काकाचा कात्रज

| Labels: | Posted On 6/23/09 at 8:32 PM

तो काका मीच. आणि मला खिंडीत गाठणारा तो धाडसी बालवीर म्हणजे आमचे पुतणे चिमू / चिनू / चिम्या / चिन्या उर्फ चिन्मय. एके दिवशी एका अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त (लग्न होऊ घातलेल्या एका भावाची बॅचलर्स उकळणे) पुण्याला जाण्याचा योग आला. शुक्रवारची सुट्टी टाकली होती. शुक्रवारी सकाळी १२-१ पर्यंत झोपून, जेवून, दुपारची झोप झाल्यावर ४-५ च्या सुमारास निघायचे आणि उरलेली झोप वोल्वोत वसूल करत रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत पुण्यास पोचायचे असा माझा प्लॅन आमच्या पिताश्रींनी उधळून लावला. 'सुट्टी घेतली आहेस तर लवकर जाऊन वहिनी जरा मदत कर. ऐन वेळी पोचून नुसती पार्टी झोडून येऊ नकोस. तुम्हा सगळ्यांचं करता करता ती बिचारी एकटी दमून जाते'. आणि परस्पर त्यांनी मी १२ च्या आत काहीही करून पुण्यात पोचेनच असा फोन आमच्या बंधुराजांना करूनही टाकला. भावाने 'शेजारी चावी देऊन ठेवतो' असे सांगितले. १२ च्या सुमारास पुण्याला पोचलो. लंच टाइम मध्ये पोचल्याने भाऊ आणायला आला होता. त्याच्या सोबत जेवायचा आणि डिसेंबरच्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उतारा घ्यायचा प्लॅन ठरवला. उतारा घेता घेता लंच टाइम संपल्याने न जेवताच निघालो. साधारण २ च्या सुमारास घरापाशी पोचलो.

चिनू शेजारच्या इमारतीतल्या गोगटे आजींकडे खेळायला गेला होता. आजू बाजूची ६-७ मुलंही होती. भावाच्या आज्ञेनुसार तिथून चिनूला उचलला. त्यांचा ल्युडो रंगात आला असतानाच मी आल्याने 'ए काय रे काका, थोड्यावेळाने ये ना परत' असं त्याने मला सांगायचा प्रयत्न केला. पण मला घरी जाऊन ताणून द्यायची असल्याने पुन्हा येण्यास सवड होणार नव्हती. तो ऐकेना. शेवटी त्याला जबरदस्तीने उचलला, तेव्हढ्यात पायाला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं म्हणून खाली पाहिलं तर त्यांच्यातली एक चिमुरडी दात-ओठ खाऊन मला चिमटा काढायचा प्रयत्न करत होती. असो. शेवटी एकदाचा चिमू / चिनू / चिम्या / चिन्या ला काखोटीस मारून मी घरी आलो. घरी पोचतोय तोच श्वेता वहिनीचा फोन आला...

श्वेता वहिनी - आलास?
मी - कधीच... घरी येऊन जुना झालो...
श्वेता वहिनी - किती वाजता पोचलास?
मी - १२ च्या आसपास...
श्वेता वहिनी - रात्रीच स्टँडवर जाऊन बस मध्ये झोपला होतास की काय?
मी - काहीही काय अगं?
श्वेता वहिनी - मग इतक्या सकाळी कसा उठलास?
मी - तुझ्या नवऱ्याने नि त्याच्या काकाने मिळून गेम केलाय माझा...
श्वेता वहिनी - जेवणाचं काय?
मी - काय जेवणाचं?
श्वेता वहिनी - दादा बरोबर बाहेर जेवायला गेला होतास ना?
मी - तुला कसं कळलं?
श्वेता वहिनी - हो की नाही?
मी - हो...
श्वेता वहिनी - मग नेहमी प्रमाणे गप्पांच्या ओघात नुसतेच घसे ओले करून जेवायचं विसरला असाल...
मी - हो...
श्वेता वहिनी - फ्रीज मध्ये तुझ्यासाठी भाजी ठेवली आहे. मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घे.
मी - हो वहिनीसाहेब...कोणती भाजी केली आहेस?
श्वेता वहिनी - तुझ्या आवडीची मेथीची....
मी - अरे काय?????
श्वेता वहिनी - गंमत करतेय रे...
मी - माहिती आहे गं, जुनी झाली ही गंमत...
श्वेता वहिनी - गप्प बस. आणि ऐक, मायक्रोवेव्ह मध्येच गरम कर, मागच्या वेळेसारखी माझी कढई जाळू नकोस...
मी - हो गं, आणि ती कढई मी नाही तुझ्या नवर्‍याने जाळली होती...
श्वेता वहिनी - अशक्य आहे...
मी - का?
श्वेता वहिनी - तो इतके कष्ट घेणंच शक्य नाही...
मी - जाऊ दे, चल मी आता जेवणाची सोय बघतो. तू किती वाजता येतेयस?
श्वेता वहिनी - साधारण ७ वाजेपर्यंत येईन...
मी - आणि शलू?
श्वेता वहिनी - ती नाही यायची, आई सोबत बाहेर गेली आहे...
मी - बरं... टाटा
श्वेता वहिनी - बिर्ला

फोन ठेवल्यावर समोर चिन्मय साहेब हसत उभे असलेले दिसले.

मी - काय रे, हसतोयस का???
चिनू - आई ओरडली ना तुला?
मी - छे रे...
चिनू - मी ऐकलं...
मी - आई कडून ओरडा खायला मी काय तुझा बाबा आहे?
चिनू - पण मी ऐकलं...
मी - राँग नंबर होता रे...
चिनू - असा कसा असेल? काय नंबर लावलास?

(असं म्हणून माझ्या हातातला फोन काढून घेतला. ह्या ५-६ वर्षाच्या कार्ट्याला इतकी अक्कल कधी आली असा विचार करत असतानाच पठ्ठ्याने कॉलर लिस्ट मध्ये असलेला श्वेता भाई असा नंबर मला दाखवला. )

चिनू - काका तू आईला भाई म्हणतोस????
मी - प्रकटः नाही रे (स्वगतः अरे तुझ्या बाबानेच नाव ठेवलंय ते.)
चिनू - मग आईच्या नावापुढे भाई का लिहिलंयस?
मी - अरे चुकून लिहिल्या गेलं असेल?
चिनू - मी सांगणार आईला...
मी - नको................ थांब मी बदलतो लगेच....
चिनू - तरी मी सांगणार....
मी - मी तुझा लाडका काका आहे की नाही?
चिनू - छट... श्री काका माझा सगळ्यात लाडका आहे...
मी - का?
चिनू - त्याने मला २ मोठे डबे भरून गोट्या आणि ४ भवरे दिले... पण भवरे फिरवायला नाडी नाही दिली...
मी - घे तुझ्या बाबाच्या चड्डीची...
चिनू - घेतली होती...
मी - शाब्बास....
चिनू - पण आईने ती माझ्याकडून काढून घेतली आणि रद्दीच्या गठ्ठ्याला बांधली...
मी - मग तुझ्या चड्डीची घे...
चिनू - माझ्या चड्डीला नाडी नाहीये...
मी - बरं मग मी तुला नवी कोरी नाडी घेऊन देईन हां... पण तू आईला काही सांगू नकोस...
चिनू - चालेल... आपण संध्याकाळी बाहेर जाऊ तेव्हा घेऊ...
मी - चालेल...
चिनू - काका... इथे जवळच बाग आहे, तिथे पण जाऊया?
मी - हो...
चिनू - बागे समोर ना उंटावरून चक्कर मारून आणतात...
मी - बरं...
चिनू - आणि बागेच्या गेटपाशी म्हातारीचे केस पण मिळतात...
मी - बरं...
चिनू - आणि....
मी - चिनू मला भूक लागली आहे, मी जेवून घेऊ का आत जरा?
चिनू - ऐक ना... जेवता जेवता ऐक...

फ्रीज उघडला तर आत मध्ये कांदा-बटाटाच्या रस्सा आणि गुलाबजाम दिसले. पुन्हा वहिनीला फोन लावून किती वेळ टायमर लाऊ वगैरे विचारलं. ताट वाढून बाहेर आलो तर स्वारी कागद पेन्सिल घेऊन काही तरी चित्र काढत होती.

मी - कसलं चित्र काढतोय रे?
चिनू - हत्तीचं
मी - अरे वा, तुला हत्ती आवडतो वाटतं?
चिनू - नाही
मी - मग का काढतोयस?
चिनू - मला येत नाही म्हणून आईने काढायला सांगितलंय...
मी - अरे पण येत नाही तर काढणार कसा?
चिनू - ह्म्म्म्म... काका तू काढून दे ना मग...
मी - (स्वगतः बापरे) अरे मी जेवतोय... (डोळ्यासमोर चित्रकलेचा तास आणि मी भगव्या रंगाचं गुलाब काढलं म्हणून पट्टी मारणारे मास्तर उभे राहिले)
चिनू - जेवण झाल्यावर काढून दे मग...
मी - (स्वगतः गेली दुपारची झोप) अरे पण आईने तुला काढायला सांगितलंय ना?
चिनू - अरे पण मला कुठे येतं काढता...
मी - (आईडिया) जेवण झालं की मला थोडं काम आहे...
चिनू - पटकन काढून दे ना, मग मी तुला गोष्ट सांगीन...
मी - कसली गोष्ट?
चिनू - आमच्या वर्गात मी सांगितली एक गोष्ट
मी - तू शाळेत कधी पासून जायला लागलास?
चिनू - शाळेत नाही, आमच्या डे-केअर मध्ये...
मी - बरं बरं... कसली गोष्ट होती?
चिनू - तू आधी चित्र काढून दे मगच मी गोष्ट सांगीन
मी - पण मी चित्र काढल्यावर तू गोष्ट नाही सांगितलीस तर?
चिनू - सांगीन ना मी...
मी - बरं बाबा, ओरडू नकोस...

जेवण झाल्यावर चित्र काढायला बसलो. बऱ्याच मेहेनती नंतर, भरपूर खाडाखोड करून शेवटी एकदाचा हत्ती काढला. तोवर बाळराजे टिव्ही बघण्यात गुंग होते.

मी - चिनू... झालं बघ चित्र काढून...
चिनू - ये... ये...

थोडावेळ चिनूने चित्र निरखून बघितलं.

चिनू - काका, पुस्तकातला हत्ती असा दिसत नाही...
मी - अरे खरा हत्ती असाच असतो...
चिनू - पण हत्तीला सोंड असते...
मी - अरे ही काय सोंड (असं म्हणून मी एके ठिकाणी बोट टेकवलं, तर ती सोंड आहे की शेपटी हे मलाच ओळखता येईना)
चिनू - मग शेपटी कुठाय...
मी - अरे शेपटी नाहीये ह्या हत्तीला...
चिनू - मला पूर्ण हत्ती हवाय...
मी - अरे ह्याला अजून शेपटी उगवली नाहीये...
चिनू - नाही ना...
मी - अरे खरंच... हा लहान हत्ती आहे... हे बघ, तुझ्या शलू ताईचे केस आई इतके लांब आहेत का?
चिनू - नाही...
मी - तसंच ह्या हत्तीचं आहे...
चिनू - अरे पण शलू ताई मुलगी आहे हा हत्ती आहे, आणि तिला शेपटी कुठाय?
मी - ते ही आहेच, मग आता काय करायचं?
चिनू - मी तुला गोष्ट नाही सांगणार...
मी - बरं, मी तुला आता एकदम पुस्तकातल्या सारखा हत्ती काढून देतो. मला शाळेत चित्रकलेत १० पैकी १० मिळायचे.

ह्यावर चिनूचा विश्वास बसला नाही. काका आपल्याला गंडवतोय असा संशय त्याला आला. थोडा हिरमुसला होऊन तो सोफ्यावर जाऊन बसला.

मी - काय झालं रे?
चिनू - आता आई मला ओरडणार...
मी - का? बाबा येणार नाहियेत का घरी आज?
चिनू - म्हंजे?
मी - म्हंजे काही नाही... आई का ओरडणार?
चिनू - मी हत्तीचं चित्र काढलं नाही म्हणून...
मी - अरे पण आपण काढलाय की हत्ती...
चिनू - पण तो पुस्तकातल्या हत्ती सारखा दिसत नाही ना...
मी - मग कुणासारखा दिसतो?
चिनू - मला नाही माहिती...
मी - बरं तू मला गोष्ट सांग...
चिनू - नाही आधी तू हत्ती काढ...

हे हत्ती प्रकरण मला भलतंच जड जाणार असं वाटून मी चिनूला बागेत घेऊन जायचा विचार केला. त्याला कपडे घेऊन याला सांगितलं तर महाराज त्यांचं नाडीचं धोतर आणि छब्बा घेऊन आले.

मी - अरे हे घालून कसं बागेत जाणार?
चिनू - पण मला हे आवडतं ना...
मी - बागेत खेळताना खराब होईल बाळा धोतर...
चिनू - मग आपण ते वॉशिंग मशीन मध्ये धुऊया
मी - पण अरे ह्या कपड्यात खेळता नाही येणार...
चिनू - मला हेच कपडे हवेत ना पण...
मी - बरं बाबा घाल...
चिनू - तू घालून दे...

बर्‍याच कसरतीनंतर एकदाचं धोतर आणि छब्बा घालून साहेबांना तयार केलं आणि बिल्डिंगच्या बाहेर आलो.

चिनू - काका पाय दुखतायत...
मी - का रे? नको जाऊया का मग बागेत?
चिनू - आपण रिक्षाने जाऊया ना...
मी - बरं...

ह्या चित्र प्रकरणामुळे अजूनही चिनू थोडा हिरमुसलेलाच वाटत होता. ढेंगेवरच्या बागेत रिक्षाने पोचल्यावर सी-सॉ, झोपाळा, घसरगुंडी, मातीत किल्ला बनवायचा अयशस्वी प्रयत्न, उंटावरून चक्कर, घोड्यावरून चक्कर, कुल्फी, म्हातारीचे केस अशी साग्रसंगीत समजूत काढल्यावर स्वारी पुन्हा खिदळायला लागली. नशिबाने कपडे फार खराब झाले नव्हते. शेवटी जाता जाता एकदा शेवटचं म्हणून चिनू घसरगुंडीवर घसरायला गेला आणि येताना नुसता छब्बा आणि हातात फाटकं धोतर अशा अवतारात आला. त्याला असा बघून मला हसूच आलं.

मी - धोतर कसं फाटलं रे?
चिनू - माहिती नाही काका. खाली घसरगुंडीवरून घसरलो तर धोतर वरच राहिलं. खाली काढायला म्हणून धोतराला लटकलो तर फाटलं.
मी - धन्य आहेस, लागलं नाही ना कुठे?
चिनू - नाही...
मी - नशीब माझं, जाऊ दे, फाटलं तर फाटलं धोतर, आपण तुझ्यासाठी आत्ताच्या आत्ता नवीन घेऊ.
चिनू - ये... ये...
मी - हे धोतर कधी घेतलं रे?
चिनू - मागच्या महिन्यात आजीने आणलं.
मी - अरे वा, मज्जाय एका मुलाची...
चिनू - मज्जा नाही, २ महिन्यांनी माझी मुंज आहे ना तेव्हा घालण्यासाठी आणलं आज्जीने...
मी - काssssss य????????? अरे गधड्या मेलो मी...
चिनू - का?
मी - अरे मुंजीसाठी घेतलेलं धोतर आत्ता का घालून आलास?
चिनू - मला ते धोतर खूप आवडतं पण आई घालूच देत नाही...
मी - अरे लागली वाट, आता थांब इथे थोडावेळ मला विचार करू दे...

लगेच मी आमच्या बंधुराजांना फोन लावला आणि सगळी हकीकत त्याच्या कानावर घातली.

मी - दादा, आता वहिनी मला बदडणार...
दादा - हो ना...
मी - हो ना काय अरे... काही तरी सुचव ना...
दादा - अरे मलाच सुचत नाहीये. त्यात ते धोतर हिच्या आईने वाराणसीहून आणलं होतं चिनूच्या मुंजीसाठी... तुझ्या बरोबर आता माझी पण वाट
मी - मेलो आता...
दादा - हो ना...
मी - अरे हो ना काय? मी एक काम करतो, चिनूला तुझ्या ऑफिसमध्ये सोडून मुंबईला जातो परत...
दादा - गप्प बस रे... आईडिया... श्वेता अजून आली नसेल घरी, तू पटकन घरी पोच, चिनूला अंघोळ वगैरे घालून, कपडे बदलून गोगटे आजींकडे सोडून ये.
मी - ओक्के...

घाईघाईत चिनूला घेऊन रिक्षाने बिल्डिंगपाशी पोचलो. रिक्षावाल्याला पैसे देत होतो तितक्यात समोर एक रिक्षा येऊन थांबली आणि त्यातून आमच्या वहिनीसाहेब उतरल्या. चिनू माझ्या मागे लपला. मला बघून श्वेता हसली. पण जसजसा तिला चिनू आणि हातातलं फाटकं धोतर दिसलं तसे चेहऱ्यावरचे भाव बदलत बदलत अतिशय हिंस्र झाले. सगळ्यांसमोर माझ्यावर हल्ला केला तर साक्षीदार राहतील म्हणून असेल कदाचित पण तिने घेरी पोचेपर्यंत राग कसाबसा आवरला. घरी पोचताच रणकंदन माजले.

श्वेता वहिनी - चिनू... धोतर कसं फाटलं... तू आत्ताच्या आत्ता वाराणसीला जाऊन असंच्या असं धोतर घेऊन ये (हे वाक्य माझ्यासाठी होतं. अचानक मला त्या गुढघ्या एव्हढ्या पोराचा आधार वाटू लागला.)

श्वेता वहिनी - चिनू तुला हजारवेळा नको सांगूनही तू हे धोतर का घातलंस?
चिनू - मी नाही घातलं, काकानी घालून दिलं...
मी - अरे तूच घेऊन आलास ना हे धोतर कपाटातून...
श्वेता वहिनी - तो लाख घेऊन येईल, तू घालून का दिलंस, घरातल्या कपड्यांवरच घेऊन जायचं होतंस ना त्याला...
मी - अगं पण...
श्वेता वहिनी - आद्या एक शब्दही बोलू नकोस, आत्ताच्या आत्ता वाराणसीला जाऊन असंच्या असं धोतर घेऊन ये...
मी - अगं मी पुढल्या महिन्यात जाणार आहे वाराणसीला तेव्हा नक्की आणीन...
श्वेता वहिनी - मला टेपा लाऊ नकोस...
मी - अगं खरं सांगतोय...
श्वेता वहिनी - चिनू तू कोपऱ्यात भिंती कडे तोंड करून उभा राहा आणि १० वेळ १०० पर्यंत आकडे मोज.
मी - अगं त्या पेक्षा १००० मोजायला सांग ना सरळ
श्वेता वहिनी - त्याला १०० पर्यंतच आकडे येतात... आणि तू एक शब्दही बोलू नकोस नाहीतर तुलाही उभा करीन मी...
(चिनूला स्वत: वरचं राज्य घालवायची युक्ती सापडली)
चिनू - आई... काकानी तुला श्वेता भाई नाव ठेवलंय...
श्वेता वहिनी - काssssss य????
मी - नाही गं
चिनू - हो आई, मी काकाच्या फोन मध्ये पाहिलं...
श्वेता वहिनी - आद्या फोन बघू तुझा...
मी - गंमत गं जरा...
श्वेता वहिनी - तुला आणि तुझ्या भावाला धरून बदडलं पाहिजे, खूप लाडावून ठेवलंय तुम्हा सगळ्यांना... चिनू तू हसू नकोस, आकडे मोज...

(तेव्हढ्यात आमच्या सुदैवाने दादाची एंट्री झाली.)

दादा - काय गं काय झालं चिडायला इतकं?
श्वेता वहिनी - हे बघ, आईने वाराणसीहून आणलेलं धोतर चिनू ने घालून फाडलं...
दादा - अगं ठीक आहे, साधं धोतर आहे ते, तुझी पैठणी फाटल्यासारखी काय चिडतेयस?
मी - मी म्हणालो की पुढल्या महिन्यात वाराणसीला जाणारच आहे तिथून आणीन नवीन. दादासाठी पण आणीन...
श्वेता वहिनी - वाट बघतेय मी...
चिनू - काका मला दोन आण...
श्वेता वहिनी - चिनू आकडे झाले का मोजून?
दादा - जाऊ दे गं, ये रे चिनू बाबाकडे
श्वेता वहिनी - बिघडवा त्याला अजून, जरा म्हणून ओरडू देत नाहीत...
मी - अगं दादा आहे ना तुझ्यासाठी...
श्वेता वहिनी - नालायकपणा नकोय, थांब, तुझंही आता लग्न करायला सांगते काकांना... बास झालं एकट्याने उंडारणं आता...

(ही भयानक धमकी ऐकून मी ताडकन उठलो.)

मी - मी येतो...
श्वेता वहिनी + दादा - काय रे कुठे निघालास?
मी - वाराणसीला...

----------------------------------------समाप्त----------------------------------------