आयुष्याचे नाटक - प्रवेश पाचवा

| Labels: | Posted On 6/24/08 at 7:45 PM

प्रवेश पाचवा - खुळ्यांची खुळं





पु. लं. नि सांगितल्या प्रमाणे स्त्रियांची म्हणून पुरुषांनी चालवलेली जी मासिकं असतात त्यातलंच एक वाचून विद्याला तिचं वजन उंचीच्या प्रमाणात जास्त आहे असा साक्षात्कार झाला आणि घरात फिटनेसचं वारं वाहू लागलं. 'पण तुझं वजन रुंदीच्या प्रमाणात बरोबर आहे... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ... ' असं त्यावर मी म्हटल्याने बदला म्हणून हे फिटनेसचं झेंगट माझ्याही मागे लावण्यात आलं.

मी अगदीच हार्ड नट असल्याने जीम मध्ये नाव नोंदवण्यास सरळ नकार दिला. काही वर्षापूर्वी मी आणि मध्याने जीम मध्ये नाव नोंदवलं होतं. ३ महिन्याची फी भरली. पैसे भरले की झक मारत जाऊच हा आमचा विश्वास पार बुडीत निघाला आणि आठवड्या भरात आमची जीम बंद झाली. त्यानंतर काही महिन्यांनी आता वाट्टेल ते झालं तरी जायचंच असं ठरवून पुन्हा ३ महिन्यांचे पैसे भरून आलो. आणि पुन्हा आठवड्याभरात जीम बंद. तिसऱ्यावेळी गेलो तेव्हा शेवटी सर म्हणाले 'तुम्ही आधी आठवडाभर फुकट या. त्यानंतरही आलात तरच पैसे भरा. ' ती वेळ अर्थातच आमच्यावर कधी आली नाही.

हा अनुभव मी विद्याला ऐकवल्याने व्यायामाची सुरुवात चालण्यापासून करावी असे तिने आणि संध्या ने ठरवले. पहिल्या दिवशी सोडायला चल असं म्हणून हिने मला पहाटे उठवलं. 'बागेत चालायला जायचं तर तिथपर्यंत सोडायला गाडी कशाला हवी. चालतच जा की. ' हा सल्ला धुडकावून ती पंखा बंद करून निघून गेली. मध्याही संध्याला सोडायला आला होता. थोड्यावेळाने ह्या घामाघूम होऊन बाहेर आल्या तेव्हा आम्ही बागे समोरच्या हॉटेलात बसून जिलबीवर ताव मारत होतो. ते बघून संध्याने टोमणा मारला 'वा... बायका आत घाम गाळतायत आणि तुम्ही इथे जिलब्या हाणताय... ' त्यावर लगेच मी प्रती टोमणा दिला 'मॅडम रोज १२-१२ तास योगासनं करतो. शवासन आणि मकरासन आलटून पालटून... हा हा हा... ' उत्तरा दाखल मला अंगठा आणि मधलं बोट मुडपून पेरांच्या हाडांनी चिमटा काढण्यात आला.

संध्याकाळी येताना विद्या स्किपींग रोप्स घेऊन आली. आज पायांचा व्यायाम झाला आता उद्या खांदे आणि हातांचा व्यायाम होण्यासाठी दोरीच्या उड्या मारणार. दुसऱ्या दिवशी अचानक ६ वाजता धप्प... धप्प... धप्प... अशा आवाजांनी जाग आली. घाबरून जागा झालो तर बेडच्या बाजूला विद्या दोरीच्या उद्या मारत होती. 'अगं बिल्डिंग जुनी झाली आहे आपली' हे ओठांशी आलेलं वाक्य मी पुन्हा पंखा बंद होईल ह्या भीतीने मी गिळलं. पुढल्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा त्यांचा चालायचा व्यायाम आणि आमची जिलबी. दुकानदार जुन्या ओळखीचा असल्याने त्याने ऐकवलंच 'अरे बायको बरोबर येते त तुम्ही पन चालते का नाय? त्यावर मध्याने ऐकवलं 'आमी चालते त तुज्या जिलब्या कोन खाते??? ' देवाच्या कृपेने त्यांचं हे फिटनेसचं खूळ लवकरंच उतरलं आणि आमची सकाळची जिलबी बंद झाली. काही दिवस शांततेत गेले.

पण स्वस्थ म्हणून बसायचं नाही असा काही बायकांचा स्वभाव असतो. त्यानुसार फावल्या वेळात बिल्डिंग मधल्या मुलांना शिकवण्याचं खूळ हिच्या डोक्यात शिरलं. मुलांच्या आयांनी पण दुसरी कडे जाऊन काय हवा तो दंगा करू दे म्हणून आनंदाने परवानगी दिली. पण शिकवायचं काय हा प्रश्न होताच, कारण सगळी मुलं वेगवेगळ्या इयत्तेतली होती. त्यावर आपण संस्कारवर्ग सुरू करू असं ठरवण्यात आलं. मदतीला अर्थातच संध्या.

त्यानुसार रवीवारी सकाळी ७ वाजता ५-६ आयांनी आप-आपली कार्टी आमच्या घरी आणून सोडली आणि स्वतः झोपायला निघून गेल्या. आमच्या खालच्या साठे काकांचा अक्षय आला नि डायरेक्ट माझ्या शेजारी पांघरुणात शिरला. थोड्यावेळाने बायको त्याला शोधत शोधत बेडरूम मध्ये आली.

ऊठ ना रे सोन्या...

उं हूं...

शहाणी बाळं झोपतात का इतक्या वेळ...

ऍडी काका झोपलाय की...

अरे तो कुठे बाळ आहे... (तो कुठे शहाणा आहे हे शब्द तिने मुश्किलीने आवरले असावेत)

मी पण मोठा झालोय...

बघ बाहेर सगळे जण किती मजा करतायत...

(मी हळूच पांघरून वर करून बघितलं तर अक्षयची धाकटी बहीण खुर्चीवर पेंगत होती, नि एक मुलगा सूर्यनमस्काराच्या ६व्या आसनातच हात लांब करून झोपला होता)

काय करतायत???

तू बघ तर येऊन...

नंतर बघतो...

हा आता ऐकत नाही म्हणून बायकोने त्याला उचलून न्यायचे ठरवले. तिची थोडी गंमत करावी म्हणून मी पांघरुणाखालून हात घालून त्याला धरून ठेवला. ते बायकोला कळलं असावं म्हणून ती म्हणाली 'ऍडी काकाला घेऊन आलास तर तुला चॉकलेट देईन. ' लगेच सोडलं त्याला. त्यानंतर बाहेर अर्धा तास प्रचंड रडारड आणि कल्ला करून मुलं आप आपल्या घरी निघून गेली.

अक्षयचे बाबा अरविंद मला २ वर्षच सीनियर. तो पण माझ्या सारखाच निशाचर आणि सूर्यवंशी. ह्या बिल्डिंगच्या पाण्यातच काहीतरी आहे राव. दुपारी कट्ट्यावर जायला निघालो. बऱ्याच दिवसात गप्पा झाल्या नव्हत्या म्हणून त्यालाही सोबत न्यावे असा विचार करून बेल वाजवली तर साठे आजींनी दार उघडलं.

मला बघून मिष्किल पणे विचारलं 'काय रे??? खु खु खु खु... '

काय झालं आजी...

मला काय होणारे??? तुम्हाला काय झालंय???

मला कुठे काय झालंय...

नाही... मुलं सांभाळायचा सराव सुरू झालाय म्हणून विचारलं हो...

असं काही नाहीये हो आजी. अजून किमान वर्षभर तरी विचार नाही...

अजून वर्षभर??? अरे अजून थांबलास तर मुलाला घेऊन फिरताना मुला ऐवजी नातू समजतील हो लोकं त्याला... खु खु खु खु

ह्यांच्या नातवाच्या वेळी मध्याने मोट्ठा किस्सा केला होता. नातवाच्या बारशाला आम्ही जमलो असताना त्यांनी नातवाच्या जिभेवर मधाचा थेंब लावला. का लावला म्हणून विचारल्यावर म्हणाल्या 'ह्याने मूल हुशार आणि चटपटीत होतं' त्यावर आगाऊ मध्याने 'अरविंदला लावलं नव्हतं का? ' असं विचारलं. अरविंदला ओळखणारी लोकं, त्याचे बाबा, स्वतः अरविंद आणि खुद्द त्याची बायकोही मोट्ट्याने खो खो करून हसले होते. पण त्यानंतर साठे आजींनी 'माधव अतिशय आगाऊ कार्टा आहे, त्याची साथ सोड. ' असं मला हजार वेळा तरी ऐकवलं असेल.

बायकोचे हे संस्कार वर्गही लवकरच बंद पडले. आता पुढे काय होतंय ही धास्ती होतीच. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. थोडे दिवस घरात शांतता होती.

आणि एके दिवशी अचानक शांत समुद्रात वादळ यावं तसं आमच्या घरात सुना आत्त्याचं आगमन झालं.

Comments:

There are 1 comments for आयुष्याचे नाटक - प्रवेश पाचवा