माझं साक्षात्कारी एकटेपण

| Labels: | Posted On 11/11/08 at 5:00 PM

माझं साक्षात्कारी एकटेपण
म्हणजेच - घी देखा मगर बडगा नहीं देखा, दूरून डोंगर साजरे, करायला गेलो काय नि झाले उलटे पाय वगैरे वगैरे

फिटण्या आधी एकदा तरी एकटं राहून बॅचलर्स लाईफ मनसोक्त उपभोगायची ही माझी लहानपणापासूनची सुप्त इच्छा होती. ती मी घरच्यांसमोर प्रकटही केली. पण 'आधी स्वतःच्या चादरीची घडी घालायला शिका. आलेत मोठे एकटे राहणारे. ' ह्या शब्दात त्यावर बोळा फिरवला गेला. शेवटी एकदाचं नोकरी निमित्ताने बँगलोरला यावं लागलं आणि ती पूर्ण झाली. पूर्वी आई-बाबांनी परवानगी दिली नसती, पण आता हा अजून बिघडणे शक्य नाही हे त्यांना पटल्याने त्यांनी हसत हसत परवानगी दिली. झालंच तर एकटा राहून तरी थोडा जबाबदार होईल अशी त्यांची अपेक्षा असावी.

इथे यायचं ठरल्यावर मला पहिला प्रश्न पडला 'तिथे मराठी लोकं भेटतील का? ' पण भाऊ म्हणाला 'अरे माझे सगळे रूम-मेटस मराठीच आहेत. ' बँगलोरला जायचं म्हणून शॉपिंग झाली. मी सगळेच मळखाऊ रंगाचे कपडे आणल्याने आईच्या कपाळावर आठी उमटली. जाताना प्रचंड सूचना मिळाल्या. चादरी दर आठवड्याला धूत जा, रोज एकदा तरी केर काढत जा, दिवसातनं दोनदा दात घासत जा, रोज अंघोळ करत जा, गोड खाल्लंस की चूळ भरत जा, बोलणारं कुणी नाहीये म्हणून कसाही राहू नकोस, इत्यादी इत्यादी. मी जाणार म्हणून माझ्या सगळ्या मित्रांना फार वाईट वाटलं. मला माझ्याच पैशाने (पगार वाढला जोश्या, माज नकोय, बिल भर) ५-६ ठिकाणी सेंड ऑफ देण्यात आले. ह्या पार्ट्यांवर माझा वर्षभराचा वाढीव पगार खर्च झाला.

तर, एकदाचा बँगलोरला आलो. सुरुवातीला महिनाभर भावासोबत राहिलो. तो नि त्याचे रूम-मेट्स एकाच कॉलेज मधले नि आता एकाच कंपनीत. हा माझा (मामे असला तरी) भाऊ आहे ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. अगदीच साधा सरळ आहे राव. कसल्याही चांगल्या सवयी नाहीत. रोज पहाटे उठून योगासनं आणि व्यायाम करतो. शनिवार रविवार वेळ मिळेल तेव्हा अजगर व्हायचं सोडून क्रिकेट खेळतो. हे कमी होतं की काय म्हणून त्याला वर दुधाचं व्यसन ही आहे. ह्या सवयी त्याने मलाही लावायचा प्रयत्न केला. पण मला सुधारता सुधारता तोच बिघडेल अशी भीती वाटल्याने सोडून दिला.

त्याचे घर माझ्या ऑफिस पासून लांब असल्याने मी वेगळं घर घेण्याचं ठरवलं. आणि मला घी देखा मगर बडगा नहीं देखा, दूरून डोंगर साजरे, करायला गेलो काय नि झाले उलटे पाय, इत्यादी म्हणींचा अर्थ समजायला सुरुवात झाली.

पहिला धक्का बसला घर शोधणे ह्या प्रकाराने. एजंट हा माणूस किती टिपीकल असू शकतो ह्याचा अंदाज आला. मी सांगितलेल्या अटींपैकी एकही अट पूर्ण न करणारी घरं बघण्यात माझे सुरुवातीचे काही दिवस गेले. त्यात भाडं ही माझ्या बजेट पेक्षा जास्त. एकदा तर एकच घर मला तीन एजंट्स नि वेगवेगळ्या दिवशी दाखवलं. तशा माझ्या अटी फार नव्हत्या. चहावाला, पानवाला नि वाइन शॉप जवळ हवं, एरियात रिक्षा स्टँड हवा आणि मुख्य म्हणजे बेडरूम मध्ये अजिबात उजेड यायला नको. शेवटी २०-२५ घरं बघून झाल्यावर एक घर फायनल केलं. मी येताना कपड्यांशिवाय काहीच सामान न आणल्यामुळे सगळंच घ्यायचं होतं. पण मी मुळातच प्रचंड ऑर्गनाइज्ड माणूस असल्याने ते मला फार जड गेलं नाही. गॅस ते गादी अशी सगळी खरेदी एका शनीवारी ५ तासात संपवली. हाय काय अन नाय काय.

पण दुसरा धक्का इथे बसला. शाळेनंतर डायरेक्ट आत्ता बाजारहाट केल्याने मधल्या काळात सगळ्याच वस्तूंचे भाव इतके आचरटा सारखे वाढले असतील ह्याची मला कल्पनाच नव्हती. हळू हळू मला आटे दाल का भाव कळायला सुरुवात झाली. कपडे धुण्याचा साबण २० रुपये, अर्धा किलो मिल्क पावडर १०० रुपये, ५ किलोचा पोर्टेबल गॅस २५० रुपये, स्कॉच ब्राईट ची किंमत २२ रुपये ऐकल्यावर ह्या सोबत घासायला माणूस पण मिळतो का असं विचारलं दुकानदाराला. अक्षरशः डोकं फिरायची वेळ आली. च्यामारी ह्या रेट नि पगार कितीही वाढला तरी पुरणार नाही. बचत तर लांबच राहिली. प्रेम चोपडाचा 'नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या' हा डायलॉग तंतोतंत पटला. झक मारली नि इथे आलो असं झालं. पण आता आधीचा जॉब सोडल्याने दोर कापलेल्या मावळ्यासारखं लढायचं ठरवलं.

एकटं राहायला लागल्यावर तर रोज नवनवीन गंमती होऊ लागल्या. आपल्याला स्वच्छतेची नि टापटिपीची फार आवड आहे हा गैरसमज पहिल्याच आठवड्यात दूर झाला. च्यायला किती धूळ जमते यार हा डायलॉग वारंवार तोंडात येऊ लागला. सर्वात वाईट झालं म्हणजे पूर्वीची ऑटोमॅटिक लाईफ स्टाइल गेली. पूर्वी कसं, कपडे बादलीत टाकले की ते आपोआप इस्त्री होऊनच कपाटात सापडायचे. डबा सिंक मध्ये टाकला की तो आपोआप दुसऱ्या दिवशी भरलेल्या अवस्थेत बॅग मध्ये सापडायचा. हे सगळंच बंद झालं. खरं तर हे सगळं सुरू झालं. इतर वेळी इतकी हलकी वाटणारी चादर धुवायला घेतली की अचानक कशी जड होते हे मात्र कळलं नाही. अंघोळ ही गोष्ट 'आज करायची कामं' ह्या सदरात मोडू शकते ह्याचाही साक्षात्कार झाला.

पहिल्या दिवशी झोपलो तर काही केल्या झोपच येईन. ह्यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे. झोप न येण्याचं कारण होतं, आमच्या मुंबईच्या घरात दोन बिल्डिंग मधल्या ट्यूबचा प्रकाश यायचा. इथे मिट्ट काळोख. शेवटी किचन मधला दिवा लावल्यावर झोप आली.

ह्यानंतर सुरू झालं आमचं आवडतं 'एनर्जी कंजर्वेशन'. ह्याला काही जण आळशीपणाही म्हणतात. म्हणजे चहा झाल्यावर गाळणं धुवावं लागू नये आणि दिवसातून दोन वेळा दूध तापवावं लागू नये म्हणून मिल्क पावडर आणि टी बॅग्स आणल्या, घर झाडताना वाकावं लागू नये म्हणून लांब दांड्याचा झाडू घेतला, चादर दर आठवड्याला धुण्यापेक्षा २ आठवड्याने ड्राय क्लिनींगला टाकायला लागलो. ह्या सगळ्यामुळे आयुष्य जरा सुसह्य झालं. शनिवार रविवार हवं तेव्हढं झोपणं सुरू झालं. एका विकांताला फक्त १ चहाचा ब्रेक घेऊन सलग १७. ५ तास झोपायचा रेकॉर्डही करून झाला. शुक्रवारी रात्री जे झोपायचं ते डायरेक्ट शनिवारी दुपार नंतरच उठायचं. त्यामुळे मग दुपारच्या जेवणाची चिंता मिटते. संध्याकाळी जरा चकाट्या पिटल्या पुन्हा झोपायला मोकळे. मग हेच सायकल रविवारी कंटिन्यू करायचं.

पण नव्याची नवलाई संपल्यावर ह्याचाही कंटाळा आला. एकटेपण खायला उठू लागलं. मुंबईत वेळी अवेळी फोन करून चावणारे आणि इतर वेळी त्रास देणारे मित्र हवेहवेसे वाटू लागले. 'अरे मी देतो तुमचे चहा-सिगारेटचे पैसे, पण या इथे' असं मोठ्ठ्याने ओरडावंसं वाटू लागलं. साला एक मराठी शब्द कानावर पडेना. पार सरकलो होतो. मुंबईला मित्रांना फोन केल्यावर कानावर पडणाऱ्या शिव्या ओव्यांसारख्या वाटू लागल्या. कुठे कोणी 'अरे' म्हणाला की तो 'अरे' हिंदीचा आहे की मराठीचा म्हणून कान टवकारायचो. MH च्या गाड्या बघून (इंक्ल्यूडींग MH १२) उगाच मनातून बरं वाटायचं. १-२ वेळा मुंबईला गेल्यावर मुलींना माहेरी जाताना काय वाटत असेल ते कळलं.


सुदैवाने ह्यावरही उपाय सापडला. माझी एक मैत्रीण एके दिवशी मला एका मराठी नाटकाला घेऊन गेली. आणि इथले महाराष्ट्र मंडळ भलतंच कार्यरत आहे हे मला कळलं. पूर्वी तात्यांचं आहे म्हणून नाव नोंदवलेल्या 'मिसळ-पाव'ची पण चटक लागायला सुरुवात झाली. मग काय, मित्र जमायला सुरुवात झाली. 'जाऊ तिथे कट्टा करू' हा धर्म असल्याने इथेही कोब्रा कट्टा आणि आमच्या 'मिसळ-पाव'चा कट्टा सुरू केला. इथेही असंख्य मित्र जमले. धमाल सुरू झाली. आणि सहा महीन्या नंतर पहिल्यांदाच मला आपण एकटं राहतोय ह्याचा विसर पडला. बॅचलर लाईफ खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला सुरुवात झाली.

मागच्याच आठवड्यात एका मित्राचा फोन आला. त्याला इथे नोकरीची ऑफर आली होती. मला पडलेला प्रश्न त्यालाही पडला 'अरे पण तिकडे मराठी लोकं आहेत का? ' माझ्या तोंडून उत्तर बाहेर पडलं 'अरे नको तितकी आहेत, तू ये बिंदास... '

Comments:

There are 5 comments for माझं साक्षात्कारी एकटेपण