कट्टेबाज

| Labels: | Posted On 11/7/08 at 5:04 PM

ओळख
चहाबाज, दारूबाज, सट्टेबाज असतात तसे आम्ही कट्टेबाज आहोत. तसे आम्ही चहाबाज आणि दारूबाजही आहोत. नि सद्ध्या शेअर मार्केट मध्ये सट्टाही चाललाय. तर, असे आम्ही सर्वगुणसंपन्न कट्टेकर आमच्या सर्वगुणसंपन्न कट्ट्यावर भेटतो. कट्टा सर्वगुणसंपन्न आहे म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तू कट्ट्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. चहा-विडी कट्ट्यावरच मिळते, वडापाव, चायनीजच्या गाड्या नि सायबर कॅफे समोरच आहे, मागे नाट्यगृह आणि लायब्ररी असल्याने २४X७ प्रेक्षणीय स्थळं आहेत, बाइक्स लावायला जागा आहे, समोरच फळांपासून कोंबडी पर्यंत सगळं मिळणारा बाजार आहे, तसंच, इथून स्टेशन चालत फक्त ५ मिनिटांवर आहे. अजून काय पाहिजे? म्हणजेच आमचा कट्टा घरासाठीची आयडीयल लोकेशन आहे. आणि इथे आम्ही राहतोही घरच्यासारखेच. घर दुसरीकडे पण राहतो कट्ट्यावर अशी परिस्थिती आहे.

कुठलाही कट्टा ही केवळ एक जागा नसून ती एक संस्था असते. तसंच ती पिढ्या न् पिढ्या चालत आलेली संस्क्रुतीही असते. इथे भांडणं सोडवली जातात, प्रकरणं जुळवली जातात, सल्ले मिळतात, गुद्देही मिळतात. वेगवेगळी भन्नाट व्यक्तीमत्व नि:स्वार्थी पणे केवळ कट्ट्यावरच एकत्र येतात. ह्या कट्ट्याबद्दल आम्हा सगळ्यांच्या मनात अपरंपार माया, प्रेम, लोभ इत्यादी आहे. ह्याचं पहिलं कारण म्हणजे ह्या कट्ट्यावर आम्ही मित्र एकमेकांना भेटलो. कुठेही जाता-येताना मध्ये एक स्टॉप कट्ट्यावर ठरलेला. कट्टा म्हणजे नुसती चहा प्यायची जागा न राहता निरोपांची देवाण घेवाण करण्याचं ठिकाण, आमचे जीवन विषयक अचाट तत्त्वज्ञान पाजळण्याची हक्काची जागा, कंटाळा आल्यास हमखास मित्र भेटण्याचे ठिकाण, सध्या कोण कुणासोबत आहे / कुठे कोण नवीन आलंय ही माहिती मिळण्याची जागा, प्रॉब्लेम्स डिस्कस करण्याची कॉंफरंस रूम, इत्यादी बनलाय. बाबांनी घरातून पुढे-मागे हाकललंच तर किमान डोक्यावर छप्पर आणि पाठ टेकायला बाकडी असतील हा आधारही कट्ट्यानेच दिला. कुणीही हाकलणार नाही अशी हक्काची जागा असावी हे ध्रुव बाळाने आणि आम्ही पाहिलेलं स्वप्न कट्ट्याने पूर्ण केलंय.

आता कट्टा प्रिय असण्याचे दुसरं कारण म्हणजे हा कट्टा आमच्या समोर बनलाय. माझे इतर सगळे कट्टे - के. सी. कॉलेज जवळचा चहावाला, सेंट्रल सिनेमाच्या समोरचा इराणी, कुलाब्यातला अश्रफ पानवाला, कॉलेज जवळचा धाबा, शिवाजी पार्कजवळचा इराणी, पार्ल्यातल्या हनुमान रोड वरचा चहावाला, आणि अजून बरेच, हे सगळे कट्टे आधी पासून होते. मी नंतर तिथे जाऊ लागलो. पण आमचा सद्ध्याचा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचा कट्टा हा अक्षरशः आमच्या डोळ्यादेखत उभा राहिलाय.

पूर्वी इथे एक मोकळं मैदान होतं आणि शेजारी उल्टी-पाल्टी ची शाळा. मैदानाच्या कडेने काही झाडं, तुरळक झोपड्या आणि चार-दोन खाऊच्या गाड्या होत्या. एका कोपऱ्यात डुकरं उकिरडा फुंकत असायची (हे बदललं नहिये अजून). मध्यभागी मैदानात ८-१० टीम्स वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळत असायच्या. एकाने दुसऱ्याचा बॉल अडवणे / कॅच पकडणे इत्यादी प्रकार प्रचंड चालायचे. आणि ह्या सगळ्याच्या मधोमध आजूबाजूच्या सोसायट्यांमधली कार्टी पतंग उडवायची.

एके दिवशी न्यूज आली की आता आपलं हे मैदान जाणार आणि ह्या जागी एक भव्य नाट्यसंकूल उभं राहणार. लवकरच मैदानाला कुंपण घालून आत खोदकाम नि बांधकाम सुरू झालं. नि बघता बघता हे भव्य-दिव्य नाट्यसंकूल उभं राहिलं. ह्या नाट्यसंकूलाच्या दोन्ही गेट्सच्या बाजूला दोन झुणकाभाकर केंद्रं आली. त्यातलंच एक म्हणजे आमचा कट्टा.

जसे इतर कट्ट्यावर ग्रुप जमतात तसाच आमचाही ग्रुप जमला. सदैव पडीक असणारे काही लोकं ओळखीचे झाले नि कट्ट्यावर रंगत वाढू लागली. एकाच तबेल्यात जसे वेगवेगळ्या रंगाचे नि स्वभावाचे घोडे असतात, तसेच आम्हीही आहोत. सगळ्याची एक झक्कास मिसळ तयार झाली आहे. गुढग्यात मेंदू असलेला अव्या, अभ्यासू रवी, सदैव प्रेमात पडणारा पाऱ्या, बाबांसोबत दुकानात बसणारा आर. जे., चहावाला बाबू, पानवाला मधू, नाट्यगृहात काम करणारा नि तंबोरा वाजवायचं वेड असणारा मारी, पैलवान सोन्या आणि मी, ही आमची नेहमीची जनता. इथे आम्ही बसल्या बसल्या काय करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. इथे आम्ही बसल्या बसल्या रोज नव नवे शोध लावतो, आपल्या नवीन थिअरीज बनवतो, बातम्यांची देवाण घेवाण करतो. थोडक्यात, एकमेकांची आयुष्य समृद्ध बनवतो.

गडकऱ्यांनी महाराष्ट्राला 'दगडांच्या देशा' असं संबोधायचं कारण आपले राजकारणी आहेत हा अमूल्य शोध अव्याने इथेच लावला. नवीन कुठलीही वस्तू, टेक्नॉलॉजी अथवा औषध कुणी शोधलं की 'हे वेदांमध्ये आधीच सांगितलं आहे' हे आमच्या गळ्यात उतरवण्याचा रवीचा प्रयत्न असतो. आठवड्याच्या दिवशी दुपारचे शो फुकटात बघण्याची सोय मारी करतो. सायकल पासून ते विमाना पर्यंत आणि पॉकेटमनी पासून ते सब-प्राईम क्रायसीस पर्यंत सगळ्यावर इथे अधिकारवाणीने भाष्य होत असतात. वयस्क लोकांना जवळच्या भाड्यामुळे घेऊन जायला नकार देणाऱ्या उर्मट रिक्षावाल्यांची कानशिलंही सोन्याच्या शुभहस्ते इथेच गरम होतात. तसंच, लग्न झालेले मित्र समोरच्या बाजारात जाताना त्यांची पोरं आमच्या पाळणाघरात सोडून जातात.

कट्ट्यावर आमचा ग्रुप जावई सासरी वावरावा तसा वावरत असतो. तसे सगळेच आजूबाजूच्या परिसरात राहत असल्याने एकमेकांना पाहून होतो. एकत्र येण्यास कारणीभूत ठरला कट्टा. नि त्यानंतर जी धमाल सुरू झाली ती आज पर्यंत सुरू आहे.

क्रमशः

Comments:

There are 4 comments for कट्टेबाज