आयुष्याचे नाटक - प्रवेश चौथा

| Labels: | Posted On 6/20/08 at 11:05 PM

प्रवेश चौथा - रियरव्ह्यू मिरर
लग्नाळूपणाला मी आता बऱ्यापैकी सरावलोय. पॉकेट मनी ५, ००० वरून ५, ५०० झालाय. बायकोच्या म्हणण्यानुसार शेपूट अजून पूर्णं सरळ झालेलं नाहीये. पण माझ्या आणि उरलेल्या ४ पांडवांच्या मते मी बराच सुधारलोय. शनिवार, रविवार ९ ला उठतो, स्वतःच्या पांघरुणाची घडी स्वतः घालतो, ऑफिसमधून आलो की मोजे बुटात आणि बूट शू-रॅक मध्ये ठेवतो, चहा पिऊन झाला की कप-बशी विसळून ठेवतो, एक दिवसा आड दाढी करतो (इथे मी भिंतीवर डोकं आपटतोय अशी कल्पना करा) आणि अशाच अजून तत्सम वाईट सवयी मलाही लागत आहेत. थोडक्यात, ऍड्याचा ऍडमीकी व्हायला सुरुवात झालेली आहे (बायको, दुसरं कोण? ).

एका शुक्रवार संध्याकाळी आम्ही कट्ट्यावर बसून आमच्या मौलिक विचारांची आदान प्रदान आणि आमचं जीवना विषयीचं भन्नाट तत्त्वज्ञान वाटत बसलो होतो. आज आमच्या सोबत मध्याचा मावसभाऊ गंट्या आपटे पण होता. गंट्याने मराठीत यम ये केलंय. आपण ह्या जगात थोडे उशीरा आल्याची त्याला खंत आहे. त्याला मनातून समाजवादी व्हायचं होतं. पण आज-काल समाजवाद्यांना कुणी विचारत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत त्याची शरीरयष्टी व खाण्या-पिण्याच्या सवयी बघता त्याने तो विचार तूर्तास बाजूला ठेवलाय. त्यामुळे आतून समाजवादी पण बाहेरून भोगवादी असं दुहेरी आयुष्य जगताना गंट्या दिसामासाने वाढतोय. त्या विषयावर छेडलं तर 'अरे वाढीचं वय आहे माझं' असं सांगून मोकळा होतो.

असो. तर असे आम्ही कट्ट्यावर बसलो असताना एकदम विंचू चावल्या सारखा अथवा झोपेतून अकाली उठवल्यासारखा गंट्या ओरडला.

गंट्या - माणूस लग्न का करतो.???

एक आवाज - अरे कामवाल्या बायकांचे भाव किती वाढलेत आज-काल...

आम्ही सगळे कोरस मध्ये चमकलो. हे आतलं गुपित भर दिवसा, सार्वजनिक ठिकाणी, चार लोकांसमोर मोट्ट्याने ओरडून सांगण्याची हिंमत असलेला हा थोर महापुरुष कोण हे पाहण्यासाठी आवाजाच्या दिशेने माना वळवल्या. पाहतो तर एक माणूस दुसऱ्या कुणाशीतरी फोन वर बोलत होता.

गंट्या - माणूस लग्न का करतो.???

आम्ही सगळे गप्प.

गंट्या - मी सांगतो.

मी - गंट्या, गंटुड्या, गंटोब्या, माझ्या सोन्या, माझ्या गोंडस गुलाबा... तुझं लग्न कुठे झालंय अजून.

गंट्या - म्हणूनच मी ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकतो. सोसायटीच्या टीम मध्येही क्रिकेट न खेळून सुद्धा तुम्ही गांगुलीने कसे शॉट्स मारावेत हे सांगता ना? तर फंडा असा आहे, श्री श्री डार्वीन महाराज इंग्लंडकर ह्यांच्या मते माणूस हा पूर्वी एप सदृश प्राणी होता.

विज्या (मध्याकडे बघत) - पूर्वी???

मध्या - चड्डीत राहा बे साल्या...

गंट्या - अजाण बालकांनो गप्प बसा. मध्ये मध्ये बोलू नका. तर सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात आळशी प्राणी माणूस आहे. आणि माणसांमधला सर्वात आळशी प्राणी म्हणजे पुरूष.

मध्या, विज्या, विन्या (माझ्याकडे बघत) - खरंय...

मी - चड्डीत राहा बे साल्यांनो... असं काही नाही गंट्याशेट. सगळे पुरूष असे नसतात.

गंट्या - बSSSSरं... आता आपण तुझंच उदाहरण घेऊया. तू हॉल मधल्या सोफ्यावर बसल्या बसल्या दात घासतोस, चहा पितोस, नाश्ता करतोस, पेपर वाचतोस, TV बघतोस, जेवतोस, Laptop घेऊन chatting करतोस (मी - अरे Laptop असतोच त्यासाठी) दुपारी TV सुरू ठेवून झोपतोस. म्हणजे तू फक्त झोपायला जाताना आणि अंघोळ करताना त्या सोफ्यावरून बूड उचलतोस.

मी - साल्यांनो तुम्हाला गेम करायला दर वेळी मीच भेटतो का? गंट्या उगाच काहीतरी फेकू नकोस.

गंट्या - मी फेकतोय? बSSSSरं. आता तू नि ह्या मध्याने प्रेमविवाह केलात. प्रेम केलंत ठीक आहे. समजू शकतो. घरातल्या मांजरांनाही प्रेम लागतं. पण विवाह का केलात?

मी - त्याचं असं आहे बाळा, तू अजून दुपट्यात आहेस. थोडा मोठा झालास की सांगीन नक्की.

विन्या - सांग रे. मलाही तुमच्या प्रेमप्रकरणात इंटरेस्ट आहे. ताईला विचारलं होतं. ती म्हणाली 'थोबाड फोडीन, CET चा अभ्यास झाला का? '. पण तू आपला माणूस आहेस बॉस. सांगून टाक तुमची प्रेमकहाणी.

मी - अबे ए साल्या, मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे. आदराने वाग.

विन्या - सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ ही म्हण ऐकली आहेस का?

मी - बSSSSरं. सांगतो. सांग रे मध्या.

मध्या - तू 'शान' पिक्चर पहिलायस का? त्यात एक डायलॉग आहे. फोन से आवाज सुननी हो तो पहले कॉईन डालना पडता है.

मी (एक नाणं काढत) - ये ले. घे टाकून नि कर भुंकायला सुरुवात.

मध्या - तर मित्रहो, आमच्या दोघांचा प्रेमविवाह.

गंट्या - पुढे बोल. आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की विद्या आणि संध्या सारख्या गुणवान मुलींनी तुमच्यात काय पहिलं.

विज्या - मला नाहीये. मी असं कधीही म्हणालो नाहीये.

गंट्या - अरे आम्ही म्हणजे आदरार्थी एकवचन रे सोन्या. बोल तू मध्या.

मध्या - आम्ही लास्ट इयरला असताना संध्या आणि विद्यानी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आमची पहिली भेट झाली कॉलेजच्या गेट वर.

पहिला दिवस असल्याने रॅगींग करण्यासाठी आम्ही ज्युनीयर्सना गेट वरच पकडत होतो. ह्या दोघींनी घाबरत घाबरत कॉलेज मध्ये एंट्री घेतली आणि बघता क्षणीच मला संध्या आणि ह्याला विद्या आवडली. आम्ही आमच्या कंपूला ह्यांना जाऊ दे अशी खूण केली. त्या दोघी दबकत दबकत आता अडवतील मग अडवतील अशी धाकधूक बाळगत निघून गेल्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांना तंबी दिली. ह्या दोघींकडे बघाल तर हात कलम केले जातील.

मग सुरू झाला एक जीवघेणा प्रवास. जीवघेणा अशासाठी की सुरुवातीला आम्हाला ह्या दिसायच्याच नाहीत. मग कळलं की ह्या पहिल्या लेक्चरच्या १० मिनिटं आधी येतात, सगळी लेक्चर्स अटेंड करतात आणि आम्ही कँटिन मध्ये पडीक असताना कॉलेज सुटलं की निघून जातात. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी पासून आम्हीही पहिल्या लेक्चरच्या वेळी कॉलेजला जाऊ लागलो. आई खूश झाली. बाबांना संशय आला.

ह्यांना बघण्यासाठी कॉमर्सला असून आम्ही आर्ट्सची लेक्चर्स अटेंड करू लागलो. पण गाडी पुढे सरकत नव्हती. आम्ही कितीही स्मार्ट, बिनधास्त असलो (इथे कोरस मध्ये हशा आला) तरी मुलींशी बोलायचं म्हणजे हात-पाय थरथरायला लागायचे. त्यामुळे ४ महिने झाले तरी आमची ओळख नव्हती झाली.

पण ती संधी लवकरच आली. आणि ह्या नालायक ऍडी नि त्या संधीची माती केली.

(इथे अचानक सगळ्यांचा इंटरेस्ट वाढला. सगळे कान टवकारून ऐकू लागले. )

मी कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता असल्याने (इथे पुन्हा कोरस मध्ये हशा आला) त्यांच्याशी आमची ओळख झाली. म्हणजे आधी माझी त्या दोघींशी झाली आणि मग मी मग ह्याची करून दिली. त्याबद्दल कबूल केलेली पार्टी ह्याने अजून मला दिलेली नाहीये. असो.

संध्या आणि विद्या दोघींना अभिनयाची आणि गाण्याची आवड. त्यामुळे त्यांनी नाटकात आणि वाद्यवृंदात भाग घेण्यासाठी इच्छुक म्हणून नाव नोंदवलं. त्यांचं दोन्ही कडे सिलेक्शन व्हावं म्हणून आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. कारण मग त्या नंतर आम्हाला आपसूकच तयारी साठी म्हणून त्यांच्या सोबत वेळ घालवता येणार होता.

एलीमीनेशन राउंडाला जे सर होते त्यांना जुनी गाणी आवडत असल्याने मी संध्या आणि विद्याला म्हणालो एखादं जुनं गाणं म्हणा. त्यावर संध्या नाक फेंदारून म्हणाली 'तुला काय करायचंय? ' तिने कुठलं तरी नवीन गाणं म्हटलं. पण आवाज चांगला असल्याने दोघी सिलेक्ट झाल्या. माझा जीव भांड्यात पडला. सरांनी सिलेक्ट झालेल्या लोकांची नावं वाचून दाखवताना तिचं नाव वाचल्यावर मी हसून तिच्याकडे बघितलं. तिने पुन्हा एकदा नाक फेंदारून 'हूं' केलं.

फायनल लिस्ट बोर्डावर लावण्यासाठी मी तयारी करत होतो. ह्या माठ ऍडीला सोबत घेतलं होतं. विद्याच्या ID कार्डची झेरॉक्स हातात आल्यावर आधी हा १० मिनिटं बघतच बसला आणि शेवटी ह्याने Vidya हे नाव मराठीत लिहिताना 'विड्या' असं लिहिलं आणि मी ती लिस्ट न बघता नोटीस बोर्डावर चिकटवली. आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जो ठणाणा झालाय त्याला तोड नाही. आम्ही कॉलेज मध्ये पाऊल ठेवायच्या आत आम्हाला खबर आली 'मराठीचे जोशी सर तुम्हाला शोधतायत'. आम्ही थोडे गोंधळात पडलो. कॉमर्सच्या पोरांना जोशी सरांनी का शोधावं? जोशी सर आमच्या कॉलेजचे उप-मुख्याध्यापकही होते. एकदा वाटलं आपण आर्ट्सच्या लेक्चर्सना बसतो हे त्यांना कळलं असेल. नंतर वाटलं कॉलेज-डे संबंधी काही बोलायचं असेल. शेवटी जे असेल ते असेल, देख लेंगे, असं म्हणून आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो.

इथे मी मध्याला थांबवला 'आता मी सांगतो'.

तर, आम्ही जोशी सरांच्या केबिन मध्ये गेलो. आणि आत जाऊन बघतो तर आत ह्या दोघी बसल्या होत्या. आम्हाला काही उलगडा होईना. सर म्हणाले 'बसा जोशी, बसा रानडे. ' आम्ही बसल्यावर त्यांनी मला आणि मध्याला एक कागद दिला. मी वाचलं तर त्यावर इंग्रजीत Vidya लिहिलं होतं. माझी टरकली. म्हटलं ह्यांना कसं कळलं. मध्याच्या कागदावर संध्या असेल असं वाटलं म्हणून बघितलं तर त्याच्यावरही Vidya च लिहिलेलं होतं. आत तर फुल्ल वेड लागायची पाळी. इथे ह्या दोघी आमच्या कडे आम्ही क्षुद्र जंतू असल्यासारख्या बघत होत्या. तेव्हढ्यात सरांनी दुसरा कागद दिला. तो कोरा होता. पेन दिलं नि म्हणाले लिहा तो शब्द मराठीत. मी ह्यावेळी बरोबर 'विद्या' लिहिला. मध्याने गोची केली. त्याने Vidya मराठीत तीन वेग वेगळ्या प्रकारे लिहिला.

सर - काल नोटीस बोर्डावरची लिस्ट कुणी बनवली?

मी - मी. म्हणजे मध्या... माधवनी मला झेरॉक्स दिल्या, मी नावं लिहीली.

सर - अरे काय हे. आज बरोबर लिहिलेलं हेच नाव काल तू 'विड्या' असं का लिहिलंस कळू शकेल काय?

मी उडालोच. अशी चूक माझ्या कडून होणं शक्यच नाही असं मनात आलं होतं, पण तेव्हढ्यात सरांनी लिस्टची कॉपी मला दाखवली. मनात म्हटलं 'चांगलाच पोपट झाला राव'.

मी - सर, चूक झाली. माफ करा.

सर - मला काय सांगताय? हिला सांगा.

मी - विद्या बाई, माझ्या हातून चूक झाली. मला माफ करा.

विद्या - पण तुझ्या मुळे मला सकाळ पासून सगळे चिडवतायत त्याचं काय?

मी - कोण चिडवतंय नाव सांग.

विद्या - तुला काय करायचंय?

मी - नाव तर सांग ना

विद्या - मग तू काय करशील. मारशील त्यांना जाऊन?

मी - ते काय करायचं हा माझा प्रश्न आहे. तू फक्त नाव सांग. (आता झालेल्या अपमानामुळे मी जरा वैतागलो होतो आणि त्यात ही आगाऊपणे उत्तरं देत होती. ) मी त्यांना मारीन नाही तर गोळा करून पार्टी देईन.

आता संध्या मध्ये पडली - बघ, मी म्हणाले नव्हते तुला. हा ह्यांचाच प्लॅन आहे. ते सगळे ह्यांचेच मित्र आहेत. ह्यांनी सांगितलेलं गाणं म्हणायला आपण नकार दिला म्हणून आपली जिरवतायत ते.

हे ऐकून मध्याही पेटला - वा वा वा... तुम्ही घशातून जे भीतिदायक आवाज काढता त्याला गाणं म्हणत असतील तर ऍडी टॉम क्रूज आहे.

चुकून मध्याने नको त्या शेपटावर पाय ठेवला. आता टॉम क्रूजची पोस्टर्स ह्यांच्या बेडरूम मध्ये आहेत नि तो ह्या दोघींचा मानलेला नवरा आहे हे आम्हाला कसं कळणार?

विद्या - तोंड बघितलंय का आरशात? उर्श्वमुखी कुठचा...

मी - काय कुठचा???

विद्या - तुला काय करायचंय? मी त्याला बोललेय.

जोशी सर - बाळांनो, तुम्ही कुठे आहात ह्याचं भान आहे का तुम्हाला?

आम्ही - सॉरी सर...

विद्या - सर ह्याला आत्ताच्या आत्ता कॉलेज मधून काढून टाका.

मी - हॅ हॅ हॅ... शुद्धलेखनाच्या चुका पेपर मध्ये केल्या तरी काढत नाहीत. आणि मॅडम मी कॉलेजचा G.S. आहे. असल्या फालतू गोष्टीवरून माझ्यावर ऍक्शन घेतली तर लय भारी पडेल.

विद्या - काय करशील??? मारशील मला?

मी - तू सारखी मारा-मारीच्या गोष्टी का करतेयस?

सर - जोशी... शांत व्हा...

संध्या - सर मी एक सुचवू? ह्यांना 'विद्या' हे नाव हजार वेळा लिहायची शिक्षा द्या.

मध्या - काहीही काय...

मी - चालेल... (आणि मध्याला डोळा मारला)

नंतर माझ्या वाटचं हजार वेळा आणि मध्याच्या वाटचं हजार वेळा असं ते नाव मी २ हजार वेळा लिहून काढलं.

तर अशी आमच्या चौघांची आप-आपसात पहिली ऑफिशियल ओळख झाली. त्यानंतर आम्ही कॉलेज-डे च्या तयारी साठी बऱ्याच वेळा भेटलो. पण गाडी काही पुढे जात नव्हती. हे शेवटचं वर्ष होतं. त्यानंतर आम्ही कॉलेजच्या बाहेर पडणार होतो. आता निदान रोज दर्शन तरी होत होतं. पण एकदा बाहेर पडलं की संपलं सगळं.

म्हणून मग आम्ही शेवटी ठरवलं 'बॉस, स्वतः जाऊन स्वतःसाठी प्रपोज करायचा आपल्यात दम नाही. म्हणून मग आपण आता एक मेकांच्या वतीने प्रपोज करायचं. ' त्या प्रमाणे मी संध्याकडे आणि मध्या विद्या कडे गेलो. थोड्यावेळाने मी आणि मध्या एकमेकांना येऊन भेटलो. कुणी काही बोलेचना.

शेवटी मीच धीर करून विचारलं - काय झालं रे?

मध्या - ती म्हणाली, तू तसा बरा आहेस पण जरा जास्त आगाऊ आहेस...

मी - आयला, संध्या पण असंच म्हणाली. पुढे?

मध्या - त्याला सांग, CA कंप्लीट झाल्या शिवाय काही नाही.

मी - आयला, संध्या पण असंच म्हणाली. ह्याचा अर्थ काय?

मध्या - ह्याचा अर्थ असा की आता अभ्यासाला लागायचं.

मग ह्या नंतर पुढची चार वर्षं आम्ही तारेवरची कसरत करत काढली. CA रिझल्ट घेऊन दोघींना भेटायला गेलो. मोठ्या आशेने रिझल्ट दाखवला.

चेहेऱ्या वरची सुरुकुतीही न हलवता विद्या म्हणाली - गुड. पण तू CA झालास म्हणजे मी तुला हो म्हणीन असा अर्थ होत नाही.

माझी नेहमीप्रमाणे सटकलीच - मग आता काय फायनान्स मिनिस्टर व्हायची वाट बघणारेस का?

विद्या - चिडू नको रे...

मी - चिडू नको तर काय तुझी पुजा करू?

विद्या - मला चालेल.

मी - हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. बाइक इतकं नसेल पण त्याच्या जवळपास आहे. आणि हे मी मनापासून बोलतोय. ह्या तीन वर्षात मी एकाही मुली कडे बघितलं नाहीये. म्हणजे, तसं बघितलं, पण तसं नाही बघितलं. तुला मी आवडत असेन, काही विचार केला असशील तर मला स्पष्टपणे सांग. नाहीतर...

विद्या - नाहीतर काय???

मी - नाहीतर... मी तुला विचार करायला अजून वेळ देईन...

ह्यावर विद्या जी काही गोड हसलेय की ते बघून काळजाचं पाणी होणं, सुटकेचा निःश्वास सोडणं, पोटात गार वाटणं, जीव भांड्यात पडणं हे सगळं मला एकदमच झालं. मी लगेच मध्याला हुश्श्श्श असा SMS केला आणि तेव्हढ्यात मध्याचा मला हुश्श्श्श असा SMS आला. ह्यापुढचं तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे.

कहाणी सांगून झाल्यावर भानावर आलो तर आजू बाजूला अजून जनता जमून टाळ्या वाजवत होती.

गंभीर भाव चेहऱ्यावर आणून गंट्या म्हणाला - हे सगळं ठीक आहे. पण माझा मूळ प्रश्न अजून अनुत्तरितच आहे...

मी - कोणता???

गंट्या - माणूस लग्न का करतो...???

Comments:

There are 13 comments for आयुष्याचे नाटक - प्रवेश चौथा