मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त आघाडी

| Labels: | Posted On 11/17/08 at 6:21 PM

धम्याला माझ्या घरी घेऊन आलो. आत आल्यावर कपडे बदलण्यासाठी धम्या बेडरूम मधे गेला. बराच वेळ झाला तरी साहेब बाहेर आले नाहित म्हणून मी डोकावून बघितलं तर धम्या चक्क कपाट आवरत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो". असं म्हणून धम्या फ्रेश व्हायला बाथरूम मधे गेला.

यथेच्छ जेऊन वगरे आम्ही झोपलो. मधेच मला अचानक वारं लागल्यासारखं वाटून जाग आली. बघतो तर धम्या झोपेतल्या झोपेत शेजारी बसून मला पेपर हलवून वारा घालत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".

धम्याला सकाळी ७ ला उठायचं होतं. गजर लावला होता. मी उठलो पण साहेब उठले नाहीत. शेवटी मी जोरात ओरडलो, धम्या ऊठ अरे तास भर उशीर झाला. अचानक धम्या ताडकन उठला आणि अंगठे धरून कोपर्‍यात ओणवा उभा राहिला. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".असो असो. आता खरा व्रुत्तांत :-)भाग १ - मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त ओसरीधम्या बँगलोरला येतोय ह्याची चर्चा मागचे कितीतरी दिवस ख.व. मधून सुरु होती. शेवटी प्रत्यक्ष धम्याकडून खरड येऊन पडली आणि त्या बातमी वर शिक्का मोर्तब झालं. "बँगलोरला येतोयस तर माझ्याच घरी उतरायचंय. दुसरी कडे राहिल्याचं कळलं तर रात्री पोत्यात घालून अपहरण करण्यात येईल" ह्या माझ्या प्रेमळ आमंत्रणाचा मान ठेऊन धम्याने माझ्याकडे रहायचं ठरवलं.

दरम्यान बँगलोर मधल्या इतर मि.पा. कर्‍यांशी संपर्क साधणं सुरू होतं. धमाल साहेब फार कमी वेळ, म्हणजे रविवार रात्र ते सोमवार पहाट, इथे असल्याने प्लॅन एकदम काटेकोर पणे मिनीटाच्या हिशोबात बनवण्यात आला. यशो, धम्या, अभिरत आणि मी अशा चौघांनी भेटायचं ठरवलं. मोठ्या मनाने यशोने आम्हाला तिच्या घरी डिनरचं आमंत्रण दिलं. वर कुणाला काय आवडतं ह्याची शौकशीही केली. विमानतळावरून बस मधे नी बशीतून माझ्या घरी अशी स्वारी आल्यावर आम्ही यशोच्या घराकडे प्रयाण केलं. अभिरत तोवर येऊन पोचला होता. यशो तिच्याच घरी असल्याने तिला उशीर होण्याची शक्यता नव्हती.

तर, धम्या आणि मी यशोकडे पोचल्यापोचल्या आम्हाला जेवणाची जय्यत तयारी झाल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला बराच वेळ गप्पा टप्पा झाल्यावर शेवटी जेवणाकडे मोर्चा वळवला. ह्या दरम्यान सतत पि.जे. मारणं सुरुच होतं.

मेथीचे पराठे, दही, हरबर्‍याची उसळ, चिकन, श्रीखंड, मट्ठा, मसाले भात अशा फर्मास जेवणावर ताव मारता मारता आम्ही एकमेकांची यथेच्छ खेचत होतो. सोबत तोंडी लावायला अर्थातच मि.पा. वरच्या घडामोडी होत्याच.

मधेच मिपा बँगलोर कट्ट्याचे मुख्य आयोजक, मिपा बँगलोर ओसरी चे प्रचारक, मिपा बँगलोर ढोसरी चा खंदा "खंबा" आणि बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समितीचे संस्थापक व उरलेले एकमेव सभासद श्री श्री डॉन बाबा बंगाली (सद्ध्या वास्तव्य जर्मनी) ह्यांनी फोन करून आमच्याशी यथेच्छ गप्पा मारल्या.

अभिरत ने आपली विनोदबुद्धी काय जबराट आहे ह्याच्या पुरावा म्हणून "ऍड्याच्या हातात चक्क पाण्याचा ग्लास" असं म्हणून माझा फोटो काढला.

धम्याला दुसर्‍या दिवशी लवकर उठायचे असल्याने आम्ही शेवटी ११ वाजता यशोच्या घरून निघायचं ठरवलं. धम्या आणि अभिरत ला रिक्षा मधे घलून मी त्यांच्या मागून बाईक घेऊन माझ्या घरी पोचलो.


भाग २- मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त ढोसरीघरी पोचल्या पोचल्या नेहेमी प्रमाणे तातडीने माझ्या बैठकीच्या खोलीचं "बैठकीच्या खोलीत" रुपांतर करण्यात आलं.
धम्याच्या आवडी प्रमाणे सिंगल मॉल्ट ची व्यवस्था करण्यात आली होती.(तात्यानूं, तुमची लय आठवण आली. तुम्हाला उचक्या लागल्या असतीलच)

किचन मधे ग्लास आणायला गेलेला अभिरत तिथे मांडून ठेवलेले काचेचे शो-पिस बघून भिरभिरला.

असो. सगळी व्यवस्था चोख झाल्याची पावती देत धमाल रावांनी आता होऊन जाऊ द्या सुरुवात अशी आज्ञा केली आणि आम्ही सुरुवात केली. मधेच धम्याने मी त्याच्या ग्लासात ओततोय असा फोटो काढून घेतला. म्हणजे 'तू आग्रह केलास म्हणून मला नाईलाजाने घ्यावी लगली' असं कारण देता येइल म्हणाला.

ह्या नंतर पुढचे बरेच तास आम्ही वसंतराव, अण्णा, बाबुजी ह्यांची एकाहून एक सरस गाणी ऐकत घालवले. नॉन-स्टॉप गप्पाही सुरू होत्या. माझ्या शोकेस मधली घड्याळं बघून अभिरत खूश झाला. त्यात लवकरच अजून एकाची भर पडणार असल्याचं सांगितलं. डॉण बाबा बँगलोरी जर्मनीहून येताना व्हाया लंडन येणारेत आणि माझ्यासाठी बिग बेन मधलं घड्याळ उचलून आणणार आहेत हे कळल्यावर त्याला अजूनच आनंद झाला.

मधेच धम्याने मला व्याकूळ होऊन "खरंच का रे तुझ्या नाटकातले साने काका काल्पनीक आहेत?" अशा प्रश्न विचारला. धम्याला इतका कमी वेळासाठी आल्याने दर १० मिनीटानी एक अशा शिव्या पडत होत्या. शेवटी पुढल्या वेळी जास्त वेळ काढून येइन असं आश्वासन त्याच्याकडून घेण्यात आलं.

असं करता करता किती तास कसे गेले ह्याचा हिशोबच राहिला नाही. प्रचंड एंजॉय केलं. शेवटी रात्री झोपायची वेळ आणि सकाळी उठायची वेळ ह्यात किमान १ तास असावा ह्यावर सर्वांचं एकमत झाल्याने आम्ही आमची ढोसरी थांबवायचं ठरवलं.

सकाळी अभिरत कधी तरी गायब झाला. धम्याही ८ च्या दरम्यान अंघोळ करून कामावर गेला. जाताना मला उठवलं "लय भारी मजा आली रे भावा" असं म्हणून माझा निरोप घेताला. मी दार लावलं आणि पुन्हा झोपलो.फोटो - http://www.flickr.com/photos/24440094@N02/sets/72157609254815561/

Comments:

There are 1 comments for मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त आघाडी