बोळा निघाला, पाणी वाहतं झालं :-)

| Labels: | Posted On 10/31/18 at 12:24 PM

मराठी भाषा दिनानिमित्त झी मराठी दिशामधे प्रकाशित झालेला लेख

सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्‍याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस्य आहे.
नवी पिढी मराठीत बोलत नाही, रोजच्या जगण्यातून आणि व्यवहारातून मराठी हद्दपार होत आहे अशी ओरड सुरु आहे. आणि ही ओरड मराठीतच सुरु आहे. पण खरंच तशी परिस्थिती आहे का? काही वर्षांपूर्वी थोड्याफार प्रमाणात होती. आणि आता बर्‍याच प्रमाणात नाही. पण हे जे काही मागच्या काही वर्षात होतं ते मराठी माणसाच्या मराठी विषयीच्या आटत चाललेल्या किंवा पातळ होत असलेल्या मायेमुळे नव्हे.
सामान्यपणे व्यक्त व्हायला गरज असते माध्यमाची आणि पूर्वी ती फारच कमी प्रमाणात उपलब्ध होती. म्हणजे एखाद्याला काही लिखाण करायचं असेल तर डायरी, कवितांची वही ह्या पलिकडे शक्यता नसायची. जगापर्यंत पोचायचं तर काही मासिकं आणि वाचकांचा पत्रव्यवहार हीच साधनं होती, पण ती ०.०१ लोकांनाही सहज उपलब्ध नव्हती. स्वतःला वेगवेगळ्याप्रकारे सिद्ध करून, खपेल असं लिखाण करून, प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढून, पुस्तक विकले जाण्यासाठी नवस बोलून लेखक होणे ही प्रक्रिया अतिप्रचंड वेळखाऊ आहे.
पण काही काळापूर्वी क्रांती झाली. संवाद माध्यमांची क्रांती. आंतरजालाने केवळ माहितीचा रूक्ष स्त्रोत हे स्वतःचे रुपडे पालटून मनोरंजनाचे साधन हा अवतार धारण केल्यापासून लोकांना व्यक्त होण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध झाली. त्यात भर पडली फोनेटिक युनिकोड फाँट्सची. इंग्रजी किबोर्ड वापरून मराठी अक्षरं उमटायला लागल्यावर लोकांच्या प्रतिभेला अक्षरशः नवा बहर आला.
पूर्वी आंतरजालाची भाषा जी मुख्यत्वे इंग्रजी होती ती आता प्रत्येकासाठी वेगळी झाली. सोशल मिडियाने केवळ लोकांना एकत्रच आणले नाही तर त्यांना त्यांच्या भाषेत संवाद साधायचाही पर्याय दिला. आणि हे झाल्यावर जनता सुटलीच. जगाच्या कानाकोपर्यात वसलेल्या मराठी जनांना ह्या www ने मराठी भाषेच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र आणलं.
ह्या जगात वावरणारी लोकं बघितली, नवी पिढी अथवा जुनी, तर एक गोष्ट सहज लक्षात येते की इथे मराठी माणूस मुख्यत्वे मराठीतच व्यक्त होतो. अनेक संस्थाळं, ब्लॉग्स, फेसबुक पेजेस ह्यांनी मराठी माणसाला मराठीतून संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. लोकांना व्यक्त व्हायला आणि त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवायला नवी माध्यमं उपलब्ध झाली. आता एखाद्याला त्याची कथा, कविता, संपादकांकडून साभार परत यायची धाकधूक न बाळगता आपल्या फेसबुक पेज, ब्लॉगवर लगेचच टाकता यायला लागली.
अनेक वर्षांनी माळे साफ करताना एखादी जुनी वही सापडून साक्षात्कार व्हायचा 'अरे, आपली आई किती छान कविता करायची'. मराठीत अशा उत्तम लेखक, कवयित्री असलेल्या अनेक जणी आहेत. पण हे त्यावेळी स्वतःपुरतं मर्यादीत होतं कारण दुसरा पर्यायच नव्हता. मासिकं आणि पेपरवाले तरी कुणाकुणाचं आणि किती छापणार? साहित्य सेवा करायचा उदात्त हेतू असला तरी आर्थिक गणित जुळवताना नवोदितांपेक्षा प्रस्थापितांना झुकतं माप मिळणं स्वाभाविकच होतं. क्षमता असूनही संधी न मिळालेले अनेक लेखक आणि त्यांच्या लिखाणाला डायरीतून बाहेर काढायला ही क्रांतीच कारणीभूत आहे.
महत्त्वाचं म्हणजे 'राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कवणे चालोची नये?' ह्याप्रमाणे प्रत्येकालाच उत्तम लेखक होता येत नसले तरी व्यक्त होणे ही प्रत्येकाचीच गरज असते. त्यामुळे 'सुघटीत लिहिता येत नाही म्हणून लिहूच नये की काय?' ह्या प्रश्नाला सामोरे जायचे बळही सोशल मिडियानेच दिले. वर्तमानपत्र अथवा अजून कुठे लिहून ते लोकांना आवडेल का? लोकं काय म्हणतील? ही भीड चेपली जाऊन नवे प्रयोग करून बघायचा आत्मविश्वास वाढीला लागला. अक्षरास हसू नये टाईप लाज जाण्याची भीती चेपून माझ्या वॉलवर मी न लाजता काहीही लिहेन हा आत्मविश्वास निर्माण झाला. थोडक्यात मुक्तछंदाने अनेक कवींची जी सोय केली तीच सोय ह्या नव्या माध्यमाने लेखकांची केली.
आज मराठी साहित्य विश्वात ही नव्या लेखकांची, नव्या वाचकांची पिढी फार मोठे बदल घडवत आहे. एक वैयक्तीक ब्लॉग लेखक ते प्रत्यक्ष पुस्तकांचे लेखक हा प्रवास बर्‍याच जणांनी परंपरेने चालत आलेल्या पायर्‍या ओलांडून अल्पावधीत पार केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुस्तकांची विक्रीही सुद्धा पूर्णपणे ह्याच माध्यमातून होत आहे. उदाहरणार्थ, आपल्या फेसबुकवरील ललित कथांचे पुस्तक ते भयकथा आणि गुन्हेगारी कथांचे संग्रह प्रकाशीत करणारे सचिन परांजपे ह्यांनी आपले लिखाण लोकांपर्यंत पोचवून आपला स्वतःचा असा वाचक वर्ग ह्याच सोशल मिडियातून उभारला आहे. मंदार जोग ह्यांनीही ह्याच माध्यमाच्या ताकदीचा प्रभावी उपयोग करून आपल्या पुस्तकांचे लेखन, जाहिरात आणि प्रकाशन केले. पुस्तकांच्या अर्ध्याहून अधीक प्रती प्रकाशनापूर्वीच ह्याच माध्यमातून विकल्या. आणि ही दोन केवळ प्रातिनिधिक उदाहरणं झाली.
सार्वजनीक लेखनाचा श्रीगणेशा इथून करणारे जसे अनेक इथे आहेत तसेच नवोदित लेखकांना समजून घेऊन चार युक्तीच्या गोष्टी सांगणारे ज्येष्ठ लेखकही आहेत. लेखकांसोबतच अनेक नवे वाचकही इथे निर्माण झाले कारण त्यांनाही आता साहित्य सहजपणे उपलब्ध होऊ लागले. फेसबुक, ब्लॉग्ज, वेबसाईट्स ह्यांनी लेखक आणि वाचक ह्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर उभे केले. पूर्वी लेख लिहिला तर वाचकांचे पत्र येईपर्यंत तो लोकांना कसा वाटला हे लेखकाला समजायची सोय नसे. आता मात्र लेख वाचला की लगेच तो कसा वाटला हे सांगण्याचीही सोय निर्माण झाली आहे.
आणि एकदा इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठीतून संवाद होऊ लागल्यावर नव्या पिढीली ही आपली भाषा आहे आणि आपणच ती जपायला हवी हे सुद्धा मनापासून पटले. त्यामुळेच स्वतःच्या ब्लॉगवर आवर्जून फक्त आणि फक्त मराठीतच लिहिणे असो की मराठी दिनानिमित्त वाचक कट्टे भरवणं असो, सगळं काही इथे नव्याने सुरू झालं. नवी पिढी भलेही जुन्या पिढीसारखं खिडकीत बसून कादंबर्‍या वाचत नसेल, पण ह्या आंतरजालाच्या खिडकीत आवर्जून मराठीच वाचली जाते.
अर्थात ह्या सगळ्या मंथनातून सुंदर सुप्रभातचे रतीब घालणारे, J1 झालं का? च्या जिलब्या पाडणारे, बॅनर मंत्री, मीम सम्राट अशी रत्नही बाहेर आली हा वेगळा भाग. पण लोकं मराठीत लिहिती झाली, बोलती झाली ही फार मोठी गोष्ट आहे. लोकं आपल्या मातॄभाषेत व्यक्त होऊ लागली. संवादाच्या माध्यमाचा बोळा निघाला, पाणी वाहतं झालं.
-
आदि जोशी

थंडी गॉन… घाम ऑन!!!

| Labels: | Posted On at 12:19 PM

चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो?
लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही. पण आजकाल कसलाच भरवसा राहिला नाही हेच खरं.
काही गोष्टींसाठी मुंबईकर एकदम अनप्रिपेअर्ड असतात. उदा.: पहिल्याच रिक्षा/टॅक्सी चालकाने आपल्यालं हवं तिथे यायला हो म्हणणे, कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळी ट्रेन रिकामी दिसणे, फुटपाथवर चक्क चालायला जागा असणे... ह्यातच थंडी अनुभवणे ह्या गोष्टीचा समावेश आहे. मुंबईकरांनी थंडीची अजिबात म्हणजे अजिबातच सवय नाही. नाही म्हणजे इतकी नाही की मुंबईकरांचे एसी सुद्धा कधी २०-२२ डिग्रीच्या खाली चालत नाहीत.
जगबुडी होत असताना मुंबईकर अगोचरपणा करून पाण्यातून चालत घरी जातील, रॅकवर ठेवलेल्या बॅगेत बाँब असू शकतो ही सूचना ऐकत उभ्या उभ्या झोप काढतील, इतकंच नव्हे तर ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर घाबरत नाही कारण 'वॉर्मींग झालंच तर फार फार तर अजून थोडा घाम येईल, त्यात काय...'.
पण... पण... पण... थंडीत करायचं काय हे मात्र त्यांना कळत नाही. पंखा लावायचा नाही तर झोप कशी येणार? गरम हवा खोलीभर फिरवण्यासोबत मुंबईतल्या पंख्याचे मुख्य काम म्हणजे एका लईत आवाज करून माणसांना गाढ झोपवणे. ही अंगाई बंद झाल्यापासून झोपही उडाली.
असे एकंदरीत कठीण दिवस सुरू होते. खिशातले रुमाल कोरडे राहत होते. पंख्यावर जळमटं साठत होती. 'फिलींग कूल इन मुंबई' असे अपमानास्पद हॅशटॅग फिरवले जात होते. 'मुंबईत ॠतू दोनच' हे ब्रह्मवाक्य बदलावं लागतं की काय अशी वेळ आली होती. स्वतःच्याच घरात 'बबन चड्डी आणि बनियान' ह्या जागतीक युनिफॉर्मवर वावरायची सोय राहिली नव्हती. स्वेटर, शाली, दुलया ह्या शोभेच्या वस्तूंची घडी मोडावी लागते की काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कॄपेने शेवटी आज तो आलाच.
ऑफिसला जात असताना कानामागून ओघळणारा, आपण मुंबईतच असल्याची खात्री पटवणारा, माझा नवसाचा घामाचा थेंब.

-
अट्टल मुंबईकर,
आदि जोशी