बंड्याची शाळा - धडा पाचवा
| Labels: बंड्याची शाळा | Posted On 5/18/09 at 11:44 PM
बंड्याची शाळा
(धडा पाचवा - दहावी)
(धडा पाचवा - दहावी)
'ह्या वर्षी काय उंडारायचं ते उंडारून घ्या, पुढल्या वर्षी दहावी आहे' ह्या वाक्याने नववीत असताना दहावी जवळ आल्याची नांदी झाली.
नववी पर्यंत सहामाही आणि वार्षिक परीक्षेला अर्ध अर्ध पुस्तक असायचं. दहावीला वार्षिक परीक्षेला प्रत्येक विषयाचं अख्खं पुस्तक असतं हे कळल्यावर मनात धडकी भरली, पाचावर धारण बसली, पोटात गोळा आला, हात पाय गारठले. सगळ्या विषयांचा इतका अभ्यास करायचा ह्या विचारानेच आपण कधीच दहावीला जाऊ नये असं वाटायचं.
दहावीच्या वर्षाला सुरुवात नववीची परीक्षा झाल्यावर लगेच झाली. नववीचा रिझल्ट लवकर लावून त्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच शाळेत दहावीचे स्पेशल क्लासेस सुरू झाले. त्या २ महिन्यात सगळा पोर्शन संपवणार हे कळल्यावर 'आता वर्षभर उसाटायला मोकळे, उगाच लोक दहावीचा बाऊ करतात', असं वाटलं होतं. पण ही माहिती अर्धवट होती. त्या २ महिन्यात सगळ्या विषयांचा ओव्हरव्ह्यू देऊन मग वर्षभर सगळे विषय चवीचवीने शिकवण्यात येणार असं कळलं. उन्हाळ्याची सुट्टी हिरावून घेण्याचं पातक करणार्या त्या दहावी विषयी वर्षाच्या सुरुवातीलाच मनात अढी बसली.
उन्हाळी वर्गांच्या पहिल्याच दिवशी सरांनी 'बघा, हा एप्रिल महिना संपत आलाय. पुढल्या मार्च मधे म्हणजे ११ महिन्यात तुमची दहावीची परीक्षा. दिवसातले ८ तास झोप धरली तर उरतात ७ महिने. त्यात शाळा आणि ट्यूशनचे रोजचे ८ तास धरले तर उरतात ३ महिने. १ महिना सुट्टी, पाहुणे, सणवार, घरची मंगल कार्य वगैरे साठी धरला तर तुमची २ महिन्यात दहावीची परीक्षा आहे' असं भन्नाट गणित मांडून सगळ्यांना घाबरवलं होतं. त्या दिवशी सगळे विमनस्क अवस्थेत वर्गातून बाहेर पडले होते. भल्या भल्यांची जिरली होती. मी मी म्हणणारे गळपटले होते. सार्वजनिक डिप्रेशन आलं होतं. आपल्याकडे इतका कमी वेळ आहे??? काहीही काय???
ह्या सगळ्यामुळे शाळेतली हुशार मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीपासूनच अभ्यासाला लागली. आमच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला दिवसाचं वेळापत्रक बनवून आणायला सांगितलं. मी बनवलं. ते टाईमटेबल पाहून सरांनी आधी स्वतः:च्या कपाळावर आणि नंतर माझ्या पाठीवर हात मारला.
सकाळी १०-११ - तयारी, न्याहारी.
सकाळी ११-१२ - जेवण, शतपावली.
दुपारी १२-५ - शाळा
संध्याकाळी ५-७ - न्याहारी, खेळ
संध्याकाळी - ७-९ जेवण, टीव्ही, शतपावली
रात्री ९-१० गृहपाठ, अभ्यास.
रात्री १० च्या पुढे झोप
अरे रोज १ तास अभ्यास करून तू परीक्षेत काय उजेड पाडणार???
पण रोज शाळेत येणार आहे की ५ तास
अरे शाळेत अभ्यास होतो का?
सर मग मी घरीच बसत जाऊ का?
पुन्हा एकदा माझ्या पाठीवर आणि गालावर हात मारून सरांनी मला नवीन टाइम टेबल बनवून दिलं. त्या वेळापत्रकानुसार माझा दिवस पहाटे ५ ला सुरू होऊन रात्री १२ ला संपणार होता. आणि इतके तास जागूनही दोन्ही वेळची न्याहारी, जेवण, खेळ ह्या साठी दिवसभरात फक्त एक तास दिला होता. हे भयानक वेळापत्रक मी आईच्या हाती लागू देणं शक्यच नव्हतं त्याची रवानगी तत्काळ आमच्या बिल्डिंगच्या इलेक्ट्रिक बॉक्स मधे करण्यात आली. तिथे माझं प्रगती पुस्तक, तपासून दिलेले पेपर, सरांनी बाबांसाठी दिलेल्या चिठ्ठ्या अशा हरवलेल्या सगळ्या गोष्टी सापडायच्या.
दहावीचा दुसरा त्रास म्हणजे, अमेरिकेहून आलेली लोकं जशी प्रत्येक वाक्याची सुरुवात अथवा शेवट 'अमेरिकेत ना...' ने करतात तसं आमच्या बाबतीत उच्चारल्या जाणार्या प्रत्येक वाक्याची सुरुवात अथवा शेवट 'यंदा दहावी ना?' ने व्हायचा. कुठेही जायची सोय नाही. प्रत्येक जण सल्ले द्यायला टपून बसलेला. चुकून गेलो तर 'अरे... दहावी आहे ना तुझी' असं ऐकावं लागायचं. मला काही फरक पडत नसे, पण शेवटी लोकलाजेस्तव आई-बाबांनीच मला बाहेर न्यायचं बंद केलं. बरं नाही गेलो तर 'आलाय मोठा दहावी वाला, आम्ही काय कधी शाळेत गेलो नाही की काय' असं ऐकावं लागे. जीव अगदी मेटाकुटीला आला होता. त्यात सहामाही नंतर तर मला घरूनच कर्फ्यू लागला होता.
घरी पाहुणे आले की माझी रवानगी आतल्या खोलीत होत असे. मला त्रास होऊ नये म्हणून सगळे हळू आवाजात बोलत. पाहुणेही एकदाच आतल्या खोलीत पेशंटला भेटायला आल्यासारखे तोंड दाखवून जात. मग बाहेर इतरांसोबत हास्य विनोद सुरू. आणि मी वाळीत टाकल्यासारखा एकटा आत. टीव्ही बंद कारण माझी दहावी आहे, खेळायला जायचं नाही कारण माझी दहावी आहे, उशीरापर्यंत लोळायचं नाही कारण माझी दहावी आहे, सुट्टीत कुठे बाहेर जायचं नाही कारण माझी दहावी आहे. एकदा तर दादाने मला चॉकलेट दिलं नाही कारण म्हणे माझी दहावी आहे. अरे काय????????? अशा वेळी ओरडून म्हणावंस वाटे 'अरे हो... आहे माझी दहावी, काही पाप केलंय का मग मी? असे नका वागू माझ्याशी... मला आपलं म्हणा...' झक मारली नी दहावीत गेलो असं वाटायचं त्या वेळी.
पण सांगणार कोणाला? बाबांना सांगितलं तर 'नऊ वर्ष उनाडक्याच केल्यात, ह्या वर्षी तरी अभ्यास करा...' असं ऐकायला मिळालं. घरी आलेले एक काका मला एकदा म्हणाले होते 'अरे आमच्या वेळी आम्हाला काही न करता सहज फर्स्ट क्लास मिळत असे...' मला त्यांच्या शाळेत का नाही घातलं म्हणून बाबांवर प्रचंड रागावलो होतो त्या दिवशी.
आमच्या शाळेने त्या वर्षी दर महिन्याला परीक्षा घ्यायचं ठरवलं. पूर्वी वर्षातून चारच वेळा खायला लागणारा रिझल्ट नंतरचा मार आता दर महिन्याला मिळणार म्हणून प्रचंड चिडचिड झाली. असो.
दहावी खरं तर इतका भयानक प्रकार नाहीये. पण त्याचा विद्यार्थ्यांपेक्षा इतर लोकंच इतका बाऊ करतात की मुलं बिचारी घाबरतात. मला घाबरवण्याचा प्रयत्न करताना एका सरांनी 'ह्या वर्षी अभ्यास नाही केलास नी कमी मार्क्स मिळाले
तर कुठे तरी गॅरेज काढावं लागेल' असं सांगितलं होतं. मुळात मला गाड्या आणि बाईक्सची प्रचंड क्रेझ असल्याने ती धमकी न वाटता आमंत्रणच वाटलं होतं. मी लगेच रात्री बाबा आल्यावर त्यांना विचारलं 'मी ह्या वर्षी कमी मार्क्स मिळवले तर मला गॅरेज काढून द्याल का?' बाबांनी उत्तर काय दिलं हे सांगायला नकोच.
असे दिवस सुखात जात असताना एकदाचं दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक आलं. पुन्हा त्यावरून काही मंडळी नाराज झाली. पण आता जे आहे ते आहे तसं स्वीकारण्या शिवाय पर्याय नसल्याने गपगुमान अभ्यासाला लागली. आम्ही आपले निवांतच होतो. पण जशी जशी परीक्षा जवळ येत होती तस तसं आई-बाबांचं टेन्शन अजूनच वाढत होतं. बुद्धी तल्लख व्हावी म्हणून रात्रभर भिजवलेले बदाम, च्यवनप्राश, वगैरेंचा मारा सुरू झाला. हे सगळं मी हसत मुखाने फस्त करत होतो. माझी अभ्यासातली गती आणि उत्साह बघून आई एखाद्या देवाला नवस करावा की काय ह्या विचारात पडली. जुन्या आणि नव्या २१ अपेक्षितचे ढीग घरी येऊन पडले.
एकदाचा परीक्षेचा दिवस उजाडला. पहिला पेपर शिरस्त्याप्रमाणे मराठीचा होता. घरून निघताना सगळं घेतलंय का अशी शंभरवेळा चौकशी झाली. हॉल तिकीट नावाचा एक प्रकार जो माझ्यासारखी बहुतेक मुलं परीक्षा येईपर्यंत एकतर हरवतात अथवा परीक्षेला न्यायचा विसरतात तो बाबांनी ताब्यात घेतल्यामुळे चिंता नव्हती. मी निघताना आई-बाबांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून दहावी ही वाटतं तितकं सोप्प प्रकरण नाहीये अशी शंका मनाला चाटून गेली.
परीक्षाकेंद्राला तर पार अवकळा आली होती. सगळीकडे टेन्शन मधे असलेले पालक. शेवटचं वाचून घेणारे विद्यार्थी आणि काही ठिकाणी त्यांच्या डो़क्यावर छत्री धरून, पाणी घेऊन उभे असलेले पालक हे सगळं बघून अंमळ मजा वाटली. पहिला पेपर झाल्यावर बाकीचे पेपर्स धडाधड संपले.
तर अशा प्रकारे आमचा आणि आमच्या बिचार्या पालकांचा जीव नकोसा करणारी दहावी एकदाची संपली आणि आमचं घोडं एकदाचं गंगेत न्हायलं.
----------------------------------------------समाप्त---------------------------------------------
आता मी ब्लॉग वाचायच्या आधीच कमेंट टाकु शकतो.
मस्त झकास. लिखाण भारीच असतं तुझं.
Maza Dahavicha pahila paper aathavala.
tyat bomb manaje koni tari exam center var aafava pasaravali ki paper futla mhanun, aani aaj paper canel zala.
Shappat te aathavala tari shahare yetat.
आयला तू दहावी पास आहेस होय? मला वाटल की...
खीखीखीखीखीखीखी
खीखीखीखीखीखीखी
are tu tar p l deshpanden cha varsadar vatato. chan vinodi lihto. keep it up.
"मी निघताना आई-बाबांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून दहावी ही वाटतं तितकं सोप्प प्रकरण नाहीये अशी शंका मनाला चाटून गेली."
.....
Baap re.. kuthun suchat re tula he sagale?
"faar bhari lihitos" ya vaqyachi kiti savay zali asel na tula?? pan seriously..ata ekhade pustak bistak kadh...
बाप रे......., एक मिनिट तर माझीच दहावी ची परीक्षा आहे असं वाटून गेलं. लेख मस्तच जमलाय.
Adya, leka kharach 99.99% goshti jultat re... baba sarya aathvannina ujala dilas... :)
आता माझ्याकडचे शब्द संपले. किती वेळा स्तुती करायची एकाच माणसाची? तेव्हा आतापासून प्रत्येक लेखावर एकच प्रतिक्रिया... भन्नाट, अप्रतिम, सुसाट (टीप: ही प्रतिक्रिया आता कॉपी-पेस्ट होणार आहे... ;-) )
"मी निघताना आई-बाबांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून दहावी ही वाटतं तितकं सोप्प प्रकरण नाहीये अशी शंका मनाला चाटून गेली."
Zakkas
बाप रे! दहावीची परीक्षा! इतकं ओघवत कसं लिहिता हो तुम्ही!
मी तुमचं सर्व लिखाण वाचलं.....मित्रालाही वाचायला सांगीतलं.....सर्वच्या सर्व लेख मला फार आवडले.
वाचुन छान वाटलं
(माझ्या life मध्ये माझं पहीलं-वहीलं कमेँट मी तुम्हालाच दिलय)
॥ keep it up ॥
पुन्हा एकदा वाचून खो खो हसलो. टाईम टेबल वाचून तर खूप मोठ्याने हसलो. मराठीतल्या टॉप ब्लॉग्स मध्ये एक. तुझी स्टाईक युनिक व मस्त आहे. लगे रहो ऍडिशेट.