बंड्याची शाळा - धडा चौथा

| Labels: | Posted On 5/17/09 at 8:47 PM

बंड्याची शाळा
(धडा चौथा - परीक्षा)



मी माझ्या आयुष्यात परीक्षेला कधीच घाबरलो नाही. मला फक्त रिझल्टची भीती वाटायची. पण कष्टाविण फळ नाही ह्या सुविचारानुसार सुट्टी हवी असेल तर परीक्षा द्यावीच लागायची. मास्तर एक एक धडा दोन दोन तासात उडवू लागले की कळायचं परीक्षा जवळ येतेय. पाचवी पर्यंत धड्याखाली दिलेल्या प्रश्नावलीतूनच पेपरसाठी प्रश्न निवडले जात. त्या नंतर त्रास सुरू झाला. मुलांना विषयाची जाण किती आहे हे समजून घेण्याचे वायफळ प्रयत्न सुरू झाले. रट्टा मारून पुस्तक पाठ होतं पण विषय समजत नाही हे कळायला मला फार उशीर झाला. परीक्षा येतेय येतेय म्हणता म्हणता एके दिवशी बोर्डावर परीक्षेचं वेळापत्रक लागायचं. वेळापत्रक लागलं की मुलं अभ्यासाचं प्लॅनिंग करायला सुरुवात करायचे. आम्ही शेवटचा पेपर कधी आहे हे पाहून सुट्टीत काय करायचं ह्याचं प्लॅनिंग करायचो.

इतक्या वर्षात हे वेळापत्रक पाहून खूश झालेला एकही विद्यार्थी मी पाहिला नाही. कुणाला मराठीचा पेपर पहिला हवा असायचा, कुणी गणित शेवटी म्हणून नाराज, कुणाला इतिहासापासून सुरुवात हवी असायची, एक ना दोन. मी आणि माझा कंपू मात्र 'वा, काय झकास टाइम टेबल आहे' असं म्हणून लोकांच्या दु:खावर डागण्या द्यायचो. कुणी तरी आश्चर्यचकित होऊन विचारायचं 'तुला मराठीचा पेपर पहिला चालेल?' उत्तर मिळायचं 'हो, माझा सगळा अभ्यास झालाय...' ह्या सगळ्या गडबडीत वेळापत्रक उतरवून घ्यायचं हमखास विसरायचो. आपण कितीही बोललो, निषेध व्यक्त केला तरी वेळापत्रक बदलणार नाही हे माहिती असल्याने 'आलिया भोगासी असावे सादर' ह्या सल्ल्याचं पालन करायचो.

नाही म्हणायला नववीत असताना सहामाही परीक्षेच्यावेळी वेळापत्रकात बदल होईल का असं मास्तरांना विचारायला गेलो होतो. पहिला पेपर भुगोलाचा होता, तो शेवटी असावा असं सगळ्यांचं मत पडलं. पण हे मास्तरांना सांगणार कोण? मुलांनी आप-आपसात बरीच चर्चा केली. ह्या चर्चेत आम्हाला अजिबात इंटरेस्ट नव्हता, तरी गंमत म्हणून तिथे बसलो होतो. शेवटी सगळ्यांनी परस्पर माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं. माझं नाव पुढे आलं ह्याची कारणं 'तू बिंधास्त आहेस' पासून 'तुला मार खायला काही वाटत नाही' इथपर्यंत अनेक होती. तर, हो नाही हो नाही करता करता तयार झालो. वर्गातून मोठ्या धीटपणे बाहेर पडलो, मनातून मात्र पार घाबरलो होतो. टिचर्स रूम मध्ये गेलो. टिचर्स रूम मला कायम एखाद्या डाकूच्या अड्ड्यासारखी वाटायची. डाकू कसे गावोगाव फिरून, गावकर्‍यांन लुटत, चोपत अड्ड्यावर परत येतात आणि सरदाराला सलामी देतात, तसंच काहीसं. सगळे शिक्षक आपापल्या वर्गातून विद्यार्थ्यांना बदडून, चोपून मुख्याध्यापकांना सलामी द्यायला इथे येतात असं वाटे. मग ते आपल्या पुढच्या हल्याविषयी इतर डाकूंशी सल्ला मसलत करत.

असो. तर, मी मोठा धीर करून टिचर्स रूमच्या दरवाज्यापाशी गेलो. सगळ्या शिक्षकांनी एकदम माझ्याकडे बघितलं.
आवंढा गिळून म्हणालो 'सर...'
तीन चार जणांनी 'काय रे???' म्हणून दरडावलं.
पुन्हा एक आवंढा 'सोनावणे सर...'
माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत सर म्हणाले 'काय रे???'
सर जरा बोलायचं होतं...
बोल की मग...
सर, भुगोलाचा पेपर शेवटी ठेवता येईल का?
का?
असं सगळे म्हणतायत...
कोण म्हणतंय असं???
सगळे...
नावं सांग...
सर, सगळ्यांची नावं कशी सांगू???
शहाणपणा करू नकोस. सतीश, जा रे नववीच्या वर्गातून ४-५ मुलांना घेऊन ये...
शेवटच्या बाकावरची का?...
कुठचीही आण रे...
नुसती मुलंच आणू की १-२ मुलींनाही घेऊन येऊ...
अरे जा आता नाही तर कानफटवीन...

सतीश आमच्या वर्गातून २ मुली, एक बरीच वर्ष नववीत असलेला मुलगा आणि एक हुशार मुलगा अशी व्हेरायटी घेऊन आला. मी तिथेच असल्याने अजून एक 'ढ' मुलगा आणायची त्याला गरज वाटली नसावी. सगळे हलाल व्हायला आल्यासारखे आले.

काय रे...
काय सर...
भुगोलाचा पेपर शेवटचा हवाय का?

हे वाक्य सरांनी अशा जरबेने विचारलं की सगळ्यांनी एकजात हात वर केले. मी अडकलो. नशिबाने मला मार खायला काही वाटायचं नाही म्हणून बरं. एकदा मी पिटीच्या सरांना विचारलं होत 'सर नेहमी नेहमी त्याच त्याच मुलांना मारून तुम्हाला कंटाळा नाही का हो येत?'

तर, परीक्षेचं वेळापत्रक लागलं की मुलांची धावपळ सुरू व्हायची. आम्ही निवांत असायचो. आमच्या शाळेतली बरीच मुलं माझ्याच सोसायटीत राहत असल्याने वेळापत्रक लागल्यानंतर मैदान ओस पडायचं. ह्या दिवसात अख्खं मैदान आम्हाला मिळायचं. पण घरच्यांना आमच्या परीक्षेची काळजी आमच्यापेक्षा जास्त असल्याने हे सुख फार काळ टिकायचं नाही. त्यानंतर सुरू व्हायचा अभ्यास नावाचा एक दिव्य प्रकार.

सर्वात आधी आमचं संध्याकाळचं खेळणं आणि टीव्ही बंद व्हायचा. त्यामुळे अभ्यास करावा लागतो ह्या पेक्षा दंगा करता येत नाही ह्याचं दु:ख फार असायचं. मला रात्री जागणं आणि भल्या पहाटे अभ्यासासाठी उठणं कधीही जमलं नाही. सतत डुलक्या यायच्या. 'ट्रीपला जाताना कसा रे उठतोस स्वतःहून' 'अगं ती ट्रीप असते...' ' मग आताही ट्रीपला जायचंय असं समजून ऊठ आणि ट्रीपला न जाता अभ्यासाला बस.'

मला मनात कुठे तरी आशा होती की आई वैतागून मला अभ्यास करायला लावण्याचा नाद सोडून देईल. पण तसं काही झालं नाही. मी कितीही प्रयत्न केले तरी त्याना न जुमानता आई दामटून अभ्यासाला बसवायची. शाळा आणि कॉलेज अशा १५ वर्षात अभ्यासावरून मी आईचं किमान १५,००० लीटर रक्त आटवलं असेल. माझ्याकडून अभ्यास करून घ्यायची आईची चिकाटी भन्नाट होती. मोठा भाऊ बिचारा साधा सरळ होता. पहिल्या हाकेला उठायचा. सगळं आवरून १५ मिनिटात अभ्यासाला सुरुवात. त्याची अभ्यासाला सुरुवात झाली तरी मी आपला तोंडात ब्रश धरून बेसिन समोर पेंगत उभा असे. हे बघून आई जोरात 'हं...' असं ओरडायची. मग कसा बसा रंधा मारून चूळ भरून चहा प्यायला बसायचो. चहा पिऊन तरतरी येते हा शोध ज्याने कुणी लावला त्याला धरून बदडायला हवं. कारण चहा पिऊनही झोप कशी येते असं ऐकवून मला बदडण्यात येत असे. मग कसा बसा डुलकत डुलकत अभ्यास सुरू व्हायचा. गालातल्या गालात हसत दादा गंमत बघत असायचा. मधून मला जाग येण्यासाठी मोठ्याने वाचायला सुरुवात करायचा. झोपमोड झाली की आपण अभ्यासाला बसलो असून त्या वेळी झोपत आहोत हे विसरून आमची मारामारी सुरू व्हायची. पुन्हा मार, पुन्हा अभ्यास.

पाढे, सनावळ्या, तहाची कलम ह्या सगळ्यांना त्रास देणार्‍या गोष्टींनी मलाही छळलं. सगळ्यात जास्त धडकी भरवणार विषय म्हणजे गणित. त्यात त्याला आठवी नंतर भूमितीची जोड मिळाली नी त्याची न्युसंस व्हॅल्यू अजूनच वाढली गणितं न सोडवता आल्याने वर्गात सरांचा प्रचंड मार खाल्लाय. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी तर वेगळीच गंमत असायची. मला गणिताचा (आणि इतर कुठलाही) पेपर लिहायला कधीही तासापेक्षा जास्त वेळ लागला नाही. मग त्यानंतर टिवल्या बावल्या सुरू व्हायच्या. मास्तर आपले डोळे मोठे करून धाकात ठेवू पाहायचे. त्यात मधूनच तहान, लघुशंका इत्यादी कारणांसाठी सतत वर्गाबाहेर पडायला बघायचो.

अनेक वर्ष मला परीक्षा का घेतात हेच कळत नव्हतं. ह्याच प्रमाणे परीक्षेच्या वेळी पाचवीला पुजलेली झोप, शेवटचा पेपर देऊन येताच कुठे गायब होते हे ही कळत नसे. तर, अनेक वर्ष मला परीक्षा का घेतात हेच कळत नव्हतं. कारण एक दोन अपवाद वगळता दर वर्षी वर्गात तीच मुलं दिसायची. मास्तरांनी शिकवावं आणि मुलांना विचारावं 'कळलं का रे मुलांनो?' हो असं उत्तर आलं तर पुढच्या वर्गात पाठवावं. सिंपल. कशाला मुलांना अभ्यास करायचे आणि मास्तरांना पेपर तपासायचे कष्ट द्यायचे? पण आयुष्य इतकं सरळ नसतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मास्तरांना काही तरी उद्योग हवा म्हणून पेपर तपासण्यासाठी परीक्षा घेतात असंही मत आमच्या वर्गात एकाने व्यक्त केलं होतं.

शाळेतल्या सगळ्या परीक्षा व्यवस्थित पार पडल्या, घरच्यांच्या (आणि शाळेच्याही) सुदैवाने कुठल्याही इयत्तेत मुक्काम न ठोकता वेळच्यावेळी शाळेतून बाहेर पडलो. पहिली ते नववी असे सुखाचे दिवस घालवल्यावर आयुष्यातलं सर्वात वाईट वर्ष माझ्या आयुष्यात आलं. दहावी.

Comments:

There are 3 comments for बंड्याची शाळा - धडा चौथा