बंड्याची शाळा - धडा दुसरा
| Labels: बंड्याची शाळा | Posted On 3/3/09 at 11:41 PM
बंड्याची शाळा
(धडा दुसरा - शिक्षा)
(धडा दुसरा - शिक्षा)
पाठीवर डस्टर ठेऊन ओणवे उभे राहणे, सरळ हातावर उभ्या पट्टीने आणि उलट्या हातावर आडव्या पट्टीने मार खाणे, बाकावर उभे राहणे, एखादा धडा १० वेळा लिहून काढणे, वर्गातल्या सगळ्या मुलांच्या वॉटर-बॅग्ज भरून आणणे, मैदानाला १० वेळा राउंड मारणे, शिट्टीच्या दोरीने पायावर फटके खाणे, दर तासाला फळा पुसणे ह्या सगळ्या क्षुल्लक शिक्षा सोडल्या तर शाळेत मला सर्वात जास्त घाबरवणारी एकच शिक्षा होती - पहिल्या बाकावर बसणे. पहिला बाक ही आमच्या कंपूतल्या भल्या-भल्यांना वठणीवर आणणारी गोष्ट होती. पहिल्या बाकावर बसणे म्हणजे चिलखत, बंदूक न घेता भारत-पाक सीमारेषेवर उभं राहण्यापेक्षा डेंजर गोष्ट वाटायची. भयाणतेला टरकवण्याची साथ म्हणून पहिला बाक कायम रिकामा असायचा. आरोपीला पहिल्या बाकावर एकट्याने बसवलं जायचं. मॉब मध्ये दंगल करणार्या एखाद्याला एकटा कोठडीत डांबला की तो कसा एकदम गलीतगात्र होतो, तशी अवस्था व्हायची आमची. इथे जो बसला तो सुधारला अशी आमच्या शिक्षकांची श्रद्धा असल्याने पहिले २ बाक रिमांडवरच्या गुन्हेगारांसाठी कायम रिकामे ठेवले जायचे. आणि मग सुधारसत्र सुरू व्हायचं.
ह्यातूनही न सुधारलेल्या आरोपींची रवानगी प्रयोगशाळेत व्हायची. प्रयोगशाळेच्या एका कोपऱ्यात पि. टी. च्या सरांचं टेबल होतं. आरोपीला आत ढकलून दरवाजा बंद केला जायचा. प्रयोगशाळेत मोठे मोठे सापळे, कारच्या बॅटरीज, एका भिंतीवर कुणीतरी भेट दिलेला चाबूक, गॅदरींगसाठी बनवलेले भाले असं सगळं भयानक साहित्य असायचं. आता ह्या सगळ्याचा वापर आपल्यावर होणार ह्या विचाराने भले भले टरकायचे. केवळ पुढे काय होणार ह्या कल्पनेने अनेकांच्या चड्ड्या ओल्या झालेल्या आहेत. असा एखादा सुटून परत कंपूत आला की मग जी वर्णनं रंगायची ती ऐकून आजपासून वर्गात मस्ती बंद, अभ्यासाला सुरूवात असे पण अनेकांनी केलेत. पाळले नाही हे सांगायला नको. आम्ही मस्ती केली नाही तर पि. टी. च्या सरांचा उपयोग काय? का उगाच कुणाच्या पोटावर पाय द्या?
पि.टी.चे सर आधीच दिसायचे भयानक. त्यात मुलांना लगेच मारून सोडण्यात त्यांना इंटरेस्ट नसे. आधी नुसतंच डोळे वटारून पहायचं, मोठ्ठ्याने ओरडायचं, भरपूर घाबरवायचं, मग दोन तीनदा हूल द्यायची आणि आरोपी थोडा रिलॅक्स होतोय असं वाटलं की मग मारायचं. त्यांचा हातही वायुवेगाने चाले. काय झालं हे कळायच्या आतच गाल एकदम गरम व्हायचा, तारे चमकायचे. त्यातून सावतोय तोच पायावर चुरचुरल्यासारखं व्हायचं. पाय चोळायला खाली वाकलं की अचानक पाठ मोडल्यासारखं वाटायचं. आणि हे सगळं जेमतेम ५-१० सेकंदात व्हायचं. मग हे पुढच्याला शिक्षा द्यायला मोकळे.
आमची शाळा दुपारची असल्याने मस्त जेऊन शाळेत जायचो. पहिल्या तासाला प्रार्थना, हजेरी वगरेंमुळे वर्गात जरा गोंधळ असायचा. त्यात पहिली १५-२० मिनीटं जायची. मग १५-२० मिनीटात तास संपायचा. खरा त्रास दुसऱ्या तासापासून सुरू व्हायचा. झोप अनावर झालेली असायची. त्यात मास्तरांचंही दुसऱ्या कुठल्यातरी वर्गावर वॉर्म-अप झालेलं असल्याने ते पूर्ण उत्साहात असायचे. पुढच्या मुलामागे लपून डुलक्या खाताना फार कसरत करावी लागायची. कसं कोण जाणे मास्तरांना कळायचं आणि मग ते तिथूनच खडू फेकून मारायला सुरुवात करायचे.
पण एकदा ह्या झोपेमुळेच मी वाचलोय. गणिताचे सर एका तासाला फळ्यावर लिहीत असताना कुणीतरी त्यांच्या दिशेने एक रॉकेट सोडलं. मास्तर मागे वळून न बघताच "जोश्या.... " असे कडाडले. आणि जेंव्हा वळले मी निष्पापपणे झोपलो असल्याचं त्यांना दिसलं. त्यानंतर मागच्या तीन बाकावरच्या मुलांना आळीपाळीने बोलावून कुणी सोडलं, कुणी सोडलं असं विचारलं. पण मित्रांची नावं मास्तरांना सांगायची नाहीत असा आमचा अलिखीत नियम असल्याने कुणीही उत्तर दिलं नाही. तोवर मला जाग आली होती. मास्तरांनी मग मी सोडून सगळ्यांना बाल्कनीत उभं केलं आणि मनसोक्त कुदवलं. दहा वर्षात तो एकच असा दिवस होता की मी मार खाणार्यांच्यात नव्हतो. मित्रांना मार खाताना पाहून प्रचंड हसू येत होतं, पण कसं बसं स्वतःला आवरलं. नाहितर शाळा सुटल्यावर मास्तरांचा राग माझ्यावर निघाला असता.
सर्वसाधारणपणे वर्गात दंगा करणे, बोलणे आणि गॄहपाठ न करणे ह्या तीन महत्वाच्या कारणांसाठी आम्हाला रिमांड वर घेतले जाई. मास्तर आणि बाई ह्यांच्या शिक्षा करायच्या तर्हा वेगवेगळ्या होत्या. बाई ओरडायच्या, ओणवे उभे करायच्या, फार फार तर पट्टी मारायच्या. मास्तर मात्र एकदम फिजीकल व्हायचे. शोले मधला असरानी जसा कैद्यांना म्हणतो 'तुम्ही सुधारणार नाही ह्याची खात्री असल्यानी मी माझा वेळ फुकट घालवणार नाही' तसंच मास्तरांचं होतं. धर की झोड, धर की झोड. पण ह्यामुळे आम्ही अधिकाधीक निगरगट्ट झालो असं आमचं मत आहे.
इतकं सगळं असलं तरी मास्तरांनी आम्हाला चुकूनही कधी वर्गाबाहेर उभं केलं नाही. कारण वर्गाबाहेर उभं राहणं ही आमच्या दृष्टीने शिक्षा नव्हतीच. ती पाऊण तासाची सुटका होती.
मास्तरांनी हात टेकल्यावर पुढची स्टेप म्हणजे घरच्यांना शाळेत बोलावणे. आपले बाबा शाळेत येणार ह्यापेक्षा ते येऊन गेल्यावर घरी आपलं काय होणार ह्या विचारानेच घाम फुटायचा. आतापर्यंत बाबांनी केलेल्या शिक्षा आठवून आठवून फार फार तर अमुक अमुक होईल अशी मनाची तयारी करायचो, पण बाबाही जोशीच असल्याने ते दर वेळी नवी आयडीया काढायचे. सर्वात कॄर प्रकार म्हणजे संध्याकाळी बाल्कनीत उभं करणे. जग खाली खेळत असताना आपण बाल्कनीत उभं राहून त्यांना बघणं ह्या सारखी शिक्षा जगात दुसरी नसेल. त्यात शिक्षा म्हणून उभा आहे हे कळल्यावर मित्रांनाही चेव चढायचा. यथेच्छ चिडवून घ्यायचे. दर वेळी टीम पाडताना 'तुझं नाव घेऊ का रे? ' असं विचारायचे, कधी स्कोर मोज म्हणायचे. लय त्रास.
अशीच एक इन्होवेटीव्ह शिक्षा मला वार्षीक परीक्षेत कमी मार्क मिळाल्यावर झाली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो तेंव्हा जाताना बाबांनी पुढल्या वर्षीची पुस्तकं सोबत घ्यायला लावली. रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक धडा वाचायचा.
असो. ते दिवस गेले, त्या शिक्षाही गेल्या. इब्लीसपणा कमी झाला नाहिये, पण वयाने वाढल्याने पूर्वी सारख्या शिक्षा आता होत नाहीत. वैतागून मध्ये एकदा बाबा मला म्हणाले 'तुझं कार्ट तुझ्यासारखं होईल तेंव्हा कळेल तुला' (तसं ते होणारच! आडातलंच पोहोऱ्यात येणार! ) हे ऐकून मात्र माझी पाचावर धारण बसली. शाळेतल्या मोठ्या मोठ्या शिक्षा हसत हसत भोगल्या, पण ही शिक्षा मात्र झेपणार नाही.
lay mhanaje lay bhari. aani kharech first bench chi shiksha saglyat bhayanak vatayachi.vatayach aapan kharech sudharu ki kaay? pan arthat tase naahi zale. dahavich sampoorn varsh mi aani mazya best friend ni middle row,first bench var basoon khadhalay. tevha pasoon first bench chi bhiti kayamchi geli.
pan jam sahi lihita haan tumhi. U r just gre8!!!
मास्तर मागे वळून.जोश्या....हा सागळ्यात भारी विनोद होता..
खूप छान लिहितोस. तुझ्यात आहे मित्रा.
chabuk... lai bhari
धन्यवाद मित्रहो :-)
आवडलीय ही पोस्ट!
आज फुरसत असल्यानी ब्लॉग चा मनमुराद आनंद घेत आहे. अप्रतिम आदित्य! आधी प्रत्येक साहित्यावर वेग वेगळा अभिप्राय द्यायला सुरूवात केली पण सर्वच इतके सुंदर आहे की आता सर्वांवर एकाच वेळी बोलावे असे ठरवून ते लिहिले आहे. खूपच सुंदर. लाजबाब! किप इट अप!
सगळाच मस्त...
पण हे तर खतरनाक... "पण बाबाही जोशीच असल्याने ते दर वेळी नवी आयडीया काढायचे." लय भारी...
Aditya,,
Ek numbewr lihila ahes.. kharach shaletle sagle divas aathavle.. :)