क्रॉसवर्ड (अंतिम)

| Labels: | Posted On 9/15/09 at 11:25 AM

रवी कसाबसा त्याच्या रूमवर पोचला. घामाने अक्षरशः निथळत होता. आता उद्या दुपारपर्यंत न थांबता त्याने तडक शिरवाळकरांची भेट घ्यायचे ठरवले आणि लगेच निघून तो शिरवाळकरांच्या बंगल्यावर पोचला. त्याला आलेला बघून दोघांनाही आनंद झाला, पण त्याची अवस्था बघून त्यांना कळलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर शशी शिरवाळकरांची स्टडी होती, त्यांनी तिथेच बसून बोलायचे ठरवले. कुणीही आलं तरी वर न सोडण्याचे आणि कुणाचाही फोन न देण्याचे आदेश नोकरांना देण्यात आले. स्टडीमधे गेल्यावर रवीने त्यांना थोडक्यात गजानन शिरवाळकरांची हकीकत सांगितली, क्रॉसवर्ड दाखवले आणि मानेच्या मृत्यूपर्यंत सगळी कहाणी सविस्तर सांगितली. एक क्षण विचार करून शशी शिरवाळकरांनी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवायचे ठरवले. त्यांच्या पोलिसांत आणि राजकारण्यांत अर्थातच बर्‍याच ओळखी होत्या. पण रवीने त्यांना थांबवले 'आज शेवटचा दिवस आहे आणि मला नाही वाटत तो इथे यायचं धाडस करेल'. रवीचं वाक्य संपतंय न संपतंय तोच धाड् धाड् धाड् गोळ्या झाडण्याचा आवाज आला.

***

शशी शिरवाळकर - बिचारा रवी. दैवाने कुठल्या वळणावर आणून ठेवलंय त्याला. बाबांच्या चुकीमुळे गजानन काकाच्या कुटुंबाची वाताहात झाली. आता तीच चूक तिसर्‍या पिढीलाही भोवते आहे. पण ह्या निमित्ताने का होईना, त्याने माझ्याशी संपर्क साधला. गजानन काकाचा खून झाला नाही हे ऐकून मनावरून मणभराचे ओझे उतरल्यासारखे झाले. एकदा का तो घरी आला की त्याच्या जिवाला धोका नाही. मी आहे समर्थ सगळं बघून घ्यायला. पण इतक्यात यायचं नाही असं का म्हणाला हे मात्र कळलं नाही. घाईघाईत त्याचा नंबरही घेतला नाही. आता कधी भेट होईल देवच जाणे.

विजय शिरवाळकर - गजानन आजोबांचा नातू जिवंत आहे हे कळल्यावर बाबांना किती आनंद झाला. होणारच. मलाही झाला. आमच्या कपाळावरचा कलंक पुसला गेला. आता मी आणि रवी मिळून शिरवाळकर घराण्याची कीर्ती अजूनच वाढवू. आता वाट बघतोय रवीच्या येण्याची. आजोबांच्या पापाचं प्रायश्चित्त घेण्याची ही चांगली संधी आहे.

किलर - अरे असा कसा निसटला. साल्यांनो भांग पिऊन गेला होतात का पाठलागावर? एका माणसावर लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला? आणि दुसरा कोण होता त्याच्या सोबत? आत्ताच्या आत्ता निघा आणि पत्ता लावल्या शिवाय परत येऊ नका. सालं, नरसोबाला अभिषेकाची संधी अशी चालून येईल वाटलं नव्हतं. काही दिवसापूर्वी त्या रवीला स्वप्नातही वाटलं नसेल की कुणीतरी लवकरच त्याच्या जिवावर उठेल. मला तरी कुठे कल्पना होती की तो जिवंत आहे. एके दिवशी फोन आला आणि त्याची सुपारी देण्यात आली. की मला माझं ऋण चुकवायची संधी मिळणार आणि वर त्याचे पैसेही मिळणार. व्वा... देव भलं करो त्याचं.

***

रविवारी सगळ्या वर्तमानपत्रांत एकच बातमी होती:
"प्रसिद्ध व्यावसायिक, कारखानदार शशी शिरवाळकर आणि त्यांच्या मुलाची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या. शशी शिरवाळकरांचा पुतण्या जबर जखमी. खुन्याचा मृतदेहही तिथेच सापडला".

""काल रात्री शिरवाळचे प्रसिद्ध कारखानदार आणि समाजसेवक श्री. शशी शिरवाळकर आणि त्यांचे सुपुत्र श्री. विजय शिरवाळकर ह्यांची त्यांच्या बंगल्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी तिथे हजर असलेला त्यांचा पुतण्या रवी शिरवाळकर जबर जखमी झाला. शिरवाळकरांवर गोळ्या झाडणारा इसमही तिथेच मृतावस्थेत पोलिसांना आढळला. पूर्व-वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्री साधारण १२:३०-१ च्या सुमारास शिरवाळकरांच्या रूम मधून गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यावर सगळे नोकर तिकडे धावले. दार आतून बंद असल्याने काही करता आले नाही. एका नोकराने लगोलग पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस आल्यावर त्यांनी दार तोडून आत प्रवेश मिळवला, तेव्हा त्यांना हे धक्कादायक दृश्य दिसले. रवी शिरवाळकर ह्यांना तातडीने इस्पितळात हलवल्याने त्यांचा जीव वाचला असे सूत्रांचे म्हणणे आहे. रवी शिरवाळकरांच्या शरीरातून एकूण २ गोळ्या काढण्यात आल्या. मा. आमदार श्री. सदानंद मोहिते ह्यांनी प्रकरणाची कसून चौकशी करायचे आदेश पोलिस दलास दिले आहेत.""

***

इन्स्पेक्टर अमर - फोन आला तेव्हा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. शिरवाळकरांसारख्या देव माणसाची कुणी हत्या करेल स्वप्नातही आले नव्हते. आयुष्यभर लोकांसाठी काम करणार्‍या माणसाचा कोणी शत्रू कसा असू शकतो? रवीच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवरून ह्या प्रकरणाचा उलगडा झाला. तीन पिढ्यांनंतरही हे वैर चालू ठेवण्याची काय गरज होती. घेतलेले पैसे सव्याज परत देऊन प्रकरण मिटवता नसतं का आलं? म्हणे देवाचा कोप झाला. अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवल्याने एका देव माणसाला मात्र हकनाक जिवाला मुकावं लागलं. ह्या सगळ्या प्रकरणात त्या मानेला मात्र विनाकारण जीव गमवायला लागला. तसंही अशा माणसांचा शेवट असाच होणार म्हणा. आयुष्यभर अंडरवर्ल्डसाठी काम केलं ह्या माणसाने. आत्ताच काय गरज होती रवीच्या मदतीला धावायची? त्याचा ड्रायव्हर पण हेच म्हणाला. फुकट जीव गमावला त्याने. किती जणांचे पैसे घेऊन बसला होता देव जाणे. त्या बिचार्‍या रवीला पण कसलं अडकवलं होतं त्या रामोश्याने. चिठ्ठी, क्रॉसवर्ड, पाळतीवर माणसं... दुसरा कुणी असता तर भीतीने हार्ट अटॅकच आला असता. नशिबानेच वाचला तो. शुद्धीवर आल्यावर त्याला विचारलं पाहिजे तिथे नक्की काय झालं? बिचारा, इतक्या वर्षानंतर काकांना भेटला आणि हे असं घडलं. जाऊन सांत्वन करायला हवं.

***

दुसर्‍या दिवशी रवी शुद्धीवर आला. नशिबाने गोळ्या जिव्हारी लागल्या नव्हत्या. एक हाताला आणि एक पायाला. रक्तस्त्राव खूप झाला. थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर रवी खडखडीत बरा झाला. शिरवाळकर घराण्याचा एकमेव वारस म्हणून लोकांच्या त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण रवीला हा सगळा ताण असह्य झाला होता. बरा झाल्यावर त्याने शिरवाळकरांची शेती, फॅक्टरी इत्यादी सगळी इस्टेट विकून टाकली. राहता बंगला मात्र पूर्वजांची आठवण म्हणून ठेवला. आणि काकाने गजानन आजोबांच्या नावाने सुरू केलेला दवाखान्यासोबतच, गावात एक नवीन शाळाही काढली काकाच्या स्मॄती प्रित्यर्थ.

***

रवी शिरवाळकर - सुटलो एकदाचा. मला वाटलं ह्यातून सही सलामत निघतोय की नाही. च्यायला ह्या मानेच्या. साला फारच सीरियसली मदत करायला गेला. म्हणे ह्या सगळ्याच्या मागे वेगळंच कुणीतरी आहे. कुणी सांगितलं होतं नको तिथे नाक खुपसायला. मला त्याला फक्त साक्षीदार म्हणून वापरायचा होता. बेट्याची चांगलीच ओळख होती पोलिसांत. रहस्याच्या नको इतका जवळ पोचला आणि संपला. नशीब त्यावेळी त्याचा ड्रायव्हर कम बॉडीगार्ड राजा सोबत नव्हता.

सालं, भिकार्‍यासारखं जगून जगून कंटाळा आला होता. ठरवलं जे माझं आहे ते मिळवायचंच. बाबांनी गजानन आजोबा आणि श्रीधर आजोबांची गोष्ट सांगितली होतीच. त्याची उत्तरकथा लिहिली आणि वापरली. काँट्रॅक्ट किलर पकडला एक, नी रचला सगळा बनाव. सालं, स्वतःच्याच घरी चोरी करवण्यापासून ते स्वतःला गोळ्या मारून घेण्यापर्यंत सगळं कसं प्लॅन प्रमाणे सुरळीत पार पडलं. जागोजागी मला फसवल्याचे पुरावे पण सोडले. काकाचंच अकाउंट हॅक करून पैसे काढले ह्या प्लॅनसाठी. शेवटच्या दिवशी बोलावलं त्या किलरला काकाच्या घरी. त्याला वाटलं पैसे देतोय. आधी त्याच्या गनने काकाला नि मुलाला उडवला आणि मग माझ्या गनने त्या किलरला.

पूर्ण भरलेले क्रॉसवर्ड रवीने डस्टबीन मधे भिरकावले. चौथा शब्द होता "परतफेड"...


समाप्त

क्रॉसवर्ड ३

| Labels: | Posted On 9/14/09 at 12:37 AM

स्टेशनवर रवीशिवाय दुसरे कुणीच नव्हते. नाही म्हणायला एक भिकारी बाकाखाली झोपला होता. आणि दूर कुठे तरी गस्तीच्या पोलिसाने काठी आपटल्याचा आवाज येत होता. जसजशी गाडी जवळ येत होती तसतशी रवीच्या हृदयातील धडधड वाढत होती. रवीने पँटच्या खिशात हात घातला. सेफ्टीसाठी तो एक छोटासा बटन नाईफ कायम सोबत ठेवत असे. तो हाताला लागल्यावर त्याला जरा धीर आल्यासारखं झालं. तितक्यात इथून सुटणार्‍या गाडीने जोरात शिट्टी वाजवली. रवी बरोब्बर घड्याळाच्या खाली उभा होता. गाडी येऊन थांबली, काही तुरळक प्रवासी उतरले, पांगापांग झाली. गाडी गार्डात निघाली. काहीही घडलं नाही. तिथून सुटणार्‍या गाडीने पुन्हा एकदा शिट्टी वाजवली आणि गाडी हलली. गाडी हळूहळू पुढे जात असतानाच त्याचं लक्ष समोरच्या डब्याकडे गेलं. आणि त्यावर काही तरी लिहिलेलं त्याला दिसलं. नुकतंच लिहिलं होतं, कारण रंग ओघळत होता. गाडीसोबत धावत धावत त्याने वाचलं 'मला दिलंत तर वाढवून देईन, घेतलंत तर वाढवून घेईन. जे द्याल ते सुरक्षित ठेवीन'. च्यायला क्लू देण्यासाठी इथे बोलवायची काय गरज होती असा विचार करत असतानाच त्याला अक्षरांच्या बाजूला काहीतरी चिकटवलेलं आढळलं. थोडं पुढे जाऊन पाहिल्यावर लक्षात आलं की ते एक तिकीट होतं. गाडीने वेग वाढवला. रवीने घाईघाईत तिकीट खेचून काढलं आणि गाडीत उडी मारली. तिकीट दादर पर्यंतचं होतं.

गाडीत बसल्या बसल्या रवीने विचार करायला सुरुवात केली. गाडीत चढून आपण चूक तर नाही केली ना. त्याने मानेला फोन लावला. माने कधी पासून त्याला फोन लावायचा प्रयत्न करत होता पण फोन लागत नसल्याने तो तिकडे टेंशनमधे आला होता. 'मी चौकशी केली ह्या माणसाची. प्रोफेशनल किलर आहे. पिढीजात धंदा आहे हा त्याचा. तू प्लॅटफॉर्मवर येणार हे मला माझ्या माणसांकडून कळले होते. आता नीट ऐक. तुझ्या कंपार्टमेंटमधे पुढच्या दरवाज्यावळ त्याची दोन माणसं बसली आहेत. ' 'काय??? ' 'हो, पण टेंशन नको घेऊस. माझा एक हत्यारबंद माणूस काल पासूनच तुझ्या पाळतीवर मी ठेवला होता, कदाचित तू नोटीस केलं नसशील पण तू उभा होतास त्याच्या जरा पुढेच एका बाकाखाली तो भिकार्‍याच्या वेषात पडून होता. तो ही चढलाय डब्यात आणि पुढून चौथ्या बाकावर झोपलाय. टेंशन घेऊ नकोस. मला अंदाज आलाय पुढे काय होणार ह्याचा. मी आत्ता मुंबई सेंट्रलला आहे. तुला दादरला भेटतो. मी आल्याशिवाय गाडीतून उतरू नकोस. '

पुढचा तासभर रवी ठोकळ्यासारखा बसून होता. दरवाज्याजवळ जाऊन अथवा वाकून बघायचंही धैर्य त्याला झालं नाही. दादरला गाडी प्लॅटफॉर्ममधे शिरताच माने उडी मारून गाडीत चढला आणि क्षणार्धातच रवीला सोबत घेऊन चालत्या गाडीतून उतरला. स्टेशनबाहेर मानेची कार उभी होती. त्यात दोघे बसले.

- दुसरा क्लू सापडला?

- हो, गाडीच्या डब्यावर लिहिलं होतं 'मला दिलंत तर वाढवून देईन, घेतलंत तर वाढवून घेईन. जे द्याल ते सुरक्षित ठेवीन'

- ह्म्म्म्म... काय असू शकेल?

- कल्पना नाही...

- बरं, तू कर विचार. आता आज पासून आपल्याकडे चारच दिवस आहेत. शिरवाळकरांचा नंबर शोधलास का तू?
- नाही, वेळच मिळाला नाही.

- बरं, मी पण शोधतो. आता तू इथे उतर, आपला काँटॅक्ट आहे हे कुणालाही कळता कामा नये.

- हो

- तुझं कोणी जवळचं नातेवाईक आहे का?

- नाही का?

- गर्लफ्रेंड वगैरे?

- नही हो...

- गुड. नाही तर हा माणूस शेवटचा उपाय म्हणून त्यांचं अपहरण करायची शक्यता होती. असो. टच मधे राहा आणि कुठलंही पाऊल उचलायच्या आधी मला सांग...

- सापडलं...

- काय?

- दुसरा शब्द सापडला...

- काय, लवकर सांग...

- 'मला दिलंत तर वाढवून देईन, घेतलंत तर वाढवून घेईन' ह्याचा अर्थ बँक...

- म्हणजे???

- पैसे ठेवले तर वाढतील, घेतले तर व्याजासकट जास्त परत द्यावे लागतील...

- आणि 'जे द्याल ते सुरक्षित ठेवीन' म्हणजे काय?

- कदाचित लॉकर. जे द्याल ते सुरक्षित ठेवीन म्हणजे लॉकरच.

- शाब्बास... पण मुंबईत शेकडो बँका आहेत, नक्की कुठली...

- ज्या डब्यावर हे लिहिलं होतं तो अख्खा डबा फॉर्चून मेकर बँकेच्या जाहिरातींनी रंगवला होता. नक्कीच ही फॉर्चून मेकर बँक आहे, दुसरा शब्दही ६ अक्षरीच आहे... मी जातो बँकेत आत्ता...

- बरं, काही कळलं तर लगेच माझ्याशी काँटॅक्ट कर...

- नक्कीच...

- राजा गाडी थांबव...

दोघांचं बोलणं होईस्तोवर गाडी शिवाजी पार्कला फेर्‍या मारत होती. एका गल्लीत राजाने गाडी थांबवली. रवीने उतरण्याआधी आजूबाजूला बघितलं. गल्ली सुनसान होती. रवीला सोडून माने निघून गेला. चालत चालत रवी विचार करत होता 'ह्या कुठल्या लफड्यात अडकलो यार. ह्या गाढवाने क्रॉसवर्ड असं काय बनवलंय. १ उभा १ आडवा ऐवजी, १ उभा २ आडवा ३ उभा ४ आडवा. १ उभा प्लॅटफॉर्म, २ आडवा फॉर्चून मेकर. पुढचे शब्द कधी सापडणार, आणि मी कधी सुटणार ह्यातून? शिरवाळकरांशी काँटॅक्ट करायला हवा. पण त्यांनी ओळख नाही दाखवली तर? आणि त्या आधीच ४ दिवस संपले तर? शी:...

आत्ता कुठे ६ वाजत होते. बँक उघडायला अजून २ तास होते. तोवर रवीने शिरवाळकरांचा फोन नंबर शोधायचं ठरवलं. नशिबाने जवळच एक २४ तास सुरू असणारं कॉफी शॉप होतं.

***

शेवटी एकदाचा नंबर मिळाला.

- हॅलो... शशी शिरवाळकर आहेत का?

- मी त्यांचा मुलगा बोलतोय, विजय... आपण कोण?

- मी... मी... रवी शिरवाळकर, गजानन शिरवाळकरांचा नातू...

- काय??? गजानन आजोबांना नातू होणं कसा शक्य आहे? त्यांचा बायकोमुलासकट खून करण्यात आला होता...

- काका, माझ्यावर विश्वास ठेवा... मी खरंच तुमच्या चुलत भावाचा, निरंजन शिरवाळकरांचा मुलगा आहे. रवी शिरवाळकर...

- अरे पण तू बोलतोयस कुठून??? बाबा... बाबा...

- कोण बोलतंय?

- मी गजानन शिरवाळकरांचा नातू रवी शिरवाळकर

- काय??? कुठून बोलतोयस तू???

- मुंबईतून...

- पण हे कसं शक्य आहे???

- माझ्यावर विश्वास ठेवा काका...

- इतकी वर्ष कुठे होतास?

- सांगतो काका... पण मला अजून महत्त्वाचं काही तरी बोलायचंय...

- तू आत्ताच्या आत्ता इथे निघून ये... मी मुंबईतल्या आपल्या मॅनेजरला सांगतो, तो सगळी व्यवस्था करेल...

- नाही काका, आपला संपर्क झालाय हे सद्ध्या तरी कुणालाही कळता कामा नये... मी लवकरच तुम्हाला भेटीन...

- अरे झालंय तरी काय? इतका टेंशन मधे का वाटतोयस? नीट सांगशील का???

- सांगतो...

***

८:१५ झाले तसे रवी बिल देऊन बाहेर पडला. बँक उघडली होती. रवी सरळ आत शिरला. लॉकर विभागाची चौकशी केली. एक माणूस रवीला स्ट्राँग रूम कडे घेऊन गेला. वळला. दरवाज्यापाशीच एक इलेक्ट्रॉनिक लॉक होते. त्यावर एक कोड टाकायचा होता. रवीने क्षणभर विचार केला, दीर्घ श्वास घेतला आणि कोड दाबला ०३१०. code accepted असा मेसेज आला आणि स्ट्राँगरूमचे दार उघडले. आत बसलेल्या माणसाने काही न बोलता रवीला एक चावी दिले आणि स्वतः रूमच्या बाहेर गेला. चावीवर नंबर होता १००४. रवीने लॉकर उघडला. आत मधे केवळ प्लॅस्टिकचे एन्व्हलप आणि एक गन होती. रवीने शांतपणे एन्व्हलप खिशात टाकले, गन पँटमधे मागच्या बाजूला खोचली आणि बाहेर पडला. बाहेरच्या फुटपाथवर मगाशी प्लॅटफॉर्मवर झोपलेला भिकारी भीक मागत होता. रवी त्याच्याकडे बघून हसला आणि काही सुट्टे पैसे त्याच्या भांड्यात टाकले. रवीने मानेला फोन लावला...

- माने लॉकर मिळाला...

- गुड...

- आत एक एन्व्हलप आणि गन सापडली...

- काय? एन्व्हलप मधे काय आहे?

- उघडलं नाही अजून... दुसरं म्हणजे शशी शिरवाळकरांशी संपर्क झालाय...

- अरे वा...

- त्यांनी लगेच भेटायला बोलावलंय... मी इतक्यात नाही असं सांगितलं...

- गुड... पण आपणच लगेच शिरवाळला निघायला हवं... मी तुला १० मिनिटात सोडलं तिथून उचलतो...

- ओके...

चालता चालता रवीने एन्व्हलप उघडले. आत एक पासबुक होते. ते उघडताच रवी जागच्या जागी थिजला. पासबुकवर नाव होते 'रवी शिरवा़ळकर'.

***

बाजूला मानेची गाडी येऊन थांबल्याचंही त्याला कळलं नाही. मानेनी जवळ जवळ ओढूनच त्याला आत बसवला. काही न बोलता रवीने त्याला पासबुक दाखवले. पासबुकवर त्याने नाव बघून मानेही गडबडला. आतली रक्कम बघून तर उडालाच...

- तुझ्या अकाउंट मध्ये इतके पैसे आहेत?

- वेडा आहेस का? मुळात हे अकाउंट मी काढलंच नाहीये...

- अरे मग हे पैसे कुठून आले?

- हा तिसरा क्लू आहे...

- काय???

- आकडा नीट बघ

- ५,४३,२१०

- हा आकडा नाहीये, तिसरा क्लू आहे...

- म्हणजे...

- नीट बघ, हा काउंट डाउन आहे...

- अरे पण शब्द काय?

- शिरवाळ, उलटी गिनती सुरू झाली आहे. शिरवाळमधून आजोबा निघाले, मला तिथे परत जायचंय...

- मी पण येतो तुझ्या सोबत...

- नको आपण वेगवेगळे जाऊया...

- चालेल... मी तुला पुण्याला सोडतो, तिथून तू मजल दरमजल करत, गाड्या बदलत शिरवाळला पोच, मी ट्रेनने येतो...

- ओके..

- गाडीत बसलो की तुला डिटेल्स देतो...

- चालेल...

- रवी, अजून एक महत्त्वाचं. ह्या माणसाला ओळखणारा एक माणूस मला सापडलाय. सकाळीच बोललो त्याच्याशी...

- काय म्हणाला तो?

- बरंच काही सांगितलं, संध्याकाळी पुन्हा फोन करणार आहे. पण मला असं वाटतंय हे सगळं दिसतं तितकं सरळ नाहीये...

- अर्थातच नाहीये... माझा जीव जाणार आहे उद्या...

- तसं नव्हे रे... पण अजून बरंच काही आहे जे आपल्याला कळलं नाहीये... आता मी ट्रेन मध्ये हेच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. होपफुली - तू मला शिरवाळला भेटशील तेव्हा रहस्याचा उलगडा झालेला असेल...

- होप सो...

***

माने रवीला हायवेवर सोडून पुणे स्टेशनकडे गेला. रवी मजल दरमजल करत, गाड्या बदलत, कधी लिफ्ट घेऊन, बराच उलट सुलट प्रवास करत तिसर्‍या दिवशी शिरवाळला पोचला. मानेनी त्याला मध्ये

sms करून बोगी त्याचा नंबर कळवला होता. आणि स्टेशनवर भेटायला सांगितले होते. रवीला कधी एकदा हे संपतंय असं झालं होतं. स्टेशनबाहेरच एका फडतूस लॉज मध्ये त्याने रूम बुक केली. रात्री ११ ला गाडी येणार होती, तोवर रवीने सगळं विसरून छान पैकी झोप काढायचं ठरवलं.

१०:४५ वाजता रवी स्टेशनवर पोचला. बोगी नंबर १७ च्या थोडा मागेच उभा राहिला. गाडी वेळेवर आली. तुरळक प्रवासी उतरले. मानेचा पत्ता नव्हता. रवीने त्याला फोन लावला तर फोन स्विच्ड ऑफ आला. त्याला कदाचित झोप लागली असेल असा विचार करून रवी डब्यात चढला. सीट नं. ३६ पाशी आला तर सीट रिकामी, अख्खी बोगीच रिकामी होती. कदाचित काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असा विचार करून रवी मागे फिरला, तेव्हढ्यात वरच्या बर्थवर कुणीतरी पाठ करून झोपलेलं त्याला दिसलं. खालच्या सीटवर पाय देऊन रवी वर चढला. त्या माणसाचा चेहरा बघण्यासाठी त्याला आपल्याकडे वळवलं आणि शॉक बसल्यासारखा रवी मागे पडला...

मानेचे निर्जीव थंड डोळे त्याच्याकडे रोखून पहात होते...


क्रमशः

क्रॉसवर्ड २

| Labels: | Posted On 9/12/09 at 12:17 PM

बाल्कनीच्या त्याच्या आवडत्या कट्ट्यावर रवी उडी मारून बसला, सिगरेट पेटवली आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात केली.

रवी शिरवाळकर,

तुझं घर भर दिवसा साफ करण्यामागे चोरी हा उद्देश नाही. तुझं चोरलेलं सामान गोडाऊन मध्ये ठेवलंय आणि त्याचा पत्ता चिठ्ठीच्या मागे लिहिलेला आहे. भाडंही भरलंय. हे सगळं करण्यामागे तुला आमच्या ताकदीची एक झलक दाखवणं आणि प्रकरणाचं गांभिर्य तुझ्या मनावर बिंबवणं हा हेतू होता. आता मुद्द्याकडे वळूया.

तुला तुझं मूळ माहिती आहे का ह्याची मला कल्पना नाही. पण ते मला माहिती आहे. शिरवाळकरचे जमीनदार गजानन शिरवाळकर ह्यांचा तू नातू. गजाननचा भाऊ श्रीधर ह्याने वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीसाठी भावाला संपवण्याचा डाव रचला. ह्यासाठी त्याने माझ्या आजोबांना पैसेही दिले. पण तुझ्या अजोबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केल्याने, माझे आजोबा त्यांना फार मानत. आणि म्हणूनच त्यांनी गजाननला पळून जायला मदत केली आणि गजाननला मारल्याचा बनावही रचला. तो अर्थातच यशस्वी झाला. त्यानंतर गजाननचं कुटुंब इतकी वर्ष आपली ओळख लपवण्यात यशस्वी ठरलं होतं. माझे आजोबा शिरपा ह्यांनी त्यानंतर फासेपारध्याचा पिढीजात धंदा सोडून दिला.

इकडे तुमचं कुटुंब स्थिरस्थावर होत असताना तिथे आमची वाताहात होत होती. माझ्या आजोबांना गावकरी आपल्यात सामावून घ्यायला कचरत होते आणि आमच्या लोकांनी तर त्यांच्यावर बहिष्कारच टाकला. नाईलाजाने आजोबांच्या मृत्यूनंतर माझे बाबा पुन्हा ह्या व्यवसायात आले. त्यानंतर त्यांचा मुलगा, म्हणजे मी, ह्या व्यवसायात उतरलो. अर्थातच आता मी कोयते कुऱ्हाडी घेऊन लोकांना मारत नाही. काळाबरोबर मी माझ्या पद्धतीही बदलल्या आहेत. आधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञान वापरून मी लोकांचे खून करतो. पण आजोबांच्यावेळी असलेला आमचा दबदबा मला पुन्हा निर्माण करता आला नाही. काही वर्षापूर्वी बोलता बोलता आमच्या बाबांनी तुमची हकिकत मला सांगितली आणि मला लक्षात आलं की आमच्या ह्या परिस्थितीचं कारण हीच राहिलेली जबाबदारी आहे. घेतलेलं काम पूर्ण झाल्यावर आमच्यात नरसोबाला अभिषेक करायची रीत आहे. आजोबांनी पैसे घेऊनही काम न केल्याने नरसोबाचा अभिषेक राहून गेलाय आणि त्यामुळेच त्याचा आमच्यावर कोप झालाय.

म्हणून आता जर मला हे सगळं ठीक करायचं असेल तर तुझा खून करण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण गजानन शिरवाळकरांचा तू एकमेव वारस आहेस. तुला काही कल्पना न देता कुठल्याही क्षणी संपवणं मला सहज शक्य होतं. पण मला तसं करायचं नाही. जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नाही, असलाच तर माझ्या अजोबांचा आहे. त्यामुळे मी तुला एक संधी द्यायची ठरवलं आहे. ह्या चिठ्ठीसोबत एक क्रॉसवर्ड तुला सापडेल. त्यात २ उभे आणि २ आडवे शब्द आहेत. हे कोडं तू सोडवायचं. एक एक करून शब्द शोध. पहिल्या शब्दात दुसर्‍या शब्दाचा मार्ग सापडेल. प्रत्येक शब्दात एक गूढ संकेत दडलाय. तो शोधून योग्य मार्ग काढण्यात यशस्वी ठरलास तर जगशील. नाही तर माझ्या बंदुकीच्या एका गोळीवर तुझं नाव कोरून ठेवलं आहेच.

तुझ्याकडे उद्यापासून केवळ ४ दिवस आहेत. रविवारी आपल्या पैकी कुणी तरी एकजण नव्या आयुष्याला सुरुवात करणार.

भेटूच.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अंगातलं सगळं त्राण निघून गेल्यासारखा रवी एकदम गलितगात्र झाला. त्याचे आजोबा, बाबा आणि आता तो, ह्यांनी इतकी वर्ष प्राणापलीकडे जपून ठेवलेलं गुपित आता कुणालातरी कळलं होतं. आणि ते सुद्धा अशा माणसाला. चिठ्ठी वाचून क्षणभर रवीला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटलं, काहीच सुचत नव्हतं. अचानक काही तरी आठवल्यासारखं त्याने मोबाईल काढला आणि १०० नंबर डायल करून फिरवणार इतक्यात त्याच्या सेल वर unknown number वरून sms आला 'पोलिसांना सांगायचा विचारही करू नकोस, ज्याला त्याला जे हवं ते पोचवण्यात आलं आहे'. हा माणूस आत्ता ह्या क्षणी ही आपल्यावर लक्ष ठेवून आहे हे जाणवून भीतीची एक अनामिक शिरशिरी अंगातून गेल्याचं रवीला जाणवलं.

हताशपणे त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि क्रॉसवर्ड उघडलं. पहिला उभा शब्द होता ४ अक्षरी आणि क्लू होता - 'इथूनच सुरुवात, इथूनच शेवट, एकाच वेळी'. च्यायला, ह्याचा अर्थ काय?... जन्म-मृत्यू? नाही.... आई-बाबा? नाही... दवाखाना? शक्य आहे, पण सगळेच दवाखान्यात मरत नाहीत... मग काय असू शकेल??? विचार करून डोकं भणभणायला लागलं तसं रवीला एक स्ट्राँग पेग मारायची इच्छा अनावर झाली. पण शोकेसमध्ये ठेवलेल्या बाटल्या शोकेससकट गायब झाल्या असल्याने रवी उठला आणि किचनमध्ये गेला. ओट्याखालच्या कपाटात कायम इमर्जन्सी साठी स्टॉक ठेवलेला असे. मोठ्या आशेने त्याने कपाट उघडलं तर आतून फक्त एक झुरळ बाहेर पडलं. 'च्यायला काय वैताग आहे, बाटल्या तरी ठेवायच्या कमीतकमी' असं स्वतःशी पुटपुटून रवी घराबाहेर पडला. घरापासून जवळच एक बार होता, तिथे जाऊन डोकं हलकं करावं असा विचार त्याच्या मनात आला.

'एक लार्ज ओल्ड मंक'. एक मोठ्ठा घोट घसा जाळत पोटात गेल्यावर त्याला जरा तरतरी आली. अंधाराला डोळे सरावल्यावर त्याने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. २ टेबल सोडून त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला. पण नाव आठवेना. तेव्हढ्यात त्या माणसाचे लक्ष रवीकडे गेले आणि त्याने हसून हात हलवला. आपला ग्लास उचलून तो माणूस रवीच्या टेबलवर येऊन बसला. आणि अचानक रवीला आठवले 'अरे हा तर माने... ' हा माने म्हणजे एक पोचलेला माणूस होता. ह्याचा धंदा म्हणजे पैशाची घेवाण देवाण. हवाला रॅकेटवाले आणि सुपारी घेऊन खून करणारे गुंड ह्याचे क्लायंट्स. एरवी रवी त्याला शक्य तेव्हा टाळायचा प्रयत्न करत असे, पण त्याच्या सद्ध्याच्या परिस्थितीत त्याला मानेला बघून एकदम हायसं वाटलं, अचानक त्याचा आधार वाटू लागला. रवी काही बोलणार इतक्यात मानेचा प्रश्न आला 'काय रे इकडे काय करतोयस? ' अजून एक मोठ्ठा घोट घेऊन रवीने मानेला सगळं सांगायला सुरुवात केली.

त्याची कहाणी ऐकून घेतल्यावर माने शांतपणे म्हणाला 'तुझा मोठा गेम झालाय. तू आता घरी जा, मला थोडा विचार करू दे. माझ्या माहितीत अशी कुणी व्यक्ती आत्ता तरी नाही. पण मी चौकशी करतो, काही कळतंय का पाहतो. जर कळलं तर तो तुझ्यापर्यंत पोचायच्या आधीच आपण त्याला उडवू. हे कार्ड ठेव. ह्यावर माझे नि माझ्या असिस्टंटचे फोन नंबर्स आहे. कधी काही वाटलं तर कॉल कर. माझी फी मी नंतर वसूल करीनच, शिरवाळकर घराण्याच्या वारसाला १५-२० लाख म्हणजे किस झाड की पत्ती. ' रवी ने कार्ड बघितलं, नंबर्स फोन मध्ये सेव्ह करून घेतले. माने पुढे म्हणाला 'आता आपल्याला दोन कामं लवकरात लवकर करायची आहेत. पहिलं म्हणजे हे क्रॉसवर्ड सोडवणं आणि दुसरं म्हणजे शिरवाळकरांकडे जाऊन तुझी खरी ओळख देणं. त्यांचा पैसा आणि काँटॅक्ट्स आपल्याला ढाल म्हणून कदाचित वापरता येतील. बील देतो मी, तू नीघ'.

घरी पोचताच रवीने स्वतःला जमिनीवर झोकून दिलं. थंडगार जमिनीचा स्पर्श पाठीला झाल्यावर तो एक क्षण ताठरला. डोळे बंद करून विचार करायचा प्रयत्न करणार होता, पण दारूच्या अंमलामुळे त्याला लगेचच झोप लागली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

दूर कुठेतरी जोरात रेल्वेची शिट्टी वाजली आणि रवीला खडबडून जाग आली. एक क्षणानंतर भानावर आल्यावर अचानक डोक्यात ट्यूब पेटली 'च्यायला... इथूनच सुरुवात, इथूनच शेवट, एकाच वेळी... ह्याचा अर्थ प्लॅटफॉर्म... इतका कसा बावळट मी... ३:१० वाजता आपल्या स्टेशनमध्ये वरून निघालेली शेवटची लोकल येते आणि त्याच वेळी इथून सुटणारी पहिली लोकल निघते. अर्थातच... पहिला शब्द प्लॅटफॉर्म आहे... ' घाईघाईत रवी घराबाहेर पडला. 'शेवटची लोकल ३ नंबर प्लॅटफॉर्म वर येते आणि पहिली लोकल ४ नंबर वरून सुटते. मुख्य म्हणजे ह्या दोघांचा प्लॅटफॉर्म कॉमन होता. एका बाजूला ३ नंबर आणि दुसरीकडे ४ नंबर. म्हणजे दुसरा क्लू ह्याच प्लॅटफॉर्म वर सापडणार.' कसाबसा धावत पळत रवी प्लॅटफॉर्म वर पोचला तेव्हा ३:०५ झाले होते. उत्सुकता शिगेला पोचली होती. एक क्षण त्याला वाटले आपण असे एकटे उगाच आलो, मानेला सांगायला हवं होतं.

असो, आता होईल ते होईल असं मनाशी ठरवून तो लोकलची वाट बघत उभा राहिला. २-३ मिनिटातच त्याला समोरून येणाऱ्या ट्रेनचा लाइट दिसला. रवीने घड्याळात बघितलं ३:०७ झाले होते. आता ३ मिनिटातच त्याच्या समोर ह्या क्रॉसवर्डचा पहिला भाग उलगडणार होता.

क्रमशः

क्रॉसवर्ड

| Labels: | Posted On 9/11/09 at 12:48 AM

नेहेमीप्रमाणे नशिबाला शिव्या घालत, पायाखाली सिग्रेट चिरडून रवी अनिच्छेने पुन्हा कामाला लागला. एके काळी देशावरच्या मोठ्या जमीनदारांमधे मोजल्या जाणार्‍या शिरवाळकर घराण्याच्या एकमेव वारसाला मुंबईत एका फडतूस कंपनीत महिना दहा हजारावर खर्डेघाशी करायला लागावी ह्याचं त्याला आज पुन्हा एकदा वैषम्य वाटलं. पूर्वी शिरवाळकर घराणं मोठं मातब्बर समजलं जायचं. जमीनदारी, शेती-वाडी, व्यापार, पैसे व्याजी देणं इत्यादी अनेक व्यवसायांत त्याच्या पूर्वजांनी गडगंज संपत्ती कमावली होती. इतकी, की शिरवाळच्या संस्थानिकांना वेळ-प्रसंगी ह्यांनी आर्थीक मदत केली होती. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. शे-दीडशे दुभती जनावरं, हजार दीड हजार एकर बागायती जमीन असलेल्या ह्या कुटंबाचा रहाता वाडाही तसाच प्रशस्त होता. पण ह्या सगळ्या गोष्टी रवीने कधीच अनुभवल्या नव्हत्या. ही सगळी ऐकीव माहिती त्याला मिळाली त्याच्या आजोबांकडून.

रवीचे आजोबा गजानन आणि त्यांचे थोरले बंधू श्रीधर आपल्या वडिलांना, दत्तोपंतांना, कारभार सांभाळण्यास मदत करत. सोबत होते त्यांच्या वडिलांचे विश्वासू साथीदार देसाई. दोघांनी मेहेनतीने हा सगळा पसारा नुसता सांभाळलाच नाही तर वाढवलाही. काही वर्षानी दत्तोपंत एके दिवशी ताप आल्याचे निमीत्त होऊन गेले. देसाईंना हा धक्का सहन झाला नाही. गेली पन्नासहून अधीक वर्ष ज्या मित्राची सावली सारखी सोबत केली तो आता नाही ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्यांनीही अंथरूण पकडले. अगदी शेवटच्या दिवसात गजानन त्यांना भेटायला गेला होता. देसाई अप्पा काही बोलायच्या अवस्थेत नव्हते, पण त्यांनी गजाननला आशीर्वाद म्हणून एक श्री दत्ताची तसबीर दिली.

वडील आणि वडीलांसारखीच माया लावणारे देसाई अप्पा गेल्यावर मात्र गजानन शिरवाळकरांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. वडील वारल्यानंतर महिन्याभरातच श्रीधरने हळूकळू संपत्तीवर कब्जा करण्यास सुरुवात केली. गजाननने त्याला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला की दोन्ही हातांनी उधळली तरी पुढच्या पंधरा पिढ्या चैनीत राहतील इतकी संपत्ती आहे. त्यामुळे, ह्या वरून भावाभावांत वाद नकोत. पण संपत्तीच्या लोभाने आंधळा झालेल्या श्रीधरला त्यावेळी दुसरे काहिही सुचत नव्हते. आधी दमदाटी करून इस्टेटीच्या कागदावर सही करायला लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गजानन बधत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी श्रीधरने गजाननला कुटूंबासकट संपवण्याचा डाव रचला. फासेपारध्यांना पैसे देऊन स्वत: कामासाठी बाहेरगावी असताना गजाननला संपवण्याचा कट रचण्यात आला. फासेपारधी असले तरी गजाननसारख्या देवमाणसाच्या हत्येचे पाप नको म्हणून त्यांचा म्होरक्या, शिरपा, एके दिवशी येऊन हे सगळं गजाननला सांगून गेला. त्याच दिवशी गजाननने घर सोडायचा निर्णय घेतला.

श्रीधरच्या कटानुसार तो बाहेरगावी गेल्यावर गजाननने सोबत केवळ श्रीदत्ताची तसबीर घेऊन नेसत्या वस्त्रानिशी मुलाबाळांसकट घर सोडले. त्यानंतर गावोगाव भटकत, छोटी-मोठी कामं करत कुणाच्या नजरेत येणार नाही असं आयुष्य जगायला त्यांनी सुरुवात केली. असंच फिरता फिरता एका गावी धर्मशाळेत थांबले असता अचानक त्यांची गाठ शिरपाशी पडली. गाठ पडली म्हणण्यापेक्षा तो स्वतःहून त्यांच्या समोर आला. शिरपाने गजाननच्या कपड्यांना जनावराचे रक्त लाऊन श्रीधरला दाखवले होते. पण तरी श्रीधरला पूर्ण खातरजमा करायची असल्याने त्याने आपली माणसं गजाननचा शोध घ्यायला गावोगाव पाठवली होती. गजाननला त्या माणसांकडून काही त्रास होऊ नये म्हणून इतके महिने शिरपा त्यांच्या नकळत त्यांची सावली सारखी पाठराखण करत होता. बरेच महिने शोधाशोध केल्यावरही काही पत्ता लागेना म्हणून शेवटी श्रीधरने आपल्या माणसांना परत बोलावून घेतले. आज शिरपाने श्रीधरला भेटून ही सगळी हकिकत सांगितली आणि त्याचबरोबर आपण हे वाईट काम सोडून चांगल्या मार्गाला लागणार असल्याचेही सांगितले. शिरपाच्या ॠणाखाली दबलेल्या गजाननने त्याला काही दिवस आपल्याकडे रहायचा आग्रह केला. पण पुन्हा कुणास संशय यायला नको म्हणून शिरपा त्याच दिवशी निघाला. जाताना त्याला गजाननने भेट म्हणून श्रीदत्ताची तसबीर दिली आणि सुयश चिंतीले.

हळू हळू आपल्या नव्या आयुष्यात गजानन रमला. मुळातच शांत स्वभाव आणि समाधानी वॄती असलेल्या गजाननचे पैशाअभावी काही अडले नाही. इकडे श्रीधरने सुरुवातीला काही दिवस खूप ऐषोरामात घालवले. पण हळू हळू ह्या सगळ्याचा त्याला कंटाळा येऊ लागला. दारू, जुगार, बायका, सगळं काही करून झालं. मुलगा शहरात शिकायला गेला होता. तो मधून मधून येत असे, पण आपल्या बाबांचे प्रताप कळल्यावर त्याने वडिलांशी बोलणं सोडलं आणि शिक्षण झाल्यावर तिथेच कायमचा स्थाईक झाला. पुढे, साथीच्या रोगात बायको वारल्यावर मात्र श्रीधरला वेड लागायची पाळी आली. इतक्या मोठ्या वाड्यात तो आणि त्याचे २ नोकर इतकीच लोकं होती. भावाला मारून आपण काय साध्य केलं हा प्रश्न त्याला हळू हळू सताऊ लागला. रात्री अपरात्री विचित्र भास होऊ लागले. आणि एके सकाळी गळफास लाऊन घेतलेल्या अवस्थेत श्रीधर लोकांना सापडला.

वडिलोपार्जीत इस्टेट सांभाळण्यासाठी नाईलाजाने श्रीधरचा मुलगा शशी गावी परत आला. हळू हळू त्याने कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. शशीचा स्वभाव बाबांच्या अगदी विरूद्ध होता. मनमिळाऊ आणि लोकांना मदत करायला सदैव तत्पर असलेल्या शशीने शिरवाळकर घराण्याल गतवैभव प्राप्त करून द्यायचे ठरवले. त्याने आपल्या वडिलांच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून काकांच्या नावाने गावात धर्मदाय दवाखाना सुरु केला, वडिलांनी जबरदस्तीने ज्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या त्या त्यांना परत केल्या, मुद्दलापेक्षा कैकपटीने व्याज भरत रहाणार्‍यांची कर्जे पूर्णपणे माफ केली. आणि हळू हळू पुन्हा शिरवाळकर घराण्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

नेहेमीप्रमाणे ऑफीसमधून नाक्यावर आणि नाक्यावरून घरी आलेल्या रवीने दार उघडून हॉल मधला दिवा लावला आणि त्याला धक्काच बसला. ह्या मधल्या आठ-दहा तासात कुणीतरी त्याचं घर पार साफ केलं होतं. साफ म्हणजे दिवे, पडदे, ह्यांसकट सगळ सामान घरातून गायब झालेलं होतं. उरल्या होत्या नुस्त्या भिंती आणि खिडक्यांच्या चौकटी. एक क्षण त्याला आपण कुठे आलोय हेच कळेना. हॉलमधून कानोसा घेत सावधपणे रवी किचनमधे शिरला. तिथेही तोच प्रकार. एकूण एक वस्तू गायब. तेव्हढ्यात त्याला ओट्यावर एक भांडं पालथं करून ठेवलेलं आढळलं. भांडं उचलून बघताच त्याला आत लहानशी पिशवी आढळली. पिशवीत त्याच्यासाठी एक चिठ्ठी होती.
आणि सोबत होतं.......

.......एक क्रॉसवर्ड.

क्रमशः