दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ
| Labels: दवणीय अंडी | Posted On 3/15/18 at 5:25 PM
.
आजचा सुविचारः न पिणार्याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
.
आजचा सुविचारः न पिणार्याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
.
अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे.
रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते.
प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो. साबणालाही भावना असतात. मन स्वच्छ करणारा साबण मात्र कुणी बनवला नाही. पण काहीही असलं तरी 'नाही निर्मळ मन, काय करील साबण...' असं म्हणून अंघोळ टाळणं हा पलायनवाद आहे. पाणी वाचवायचे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं. भावना उचंबळत्या, विचार प्रगल्भ आणि जाणीवा टोकदार असल्या की आयुष्याला नवी दिशा मिळते.
आयुष्य फार सुंदर आहे. फक्त नजर हवी. सकाळी जेव्हा चहा पितो तेव्हा त्यातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच अस्तीत्व एकमेकांत विरघळवून टाकलेलं असतं. चहा पावडर, दूध, साखर, आलं, गॅस... प्रत्येकानी स्वतःची चव जपली तर चहाची चव येणार कशी? आणि चहाची चव आली नाही तर किक न बसल्याने सुखाच्या प्रत्येक अनुभुतीसाठी कुंथावं लागणार. तसंच आयुष्याचं आहे. कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच वेगळं अस्तीत्व जपलं तर घरात आणि लोकल ट्रेनच्या डब्यात फरक तो काय? सगळे एकत्र बसणार, जाणारही एकाच ठिकाणी... पण कुणाचा कुणाशी संबंध नाही. मोटरमनरुपी आई आणि गार्डरुपी बाप ह्यांच्यामधे पोरं चेन खेचायची वाट बघत बसतील. गंमत बघायला जमणारे पाकिटमार नातेवाईक वेगळेच.
सकाळी पेपर पूर्ण वाचून झाल्यावर त्या २०-२२ पानांमधल्या ठळक बातम्याच केवळ लक्षात राहतात, फाफट पसारा विस्मॄतीत जातो. तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या. वर्तमानपत्राचा उपयोग दुसर्या सकाळी कशासाठी केला जातो ते माहिती आहेच. जशा आपल्याला आठवणी असतात तशाच लोकांनाही असतात. त्यामुळे लोकं आपल्याला कसं आठवतात हे सुद्धा महत्वाचं आहे. काही गोष्टींचा वापरानंतर कचरा होतो, पण फुलांचं मात्र निर्माल्य होतं.
आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे. शेणावरून आठवलं, गाईच्या शेणाला पंचगव्यात स्थान आहे; बैलाच्या शेणाला मात्र बुलशीट म्हणतात.
अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं.
आठवणींची अंडी मात्र उबवू नये.
आपला,
आदि जोशी