बोळा निघाला, पाणी वाहतं झालं :-)

| Labels: | Posted On 10/31/18 at 12:24 PM

मराठी भाषा दिनानिमित्त झी मराठी दिशामधे प्रकाशित झालेला लेख

सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्‍याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस्य आहे.
नवी पिढी मराठीत बोलत नाही, रोजच्या जगण्यातून आणि व्यवहारातून मराठी हद्दपार होत आहे अशी ओरड सुरु आहे. आणि ही ओरड मराठीतच सुरु आहे. पण खरंच तशी परिस्थिती आहे का? काही वर्षांपूर्वी थोड्याफार प्रमाणात होती. आणि आता बर्‍याच प्रमाणात नाही. पण हे जे काही मागच्या काही वर्षात होतं ते मराठी माणसाच्या मराठी विषयीच्या आटत चाललेल्या किंवा पातळ होत असलेल्या मायेमुळे नव्हे.
सामान्यपणे व्यक्त व्हायला गरज असते माध्यमाची आणि पूर्वी ती फारच कमी प्रमाणात उपलब्ध होती. म्हणजे एखाद्याला काही लिखाण करायचं असेल तर डायरी, कवितांची वही ह्या पलिकडे शक्यता नसायची. जगापर्यंत पोचायचं तर काही मासिकं आणि वाचकांचा पत्रव्यवहार हीच साधनं होती, पण ती ०.०१ लोकांनाही सहज उपलब्ध नव्हती. स्वतःला वेगवेगळ्याप्रकारे सिद्ध करून, खपेल असं लिखाण करून, प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढून, पुस्तक विकले जाण्यासाठी नवस बोलून लेखक होणे ही प्रक्रिया अतिप्रचंड वेळखाऊ आहे.
पण काही काळापूर्वी क्रांती झाली. संवाद माध्यमांची क्रांती. आंतरजालाने केवळ माहितीचा रूक्ष स्त्रोत हे स्वतःचे रुपडे पालटून मनोरंजनाचे साधन हा अवतार धारण केल्यापासून लोकांना व्यक्त होण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध झाली. त्यात भर पडली फोनेटिक युनिकोड फाँट्सची. इंग्रजी किबोर्ड वापरून मराठी अक्षरं उमटायला लागल्यावर लोकांच्या प्रतिभेला अक्षरशः नवा बहर आला.
पूर्वी आंतरजालाची भाषा जी मुख्यत्वे इंग्रजी होती ती आता प्रत्येकासाठी वेगळी झाली. सोशल मिडियाने केवळ लोकांना एकत्रच आणले नाही तर त्यांना त्यांच्या भाषेत संवाद साधायचाही पर्याय दिला. आणि हे झाल्यावर जनता सुटलीच. जगाच्या कानाकोपर्यात वसलेल्या मराठी जनांना ह्या www ने मराठी भाषेच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र आणलं.
ह्या जगात वावरणारी लोकं बघितली, नवी पिढी अथवा जुनी, तर एक गोष्ट सहज लक्षात येते की इथे मराठी माणूस मुख्यत्वे मराठीतच व्यक्त होतो. अनेक संस्थाळं, ब्लॉग्स, फेसबुक पेजेस ह्यांनी मराठी माणसाला मराठीतून संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. लोकांना व्यक्त व्हायला आणि त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवायला नवी माध्यमं उपलब्ध झाली. आता एखाद्याला त्याची कथा, कविता, संपादकांकडून साभार परत यायची धाकधूक न बाळगता आपल्या फेसबुक पेज, ब्लॉगवर लगेचच टाकता यायला लागली.
अनेक वर्षांनी माळे साफ करताना एखादी जुनी वही सापडून साक्षात्कार व्हायचा 'अरे, आपली आई किती छान कविता करायची'. मराठीत अशा उत्तम लेखक, कवयित्री असलेल्या अनेक जणी आहेत. पण हे त्यावेळी स्वतःपुरतं मर्यादीत होतं कारण दुसरा पर्यायच नव्हता. मासिकं आणि पेपरवाले तरी कुणाकुणाचं आणि किती छापणार? साहित्य सेवा करायचा उदात्त हेतू असला तरी आर्थिक गणित जुळवताना नवोदितांपेक्षा प्रस्थापितांना झुकतं माप मिळणं स्वाभाविकच होतं. क्षमता असूनही संधी न मिळालेले अनेक लेखक आणि त्यांच्या लिखाणाला डायरीतून बाहेर काढायला ही क्रांतीच कारणीभूत आहे.
महत्त्वाचं म्हणजे 'राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कवणे चालोची नये?' ह्याप्रमाणे प्रत्येकालाच उत्तम लेखक होता येत नसले तरी व्यक्त होणे ही प्रत्येकाचीच गरज असते. त्यामुळे 'सुघटीत लिहिता येत नाही म्हणून लिहूच नये की काय?' ह्या प्रश्नाला सामोरे जायचे बळही सोशल मिडियानेच दिले. वर्तमानपत्र अथवा अजून कुठे लिहून ते लोकांना आवडेल का? लोकं काय म्हणतील? ही भीड चेपली जाऊन नवे प्रयोग करून बघायचा आत्मविश्वास वाढीला लागला. अक्षरास हसू नये टाईप लाज जाण्याची भीती चेपून माझ्या वॉलवर मी न लाजता काहीही लिहेन हा आत्मविश्वास निर्माण झाला. थोडक्यात मुक्तछंदाने अनेक कवींची जी सोय केली तीच सोय ह्या नव्या माध्यमाने लेखकांची केली.
आज मराठी साहित्य विश्वात ही नव्या लेखकांची, नव्या वाचकांची पिढी फार मोठे बदल घडवत आहे. एक वैयक्तीक ब्लॉग लेखक ते प्रत्यक्ष पुस्तकांचे लेखक हा प्रवास बर्‍याच जणांनी परंपरेने चालत आलेल्या पायर्‍या ओलांडून अल्पावधीत पार केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुस्तकांची विक्रीही सुद्धा पूर्णपणे ह्याच माध्यमातून होत आहे. उदाहरणार्थ, आपल्या फेसबुकवरील ललित कथांचे पुस्तक ते भयकथा आणि गुन्हेगारी कथांचे संग्रह प्रकाशीत करणारे सचिन परांजपे ह्यांनी आपले लिखाण लोकांपर्यंत पोचवून आपला स्वतःचा असा वाचक वर्ग ह्याच सोशल मिडियातून उभारला आहे. मंदार जोग ह्यांनीही ह्याच माध्यमाच्या ताकदीचा प्रभावी उपयोग करून आपल्या पुस्तकांचे लेखन, जाहिरात आणि प्रकाशन केले. पुस्तकांच्या अर्ध्याहून अधीक प्रती प्रकाशनापूर्वीच ह्याच माध्यमातून विकल्या. आणि ही दोन केवळ प्रातिनिधिक उदाहरणं झाली.
सार्वजनीक लेखनाचा श्रीगणेशा इथून करणारे जसे अनेक इथे आहेत तसेच नवोदित लेखकांना समजून घेऊन चार युक्तीच्या गोष्टी सांगणारे ज्येष्ठ लेखकही आहेत. लेखकांसोबतच अनेक नवे वाचकही इथे निर्माण झाले कारण त्यांनाही आता साहित्य सहजपणे उपलब्ध होऊ लागले. फेसबुक, ब्लॉग्ज, वेबसाईट्स ह्यांनी लेखक आणि वाचक ह्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर उभे केले. पूर्वी लेख लिहिला तर वाचकांचे पत्र येईपर्यंत तो लोकांना कसा वाटला हे लेखकाला समजायची सोय नसे. आता मात्र लेख वाचला की लगेच तो कसा वाटला हे सांगण्याचीही सोय निर्माण झाली आहे.
आणि एकदा इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठीतून संवाद होऊ लागल्यावर नव्या पिढीली ही आपली भाषा आहे आणि आपणच ती जपायला हवी हे सुद्धा मनापासून पटले. त्यामुळेच स्वतःच्या ब्लॉगवर आवर्जून फक्त आणि फक्त मराठीतच लिहिणे असो की मराठी दिनानिमित्त वाचक कट्टे भरवणं असो, सगळं काही इथे नव्याने सुरू झालं. नवी पिढी भलेही जुन्या पिढीसारखं खिडकीत बसून कादंबर्‍या वाचत नसेल, पण ह्या आंतरजालाच्या खिडकीत आवर्जून मराठीच वाचली जाते.
अर्थात ह्या सगळ्या मंथनातून सुंदर सुप्रभातचे रतीब घालणारे, J1 झालं का? च्या जिलब्या पाडणारे, बॅनर मंत्री, मीम सम्राट अशी रत्नही बाहेर आली हा वेगळा भाग. पण लोकं मराठीत लिहिती झाली, बोलती झाली ही फार मोठी गोष्ट आहे. लोकं आपल्या मातॄभाषेत व्यक्त होऊ लागली. संवादाच्या माध्यमाचा बोळा निघाला, पाणी वाहतं झालं.
-
आदि जोशी

थंडी गॉन… घाम ऑन!!!

| Labels: | Posted On at 12:19 PM

चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो?
लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही. पण आजकाल कसलाच भरवसा राहिला नाही हेच खरं.
काही गोष्टींसाठी मुंबईकर एकदम अनप्रिपेअर्ड असतात. उदा.: पहिल्याच रिक्षा/टॅक्सी चालकाने आपल्यालं हवं तिथे यायला हो म्हणणे, कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळी ट्रेन रिकामी दिसणे, फुटपाथवर चक्क चालायला जागा असणे... ह्यातच थंडी अनुभवणे ह्या गोष्टीचा समावेश आहे. मुंबईकरांनी थंडीची अजिबात म्हणजे अजिबातच सवय नाही. नाही म्हणजे इतकी नाही की मुंबईकरांचे एसी सुद्धा कधी २०-२२ डिग्रीच्या खाली चालत नाहीत.
जगबुडी होत असताना मुंबईकर अगोचरपणा करून पाण्यातून चालत घरी जातील, रॅकवर ठेवलेल्या बॅगेत बाँब असू शकतो ही सूचना ऐकत उभ्या उभ्या झोप काढतील, इतकंच नव्हे तर ग्लोबल वॉर्मींगलाही मुंबईकर घाबरत नाही कारण 'वॉर्मींग झालंच तर फार फार तर अजून थोडा घाम येईल, त्यात काय...'.
पण... पण... पण... थंडीत करायचं काय हे मात्र त्यांना कळत नाही. पंखा लावायचा नाही तर झोप कशी येणार? गरम हवा खोलीभर फिरवण्यासोबत मुंबईतल्या पंख्याचे मुख्य काम म्हणजे एका लईत आवाज करून माणसांना गाढ झोपवणे. ही अंगाई बंद झाल्यापासून झोपही उडाली.
असे एकंदरीत कठीण दिवस सुरू होते. खिशातले रुमाल कोरडे राहत होते. पंख्यावर जळमटं साठत होती. 'फिलींग कूल इन मुंबई' असे अपमानास्पद हॅशटॅग फिरवले जात होते. 'मुंबईत ॠतू दोनच' हे ब्रह्मवाक्य बदलावं लागतं की काय अशी वेळ आली होती. स्वतःच्याच घरात 'बबन चड्डी आणि बनियान' ह्या जागतीक युनिफॉर्मवर वावरायची सोय राहिली नव्हती. स्वेटर, शाली, दुलया ह्या शोभेच्या वस्तूंची घडी मोडावी लागते की काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कॄपेने शेवटी आज तो आलाच.
ऑफिसला जात असताना कानामागून ओघळणारा, आपण मुंबईतच असल्याची खात्री पटवणारा, माझा नवसाचा घामाचा थेंब.

-
अट्टल मुंबईकर,
आदि जोशी

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

| Labels: | Posted On 3/15/18 at 5:25 PM


.
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
.
अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे.
रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते.
प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो. साबणालाही भावना असतात. मन स्वच्छ करणारा साबण मात्र कुणी बनवला नाही. पण काहीही असलं तरी 'नाही निर्मळ मन, काय करील साबण...' असं म्हणून अंघोळ टाळणं हा पलायनवाद आहे. पाणी वाचवायचे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं. भावना उचंबळत्या, विचार प्रगल्भ आणि जाणीवा टोकदार असल्या की आयुष्याला नवी दिशा मिळते.
आयुष्य फार सुंदर आहे. फक्त नजर हवी. सकाळी जेव्हा चहा पितो तेव्हा त्यातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच अस्तीत्व एकमेकांत विरघळवून टाकलेलं असतं. चहा पावडर, दूध, साखर, आलं, गॅस... प्रत्येकानी स्वतःची चव जपली तर चहाची चव येणार कशी? आणि चहाची चव आली नाही तर किक न बसल्याने सुखाच्या प्रत्येक अनुभुतीसाठी कुंथावं लागणार. तसंच आयुष्याचं आहे. कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच वेगळं अस्तीत्व जपलं तर घरात आणि लोकल ट्रेनच्या डब्यात फरक तो काय? सगळे एकत्र बसणार, जाणारही एकाच ठिकाणी... पण कुणाचा कुणाशी संबंध नाही. मोटरमनरुपी आई आणि गार्डरुपी बाप ह्यांच्यामधे पोरं चेन खेचायची वाट बघत बसतील. गंमत बघायला जमणारे पाकिटमार नातेवाईक वेगळेच.
सकाळी पेपर पूर्ण वाचून झाल्यावर त्या २०-२२ पानांमधल्या ठळक बातम्याच केवळ लक्षात राहतात, फाफट पसारा विस्मॄतीत जातो. तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्‍या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या. वर्तमानपत्राचा उपयोग दुसर्‍या सकाळी कशासाठी केला जातो ते माहिती आहेच. जशा आपल्याला आठवणी असतात तशाच लोकांनाही असतात. त्यामुळे लोकं आपल्याला कसं आठवतात हे सुद्धा महत्वाचं आहे. काही गोष्टींचा वापरानंतर कचरा होतो, पण फुलांचं मात्र निर्माल्य होतं.
आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्‍या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे. शेणावरून आठवलं, गाईच्या शेणाला पंचगव्यात स्थान आहे; बैलाच्या शेणाला मात्र बुलशीट म्हणतात.
अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं.
आठवणींची अंडी मात्र उबवू नये.

आपला,
आदि जोशी

दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेचे उमाळे

| Labels: | Posted On at 5:24 PM


आज कैक वर्षांनी शाळेच्या गॄपने त्यांच्या बॅचचे स्नेहसंमेलन करायचे ठरवले होते. तसा बाब्या इतक्या वर्षांनी सगळ्यांना परत भेटण्यास शष्पभरही उत्सुक नव्हता. प्रत्यक्ष शाळेत असतानाही बाब्याची शाळेत जायची अजिबात इच्छा होत नसे.
एक तर ह्या शाळेच्या गॄपने त्याला वात आणला होता. रोज सकाळी गुरु = देव, शाळा = देवालय, विद्यार्थी = दगड, शिक्षक = मूर्तीकार असले मेसेज वाचून त्याचं डोकं सरकायचं. लोकांना शाळेच्या आठवणीने भरून वगैरे यायचं, आपण आज आहोत ते शाळे मुळे वगैरे जिलब्या तर नेहेमीच्याच होत्या. पण आपल्या आजच्या कारकुनी आयुष्यात शाळेचे योगदान नक्की काय हे बाब्याला न सुटलेले कोडे होते. बाब्याच्या शाळेच्या आठवणी एक तर अत्यंत त्रासदायक अथवा न्युट्रल ह्या प्रकारात मोडणार्‍या होत्या.
सगळ्यात त्रासदायक आठवण म्हणजे तो नववीत असताना शाळेने सुरु केलेला सार्वजनीक रक्षाबंधनाचा आचरटपणा. ज्या वयात वॅलेंटाईन डे साजरा करायचा त्या वयात जबरदस्तीने सगळे सगळ्यांचे वर्गबंधू आणि वर्गभगीनी. पुढे जाऊन ह्यातल्याच २-४ वर्गबंधू-भगिनींनी लग्नही केले होते.
जसजसा दिवस जवळ येऊ लागला तशी गॄपवर स्नेहसंमेलनाची चर्चा जोरात रंगू लागली. अमेरिकेत नोकरीला असलेला एक वर्गमित्र आणि अमेरिकेत नोकरीला असलेल्या मुलाशी लग्न करून अमेरिकेत गेलेली एक वर्गमैत्रीण हे खास ह्या संमेलनासाठी येणार असल्याने खास त्यांच्या सोयीची तारीख ठरवण्यात आली. ह्यावर 'आम्ही काय रिकामे पडलोय काय?' असा प्रश्न बाब्याने अर्थातच मनातल्या मनात विचारला. खरं तर ते दोघं भलत्याच कामासाठी इथे येणार असल्याने एकाच मांडवात दोन्ही लग्न उरकून घेऊ असा विचार करून त्यांनी संमेलनाची तारीख त्यांच्या सोयीने ठरवायला भाग पाडलं होतं.
पण एका गोष्टीसाठी बाब्याला शाळेत जायचं होतं ते म्हणजे मास्तरांना भेटणे. ज्यांनी आपले शालेय जीवन अत्यंत असह्य केले ते सगळे मास्तर आता नक्की कसे आहेत आणि इतक्या वर्षांनी आपल्याला सर ओळखतील का हे त्याला जाणून घ्यायचं होतं. कैक वर्षांपूर्वी एकदा त्याला समोरून येताना बघून मराठीच्या सरांनी रस्ता बदलला होता हे त्याला अजूनही आठवत होतं. गणिताचे सर पाढे विचारतील ह्या भीतीने तो त्यांना बघून स्वतःच रस्ता बदलत असे.
होता होता तो दिवस उजाडला. बाब्या तसा शाळेसमोरून बर्‍याच वेळा जात असे पण आज जवळपास २० वर्षांनी त्याने शाळेत पाऊल ठेवलं. सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. ह्या पायरीवर आपटलो होतो, ह्या कोपर्‍यात उभे असायचो, ह्या बाल्कनीमधे ओणवे असायचो, ह्या खिडकीची काच आपण फोडली होती मग सरांनी आपल्याला तडकवले होते...
अमेरिकेहून आलेल्या मैत्रीणीने ऐनवेळी टांग दिल्याने दोन चार मित्र गळले होते. अमेरिकेहून आलेल्या मित्राच्या भोवती सगळे गोळा होऊन सिंदबादच्या सात सफरी ऐकत होते. मित्रही आपल्याला अमेरिकेत असल्याचा अभिमान नसल्याचा आव आणून जसं बोलता येईल तसं बोलत होता.
मुलांचा, आम्ही अजून कसे फिट आहोत हे दाखवण्याचा आणि मुलींचा, आम्ही अजून कशा अवखळ आहोत हे पटवण्याचा आटापिटा सुरु होता.
एका बाजूला सगळे शिक्षक होते. त्यातल्या एक सरांच्या समोर बाब्या जाऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सर अत्यंत आनंदाने म्हणाले... अर्थातच ओळखलं. कसा आहेस? काय चाललंय सद्ध्या? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX?
बाजूच्या इतर मुलांनाही त्यांनी तेच प्रश्न विचारल्याने बाब्या काय ते समजला.
पुढे दिसले त्यांचे मुख्याध्यापक. इतकं वय होऊनही ते आले होते. ह्यांचं आणि बाब्याचं साताजन्माचं वैर असल्यागत ते बाब्याला कुदवायचे.
त्यांच्या समोर जाऊन बाब्या उभा राहिला आणि त्यांना विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सरांनी त्याला एकदा न्याहाळलं आणि प्रेमाने विचारलं... कसा आहेस काशी?
बाब्याची तार सटकली. काशी हा शाळेचा घंटा बडवणारा प्यून होत. काशी समजल्याचा राग नाही, पण, ज्याला तुम्ही इतकी वर्ष घंटेसारखं बडवलत त्याला तुम्ही ओळखू नये ह्याचा बाब्याला प्रचंड सात्विक संताप आला. राग आणि अपमान गिळून बाब्या पुढे गेला.
दोन शिक्षिका गप्पा मारत बसल्या होत्या. त्यातल्या एक भुगोलाच्या शिक्षिका होत्या, दुसर्‍या त्याला आठवत नव्हत्या. बाब्याने बाईंना वाकून नमस्कार केला आणि तसाच शेजारच्या बाईंनाही केला. त्या बरोब्बर त्या दुसर्‍या बाई उठून उभ्या राहिल्या, बाब्याच्या पाठीत एक जोरात गुद्दा घातला आणि वैतागून म्हणाल्या 'अरे डुकरा नमस्कार कसला करतोस... वर्गात होते मी तुझ्या...' लगेच त्याच्याही डोक्यात प्रकाश पडला. इतकी वर्ष होऊनही आपल्या वर्गमैत्रीणी तशाच हिंसक आहेत हे जाणवून त्याला जरा बरे वाटले.
नंतर भाषणं झाली. त्यात आपल्याला शाळेने कसं घडवलं, शाळा नसती तर मी नसतो, आई वडिलांपेक्षाही शिक्षकांनी कसं समजून घेतलं, शाळेचा बिल्ला अजून कसा जपून ठेवलाय, एमबिएपेक्षा शाळेत मॅनेजमेंट जास्त शिकलो, शाळेतल्या खेळाची मजा ऑलिंपिक गेम्सनाही कशी नाही... असे कैक मुद्दे मांडले गेले. चॅलेंज गेम मधे एकाने दोन एक्के टाकल्यावर पुढच्याने ३ एक्के म्हणावं तसला प्रकार होता सगळा. एका भाषणात तर इतकी गोल गोल भाषा होती की हे आपले शिक्षक अर्जुनाला गीता सांगणार्‍या कॄष्णाचेच अवतार आहेत ह्याची बाब्याला खात्री पटली. शिक्षकांना हे आधीपासून माहिती होतेच.
एकदंरीत आजचा दिवस फुकट गेला असं बाब्याच्या मनात आलं. त्यापेक्षा ४ तास घरी झोपलो असतो.
संमेलन संपता संपता एक सर भेटले. इतर शिक्षकांप्रमाणेच हे सुद्धा आपल्याला नक्की ओळखणार नाहीत ह्याची खात्री बाळगून बाब्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
त्यावर ते ओळखीचं हसून म्हणाले... अजूनही पेन्सिल खातोस का?
हे ऐकल्यावर मात्र बाब्याचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडायला लागला. 'ओळखलंत का सर मला?' ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला एकदाचं मिळालं होतं.

आपला,
आदि जोशी

दवणीय अंडी - अंडे २रे - नात्यांची श्रीमंती

| Labels: | Posted On at 5:22 PM


एसीने थंडगार झालेल्या आपल्या रूममधल्या गुबगुबीत गादीवर ब्लँकेट ओढून झोपलेल्या बंड्याने अजून एकदा कूस बदलली. त्याला काही तरी टोचल्याची भावना झाली. अर्धवट झोपेत असल्याने 'सुख टोचत असेल' असा विचार मनात येऊन त्याने ब्लँकेटखाली हात घातल्यावर टोचणारी वस्तू सुख नसून चार्जरची पीन आहे हे त्याच्या लक्षात आले.
आजकाल बंड्या जरा अस्वस्थच असे. ह्याच्याशी त्याला पडलेल्या केट्यांचा काही संबंध नव्हता. इन जनरच आयुष्य वैराण आहे अशी भावना त्याच्या मनात दाटून येत असेल. सद्ध्या फेबु आणि वॉअॅ वर वाजवीपेक्षा जास्तच पडीक असल्याने ही भावना वरचेवर त्याला छळत असे. भरीस भर म्हणून वयाच्या १२-१५ व्या वर्षी कंपनी काढून अब्जोपती होणार्‍या मुलांच्या गोष्टी वाचल्यापासून तर आपले आयुष्य अगदीच फुकट आहे अशी त्याची खात्री होत चालली होती. कारण अजूनही त्याला विडी काडीचा खर्च सोडवायला मधून मधून बाईक पंक्चर करावी लागत असे.
सगळं काही असूनही नसल्यासारखं होतं. बेडवर लोळत त्याने वॉअॅ उघडून एक एक गॄप चाळायला सुरुवात केली. एका गॄपवरचा एक मेसेज वाचून बंड्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो क्षण त्याची युरेका मोमेंट होती. मेसेजमधे अत्यंत गहन मेसेज होता - ""पैसा कुणीही कमावतो, खरा श्रीमंत तोच ज्याने माणसं कमावली. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा नात्यांची श्रीमंती महत्वाची"".
बंड्या उठून बसला. ब्लँकेट खाली घरंगळल्यावर त्याची उब जाऊन आता त्याला एसीची थंडी बोचू लागली. मगासचा मेसेज डोक्यात होताच. ह्यावरून त्याला कल्पना सुचली... अरे आपल्या आयुष्याचंही असंच आहे... पैशाची ऊब गेली की सत्याची थंडी बोचू लागते*...
*कुठल्याही गोष्टीचा जीवन विषयक तत्वज्ञानाशी बादरायण संबंध जोडण्याची ग्यानबाजी करण्यासाठी हा फॉर्मॅट हमखास उपयोगी पडतो. हे वाचून ते जाणवलं... कशामुळे कशाची आठवण व्हावी ह्याला बंधन नाही. उदा.: पेपर वाचताना जाणवलं आयुष्य वाचायचं राहून गेलं, जात्यातले गहू पाहून जाणवलं आपल्या आयुष्याचंही असंच पीठ होतंय, बँक स्टेटमेंट वाचून जाणवलं आयुष्य टॅली झालंच नाही, ठेवणीतले कपडे घडीवर खराब झालेले पाहून जाणवलं मधून मधून मनाच्या घड्याही उलगडायला हव्यात, कुत्रा आणि खांबाला बघून जाणवलं नियतीने आपल्यावरही असाच पाय वर केलाय...
तर, हा साक्षात्कार झाल्यामुळे आता बंड्या स्वस्थ बसणे शक्य नव्ह्ते. त्याला आयुष्याची गोळाबेरीज नव्याने करायची होती. नात्यांची श्रीमंती वाढवायची होती. त्याने लगेच घर सोडून जायचा निर्णय घेतला. आई वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट त्याने घरी ठेवली. फक्त मोबाईल आणि पॉवरबँक आठवणीने खिशात टाकली. जाताना बाबांच्या स्टडी टेबलवर एक चिठ्ठी लिहून ठेवली "स्वतःचा शोध घ्यायला घर सोडून जातोय. माझा शोध घेऊ नका." घराबाहेर पडल्यावर त्याला आठवले की आपण चिठ्ठीखाली सही न केल्याने, मी/ताई/आई/सखू बाई ह्या पैकी नक्की कोण घर सोडून गेलंय, हे वडिलांना कळणार नाही. पण तरीही तो मोठ्या निर्धाराने निवडलेली वाट चालू लागला.
घराजवळच्या बसस्टॉपवर त्याला एक बाई बसची वाट बघत असलेली दिसली. बायका पुरुषांच्या मानाने जास्त मायाळू असल्याच्या समजुतीतून त्याने इथूनच नवी नाती जोडायला सुरुवात करायचे ठरवले. त्या पाठमोर्‍या बाईंच्या मागे उभे राहत छप्पन सशांची व्याकूळता चेहर्‍यावर आणून बंड्याने सुरुवात केली ‘नमस्कार...' हे ऐकल्यावर ती बाई चटदिशी वळली आणि आपले खरखरीत हात त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली... 'क्या रे चिकने...'
बंड्या तीन ताड उडाला. इथे धोका आहे आहे जाणवून लगेच तिथून सटकला.
थोडं पुढे गेल्यावर त्याला एक मासेवाली दिसली. तिच्यासमोर उभा राहून तो प्रेमाने म्हणाला... 'आजपासून तुम्हीच माझ्या आई...' उत्तराच्या अपेक्षेत असताना अगदीच अनपेक्षीत ते घडलं. मासेवालीने कोयता काढून त्याला शिव्याच घालायला सुरुवात केली... 'साले सकाळी सकाळी नवटाक मारून येतात नी धंद्याची खोटी करतात... पुन्हा आलास तर उभा चिरेन...'
बंड्या भलताच गडबडला. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. जीव वाचवून तो पळाला. अजून एक प्रयत्न फसला होता. पण… 'तुम्ही अपयशी तेव्हाच होता जेव्हा तुम्ही प्रयत्न करायचे थांबता' ही ओळ आठवून त्याने दुसरा रस्ता धरला.
थोड्या वेळाने त्याला एक भाजीवाल्या आज्जी दिसल्या. म्हातारी प्रेमळ वाटत होती. त्यामुळे इथे रिस्क कमी आहे असं वाटून तो त्यांच्या समोर बसला आणि मगासचाच डायलॉग टाकला... 'आजपासून तुम्हीच माझ्या आई...' म्हातारीने एक क्षण त्याच्याकडे बघितलं आणि मायेने म्हणाली 'असं म्हणतोस??? बरं...' मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा आणि एकमेकांच्या चौकशा झाल्यावर बंड्याला कळले की म्हातारीला स्वतःची आणि सवतीपासून अशी एकंदरीत ४ मुलं आणि ३ मुली आहेत. त्यातल्या दोघा मुलांचं लग्न होऊन त्यांनाही प्रत्येकी २-२ मुलं आहेत. त्यामुळे म्हातारी भलतीच श्रीमंत असल्याचा साक्षात्कार झाल्यावर बंड्या तिला म्हणाला 'चला आई, मी आजपासून तुमच्यासोबत राहणार...' हे ऐकून म्हातारी म्हणाली 'अरे माझ्या घरात आधीच डझनभर माणसं आहेत. उलट मीच तुझ्याकडे रहायला यायचा विचार करत होते.' आता बंड्या गडबडला. म्हणाला 'मीच स्वतः घर सोडून आल्याने तुम्हालाच मला तुमच्या घरी न्यावं लागेल...' ह्यावर म्हातारीने 'लैच शाना हैस...' असं म्हणून त्याला एक काकडी फेकून मारली.
बंड्याचा आता फार म्हणजे फारच भ्रमनिरास झाला होता. सकाळपासून नात्यांची श्रीमंती सोडाच चव्वनीही त्याच्या नजरेस पडली नव्हती. रेडिमेड इतका मोठा मुलगा मिळूनही कुणी आई व्हायला तयार नाही ह्याचं त्याला फारच वैषम्य वाटलं. तितक्यात त्याला जाणवलं की त्याला भूक लागली आहे आणि अशक्य घाम आला आहे. फिरता फिरता तो एका हॉटेलसमोर आला. हॉटेल बर्यापैकी महाग वाटत होतं. इतर वेळी तो विचार न करता आत गेलाही असता, पण आज खिशात पैसे नसल्याने आता ह्या हॉटेलवाल्याला मामा बनवून काही मिळते का बघावे असा विचार त्याने केला.
तितक्यात 'अरे बंड्या!' अशी हाक ऐकू आली. ती त्याची शैला मावशी होती 'कॉलेजच्या वेळेत इथे काय करतोयस रे?' त्यावर भूक लागली होती म्हणून हॉटेल शोधत होतो असं उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. मग मावशी त्याला हॉटेलात घेऊन गेली, यथेच्छ जेऊ घातलं, बील भरलं, गाडीने घरी सोडलं, वगैरे वगैरे सगळं झालं.
आई बाबा अजून घरी आले नव्हते. गुपचूप बंड्या त्यांच्या रूममधे गेला आणि सकाळी लिहिलेली चिठ्ठी फाडून टाकली. आपलं हस्ताक्षर इतकं गचाळ असल्याची त्याला आज पहिल्यांदाच लाज वाटली.
चिठ्ठी फाडून बंड्या त्याच्या रूममधे गेला. एसी लाऊन, दुलई ओढून, गुबगुबीत गादीवर लोळत त्याने वॉअॅ उघडले आणि सकाळच्या मेसेजला रिप्लाय केला 'नात्यांची श्रीमंती शोधण्यापेक्षा श्रीमंत नातेवाईक शोधा...'
आज बंड्या बर्‍याच दिवसानी शांतपणे झोपला. झोपण्यापूर्वी ती टोचणारी चार्जरची पीन बाजूला करायला तो विसरला नाही. आता बंड्या आतून-बाहेरून सुखी आहे.

आपला,
आदि जोशी