मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त आघाडी

| Labels: | Posted On 11/17/08 at 6:21 PM

धम्याला माझ्या घरी घेऊन आलो. आत आल्यावर कपडे बदलण्यासाठी धम्या बेडरूम मधे गेला. बराच वेळ झाला तरी साहेब बाहेर आले नाहित म्हणून मी डोकावून बघितलं तर धम्या चक्क कपाट आवरत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो". असं म्हणून धम्या फ्रेश व्हायला बाथरूम मधे गेला.

यथेच्छ जेऊन वगरे आम्ही झोपलो. मधेच मला अचानक वारं लागल्यासारखं वाटून जाग आली. बघतो तर धम्या झोपेतल्या झोपेत शेजारी बसून मला पेपर हलवून वारा घालत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".

धम्याला सकाळी ७ ला उठायचं होतं. गजर लावला होता. मी उठलो पण साहेब उठले नाहीत. शेवटी मी जोरात ओरडलो, धम्या ऊठ अरे तास भर उशीर झाला. अचानक धम्या ताडकन उठला आणि अंगठे धरून कोपर्‍यात ओणवा उभा राहिला. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".



असो असो. आता खरा व्रुत्तांत :-)



भाग १ - मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त ओसरी



धम्या बँगलोरला येतोय ह्याची चर्चा मागचे कितीतरी दिवस ख.व. मधून सुरु होती. शेवटी प्रत्यक्ष धम्याकडून खरड येऊन पडली आणि त्या बातमी वर शिक्का मोर्तब झालं. "बँगलोरला येतोयस तर माझ्याच घरी उतरायचंय. दुसरी कडे राहिल्याचं कळलं तर रात्री पोत्यात घालून अपहरण करण्यात येईल" ह्या माझ्या प्रेमळ आमंत्रणाचा मान ठेऊन धम्याने माझ्याकडे रहायचं ठरवलं.

दरम्यान बँगलोर मधल्या इतर मि.पा. कर्‍यांशी संपर्क साधणं सुरू होतं. धमाल साहेब फार कमी वेळ, म्हणजे रविवार रात्र ते सोमवार पहाट, इथे असल्याने प्लॅन एकदम काटेकोर पणे मिनीटाच्या हिशोबात बनवण्यात आला. यशो, धम्या, अभिरत आणि मी अशा चौघांनी भेटायचं ठरवलं. मोठ्या मनाने यशोने आम्हाला तिच्या घरी डिनरचं आमंत्रण दिलं. वर कुणाला काय आवडतं ह्याची शौकशीही केली. विमानतळावरून बस मधे नी बशीतून माझ्या घरी अशी स्वारी आल्यावर आम्ही यशोच्या घराकडे प्रयाण केलं. अभिरत तोवर येऊन पोचला होता. यशो तिच्याच घरी असल्याने तिला उशीर होण्याची शक्यता नव्हती.

तर, धम्या आणि मी यशोकडे पोचल्यापोचल्या आम्हाला जेवणाची जय्यत तयारी झाल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला बराच वेळ गप्पा टप्पा झाल्यावर शेवटी जेवणाकडे मोर्चा वळवला. ह्या दरम्यान सतत पि.जे. मारणं सुरुच होतं.

मेथीचे पराठे, दही, हरबर्‍याची उसळ, चिकन, श्रीखंड, मट्ठा, मसाले भात अशा फर्मास जेवणावर ताव मारता मारता आम्ही एकमेकांची यथेच्छ खेचत होतो. सोबत तोंडी लावायला अर्थातच मि.पा. वरच्या घडामोडी होत्याच.

मधेच मिपा बँगलोर कट्ट्याचे मुख्य आयोजक, मिपा बँगलोर ओसरी चे प्रचारक, मिपा बँगलोर ढोसरी चा खंदा "खंबा" आणि बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समितीचे संस्थापक व उरलेले एकमेव सभासद श्री श्री डॉन बाबा बंगाली (सद्ध्या वास्तव्य जर्मनी) ह्यांनी फोन करून आमच्याशी यथेच्छ गप्पा मारल्या.

अभिरत ने आपली विनोदबुद्धी काय जबराट आहे ह्याच्या पुरावा म्हणून "ऍड्याच्या हातात चक्क पाण्याचा ग्लास" असं म्हणून माझा फोटो काढला.

धम्याला दुसर्‍या दिवशी लवकर उठायचे असल्याने आम्ही शेवटी ११ वाजता यशोच्या घरून निघायचं ठरवलं. धम्या आणि अभिरत ला रिक्षा मधे घलून मी त्यांच्या मागून बाईक घेऊन माझ्या घरी पोचलो.


भाग २- मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त ढोसरी



घरी पोचल्या पोचल्या नेहेमी प्रमाणे तातडीने माझ्या बैठकीच्या खोलीचं "बैठकीच्या खोलीत" रुपांतर करण्यात आलं.
धम्याच्या आवडी प्रमाणे सिंगल मॉल्ट ची व्यवस्था करण्यात आली होती.(तात्यानूं, तुमची लय आठवण आली. तुम्हाला उचक्या लागल्या असतीलच)

किचन मधे ग्लास आणायला गेलेला अभिरत तिथे मांडून ठेवलेले काचेचे शो-पिस बघून भिरभिरला.

असो. सगळी व्यवस्था चोख झाल्याची पावती देत धमाल रावांनी आता होऊन जाऊ द्या सुरुवात अशी आज्ञा केली आणि आम्ही सुरुवात केली. मधेच धम्याने मी त्याच्या ग्लासात ओततोय असा फोटो काढून घेतला. म्हणजे 'तू आग्रह केलास म्हणून मला नाईलाजाने घ्यावी लगली' असं कारण देता येइल म्हणाला.

ह्या नंतर पुढचे बरेच तास आम्ही वसंतराव, अण्णा, बाबुजी ह्यांची एकाहून एक सरस गाणी ऐकत घालवले. नॉन-स्टॉप गप्पाही सुरू होत्या. माझ्या शोकेस मधली घड्याळं बघून अभिरत खूश झाला. त्यात लवकरच अजून एकाची भर पडणार असल्याचं सांगितलं. डॉण बाबा बँगलोरी जर्मनीहून येताना व्हाया लंडन येणारेत आणि माझ्यासाठी बिग बेन मधलं घड्याळ उचलून आणणार आहेत हे कळल्यावर त्याला अजूनच आनंद झाला.

मधेच धम्याने मला व्याकूळ होऊन "खरंच का रे तुझ्या नाटकातले साने काका काल्पनीक आहेत?" अशा प्रश्न विचारला. धम्याला इतका कमी वेळासाठी आल्याने दर १० मिनीटानी एक अशा शिव्या पडत होत्या. शेवटी पुढल्या वेळी जास्त वेळ काढून येइन असं आश्वासन त्याच्याकडून घेण्यात आलं.

असं करता करता किती तास कसे गेले ह्याचा हिशोबच राहिला नाही. प्रचंड एंजॉय केलं. शेवटी रात्री झोपायची वेळ आणि सकाळी उठायची वेळ ह्यात किमान १ तास असावा ह्यावर सर्वांचं एकमत झाल्याने आम्ही आमची ढोसरी थांबवायचं ठरवलं.

सकाळी अभिरत कधी तरी गायब झाला. धम्याही ८ च्या दरम्यान अंघोळ करून कामावर गेला. जाताना मला उठवलं "लय भारी मजा आली रे भावा" असं म्हणून माझा निरोप घेताला. मी दार लावलं आणि पुन्हा झोपलो.







फोटो - http://www.flickr.com/photos/24440094@N02/sets/72157609254815561/

माझं साक्षात्कारी एकटेपण

| Labels: | Posted On 11/11/08 at 5:00 PM

माझं साक्षात्कारी एकटेपण
म्हणजेच - घी देखा मगर बडगा नहीं देखा, दूरून डोंगर साजरे, करायला गेलो काय नि झाले उलटे पाय वगैरे वगैरे





फिटण्या आधी एकदा तरी एकटं राहून बॅचलर्स लाईफ मनसोक्त उपभोगायची ही माझी लहानपणापासूनची सुप्त इच्छा होती. ती मी घरच्यांसमोर प्रकटही केली. पण 'आधी स्वतःच्या चादरीची घडी घालायला शिका. आलेत मोठे एकटे राहणारे. ' ह्या शब्दात त्यावर बोळा फिरवला गेला. शेवटी एकदाचं नोकरी निमित्ताने बँगलोरला यावं लागलं आणि ती पूर्ण झाली. पूर्वी आई-बाबांनी परवानगी दिली नसती, पण आता हा अजून बिघडणे शक्य नाही हे त्यांना पटल्याने त्यांनी हसत हसत परवानगी दिली. झालंच तर एकटा राहून तरी थोडा जबाबदार होईल अशी त्यांची अपेक्षा असावी.

इथे यायचं ठरल्यावर मला पहिला प्रश्न पडला 'तिथे मराठी लोकं भेटतील का? ' पण भाऊ म्हणाला 'अरे माझे सगळे रूम-मेटस मराठीच आहेत. ' बँगलोरला जायचं म्हणून शॉपिंग झाली. मी सगळेच मळखाऊ रंगाचे कपडे आणल्याने आईच्या कपाळावर आठी उमटली. जाताना प्रचंड सूचना मिळाल्या. चादरी दर आठवड्याला धूत जा, रोज एकदा तरी केर काढत जा, दिवसातनं दोनदा दात घासत जा, रोज अंघोळ करत जा, गोड खाल्लंस की चूळ भरत जा, बोलणारं कुणी नाहीये म्हणून कसाही राहू नकोस, इत्यादी इत्यादी. मी जाणार म्हणून माझ्या सगळ्या मित्रांना फार वाईट वाटलं. मला माझ्याच पैशाने (पगार वाढला जोश्या, माज नकोय, बिल भर) ५-६ ठिकाणी सेंड ऑफ देण्यात आले. ह्या पार्ट्यांवर माझा वर्षभराचा वाढीव पगार खर्च झाला.

तर, एकदाचा बँगलोरला आलो. सुरुवातीला महिनाभर भावासोबत राहिलो. तो नि त्याचे रूम-मेट्स एकाच कॉलेज मधले नि आता एकाच कंपनीत. हा माझा (मामे असला तरी) भाऊ आहे ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. अगदीच साधा सरळ आहे राव. कसल्याही चांगल्या सवयी नाहीत. रोज पहाटे उठून योगासनं आणि व्यायाम करतो. शनिवार रविवार वेळ मिळेल तेव्हा अजगर व्हायचं सोडून क्रिकेट खेळतो. हे कमी होतं की काय म्हणून त्याला वर दुधाचं व्यसन ही आहे. ह्या सवयी त्याने मलाही लावायचा प्रयत्न केला. पण मला सुधारता सुधारता तोच बिघडेल अशी भीती वाटल्याने सोडून दिला.

त्याचे घर माझ्या ऑफिस पासून लांब असल्याने मी वेगळं घर घेण्याचं ठरवलं. आणि मला घी देखा मगर बडगा नहीं देखा, दूरून डोंगर साजरे, करायला गेलो काय नि झाले उलटे पाय, इत्यादी म्हणींचा अर्थ समजायला सुरुवात झाली.

पहिला धक्का बसला घर शोधणे ह्या प्रकाराने. एजंट हा माणूस किती टिपीकल असू शकतो ह्याचा अंदाज आला. मी सांगितलेल्या अटींपैकी एकही अट पूर्ण न करणारी घरं बघण्यात माझे सुरुवातीचे काही दिवस गेले. त्यात भाडं ही माझ्या बजेट पेक्षा जास्त. एकदा तर एकच घर मला तीन एजंट्स नि वेगवेगळ्या दिवशी दाखवलं. तशा माझ्या अटी फार नव्हत्या. चहावाला, पानवाला नि वाइन शॉप जवळ हवं, एरियात रिक्षा स्टँड हवा आणि मुख्य म्हणजे बेडरूम मध्ये अजिबात उजेड यायला नको. शेवटी २०-२५ घरं बघून झाल्यावर एक घर फायनल केलं. मी येताना कपड्यांशिवाय काहीच सामान न आणल्यामुळे सगळंच घ्यायचं होतं. पण मी मुळातच प्रचंड ऑर्गनाइज्ड माणूस असल्याने ते मला फार जड गेलं नाही. गॅस ते गादी अशी सगळी खरेदी एका शनीवारी ५ तासात संपवली. हाय काय अन नाय काय.

पण दुसरा धक्का इथे बसला. शाळेनंतर डायरेक्ट आत्ता बाजारहाट केल्याने मधल्या काळात सगळ्याच वस्तूंचे भाव इतके आचरटा सारखे वाढले असतील ह्याची मला कल्पनाच नव्हती. हळू हळू मला आटे दाल का भाव कळायला सुरुवात झाली. कपडे धुण्याचा साबण २० रुपये, अर्धा किलो मिल्क पावडर १०० रुपये, ५ किलोचा पोर्टेबल गॅस २५० रुपये, स्कॉच ब्राईट ची किंमत २२ रुपये ऐकल्यावर ह्या सोबत घासायला माणूस पण मिळतो का असं विचारलं दुकानदाराला. अक्षरशः डोकं फिरायची वेळ आली. च्यामारी ह्या रेट नि पगार कितीही वाढला तरी पुरणार नाही. बचत तर लांबच राहिली. प्रेम चोपडाचा 'नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या' हा डायलॉग तंतोतंत पटला. झक मारली नि इथे आलो असं झालं. पण आता आधीचा जॉब सोडल्याने दोर कापलेल्या मावळ्यासारखं लढायचं ठरवलं.

एकटं राहायला लागल्यावर तर रोज नवनवीन गंमती होऊ लागल्या. आपल्याला स्वच्छतेची नि टापटिपीची फार आवड आहे हा गैरसमज पहिल्याच आठवड्यात दूर झाला. च्यायला किती धूळ जमते यार हा डायलॉग वारंवार तोंडात येऊ लागला. सर्वात वाईट झालं म्हणजे पूर्वीची ऑटोमॅटिक लाईफ स्टाइल गेली. पूर्वी कसं, कपडे बादलीत टाकले की ते आपोआप इस्त्री होऊनच कपाटात सापडायचे. डबा सिंक मध्ये टाकला की तो आपोआप दुसऱ्या दिवशी भरलेल्या अवस्थेत बॅग मध्ये सापडायचा. हे सगळंच बंद झालं. खरं तर हे सगळं सुरू झालं. इतर वेळी इतकी हलकी वाटणारी चादर धुवायला घेतली की अचानक कशी जड होते हे मात्र कळलं नाही. अंघोळ ही गोष्ट 'आज करायची कामं' ह्या सदरात मोडू शकते ह्याचाही साक्षात्कार झाला.

पहिल्या दिवशी झोपलो तर काही केल्या झोपच येईन. ह्यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे. झोप न येण्याचं कारण होतं, आमच्या मुंबईच्या घरात दोन बिल्डिंग मधल्या ट्यूबचा प्रकाश यायचा. इथे मिट्ट काळोख. शेवटी किचन मधला दिवा लावल्यावर झोप आली.

ह्यानंतर सुरू झालं आमचं आवडतं 'एनर्जी कंजर्वेशन'. ह्याला काही जण आळशीपणाही म्हणतात. म्हणजे चहा झाल्यावर गाळणं धुवावं लागू नये आणि दिवसातून दोन वेळा दूध तापवावं लागू नये म्हणून मिल्क पावडर आणि टी बॅग्स आणल्या, घर झाडताना वाकावं लागू नये म्हणून लांब दांड्याचा झाडू घेतला, चादर दर आठवड्याला धुण्यापेक्षा २ आठवड्याने ड्राय क्लिनींगला टाकायला लागलो. ह्या सगळ्यामुळे आयुष्य जरा सुसह्य झालं. शनिवार रविवार हवं तेव्हढं झोपणं सुरू झालं. एका विकांताला फक्त १ चहाचा ब्रेक घेऊन सलग १७. ५ तास झोपायचा रेकॉर्डही करून झाला. शुक्रवारी रात्री जे झोपायचं ते डायरेक्ट शनिवारी दुपार नंतरच उठायचं. त्यामुळे मग दुपारच्या जेवणाची चिंता मिटते. संध्याकाळी जरा चकाट्या पिटल्या पुन्हा झोपायला मोकळे. मग हेच सायकल रविवारी कंटिन्यू करायचं.

पण नव्याची नवलाई संपल्यावर ह्याचाही कंटाळा आला. एकटेपण खायला उठू लागलं. मुंबईत वेळी अवेळी फोन करून चावणारे आणि इतर वेळी त्रास देणारे मित्र हवेहवेसे वाटू लागले. 'अरे मी देतो तुमचे चहा-सिगारेटचे पैसे, पण या इथे' असं मोठ्ठ्याने ओरडावंसं वाटू लागलं. साला एक मराठी शब्द कानावर पडेना. पार सरकलो होतो. मुंबईला मित्रांना फोन केल्यावर कानावर पडणाऱ्या शिव्या ओव्यांसारख्या वाटू लागल्या. कुठे कोणी 'अरे' म्हणाला की तो 'अरे' हिंदीचा आहे की मराठीचा म्हणून कान टवकारायचो. MH च्या गाड्या बघून (इंक्ल्यूडींग MH १२) उगाच मनातून बरं वाटायचं. १-२ वेळा मुंबईला गेल्यावर मुलींना माहेरी जाताना काय वाटत असेल ते कळलं.


सुदैवाने ह्यावरही उपाय सापडला. माझी एक मैत्रीण एके दिवशी मला एका मराठी नाटकाला घेऊन गेली. आणि इथले महाराष्ट्र मंडळ भलतंच कार्यरत आहे हे मला कळलं. पूर्वी तात्यांचं आहे म्हणून नाव नोंदवलेल्या 'मिसळ-पाव'ची पण चटक लागायला सुरुवात झाली. मग काय, मित्र जमायला सुरुवात झाली. 'जाऊ तिथे कट्टा करू' हा धर्म असल्याने इथेही कोब्रा कट्टा आणि आमच्या 'मिसळ-पाव'चा कट्टा सुरू केला. इथेही असंख्य मित्र जमले. धमाल सुरू झाली. आणि सहा महीन्या नंतर पहिल्यांदाच मला आपण एकटं राहतोय ह्याचा विसर पडला. बॅचलर लाईफ खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला सुरुवात झाली.

मागच्याच आठवड्यात एका मित्राचा फोन आला. त्याला इथे नोकरीची ऑफर आली होती. मला पडलेला प्रश्न त्यालाही पडला 'अरे पण तिकडे मराठी लोकं आहेत का? ' माझ्या तोंडून उत्तर बाहेर पडलं 'अरे नको तितकी आहेत, तू ये बिंदास... '

कट्टेबाज - भाग २

| Labels: | Posted On 11/10/08 at 6:19 PM

सकाळी कट्ट्यावर पोचलो तर अव्या आणि पाऱ्या, मारी ला शोधत होते. बरेच वैतागलेले दिसले. झालं असं, की आदल्या रात्री एका गाण्याच्या प्रोग्रॅम मध्ये मारी तंबोऱ्यावर साथ देणार होता. त्यांनी सगळ्यांना सांगून पाहिलं पण कुणीही यायला तयार झालं नाही. शेवटी तुम्ही तरी या म्हणून त्याने ह्या दोघांना गळ घातली. वर सांगितलं की तुमच्यासाठी २ तिकिटं खिडकीवर ठेवली आहेत. बिचारे भूत-दया म्हणून गेले. तिकिटं कलेक्ट केल्यावर कळलं की तिकिटाचे पैसे दिले नव्हते. नि वर दुसऱ्या रांगेतली २७५ रुपयाची तिकिटं होती. मनातल्या मनात पाऱ्याला शिव्या घालत आणि ५५० रुपयात काय काय करता आलं असतं ह्याचा हिशोब करत बिचारे गेले प्रोग्रॅमला. आत मध्ये जाऊन पाहिलं तर अर्ध्याहून अधिक हॉल रिकामा होता. कुठल्यातरी क्लासने आपल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम भरवला होता. त्यामुळे त्यांचे पालक आणि नाट्यगृहाचा कर्मचारी वर्ग सोडून बाकी जास्त जनता नव्हती. टॉर्च मारून सीट कुठे आहे ते दाखवणारा माणूस बाहेर गेल्यावर म्हणे हॉल रिकामा रिकामा वाटायला लागला.

सगळ्यांचे आभार मानून गाण्याचा भन्नाट कार्यक्रम सुरू झाला. साथीला असलेला तबला वादक आणि पेटी वादक ह्यांचा एक मेकांशीच नव्हे तर गाणाऱ्याशीही काही संबंध नव्हता. भरीस भर म्हणून मारी पण एका कानात इयरप्लग लावून मोबाईल वर गाणी ऐकत होता. मध्यांतरापूर्वी ज्यांची गाणी झाली आहेत ते गायक आणि त्यांचे पालक मध्यांतरात सटकले. अव्या नि पाऱ्याची गोची अशी झाली की ते समोरच बसले असल्याने त्यांना निघता येईन. हे सगळं असह्य होऊन पाऱ्याने जनरीत वगैरे गेली बाझवत असं म्हणून तिथेच ताणून दिली. ते बघून गायिकेची तान अंमळ जास्त खेचल्या गेल्याचा अव्याला भास झाला.

कुणाचीही भीड भाड न बाळगणाऱ्या अव्या लोकलाजेस्तव हे अत्याचार ३ तास सहन करत होता ह्यावर माझा मात्र विश्वास बसेना. खोदून खोदून विचारल्यावर कळलं की अव्या थांबण्यामागचं मुख्य कारण समोर स्टेज वर गात होतं. हा मान डोलाऊन दाद वगैरे देत होता. प्रोग्रॅम कितीही फडतूस असला तरी 'चोराच्या हातची लंगोटी' ह्या न्यायाचे हिच्याशी ओळख झाली तर २७५ सार्थकी लागतील असा विचार करून अव्या प्रोग्रॅम झाल्या झाल्या तिला भेटायला गेला. स्वागताच्या वेळी पाहुण्यांना दिलेल्या पुष्पगुच्छातलंच एक गुलाब घेतलं, काळ्या पडलेल्या बाहेरच्या पाकळ्या खुडल्या नि मनाच्या एका कोपऱ्यात वाक्यांची जुळवणी नि दुसऱ्या कोपऱ्यात धीर येण्यासाठी रामरक्षा असं करत अव्या ग्रीन रूमच्या बाहेर तिला शुभेच्छा द्यायला उभा राहिला. गार पडलेले हात-पाय नि कपाळावर घाम अशा विचित्र अवस्थेत ५ मिनिटं घालवल्यावर एकदाचा ग्रीन रूमचा दरवाजा उघडला. पण दैव म्हणून जे काही असतं ते आपल्या इच्छेनुसार कधीही चालत नाही हा भाई काकांना आलेला अनुभव अव्यालाही आला. अव्याला आवडलेला चेहरा ग्रीन-रूम मधून बाहेर पडताना कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र अशा अवतारात बाहेर आला नि ह्याच्याकडे ढुंकूनही न बघता सरळ लिफ्ट मध्ये शिरला.

ह्या सगळ्यामुळे अव्या जामच सरकला होता, ह्या मारी च्या मारी, भेटू दे हरामखोराला, मारतोच धरून. अरे गाण्याची आवड लागावी म्हणून प्रोग्रॅम करता की लोकांना गाण्यापासून पुट-ऑफ करण्यासाठी. आणि वर असल्या भुक्कड कार्यक्रमांची तिकिटं आपल्याच मित्रांना विकता?
त्याला शांत करण्यासाठी चहा मागवला. पैसे द्यायला गेलो तर मी यायच्या आधी २ प्लेट वडा-सांबार नि शिरा फस्त झाला होता. ह्याचे पैसे अव्या देईल असं म्हणालो तर अव्या म्हणाला तुझ्यासाठी थांबलो म्हणून हे पैसे तूच भरायचेस. वर 'स्वतःच तोंड बघितलंस ना सकाळी सकाळी' हा टोमणा ऐकावा लागला.
"जोश्या लेका दुःख तिचं लग्न झाल्याचं नाहीये... "
"माहिती आहे, दुःख तिचं लग्न तुझ्याशी न झाल्याचं आहे... "
"नाही रे... च्यायला आता ही गायला बसतानाच लायसंस घालून बसली असती तर काय झालं असतं? आपल्याला कॅटलॉग मध्ये आवडलेला शर्ट एक तर आपल्या साइज मध्ये नसतो अथवा स्टॉक संपलेला असतो असं एक संत वचन आहे. पण सालं हे मुलींच्या बाबतीतही का व्हावं? "
"मला काय माहीत? "
"ह्म्म्म्म... "
"जाऊ दे रे, ती जगातली शेवटची सुंदर मुलगी नव्हती रे... "
"नि असती तरी ती तुला पटली नसती" डायलॉग मारत मारत पाऱ्याने एंट्री घेतली. तो इथे अव्यावर वैतागला होता. हा भाई त्याला न उठवताच तिला भेटायला पळाला होता. त्यांची आप-आपसात जुंपली. पण अव्याने त्याला सिगरेट दिल्यावर त्याने सिगरेट पेटवून वाद विझवला.

एरवी सगळ्यात आधी कट्ट्यावर येणारा सोन्या अजून आला नव्हता. फोन करणार इतक्यात तो स्वतःच अवतरला. सोन्या नुकताच ताजा ताजा प्रेमात पडला होता. त्यामुळे त्याच्या अशा वेळी-अवेळी गायब होण्याची आता सवय झाली होती. चेहरा पाडून आलेल्या सोन्याला पाहून कुणालाच आश्चर्य वाटलं नाही. बिचारा स्त्री-हट्टाला बळी पडून कुठले कुठले टुकार सिनेमे बघून यायचा नि पुढचा तास दीड तास आम्हाला पकवायचा. पण ह्यावेळी कारण वेगळं होतं. पगार झाला म्हणून हा मुलगा मोठ्या रोमँटिक मूड मध्ये ग. फ. ला शॉपिंगला घेऊन गेला. तिच्याकडे नसलेल्या कलरचा ड्रेस ह्याने घ्यायला लावला. नि तिथेच फसला. आता तिच्याकडे ह्या कलरचा ड्रेस नसल्याने साहजिकच त्या ड्रेस वर मॅचिंग सँडल्स, पर्स, कानतली नि मोबाईल पाऊच तिच्याकडे नव्हताच. चार आण्याची कोंबडी नि बारा आण्याचा मसाला झाला. तिने ह्या सोन्याला बकऱ्यासारखा कापला (खाऊ-पिऊ तरी घातलं का रे... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ - अव्या) त्यामुळे मालक तात्पुरते दुखा:त होते. हळू हळू एक एक करून कोरम जमला. प्रत्येकाने एक-मेकाला डोळे मारून सोन्याची चौकशी केली नि त्याच्या दु:खावर यथेच्छ मीठ चोळलं.

रविवार असल्याने आज प्रजा निवांत होती. दुपार कशी घालवावी ह्यावर बराच काथ्याकूट करून झाल्यावर नेहमीप्रमाणे सोन्याच्या घरी जाऊन पत्ते खेळावेत ह्यावर सगळ्यांचं एकमत झालं. पण सोन्याने हा प्रस्ताव धुडकावून लावला 'साल्यांनो माझ्या घरी बसता आणि मी नोकर असल्यासारखे पाणी आण, चहा आण, उशी दे असे हुकूम सोडता. वर जाताना सगळा पसारा तसाच टाकून जाता. पत्ते पण नाही आवरत नालायकांनो तुम्ही. ' शेवटी त्याच्या सिगारेट्सचा खर्च सगळ्यांनी मिळून करायचा, लागतील त्या वस्तू स्वतः उठून घ्यायच्या आणि जाताना परत जागच्या जागी ठेवायच्या, चहाचे कप न फोडता धुवायचे नि ओट्यावर उलटे वाळत घालायचे ह्या अटींवर त्याने मान्यता दिली.

ह्यातली एकही अट आम्ही पूर्ण नाही केली. ह्या आधीही केली नव्हती नि ह्या पुढेही करणार नाही. 'असंच वागायचं तर तुझ्या घरी कशाला येऊ, स्वतःच्याच घरी जाऊ ना' इति अव्या. पत्ते खेळता खेळता अव्याने एक अफलातून किस्सा ऐकवला. खरा खोटा त्यालाच ठाऊक. त्याला पण ठाऊक असेल की नाही देव जाणे. कारण तो इतक्या ठामपणे टेपा लावतो की काही दिवसांनी त्या खऱ्याच वाटायला लागतात. म्हणे त्याच्या एका मित्राचं कॉलेजमध्ये एका मुली सोबत प्रकरण सुरू होतं. कॉलेजनंतर ते मोडलं. त्या नंतर त्या मुलीचं त्याच्या मित्राशी लग्न ठरलं. घरून परवानगी नव्हती, म्हणून पळून जायचं ठरलं. हिला पळवण्यासाठी अव्याचा मित्र म्हणे त्या मुलीच्या भावाचीच बाइक घेऊन गेला होता. सगळे हसले. पोट धरधरून हसले. आपल्या विनोदाला आलेला हा भव्य-दिव्य प्रतिसाद पाहून अव्याला कळलं की ये बात कुछ हजम नही हुई.

पाऱ्या - च्यायला हा अव्या पत्ते फिरवतो...
अव्या - अरे पत्ते म्हणजे काय मेरी-गो-राउंड आहे का हवा तसा फिरवायला...
मी - पण सोन्या... च्यायला तुला ग. फ. ला आपणहून शॉपिंगला घेऊन जायची दुर्बुद्धी कशी झाली???
अव्या - अरे जब गीदड की मौत आती है तब वो शहर की तरफ भागता है...
मी - ह्या म्हणीचा त्याचा इथे काय संबंध अरे...
अव्या - काही नाही, अशीच आठवली म्हणून सांगितली.
रवी - संबंध आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्याला मराठीत...
अव्या - म्हणजे चुकीची गणितं सोडवून हा जोश्या जसा मास्तरांना स्वतःहून वही तपासायला द्यायचा तसं का???
मी - च्यायला आज सोन्यावर राज्य आहे. माझ्यावर घसरू नका. हा इतिहास नंतर उगाळा...
सोन्या - त्याचं झालं असं की अरे... तुला आठवतं का मी पाऱ्याची बाइक घेऊन गेलो होतो मागच्या आठवड्यात? ते हिलाच भेटायला. मी सिनेमॅक्स पाशी तासभर उभा यार. ही आलीच नाही. शेवटी कंटाळून मी कट्ट्यावर परत आलो. तर नंतर हिच माझ्यावर चिडली. म्हणे तास भर थांबलास तर वारूळ जमलं का तुझ्या भोवती. भांड भांड भांडली. म्हणून मग तिची समजूत काढावी म्हणून तिला घेऊन गेलो शॉपिंगला.
रवी - अरे पण रागाचं कारण आणि शॉपिंग ह्या वेग-वेगळ्या गोष्टी आहेत. ड्रेस घेतल्याने राग कसा शांत होईल कुणाचा? रोज अनशा पोटी, सोवळ्याने हनुमान चालीसा वाचली तर मी पंतप्रधान होईन का?
सोन्या - अरे यार हे असंच असतं. सगळ्या प्रॉब्लेम्सचं उत्तर शॉपिंग असतं हा मला प्रेमात पडल्यावर झालेला साक्षात्कार आहे.

आता सोन्या अजून चावणार हे ध्यानात आल्याने आम्ही विषय बदलाला. सोन्या निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेल्यावर सगळा पसारा तसाच टाकून आम्ही कट्ट्यावर पळालो.



क्रमशः

कट्टेबाज

| Labels: | Posted On 11/7/08 at 5:04 PM

ओळख




चहाबाज, दारूबाज, सट्टेबाज असतात तसे आम्ही कट्टेबाज आहोत. तसे आम्ही चहाबाज आणि दारूबाजही आहोत. नि सद्ध्या शेअर मार्केट मध्ये सट्टाही चाललाय. तर, असे आम्ही सर्वगुणसंपन्न कट्टेकर आमच्या सर्वगुणसंपन्न कट्ट्यावर भेटतो. कट्टा सर्वगुणसंपन्न आहे म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तू कट्ट्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. चहा-विडी कट्ट्यावरच मिळते, वडापाव, चायनीजच्या गाड्या नि सायबर कॅफे समोरच आहे, मागे नाट्यगृह आणि लायब्ररी असल्याने २४X७ प्रेक्षणीय स्थळं आहेत, बाइक्स लावायला जागा आहे, समोरच फळांपासून कोंबडी पर्यंत सगळं मिळणारा बाजार आहे, तसंच, इथून स्टेशन चालत फक्त ५ मिनिटांवर आहे. अजून काय पाहिजे? म्हणजेच आमचा कट्टा घरासाठीची आयडीयल लोकेशन आहे. आणि इथे आम्ही राहतोही घरच्यासारखेच. घर दुसरीकडे पण राहतो कट्ट्यावर अशी परिस्थिती आहे.

कुठलाही कट्टा ही केवळ एक जागा नसून ती एक संस्था असते. तसंच ती पिढ्या न् पिढ्या चालत आलेली संस्क्रुतीही असते. इथे भांडणं सोडवली जातात, प्रकरणं जुळवली जातात, सल्ले मिळतात, गुद्देही मिळतात. वेगवेगळी भन्नाट व्यक्तीमत्व नि:स्वार्थी पणे केवळ कट्ट्यावरच एकत्र येतात. ह्या कट्ट्याबद्दल आम्हा सगळ्यांच्या मनात अपरंपार माया, प्रेम, लोभ इत्यादी आहे. ह्याचं पहिलं कारण म्हणजे ह्या कट्ट्यावर आम्ही मित्र एकमेकांना भेटलो. कुठेही जाता-येताना मध्ये एक स्टॉप कट्ट्यावर ठरलेला. कट्टा म्हणजे नुसती चहा प्यायची जागा न राहता निरोपांची देवाण घेवाण करण्याचं ठिकाण, आमचे जीवन विषयक अचाट तत्त्वज्ञान पाजळण्याची हक्काची जागा, कंटाळा आल्यास हमखास मित्र भेटण्याचे ठिकाण, सध्या कोण कुणासोबत आहे / कुठे कोण नवीन आलंय ही माहिती मिळण्याची जागा, प्रॉब्लेम्स डिस्कस करण्याची कॉंफरंस रूम, इत्यादी बनलाय. बाबांनी घरातून पुढे-मागे हाकललंच तर किमान डोक्यावर छप्पर आणि पाठ टेकायला बाकडी असतील हा आधारही कट्ट्यानेच दिला. कुणीही हाकलणार नाही अशी हक्काची जागा असावी हे ध्रुव बाळाने आणि आम्ही पाहिलेलं स्वप्न कट्ट्याने पूर्ण केलंय.

आता कट्टा प्रिय असण्याचे दुसरं कारण म्हणजे हा कट्टा आमच्या समोर बनलाय. माझे इतर सगळे कट्टे - के. सी. कॉलेज जवळचा चहावाला, सेंट्रल सिनेमाच्या समोरचा इराणी, कुलाब्यातला अश्रफ पानवाला, कॉलेज जवळचा धाबा, शिवाजी पार्कजवळचा इराणी, पार्ल्यातल्या हनुमान रोड वरचा चहावाला, आणि अजून बरेच, हे सगळे कट्टे आधी पासून होते. मी नंतर तिथे जाऊ लागलो. पण आमचा सद्ध्याचा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचा कट्टा हा अक्षरशः आमच्या डोळ्यादेखत उभा राहिलाय.

पूर्वी इथे एक मोकळं मैदान होतं आणि शेजारी उल्टी-पाल्टी ची शाळा. मैदानाच्या कडेने काही झाडं, तुरळक झोपड्या आणि चार-दोन खाऊच्या गाड्या होत्या. एका कोपऱ्यात डुकरं उकिरडा फुंकत असायची (हे बदललं नहिये अजून). मध्यभागी मैदानात ८-१० टीम्स वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळत असायच्या. एकाने दुसऱ्याचा बॉल अडवणे / कॅच पकडणे इत्यादी प्रकार प्रचंड चालायचे. आणि ह्या सगळ्याच्या मधोमध आजूबाजूच्या सोसायट्यांमधली कार्टी पतंग उडवायची.

एके दिवशी न्यूज आली की आता आपलं हे मैदान जाणार आणि ह्या जागी एक भव्य नाट्यसंकूल उभं राहणार. लवकरच मैदानाला कुंपण घालून आत खोदकाम नि बांधकाम सुरू झालं. नि बघता बघता हे भव्य-दिव्य नाट्यसंकूल उभं राहिलं. ह्या नाट्यसंकूलाच्या दोन्ही गेट्सच्या बाजूला दोन झुणकाभाकर केंद्रं आली. त्यातलंच एक म्हणजे आमचा कट्टा.

जसे इतर कट्ट्यावर ग्रुप जमतात तसाच आमचाही ग्रुप जमला. सदैव पडीक असणारे काही लोकं ओळखीचे झाले नि कट्ट्यावर रंगत वाढू लागली. एकाच तबेल्यात जसे वेगवेगळ्या रंगाचे नि स्वभावाचे घोडे असतात, तसेच आम्हीही आहोत. सगळ्याची एक झक्कास मिसळ तयार झाली आहे. गुढग्यात मेंदू असलेला अव्या, अभ्यासू रवी, सदैव प्रेमात पडणारा पाऱ्या, बाबांसोबत दुकानात बसणारा आर. जे., चहावाला बाबू, पानवाला मधू, नाट्यगृहात काम करणारा नि तंबोरा वाजवायचं वेड असणारा मारी, पैलवान सोन्या आणि मी, ही आमची नेहमीची जनता. इथे आम्ही बसल्या बसल्या काय करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. इथे आम्ही बसल्या बसल्या रोज नव नवे शोध लावतो, आपल्या नवीन थिअरीज बनवतो, बातम्यांची देवाण घेवाण करतो. थोडक्यात, एकमेकांची आयुष्य समृद्ध बनवतो.

गडकऱ्यांनी महाराष्ट्राला 'दगडांच्या देशा' असं संबोधायचं कारण आपले राजकारणी आहेत हा अमूल्य शोध अव्याने इथेच लावला. नवीन कुठलीही वस्तू, टेक्नॉलॉजी अथवा औषध कुणी शोधलं की 'हे वेदांमध्ये आधीच सांगितलं आहे' हे आमच्या गळ्यात उतरवण्याचा रवीचा प्रयत्न असतो. आठवड्याच्या दिवशी दुपारचे शो फुकटात बघण्याची सोय मारी करतो. सायकल पासून ते विमाना पर्यंत आणि पॉकेटमनी पासून ते सब-प्राईम क्रायसीस पर्यंत सगळ्यावर इथे अधिकारवाणीने भाष्य होत असतात. वयस्क लोकांना जवळच्या भाड्यामुळे घेऊन जायला नकार देणाऱ्या उर्मट रिक्षावाल्यांची कानशिलंही सोन्याच्या शुभहस्ते इथेच गरम होतात. तसंच, लग्न झालेले मित्र समोरच्या बाजारात जाताना त्यांची पोरं आमच्या पाळणाघरात सोडून जातात.

कट्ट्यावर आमचा ग्रुप जावई सासरी वावरावा तसा वावरत असतो. तसे सगळेच आजूबाजूच्या परिसरात राहत असल्याने एकमेकांना पाहून होतो. एकत्र येण्यास कारणीभूत ठरला कट्टा. नि त्यानंतर जी धमाल सुरू झाली ती आज पर्यंत सुरू आहे.





क्रमशः