क्रॉसवर्ड (अंतिम)
| Labels: क्रॉसवर्ड | Posted On 9/15/09 at 11:25 AM
रवी कसाबसा त्याच्या रूमवर पोचला. घामाने अक्षरशः निथळत होता. आता उद्या दुपारपर्यंत न थांबता त्याने तडक शिरवाळकरांची भेट घ्यायचे ठरवले आणि लगेच निघून तो शिरवाळकरांच्या बंगल्यावर पोचला. त्याला आलेला बघून दोघांनाही आनंद झाला, पण त्याची अवस्था बघून त्यांना कळलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर शशी शिरवाळकरांची स्टडी होती, त्यांनी तिथेच बसून बोलायचे ठरवले. कुणीही आलं तरी वर न सोडण्याचे आणि कुणाचाही फोन न देण्याचे आदेश नोकरांना देण्यात आले. स्टडीमधे गेल्यावर रवीने त्यांना थोडक्यात गजानन शिरवाळकरांची हकीकत सांगितली, क्रॉसवर्ड दाखवले आणि मानेच्या मृत्यूपर्यंत सगळी कहाणी सविस्तर सांगितली. एक क्षण विचार करून शशी शिरवाळकरांनी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवायचे ठरवले. त्यांच्या पोलिसांत आणि राजकारण्यांत अर्थातच बर्याच ओळखी होत्या. पण रवीने त्यांना थांबवले 'आज शेवटचा दिवस आहे आणि मला नाही वाटत तो इथे यायचं धाडस करेल'. रवीचं वाक्य संपतंय न संपतंय तोच धाड् धाड् धाड् गोळ्या झाडण्याचा आवाज आला.
***
शशी शिरवाळकर - बिचारा रवी. दैवाने कुठल्या वळणावर आणून ठेवलंय त्याला. बाबांच्या चुकीमुळे गजानन काकाच्या कुटुंबाची वाताहात झाली. आता तीच चूक तिसर्या पिढीलाही भोवते आहे. पण ह्या निमित्ताने का होईना, त्याने माझ्याशी संपर्क साधला. गजानन काकाचा खून झाला नाही हे ऐकून मनावरून मणभराचे ओझे उतरल्यासारखे झाले. एकदा का तो घरी आला की त्याच्या जिवाला धोका नाही. मी आहे समर्थ सगळं बघून घ्यायला. पण इतक्यात यायचं नाही असं का म्हणाला हे मात्र कळलं नाही. घाईघाईत त्याचा नंबरही घेतला नाही. आता कधी भेट होईल देवच जाणे.
विजय शिरवाळकर - गजानन आजोबांचा नातू जिवंत आहे हे कळल्यावर बाबांना किती आनंद झाला. होणारच. मलाही झाला. आमच्या कपाळावरचा कलंक पुसला गेला. आता मी आणि रवी मिळून शिरवाळकर घराण्याची कीर्ती अजूनच वाढवू. आता वाट बघतोय रवीच्या येण्याची. आजोबांच्या पापाचं प्रायश्चित्त घेण्याची ही चांगली संधी आहे.
किलर - अरे असा कसा निसटला. साल्यांनो भांग पिऊन गेला होतात का पाठलागावर? एका माणसावर लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला? आणि दुसरा कोण होता त्याच्या सोबत? आत्ताच्या आत्ता निघा आणि पत्ता लावल्या शिवाय परत येऊ नका. सालं, नरसोबाला अभिषेकाची संधी अशी चालून येईल वाटलं नव्हतं. काही दिवसापूर्वी त्या रवीला स्वप्नातही वाटलं नसेल की कुणीतरी लवकरच त्याच्या जिवावर उठेल. मला तरी कुठे कल्पना होती की तो जिवंत आहे. एके दिवशी फोन आला आणि त्याची सुपारी देण्यात आली. की मला माझं ऋण चुकवायची संधी मिळणार आणि वर त्याचे पैसेही मिळणार. व्वा... देव भलं करो त्याचं.
***
रविवारी सगळ्या वर्तमानपत्रांत एकच बातमी होती:
"प्रसिद्ध व्यावसायिक, कारखानदार शशी शिरवाळकर आणि त्यांच्या मुलाची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या. शशी शिरवाळकरांचा पुतण्या जबर जखमी. खुन्याचा मृतदेहही तिथेच सापडला".
""काल रात्री शिरवाळचे प्रसिद्ध कारखानदार आणि समाजसेवक श्री. शशी शिरवाळकर आणि त्यांचे सुपुत्र श्री. विजय शिरवाळकर ह्यांची त्यांच्या बंगल्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी तिथे हजर असलेला त्यांचा पुतण्या रवी शिरवाळकर जबर जखमी झाला. शिरवाळकरांवर गोळ्या झाडणारा इसमही तिथेच मृतावस्थेत पोलिसांना आढळला. पूर्व-वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्री साधारण १२:३०-१ च्या सुमारास शिरवाळकरांच्या रूम मधून गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यावर सगळे नोकर तिकडे धावले. दार आतून बंद असल्याने काही करता आले नाही. एका नोकराने लगोलग पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस आल्यावर त्यांनी दार तोडून आत प्रवेश मिळवला, तेव्हा त्यांना हे धक्कादायक दृश्य दिसले. रवी शिरवाळकर ह्यांना तातडीने इस्पितळात हलवल्याने त्यांचा जीव वाचला असे सूत्रांचे म्हणणे आहे. रवी शिरवाळकरांच्या शरीरातून एकूण २ गोळ्या काढण्यात आल्या. मा. आमदार श्री. सदानंद मोहिते ह्यांनी प्रकरणाची कसून चौकशी करायचे आदेश पोलिस दलास दिले आहेत.""
***
इन्स्पेक्टर अमर - फोन आला तेव्हा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. शिरवाळकरांसारख्या देव माणसाची कुणी हत्या करेल स्वप्नातही आले नव्हते. आयुष्यभर लोकांसाठी काम करणार्या माणसाचा कोणी शत्रू कसा असू शकतो? रवीच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवरून ह्या प्रकरणाचा उलगडा झाला. तीन पिढ्यांनंतरही हे वैर चालू ठेवण्याची काय गरज होती. घेतलेले पैसे सव्याज परत देऊन प्रकरण मिटवता नसतं का आलं? म्हणे देवाचा कोप झाला. अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवल्याने एका देव माणसाला मात्र हकनाक जिवाला मुकावं लागलं. ह्या सगळ्या प्रकरणात त्या मानेला मात्र विनाकारण जीव गमवायला लागला. तसंही अशा माणसांचा शेवट असाच होणार म्हणा. आयुष्यभर अंडरवर्ल्डसाठी काम केलं ह्या माणसाने. आत्ताच काय गरज होती रवीच्या मदतीला धावायची? त्याचा ड्रायव्हर पण हेच म्हणाला. फुकट जीव गमावला त्याने. किती जणांचे पैसे घेऊन बसला होता देव जाणे. त्या बिचार्या रवीला पण कसलं अडकवलं होतं त्या रामोश्याने. चिठ्ठी, क्रॉसवर्ड, पाळतीवर माणसं... दुसरा कुणी असता तर भीतीने हार्ट अटॅकच आला असता. नशिबानेच वाचला तो. शुद्धीवर आल्यावर त्याला विचारलं पाहिजे तिथे नक्की काय झालं? बिचारा, इतक्या वर्षानंतर काकांना भेटला आणि हे असं घडलं. जाऊन सांत्वन करायला हवं.
***
दुसर्या दिवशी रवी शुद्धीवर आला. नशिबाने गोळ्या जिव्हारी लागल्या नव्हत्या. एक हाताला आणि एक पायाला. रक्तस्त्राव खूप झाला. थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर रवी खडखडीत बरा झाला. शिरवाळकर घराण्याचा एकमेव वारस म्हणून लोकांच्या त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण रवीला हा सगळा ताण असह्य झाला होता. बरा झाल्यावर त्याने शिरवाळकरांची शेती, फॅक्टरी इत्यादी सगळी इस्टेट विकून टाकली. राहता बंगला मात्र पूर्वजांची आठवण म्हणून ठेवला. आणि काकाने गजानन आजोबांच्या नावाने सुरू केलेला दवाखान्यासोबतच, गावात एक नवीन शाळाही काढली काकाच्या स्मॄती प्रित्यर्थ.
***
रवी शिरवाळकर - सुटलो एकदाचा. मला वाटलं ह्यातून सही सलामत निघतोय की नाही. च्यायला ह्या मानेच्या. साला फारच सीरियसली मदत करायला गेला. म्हणे ह्या सगळ्याच्या मागे वेगळंच कुणीतरी आहे. कुणी सांगितलं होतं नको तिथे नाक खुपसायला. मला त्याला फक्त साक्षीदार म्हणून वापरायचा होता. बेट्याची चांगलीच ओळख होती पोलिसांत. रहस्याच्या नको इतका जवळ पोचला आणि संपला. नशीब त्यावेळी त्याचा ड्रायव्हर कम बॉडीगार्ड राजा सोबत नव्हता.
सालं, भिकार्यासारखं जगून जगून कंटाळा आला होता. ठरवलं जे माझं आहे ते मिळवायचंच. बाबांनी गजानन आजोबा आणि श्रीधर आजोबांची गोष्ट सांगितली होतीच. त्याची उत्तरकथा लिहिली आणि वापरली. काँट्रॅक्ट किलर पकडला एक, नी रचला सगळा बनाव. सालं, स्वतःच्याच घरी चोरी करवण्यापासून ते स्वतःला गोळ्या मारून घेण्यापर्यंत सगळं कसं प्लॅन प्रमाणे सुरळीत पार पडलं. जागोजागी मला फसवल्याचे पुरावे पण सोडले. काकाचंच अकाउंट हॅक करून पैसे काढले ह्या प्लॅनसाठी. शेवटच्या दिवशी बोलावलं त्या किलरला काकाच्या घरी. त्याला वाटलं पैसे देतोय. आधी त्याच्या गनने काकाला नि मुलाला उडवला आणि मग माझ्या गनने त्या किलरला.
पूर्ण भरलेले क्रॉसवर्ड रवीने डस्टबीन मधे भिरकावले. चौथा शब्द होता "परतफेड"...
समाप्त
मस्त कलाटणी देऊन शेवट केलाय. सगळे भागच जबरी..
कथा आवडली मस्त आहे
Afalatun katha aahe......
Shevatparyanta kalat nahi kay honar te...
apratim .......
hindi movie la shobhanyasarkhi story ahe ...
शेवट आवडला...
Nehemipramanech chhan! :)
Diwali ank athava itar masikan-madhe katha publish kar. All The Best!!!
Too Good.
नाद खुल्रा भावा. असेच लिहित जा .
कोणालाही वाटणार नाही अशा ठिकाणी येऊन गोष्टीचा शेवट झाला आहे........................!
एकदम भन्नाट आहे शेवट......
लय भारी आहे बुवा शेवट.......!!!
आपल्याला आवडला बुवा............................!
Tu tar yaar marathi madhla abbas mastan nighala yaar....tuzhya badal kai bolu yaar.....everything is perfect yaar wht a story man..hats offfff
Kon re Shirvalkar he? :P