पाचवी खोली
| Labels: लेख | Posted On 3/29/11 at 9:54 AM
गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही. कुणी लेख लिहावा इतकी ही उदात्त वस्तू अथवा वास्तू नाहीच. पण चाळकर्यांच्या जीवनात हिचं महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही.
जे चाळीत राहिले नाहीत त्यांच्यासाठी सांगायचं तर ही पाचवी खोली साधारण सिनेमात दिसणार्या पोलिसांच्या टॉर्चर रूम सारखी दिसते. फक्त इथे सत्य शोधक पट्टा नसतो. साधारण ६x६ ची खोली. जास्त जोरात लावली तर तुटेल अशी भीती वाटणारी कडी. कडी लाऊनही उघडाच राहिलाय असं वाटणारा दरवाजा. स्वातंत्र्यपूर्वकाळात कोबा केलेली जमीन. एक शोभेचा नळ. काचा फुटलेली आणि कुणीतरी पुठ्ठा चिकटवलेली खिडकी. संशोधनाचा विषय ठरावा असा रंग. भरीसभर म्हणून त्या खिळखिळ्या दरवाजातून किलकिलत आत येणारा प्रकाशाचा झोत पाचव्या खोलीत एक गूढ-भयाण वातावरण निर्माण करत असे.
दरवाजाच्या त्या फटीखेरीज हवा येण्याजाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने खोलीतल्या ह्या भयाण वातावरणाला कुंद कारूण्याची झालरही लागत असे. कुणी जास्तवेळ आत राहिल्यास लोकं बाहेरून 'मेलास का रे?' असं ओरडत. ह्या ओरडण्याचे कारण चेष्टा नसून आतल्या माणसाविषयी कळकळ असे. कारण माणूस फार वेळ आत राहिला तर गुदमरून मरण्याचीच शक्यता जास्त. कदचित त्यामुळेच लोकं बाहेरही पटापट येत. आणि ती तशी यावीत ह्यासाठीच कुणी तिथे एग्झॉस्ट फॅन वगरे बसवले नसावेत. कोण जाणे, एखादा आत रमला तर इतरांची पंचाईत व्हायची. फ्लश, एग्झॉस्ट फॅन सारख्या चैनी त्या काळी नव्हत्या. आणि असत्या तरी त्या नळासारख्या शोभेपुरत्याच राहिल्या असत्या.
मुंबईचं प्रतिबिंब मुंबईकराच्या आयुष्यात दिसतं असं म्हणतात. आणि ते बघायला पाचव्या खोली सारखी दुसरी उत्तम जागा नाही. गर्दी, भयानक उकाडा, खूप घाम, कोंदट हवा, मान टाकलेला नळ ही मुंबईची सगळी लक्षणं ह्या ६x६ च्या खोलीत दिसून येतात.
पाचव्या खोलीतली भित्तीचित्रे आणि लिखाण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आफ्रिकेतल्या गुहेत सापडणार्या चित्रांशी साधर्म्य असलेल्या ह्या चित्रांचे चित्रकार आफ्रिकन चित्रकारांप्रमाणेच अनाम आहेत. माणसाच्या शरीराचं इतकं तपशीलवार चित्रण खजुराहोच्या शिल्पांनंतर इथेच दिसतं. कोणाचे कुणाशी जुळले आहे, कोण कशी चालू आहे, कोण एकाचवेळी अनेकांसोबत फिरत आहे अशा जिव्हाळ्याच्या विषयांवर इथे साधकबाधक चर्चा होऊन त्याची तपशीलवार नोंद ह्या भिंतीवर करून ठेवलेली आढळते. तसंच चाळीत घडणार्या भांडणांपासून ते मॅचच्या टाईमटेबलपर्यंत सगळ्या लेटेस्ट घडामोडीही ह्या भिंतीवर कोरून ठेवलेल्या आढळत. काही इतिहास संशोधकांच्या मते सद्ध्या प्रचलीत असलेल्या फेसबूक मधील वॉलची जननी हीच पाचव्या खोलीतली वॉल आहे. एका भिंतीवर तर "माझी होशील का" असा प्रश्न आणि त्याखाली "नाही" असं उत्तरही वाचायला मिळालं होतं.
ह्या पाचव्या खोलीने आम्हाला काय काय शिकवलं हे लिहायला लागलो तर यादी फार मोठी होईल. हठयोग्यांसारखं एका पायावर उभं राहून रांगेत तप करायला शिकवलं. सकाळी सकाळी प्रत्येक मजल्यावर असे अनेक ध्यानमहर्षी दिसत. शेअरींग आणि वेटींगचे प्रात्यक्षिक इथे दिसे. एक माणूस माणूस आत गेला की तो जाताना पेपर दुसर्या माणसाकडे पास करत असे आणि तो पुढच्याकडे. रांगेचा फायदा सर्वांना ही ओवी इथे प्रत्यक्षात अनुभवली जात असे. इतकी शिस्तबद्ध रांग मुंबईत दुसरीकडे कुठेही दिसणार नाही.
अनेक जण तर सकाळी सकाळी बायकोची कटकट नको म्हणून शांत चित्ताने विडी शिलगावून रांगेत उभे राहत आणि नंबर आला की लोकांना पास देऊन पुढे पाठवत. माणसं उठली की आधी देवापुढे हात जोडायचे सोडून तोंडात ब्रश खुपसून रांगेत उभे राहत. घरात २ पेक्षा अधीक मुलं असली तर एक दुधाच्या रांगेत आणि एक इथल्या रांगेत असं चित्र दिसे.
इथे आम्ही पाण्याची बचत करायला शिकलो. पाचव्या खोलीत नळ असे, पण वयस्क माणसांना उठताना आधार म्हणूनच त्याचा वापर होई. त्यातून पाणी येताना कुणीही कधीही पाहिले नव्हते. 'हा नळ मालकाने टाकीला जोडलेलाच नाही, नुस्ताच पाईप टाकलाय' असंही एकदा एकाने मला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत सगळी भिस्त घरून आणलेल्या बादलीवर असे. घरून निघून मधल्या वाटेत पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता, बादली अजिबात डचमळू न देता मुक्कामी पोचणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.
पाचव्या खोलीने आम्हाला विजेची बचत करायला शिकवली. प्रत्येकाच्या घरात इथल्या दिव्याचा वेगळा स्विच असे. घरून निघताना तो सुरू करून निघावा लागे. कार्यभाग आटपून माणूस बाहेर पडला की दरवाज्याची बाहेरची कडी लावल्याचा आणि घरून दिव्याचा स्विच ऑफ केल्याचा आवाज एकदमच येत असे. लोकांचे कुले धुवायला आपली वीज का जाळा? असे साधे सोपे तत्व त्या मागे असे. आजकालच्या मुलांना एखाद्या खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करावे हे शिकवावं लागतं. इथे तो आमच्या चाळीच्या संस्कारांचाच भाग होता. कारण 'जरा जाऊन येतो, जोशांचा दिवा सुरू आहे' असे संवादही केवळ आणि केवळ चाळीतच ऐकू येत.
अनेक लोकांच्या प्राणायामाच्या सवयीची सुरुवात इथूनच झाली. जीव मुठीत धरून 'बसणे' म्हणजे काय ह्याचा शब्दशः अनुभव इथे येत असे. आत जाताना छातीभरून श्वास घ्यायचा आणि तो सोडायला लागायच्या आधी बाहेर यायचं असे अचाट प्रकार इथे बघायला मिळत. मुंबईच्या घाईगडबडीच्या आणि गर्दीने व्यापून राहिलेल्या आयुष्यात काही एकटेपणाचे निवांत क्षण अनुभवण्याची जागाही ही पाचवी खोली असे. चाळकर्यांचं बाकी सगळं आयुष्यच सार्वजनीक असल्याने इथेच काय तो एकांत मिळत असे. नको नकोसा वाटला तरी.
अशा ह्या आखुडशिंगी, बहुगुणी पाचव्या खोलीपासून एकेकाळी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. आणि शेवटही.
चाळीवर आणि चाळकर्यांवर अनेकांनी अनेक लेख लिहिले पण ही पाचवी खोली मात्र उपेक्षितच राहिली आणि म्हणूनच आमचा हा लेखन प्रपंच.
-------X-------
आजच्या दिवसाच्या शेवट ही पोस्ट वाचून करतेय....एकदम लोटपोट
तुझी पाचव्या खोलीवर पीएचडी झालीय ...
LOLZ.......
वाह आदी... अप्रतिम :)
पाचव्या खोलीचे समर्पक वर्णन केलंस यार. एके काळी सगळ अनुभवले ते क्षण डोळ्यापुढे आले.
खुप आवडलं..
:) छानच!
भन्नाट !! मस्तच !!
मित्रा सही लिहिलयं रे !! \
हसून हसून लोळालोळी :):):)
जबरा...
आडस्... तुम्ही आज पाचव्या खोलीबद्दल चार शब्द लिहून माणसामध्ये अजूनही कृतज्ञता शिल्लक असल्याचे दाखवून दिले आहे.
मस्तच !
मी मुंबईच्या blog मध्ये वाढले आहे. पण एक प्रसंग share करते.
एकदा मी माझ्या गिरगावातल्या शांतारामाची चाळीतल्या एका मामा कडे रहावयास गेले होते. सकाळी तुमच्या पाचव्या खोलीत जाण्याचा प्रसंग आला. मामीने माला 'डालडा चा तो पिवळा डब्बा' भरून दिला. त्या प्रसंगा नंतर मी आज परीयांत मामाकडे रहायला म्हणून गेलेले नाही. :-)
पाचवी खोली अप्रतीम... :)
superb livlay mitra!!!
शॉल्लेट रे मित्रा...!!
प्रशांत दामलेच्या ’सुख म्हणजे नक्की काय असतं?" या गाण्यावर आम्ही नेहमी एक कमेंट करायचो....
येड्या दामलेला मुळी सुख म्हणजे काय असतं ते अनुभवायची संधीच मिळाली नाही. सुख कशाला म्हणायचं? समजा तुम्ही उल्हासनगरच्या किंवा धारावीच्या एखाद्या चाळीत राहात आहात. ४० खोल्यात ३-४ संडास (पाचवी खोली) आहेत. एका शुभ सकाळी तुम्ही निसर्गाचे आवाहन (नेचर्स कॉल) स्विकारून पाचव्या खोलीकडे धाव घेता, तुमच्या लक्षात येते की तिथे अजिबात रांग लागलेली नाहीये. त्याला सुख म्हणतात. तूम्ही निवांत आत शिरता अगदी सावकाश सगळा विधी उरकता आणि समाधानाने बाहेर येता. बाहेर ही मोठी रांग लागलेली असते. रांगेतले तुमच्याकडे प्रचंड मत्सराने बघत असतात...
ती सुखाची परमावधी असते.
:)) awesome!!!
Masta lihilays :)
सर्वांचे मनापासून आभार _/\_
खरच मित्रा '
मस्त लिहिले आहेस अगदी ढासू
आवडले आपल्याला
बटाट्याची चाळ आठवली. छान !
बाप लिहिलं आहेस ... खरच पाचव्या खोलीविषयी इतकं चांगलं कधी वाचण्यात आलं नाही ...
एव्हड्या अवघड विषयावर अगदी अभ्यासपुर्वक लिहणं तुलाच जमतं मित्रा ... सलाम तुझ्या लेखणीला !!
पाचवी खोली Rocks!!!
Blogger-Design-Blog Post Edit-
Show Share Buttons ;)
एक नंबर मित्रा!! आजीचे घर आठवले!!
आवडले.
आज बर्याच दिवसांनी जी मेलवर गेलो आणि मग तुझी पाचवी खोली मी आणि तुझ्या मावशीने वाचून काढली. एकदम खास! यथार्थ वर्णन!
Kay re AAAditya Joshanchya Vadyatun AKdum Pachavya Kholit. J A B A R D A S T. Marshil LEKA Akhadyala Hasaun....
Bhaari lihilay....
bharee.....chawl ani chawlitala ayushya hyavar itaka chintanshil lekh me ajun tari vachala navta....pachvya kholicha chawlitil lokanchya ayushyatil mahatwa uttam prakare patvun dila ahe joshini!
पाचव्या खोलीला बोलतं केलंस मित्रा :D
Hats off मित्रा. या विषयावर अस काही वाचायला मिळेल असे वाटते नव्हते.
Thanks Sushant :-)