आयुष्याचे नाटक - प्रवेश सहावा

| Labels: | Posted On 6/26/08 at 2:49 PM

प्रवेश सहावा - कोंकण यात्रा
सुना आत्या म्हणजे बाबांची सगळ्यात लहान बहीण. २०-२२ वर्ष आई-बाबा आणि भावंडांवर तलवारबाजी करून एके दिवशी सुना आत्या सासरी राज्य करायला निघून गेली. तिला नवराही अगदी म्हणजे अगदीच गरीब मिळाला. सासू नव्हती. सासरेही बिचारे एका कोपऱ्यात देव देव करत बसले असायचे. तशी सुना आत्या मूळची खूप प्रेमळ. आम्हा भाचरांवर तर अमर्याद प्रेम केलं. तिचं सासर कोंकणात असल्याने दर सुट्टीत आमचा मुक्काम तिच्याकडेच असायचा. आंबे उतरवले नि मुंबईला ३ भावांकडे पेट्या आल्या नाहीत असं कधीच झालं नाही. पण तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जरब होती. सासरी गेल्या गेल्या तिने घराची सगळी सूत्र हातात घेतली आणि त्या घराचा बघता बघता कायापालट झाला. काका मुळात स्वभावाने गरीब आणि भिडस्त. पण ह्याच स्वभावामुळे एकट्याने आंबे, शेती, नारळी, पोफळी हा सगळा व्याप सांभाळणं कठीण जायचं. भरवशाचा माणूस कुणी नव्हता. सुना आत्याने तिथेही हळू हळू त्यांना मदत करायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्याला साथ मिळाली तिच्या करारी स्वभावाची, तीक्ष्ण जिभेची आणि टिपीकल कोकणस्थी खवट पणाची.

तर अशी ही सुना आत्या एक दिवस आमच्या घरी आली. आल्या आल्या आमच्या गप्पा सुरू झाल्या.
मी - पप्या कसा आहे गं?
आत्या - सतरां पारांवरचां मुंजा तो, त्याला काय धाड भरतिये?
मी - आणि पप्या चे प. पू.?
आत्या - तोही त्याचाच बाप. व्याघ्रेश्वराजवळ बसलेला असतो दिवसभर.
पप्याचे वडील ही एक अजब आसामी होती. टिपीकल कोकणीपणच आयडियल सँपल होतं. हयात कोंकणात घालवलेली, त्यात कोकणस्थ आणि वरून एकारांती असं डेडली काँबिनेशन होतं. पप्याने इंजिनियरिंगला ऍडमिशन घ्यायची ठरवल्यावर ह्यांनी 'हे पाहा, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस हो. तुझी फी मी भरीन पण नंतर तू माझ्याकडे पाह्यलं नाहीस तर मी कुणाकडे पाहणार' असं म्हणून त्याची 'माझ्या वडिलांनी माझी इंजिनीयरींगची फी भरण्यासाठी स्वतःची हयातभराची कमाई घातली. पुढे मरेपर्यंत मी त्यांना सांभाळीन व यथासांग दिवस-कार्य करीन. अथवा माझ्यावर त्यांनी केलेला खर्च चालू व्याजदरासकट परत करीन. ' असं लिहिलेल्या कागदावर पंचांसमोर सही घेतली.

पण पप्या मुलगा गुणी निघाला. शिक्षण झाल्यावर गावातच बॉल-बेअरिंगची फॅक्टरी टाकली आणि बापालाही सांभाळतोय. एकदा बोलता बोलता हा विषय निघाल्यावर त्यांनी मला सांगितलं 'अरे एकुलता एक मुलगा तो. पैशापेक्षा का मोठा आहे? पण फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते हो... ' हो चा उच्चार टिपीकल हेल काढून.

आत्याने नेहमी प्रमाणे आमच्या घरीही सूत्र हातात घेतली. सुनेने मला वळण लावायचे प्रयत्न केलेले बघून ती माझ्या बायको वर भारीच खूश झाली. 'जोश्यांच्या सगळ्यात नाठाळ आणि वात्रट कार्ट्याशी लग्न केलंस, धीराची आहेस हो पोरी' अशी सुरुवात करून जी माझी लक्तरं टांगायला सुरुवात केली ते ऐकून 'काश ये धरती फटकर मुझे अपने में समा ले' असं वाटलं. जायला निघालो तर मला हात धरून थांबवलं 'जातांयस कुठे, थांब थांब... ' हिने वर आत्त्याला चावी मारली 'अजून सांगा ना ह्याच्या लहानपणीच्या गमती जमती... ' आत्त्याचा पतंग एकदम भरदोल मध्ये उडायला लागला...
आत्या - अगं हा लहानपणापासून असाच आळशी आणि वेंधळा आहे. लहान पणापासून गोडाची फार आवड, म्हणून मी ह्याला लाडाने गोड्या म्हणायचे.
विद्या - अय्या... हा बोलला नाही मला कधी... कित्ती क्युट नाव आहे... गोड्या...
आत्या - आम्ही गिरगावात चाळीत राहायचो तेव्हाची गंमत सांगते, सगळ्या भावंडांच्या मुलांना अंघोळ घालायची मी. आणि हा त्याची वेळ आली की खुर्ची खाली लप, फडताळात शीर असं करून टाळायला बघायचा. एकदा ह्याला पकडून अंघोळ घालताना हात सोडवून जो नागव्याने धावत सुटला चाळभर तो पार अर्ध्या तासाने हातात आला.
मी - अग आत्ते तेव्हा मी २ वर्षाचाही नव्हतो...
आत्या - मला सांगतंयस? मला सांगतंयस? कुले धुतलेत तुझे ह्या हातानी... झोप तर अशी अनावर की कित्येकदा ताटावरच पेंगायला लागायचा. आता तू आलियेस, सुधार त्याला जरा. आम्ही हात टेकले... काय रे, सूनबाईला कुठे घेऊन जातोस की नाही फिरायला? की अजून त्या मध्यासोबतच कट्टा एके कट्टा? मध्ये फोन केला होतान त्याने, म्हणाला... आत्ते ये वेळ काढून राहायला.
मी - वा वा... जातो तर...
विद्या - कोणत्या बायकोला नेतोस? मला तर नाही नेलंस कधी...
मी - अगं असं काय करतेस??? आपण 'रंग दे बसंती' ला नव्हतो का गेलो...
विद्या - ते लग्ना आधी...
मी - आणि परवा बाजारात नेलं होतं ते???
विद्या - बघा ओ आत्या, कसा अरसिक आहे ते, कुट्ठे म्हणून न्यायला नको ह्याला मला.
आत्या - महितिये... आज का ओळखतेय ह्याला... अगं आता बाजारात तरी येतो, लग्ना आधी तर घरातही फिरत नसे. सोफ्यावरच चिकटून असायचा. ते काही नाही गोड्या, बॅगा भरा नि चला माझ्याबरोबर चार दिवस दापोलीस.
विद्या - सहीच... खरंच येतो...
(मला मनापासून कोंकणात राहायला आवडतं, पण ऑफिसची बरीच कामं होती
मी - नको गं आत्या सुट्टी मिळणं शक्य नाही.
आत्या -अरे पुढल्या सोमवारी सुट्टीच आहे ना कसलीशी, चला की तीन दिवस. शुक्रवारच्या रातराणीत बसू. पहाटे दापोलीस. तिथून पुन्हा सोमवार रात्रीची रातराणी पकडलीस की मंगळवारी कामावर जायला हजर.
मी - ह्म्म्म्म्म...
आत्या - अरे ह्म्म ह्म्म काय करतोय शुंभा सारखा...
मी - येतो...


-----------------------------------------------------------------------------------------------

बॅगेत मी फक्त शॉर्टस घेतलेल्या पाहून बायको हैराण झाली 'अग तिथे काय करायचेत कपडे, तिथे गेल्यावर माझा शॉर्टस नि टी-शर्ट हाच गणवेश असतो. तरी बायकोने २ जीन्स टाकल्याच. माझी एक हँडबॅग आणि हिच्या २ सुटकेस असं सामान झालं. मी - अगं शालू नि पैठण्या काय करायच्यात तिथे?
विद्या - वा वा... कुठे कार्याला जावं लागलं तर...
मी - शालू घालून कोंकणातल्या लग्नाला गेलीस तर नवरा मुलगा तुलाच नवरी समजून हार घालेल... हा हा हा... आSSSSS
अंघोळ करून खोलीत कपडे बदलायला आलो तर आत्त्या आत बायकोशी गप्पा मारत होती. तिला म्हटलं जरा बाहेर जा कपडे बदलायचेत तर 'मला लाजतंयस, मला लाजतंयस' म्हणून फिस्कटली.

-----------------------------------------------------------------------------------------------

आपल्याला लहानपणापासून ओळखणारे मोठे आपला कधी, कुठे, कसा पोपट करतील सांगता येत नाही. माझ्या लग्नात बायको मला घास भरवत असताना एका मामाने खवचट पणे भर पंगतीत मोट्ठ्याने ओरडून 'अजून भरवावं लागतं का? ' असं विचारलं होतं. आणि वर स्वतःच ख्यॅ ख्यॅ ख्यॅ करून हसला होता.

-----------------------------------------------------------------------------------------------

गोरेगाव (कोंकणातले) ला बस थांबली तसा मी राष्ट्रकार्य करायला खाली उतरलो. उतरत असताना लवकर ये रे असं मला सांगून आत्याने एकदा मी कसा बाहेर गेलो नि येताना भलत्याच एस. टी. मध्ये कसा चढलो, कशी चुकामूक झाली इत्यादी कहाणी बायकोला ऐकवली.

५:३० ला एस. टी दापोली डेपो मधी शिरली आणि एकदम सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्या. ३-४ वर्षांनी येत असल्याने जुनी ओळखीची ठिकाणं शोधत शोधत घराकडे प्रवास सुरू झाला होता. पप्या गाडी घेऊन आम्हाला आणायला आला होता. दापोली-आसूद ८ किमी चा घाटातला वळणा-वळणाचा रस्ता. मागच्या काही वर्षात कोंकण बरंच बदललं होतं. आणि लोकंही. मातीचे रस्ते जाऊन आता डांबर आलं होतं. पूर्वी आड-वळणाला गल्लीत असणारा असणारा बार आता हमरस्त्यावर आला होता. आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा आसूद एक लहानसं गाव होतं. केशवराज आणि व्याघ्रेश्वर हे दोन देव आणि मुरुड अथवा हर्णेला जाताना तिठ्यावर लागणारा आसूद पुल हीच गावाची ओळख होती.

घरी आल्यावर दारातच आमचं स्वागत केलं आंब्याच्या जुन्या झाडानं. हे झाड आत्त्याच्या सासूबाईंनी लावलं होतं, पुढल्या पिढीला फळं मिळावीत म्हणून. लहानपणी आम्ही ४-५ भावंड आत्त्याकडे आलो की झाडावर दगड मारून आंबे पाडणं हा आमचा आवडता छंद असे. २०-२५ दगड मारले की एखादा आंबा पडायचा. कधी कधी झाडावर चढायचो. आत्या कायम ओरडायची 'अरे घरात पडलेत हवे तितके आंबे, वांदरांसारखे झाडावर काय चढताय? ' एकदा काकांनी समजावलं 'बाळांनो, झाडाला दगड मारू नका, त्यालाही लागतं. ' त्या नंतर आमचं दगड मारणं बंद झालं. झाडाला लागतंय म्हणून नव्हे, तर एके दिवशी झाडाने रागावून आपल्याला फांदी मारली तर पाठीचं काय होईल म्हणून.

आसूदच्या घरी कार्यक्रम ठरलेला असायचा. सकाळी म्हशींना घेऊन नदीवर जायचं, त्यांच्या सोबतच डुंबायचं, घरी आलं की मस्त पैकी मेतकूट भात, तूप, लोणचं आणि ताकातला पापड खाल्ला की अंगणात क्रिकेट खेळायला मोकळे. घरचा हरकाम्या बाबू आम्ही बॅट आपटून आपटून सारवलेल्या जमिनीला खड्डे पाडतो म्हणून आमच्यावर खेकसायचा. जेवणा आधी काकांसोबत वाडीला पाणी घालायचं. दुपारी आत्याने जेवायला काहीतरी खास केलेलं असायचं. तशी पानगी मी नंतर कुठेही खाल्ली नाही.

उन्हं कलली की मग आसूद पुलावर जाऊन जोश्यांच्या हॉटेलात यथेच्छ मिसळ चापायची. लहानपणी ती कायम तिखट लागायची. मग काका बरणीतले पेढे काढून देत. एकदा आमच्या ढकलाढकलीत एका खुर्चीचा हात मोडला. तो नोकराने उचलून एका कपाटामागे ठेवला. २ वर्षांनी पुन्हा गेलो तर खुर्चीही तशीच होती आणि कपाटा मागे ठेवलेला हातही तिथेच होता. रात्र झाली की भुतांचा गोष्टी ऐकता ऐकता झोप लागायची. मग काका एकेकाला उचलून गादीवर ठेवत. कधी कधी रात्र-रात्र भर पत्त्यांचे डावही चालत. पहाट झाली ही बर्वे बुवांचे दूरून ऐकू येणारे अभंग पार काळीज चिरत जात.

ह्या सगळ्या आठवणी क्षणार्धात डोळ्यासमोरून झर्रकन सरकल्या आणि मी अभावीतपणे हसलो. बायकोने बघितलं. ती ही माझ्याकडे बघून समजल्यासारखं हसली.

Comments:

There are 12 comments for आयुष्याचे नाटक - प्रवेश सहावा