आपली बुडणारी संस्कॄती आणि आपण

| Labels: | Posted On 3/5/09 at 2:07 AM

काय चाललंय काय? आपली संस्कॄती बुडतेय राव. आणि कुणाचं लक्ष नाहिये. रादर (खरं म्हणजे) कुणाला पडलीच नाहिये. एकदा कट्ट्यावर आमचे मित्र श्री जिग्नेस भाय ह्यांना मी असं म्हटल्यावर ते म्हणाले 'सेन्सेक्स पडला ना आता अशीच वाट लागणार, ऑगस्ट नंतर होईल सगळं ठीक'. मी हताश झालो.

पूर्वीच्या काळी (मी म्हातारा असताना) असं नव्हतं. आज-काल सगळीकडेच बोंबाबोंब आहे. आदरणीय चो.चे. दांडगट बाबा काडीलावे ह्यांच एक वचन सहज आठवलं. त्यांनी एका प्रवचनात सांगितलं होतं 'आज-कालची तरूण पिढी भोगवाद आणि चंगळवादाकडे झुकते आहे. कशा कशाची म्हणून काही काही ठेवली नाही त्यांनी. एकदा आरती सुरू असताना मी चक्क एका मुलाला सिगारेट ओढताना पाहिलं. मला इतका धक्का बसला की माझ्या हातातला बियरचा ग्लास खाली पडला'.

आदरणीय चो.चे. दांडगट बाबा काडीलावे यांचे हे उच्च विचार मनात घर करून बसले. त्यामुळे एकदा घर रिकामे असल्याने आम्ही आमचा कंपू जमवून समोर सगळे साहित्य घेऊन बसलो आणि मनन करायला सुरुवात केली. आज-काल वरचेवर ध्यानधारणा करत असल्याने समाधी अवस्थेत जायला जरा वेळ लागतो. तर, समाधीच्या तरल अवस्थेत पोचल्यावर आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे नक्की काय होतंय ह्यावर विचार करायचं आमच्या अंतर्मनाने ठरवलं.

माणसाला दोन मनं असतात - अंतर्मन आणि बहिर्मन (आर. डी. बर्मन आणि एस्. डी. बर्मन ह्या लिस्ट मधे येत नाहित) त्यातलं अंतर्मन हे कायम आतल्या / अदॄष्य / समोर न दिसणार्‍या गोष्टींचा विचार करतं आणि बहिर्मन हे बाह्य / दॄष्य / समोर दिसणार्‍या गोष्टींचा विचार करतं. उदा. - डाण्याने रविवारी पुन्हा (सौम्य) टांग दिल्याबद्दल त्याला चांगलाच झापला पाहिजे असं बहिर्मन म्हणतं पण त्याच वेळी त्याच्याकडची शिवास रिगल अजून न संपल्याने त्याला शिव्या न घालणेच योग्य असे अंतर्मन सांगतं. त्याच वेळी बहिर्मन म्हणतं 'त्याने ती कधीच संपवली आहे, आत नुस्तीच हुल देतोय'. ह्यावर अंतर्मन म्हणतं 'चान्स घेऊन बघायला काय हरकत आहे?' तर असं सगळं आहे. जे मला समाधी अवस्थेत गेल्यावर सुचतं आणि तेंव्हाच कळतं.

तर, समाधीच्या तरल अवस्थेत पोचल्यावर आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे नक्की काय होतंय ह्यावर विचार करायचं आमच्या अंतर्मनाने ठरवलं. त्यातून काही महत्वाचे मुद्दे माझ्यासमोर आले. पण त्याचवेळी धमालरावांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा केल्यावर 'आज-काल ड्राय-डेज ची संख्या वाढवल्याने असं होत असावं' असं अनुमान त्यांनी बांधलं. समाधीच्या त्या तरल अवस्थेत आम्हाला ते पटूनही गेलं. ह्या सगळ्यातून आमच्या अंतर्मनानी काही मुद्दे मांडले जे आमच्या प्रॅक्टीकल बहिर्मनाने आणि पूर्ण होशोहवासात असलेल्या चकणाखाऊ मित्रांनी खोडून काढले ते असे- (अवांतरः बहिर्मनलाही तरल करणारे द्रव्य बनवायचे कुणाला अजून कसले सुचले नाही?)

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुलांना काही रीत-भात उरलीच नाही असं आमचे पिताश्री आम्हाला ऐकवत असतात. पण त्याच वेळी ते तरूण असताना आजोबाही त्यांना हेच ऐकवत असं सांगतात. त्यामुळे ह्या मुद्द्यात काही दम नाही राव. लार्ज भरावा लागेल.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुली कसले कसले कपडे घालतात. पूर्वी असं नव्हतं. पण पूवी ग्लोबल वॉर्मींगही नव्हतं. कसलं उकडतं राव आज-काल. तोकडे कपडे हे आता फॅशन स्टेटमेंट राहिलं नसून ती एक गरज झाली आहे. पुरूषांनाही असले तोकडे कपडे घालून फिरायला आवडेल पण मग त्यासाठी फिगर मेंटेन करावी लागेल, जितके मिली घाम बाहेर गेला तितके लिटर बियर आत ढकलणे बंद करावे लागेल, अरबट चरबट खाणे बंद करावे लागेल, सकाळी उशीरापर्यंत लोळणे बंद करून व्यायाम करावा लागेल. पण हे सगळे कष्ट घेण्यापेक्षा पायघोळ कपडे घालायचे आणि दुसर्‍यांना नावं ठेवायची हे जास्त सोप्प आहे. त्यामुळे ह्या मुद्द्यातही काही दम नाही राव. अजून एक लार्ज भरा.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुलांना स्तोत्र वगरे येतंच नाहीत. आता इथे मोठ्ठा लफडा आहे. कुणाच्या मानाने स्तोत्र येत नाहीत? मला एका लांबच्या आजीनी शाळेत असताना (मी शाळेत असताना) विचारलं होतं 'काय रे... काय काय येतं?' त्यावर मी छाती फुगवून म्हणालो 'रामरक्षा, अथर्वशीर्ष, मारूती स्तोत्र, गीतेचा पंधरावा अध्याय, तुकारामंचे काही अभंगही येतात...' ह्यावर तिने माझ्याकडे मी किस झाड की पत्ती असल्यासारखं बघून सांगितलं 'पुढल्या सुट्टीत चांगली महिनाभर येईन आणि तुला शीवमहिम्न शिकवून जाईन'. त्यावर मी म्हणलो 'अगं तुकारामांनी सांगितलंय की स्तोत्र म्हणता नाही आलं तरी तुम्ही मनापासून हाक मारल्यास ती देवापर्यंत पोचते' ह्यावर माझ्या पाठीवर पाच बोटं उमटवण्यात आली आणि कार्ट वाह्यात आहे ह्या तिच्या मताला अजून पुष्टी मिळाली.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आजकालच्या उच्चशिक्षीत मुलांना मातॄभाषेत बोलायची लाज वाटते. असं ज्याला वाटतं त्यानी एके दिवशी आमच्या कट्ट्यावर यावं. इतकी वर्षं आपण बोललो ती खरी मराठी की ही ऐकतोय ती खरी मराठी असा प्रश्न पडेल. सॉफ्टवेअर इंजीनीयर ते साधे मेकॅनीकल इंजीनीयर आणि त्या दरम्यानचे सगळे आमच्याकडे विपूल प्रमाणात आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून मराठी भाषेला दिलेले नवीन शब्द ऐकले तर भल्याभल्यांना झीट येईल. पण नकाच येऊ, इतकं शिकूनही सुसंस्कॄत नाही झालात अशी बोंबाबोंब सुरू होईल. आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यानंतर तुमचा जो उद्धार होईल त्यानी तुम्हाला भर म्हातारपणात वैराग्य आलं तर आम्ही जबाबदार नाही.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - आज-कालच्या मुलींच्या अपेक्षा फार वाढल्यात. असा मुद्दा गंट्याने मांडताच मक्या त्याच्यावर घसरला 'तू कोणती सिगारेट ओढतोस?' 'मोठी गोल्डफ्लेक' 'तुझे बाबा कोणती ओढायचे?' 'चारमिनार' 'मग तू गोल्डफ्लेक का ओढतोस, ती पण चारमिनार ओढणार्‍या बाबांच्या पैशाने?' 'चारमिनाल लय टुकार आहे यार' 'अरे मग माचीस घेण्याइतकं इन्कम नसताना तुला गोल्डफ्लेक ओढाविशी वाटते तर मग स्वतःच्या पायावर उभ्या असणार्‍या मुलीच्या अपेक्षा वाढल्या तर त्यात काय चूक आहे?'

हा आमचा प्रांत नसल्याने आणि आजचा स्पाँसरर मक्या असल्याने आम्ही लगेच मक्याला अणुमोदण देऊन अजून एक लार्ज भरला.

आपली संस्कॄती बुडतेय म्हणजे - नक्की सांगता येत नाही पण काही तरी होतंय यार.


गॅस झाला असेल. तू इनो घे, तोवर आम्ही अजून एक लार्ज भरतो.

Comments:

There are 19 comments for आपली बुडणारी संस्कॄती आणि आपण