आम्ही संघटना उभारतो

| Labels: | Posted On 2/11/09 at 11:24 PM

आत्ता पर्यंत आम्ही बर्‍याच संघटना, संस्था सुरू केल्या. काही संघटनांच्या संस्थापनेच्या वेळी जातीने हजर होतो. सगळ्याच्या सगळ्या एकजात आपटल्या. (वि.सू. - जातीने आणि एकजात हे जातीवाचक शब्द म्हणून वापरले नाहियेत) ह्या लेखाद्वारे आम्ही आमच्या / संघटना सुरू करणार्‍यांच्या चुका सांगणार आहोत. जेणेकरून अशा चुका तुमच्याकडून होणार नाहीत.

सुरुवात सगळ्यात लेटेस्ट पासून करूया -

'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती'


बंगळूरात एका ढोसरीचे समयी श्री. श्री. प. पू. चो. च्या. डॉण बाब बंगलोरी ह्यांच्या डोक्यात 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' काढायची कल्पना बरळली. सॉरी. तरळली. ही संघटना यशस्वी व्हावी म्हणून त्यांनी लगेच त्यावेळी तिथे हजर असलेले म. हा. डां. ब. र. ट. अभिज्ञ दादा बारलीकर ह्यांना संस्थापक पद देऊन टाकले. एक मेंबर पक्का झाला. मलाही एखादं पद हवं होतं. पण त्या दोघांनी 'सगळेच पदाधिकारी झाले तर आपण वट कोणाला दाखवणार?' असे ठरवून मला सभासद म्हणून नोंदवून घेतले. इतपत ठीक आहे. पण पुढे एक चूक झाली. आमच्या ब्रेनस्टॉर्मींग चे बिल २,००० च्या वर आल्याचे बघताच त्यावेळी त्यांनी मला आजीवन सभासदत्व शूल्क १,००० फक्त दे असे सांगितले.

पुढे ह्या सात्विक आहार आणि योगासनांची सुरुवात सभासद म्हणून मीच करावी आणि पहिलाच मेंबर कामाला लागल्याचे जगाला दाखवून समिती ची इमेज बनवावी असे त्यांनी ठरवले. पुढे मला मदत म्हणून डाण्याने रात्रपाळी झाली की घरी जायच्या आधी मला कॉल करून उठवायची जबाबदारी घेतली. अभिज्ञ नी पुढच्या ढोसरी ला खास माझ्यासाठी फ्रेश लाईम ज्युस आणून माझा पेशंस तपासायचे ठरवले. वर तो वाढावा म्हणून माझ्यासमोरच सामीष भोजन आणि अपेयपान करायचे ठरवले. आणि वर हे सगळं माझ्याच भल्यासाठी चालल्याचे माझ्या मनावर ठासवायचा प्रयत्न करून हा सगळा खर्च प्लस गाडीभाडे (डाण्या - त्याचं घर ते माझं घर व्हाया लंडन + अभिज्ञ - त्याचं घर ते माझं घर व्हाया ऍम्स्टरडॅम) मागितले.

हे सगळं ऐकल्यावर मी विचार करून सांगतो असं म्हणून त्यांना सप्तरंगी टांग दिली.

धडा - संघटना सुरू होण्या अगोदरच सभासदांना देशोधडीला लावायचे प्लॅन्स बनवू नयेत. बनवलेच तर ते किमान त्यांच्या समोर डिस्कस करू नयेत.आखील भारतीय फुंके संघटना


ह्या संघटनेची सुरुवात सरकारच्या एका अमानवतावादी निर्णया पासून झाली. आमचे काही समाजवादी मित्र आणि आम्ही रेल्वेचे इंजीन स्टेशनात धूर सोडत बसते तसे कट्ट्यावर बसलो असताना ह्या अघोरी निर्णया विरूद्ध आवाज उठवायचे ठरवले. सार्वजनीक ठिकाणी धूम्रपान निषेधाचा निषेध सार्वजनीकरित्या करायचे मान्य झाले. लगेच तिथल्या तिथे आम्ही पुढाकार घेऊन आखील भारतीय फुंके संघटना स्थापन केली. बाबू पानवाल्याने आमच्या प्रयत्नांनी निर्णय बदलल्यास सगळ्यांना एक्-एक गोल्ड फ्लेक देण्याचे मोठ्या मनाने जाहीर केले.

ह्यामुळे उत्साह वाढून आम्ही आम्ही सिगारेटी ओढून मेलो तर सरकारच्या बापाचं काय जातं? हा सिगारेट इतकाच ज्वलंत लेख लिहून जनतेला जागॄत करायचा आणि सरकारला आम्हाला मोकळा धूर सोडू द्या अशी विनंती करायचा प्रयत्न केला. ह्या वरून आमच्यावर बरीच टिका झाली. अनेक लोकांनी तुम्हाला चटके दिले पाहिजेत अशी अरेरावीची भाषाही वापरली.

इतकं सगळं होऊनही ही संघटना यशस्वी झाली नाही. कारण नियमाची अंमलबजावणी करणारी लोकंच हा नियम पहिल्या दिवसापासून धाब्यावर बसवू लागली. त्यामुळे मग आमच्या संघटनेला कोण विचारणार. पहिल्याच दिवशी आमच्या संघटनेची ऍश झाली.

धडा - आपण जी संघटना काढतो आहोत त्याची खरंच गरज आहे का ह्याची खात्री करावी. तुम आगे बढो म्हणणारी जनता आपण आगे बढल्यावर मागच्या मागे सटकते. उगाच पुण्याला जाऊन 'विनय विकास समीती अथवा विनम्र भाषा प्रचार समिती' काढाल तर तोंडावर पडाल.


आपली बुडणारी संस्कॄती बचाव समिती

आमच्या गिरगावात भाटवडेकर चाळीमधे नाना परचूरेच्या घरी त्याचे आजोबा (रत्नांग्री, मधली आळी) काही दिवस वास्तव्यास आले होते. चाळीच्या गणेशोत्सवात झालेले सांस्कृतीक कार्यक्रम पाहिल्यानंतर आलेल्या हॄदयविकाराच्या झटक्यानंतर बरे झाल्यावर त्यांनी तडकाफडकी आपली बुडणारी संस्कॄती बचाव समिती ची स्थापना केली. पहिल्या सभेच्या दिवशी संकष्टी असल्या कारणाने सर्वांना साबूदाण्याची खिचडी, दाण्याची आमटी आणि आंबा बर्फी विनामूल्य वाटण्याचे ठरवले. हा मेनू कळताच अण्णांच्या सभेला अलोट गर्दी लोटली. (ह्या वेळी एका भामट्याने रस्त्यावरून जाणार्‍या लोकांना खिचडीची कूपन्स वाटल्याचे ऐकीवात आहे.)

समोरच्या चाळीत रहाणार्‍या डिसिल्वा अंकलनेही 'दिंदू क्शंखॄई भाछाय्लाच्च हघी' (खिचडी + हिंदू संस्कॄती वाचवायलाच हवी ) असे विधान केले. ह्या दरम्यान बर्‍याच मान्यवरांची भाषणं झाली. त्यात ग्रँटरोड येथे हातभट्टी लावणार्‍या तोड्या भाय ने 'सर्व्यांनी हुद्या पासून धेशीच दोसायचा निराधार करा' असे आवाहन केले आणि सँपल म्हणून पहिल्या धारेची नारंगी एक एक चमचा उपस्थीतांना वाटली.

अण्णा खूष झाले. लोकं तुडूंब झाली.

इतकं असूनही ही संघटनाही बंद पडली. कारण त्याच दरम्यान चाळीतल्या गोडसेंचे पुत्ररत्न कु. अशोक नुकतेच अमेरिकेहून शिक्षण संपवून परत आले होते. येतान त्याने ब्लॅक, ब्लू कलरची बरीच लेबलं आणि रॉथमन्स, कॅमल इत्यादींचे खोके आपल्या जुन्या मित्रांना द्यायला आणले होते. प्लस त्याच्या घरात ठणाणणार्‍या रॉबी विल्यम्सही, मॅडोना, इ. प्रभूती चाळीतल्या पोट्ट्या-पाट्ट्यांना वेड लावत होत्या. त्यात ह्या सभेच्या दुसर्‍याच दिवशी त्याने चाळीतली उत्साही जनता गोळा करून त्यांना मुंबैच्या रात्र-जगाची अनोखी सफर घडवली होती.

धडा - आपली काँपीटीशन कोण आहे ह्याचा पूर्ण विचार केल्यावरच संघटना काढावी. अन्यथा पोपट होतो. पंजाबात जाऊन दाढीचे दुकान फुकटात दाढ्या केल्या तरी चालणार नाही. फावला वेळ असेल तर संघटना जरूर काढावी पण ती चालेलच अशी अपेक्षा करू नये.


तर, आपण कुठलीही संघटना सुरू करण्याआधी ह्या सगळ्या धड्यांचा गॄहपाठ करावा अशी कळकळीची विनंती.

Comments:

There are 3 comments for आम्ही संघटना उभारतो