इथे जोशी रहातात - भाग २

| Labels: | Posted On 2/5/09 at 11:55 PM

भाई जोशी मोनोलॉग २

तात्याची बायको सगुणा अगदी नावा प्रामाणेच होती. पण ह्याचा हा आळस मात्र तिच्या पार डोक्यात जायचा. एके दिवशी बिचारी ह्याला झोपेतून उठवण्यासाठी मोठ्याने ओरडली आणि हार्ट अटॅक येऊन सासूकडे निघून गेली. त्यानंतर तर ह्या दोघांना मोकळं रान मिळालं. आईच्या भितीने का होईना चंद्या निदान दहावी तरी पास झाला. शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून शेजारी पाजारी चंद्याच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे यायचे. लोकांच्या वाळत घातलेल्या कपड्यांवर पाणी ओतणे, वाळवणं पळवणे, वाड्यातल्या कॉमन संडासात कुणी गेले असता बाहेरून कडी घालणे, दुपारी लोकं झोपले असताना कडी वाजवणे, एक ना दोन. अप्पाला तर ह्या दोघांनी कधीच गुंडाळून ठेवलं होतं. अप्पा महा खट म्हणूनच इतकी वर्ष तग धरून आहे. दुसर्‍या एखाद्याने ह्यांना कंटाळून एकतर स्वत: जीव तरी दिला असता किंवा आत्महत्या तरी केली असती. मला चिंता आहे ती अप्पा गेल्यावर तात्याचं काय होणार ह्याची.

बाबांचा मोनोलॉग

मागची पन्नास वर्ष अशीच काढली. काही न करता आणि जगाला धक्का न लावता. आमच्या आईला माझ्याकडून फार अपेक्षा. मुलगा मोठेपणी कुणी तरी मोठा होईल. पण बाबांनी बाळाचे पाय पाळण्यातच बघितले होते. बाबांचे एक काका लोकांचे कान पाहून भविष्य सांगायचे. त्यांनी बाबांना सांगितलं होतं 'तुझ्या मुलाच्या आयुष्यात राजयोग आहे. सगळं व्यवस्थीत होईल, चिंता नको.' त्या प्रमाणे सगळं व्यवस्थीत झालं. फार काही करावं लागलं नाही. कारण डोक्यावर हक्काचं छप्पर होतं, कमावता बाप होता, दुसर्‍या जबाबदार्‍या नव्हता. मग कशाल ४ कवड्या मिळवण्यासाठी रक्त आटवा.

आमची बायको भारी तापट होती. मी सुखाने झोपलेलो तिला अजिबात बघवायचं नाही. येता जाता ओरडायची. एकेदिवशी अशीच मला झोपेतुन उठवण्यासाठी माझ्यावर रागावली आणि अतिरागामुळे हार्ट अटॅक आला आणि कायमची शांत झाली. आमचं पुत्ररत्न म्हणजे माझ्यावर कडी आहे. माझं आयुष्य गेलं असंच, पण त्याला मात्र नक्कीच काही तरी उद्योग धंदा करायला लावलं पाहिजे. आता आला
की बोलतो आज त्याच्याशी.

मुलगा - हाय डॅड...
बाप - हॅल्लो सन... कुठे शेण खात होतास इतका वेळ? ही यायची वेळ झाली का? आमची जेवणं झाली कधीच. आत तुला कोण वाढणार, तुझा बाप?
मुलगा - हो...
बाप - कानफटवीन... कुठे होतास इतका वेळ?
मुलगा - अहो कट्ट्यावर गेलो तर कळलं की आज आपल्या नाट्यग्रुहात एक कवी संमेलन आहे... फुकट प्रवेश होतं म्हणून बसलो थोडा वेळ...
बाप - वा वा वा... कोण कवी होते...
मुलगा - होते हो असेच नवशे गवशे... टिपीकल इंटेलेक्चुअल 'आव' आणणारे...
बाप - म्हणजे????
मुलगा - म्हणजे आत्म्याची जाणीव, भावने मागची भावना, एकट्यातलं जग....
बाप - बापरे... तुझी उतरली असेल मग खाडकन...
मुलगा - हो ना... पण अशी गाढ झोप लागली म्हणून सांगू...
बाप - अरे मग कविता ऐकलीस की नाही...
मुलगा - ऐकली ना... ऐकवू का???
(बाप होऊन जाऊ दे अशी खूण करतो)
मुलगा - पुन्हा तीच सकाळ, पुन्हा तीच दुपार...
बाप - वा वा... वा वा...
मुलगा - पुन्हा तीच सकाळ, पुन्हा तीच दुपार... पुन्हा त्याच असहाय्यतेचा, आत्म्यावर बलात्कार...
बाप - आइच्चा घो...
मुलगा - दुसरी ऐका...
शब्द डोळ्यांनी बोलतात, मनाचे मौन आहे...
बाप - ह्म्म्म्म....
मुलगा - शब्द डोळ्यांनी बोलतात, मनाचे मौन आहे... भंगल्या नात्यात माझ्या, उसास्यांची चैन आहे...
बाप - बास...
मुलगा - अहो ह्या नंतर झोप लागली मला
बाप - आता काय प्रोग्राम?
मुलगा - नेहेमीचाच... जेवण आणि निद्रादेवीची आराधना...
बाप - वा... निद्रादेवीची आराधना म्हणे. गादीवर पडल्यापासून दुसर्‍या मिनीटाला अजगर होतो तुझा... घोरायला लागतोस लगेच...
मुलगा - अहो कसलं काय... ह्या घरात मनसोक्त घोरता पण येत नाही....
बाप - का रे???
मुलगा - जोरात घोरलो तर कुठच्या तरी भिंतीचे पोपडे पडतील अशी भीती वाटते...
बाप - अरे इतकी काळजी आहेत तर पैसे कमवा आणि वाडा करा की नीट.
मुलगा - ह्म्म्म... रमी खेळायची का?
बाप - काढ पत्ते...
(मुलगा पत्ते आणायला आत जातो आणि आतून पत्ते पिसत पिसत बाहेर येतो)
बाप - नीट पिस... आणि पत्ते लाऊ नकोस...
मुलगा - अहो पत्ते म्हणजे काय सायकल आहे का हवी तशी फिरवायला...
बाप - मग दर वेळी कसा रे तूच जिंकतोस...
मुलगा - नशीब... तुमचं नशीब फुल्या फुल्या आहे त्याला तुम्ही तरी काय करणार...
बाप - तुझ्या सारखं अवली कार्ट आमच्या घरात आलं तेव्हाच हे कळायला हवं होतं मला...
(पत्ते वाटून झालेत)
बाप - काय मग चंदू शेट... पोटापाण्यासाठी पुढे-मागे काही करायचा विचार आहे की नाही?
मुलगा - विचार सुरू आहे...
बाप - शब्बास, काय विचार सुरू आहे?
मुलगा - झाला की सांगिनच... सद्ध्या तरी काही तरी बिझनेस करायचा विचार आहे...
बाप - वा वा वा... पण धंद्याला लागणारं भांडवल कुठून मिळवणार...
मुलगा - तुमच्याकडून...
बाप - म्हणजे थोडक्यात मला धंद्याला लावायचा विचार आहे तर... चंद्या, धंदा करणं तेरे बस की बात नहीं है...
मुलगा - का हो...
बाप - मुळात त्या साठी तल्लख बुद्धी आणि गोडबोल्या स्वभाव लागतो. ह्या दोन पैकी एकही आपल्याकडे नाहिये...
मुलगा - बास का...
बाप - बास का काय... मागच्या वर्षी फटाक्यांचा धंदा केला होतास... शेवटच्या दिवशी सगळे फटाके तुलाच उडवायला लागले...
मुलगा - होतं असं कधी कधी...
बाप - कधी कधी? मधे एकदा आंब्याचा व्यापार करण्यासाठी अजोबांकडून पैसे घेतलेस. तुला मेल्या हापूस आणि पायरी मधला फरक कळत नाही.
मुलगा - का लाज काढताय???
बाप - चंद्या मेल्या कसं होणार तुझं पुढे???
मुलगा - होईल हो... तुम्ही टेंशन नका घेऊ...
बाप - कसं होईल...
मुलगा - बाबा एक सांगा, माणसाला जगायला काय लागतं?
बाप - काय?
मुलगा - रोटी कपडा और मकान... आत्ता रोटी आजोबा देतायत, कपड्यांची मला हौस नाही आणि मकान आहेच की आपलं.
बाप - मी आणि आजोबा भिंतीवर लटकलो की काय करणार आपण?
मुलगा - त्याला वेळ आहे हो अजून बराच. तुम्ही अजून किमान ३० वर्ष आणि आजोबा किमान १५ वर्ष कुठेही जात नाही.
बाप - मागच्या आठवड्यात आपले हॉटेल वाले तांबे भेटले होते.
मुलगा - काय म्हणाले???
बाप - त्यांची मुलगी आहे लग्नाची. तुझ्यासाठी विचारत होते.
मुलगा - अहो ती टिपीकल वरण-भात मॉडेल आहे हो.
बाप - हॉटेल मधे पार्टनरशीप देतो म्हणाले.
मुलगा - पण ती अगदीच साजूक तूप आहे हो. जराही तडका नाही...
बाप - तुला बिपाशा बासू हवी आहे का मग?
मुलगा - तिला मी चाललो तर मला ती नक्कीच धावेल...
बाप - अरे अशा बायका सांभाळणं कठिण असतं सोन्या. एकदम हाय मेंटेनन्स आयटम आहे तो. त्यात तुला स्वतःच्या पैशाने चड्डीची नाडी घ्यायची ऐपत नाही.
मुलगा - जाऊ द्या हो...
बाप - तुला कुणी आवडते का रे?
मुलगा - एक आहे...
बाप - कोण? कुठची? कुणाची? काय करते?
मुलगा - आपले शिंत्रे काका आहेत ना त्यांची 'शिला'
बाप - ती??? अरे ती अजून कॉलेज मधे आहे...
मुलगा - मग???
बाप - अरे तुला लग्न करायचंय की मुलगी दत्तक घ्यायची आहे?
मुलगा - बाबा तुम्ही विचारलत कुणी आवडते का? मी सांगितलं.
बाप - झक मारली तुला विचारलं. कुठे अक्कल शेण खायला गेली होती माझी देव जाणे...
(आजोबा आतून बाहेर येतात)
आजोबा - वा वा वा... आज बाप-मुलगा मिळून त्यांच्या आवडत्या डिश वर ताव मारतायत वाटतं. चालू द्या चालू द्या...
मुलगा - बसा आजोबा... पाच, तिन, दोन खेळू...
आजोबा - मी झाडांना पाणी घालायला चाललोय... उठ आणि मदतीला ये...
मुलगा - अहो बाबा एकटे कसे रमी खेळतील? अर्थात एकटे खेळले तरी हरतील म्हणा... (बाबा मारायची ऍक्शन करतात) आजोबा आपण अफूची, भांगेची किंवा मोहाची झाडं लावायची का हो? तुमचे किती पैसे वाचतील विचार करा... (आजोबा मारायची ऍक्शन करतात)
आजोबा - चल उठ आता…
बाप - थांबा बाबा मी येतो
(दोघे बाहेर जातात)

Comments:

There are 6 comments for इथे जोशी रहातात - भाग २