उ. न. क. अर्थात उपेक्षीत नवरे कमिटी

| Labels: | Posted On 3/23/10 at 11:24 PM

नुकतंच महिलांना ३३% आरक्षण देणार्‍या विधेयकाला संमती मिळाली. ह्या आरक्षणाचे भविष्यात होणारे भयानक परिणाम ओळखून लालू प्रसाद यादवांसारख्या काही द्रष्ट्या नेत्यांनी ह्याला विरोध केला, पण मध्यंतरी बराच काळ ते नुसतेच बोलविते धनी असल्याने त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही. ह्या आरक्षणाचा आणि महिला मुक्ती चळवळीचा फार जवळचा संबंध आहे. महिला सक्षमीकरणाची चळवळ साधारण ७० च्या दशकात सुरू झाली. पण त्या आधीही आपल्याला अनेक ठिकाणी लाक्षणिकरित्या सक्षम आणि भक्कम महिला दिसतंच होत्या. असो. आजचा मुद्दा हा नव्हे. महिला मुक्ती चळवळी इतकाच, किंबहुना त्याहूनही जुना इतिहास पुरूषमुक्ती चळवळीला आहे. ह्या चळवळीची बीजे जेंव्हा पहिल्या पुरूषाने विवाह केला तेव्हाच रोवली गेली. त्यानंतर ह्याविरूद्ध ब्र काढण्याइतपत हिंमत गोळा कराण्यातच पुरूषांची हजारो वर्ष गेली. त्यामुळे अशा पिडीत, दु:खी आणि पिढीजात गुलामगिरीची जाणीव घेऊन जन्मास येणार्‍या समस्त पुरूषांसाठी आम्ही मुक्काम पोस्ट बंगळूरू इथे असताना आमचं लग्न व्हायच्या आधीच मोठ्या दुरदृष्टीने उ. न. क. म्हणजेच 'उपेक्षीत नवरे कमिटी' ह्या अखील भारतीय समितीची स्थापना केली. कारण आमच्याही नाकात वेसण आणि हातात दळणाची पिशवी देण्याचं कुटील कारस्थान घरी शिजत होतंच. न जाणो पुढे मागे आपणांसही गरज पडेल हा हेतूही ह्या संस्थेच्या स्थापने मागे होताच.

आज ह्या कमिटीच्या स्थापनेला अजून एक दिवस पूर्ण झाला. अर्थात लोकांना ह्यात काही विशेष वाटणार नाही पण सचिनने काढलेली प्रत्येक धाव जसा एक नवा विक्रम प्रस्थापीत करते तसंच मावळणार्‍या प्रत्येक दिवसागणिक आमच्या समितीच्या आयुर्मानात भर पडते. अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस संस्थेचे सदस्य जसे लपून छपून भेटतात तसेच आमचेही सदस्य जीव मुठीत घेऊन चोरून भेटतात. अपेयपान करणारी माणसंही आजकाल देवळात शिरल्यासारखी उजळ माथ्याने गुत्त्यात शिरतात आणि आमच्या संस्थेच्या सभासदांवर मात्र असं दिवाभितासारखं जगायची पाळी येते ह्यासारखं दुर्दैव नाही. पण मुळातच मान खाली घालून जगायचं पक्कं ट्रेनींग घरूनच मिळाल्याने आमच्या सभासदांना ह्यात काही विशेष वाटत नाही ही बाब वेगळी.

आज सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आम्ही रोवलेल्या बिजाला पहिला अंकूर फुटला आहे, आमच्या बाळाने पहिला ट्यॅहॅ केला आहे, आम्ही घातलेल्या अंड्याला पहिला तडा गेला आहे. नुकतीच आमच्या उ. न. क. च्या मुंबई शाखेची पहिली बैठक पार पडली. त्यात काही अत्यंत ज्वलनशील मुद्द्यांना हात घालण्यात आला. सामाजिक, आत्मीक, भावनीक अशा सर्व प्रकारच्या जाणीवा जागृत व्हायच्या ह्या काळात आमच्या सदस्यांच्याही जाणीवा, बंद दाराच्या आत का होईना, जागॄत होत आहेत हे पाहून अस्मादिकांस संतोष जाहला. तर, बैठकीत चर्चीले गेलेले काही ठळक मुद्दे मी इथे मांडत आहे.

१ - मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
 - आई म्हणून आपल्या लेकरांवर जिवापाड प्रेम करणारी स्त्री जेंव्हा बायकोच्या भुमीकेत शिरते तेंव्हा हा प्रेमळ स्वभाव अचानक कुठे गायब होतो असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

 - हुंड्याचा प्रश्न सद्ध्या फार बिकट होत आहे. हुंडा दिला नाही म्हणून आमच्या एका सदस्याला त्याच्या बायकोने चक्क स्वतः बनवलेला चहा दिला आणि तो संपवायलाही लावला. ह्या अन्यायाविरूद्ध कुठल्या कलमाखाली तक्रार नोंदवावी? 
 - लेडीज डब्याशेजारच्या डब्यातील लोकांनी बायकांच्या गप्पांचा त्रास होतो म्हणून त्या आवाजवर कडी करण्यासाठी भजनी मंडळ सुरू केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून लेडीज डब्यातील बायकांनी बसल्याबसल्या आपल्या खड्या आवाजात ह्या भजनांचे निरूपण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे, ह्या अशा निरूपण मंडळांबर बंदी आणावी अथवा लेडीज स्पेशल गाड्यांची संख्या वाढवावी अशी आम्ही रेल्वे प्रशासनास विनंती करतो.  
 - सगळीकडे ३३% आरक्षण मागणार्‍या बायका लग्नानंतर काही महिन्यातच घरातल्या एकुलत्या एका बेडचा जवळजवळ ६७% भाग व्यापतात ह्यावर कुणाकडे उपाय आहे का? मोठा बेड घ्यावा हा उपाय विचारात घेतला जाणार नाही. 
 - जेवणाव्यतिरीक्तही नवर्‍यांना तोंड उघडण्याची संधी द्यावी ह्या मुद्द्यावर लवकरच देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. बोलायची सवय नसल्याने ह्या आंदोलनात कुठल्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत, फक्त फलक नाचवले जातील.
 - घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे ह्यासाठी लवकरच जेल भरो सारखं कपाट खाली करो हे देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. आम्ही स्वतः बंगळूरूहून मुंबईस येऊन महिना झाला तरी आमचे कपडे त्याच बॅगांमधून काढतो आणि धुवून आल्यावर घड्या घालून पुन्हा बॅगेत ठेवतो ह्यावरून ह्या समस्येचं गांभिर्य लक्षात यावं.
 - पुरूषांसाठी टिव्ही वर चार दिवस सासर्‍याचे, कारण सासराही कधी काळी जावई होता अशा फँटसी मालिका सुरू कराव्या. 
 - टिव्ही वरून अजून एका मेंबरला एक नवकल्पना सुचून रिमोटवरील म्यूट बटणाचा उपयोग घरातल्या इतर जिन्नसांवर करता येऊ शकेला का ह्यावर संशोधन करायचे ठरले. 
१० - हा कागद वाचून झाल्यावर तो लगोलग नष्ट करून टाकावा. 

तर मित्रांनो, अशा रितीने आपल्या उपेक्षीत नवरे कमिटीच्या मुंबई शाखेचे कामकाज मोठ्या जोमाने सुरू झाले आहे. पुढल्या बैठकीची वेळ, तारीख आणि जागा लवकरच तुम्हाला सांकेतीक भाषेत कळवण्यात येईल. जगलो वाचलो तर भेटूच पुढल्या वेळी.


आपला उपेक्षीत,

ऍडी जोशी