आयुष्याचे नाटक - प्रवेश आठवा
| Labels: आयुष्याचे नाटक ६-८ | Posted On 10/17/08 at 11:18 AM
प्रवेश आठवा - क्रमशः
मी - नारळ कसा दिला रे?
भैय्या - १० रुपया एक.
मी - ३ दे
तेव्हढ्यात बायकोने मला बाजूला खेचलं.
विद्या - अरे काय करतोयस???
मी - नारळ घेतोय...
विद्या - अरे पण त्याने सांगितलेल्या किमतीला?
मी - हो...
विद्या - बाजूला हो, दिवाळं काढशील अशानं...
मी - मग घेऊन कशाला आलीस मला?
विद्या - तुला सामान विकत घ्यायला आणलं नाहीये, इतक्या पिशव्या एकटीने उचलवणार नाहीत म्हणून आणलंय.
मी - हा अन्याय आहे...
विद्या - हा संसार आहे... हॅ हॅ हॅ हॅ... तू एक काम कर, त्या आरे च्या स्टॉल पाशी उभा राहा, मी करते खरेदी.
असं म्हणून माझं कुंकू पुन्हा त्या मार्केट च्या गर्दीत गुडुप झालं. मी आरे च्या टपरीवर जाऊन उभा राहिलो तर काउंटर वरचा माणूस माझ्याचकडे बघून हसताना दिसला.
थोड्या वेळाने विद्या २४ रुपयात ४ नारळ घेऊन विजयी मुद्रेने बाहेर आली. पिशवी माझ्या हातात देऊन पुन्हा आत गुडुप झाली. त्या नंतर पुढचा अर्धा तास पूर्वी लोकं कामावरून आली की पडवीतल्या खुंटी वर पगड्या अडकवत तशा वेगवेगळ्या पिशव्या ती मला अडकवत होती. माझ्या लस्सीच्या ३ बाटल्या संपल्या होत्या. शेवटी एकदाची खरेदी झाली. घरी जायला रिक्षा पकडली.
विद्या - संध्याकाळचा काही प्रोग्रॅम ठरवू नकोस.
मी - का?
विद्या - का म्हणजे काय?
मी - का म्हणजे व्हाय?
विद्या - फालतू विनोद नकोयत. आज संध्याकाळी सोसायटी मध्ये गेट टू गेदर आहे. त्या आधी पुजा आहे. आपण बसणार आहोत पूजेला.
मी - अरे बापरे.
विद्या - बापरे काय? १ तास स्वस्थ एका जागी बसायला त्रास होतो?
मी - त्यासाठी नाही गं, पुजेला बसेन मी २ तास सुद्धा. पण खरा छळ त्या नंतर आहे.
विद्या - म्हणजे काय?
मी - बघशीलच. पण मी पूर्णं वेळ थांबेन ह्याची गॅरंटी नाही.
विद्या - माहितीये मला...
मी - काय माहितीये?
विद्या - साठे आजींनी सांगितलंय, इथे गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले की तुम्ही सगळे गच्चीत जाऊन पाण्याच्या टाकी खाली झोपता ते.
मी - आयला...
विद्या - ह्या वेळी सगळ्या गच्च्यांना कुलुपं घालायला सांगितली आहेत.
मी - अरे काय???
विद्या - काय काय? काय होतं रे जरा ३-४ तास घालवले तिथे तर.
मी - अग प्रश्न वेळेचा नाहीये गं. पण त्या ३-४ तासात जे मानसिक अत्याचार होतात ते सहन नाही होत. गाण्याचे प्रयत्न, नाचाचे प्रयत्न, निवेदन करणार्या मेहता काकूंचे तेच तेच जुने विनोद ऐकून आत पकलोय मी. मागच्या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एका मुलीने क्रेझी किया रे वर डान्स केला. 'क्रेझी किया रे' सांस्कृतिक कार्यक्रम??? दुसर्या दिवशी सेक्रेटरींना विचारलं तर म्हणाले 'माहिती आहे रे, पण आपला जमाना राहिला नाही. काळ बदललाय'.
विद्या - हा हा हा हा हा
मी - हसायला काय झालं?
विद्या - अरे ते पाटील काका साठीचे नी तू तिशीत पण नाही. तरी तुला ते आपल्यात समजतात.
मी - अगं ते मला त्यांच्यात नाही, त्यांना आमच्यात समजतात. रिटायर झाल्यावर जीमला वगैरे जायला लागलेत.
विद्या - बघ...
मी - बघ काय? मी पण जाईन रिटायर झालो की. त्यांचा मुलगा बबन पण जायचा जीमला.
विद्या - बबन कोण? त्यांच्या मुलाचं नाव राजेश आहे ना?
मी - तेच गं, त्याला आम्ही बबन म्हणतो. तर, हा घरून निघायचा नी थोडा पुढे जाऊन पुन्हा मागच्या गेट नी सोसायटीत यायचा नी टाकीखाली तासभर मस्त गजर लावून झोपायचा. एक दिवशी काकांनी बघितलं नी बुकल बुकल बुकललं.
विद्या - धन्य आहे, तुमच्या पैकी एक पण सरळ नाहीये ना?
मी - मी आहे ना
विद्या - आहेस ना, जिलबी सारखा सरळ...
मी - ए आज जिलब्या कर ना जेवायला...
विद्या - जिलब्या म्हणजे काय दडपे पोहे वाटले तुला? तयारी लागते भरपूर त्यासाठी. पुढल्या रविवारी करीन. त्या आधी तुझा मूड बदलला तर वेळेवर कळव मला. कामात बिझी असशील तर स.म.स. करून सांगितलंस तरी चालेल.
मी - हो गं
विद्या - चिडू नको रे...
मी - चिडलोय कुठे?
घर आलं. पुन्हा रिक्षावाल्याशी २ रुपये जास्त कसे झाले म्हणून हिने धुमशान करून त्याला ३ रुपये कमी दिले. आपला वारसा पुढे चालवणार्या सुनेकडे आई मोठ्या कौतुकाने बघत होती. दोघींची बार्गेनींग पावर जबरदस्त आहे. बर्याच आधी एकदा मामे बहिणीच्या लग्नाच्या साडी खरेदी साठी आई बरोबर मी हमाल म्हणून गेलो होतो (जोशी घराण्यातल्या तमाम पुरुषांचा हा वारसा आता मी पुढे चालवतोय) साडीवाला किंमत सांगायचा आणि आई डायरेक्ट त्याच्या अर्ध्या पासूनच सुरुवात करायची. मग बराच वेळ ढील देणे, घसीटणे असे संक्रांतीतले प्रकार करून झाल्यावर आईने दुकानदाराला गुंडाळला. दुकानातून निघालो तेव्हा भर उन्हाळ्यात दिवाळं निघाल्याचा भाव दुकानदाराच्या चेहेर्यावर होता.
शनिवार असल्याने आज भरपूर झोपायला मिळणार ह्या आनंदावर विरजण पडलं. नशिबाने रविवार हाताशी होता. रविवारी दुपारी जेवण झाल्यावर विद्या बाहेर जायला निघाली.
मी - कुठे स्वारी?
विद्या - मैत्रिणीकडे चाललेय?
मी - किती वाजता येणारेस?
विद्या - उशीर होईल. खूप महत्त्वाचं काम आहे.
मी - बरं. जाताना लॅच लावून जा. गुड नाइट.
विद्या - गुड नाइट काय? रद्दी विकायचं कबूल केलंयस ना आज.
मी - पुढल्या रविवारी विकतो गं.
विद्या - मागचे ३ रविवार तुझा पुढला रविवार येतंच नाहीये.
मी - पुढला रविवार नक्की.
विद्या - पंखे पण पुसायचेत.
मी - पण पंखे स्वच्छ तर आहेत.
विद्या - अरे धूळ जमलेय. फिरतायत म्हणून दिसत नाहीये.
मी - मग फिरतेच राहू दे की. बंद कशाला करायचेत? तसंही मुंबई मध्ये १२ महिने उकडतंच. मुंबईत दोनच ऋतू उन्हाळा नी पावसाळा.
विद्या - पु.लं.चे डायलॉग ढापू नकोस. बरं चल मी निघते.
मी - टाटा.
बायको गेली नी अचानक मला साक्षात्कार झाला की लग्नानंतर पहिल्यांदाच मी इतके तास एकटा असणार आहे. म्हणून मध्याला फोन केला. तर तो पण घरी एकटाच होता. संध्या पण बाहेर गेली होती. एकत्रच गेल्या असणार. आहेच ती सीता-गीता ची जोडी. दहा मिनिटांत साने काकांचा रिकामा आहेस का म्हणून फोन आला. साने काकूंनी मैत्रिणी घरी येणारेत म्हणून ह्यांना ६-७ तास बाहेर कुठेतरी फिरून या असं सांगून कटवलं होतं. पुन्हा सगळे शबरी मध्ये जमलो. दुपार असल्याने उकाड्यावर मात करण्यासाठी बियर प्यावी असं सर्वानुमते ठरलं.
ग्लास भरून 'हर्षयती, आनंदयती, उल्हासयती' केलं. पहिल्या पावसाच्या गार धारा पडल्यावर तप्त धरणी जशी तृप्त होते तशीच आमची अवस्था झाली.
इथे आम्ही शबरी मध्ये कार्यमग्न असताना आमच्या अपरोक्ष मात्र वेगळंच राजकारण शिजत होतं ह्याची आम्हा अश्राप जिवांना कल्पना नव्हती.
सध्या नी विद्या कुणा मैत्रिणीकडे गेल्या नसून साने काकूंच्या घरे गेल्या होत्या. नी सोबत विज्या ची बायको नी विन्याची होणारी बायको ह्या सुद्धा होत्या. त्या दिवशी साने काकूंच्या घरी खं.बा. (खंबीर बायका) ची बैठक होती. अर्थात हे नाव आम्हीच त्यांना ठेवलं आणि बैठकी बद्दलही आम्हाला नंतरच कळलं. पण त्या दिवशी जरा म्हणून सुगावा लागू दिला नव्हता.
साने काकू - या या
विद्या - काय म्हणता काकू
साने काकू - मी मजेत गं, बोला काय काम काढलंत?
निता - मी चहा ठेवते
विद्या - आम्हाला तुमचा सल्ला हवाय.
साने काकू - कशाबद्दल? आणि तोही चौघींना एकदम.
संध्या - नवर्यांना कंट्रोल मध्ये कसं ठेवावं ह्या बद्दल.
साने काकू - साने काका माझ्या कंट्रोल मध्ये आहेत ही अफवा कुणी पसरवली.
विद्या - तसं नाही काकू पण आता इतक्या वर्षानंतर तुम्हाला नक्कीच आमच्या पेक्षा जास्त अनुभव आले असतील. त्यातून आम्हाला शिकायला मिळेल.
साने काकू - असं म्हणतेस? बरं. समस्या काय आहे?
निता - दूध उतू गेलं वाटतं...
संध्या - त्याचं असं आहे काकू की मध्या तसा चांगला आहे. पण खूप जास्त आळशी आहे. मला वाटलं होतं लग्नानंतर सुधारेल.
साने काकू - हे कुणी सांगितलं तुला??
संध्या - असं मला वाटलं होतं.
साने काकू - असं काही नसतं. नी तुमच्या लग्नाला अजून वर्षही झालं नाही, इतक्यात काय सुधारणा होणार?
कोरस - ह्म्म्म्म्म
साने काकू - हे बघ, आता मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. लग्ना नंतर मुलं लगेच सुधारत नाहीत. तशीही मुलं मुलीपेक्षा थोडी जास्त बालिश असतात. त्यामुळे पहिलं वर्ष तर आपलं आत लग्न झालंय ह्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. दुसरं असं असतं की त्यांचं बाहेरचं आयुष्य पूर्वी सारखंच सुरू असतं
विद्या - पण हे चुकीचं नाहीये का काकू?
साने काकू - चुकीचं आहे पण चूक त्यांची नाहीये.
संध्या - म्हणजे?
साने काकू - म्हणजे बघ. लग्नानंतर आपण मुली नवीन घरात येतो. घर नवीन, घरची लोकं नवीन , शेजारी नवीन, जुन्या मैत्रिणी नाहीत. त्यामुळे आपलं घर एके घर असंच काँसंट्रेशन होतं. पण मुलांच्या आयुष्यात एक बायको सोडली तर तसा काहीच फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच, सगळं सेमच. आपण माहेरी गेलो की कसं पुन्हा आठवडाभर पूर्वी सारखं लोळून काढतो की नाही. आई कशाला म्हणून हात लावू देत नाही. तशीच ही मुलं तर १२ महिने माहेरीच असतात.
संध्या - मग?
साने काकू - मग काय? पहिले प्रथम एक लक्षात घ्या. शिट्टी झाल्यावर भात जसा लगेच शिजत नाही तसे नवरेही लग्नानंतर लगेच बदलत नाहीत. आधी सांगितल्या प्रमाणे काही अपवाद वगळता मुलं मुलींच्या तुलनेत इम्मॅचुर असतात. त्यामुळे जसं आपण शिट्टी झाल्यावर वाफ जिरायला वेळ देतो तसंच मुलांमध्ये लग्न जिरायला जरा वरा वेळ द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे नवर्याच्या मागे सारखी हे कर - ते कर भुणभूण नाही करायची. आधिच लग्नानंतर आपलं स्वातंत्र्य संपणार ह्याची त्यांना भीती असते. त्यात आपण सारखं त्यांच्या मागे लागलं तर त्याची खात्रीच होते त्यांना.
विद्या - अहो मग काही करणारच नाहीत ते.
साने काकू - असं नाहीये. एक गंमत सांगते. थोडं डोकं चालवायचं. आमचं लग्न झालं तेव्हा हे पण असेच होते. बाहेरची कामं करायचं डिपार्टमेंट ह्यांच्याकडे होतं. एकदा पुढला रविवार, पुढला रविवार करता करता महिनाभराची रद्दी साठली घरात. मी ती एका पिशवीत भरली नी ह्यांच्या कपाटात ठेवली. लगेच पुढल्या रवीवारी घरातली रद्दी गायब.
निता - व्वा. काकू तुम्ही सॉलिड आहात.
साने काकू - अजून एक. टेलिफोनचं बील भरायला विसरायचे. मी एके राती जेवताना ह्यांना विचारलं 'अहो कुणाला काही निरोप द्यायचेत का?' हे गोंधळले. मी खुलासा केला 'अहो काल टेलिफोन वाले येऊन सांगून गेले आठवड्याभरात बिल भरा अथवा लाइन कापू. आता आपण कधी इतक्या लवकर बिल भरतो का? ह्या टेलिफोनवाल्यांना काहीच कळत नाही बाबा.' दुसर्या दिवशी ऑफिसला जाण्याआधी बिल भरण्यात आलं.
संध्या - भारीच...
साने काकू - त्यामुळे थोडं डोकं चालवायचं. आता एक सांग, ऍडी अजिबातच बदलला नाहीये का?
विद्या - अगदीच तसं नाहीये. थोडा सुधारलाय. आजकाल कट्ट्यावर जास्त टाईमपास करत नाही. संध्याकाळी पण बर्याचदा घरी असतो. आणि मागच्या महिन्यात स्वतःहून बाबांच्या वाढदिवसाला हॉटेल मध्ये टेबल बुक करून ठेवलं होतं. डेंजर सासर्याला सरप्राइज पार्टी म्हणे.
संध्या - मध्याने पण सिगरेट कमी केल्यात म्हणत होता. नी आज काल मित्रांचे फोन आले तरी टाळतो काही तरी कारणं सांगून. काल स्वतःहून कट्ट्यावर जाताना 'काही आणायचंय का गं बाहेरून?' असं विचारून गेला.
विद्या - अगं आज सकाळी ऍडी नी बटाटे घेतले चिरायला. मी म्हणाले राहू दे, भाजी झाली आहे करून. आज काल रोज उशीर होतोय ऑफिस मध्ये. एक दिवस करू दे थोडा आराम. मी काय, ९ ते ६ फिक्स ड्यूटी. नी ६ ला सुटले की ६:१५ घरात असते.
साने काकू - वा. बरीच प्रगती आहे.
विद्या - मग आता?
साने काकू - आता काय? जरा सबुरीने घ्या. नवरे तुमचे आहेत, संसारही तुमचा आहे. लोणचं थोडं मुरू द्या नी मग बघा संसार कसा मस्त चटपटीत होतो ते. तेंव्हा, चिंता सोडा नी संसार मस्त एन्जॉय करा. चला, करा चहाने चियर्स.
कोरस - चियर्स.
------------------------------------- क्रमश -------------------------------------
मित्र हो, आयुष्याचं हे नाटक आता इथे एका महत्वाच्या वळणावर येऊन थांबवत आहे. आता सगळ्यांची गाडी रुळावर आली आहे. प्रत्येक पात्र आता आप-आपलं आयुष्य हवं तसं जगायला मोकळं आहे. त्यामुळे मजा येतेय तोवरच थांबावं असा विचार आहे.
डिस्क्लेमर - ह्या नाटकातली सगळी पात्र आणि घटना पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कुणाला काही साम्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्यातली विद्या मी, संध्या मी, साने काका मी, मध्या मी आणि ऍडी तर मी आहेच. आणि देवाच्या कृपेने मी अजून सुखी आणि एकटा जीव सदाशिव आहे.
आणखी एखादा प्रवेश टाकून संपवता आलं असतं तर छान झालं असतं. पण असो. नाटक आता महत्त्चाच्या वळणावरही आलंय, तेव्हा इथेही थांबायला ... निदान स्वल्पविराम घ्यायला हरकत नाही.
काही वर्षांनी "पुढे काय झालं?.." या विचारातून दुसरं पर्व सुरू करता येईल - स्वतंत्र नाटकाप्रमाणे.
असो.
"आयुष्याचे नाटक" चं "कायुष्याचे नाटक" होण्यापूर्वी थांबवायचा विचार छान आहे.
शुभेच्छा.
-प्रशांत
afalatoon
Khup chan lihita tumhi....
nice blogs
read all blogs from aayushyacha natak
enjoyed!!!!!!!!
publish a book
i will definitely buy one!!!
keep it up!!!
Adi tuzhi vichar karaichi takad solid ahe yaar
1 number
बाऽऽपरे... आठ प्रवेशांचं हे महानाट्य सुचलं कसं तुला? सोमरसप्राशनाचा परीणाम का? ;-) पण एनीवे, खूप भारी. आणि हे एवढं सगळं तुला सुचलं त्याबद्दल Hats off... आपण महान आहात. :-)
Thanks a lot for this Blog.....
arthat best blog ahe....asech lihit raha, publish karat raha..tuzya sukhi ayushyala amchya shubhecchha...
Anagha & Neeraj
खूप च छान! :))
खूप च छान! :))
खूप च छान! :))
adyaaa bhaava mast lihilays.kal pasun aakhaa blog wachla .maja ali,next tym ektra basuya pyayla.....:D
तुमच्या ब्लोग विषयी मला टॅलीनामा या ब्लोग वरून लिंक मिळाली. त्यांचे (मराठे) सगळे मजकूर मी आधाशा सारखे वाचून काढले. आदि तुम्हाला हे खूपच छान जमलय. तुमची लेखन शैली सुहास शिरवळकर यांच्याशी मिळते आहे. त्यांची "बरसात चांदण्यांची " हे पुस्तक तुम्ही वाचले नसेल तर जरूर वाचा? धन्यवाद !
प्रमोद