दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला
| Labels: दवणीय अंडी | Posted On 11/2/17 at 7:15 PM
'दवणीय अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्या समस्त गुरुजनांच्या उलट्या पायांना कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले अंडे आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला
फार दिवसांनी परवा कट्ट्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही कार्यमग्न असल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या... अण्णाचे चहाचे ग्लास अजून थोडे खरपूस झाले होते, वडे तळायच्या तेलाने आता ग्रीसची तैलता धारण केली होती, पाखरांची एक अख्खीच्या अख्खी नवी बॅच भिरभिरत होती... पण बाकी सगळं तसंच होतं... अण्णासकट...
पण लवकरच कारण लक्षात आलं. संपर्क कमी झाल्यामुळे आमचे विषय आणि त्यांचे विषय हे समान राहिले नव्हते. जे होते ते जुने झाले होते. त्यामुळे एकेकाळी ज्यांच्यासोबत आम्ही आयुष्यातले अमूल्य क्षण शून्यप्रकारे सार्थकी लावत होतो तेच मित्र आज अपरिचीत वाटत होते. बंड्याला पूर्वी टक्कल होतं की नव्हतं हे आठवेना... भैय्या आमचा ब्रँड विसरला होता...
निघताना सगळ्यांची गळाभेट घेतली आणि किमान आठवड्यातून एक तरी फोन करायचे वचन देऊन त्यांची रजा घेतली. कॉल करेन हे वाक्य मनात अडकून राहिलं होतं. थोडं पुढे गेल्यावर मला जाणवलं... जाणवलं नव्हे... साक्षात्कार झाला... अरे हे असंच आपलं स्वतःच्या बाबतीतही घडतं... आणि आपलंच आयुष्य स्वतःलाच अपरिचीत वाटू लागतं.
आठवा बरं, तुम्ही खास स्वत:साठी असा वेळ शेवटचा कधी काढला होता? तुमच्या आवडी, छंद जपण्यासाठी कधी शेवटची सुट्टी घेतली होती? एकटेच... स्वतःसोबत शेवटचे कधी फिरायला गेलात? एखादा विकेंड धुणी-भांडी केर-वारे बाजूला ठेऊन फक्त स्वतःसाठी जगलात? नाही आठवत ना? खरी मेख इथेच आहे. लोकांसाठी जगताना आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो. अंतर पडत जातं... हळू हळू वाढत जातं... आपल्या आयुष्याबद्दलच्या कल्पना परक्या वाटू लागतात आणि मग आपण दुसर्याच कुणाचं तरी आयुष्य जगतो आहोत ही भावना वारंवार सतावते.
तर मग ज्या प्रकारे आपण मित्रांना कॉल करून चौकशी करतो, खबरबात ठेवतो... त्याच प्रकारे एक कॉल आजच स्वतःला करा. मनाशी संवाद साधा. कुठे काय साचलंय ते बघा... मन मोकळे होऊ द्या... आकाश आपोआप निरभ्र होईल.
अर्धवट वाचलेल्या पुस्तकातला तो बुकमार्क अजूनही तुमची वाट बघत आहे. फक्त एक कॉल करायचा अवकाश आहे. करताय ना मग एक कॉल... स्वतःला?
आपला,
आदि जोशी