गोष्टी सांगेन युक्तीच्या चार - ब्लॉग लिहीण्या विषयी थोडेसे

| Labels: | Posted On 5/2/08 at 4:57 PM

मी कोण, मी कुठे, मी कसा, मीच का म्हणून... अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी ब्लॉग लिहीत नाही. विश्वाच्या सुरुवातीपासून माणसाला पडणार्‍या ह्या प्रश्नांची उत्तरं ब्लॉग लिहून मिळणार नाहीत हे मला माहिती आहे. मुळात मला असे प्रश्नच पडत नाहीत. तसंच मी का लिहीतो हा प्रश्नही मला पडत नाही (लोकांना पडत असेल कदाचीत). मी ब्लॉग का लिहितो हा प्रश्न मी सिगरेट का ओढतो ह्या प्रश्ना इतकाच कूट किंवा गहन आहे. आणि ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तरही एकच आहे. मला आवडतं म्हणून. तसा मी ह्या ब्लॉग विश्वात नवीनच आहे. काही महिनेच झालेत लिहायला सुरुवात करून. खरं सांगायचं तर मी मुंबई सोडून इथे बँगलोरला राहायला आलो तेव्हा पासून मला प्रचंड मोकळा वेळ मिळू लागला. मग नुसतंच घरी बसून लोळण्यापेक्षा थोडं लिहिलेलं काय वाईट असा एक वाईट विचार मनात आला आणि मी सुद्धा की बोर्ड बडवायला सुरुवात केली.

माझ्या ह्या काही महिन्यांच्या भटकंतीत ह्या ब्लॉग विश्वा विषयी आलेले माझे अनुभव आणि मी केलेलं निरीक्षण मी येथे देणार आहे. हा उद्योग करायचे मुख्य कारण म्हणजे जे माझ्या नंतर नवीन ब्लॉग सुरू करतील त्यांना इथे रुळण्यासाठी काही मार्गदर्शन करणे हा आहे. यशस्वी ब्लॉग ले़खक / लेखिका होण्या साठी काय करावे ह्याचे हे (सुलभ शौचालया सारखे) सुलभ गाईड. आता माझ्या सारख्या नव्या लेखकाने हे सगळं करणं म्हणजे नुकतीच एफ्. वाय. बी. ए. ला ऍडमिशन घेतलेल्या मुलाने डायरेक्ट शेक्सपियरच्या कासोट्याला हात घालण्यासारखं आहे. पण ठीक आहे.

ब्लॉग यशस्वी पणे सुरू करायचा असेल तर पाहिला नियम म्हणजे स्वतःच खर्‍या नावाने कधीही लिहायचं नाही. एक झक्कास पैकी abstract नाव निवडायचं. मी ब्लॉग सुरू केला आणि तो सुद्धा माझ्या खर्‍या नावाने हे बघून बर्‍याच लोकांना धक्का बसला. नकळतपणे मी आल्या आल्या एक अलिखित नियम मोडला होता. आता हे तुमच्या ब्लॉगचं abstract नाव कसं असावं? तुलना करायची तर एकदम प्रायोगिक नाटकांच्या नावासारखं असावं. माझ्यातला मी, शून्यातलं जग, दुपारचा चंद्र, अंधाराचा किरण, माणसातला माणूस, कुपोषितांची ढेकर, वगैरे वगैरे वगैरे. नाव वाचून काहीही कळत नही. पण नाव जितकं अगम्य आणि हटके तितका लिहिणार माणूस क्रिएटीव असा एक सर्वजनीक गैरसमज आहे. त्याचा फायदा आपण घ्यायचा. कळलं नाही की आपसूकच वाचणारे स्वतःच्या बुद्धीचं दिवाळं निघालंय हे कबूल करण्यापेक्षा छानच आहे, कसं सुचतं, असं म्हणतात. तू लय भारी नी मी ही लय भारी. आणि आपलं लिखाण अगदीच टुकार होऊ लागलं तर आपली चार चौघात अब्रूही जात नाही.

स्वतःच्या इंट्रो मध्येही हा अगम्यपणा कंटिन्यू करायचा. ह्यात सर्वसाधारण पणे स्वतः: विषयी बोलावं. तर असा हा स्वतः:विषयीचा अगम्य इंट्रो कसा लिहावा ह्याचं हे प्रात्यक्षिक:
'मी स्वतः विषयी स्वतःच काय लिहू? विचार केला आणि मला कळलं की मी कोण हे माझं मलाच अजून कळलेलं नाहीये.' ह्या पुढे 'मी कोण हे मला अजून कळायचंय, नी कळल्यावर वळायचंय' असा सूर लावावा. पण इथे आपल्याहूनही मुरलेली जनता आहे ज्यांच्यावर ह्याचा काहीही परिणाम होत नाही. ते ह्याला भीक घालत नाहीत. म्हणून मग हिच री पुढे ओढून 'मी जन्माला का आलो, कुठे जाणार आहे, जगणं म्हणजे नुसतं जिवंत राहणे का, शाळेत शिकणं म्हणजे ज्ञान मिळवणं का, मी म्हणजे मीच आहे की दुसराच कुणी' असेही प्रश्न लिहावेत.
(मला मात्र असे काही प्रश्न कधीच पडत नाहीत. कारण मी कसा नी कोण आहे हे समजावून देण्याचं काम माझ्या आयुष्यात बर्‍याच मंडळींनी न सांगताच केलं आहे. मला पडणारे प्रश्न एकदम साधे सरळ असतात. कट्ट्यावर मित्रं भेटतील का, ऑफिस मधून आज तरी दिवस उजाडायच्या  निघता येईल का, ८:४१ च्या गाडीत ती आज चढेल का, ह्या रविवारी तरी आई दुपार पर्यंत झोपू देईल का, वगैरे वगैरे.)


आता आपल्या ब्लॉगसाठी एखादं abstract नाव निवडलं की आतला मजकूरही तितकाच किंवा त्याहून अधिक abstract हवा. पण हे जमायला प्रचंड मेहेनत लागते. त्यामुळे अशा लिखाणाची सुरुवात मुक्तछंदातल्या कवितांपासून करावी. मुक्तछंद असल्याने यमक जुळवायचा त्रास होत नाही आणि आपली मर्यादित लेखन शक्ती जगापुढे उघडी पडत नाही. तसंच, लोकांना न कळणारी कविता लिहीण्यासाठी मुळात आपल्याला कविता म्हणजे काय हे कळून उपयोगाचे नाही. लिहायला विषयाचे बंधन नाहीये. पण कोलांट्या उड्या मात्र मारता यायला हव्यात. उदाहरणार्थ ही कविता पहा:

"चालता चालता चंद्राला विचारलं, दिवसा तू कुठे असतोस,
चंद्र म्हणाला मी काय सांगू, नील आर्म्सट्राँगला विचार."
- म्हणजे बघा. ह्या कवितेत चंद्राशी बोलण्याच कवित्व आहे, दिवसा तो काय करत असेल ह्याची व्याकुळता आहे आणि वर आर्म्सट्राँगला विचारण्याचा प्रॅक्टिकल विचारही आहे. (हान तिज्या मायला)

प्रेम कविता लिहायची असेल तर ती कारुण्य रसाने ओथंबलेली हवी. चार चौघां सारखं हॅपी एंडिंग कराल तर काळं कुत्रंही वाचणार नाही. यशस्वी प्रेम प्रकरणामध्ये जनतेला कडीचाही इंटरेस्ट नसतो.

"माझं प्रेम आहे तुझ्यावर, असं मी तुला म्हणालो,
तू सुद्धा हेच म्हणालीस, पण... दुसऱ्याला."
- आता ह्या कवितेत, स्वतःचं मन मोकळं करण्याचा मोकळेपणा आहे, तिचा प्रत्येक शब्द ऐकण्याची तपश्चर्या आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे करूण शेवटही आहे. (हान तिज्या मायला)

पण हे सामान्य विषय झाले. तुम्हाला लवकरात लवकर फ़ेमस व्हायचं असेल तर कविता करण्यासाठी विषय सुद्धा हटके निवडायला हवेत. हटके विषय कसा असावा नी त्यावर अजूनच हटके कविता कशी करावी ह्याचं हे प्रात्यक्षिक.

विषय - चालणारा लंगडा (लढ बापू)

"कोपर्‍यावर रोज दिसतो एक चालणार लंगडा.
कुबड्या घेऊन फिरत असतो गावभर,
एकदा म्हणाल मला साहेब मदत करा,
मी म्हणालो अरे मी तुझ्याहून लंगडा आहे,
तिच्यावर प्रेम करून मी ही लंगडा झालोय,
प्रेमाच्या कुबड्या घेऊन मी ही फिरतोय,
तुझ्या फक्त काखेतच कुबड्या आहेत,
माझ्या तर मनालाही कुबड आलंय."

आता ह्या कवितेचा अर्थ मी समजाऊन नाही सांगू शकत. कारण कविता म्हणजे काय हे न कळण्याच्या नियमानुसार ही कविता केली आहे.

असा हा सगळा संसार गोळा केलात की मग आपल्या ब्लॉगचा प्रचार सुरू करायचा. मित्रांना 'आजच कुठेशी ह्या ब्लॉग ची लिंक मिळाली. छान लिहिलय. तुलाही आवडेल म्हणून लिंक पाठवतोय' अशा आशयाची मेल्स टाकायची. आपले मित्रही आपल्या प्रमाणेच निरुद्योगी असल्याने ते हे मेल त्यांच्या मित्र-मंडळींना ढकलतात. नी अशा प्रकारे हा हा म्हणता आपल्या ब्लॉगवरचा हिट काउंट वाढत जातो. काही न कळून सुद्धा वाचणारे स्वतःच्या बुद्दीचं दिवाळं निघालंय हे कबूल करण्यापेक्षा छानच आहे, कसं सुचतं, असं म्हणतात. आणि लिंक पुढे पाठवत रहातात.

ह्या प्रचार सभेची शेवटची पायरी म्हणजे दुसर्‍या ब्लॉगर्सच्या ब्लॉग्सना भेटी देऊन तिथे त्यांची तोंड फुटेस्तोवर स्तुती करणे आणि त्यांच्या ब्लॉगची लिंक आपल्या ब्लॉग वर जोडणे. असे केल्याने ते सुद्धा आपली स्तुती करतात आणि आपल्या ब्लॉगची लिंक त्यांच्या ब्लॉग वर टाकतात. तू लय भारी नी मी ही लय भारी.

तर अशा प्रकारे ह्या काही गोष्टी लक्षात ठेवून ब्लॉग लिहिलात तर तुम्ही लवकरच ह्या ब्लॉगींगच्या चिमुकल्या विश्वात वर्ल्ड फेमस व्हाल. आणि तुम्ही फेमस झालात की तुमच्या ब्लॉग वर माझ्या ब्लॉगची लिंक द्यायला मात्र विसरू नका.

Comments:

There are 9 comments for गोष्टी सांगेन युक्तीच्या चार - ब्लॉग लिहीण्या विषयी थोडेसे