्वजनीक गैरसमज आहे. त्याचा फायदा आपण घ्यायचा. कळलं नाही की आपसूकच वाचणारे स्वतःच्या बुद्धीचं दिवाळं निघालंय हे कबूल करण्यापेक्षा छानच आहे, कसं सुचतं, असं म्हणतात. तू लय भारी नी मी ही लय भारी. आणि आपलं लिखाण अगदीच टुकार होऊ लागलं तर आपली चार चौघात अब्रूही जात नाही.

स्वतःच्या इंट्रो मध्येही हा अगम्यपणा कंटिन्यू करायचा. ह्यात सर्वसाधारण पणे स्वतः: विषयी बोलावं. तर असा हा स्वतः:विषयीचा अगम्य इंट्रो कसा लिहावा ह्याचं हे प्रात्यक्षिक:
'मी स्वतः विषयी स्वतःच काय लिहू? विचार केला आणि मला कळलं की मी कोण हे माझं मलाच अजून कळलेलं नाहीये.' ह्या पुढे 'मी कोण हे मला अजून कळायचंय, नी कळल्यावर वळायचंय' असा सूर लावावा. पण इथे आपल्याहूनही मुरलेली जनता आहे ज्यांच्यावर ह्याचा काहीही परिणाम होत नाही. ते ह्याला भीक घालत नाहीत. म्हणून मग हिच री पुढे ओढून 'मी जन्माला का आलो, कुठे जाणार आहे, जगणं म्हणजे नुसतं जिवंत राहणे का, शाळेत शिकणं म्हणजे ज्ञान मिळवणं का, मी म्हणजे मीच आहे की दुसराच कुणी' असेही प्रश्न लिहावेत.
(मला मात्र असे काही प्रश्न कधीच पडत नाहीत. कारण मी कसा नी कोण आहे हे समजावून देण्याचं काम माझ्या आयुष्यात बर्‍याच मंडळींनी न सांगताच केलं आहे. मला पडणारे प्रश्न एकदम साधे सरळ असतात. कट्ट्यावर मित्रं भेटतील का, ऑफिस मधून आज तरी दिवस उजाडायच्या  निघता येईल का, ८:४१ च्या गाडीत ती आज चढेल का, ह्या रविवारी तरी आई दुपार पर्यंत झोपू देईल का, वगैरे वगैरे.)


आता आपल्या ब्लॉगसाठी एखादं abstract नाव निवडलं की आतला मजकूरही तितकाच किंवा त्याहून अधिक abstract हवा. पण हे जमायला प्रचंड मेहेनत लागते. त्यामुळे अशा लिखाणाची सुरुवात मुक्तछंदातल्या कवितांपासून करावी. मुक्तछंद असल्याने यमक जुळवायचा त्रास होत नाही आणि आपली मर्यादित लेखन शक्ती जगापुढे उघडी पडत नाही. तसंच, लोकांना न कळणारी कविता लिहीण्यासाठी मुळात आपल्याला कविता म्हणजे काय हे कळून उपयोगाचे नाही. लिहायला विषयाचे बंधन नाहीये. पण कोलांट्या उड्या मात्र मारता यायला हव्यात. उदाहरणार्थ ही कविता पहा:

"चालता चालता चंद्राला विचारलं, दिवसा तू कुठे असतोस,
चंद्र म्हणाला मी काय सांगू, नील आर्म्सट्राँगला विचार."
- म्हणजे बघा. ह्या कवितेत चंद्राशी बोलण्याच कवित्व आहे, दिवसा तो काय करत असेल ह्याची व्याकुळता आहे आणि वर आर्म्सट्राँगला विचारण्याचा प्रॅक्टिकल विचारही आहे. (हान तिज्या मायला)

प्रेम कविता लिहायची असेल तर ती कारुण्य रसाने ओथंबलेली हवी. चार चौघां सारखं हॅपी एंडिंग कराल तर काळं कुत्रंही वाचणार नाही. यशस्वी प्रेम प्रकरणामध्ये जनतेला कडीचाही इंटरेस्ट नसतो.

"माझं प्रेम आहे तुझ्यावर, असं मी तुला म्हणालो,
तू सुद्धा हेच म्हणालीस, पण... दुसऱ्याला."
- आता ह्या कवितेत, स्वतःचं मन मोकळं करण्याचा मोकळेपणा आहे, तिचा प्रत्येक शब्द ऐकण्याची तपश्चर्या आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे करूण शेवटही आहे. (हान तिज्या मायला)

पण हे सामान्य विषय झाले. तुम्हाला लवकरात लवकर फ़ेमस व्हायचं असेल तर कविता करण्यासाठी विषय सुद्धा हटके निवडायला हवेत. हटके विषय कसा असावा नी त्यावर अजूनच हटके कविता कशी करावी ह्याचं हे प्रात्यक्षिक.

विषय - चालणारा लंगडा (लढ बापू)

"कोपर्‍यावर रोज दिसतो एक चालणार लंगडा.
कुबड्या घेऊन फिरत असतो गावभर,
एकदा म्हणाल मला साहेब मदत करा,
मी म्हणालो अरे मी तुझ्याहून लंगडा आहे,
तिच्यावर प्रेम करून मी ही लंगडा झालोय,
प्रेमाच्या कुबड्या घेऊन मी ही फिरतोय,
तुझ्या फक्त काखेतच कुबड्या आहेत,
माझ्या तर मनालाही कुबड आलंय."

आता ह्या कवितेचा अर्थ मी समजाऊन नाही सांगू शकत. कारण कविता म्हणजे काय हे न कळण्याच्या नियमानुसार ही कविता केली आहे.

असा हा सगळा संसार गोळा केलात की मग आपल्या ब्लॉगचा प्रचार सुरू करायचा. मित्रांना 'आजच कुठेशी ह्या ब्लॉग ची लिंक मिळाली. छान लिहिलय. तुलाही आवडेल म्हणून लिंक पाठवतोय' अशा आशयाची मेल्स टाकायची. आपले मित्रही आपल्या प्रमाणेच निरुद्योगी असल्याने ते हे मेल त्यांच्या मित्र-मंडळींना ढकलतात. नी अशा प्रकारे हा हा म्हणता आपल्या ब्लॉगवरचा हिट काउंट वाढत जातो. काही न कळून सुद्धा वाचणारे स्वतःच्या बुद्दीचं दिवाळं निघालंय हे कबूल करण्यापेक्षा छानच आहे, कसं सुचतं, असं म्हणतात. आणि लिंक पुढे पाठवत रहातात.

ह्या प्रचार सभेची शेवटची पायरी म्हणजे दुसर्‍या ब्लॉगर्सच्या ब्लॉग्सना भेटी देऊन तिथे त्यांची तोंड फुटेस्तोवर स्तुती करणे आणि त्यांच्या ब्लॉगची लिंक आपल्या ब्लॉग वर जोडणे. असे केल्याने ते सुद्धा आपली स्तुती करतात आणि आपल्या ब्लॉगची लिंक त्यांच्या ब्लॉग वर टाकतात. तू लय भारी नी मी ही लय भारी.

तर अशा प्रकारे ह्या काही गोष्टी लक्षात ठेवून ब्लॉग लिहिलात तर तुम्ही लवकरच ह्या ब्लॉगींगच्या चिमुकल्या विश्वात वर्ल्ड फेमस व्हाल. आणि तुम्ही फेमस झालात की तुमच्या ब्लॉग वर माझ्या ब्लॉगची लिंक द्यायला मात्र विसरू नका.