जेव्हा आपले म्हणवणारेच आपला घात करतात, जिवाभावाचे मित्र पाठीत खंजीर खुपसतात आणि स्वतःची सावली उलटून वार करते, तेव्हा सुरू होते कथा एका सुडाची.
ह्या कथेचा नायक एक सरळमार्गी, मध्यमवर्गीय तरूण आहे. त्याचं आयुष्य मुंबईत गेलं. नोकरी निमित्त २ वर्ष घरापासून तो लांब राहिला. हा तरूण नुकताच लग्नाच्या गोड बंधनात अडकला आहे. आणि सगळ्या नवर्यांप्रमाणे न वागता त्याने स्वतःला गॄहस्थाश्रमात झोकून दिलं आहे. लग्नानंतर काही महिने नोकरीच्या गावी राहिल्यावर तो आपल्या घरी परत आला. आणि ह्या कथेला सुरूवात झाली.
तो परत आल्यामुळे त्याच्या चांडाळचौकडीतले ३ जण - गिर्या, शिर्या आणि विर्या ह्यांना खूप आनंद झाला. त्याच्या पुनरागमनाप्रित्यर्थ त्यांनी जंगी पार्टीचं आयोजन केलं. आपले मित्र आपल्याला विसरलेले नाहीत हे बघून त्याला गहिवरून आलं.
नायकाचा स्वभाव माहिती असल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा ताबा घेतला आणि कोपर्यात नेऊन आपले अनुभवाचे बोल पाजळायला सुरुवात केली. "नव्या नोकरीत पगार वाढल्याचं बायकोला सांगू नकोस, बायकोवर आधी पासूनच कंट्रोल ठेव, तिला डोक्यावर बसू नको देऊस, उठ-सूट तिच्यासोबत तिच्या माहेरी जाऊ नकोस, एकटीला जाऊ दे हवं तितके वेळा" ह्या मित्रांच्या सल्ल्यांनी आपला नायक फारच गडबडून गेला. "बायकोला अर्धांगिनी म्हणतात कारण लग्नानंतर आपला पैसा, स्वातंत्र्य आणि घरातलं महत्वं अर्ध होतं" ह्या गिर्याच्या व्याख्येमुळे तर त्याची पारच तंतरली. "अरे मित्रांनो, बायको म्हणजे माझी शत्रू आहे का?" असं नायकाने म्हणताच त्याचे मित्र फिदिफिदि हसले आणि "कळेल, कळेल" असं म्हणून निघून गेले.
नायकाचं लग्नाळलेलं आयुष्य हळू हळू सुरू झालं. नव्या नोकरीतही तो रुळला. काही महिने छान, मस्त, मजेत गेले.
आणि एके दिवशी त्याला जाणवू लागलं की त्याचे मित्र त्याच्याची आता पूर्वीसारखे वागत नाहीत. त्याला बघून कुत्सितपणे हसतात. त्याची चेष्टा करतात. ह्याचं कारण काही त्याला कळेना. आता सांसारिक जबाबदार्यांमुळे त्याला पूर्वीसारखं मित्रांसोबत वेळ घालवता येत नसे हे त्यालाही मान्य होतं. गच्चीत रंगणार्या मैफिली, रात्र रात्र चालणारे कॅरम आणि पत्त्यांचे डाव, हॅलोजन लाऊन सोसायटीच्या मैदानात चालणार्या बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस ह्यातून त्याने कधीच अंग काढून घेतलं होतं. सद्ध्या सोसायटीत त्याची हजेरी फक्त मिटींग्जना आणि पूजेला असे. बहुदा त्याचाच राग मित्रांना आला असेल असं आपल्या नायकाला वाटलं. तसं त्याने त्यांना विचारूनही बघितलं पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. त्याच्यावर जणू सार्वजनीक बहिष्कारच घालण्यात आला होता. खरं म्हणजे शिर्या आणि गिर्याचंही नुकतंच लग्न झालेलं असतानाही त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणेच देवाच्या नावाने सोडलेल्या वळू सारखं मुक्तछंदी कसं राहिलं हे कोडं त्याला सुटेना.
एकदा पिकनिकचा प्लॅन ठरत असताना तो मित्रांसोबतच होता. पण "ह्याला नका विचारू, ह्याला घरी कामं असतात विकेंडला... हॅ हॅ हॅ" असं म्हणून ह्याला खड्यासारखं वगळण्यात आलं. आपले जिवश्च-कंठश्च मित्र गिर्या, शिर्या आणि विर्या आपल्याशी असे का वागतात ह्या पेचात आपला नायक पडला.
प्रश्न त्याच्या मनात रूंजी घालत होते. आपला बिचारा नायक आतल्या आत कुढत होता. भाजी निवडताना, कपडे वाळत घालताना, बाथरूम घासताना आणि भाजीवाल्या भैय्याशी घासाघीस करतानाही सतत त्याच्या मनात हाच विचार असे. त्याचं कामात लक्ष लागेना. पोळ्या करपू लागल्या, भात कच्चा राहू लागला, कपड्यांवरचे डाग तसेच राहू लागले.
हळू हळू त्याच्यावरिल बहिष्काराला वेगळाच रंग चढू लागला. गिर्या, शिर्या आणि विर्या आता जाता येता टोमणे मारू लागले. त्याला ओझ्याचा बैल म्हणून हिणवू लागले. (बैल त्याला बायकोही म्हणत असे. पण मित्रं ओझ्याचा बैल का म्हणत हे त्याला कळलं नाही.) चोहोबाजूनी त्याच्यावर आक्रमण होऊ लागलं. आणि एके दिवशी त्याच्या सहनशक्तिचा कडेलोट झाला. नेहमीप्रमाणे ऑफिसमधून येता येता स्टेशनवर उतरून त्याने भाजी घेतली. विंग मधे शिरताच त्याला समोर एक पोस्टर दिसलं. त्यावर दोन फोटो होते आणि मथळा होता "वाँटेड - जुना आदि जोशी" आणि पहिलं चित्र होतं - "बिफोर - हातात शॉपिंगच्या पिशव्या" आणि दुसरं चित्र होतं "आफ्टर - हातात दळणाची पिशवी". ह्यावर कडी म्हणजे त्या पोस्टरवर लाईन होती "कोण होतास तू, काय झालास तू, अरे अॅड्या कसा, नवरा झालास तू".
हे बघून त्याने ठरवलं बास झालं. ह्याचा बदला आपण घ्यायचाच. त्याच्या डोळ्यासमोर आता एकच शब्द फिरू लागला "सूड". त्याला सूड गंडाने पछाडून टाकलं. पण सूड घ्यायचा कसा हे मात्र त्याला कळेन. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला गिर्या, शिर्या आणि विर्या ह्यांचे हसरे चेहरे दिसू लागले. दिवसेंदिवस घुसमट असह्य होत होती. आणि एके दिवशी पालक निवडता निवडता अचानक त्याच्या डोक्यात बल्ब पेटला. चेहर्यावरच्या काळजीची जागा खुनशी हास्याने घेतली. त्याने लग्न न झालेल्या विर्याला सोडून गिर्या आणि शिर्याला टार्गेट करायचं ठरवलं. गिर्या आणि शिर्या अब तुम्हारी खैर नहीं असं म्हणून तो प्लॅन आखणीच्या कामाला लागला.
प्लॅन नुसार त्याने पहिला फोन केला शिर्याच्या बायकोला, स्वातीला. शिर्याचं त्याच्या महिनाभर आधीच लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांची अॅनिवर्सरी जवळ आली आहे हे त्याला माहिती होतं. आता त्याचं लग्न ३० डिसेंबरला झाल्याने शिर्या बायकोसोबत कुठे फिरायला जाण्यापेक्षा मित्रांसोबत ३१ ला हुंदडायचे प्लॅन्स बनवणार हे ही त्याला माहिती होतं.
आदि - हॅलो स्वाती, कशी आहेस?
स्वाती - मी मजेत. तू कसा आहेस? आणि असतोस कुठे आजकाल?
आदि - आहे गं इथेच. तुझ्याकडे एक काम होतं. म्हणजे जरा मदत हवी होती तुझी.
स्वाती - सांग ना...
आदि - अगं तुला माहिती आहे ना आमच्या लग्नाची अॅनिवर्सरी जवळ आली आहे.
स्वाती - हो, आमची पण...
आदि - बरोबर. मला ना माझ्या बायकोला एक सरप्राईझ द्यायचं होतं.
स्वाती - अरे व्वा... शॉपिंग करायचंय का तिच्यासाठी?
आदि - नाही गं, त्याहून भारी सरप्राईज...
स्वाती - काय रे?
आदि - मी तिला १ आठवडा सुट्टीवर घेऊन जायचा प्लॅन करतोय.
स्वाती - सुपर्ब... लकी आहे बाबा तुझी बायको.
आदि - पण त्यासाठी तुझी मदत हवी आहे.
स्वाती - हां, सांग ना...
आदि - माझ्याकडे ३ ऑप्शन्स आहेत - अंदमान-निकोबार, काश्मिर किंवा श्रीलंका. ह्यातला कुठला निवडू?
स्वाती - अरे कुठलाही निवड, नवरा आठवडाभर फिरायला घेऊन जातोय हेच खूप असतं बायकांसाठी.
आदि - ते ठीक आहे पण जाऊ कुठे?
स्वाती - अंदमान-निकोबार बेस्ट आहे.
आदि - ओक्के डन मग... पण तिला सांगू नको बरं का...
स्वाती - यस बॉस...
आदि - बाय द वे, पुढल्या महिन्यात तुमचीही ऍनिवर्सरी आहे ना? तुम्ही कुठे जाताय फिरायला?
स्वाती - आम्ही? माहिती नाही. शिर्या म्हणाला त्याच्या ऑफिसमधल्या मित्रांनी काही तरी प्लॅन बनवलाय.
आदि - ह्म्म्म्म... असा कसा हा शिर्या? मी बोलतो त्याच्याशी.
स्वाती - नको. बोलून काही उपयोग नाहिये. तुम्ही एंजॉय करा, मी बोलते तुझ्याशी नंतर.
ह्या नंतर आपल्या नायकाच्या गडगडाटी असूरी हास्याने त्याची केबिन दुमदुमून गेली. प्लॅन नुसार पुढची चाल तो खेळला. पुढला फोन गिर्याच्या बायकोला, नेहाला.
आदि - नमस्कार वहिनी साहेब, कशा आहात?
नेहा - काय रे, आज अचानक कशी आठवण आली.
आदि - अगं जरा मदत हवी होती तुझी.
नेहा - बोल ना.
आदि - आज ना मी हिला रात्री जेवायला घेऊन जायचा प्लॅन करतोय.
नेहा - अरे व्वा? कुछ खास वजह?
आदि - खास असं नाही, पण आज आमच्या लग्नाला १० महिने झाले ना, त्याचं सेलिब्रेशन...
नेहा - काय सांगतोस काय? आणि हे तुझ्या लक्षात आहे?
आदि - म्हणजे काय? अगं अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आयुष्यात खरी रंगत येते.
नेहा - खरंय रे तुझं.
आदि - तर तुझ्या ऑफिसच्या बाजूला जवळ ते फ्लेवर्स ऑफ इंडिया ओपन झालंय ना तिथे १ टेबल बुक करशील का आमच्यासाठी?
नेहा - वॉव, नक्की करीन. सहीच आहे ते हॉटेल. मी गिर्याच्या कधीपासून मागे लागलेय तिथे जाऊया म्हणून...
आदि - मग?
नेहा - मग काय? अजून ठरतोय आमचा प्लॅन.
आदि - ह्म्म्म्म असा कसा हा गिर्या? मी बोलतो त्याच्याशी.
नेहा - नको. बोलून काही उपयोग नाहिये. तुम्ही एंजॉय करा, मी बोलते तुझ्याशी नंतर.
ह्या नंतर आपल्या नायकाच्या गडगडाटी असूरी हास्याने त्याची केबिन पुन्हा एकदा दुमदुमून गेली.
तो आपली चाल खेळला होता. त्याने सोडलेले हे दोन बाँब लवकरच त्यांच्या टार्गेटवर आदळणार आणि धमाके होणार ह्याची त्याला खात्री होती. ते होण्याची तो वाट बघत होता.
आणि एके दिवशी त्यानी सोडलेला पहिला बाँब फुटला. गाजर हलवा बनवण्यासाठी गाजरं किसत असताना समोरच्या शिर्याच्या घरातून पहिल्यांदा जोरात पातेलं आदळल्याचा आणि नंतर कपबशी फुटल्याचा खळ्ळ्ळ्ळ आवाज झाला.
पुन्हा ते भेसूर हास्य त्याच्या चेहर्यावर उमटलं. त्याने तॄप्त मनाने एक खोल श्वास घेतला.
आज त्याचा सूड पूर्ण झाला होता.
काही दिवसांनी...
आता गिर्या, शिर्या आणि आदि सोसायटीच्या बागेत बसून भाजी निवडता निवडता विर्याला टोमणे मारत असतात.
सूड कथा समाप्त
माझ्या काही जिवाभावाच्या मित्रांसाठी खास सूचना: ही कथा काल्पनिक असली तरी ती कधीही सत्यकथा होऊ शकते हे लक्षात असू द्या.