इथे जोशी रहातात (अंतिम भाग)

| Labels: | Posted On 3/3/09 at 12:06 AM

तर अशी ही भुतावळ ह्या दोन खोल्यांमध्ये मागची अनेक वर्ष राहतेय. माणसाच्या गरजा मर्यादित असल्या की त्याला अधिक पैशाची गरज भासत नाही हे माझं वाक्य, तात्या आणि चंद्याने फारच मनावर घेतलंय. तसं वाड्यातल्या ह्या दोनच खोल्या वापरात असला तरी अख्खा वाडाच जोशांचा आहे बरं का! पण करणार काय. वाड्याचंही वय झालंय त्यामुळे भिंतींचा रंग उडालाय, पोपडे पडलेत, प्लॅस्टर निघालंय अशा विदीर्ण अवस्थेत सद्ध्या वाडा आहे. अप्पांना पेंशन मध्ये हे सगळं ठीक करणं निव्वळ अशक्य असल्याने बाकीच्या खोल्या तूर्तास बंद आहेत. बरं, एखाद्या बिल्डरला वाडा विकायचा म्हटला तर अप्पा तुळशी वृंदावना शेजारी अंगणात आपल्याला गाडतील ह्याची तात्या आणि चंद्याला खात्री आहे. अप्पांच्या म्हणण्यानुसार तात्या एकदम वाया गेलाय. आणि चंद्याही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय ह्याचंही दु:ख आहे. पण देवाघरी जाण्याआधी वाड्याला पुन्हा पूर्वीसारखं चकचकीत करायचं ही महत्त्वाकांक्षा मात्र अप्पा जोश्यांच्या मनात अजून आहे.


तात्या आणि चंद्या हातात स्टीलचा ग्लास घेऊन हॉल मध्ये बसलेत.

मुलगा - कसं वाटतंय तात्याराव...
बाप - बापाला नावाने हाक मारतोस???
मुलगा - पुढे राव लावलंय की...
बाप - म्हणून काय झालं? जोशी आहेस म्हणून सांभाळून घेतोय तुला...
मुलगा - बाबा... शांत व्हा... माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या
बाप - कोणत्या रे?
मुलगा - हे सोनेरी द्रव्य पिऊन कसं वाटतंय तात्याराव तुम्हाला???
बाप - भारीच आहे रे... च्यायला ह्याच्यासाठी कुठून पैसे आले तुझ्याकडे???
मुलगा - आंबे खा हो तात्या तुम्ही... बाठी कशाला मोजताय? आपला वाडा किती जुना आहे हो?
बाप - असेल साधारण सत्तर-एक वर्ष जुना? का रे?
मुलगा - सहज हो... कुठे गुप्तधन मिळालं तर काय मजा येईल ना? घराला तळघर, तळघरात सोन्याचे हंडे आणि एक सुंदर अप्सरा...
बाप - गाडलेली अप्सरा घेऊन काय करणारेस? आणि हंड्यांचं म्हणशील तर नो चान्स. अरे भाई जोशींनी आयुष्यभर काडी काडी जोडून हा वाडा उभा केलाय. अर्धपोटीही राहिलेत बऱ्याचदा असं अप्पा म्हणतात. पूर्वी भाडेकरू होते पण आता मॉडर्न मुलांना वाडा आवडत नाही म्हणून गेले बिल्डिंग मध्ये राहायला.
मुलगा - च्यायला... त्यात काय आहे न आवडण्यासारखं? मी नाही राहत इथे... सोबत वाड्या इतके जुने आजोबा पण आहेत...
बाप - चिरंजीव... आपल्याला दुसरा काही पर्याय आहे? छप्पर सोडा, साधं कौल तरी आहे का टाळक्यावर?
मुलगा - आयला हो...
बाप - चल आवर पटापट... आजोबा यायची वेळ झाली...
मुलगा - आज कुठे गेलेत हो???
बाप - कुणास ठाऊक, कुठे जाताय म्हणून विचारलं तर म्हणाले 'झाडांना पाणी घाल, मला यायला संध्याकाळ होईल' (कोरस हास्य)
(दोघे उठून आत जातात)
(आजोबा घरात येतात)
आजोबा - तात्या... चंद्या... बाहेर या नालायकांनो...
बाप - आलात बाबा... कुठे होतात आज दिवसभर?
आजोबा - इंटरव्ह्यूला गेलो होतो...
तात्या + चंद्या - काय???
बाप - तुम्ही आणि नोकरी...
मुलगा - अहो मस्त बसून पेंशन खायच्या वयात कुठे जाता नोकरीला...
आजोबा - कार्ट्या... तुम्हाला एक नवा पैसा कमावायची ना अक्कल ना इच्छा... म्हणून आता मीच पुन्हा नोकरी करायचं ठरवलंय... पार्ट टाईम आहे... पण तेव्हढाच जरा विरंगुळा आणि कमाई. नाहीतरी घरी बसून तुमचे माकडचाळे बघण्यापेक्षा ते बरं, नाही का?
मुलगा - हो ना...
बाप - हो ना काय गधड्या...
मुलगा - आजोबा मला पहिल्या पगारात काय घेणार???
बाप - गप रे... बाबा पण हे बरं दिसतं का?
आजोबा - नाही... पण हे असं भूत बंगला झालेलं घरही बरं दिसत नाही. भाईंच्या शेजारी लटकण्याआधी हा वाडा त्यांनी दिला तसा पुन्हा मस्त करणार.
मुलगा - आजोबा... ह्या वाड्यावर इतका का जीव लावून बसलायत तुम्ही... परवा कापसे बिल्डर भेटला होता. म्हणाला, वाड्याच्या जागी बिल्डिंग बांधली तर २ बेडरूम चे ३ फ्लॅट्स आणि तिघांना प्रत्येकी ३० लाख रुपये. च्यामारी आयुष्यभर तंगड्या वर करून तंगड्या तोडता येतील...
आजोबा - ये इथे... तोडतो तुझी तंगडी...
मुलगा - गंमत हो... मला माहिती आहे ह्या वाड्यात आपल्या मूळ पुरुषाचा वास आहे... मी आलोच पाच मिनिटात...
बाप - अरे आत्ता कुठे निघालास, जेवायची वेळ झाली...
आजोबा - तात्या... अरे माझी तरी कुठे इच्छा आहे नोकरी करायची... पण अरे सरकारी नोकरीत पेंशन ते किती मिळणार. आणि तुलाही बोलून काही उपयोग नाही. आपली आयुष्य संपली रे, पण मला चिंता वाटते चंद्याची. काय करील अरे तो आपल्या नंतर? त्याला वेळीच सुधार बाबा... मी काय आज आहे उद्या नाही...
बाप - चिंता नका करू बाबा... होईल सगळं ठीक...
आजोबा - आपोआप कसं होईल ठीक?
बाप - आज आम्ही दुपारी त्याच विषयावर बोलत होतो... चंद्याने एक मस्त प्लॅन बनवलाय. तो सक्सेसफुल झाला की आयुष्याची चिंता मिटेल...
आजोबा - असं म्हणतोस??? पण तू लक्ष ठेव बाबा त्याच्यावर. वाईट मार्गाला लागायला नको...


(हे नाटक ह्यापुढे दोन वेगळ्या प्रकारे घडून दोन वेगळ्या प्रकारे संपते. दोन शेवट दिले आहेत. जो आवडेल तो आपला मानावा. )शेवट एक
(चंद्या हातात एक छोटा पुडा घेऊन येतो)
मुलगा - अप्पाराव तोंड उघडा... (पेढा भरवतो... ) तुम्हाला नोकरी लागल्या बद्दल अभिनंदन...
आजोबा - अरे एकच आणलास???
मुलगा - अहो, पाचच रुपये होते खिशात, त्यात एकच आला...
(तिघेही बसतात. तात्या चंद्याला पाणी देतात)
मुलगा - आजोबा, तुम्हाला नोकरी करायची काहीही गरज नाहीये...
आजोबा - हो का???
मुलगा - हो...
आजोबा - तात्या म्हणत होता तुझ्याकडे काहीतरी सॉल्लीड प्लॅन आहे. सक्सेसफुल झाला तर आयुष्याची चिंता मिटेल... मगाशी काय म्हणालास??? हां, तंगड्या वर करून तंगड्या तोडता येतील...
मुलगा - तुमचा विश्वास बसणार नाही... पण मी आता सुधारायचं ठरवलंय...
आजोबा - हा हा हा हा हा... चंद्या, मेल्या वय झालं रे माझं... इतके भयानक विनोद नको ऐकवत जाऊस...
मुलगा - मला वाटलंच होतं तुमचा विश्वास नाही बसणार...
बाप - कसा बसेल???
आजोबा - बरं, तू म्हणतोस तर एक क्षण मान्य करू... पण सुधारणारेस म्हणजे नक्की काय करणार आहेस???
मुलगा - पुढे शिकणार...
आजोबा - व्वा...
बाप - पण तू शिकून कमावायला लागेपर्यंत काय???
मुलगा - सांगतोय हो पुढे... आपल्या वाड्याच्या मागे जागा आहे ना तिथे २ दुकानं बांधायची...
आजोबा - आणि???
मुलगा - आणि ती रेंट वर द्यायची...
आजोबा - अरे स्वतःची दुकानं रेंट वर देण्यापेक्षा स्वतः चालवा की...
मुलगा - ज्या धंद्यांना मरण नाही असे तीनच धंदे आहेत आजच्या काळात... पानवाला, मोची आणि डॉक्टर... ह्यातलं मला काहीही येत नाही...
आजोबा - ह्म्म्म्म.... विचार करावा लागेल
मुलगा - विचार नका करू आजोबा, कृती करा...
आजोबा - कानफाट फोडीन, मला नको सांगूस काय करायचं ते.... हे बघ अशी कुठलीही दुकानं बांधायला माझी परवानगी नाही...
मुलगा - माहिती आहे हो... तर अशी २ दुकानं बांधायची... ती भाड्यावर द्यायची नाहीत... आपल्याकडेच ठेवायची...
आजोबा - आणि काय करायचं?
मुलगा - एका दुकानात आपण इलेक्ट्रिक स्टोअर टाकायचं...
आजोबा - ते चालवणार कोण???
मुलगा - तुमचा मुलगा तात्या... बऱ्याच वर्षा पूर्वी तुमचा मुलगा इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला होता...
बाप - अरे माझं वय झालं आता...
मुलगा - थोडेच दिवस हो बाबा... माझं शिक्षण झालं की मग मी बसत जाईन दुकानावर...
आजोबा - चंद्या आज काहीतरी वेगळं प्यायलास का रे?
मुलगा - नाही हो...
आजोबा - मग इतका बदल अचानक कशाने झाला?
मुलगा - काल बर्वे नगरात गेलो होतो... तिथे काळे वाडा होता ना...
बाप - पोस्ट ऑफिस समोर...
मुलगा - हो... त्या जागी आता एक बिल्डिंग उभी राहिली आहे...
आजोबा - काय सांगतोस काय??? फार वाईट झालं रे. काळे आजोबांना ओळखत होतो मी, फार जीव होता त्यांचा वाड्यावर...
मुलगा - हो ना... पण ३ वर्षापूर्वी काळे आजोबा वारले, मग नातवंडांनी वाडा विकला बिल्डरला नि पैसे घेऊन बसलेत मजेत...
बाप - ह्म्म्म्म...
मुलगा - ते बघितलं आणि एकदम मनात विचार आला... आपल्या वाड्याचं असं नाही होता कामा... आत्ताच हात पाय हलवले नाहीत तर पुढे वाट लागेल...
आजोबा - खरंय तुझं... अरे भाई जोशींनी काडी काडी जमवून हा वाडा बांधलाय, प्रसंगी उपाशी राहिले पण वाड्याचं काम थांबवलं नाही...
मुलगा - हो ना... मग आता आम्ही किमान जे आहे ते तरी नीट सांभाळायला हवं ना...
आजोबा - खरंय रे चंद्या तुझं... देवाने तुला सुबुद्धी दिली आता यश देओ...
मुलगा - खरंय ना??? (चंद्या खिशातून अजून दोन पेढे काढतो) मग भरवा हे पेढे आम्हाला...
बाप - अरे खिशात पाचच रुपये होते ना???
मुलगा - अहो ते माझ्या खिशात... तुमच्या खिशातले दहा रुपये पण घेऊन गेलो होतो ना...

(तिघेही आनंदाने हसू लागतात. पडदा पडतो. )शेवट दोन(चंद्या हातात एक छोटा पुडा घेऊन येतो)
मुलगा - अप्पाराव तोंड उघडा... (पेढा भरवतो... ) तुम्हाला नोकरी लागल्या बद्दल अभिनंदन...
आजोबा - अरे एकच आणलास???
मुलगा - अहो, पाचच रुपये होते खिशात, त्यात एकच आला...
(तिघेही बसतात. तात्या चंद्याला पाणी देतात)
आजोबा - तात्या म्हणत होता तुझ्याकडे काही तरी झकास प्लॅन आहे... सक्सेसफुल झाला तर आयुष्याची चिंता मिटेल... मगाशी काय म्हणालास??? हां, तंगड्या वर करून तंगड्या तोडता येतील...
मुलगा - तो प्लॅन ना??? झाला सक्सेसफुल...
आजोबा - अरे दुपारीच ठरवलात ना? लगेच सक्सेसफुल कसा झाला???
मुलगा - हो... तुम्ही पेढा खाल्लात ना???
आजोबा - म्हणजे?
मुलगा - अहो तुम्ही पेढा खाल्लात ना... तोच माझा प्लॅन होता...
आजोबा - म्हणजे???
मुलगा - त्यात विष घातलंय...
(आजोबा उठायचा प्रयत्न करता पण खाली कोसळतात. अजून जिवंत आहेत. )

बाप - तुम्ही आहात तोवर ह्या वाड्याची वीट पण विकू देणार नाही ह्याची आम्हाला खात्री होती... मी तुम्हाला बऱ्याच आधी सुचवलं होतं. पण तुम्ही मुस्कटात भडकवलीत तेव्हा माझ्या. अहो जागांचे भाव किती वाढलेत माहिती आहे का? ह्या सोन्याच्या तुकड्यावर बसून किती दिवस आम्ही भिकाऱ्या सारखं जगायचं?
मुलगा - म्हणून मग आम्ही ठरवलं, तुम्हाला पाडायचं आणि नंतर वाडा पाडायचा. आहे की नाही एकदम सॉलिड प्लॅन. (चंद्या तात्याला क्वार्टर देतो) आणि गंमत माहिती आहे का? पोस्ट मॉर्टेम मध्ये हे विष कळत नाही. तुम्ही ब्रेन हॅमरेज नि मरणारा आता...
(बाप बाटली उघडतो आणि एक मोठ्ठा घोट घेतो... )
बाप - आता आज पासून ठीक १ महिन्याने आपण लखपती होणार. ४५ लाख तुझे नि ४५ लाख माझे. जास्तीचा एक फ्लॅट येतोय तो विकून टाकू आणि मस्त वर्ल्ड टूर करून येऊ.
मुलगा - नाही हो बाबा...
बाप - अरे नाही का? जाऊ की. नव्या फ्लॅट चे पण २५-३० लाख येतीलच की.
मुलगा - त्या साठी नाही हो नाही म्हणालो, तुम्ही ४५ लाखाच हिशोब लावला त्या साठी नाही म्हणालो...
बाप - अरे तो आधी तिघांना मिळून ९० लाख देणार होता ना...
मुलगा - हो... आता आजोबा गेले...
बाप - तेच तर... आता उरलो आपण दोघे... म्हणजे प्रत्येकी ४५ लाख होतात ना...
मुलगा - तसे होतात हो... पुन्हा हिशोब करू. मिळणार होते ९० लाख, म्हणजे प्रत्येकी ३०. आजोबा गेले म्हणजे झाले प्रत्येकी ४५ लाख. आता तुम्ही पण जाणार...
बाप - काय?
मुलगा - हो... अहो त्या दारूत पण विष घातलंय...
बाप - काय???
मुलगा - पण हे विष वेगळं आहे बरं का... च्यायला एकाच दिवशी एकाच घरात दोघांचे मेंदू फुटले तर पोलिसांना संशय येईल. त्यामुळे थोडी व्हेरायटी... तुमचं हृदय बंद पडणार.
(तात्या मरायला टेकलाय... )
तात्या - मी तुझा बाप आहे...
मुलगा - हो...
कोसळण्याआधी तात्यांचे शेवटचे शब्द - तू मगाशी मी आल्या आल्या तुला पाणी दिलं आठवतंय का?
(चंद्या घसा पकडून खाली कोसळतो. )

Comments:

There are 6 comments for इथे जोशी रहातात (अंतिम भाग)