भरकटलेल्या पक्षाची कहाणी

| Labels: | Posted On 2/10/10 at 7:54 PM

प्रस्थापितांविरूद्ध बंड ही घटना कायमच सर्वसामान्यांना, प्रस्थापितांकडून अन्याय झालेल्यांना / झाल्याचं ऐकलेल्यांना प्रचंड आवडणारी आणि आकर्षीत गोष्ट आहे. सामान्यपणे सर्वसाधारण नागरीक "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही" अशा प्रवॄत्तीचा असल्याने कुणी मोर्चा काढला तर तो प्रत्यक्ष त्यात सामील झाला नाही तरी निदान चाळीच्या गॅलरीत उभा राहून टाळ्या तरी वाजवतोच.

असंच एक बंड काही काळापूर्वी एका पक्षात झालं.  बंडाचा झेंडा उभारणारी व्यक्ती बरीच लोकप्रीय होती. आपल्या मिठास वाणीने, व्यासंगाने आणि दिलखुलास वागण्याने त्यांनी बरीच लोकं जोडली होती. ह्या व्यक्तीला स्वतःची मतं होती. केवळ कुणी तरी सांगितलं म्हणून वाट्टेल ते करण्याची लाचारी नव्हती. जगाला फाट्यावर मारायची तयारी आणि धमकही होती. ह्या व्यक्तीने प्रस्थापितांविरूद्ध बंड करायचं ठरवलं. ह्यांनी वेगळा झेंडा उभारल्यावर ह्या माणसावर प्रेम करणारी बरीच माणसं नव्या झेंड्याखाली आपुलकीने गेली. नवा झेंडा सगळ्या जुन्या झेंड्यांहून वर रहावा म्हणून कामाला लागली. वेळ काढून फक्त आणि फक्त ह्याच पक्षाच्या कार्यालयात दिसू लागली. वेगवेगळ्या गावात ह्या सर्वांनी आपल्या नव्या पक्षाच्या शाखा झुरू केल्या. सोबत बरेच नवे कार्यकर्तेही आणले. सगळेच मनापासून, पक्ष स्वतःचा आहे ह्या भावनेतून काम करू लागले. आता आपली मुस्काटसाबी होणार नाही, सगळ्यांना समान वागणूक मिळेल अशी आशा होती. तसे काही दिवस झालेही. नवा नेताही हा पक्ष तुमचाच आहे तुमच्यासाठीच आहे, घरच्यासारखे वागा, अडल्या-नडल्याला नि:संकोचपणे संपर्क साधा काही प्रॉब्लेम नाही असे सर्वांना सांगत होता व मुख्य म्हणजे काही काळ तसा वागतही होता. अजूनही जुन्या पक्षात असणार्‍या बर्‍याच व्यक्तींना इथले स्वातंत्र्य आणि आपुलकी मोहावत होती.

पाहता पाहता नव्या पक्षाचे नाव सर्वत्र दुमदुमू लागले. इथल्या कार्यकर्त्यांचे काम पाहून नव्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी इथे येऊ लागल्या. सगळं आनंदात सुरू होतं. जुन्या पक्षातल्या काही मंडळींनी ह्या नव्या पक्षाला आपल्या परीने त्रास देण्याच्या प्रयत्नही केला. पण ह्या नव्या नेत्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी सर्व हल्ले व्यवस्थीत परतवून लावले. पक्ष बांधणी केली, आपला पक्ष मजबूत केला.

सुरुवातीला नेता स्वतः जातीने सगळ्यांची विचारपूस करत होता. सगळ्यांशी चांगले संबंध राखून होता. जस जसं पक्षाचं काम वाढलं तस तसं ह्या नेत्याला सगळीकडे लक्ष देणं कठीण होऊ लागलं. म्हणून मग त्याने पक्षातली काही लोकं निवडून त्यांना पदाधिकारी बनवलं आणि पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर सोपावली. आता आपल्यातल्याच काही मंडळींना पदोन्नत्ती मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. पण इतिहासाची पुनरावॄती होते असं म्हणतात तसंच ह्या पक्षातही होऊ लागलं. नवे पदाधिकारी आपण काही काळापूर्वी कार्यकर्ते होतो हे विसरून अधिकाराचा माज दाखवू लागले. कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटिसी पाठवू लागली. नवा नेताही पदाधिकार्‍यांवर विश्वास ठेऊन ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करू लागला. जनसंपर्क तुटल्याने पडद्यामागच्या हालचाली त्याला कळत नव्हत्या. गोष्टींची केवळ एकच बाजू समोर येऊ लागली. कुणी काही बोललं तर त्याचा आवाज दडपून टाकण्यात येऊ लागला. पदाधिकार्‍यांविषयी काही बोलणं म्हणजे नेत्याचा अपमान असं नवं समिकरण रूढ करण्यात आलं.

पक्षावर प्रेम असणारी मंडळी नेत्यावरील प्रेमापोटी आणि पक्षासाठी हे सहन करत होती. पण आत कुठे तरी असंतोष खदखदू लागला होता. सगळ्यात वाईट काही घडलं असेल तर हे की काही दिवसापूर्वी समानतेची भाषा करणार्‍या नेत्याने अचानक एके दिवशी मालकी हक्काची भाषा सुरु केली. "मी ह्या पक्षाचा मालक आहे, जमत नसल्यास चालू पडा" हे त्याच्यावर नी त्याच्या पक्षावर जिवापाड प्रेम करणार्‍या लोकांनाच तो ऐकवू लागला. भले आपण नवा पक्ष स्थापायची हिंमत दाखवली पण आपल्या एकट्याच्या जीवावर हा पक्ष आहे त्या उंचीवर पोहोचणं अशक्य होतं हे विसरून आपल्याच माणसांना फाट्यावर मारू लागला. ह्या बदलाने स्वाभाविकपणेच सामान्य कार्यकर्ते गोंधळले. आपण हे जे केलं ते कुणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न लोकांना पडला. त्यांच्या पक्षावरील प्रेमाचा अर्थ दुसरा पर्याय नाही म्हणून इथे आहेत असा लावला गेला. ज्या गोष्टी करण्यास मज्जाव होतो म्हणून आपल्या नेत्याने बंडाचा झेंडा उभारला त्याच गोष्टी आता नव्या पक्षातही करण्यावर बंधन आल्याने नव्या पक्षाच्या स्थापनेच्या उद्धीष्टांनाच हरताळ फासल्याची भावना सर्वांच्या मनात होती. त्यातून पदाधिकारीही पक्ष स्वतःच्या मालकीचा असल्याच्या थाटात वावरू लागले. कार्यकर्त्यांवर बंधनं घातली गेलीच पण अनेक कार्यकर्त्यांना पक्षातून तडकाफडकी काढलेही गेले. जिथे समानतेचे आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे गायले जायचे त्याच पक्षात आता अनेक बंधनं आली. बरं, नियम बदलले तर ते कळवण्याची तसदीही घेतली नाही अथवा कुठे नियमांची यादीही देण्यात आली नाही. कुणी विचारलं तर पुन्हा उघड्या दरवाजाकडे बोट दाखवण्यात आलं. वातावरण गढूळलं.

सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या राजकारणात नसलेली अनेक माणसं प्रथम ह्याच पक्षात आली होती. सामाजीक कार्याची सुरुवात त्यांनी इथूनच केली. ह्या पक्षस्थापनेचा इतिहास कळताच आपल्या नेत्याबद्दल असलेला आदरही दुणावला. अशा लोकांत मी सुद्धा होतो. ह्या पक्षाने आत्तापर्यंत मला खूप काही दिलं. मनात येईल ते बोलायचं स्वातंत्र्य दिलं, सामाजीक जाणिवा जागॄत केल्या, जिवाभावाचे मित्रही दिले. पण खेदाने नमूद करावेसे वाटते की मी ज्या पक्षात आलो होतो तो हा पक्ष नाही. आज माझ्या ह्या पक्षात आणि इतर पक्षांत काहीही फरक उरला नाही. तिथे निदान जे आहे ते समोर आहे. काळासोबत सगळंच बदललंय. ह्या पुढे मी ह्या पक्षात राहू शकत नाही. मी बाहेर पडतोय. जसं मी नसल्याने पक्षाला काही फरक पडत नाही तसाच पक्ष नसल्याने मलाही फरक पडत नाही. ह्या पक्षावर माझं पहिलं प्रेम आहे हे जितकं खरं आहे तितकंच आता हा पक्ष इतर पक्षांच्याच वळणावर जात आहे हे ही खरं आहे. जोवर सगळं चांगलं आहे तोवरच ते सोडण्यात मजा आहे. त्यामुळे माझा ह्या पक्षाला रामराम. आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

सदर लेखाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.
 

Comments:

There are 6 comments for भरकटलेल्या पक्षाची कहाणी