क्रॉसवर्ड २

| Labels: | Posted On 9/12/09 at 12:17 PM

बाल्कनीच्या त्याच्या आवडत्या कट्ट्यावर रवी उडी मारून बसला, सिगरेट पेटवली आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात केली.

रवी शिरवाळकर,

तुझं घर भर दिवसा साफ करण्यामागे चोरी हा उद्देश नाही. तुझं चोरलेलं सामान गोडाऊन मध्ये ठेवलंय आणि त्याचा पत्ता चिठ्ठीच्या मागे लिहिलेला आहे. भाडंही भरलंय. हे सगळं करण्यामागे तुला आमच्या ताकदीची एक झलक दाखवणं आणि प्रकरणाचं गांभिर्य तुझ्या मनावर बिंबवणं हा हेतू होता. आता मुद्द्याकडे वळूया.

तुला तुझं मूळ माहिती आहे का ह्याची मला कल्पना नाही. पण ते मला माहिती आहे. शिरवाळकरचे जमीनदार गजानन शिरवाळकर ह्यांचा तू नातू. गजाननचा भाऊ श्रीधर ह्याने वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीसाठी भावाला संपवण्याचा डाव रचला. ह्यासाठी त्याने माझ्या आजोबांना पैसेही दिले. पण तुझ्या अजोबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केल्याने, माझे आजोबा त्यांना फार मानत. आणि म्हणूनच त्यांनी गजाननला पळून जायला मदत केली आणि गजाननला मारल्याचा बनावही रचला. तो अर्थातच यशस्वी झाला. त्यानंतर गजाननचं कुटुंब इतकी वर्ष आपली ओळख लपवण्यात यशस्वी ठरलं होतं. माझे आजोबा शिरपा ह्यांनी त्यानंतर फासेपारध्याचा पिढीजात धंदा सोडून दिला.

इकडे तुमचं कुटुंब स्थिरस्थावर होत असताना तिथे आमची वाताहात होत होती. माझ्या आजोबांना गावकरी आपल्यात सामावून घ्यायला कचरत होते आणि आमच्या लोकांनी तर त्यांच्यावर बहिष्कारच टाकला. नाईलाजाने आजोबांच्या मृत्यूनंतर माझे बाबा पुन्हा ह्या व्यवसायात आले. त्यानंतर त्यांचा मुलगा, म्हणजे मी, ह्या व्यवसायात उतरलो. अर्थातच आता मी कोयते कुऱ्हाडी घेऊन लोकांना मारत नाही. काळाबरोबर मी माझ्या पद्धतीही बदलल्या आहेत. आधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञान वापरून मी लोकांचे खून करतो. पण आजोबांच्यावेळी असलेला आमचा दबदबा मला पुन्हा निर्माण करता आला नाही. काही वर्षापूर्वी बोलता बोलता आमच्या बाबांनी तुमची हकिकत मला सांगितली आणि मला लक्षात आलं की आमच्या ह्या परिस्थितीचं कारण हीच राहिलेली जबाबदारी आहे. घेतलेलं काम पूर्ण झाल्यावर आमच्यात नरसोबाला अभिषेक करायची रीत आहे. आजोबांनी पैसे घेऊनही काम न केल्याने नरसोबाचा अभिषेक राहून गेलाय आणि त्यामुळेच त्याचा आमच्यावर कोप झालाय.

म्हणून आता जर मला हे सगळं ठीक करायचं असेल तर तुझा खून करण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण गजानन शिरवाळकरांचा तू एकमेव वारस आहेस. तुला काही कल्पना न देता कुठल्याही क्षणी संपवणं मला सहज शक्य होतं. पण मला तसं करायचं नाही. जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नाही, असलाच तर माझ्या अजोबांचा आहे. त्यामुळे मी तुला एक संधी द्यायची ठरवलं आहे. ह्या चिठ्ठीसोबत एक क्रॉसवर्ड तुला सापडेल. त्यात २ उभे आणि २ आडवे शब्द आहेत. हे कोडं तू सोडवायचं. एक एक करून शब्द शोध. पहिल्या शब्दात दुसर्‍या शब्दाचा मार्ग सापडेल. प्रत्येक शब्दात एक गूढ संकेत दडलाय. तो शोधून योग्य मार्ग काढण्यात यशस्वी ठरलास तर जगशील. नाही तर माझ्या बंदुकीच्या एका गोळीवर तुझं नाव कोरून ठेवलं आहेच.

तुझ्याकडे उद्यापासून केवळ ४ दिवस आहेत. रविवारी आपल्या पैकी कुणी तरी एकजण नव्या आयुष्याला सुरुवात करणार.

भेटूच.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अंगातलं सगळं त्राण निघून गेल्यासारखा रवी एकदम गलितगात्र झाला. त्याचे आजोबा, बाबा आणि आता तो, ह्यांनी इतकी वर्ष प्राणापलीकडे जपून ठेवलेलं गुपित आता कुणालातरी कळलं होतं. आणि ते सुद्धा अशा माणसाला. चिठ्ठी वाचून क्षणभर रवीला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटलं, काहीच सुचत नव्हतं. अचानक काही तरी आठवल्यासारखं त्याने मोबाईल काढला आणि १०० नंबर डायल करून फिरवणार इतक्यात त्याच्या सेल वर unknown number वरून sms आला 'पोलिसांना सांगायचा विचारही करू नकोस, ज्याला त्याला जे हवं ते पोचवण्यात आलं आहे'. हा माणूस आत्ता ह्या क्षणी ही आपल्यावर लक्ष ठेवून आहे हे जाणवून भीतीची एक अनामिक शिरशिरी अंगातून गेल्याचं रवीला जाणवलं.

हताशपणे त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि क्रॉसवर्ड उघडलं. पहिला उभा शब्द होता ४ अक्षरी आणि क्लू होता - 'इथूनच सुरुवात, इथूनच शेवट, एकाच वेळी'. च्यायला, ह्याचा अर्थ काय?... जन्म-मृत्यू? नाही.... आई-बाबा? नाही... दवाखाना? शक्य आहे, पण सगळेच दवाखान्यात मरत नाहीत... मग काय असू शकेल??? विचार करून डोकं भणभणायला लागलं तसं रवीला एक स्ट्राँग पेग मारायची इच्छा अनावर झाली. पण शोकेसमध्ये ठेवलेल्या बाटल्या शोकेससकट गायब झाल्या असल्याने रवी उठला आणि किचनमध्ये गेला. ओट्याखालच्या कपाटात कायम इमर्जन्सी साठी स्टॉक ठेवलेला असे. मोठ्या आशेने त्याने कपाट उघडलं तर आतून फक्त एक झुरळ बाहेर पडलं. 'च्यायला काय वैताग आहे, बाटल्या तरी ठेवायच्या कमीतकमी' असं स्वतःशी पुटपुटून रवी घराबाहेर पडला. घरापासून जवळच एक बार होता, तिथे जाऊन डोकं हलकं करावं असा विचार त्याच्या मनात आला.

'एक लार्ज ओल्ड मंक'. एक मोठ्ठा घोट घसा जाळत पोटात गेल्यावर त्याला जरा तरतरी आली. अंधाराला डोळे सरावल्यावर त्याने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. २ टेबल सोडून त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला. पण नाव आठवेना. तेव्हढ्यात त्या माणसाचे लक्ष रवीकडे गेले आणि त्याने हसून हात हलवला. आपला ग्लास उचलून तो माणूस रवीच्या टेबलवर येऊन बसला. आणि अचानक रवीला आठवले 'अरे हा तर माने... ' हा माने म्हणजे एक पोचलेला माणूस होता. ह्याचा धंदा म्हणजे पैशाची घेवाण देवाण. हवाला रॅकेटवाले आणि सुपारी घेऊन खून करणारे गुंड ह्याचे क्लायंट्स. एरवी रवी त्याला शक्य तेव्हा टाळायचा प्रयत्न करत असे, पण त्याच्या सद्ध्याच्या परिस्थितीत त्याला मानेला बघून एकदम हायसं वाटलं, अचानक त्याचा आधार वाटू लागला. रवी काही बोलणार इतक्यात मानेचा प्रश्न आला 'काय रे इकडे काय करतोयस? ' अजून एक मोठ्ठा घोट घेऊन रवीने मानेला सगळं सांगायला सुरुवात केली.

त्याची कहाणी ऐकून घेतल्यावर माने शांतपणे म्हणाला 'तुझा मोठा गेम झालाय. तू आता घरी जा, मला थोडा विचार करू दे. माझ्या माहितीत अशी कुणी व्यक्ती आत्ता तरी नाही. पण मी चौकशी करतो, काही कळतंय का पाहतो. जर कळलं तर तो तुझ्यापर्यंत पोचायच्या आधीच आपण त्याला उडवू. हे कार्ड ठेव. ह्यावर माझे नि माझ्या असिस्टंटचे फोन नंबर्स आहे. कधी काही वाटलं तर कॉल कर. माझी फी मी नंतर वसूल करीनच, शिरवाळकर घराण्याच्या वारसाला १५-२० लाख म्हणजे किस झाड की पत्ती. ' रवी ने कार्ड बघितलं, नंबर्स फोन मध्ये सेव्ह करून घेतले. माने पुढे म्हणाला 'आता आपल्याला दोन कामं लवकरात लवकर करायची आहेत. पहिलं म्हणजे हे क्रॉसवर्ड सोडवणं आणि दुसरं म्हणजे शिरवाळकरांकडे जाऊन तुझी खरी ओळख देणं. त्यांचा पैसा आणि काँटॅक्ट्स आपल्याला ढाल म्हणून कदाचित वापरता येतील. बील देतो मी, तू नीघ'.

घरी पोचताच रवीने स्वतःला जमिनीवर झोकून दिलं. थंडगार जमिनीचा स्पर्श पाठीला झाल्यावर तो एक क्षण ताठरला. डोळे बंद करून विचार करायचा प्रयत्न करणार होता, पण दारूच्या अंमलामुळे त्याला लगेचच झोप लागली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

दूर कुठेतरी जोरात रेल्वेची शिट्टी वाजली आणि रवीला खडबडून जाग आली. एक क्षणानंतर भानावर आल्यावर अचानक डोक्यात ट्यूब पेटली 'च्यायला... इथूनच सुरुवात, इथूनच शेवट, एकाच वेळी... ह्याचा अर्थ प्लॅटफॉर्म... इतका कसा बावळट मी... ३:१० वाजता आपल्या स्टेशनमध्ये वरून निघालेली शेवटची लोकल येते आणि त्याच वेळी इथून सुटणारी पहिली लोकल निघते. अर्थातच... पहिला शब्द प्लॅटफॉर्म आहे... ' घाईघाईत रवी घराबाहेर पडला. 'शेवटची लोकल ३ नंबर प्लॅटफॉर्म वर येते आणि पहिली लोकल ४ नंबर वरून सुटते. मुख्य म्हणजे ह्या दोघांचा प्लॅटफॉर्म कॉमन होता. एका बाजूला ३ नंबर आणि दुसरीकडे ४ नंबर. म्हणजे दुसरा क्लू ह्याच प्लॅटफॉर्म वर सापडणार.' कसाबसा धावत पळत रवी प्लॅटफॉर्म वर पोचला तेव्हा ३:०५ झाले होते. उत्सुकता शिगेला पोचली होती. एक क्षण त्याला वाटले आपण असे एकटे उगाच आलो, मानेला सांगायला हवं होतं.

असो, आता होईल ते होईल असं मनाशी ठरवून तो लोकलची वाट बघत उभा राहिला. २-३ मिनिटातच त्याला समोरून येणाऱ्या ट्रेनचा लाइट दिसला. रवीने घड्याळात बघितलं ३:०७ झाले होते. आता ३ मिनिटातच त्याच्या समोर ह्या क्रॉसवर्डचा पहिला भाग उलगडणार होता.

क्रमशः

Comments:

There are 1 comments for क्रॉसवर्ड २