आयुष्याचे नाटक - प्रवेश पहिला

| Labels: | Posted On 4/7/08 at 9:49 PM

आयुष्य हे एक नाटक आहे असं कुणीसं म्हटलंय. आमच्या ह्या नाटकातले काही प्रवेश आता आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत. ह्या प्रवेशांतील काही भाग आपल्या नाटकाशी साधर्म्य असलेला वाटला, तर आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.प्रवेश पहिला - वाजवा रे वाजवा

बहीणा बाईंची अरे संसार संसार ही कविता आपल्याला फार म्हणजे फारच आवडते. नि संसारात पडल्या पासून तर भावायलाही लागली आहे. खरं म्हणजे मी लहानपणीच लग्न करणार नाही असं ठरवलं होतं. पण प्रेमाची परिणिती लग्नातच व्हावी असा हिचा आग्रह, बाबांचं मत, आईचा हुकूम, हिच्या टोणग्या भावाचा नि त्याचा बाप शोभेल अशा बापाचा 'प्रेमळ सल्ला', ह्या सगळ्याला बळी पडून शेवटी आमचेही दोनाचे चार झालेच. प्रेम विवाह असला तरी बघण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे असा आजीचा आग्रह होता. ह्याच कार्यक्रमात देणं घेणं, मान पान, साखरपुडा, कार्यालय इत्यादी ची बोलणीही करून घेऊ असं बाबा म्हणाले. मला कुणी काही विचारलंच नाही.

ठरल्या दिवशी मी, आई, बाबा आणि आजी असे जाऊन पोचलो. एका कोचावर आम्ही नि समोरच्या कोचावर तिचे बाबा, आई, दादा, ती आणि पायाशी एक कुत्रं असे दोन संघ (मनातल्या मनात) कबड्डी कबड्डी म्हणत स्थानापन्न झालो.

बसल्या पासून पाचच मिनिटांत ही मंडळी आपल्या मुलाला नकार देतील ह्या भीतीने आमच्या बाबांनी 'आम्हाला मुलगी पसंत आहे' असं सांगून टाकलं नि आजी समोरच्या समोस्यांवर तुटून पडली. त्यावर तिच्या वडिलांनी 'आता आमच्या मुलीने ठरवलंच आहे तर आम्ही काय बोलणार' असे भाव चेहऱ्यावर आणून 'आम्हालाही मुलगा पसंत आहे' असं सांगितलं. 'तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा' हिची आई. मी आपलं विचारलं 'काल सिनेमाला का आली नाहीस? ' त्यावर सगळे स्तब्ध. ही लाजून आत पळाली नि आतून मला 'तुझ्या नानाची टांग' असा sms पाठवला. द्यायचे घ्यायचे काहीच नसल्याने आणि आप-आपल्या मंडळींचे मान-पान आपणच करायचे असल्याने समोसे संपताच आमची बैठकही संपली.

ह्या बैठकीत मी एक नोट केले की मुली कडच्यांपेक्षा आमच्या कडची मंडळीच जास्त टेंशन मध्ये होती. काही मित्रांशी बोलल्यावर ही सार्वजनिक समस्या असल्याचा साक्षात्कार झाला. संध्याकाळी कट्ट्यावर ह्या समस्येची उकल करायची असं ठरलं. पण शेकडो सिगारेटी आणि लीटरचे लीटर चहा संपूनही हाती काही लागेन. शेवटी 'साला, कलियुग कलियुग म्हणतात ते हेच' असा निष्कर्ष काढून आम्ही आपापल्या घरी गेलो.

यथावकाश आमचे लग्नं झाले. कन्यादान करते वेळी सासऱ्याच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद, सासूच्या चेहेऱ्या वरचे कुत्सित हास्य आणि साल्याच्या चेहऱ्यावरचे 'सुटलो' हे भाव बघताच मला एकदम रामदास स्वामीच आठवले. ते बोहोल्यावरून का पळाले असावेत ह्याचं कारण मला सापडलं असं वाटून मलाही हसू फुटलं. ते पाहून हिचा बाप चमकला. गोरा मोरा झाला. पण उसनं हसून त्याने माझ्या बाबांना पान सुपारी दिली. (सुपारी देणं हा वाक्प्रचार इथूनच आला असेल काय? )

एकी कडे तारा बलं चंद्र बलं सुरू असताना मी मनातल्या मनात भीमरूपी महारुद्रा म्हणत होतो. सप्तपदी घालताना मी हिला हात धरून चालवतोय ह्या ऐवजी हीच मला मागून पराणी टोचून पुढे ढकलतेय असा भासही मला झाला. वर आमची नालायक मित्र मंडळी आमच्या समोरच प्लेट च्या प्लेट आइसक्रीम चापत होती. त्यांचं लग्नं नसल्याने ते बिनधास्त होते.

घटिका भरत असताना हिच्या एका मावशीने यमक प्रास काहीही नसलेली मंगलाष्टकं म्हटली. त्यात हिचं यथेच्छ गुणवर्णन केलं होतं. आपली बायको इतकी गुणी आहे हे ऐकून मला अभिमान वाटला. पण इतक्या वर्षात ह्यातल्या एकही गुण आपल्याला कसा नाही कळला हा विचार मनात येऊन मी थोडा गोंधळातही पडलो. त्यांचं म्हणून झाल्यावर, घटिका भरत नसल्याने व जवळचा स्त्रोत्र व सुभाषितांचा साठा संपल्याने गुरुजींनी मध्येच रामरक्षेतले दोन-चार श्लोकही म्हणून घेतले. आणि कुणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच घटिका पात्राला एक तांदूळ फेकून मारला. मी सहज मान वळवून पाहिलं तर दुसरे गुरुजी शांत पणे एका कोपऱ्यात तंबाखू चोळत उभे होते व 'सावधान'च्या वेळी कोरस देत होते.

शेवटी एकदाची घटिका भरली नि लोकांनी आमच्या वर रंगीत तांदूळ फेकून टाळ्या वाजवल्या. डोंबाऱ्याच्या खेळात जसं माकड जिवाच्या आकांताने कोलांट्या उड्या मारतं नि लोकं टाळ्या वाजवतात त्यातलाच हा प्रकार. (इथे पुन्हा मला मी कोलांट्या उड्या मारतोय नि ही डमरू वाजवतेय असा भास झाला).

तर अशा प्रकारे आमचं वाजवा रे वाजवा झालं. आणि नव्याची नवलाई संपल्यावर, वाट चुकलेलं वासरू जसं थोड्या वेळाने कळपात सामील होतं, तसे आम्हीही आमच्या कट्ट्यावरच्या कळपात सामील झालो.

Comments:

There are 11 comments for आयुष्याचे नाटक - प्रवेश पहिला