मिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल सरकार)

| Labels: | Posted On 8/21/11 at 11:23 AM



दुर्जनांचे निर्दालन जितक्या सातत्याने मिथुनदा करत आले आहेत तितकं सातत्य पोलिसांना दाखवलं असतं तर आज गुन्हेगार स्वस्त साखर, मनमिळावू बायको आणि कामसू सरकारी कर्मचारी ह्यांचा इतकीच दुर्मीळ गोष्ट झाली असती. पण तसे होणे नाही. त्यामुळे आपल्या चित्रपटांतून, विविध अवतार घेऊन मिथुनदा त्यांच्या भक्तांना अन्याय निर्मुलनाचं मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांच्या सहस्त्रावतारांपैकी एक 'जस्टीस चौधरी' आज पुन्हा पाहिला आणि त्याचे परीक्षण करायचा इच्छा अनावर झाली. अर्थात मिथुनदांच्या कुठल्याही कॄतीचं परीक्षण करायची प्रत्यक्ष मिथुनदांशिवाय दुसर्‍या कुणाचीही लायकी नाही. अपवाद फक्त आद्य दुर्जन निर्दालक सुपरस्टार भगवान रजनीकांत ह्यांचा.

जस्टीस चौधरी सिनेमाची सुरुवात होते एका खुनापासून. एका सद्गुणी माणसाला संपवण्यासाठी काही गुंड पोलिसालाच सुपारी देऊन त्याचा काटा काढतात. त्याची बहीण वेगवेगळ्या पोज मधे खूप रडते. कानून के रखवालेच कानून से खिलवाड करत असल्याने तिला कुणी तरी खरा न्याय मिळवण्यासाठी जस्टीस चौधरी कडे जायचा सल्ला देतो.

मिथुनदांची एंट्री. मिथुनदा डोळ्यांतून अंगार ओकत भगवान शंकराची पूजा करतायत. केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत. पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो. मिथुनदा तयार होऊन बाहेर येतात. एक माणूस त्याच्या भावाला वाचवायची विनंती त्यांना करतो. जजशी सेटींग करून त्याच्या भावाला शिक्षा द्यायची दुष्टांची योजना असते. मिथुनदा त्याच्या भावाला अभय देतात. माणूस निघून जातो. मिथुनदांचा सहकारी, छोटन, त्यांना विचारतो की त्याचा भाऊ खरंच निर्दोष आहे का ते चेक करूया का. ह्यावर मिथुनदा त्याला एक युनिव्हर्सल ट्रुथ ऐकवतात "माई के दूध और मजबूर इंसान के आंसुओंमें मिलावट नाही होत है". ऐकणारा धन्य होतो.

पुढे मिथुनदा त्या दुष्ट पोलिस अधिकार्‍याला यमसदनी धाडतात. त्यांच्या हाणामारीच्या दृष्यांच्या वेळी 'टर्मीनेटर' चे पार्श्वसंगीत वाजते हा योगायोग नाही. टर्मीनेटर मधे कोणकोणते गुण असावेत, तो नक्की किती ताकदवान असावा, त्याच्याकडे कोणत्या पॉवर असाव्यात ह्याची कल्पना जेम्स कॅमरूनने मिथुनदांवरूनच घेतली आहे.

तर मिथुनदा आपली अशी अनेक अवतारकार्य पार पाडत असतात. त्यांच्यामुळे बरंच नुकसान सोसावं लागल्याने त्यांचा दुश्मन 'अजगर ठकराल' दुबईहून परत येतो. येऊन मिथुनदांची भेट घेतो. म्हणतो दोस्ती करू, मिळून मिसळून राहू आणि वाटून खाऊ. अर्थातच मिथुनदा त्याला नकार देतात. त्यावर तो क्षुद्र किटक त्यांना म्हणतो 'मेरा नाम है अजगर ठकराल, मै दुश्मन को काटता नही, सीधा निगलता हूं'. त्या अजाण बालकाला मिथुनदांच्या पावरचा अंदाज नसल्याने तो असं बरळतो. त्यावर मिथुनदा त्याला शांतपणे सांगतात 'जस्टीस चौधरी अपने दुश्मनको निगलता नहीं, पालता है, खेलता है'.

अशा कठोर माणसाचा एक हळवा कोपराही असतो. मिथुनदांनी जिच्या पोटी अवतार घेतलेला असतो त्या आईला वाटतं की ते गुन्हेगार आहेत. म्हणून ती त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसते. मिथुनदांना एक भाऊही असतो, तो मात्र त्यांचा भक्त असतो.

सिनेमाच्या सुरुवातीला ज्या मुलीला मिथुनदांनी मदत केलेली असते तिला ते पुढेही सतत मदत करत राहतात. बेरहम जमाना आणि बस्तीवाले तिला मिथुनदांची रखेल समजून तिच्या चारित्र्यावर शक घेतात. मुलीचं चारीत्र्य म्हणजे एक काच असल्याने तिला असल्या दगडांपासून वाचवण्यासाठी आणि पुन्हा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी मिथुनदा तिथल्या तिथे तिला प्रपोज करतात 'मुझसे शादी करोगी?'. मुलगी पार गोंधळते, काहीच बोलत नाही. तिला कळलं नसावं म्हणून ते पुन्हा विचारतात. ह्या वेळी इंग्रजीत 'विल यु मॅरी मी?'. तिचा होकार बघून मिथुनदा तिच्या भांगेत सिंदुर भरून तिच्याशी लग्न केल्याचं घोषीत करतात. लग्नाच्या निमित्ताने एक बेली डांस सदृश सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतो.

इथे अजगर ठकरालची पाचावर धारण बसल्याने तो त्याच्याहून मोठा भाई, डोग्रा - उर्फ शक्ती कपूर, ह्याला आवताण धाडतो. ह्या डोग्राला रक्ताचा वास आवडत असल्याने तो येता जाता स्वतःचीच नस कापून रक्ताचा वास घेत असतो. तो येतो त्या दिवशी त्याचा वाढदिवस असल्याने केक आणलेला असतो. तो केक कापणार इतक्यात ठकरालचा एक माणूस मोठ्या आवाजात बडबड करू लागतो. डोग्राला ऊंची आवाज से नफरत असल्याने तो केक वर डोकं आपटून आपटून आणि गळा कापून त्या माणसाला जीव घेतो.

डोग्रा व्यापाराच्या नावा खाली ड्रग्स आणि हत्यारांचे वितरण करायचा प्लॅन बनवत असतो. त्याला टिव्ही वर मुलाखत देताना बघून मिथुनदा टिव्ही फोडतात आणि भुतकाळात जातात. ते फ्लॅशबॅक मधून आपल्याला त्यांचे वडील, आई, भाऊ, बहीण आणि ओरिजिनल बायको ह्यांचे दर्शन घडवतात. एकच खटकतं ते म्हणजे त्यांच्या बायकोचा एक डायलॉग - 'दिनभर तो आप अदालत में रेहते हैं, और घर आने पर टिव्ही लगाके बैठ जाते हैं' अशी मर्त्य मानवांबद्दल करायची तक्रार मिथुनदांची बायको त्यांच्या बद्दल करते. मूर्ख, अजाण बाई.

त्यावेळी मिथुनदा खरोखरच न्यायालयात जस्टीस असतात. न्यायनिष्ठूर मिथूनदा डोग्राच्या भावाला त्याच्या गुन्ह्यांसाठी सजा ए मौत सुनावतात. बदला म्हणून डोग्रा त्यांची बायको, बहीण आणि वडिलांची हत्या करतो त्यांच्या डोळ्यादेखत करतो. घरासमोरच्या लॉनवरच तिघांच्या चिता पेटवण्यात येतात. मिथुनदांच्या भावाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत असतात. पण त्याचा चेहरा पाहून हे कळत नाही की डोळ्यात पाणी दु:खामुळे आलंय की चितेच्या धूरामुळे.

सुडाने पेटून मिथुनदा आता डोग्राची माणसं मारू लागतात. तेव्हा त्यांना जहांगीर नावारा एक डॉन भेटतो आणि इथूनच मिथुनदांचा न्यायाधीश ते समांतर सरकार असा प्रवास सुरू होतो.

बॅक टू वर्तमान. मिथुनदा डोग्राला भेटून आधी त्याच्या दोन भावांना आणि मग त्याला मारणार असल्याचं सांगतात. त्यानुसार ते एका भावाला मारतात. डोग्रा त्यांची सुपारी एक शार्प शूटरला देतो, जो मिथुनदांवर गोळी झाडतो. मिथुनदा त्याच्या मेल्याचं नाटक करतात. मिथुनदा मरत नाहीत त्यांना लागून गोळीच मरते. आता ते डोग्राच्या दुसर्‍या भावाला मारतात.

इथे डोग्राची माणसं मिथुनदांच्या भावाला जखमी करून त्याच्या प्रेयसीला पळवून नेतातत. अजगरचा भाउ तिच्याशी पाट मांडणार इतक्यात मिथुनदा तिथे पोचतात. आपल्या अक्षय बंदुकीने दुष्टांना नाश करतात आणि डोग्राला पकडून भाऊ ऍडमीट असलेल्या हॉस्पिटल मधे पोचतात. इथे ते त्यांची आई, बायको आणि भावाची प्रेयसी ह्यांना सांगतात की मी गुंड झालो कारण डोग्रापर्यंत पोचायचा तो एकच मार्ग होता. आता त्याला मारून ते स्वतःला कानूनच्या हवाले करणार असतात.

शेवटी ते डोग्राला गोळी घालतात आणि आईच्या हातात पिस्तुल देऊन आपण गुन्हेगारी सोडल्याचं घोषीत करतात. सिनेमा संपतो.

सिनेमाभर आपल्याला मिथुनदांच्या अनेक लीला पहायला मिळतात. सिनेमा संपला तरी मिथुनदांचे काही मौलीक विचार मोती मात्र मनात घर करून राहतातः
१. माई के हाथ का खाना हर बेटे को नसीब नहीं होता.
२. जस्टीस चौधरी सिर्फ एक ही बार माफ करता है, दुसरी बार माफी नहीं मौत मिलेगी.
३. आग और बारूद एक दुसरे से हाथ मिला ही नहीं सकते.
४. मेरे सामने तेरी औकात इतनी भी नहीं के मै तुझे अपना दुश्मन समझुं.
५. मै जिसे रेकमेंड करता हुं उसे इंटरव्ह्यु देने की जरूरत नहीं पडती.
६. जस्टीस चौधरी जुर्म के भयानक जंगल का शेर है. और जो एक बार शेर की पनाह में आ जाता है, भेडिये उसकी तरफ आंख उठाकर भी नहीं देखतें.


माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे दर्शवणारी, अन्यायाविरुद्ध लढायची प्रेरणा देणारी, मनोरंजन करणारी, राग लोभ माया मत्सर काम क्रोध ह्यांचा उत्कट आविष्कार असणारी कलाकॄती म्हणजे जस्टीस चौधरी. आपण नक्की बघा आणि अभिप्राय कळवा. सिडी नाही मिळाली तर पूर्ण सिनेमा आंतरजालावर उपलब्ध आहेच. लवकरच भेटू मिथुनदांच्या अजून एका अवताराची माहिती घेऊन.


आपला,

(मिथुनभक्त) आदि जोशी

Comments:

There are 7 comments for मिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल सरकार)