बंड्याची शाळा - धडा तिसरा
| Labels: बंड्याची शाळा | Posted On 3/10/09 at 2:15 PM
बंड्याची शाळा
(धडा तिसरा - मधली सुट्टी)
(धडा तिसरा - मधली सुट्टी)
बाकी सगळ्या विषयांना ४५ मिनिटं आणि मधली सुट्टी फक्त ३० मिनिटं ह्या अन्यायाचं कारण मला अजून सापडलं नाहिये. मुलांना जे आवडतं ते करू द्यायचं नाही हा सर्व शाळांमध्ये अलिखित नियम असावा. पि. टी. चा तास आठवड्यातून फक्त २ दिवस आणि गणित, इतिहास मात्र रोज. कधी कधी तर दोन वेळा. ह्या बद्दल मी दहावीत असताना आमच्या एका सरांकडे खंत व्यक्त केली होती. तेव्हा 'मोठेपणी पि. टी. कामाला येणार नाही. हेच विषय कामाला येतील' असा सल्ला मला देण्यात आला. मास्तरांच्या इतर सल्ल्यांप्रमाणेच हा पण कुचकामी ठरला. रोज सकाळी लोकल पकडताना पि. टी. च्या तासाला मैदानाला मारलेल्या चकराच कामाला येतात. पाढे आणि तहाची कलमं स्टेशनवर उभा राहून मोट्ठ्याने म्हणायला लागलो तर फार फार तर सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटेल.
तर, शाळेच्या त्या आठ विषयांच्या रखरखीत वाळवंटात मधली सुट्टी म्हणजे आमचं हक्काचं ओऍसीस होतं. मधल्या सुट्टीच्या घंटेची आम्ही अगदी कानात प्राण आणून वाट पाहायचो. घंटा बडवणारा प्यून आज चुकून १० मिनिटं आधीच बेल वाजवेल अशी रोज आशा वाटायची. पण दहा वर्षात एकदाही असं झालं नाही. नियमाला अपवाद म्हणूनही नाही. मधली सुट्टी फार कमी वेळ असल्याने खेळण्याचा एक क्षणही वाया जाऊ नये म्हणून आम्ही आदल्या तासालाच डबा संपवायला सुरुवात करायचो. तास संपेपर्यंत आमचा डबाही संपलेला असायचा. मधल्या सुट्टीचा तो अर्धा तास हा हा म्हणता संपायचा. इतक्या पटापट बाकीचे तास कधीही संपले नाहीत.
मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर बरेच खेळ चालायचे. त्यातला सगळ्यात आवडता म्हणजे अर्थातच क्रिकेट. दिवसचे दिवस मॅचेस चालायच्या. कालच्या राहिलेल्या इनिंग्स आज कंटिन्यू व्हायच्या. त्यात कुणी तरी रन्स लिहिलेला कागद बदललेला असायचा, मग त्यावरून मारामारी झाली, १-२ जणांचे शर्ट फाटले की पुढे खेळायला सुरुवात व्हायची. त्यात पुन्हा गोंधळ. कालच्या आणि आजच्या मधल्या सुट्टीच्या दरम्यान काही जणांच्यात भांडणं झाल्यामुळे टीम्सची फेर-रचना व्हायची. इतकं होई पर्यंत पंधरा मिनिटं झालेली असायची.
दुसरा आवडता खेळ म्हणजे मारामारी. ह्यासाठी काहीही कारण लागत नसे. बाईंना नाव सांगितलं पासून ते मला खुन्नस का दिलीस इथपर्यंत काहीही चालत असे. सर्वसाधारणपणे मारामारी करणारेही काही ठरावीक विद्यार्थी असत. मी त्या फंदात कधीही पडलो नाही. कारण मारामारी म्हटलं की मार देण्यासोबतच मार खाणंही आलंच. पण मार खाण्याचा कोटा वर्गात मास्तर आणि घरी पिताश्री इमाने इतबारे पूर्ण करत असल्याने नव्याने मार खाणं नको व्हायचं. आम्ही आपले बाहेरून टाळ्या वाजवायला. दोन आडदांड मुलांना एकमेकांवर दात ओठा खाऊन तुटून पडताना बघण्यात जी मजा असते ती सांगून कळणार नाही. अशी मारामारी सुरू असताना, त्यातल्या एखाद्यावर असलेली खुन्नस काही जण काढून घेत. समोरा समोर मारामारी करायचा दम नसल्याने त्या गर्दीत ज्यानी आपल्याला आधी ठोकलं आहे अशाला गर्दीचा फायदा घेऊन लाथा बुक्के मारत. मग ह्यातून उप-मारामारी सुरू होत असे. वा वा वा. काय नजारा असे तो. १५-२० मुलं घोळक्यात आहेत, कोण कुणाला मारतंय ह्याचा पत्ता नाही, कोण कुणाच्या बाजूने आहे माहिती नाही, मार खाणाऱ्याला आपण मार का खातोय आणि मारणाऱ्याला आपण का मारतोय ह्याचाही बऱ्याचदा पत्ता नसे. पण मजा यायची.
शाळेच्या मैदानावर आम्हाला गोट्या खेळायला सक्त मनाई होती. तरीही आम्ही नियमाला न जुमानता एखादा कोपरा पकडून गोट्या खेळतच असू. त्यातले आवडते प्रकार म्हणजे दहा-वीस, राजा-राणी आणि ढुस्स. ह्यात पुन्हा चिटींग आणि मारामारीला ऊत यायचा. नेम धरताना बोट जमिनीला न टेकवणे, वीत घेताना अंतर ढापणे, गोटी शेजारी उभं राहून पायाने हळूच गोटी पुढे सरकवणे इत्यादी प्रकारांवरून यथेच्छ भांडणं व्हायची. चार आण्याला १० मिळणाऱ्या गोट्यांवरून इतकी मारामारी करायचो हे आठवून आज हसू येतं. पण त्यावेळी ती एक गोटी म्हणजे जगण्या-मरण्याचा प्रश्न असे.
पुढचा आवडता उद्योग म्हणजे बोरं आणि चिंचा पाडणे. शाळेच्या आवारात आंब्याचं झाड होतं. पण त्याला हात लावायची कुणाच्यातही धमक नव्हती. एकदा मी मला झाडावर चढता येतं हे दाखवण्यासाठी त्या झाडावर चढलो. त्यावेळी खरं तर आंब्याचा सीझनही नव्हता, पण पैज लावून चढलो. आणि नेमके त्याच वेळी आमचे पि. टी. चे सर मैदानात आले. माझी वर पार म्हणजे पारच तंतरली. साक्षात यम आणि त्याचा रेडा एका शरीरात एकजीव होऊन समोर आल्यावर अजून काय होणार? सरांनी मला प्रेमाने खाली उतरायला सांगितलं "जोशा, माकडा सारखा वर काय चढलायस, पाच मोजायच्या आत खाली उतर. " मी काही ऐकलं नाही. कसा ऐकेन? साक्षात सिंह आणि अजगर एका शरीरात एकजीव होऊन समोर आल्यावर अजून काय होणार? खाली वाघ डरकाळ्या फोडत फेऱ्या मारत असताना झाडावर बसलेल्या माकडाची जी अवस्था होत असेल तीच माझी झाली होती. मग सरांनी आमच्यातल्या एकाला झाडावर चढून त्याला खाली उतरवायला सांगितलं. पण मास्तरांच्या कंपूत कोण सामील होणार. सगळ्यांनी झाडावर चढता येत नाही असं सांगून सुटका करून घेतली. शेवटी वैतागून मला आठवडाभर मधल्या सुट्टीत झाडावर चढून बसायची शिक्षा फर्मावून सर निघून गेले.
ही भयावह घटना सगळ्यांच्या मनात घर करून असल्याने आंब्याचं झाड आम्हाला वर्ज्य होतं. शाळेजवळच २-३ चिंचेची आणि बोरांची झाडं होती. किमान १० दगडाला एक ह्या हिशोबाने बोरं पडत असत. चिंचा काढायला आम्ही एक बांबू मिळवला होता. बोरं जो पाडेल तो खायचा पण चिंचांचं मात्र सार्वजनिक वाटप व्हायचं. कारण तो बांबू धरायला किमान २ मुलं लागत, पडणाऱ्या चिंचा खाली पडू दिल्या तर पिचकत त्यामुळे त्या झेलण्यासाठी २-३ पोरं अशी टीम असे. लोकांनी पाडलेली चिंचा, बोरं पळवणारीही काही वाह्यात कार्टी होती आमच्यात. मग तावडीत सापडल्यावर त्यांना मारही सार्वजनिक मिळत असे.
कधी कधी मधल्या सुट्टीत मी झोपतही असे. पण एकदा माझी झोप मधल्या सुट्टीवरून पुढच्या गणिताच्या तासाल कंटीन्यू झाली होती. आधी मास्तरांनी मी उठेन म्हणून वाट बघितली. पण ते होणे नाही हे लक्षात आल्यावर मला धपाटा घालून उठवलं. सगळा वर्ग फिदीफिदी हसत होतां. प्रचंड अपमान. त्यावर कडी म्हणून सरांनी मला पुढचा अर्धा तास झोपायची शिक्षा फर्मावली. दर पाच मिनिटांनी विचारीत "झोपलास का रे? " भीती आणि अपमानाने वाट लागली असताना झोप कशी येणार "नाही सर" मग मी न ऐकल्याबद्दल अजून २-४ धपाटे मिळाले होते.
ह्या शिवाय इतर आवडते उद्योग म्हणजे बाकांवर उड्या मारणे, लोकांच्या दप्तरांमध्ये कागदाचे बोळे भरणे, कुणी बाथरुम मध्ये गेल्यास बाहेरून कडी घालणे. एकदा कडी घालताना पकडल्या गेल्यामुळे मला तब्बल दहा मिनिटं बाथरुम मध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. चालू तासाला हे झालं असतं तर दु:ख नव्हतं पण ती दहा मिनिटं मधल्या सुट्टीतली असल्याने जास्त वाईट वाटलं होतं.
शाळेतल्या ह्या सगळ्या उपद्व्यापांच्या खाणाखुणा आम्ही आजही अंगावर बाळगून आहोत. कधी कधी निवांत बसलो असताना एखादा अजून असलेला व्रण अथवा जखमेची खूण आठवते आणि मधल्या सुट्टीची आठवण मनात दाटते. अशी ही आमची आवडती मधली सुट्टी अजूनही आम्हाला प्रचंड जवळची वाटते. हिच्याशी बरोबरी करेल अशी एकही गोष्ट आमच्या शालेय जीवनात नव्हती. अजूनही नाही.
मधल्या सुट्टीच्या मजेची तुलनाच करायची झाली तर त्याला काही प्रमाणात पॅरेलल अशी एकच गोष्ट आहे - तुडुंब जेवल्यानंतरची रविवार दुपारची झोप.