.
.
.
नुकतीच इ-सकाळ वर ही भयानक बातमी वाचली -
खासगी व शासकीय इमारतींमध्ये धुम्रपानाला आता बंदीअधीक माहिती - http://www.esakal.com/esakal/09022008/AurangabadInternationalMaharashtraMumbaiNationalPuneTajyabatmya262795F2D3.htm.
.
.
.
सार्वजनीक ठिकाणी बंदी ठीक आहे. सरकारी कार्यालयांनधेही ठीक आहे. (तिथे तर काम करण्यावरही बंदी असल्याची शक्यता आहे) पण प्रायव्हेट कार्यालयांमधे स्मोकींग झोन्स करायला काय हरकत आहे? स्मोकींग झोन्स मुळे लोकं बाहेर येऊन धुम्रपान करणार नाहीत आणि बाकिच्यांनाही पॅसीव्ह स्मोकींगचा त्रास होणार नाही.
ही भयानक साथ देशाच्या इतर शहरांमधे पसरू नये म्हणून समस्त फुंक्यांच्या वतीने मी सरकारला एक आवाहन करत आहे. सिगरेट जरी मायक्रो लेवल वर ओढणार्याची वाट लावत असली तरी मॅक्रो लेवल वर ती राज्यासाठी, देशासाठी, खंडासाठी आणि पर्यायाने अखंड विश्वासाठी अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे.
स्मोकींग मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा हातभार लागतो ते समजून घेऊ. त्यासाठी आपण केस-स्टडी म्हणून एका फुंक्याच्या आयुष्यात डोकावू आणि त्या अनुषंगाने स्मोकींगच्या काही फायद्यांचा अभ्यास करू. पण हे फायदे अगणीत असल्यामुळे आपण स्मोकींगचे महत्व जाणून घेण्यासाठी त्यांचे ढोबळ मानाने २ प्रकारात वर्गीकरण करू - १) देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारे फायदे २) फुंक्यांचे भावनीक / मानसीक फायदे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारे फायदे:-कॉलेज मधे सिगारेट ओढायला सुरुवात केली की पहिला प्रॉब्लेम असतो की कुणी बघणार नाही अशी जागा शोधाणे. पण ती घराजवळ नको. त्यामुळे मग लांब जाण्यासाठी बाईक / सार्वजनीक वहातूक व्यवस्थेचा वापर केला जातो. त्यामुळे पेट्रोल पंपावर काम करणारी लोकं, बेस्ट चा कर्मचारी वर्ग, रिक्षावाले अशा शेकडो लोकांच्या पोटाची सोय होते.
सिगारेट ओढून झाली की वास घालवण्यासाठी हॉल्स / विक्स / पोलो आणि तत्सम वासहारक पदार्थ खाल्ले जातात. त्या त्या कंपन्यांच्या कर्मचार्यांच्या हातालाही काम मिळते.
आपल्या गोळीमुळेच वास कसा उत्तम प्रकारे दडपला जातो ह्याची जाहीरात त्या कंपन्यांना करावी करावी लागत असल्याने जाहिरात कंपन्यांनाही काम मिळते. त्या अनुषंगाने जाहिराती बनवणारे डायरेक्टर्स, स्टुडीयो आर्टीस्ट, कलाकार इत्यादिंची ही ददात मिटते.
ह्या बनवलेल्या गोळ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी उत्तम डिस्ट्रीब्यूशन व्यवस्था लागते. त्यासाठी बरीच माणसं नेमावी लागतात. त्यामुळे त्यांच्याही पोटाची खळगी भरते.
ह्या गोळ्या खिशात भरून पोचवता येत नसल्याने टेंपो वा तत्सम गाड्या लागतात. त्यामुळे बजाज, टेंपो ट्रॅक्स, टाटा इत्यादी कंपन्यांमधल्या हजारो कामगारांच्या हाताला काम मिळते.
ह्या गाड्या पेट्रोल / डिझेल वर चालत असल्याने पेट्रोल / डिझेल निर्मीती करणार्या कंपन्यांना काम मिळते. पुन्हा ह्या गाड्यांची देखभाल वगरे करण्यासाठी बरेच मेकॅनीक लागतात. त्यांच्या पोटातही दोन घास पडतात.
दर वर्षी सरकार सिगारेटचे भाव वाढवत असल्याने आपसूकच सरकारच्या उत्पन्नातही भर पडते. म्हणजेच, सरकारचा जी. डी. पी. वाढवण्यामधे स्मोकींगचाही मोठ्या खारीचा वाटा आहे.
सिगारेट ओढणार्या बहुतेक मंडळींचे चहा मिळणारे कट्टे असतात. त्या कट्टेवाल्यालाही त्यामुळे सतत काम असते. तसंच, चहा प्यायला की सिगारेट ओढायची तलफ येत असल्याने पुन्हा सिगारेट ओढली जाते. सिगारेट ओढली की घशाला आराम म्हणून पुन्हा चहा प्यायला जातो.
असं म्हणतात की सिगारेट ओढल्याने भूक कमी होते. हे खरं मानलं तर ह्या मुळे अन्नाचा तुटवडा भरून निघण्यास मदतच होते आहे. सरकारच बहुमुल्य परकीय चलन धान्याची आयात करण्यात फुकट जाण्यापासून वाचते आहे.
पैसा जसा पैशाला ओढतो त्याच प्रमाणे एक सवय दुसर्या सवयीला ओढते. माझ्या माहितीतले बहुसंख्य फुंके फळांच्या जुन्या रसांचेही चाहते आहेत. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीचीही भरभराट होते. (त्याचे देशाला काय फायदे होतात ते जाणण्यासाठी वरचे पॉइंट्स वाचा)
त्यामुळेच, विकली गेलेली प्रत्येक सिगारेट भारतीय इकॉनॉमीच्या प्रचंड मोठ्या इंजीनातला एक्-एक पार्ट आहे, भल्या मोठ्या इमारतीतली एक्-एक वीट आहे, आकाशगंगेतला एक्-एक ग्रह आहे.
आता आपण फुक्यांना होणार्या मानसीक / भावनीक फायद्यांकडे वळूया:-सिगारेट ओढणारा माणूस कधीही एकटा पडत नाही. दुपारी देवळात एकट्याने भजन करणारी अनेक लोकं दिसतात, पण कोणत्याही वेळी कट्ट्यावर कुणीतरी एकटाच सिगारेट ओढत बसलाय हे दिसत नाही. फुकट सिगारेट ओढायच्या निमित्ताने का होईना मित्र सोबत असतातच.
आपण सिगारेट ओढताना कुणी पाहू नये म्हणून फुंके सतत चहूकडे बघत असतात. आई-बाबा, शेजारचे काका, शालेतले गुर्जी इत्यादी गनीमांना लांबूनच हेरण्याची सराव झाल्याने त्यामुळे द्रुष्टी तिक्ष्ण ते. अशा लोकांनी ऑलींपीक मधे नेमबाजीत भाग घेतल्यास नक्कीच डझनावारी पदकं मिळतील. तसंच कुणी आल्यास क्षणार्धात पळून जावे लागत असल्याने अंगात चपळता येण्यास मदत होते.
ह्या त्यांच्या सतत इकडे तिकडे बघण्यामुळे रस्त्यावरून चालणार्या स्थळांना आपण उगाच प्रेक्षणीय आहोत असा भ्रम होतो नी त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि एकदा का माणसात आत्मविश्वास जाग्रूत झाला की त्याच्या आयुष्याचं भलं होतं. ह्याचाच परिणाम पुढे उत्तम मार्क मिळवण्यात, इंटरव्य्हूत यश मिळून उत्तम नोकरी मिळण्यात वगरे वगरे होतो.
कॉलेजच्या दिवसांत बहुतेकांच्या पानवाल्यांकडे उधारी चालते. इतक्या सगळ्यांच्या उधारीचा चोख हिशोब ठेवल्याने पानवाल्याचे गणित सुधारण्यास मदत होते.
सिगारेट ओढण्यामुळे विचारांना चालना मिळते.
अनोळखी व्यक्तीशी ओळख करून घेण्यासाठी सिगरेट मदत करते. एखाद्याचा नी आपला ब्रँड सेम निघाला तर त्याच्याशी घनिष्ठ मैत्रीही होते.
रात्री अपरात्री ऑफीसमधे काम करताना सिगारेट भवनीक सोबत करते.
वेळी अवेळी एकट्याने भटकताना सिगारेट ओढत असाल तर आगीला घाबरून भूतं जवळ येत नाहीत.
आपण सिगारेट ओढत नसू नी मुलगा सिगारेट ओढायला लागला तर फारच गोची होउ शकते. पॉकेटमनी पुरत नसल्याने बापाच्या खिशातली चिल्लर उडवायला सुरुवात होते. त्या ऐवजी जर बापच सिगारेट ओढत असेल तर मुलगा चिल्लर ऐवजी डायरेक्ट सिगारेटच ढापेल आणि दुसर्याचे धन ढापण्याच्या पापातून वाचेल.
असे अजून शेकड्याने फायदे आहेत. पण माझी सिगारेट ओढायची वेळ झाल्याने मी आता इथेच थांबत आहे.
जाता जाता सरकारला अजून एक विनंती - क्रुपया अशी बंदी घालून नका. आम्हाला मोकळा धूर सोडू द्या.