दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेचे उमाळे

| Labels: | Posted On 3/15/18 at 5:24 PM


आज कैक वर्षांनी शाळेच्या गॄपने त्यांच्या बॅचचे स्नेहसंमेलन करायचे ठरवले होते. तसा बाब्या इतक्या वर्षांनी सगळ्यांना परत भेटण्यास शष्पभरही उत्सुक नव्हता. प्रत्यक्ष शाळेत असतानाही बाब्याची शाळेत जायची अजिबात इच्छा होत नसे.
एक तर ह्या शाळेच्या गॄपने त्याला वात आणला होता. रोज सकाळी गुरु = देव, शाळा = देवालय, विद्यार्थी = दगड, शिक्षक = मूर्तीकार असले मेसेज वाचून त्याचं डोकं सरकायचं. लोकांना शाळेच्या आठवणीने भरून वगैरे यायचं, आपण आज आहोत ते शाळे मुळे वगैरे जिलब्या तर नेहेमीच्याच होत्या. पण आपल्या आजच्या कारकुनी आयुष्यात शाळेचे योगदान नक्की काय हे बाब्याला न सुटलेले कोडे होते. बाब्याच्या शाळेच्या आठवणी एक तर अत्यंत त्रासदायक अथवा न्युट्रल ह्या प्रकारात मोडणार्‍या होत्या.
सगळ्यात त्रासदायक आठवण म्हणजे तो नववीत असताना शाळेने सुरु केलेला सार्वजनीक रक्षाबंधनाचा आचरटपणा. ज्या वयात वॅलेंटाईन डे साजरा करायचा त्या वयात जबरदस्तीने सगळे सगळ्यांचे वर्गबंधू आणि वर्गभगीनी. पुढे जाऊन ह्यातल्याच २-४ वर्गबंधू-भगिनींनी लग्नही केले होते.
जसजसा दिवस जवळ येऊ लागला तशी गॄपवर स्नेहसंमेलनाची चर्चा जोरात रंगू लागली. अमेरिकेत नोकरीला असलेला एक वर्गमित्र आणि अमेरिकेत नोकरीला असलेल्या मुलाशी लग्न करून अमेरिकेत गेलेली एक वर्गमैत्रीण हे खास ह्या संमेलनासाठी येणार असल्याने खास त्यांच्या सोयीची तारीख ठरवण्यात आली. ह्यावर 'आम्ही काय रिकामे पडलोय काय?' असा प्रश्न बाब्याने अर्थातच मनातल्या मनात विचारला. खरं तर ते दोघं भलत्याच कामासाठी इथे येणार असल्याने एकाच मांडवात दोन्ही लग्न उरकून घेऊ असा विचार करून त्यांनी संमेलनाची तारीख त्यांच्या सोयीने ठरवायला भाग पाडलं होतं.
पण एका गोष्टीसाठी बाब्याला शाळेत जायचं होतं ते म्हणजे मास्तरांना भेटणे. ज्यांनी आपले शालेय जीवन अत्यंत असह्य केले ते सगळे मास्तर आता नक्की कसे आहेत आणि इतक्या वर्षांनी आपल्याला सर ओळखतील का हे त्याला जाणून घ्यायचं होतं. कैक वर्षांपूर्वी एकदा त्याला समोरून येताना बघून मराठीच्या सरांनी रस्ता बदलला होता हे त्याला अजूनही आठवत होतं. गणिताचे सर पाढे विचारतील ह्या भीतीने तो त्यांना बघून स्वतःच रस्ता बदलत असे.
होता होता तो दिवस उजाडला. बाब्या तसा शाळेसमोरून बर्‍याच वेळा जात असे पण आज जवळपास २० वर्षांनी त्याने शाळेत पाऊल ठेवलं. सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. ह्या पायरीवर आपटलो होतो, ह्या कोपर्‍यात उभे असायचो, ह्या बाल्कनीमधे ओणवे असायचो, ह्या खिडकीची काच आपण फोडली होती मग सरांनी आपल्याला तडकवले होते...
अमेरिकेहून आलेल्या मैत्रीणीने ऐनवेळी टांग दिल्याने दोन चार मित्र गळले होते. अमेरिकेहून आलेल्या मित्राच्या भोवती सगळे गोळा होऊन सिंदबादच्या सात सफरी ऐकत होते. मित्रही आपल्याला अमेरिकेत असल्याचा अभिमान नसल्याचा आव आणून जसं बोलता येईल तसं बोलत होता.
मुलांचा, आम्ही अजून कसे फिट आहोत हे दाखवण्याचा आणि मुलींचा, आम्ही अजून कशा अवखळ आहोत हे पटवण्याचा आटापिटा सुरु होता.
एका बाजूला सगळे शिक्षक होते. त्यातल्या एक सरांच्या समोर बाब्या जाऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सर अत्यंत आनंदाने म्हणाले... अर्थातच ओळखलं. कसा आहेस? काय चाललंय सद्ध्या? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX?
बाजूच्या इतर मुलांनाही त्यांनी तेच प्रश्न विचारल्याने बाब्या काय ते समजला.
पुढे दिसले त्यांचे मुख्याध्यापक. इतकं वय होऊनही ते आले होते. ह्यांचं आणि बाब्याचं साताजन्माचं वैर असल्यागत ते बाब्याला कुदवायचे.
त्यांच्या समोर जाऊन बाब्या उभा राहिला आणि त्यांना विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सरांनी त्याला एकदा न्याहाळलं आणि प्रेमाने विचारलं... कसा आहेस काशी?
बाब्याची तार सटकली. काशी हा शाळेचा घंटा बडवणारा प्यून होत. काशी समजल्याचा राग नाही, पण, ज्याला तुम्ही इतकी वर्ष घंटेसारखं बडवलत त्याला तुम्ही ओळखू नये ह्याचा बाब्याला प्रचंड सात्विक संताप आला. राग आणि अपमान गिळून बाब्या पुढे गेला.
दोन शिक्षिका गप्पा मारत बसल्या होत्या. त्यातल्या एक भुगोलाच्या शिक्षिका होत्या, दुसर्‍या त्याला आठवत नव्हत्या. बाब्याने बाईंना वाकून नमस्कार केला आणि तसाच शेजारच्या बाईंनाही केला. त्या बरोब्बर त्या दुसर्‍या बाई उठून उभ्या राहिल्या, बाब्याच्या पाठीत एक जोरात गुद्दा घातला आणि वैतागून म्हणाल्या 'अरे डुकरा नमस्कार कसला करतोस... वर्गात होते मी तुझ्या...' लगेच त्याच्याही डोक्यात प्रकाश पडला. इतकी वर्ष होऊनही आपल्या वर्गमैत्रीणी तशाच हिंसक आहेत हे जाणवून त्याला जरा बरे वाटले.
नंतर भाषणं झाली. त्यात आपल्याला शाळेने कसं घडवलं, शाळा नसती तर मी नसतो, आई वडिलांपेक्षाही शिक्षकांनी कसं समजून घेतलं, शाळेचा बिल्ला अजून कसा जपून ठेवलाय, एमबिएपेक्षा शाळेत मॅनेजमेंट जास्त शिकलो, शाळेतल्या खेळाची मजा ऑलिंपिक गेम्सनाही कशी नाही... असे कैक मुद्दे मांडले गेले. चॅलेंज गेम मधे एकाने दोन एक्के टाकल्यावर पुढच्याने ३ एक्के म्हणावं तसला प्रकार होता सगळा. एका भाषणात तर इतकी गोल गोल भाषा होती की हे आपले शिक्षक अर्जुनाला गीता सांगणार्‍या कॄष्णाचेच अवतार आहेत ह्याची बाब्याला खात्री पटली. शिक्षकांना हे आधीपासून माहिती होतेच.
एकदंरीत आजचा दिवस फुकट गेला असं बाब्याच्या मनात आलं. त्यापेक्षा ४ तास घरी झोपलो असतो.
संमेलन संपता संपता एक सर भेटले. इतर शिक्षकांप्रमाणेच हे सुद्धा आपल्याला नक्की ओळखणार नाहीत ह्याची खात्री बाळगून बाब्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
त्यावर ते ओळखीचं हसून म्हणाले... अजूनही पेन्सिल खातोस का?
हे ऐकल्यावर मात्र बाब्याचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडायला लागला. 'ओळखलंत का सर मला?' ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला एकदाचं मिळालं होतं.

आपला,
आदि जोशी

Comments:

There are 1 comments for दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेचे उमाळे