बोळे

| Labels: | Posted On 10/25/09 at 8:28 PM

माणूस म्हटलं की बोळे आले. बोळे आले की पाणी तुंबणं आलं. अडकलेल्या बोळ्यामुळे अलीकडच्या बाजूला जरी सगळं कोरडं ठणठणीत, स्वच्छ, उत्तम, सुरळीत दिसत असलं तरी पलीकडच्या बाजूला तुंबलेल्या पाण्यावर वॅट ६९ च्या बाटली प्रमाणे गारेगार हिरवंकंच शेवाळं जमलेलं असतं हे बर्‍याच जणांना कळत नाही. दिसत नाही. बहुतेक जणांना असा एखादा बोळा आपल्यालाच तुंबवतोय हेच माहिती नसतं. किंबहुना, असा एखादा बोळा आपल्या आत सुखाने नांदतोय आणि शेवाळं जमवतोय हे त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. त्यामुळे हा बोळा काढून पाणी वाहते करायचे असेल तर त्यासाठी आधी बोळा कुठला हे शोधून काढणं आवश्यक आहे. ह्या लेखात आम्ही बोळ्यांचे ढोबळ मानाने काही प्रकार आणि ते काढण्यावरील उपाय देत आहोत. स्वतःचे व लोकांचे बोळे काढण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होण्याची बरीच शक्यता आहे. 


मानसिक बोळा - हा बोळा अडकलेल्या लोकांचं मन मुसळधार पावसानंतर उसळणार्‍या झर्‍याप्रमाणे असतं. म्हणजे आनंदी, उत्साही नव्हे, तर वेडं-वाकडं धावणारं. ह्यांचं मन कुणाचं ऐकत नाही. अगदी ह्यांचंही नाही. मन एकीकडे आणि चित्त एकीकडे अशी अवस्था होऊन बसते. मनावर कंट्रोल राहत नाही. मनाला प्रश्न पडू लागतात. मन विचार करू लागतं. पण हे सगळं ह्यांच्या अपरोक्ष. मग हळू हळू अशा मनाची भीती वाटू लागते. मन कधी कुठला विचार करील हे माहिती नसल्याने मनाला वार्‍यावर सोडलं जातं. मन मनास उमगत नाही अशी परिस्थिती उद्भवते. मन आणि हे स्वतः अशा दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती एकाच शरीरात नांदू लागता. मग सुरू होतो मनाशी झगडा. स्वत:च्या मनाला प्रश्न विचारणं. त्यात बर्‍याचदा मनाची सरशी होते. ही लोकं कधीही एक व्यक्ती म्हणून वावरत नाहीत. आतला मी, बाहेरचा मी, आतल्या-बाहेरच्या मधला मी, ऑफिसातला मी, घरातला मी, गुत्त्यावरचा मी असे वेगवेगळे 'मी' ह्यांच्यात असतात. प्रत्येक 'मी'चं मनही वेगळं असतं आणि ते स्वतंत्र विचार करतं. बरीच वर्ष हा बोळा अडकून राहिला की मग अशा दुभंगलेल्या वागण्याची पुढची पायरी येते. मी नाही माझं मन म्हणतं इथून सुरुवात होते. मनाचा वेगळा विचार केला जातो, ऐकला जातो. पुढे सगळे अवयव स्वतःला हवं तसं वागू लागतात. मी लिहीत नाही, माझा हात लिहितो. मी चालत नाही, मनाची हाक ऐकून पायच चालू लागतात अशा भयाण अवस्थेपर्यंत हा बोळा नेऊ शकतो. 'रे पोटा तुला भूक लागली तर गुरगुरून मला का त्रास देतोस? हात आणि तोंडाला सांगून तुझी काय ती व्यवस्था लाव' अशी आज्ञा मन देतं. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ते तुझ्या आणि फक्त तुझ्याच मनाचे खेळ आहेत'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग मन आणि चित्त ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि मानसिक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


वैचारिक बोळा - हा सर्वात भयानक बोळा. ह्या माणसांना आंतरजालीय मराठीत 'उच्चभॄ' म्हटले जाते. हा बोळा ज्याच्यात अडकला तो माणूस म्हणून जगणं बंद करून वैचारिक पातळीवर जगू लागतो. अशा लोकांना शरीर म्हणजे अडचण वाटू लागते. शरीर हा विचारांना जखडून ठेवणार पिंजरा वाटू लागतो. बिर्याणी चापणे ह्या क्रियेला शरीराचे भोग असं म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीत विचार, त्या गोष्टीच्या आधीचा-मागचा विचार सुरू होतो. त्यामुळे होतं काय की कृती करणं बंद पडतं. एखादी गोष्ट करण्याचा विचार करण्यापुढे ह्यांची गाडी जातच नाही. विचार संपले की माणूस संपला, विचारमग्न मन म्हणजे म्हणजे जिवंतपणाची खूण, अशी वाक्य फेकली जातात. अती विचाराने ह्यांना नको नको ते भ्रम होऊ लागतात. शब्दांमधले शब्द दिसू लागतात. सूर्याला 'रवी' हे नाव दिलं कारण सूर्योदयाबरोबर पृथ्वीवर पोचणारा त्याचा प्रकाश चराचर घुसळून काढतो अशा कल्पना सुचू लागतात. ही लोकं सर्वसाधारणपणे कायम अगम्य बडबडतात आणि उर्वरित जगाला निर्बुद्ध समजतात. मुख्यतः आपलं बोलणं कुणाला समजू नये ह्या पातळीवर ते नेऊन ठेवतात. आपले विचार हे काळाच्या पुढे असून ते समजण्यासाठी लागणारी विचारांची प्रगल्भता आपल्याकडेच आहे ह्या विचारावर ते विचारपूर्वक शिक्कामोर्तब करतात. हा बोळा अडकलेल्या व्यक्ती कायम अस्वस्थ असतात. सतत तगमग सुरू असते. ही तगमग आपल्याला दूध देण्यासाठी भैय्याला इतक्या पहाटे उठावं लागतं इथपासून ते जे पाणी रिसायकल करायला निसर्गाला ८ महिने लागतात ते आपण ८ मिनिटाच्या अंघोळीत वाया घालवतो इथपर्यंतही असू शकते. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ते तुझ्या आणि फक्त तुझ्याच विचारांचे खेळ आहेत'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग विचार आणि कृती ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि वैचारिक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


तात्त्विक बोळा - निरर्थक तात्त्विक वाद-विवाद हे ह्या बोळ्याचं वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्टीत वाद घालून आपलं बुद्धीजिवीत्व सिद्ध करण्याकडे ह्यांचा कल असतो. 'पण मला काय वाटतं' ह्या शब्दांनी वाक्याची सुरुवात झाली की समजावं हा बोळा अडकलाय.  अशा लोकांपासून शक्यतो चार हात दूर राहावं.  ह्या बोळ्याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी म्हणतोय ते बरोबरच असेल असं नाही असं हे स्वतःच कबूल करतात आणि पुढे 'पण मला असं वाटतं' अशी पुस्ती जोडतात. उद्या ही लोकं शरद पवारांशी राजकारणावर, सचिन तेंडुलकरशी क्रिकेटवर आणि लता मंगेशकरशी गाण्यावर वाद घालायलाही मागे पुढे बघणार नाहीत. हा बोळा अडकलेल्या लोकांमध्ये मानसिक बोळा आणि वैचारिक बोळा ह्या दोघांची लक्षणं विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे ह्याच्या मीमांसेत फार वेळ दवडत नाही.


असंतुष्ट बोळा - हा बोळा तसा ओळखायला सोपा आहे. कुठल्याही गोष्टीत समाधान मिळेनासं झालं की समजावं ह्या बोळ्याने तुंबवलंय. हा बोळा अडकलेल्या व्यक्ती कधीही दिलखुलास पणे हसत नाही. पु. लं. चं 'म्हैस' ऐकतानाही गॅस झाल्याप्रमाणे आंबट्ट चेहरा करून बसतात. तुमचा विनोद होतो पण म्हशीचा जीव जातो असे विचार मनात येत असावेत बहुतेक.  मनमोकळेपणे एखाद्या  गोष्टीचा आनंद  घेणं ह्यांना जमत नाही.  सतत कसल्या ना कसल्या चिंतेत हे असतात. शिवसेना निवडून आली तर प्रादेशिक पक्ष म्हणून नाखूष आणि काँग्रेस आली तर महाराष्ट्राला कोण विचारणार ह्याची चिंता. ह्या चिंतेत आपण मत द्यायला विसरलोय हे विस्मृतींत जातं. ह्यांना 'चिंतातुर जंतू' संबोधता येईल. हा बोळा अडकलेल्या व्यक्ती तशा निरुपद्रवी असल्याने त्यांचा बोळा काढण्याचे कष्ट घेऊ नयेत. चाव्या मारून गंमत बघावी. झालीच तर दोन घटका करमणूकच होईल.


सुधारक बोळा - जे विज्ञानाला माहिती नाही ते अस्तित्वात नाही अशी धारणा असलेल्या व्यक्तींमध्ये हा बोळा आढळून येतो. टिकेचे मुख्य विषय असतात देव-धर्म, भारतीय संस्कृती, पुराणे,  परंपरा आणि सगळ्याच जुन्या गोष्टी. आपली संस्कृती पाच हजार वर्षांची आपलं वय पन्नासही नाही हा सारासार विचारही टिका करताना ह्यांच्या मनात येत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला ह्या चालीवर देव दाखव नाही तर नास्तिक हो असा ह्यांचा आवेश असतो. लोकांच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणताना आपण विज्ञानावर अंधपणे श्रद्धा ठेवत आहोत ह्याचा त्यांना विसर पडतो. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून बघण्याचा ह्यांचा आग्रह असतो. सवय चांगली आहे, पण विज्ञानाचा कक्षा अजून तरी माणसाच्या विचारशक्ती इतक्याच रुंद आहेत हे लक्षात घेतलं जात नाही. रामायण महाभारत कालीन घटनांचे पुरावे नाहीत म्हणून त्या घडल्याच नाहीत असे ठासून सांगितले जाते. राम कृष्णाने स्वतःच्या हस्ताक्षरात सहीसकट जरी आपलं आत्मचरित्र लिहून ठेवलं असतं तरी हे हस्ताक्षर त्यांचेच आहे ह्याला पुरावा नाही म्हणून ते मान्य झालं नसतं. जगात देव नावाची वस्तू अस्तित्वात नाही ह्यांवर हे ठाम असतात. पण 'देवळात शांत का वाटतं - तिथे लोकांची पॉझिटिव्ह एनर्जी असते - मग त्याच पॉझिटिव्ह एनर्जीला मी देव म्हटलं तर काही प्रॉब्लेम आहे का? ' असे वाद विवाद झाले की मात्र ह्यांची गोची होते. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ज्या विज्ञानाला माणूस माकडापासून झाला की असाच भांगेच्या झाडाप्रमाणे उगवला हे अजून नक्की सांगता येत नाही त्याच्या नादी इतका लागू नकोस'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग सारासार विचार आणि विज्ञानावरील अंधश्रद्धा ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि सुधारक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


भारतीय बोळा - लोकमान्य टिळक, सावरकर, भगतसींग ह्यांच्या नंतर आम्हीच अशा भ्रमात ह्या व्यक्ती असतात. जे जे भारतीय ते ते सगळंच उत्तम अशी ह्यांची ठाम समजूत असते. येत्या दहा पाच वर्षात भारतच जागतिक महासत्ता होणार असा दावा दर दहा पाच वर्षानंतर केला जातो. आधीचा दावा फुटल्यावर 'अरे विचारतोय कोण जगाला? गरज नाही आम्हाला जगाची' अशा वल्गना केल्या जातात. भारत सोडून परदेशात गेलेल्या लोकांवर पळपुटे म्हणून टिका करताना परदेशातून येणार्‍या मित्राला 'जॅक डॅनियल्स आण रे' सांगायला हे विसरत नाहीत. आपण घालत असलेली पँट, आपला मोबाईल फोन ते काँप्यूटर ह्यातल्या कुठल्याही गोष्टीचा शोध भारतात लागला नाही ह्याचा विसर ह्यांना पडतो. 'अरे आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला म्हणून तर तुमच्या काँप्यूटरची ०१०१० ची भाषा तरी जन्मली आणि काँप्यूटर अस्तित्वात आला' अशा वल्गना केल्या जातात. प्रत्येक भारतीय गोष्टीचा जाज्वल्य अभिमान ह्या व्यक्तींना असतो. धारावीतून जाताना नाक झाकण्याऐवजी 'आहे असा वास तुमच्या अमेरिकेत? ' असा प्रश्न केला जातो. पान खाऊन पचापच थुंकताना 'परदेशातली स्वच्छता म्हणजे कुठेही थुंकण्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला आहे' असा आरोप केला जातो. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि एक कडकडीत पहिल्या धारेची पाजणं. ती घेतल्यावर डोकं भिरभिरून 'गड्या आपली स्कॉचच बरी' ह्यावर त्यांचा पुन्हा विश्वास बसतो. स्कॉचचे २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की नको त्या गोष्टींचा गर्व आणि योग्य त्या गोष्टींचा अभिमान ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि भारतीय बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.

.
आता लास्ट बट नॉट द लिस्ट, एक आंतरजालीय मराठी स्पेशल बोळा
.

प्रतिसाद बोळा - लेखापेक्षा मोठा प्रतिसाद आढळला की समजावं हा बोळा अडकलाय. नुसते मोठे प्रतिसाद देऊन ह्या व्यक्ती थांबत नाहीत, तर लेखातल्या प्रत्येक ओळीचं पोस्ट मार्टेम केलं जातं. नवनवे संदिग्ध अर्थ शोधले जातात. साध्या साध्या ओळींमध्ये ह्यांना दृष्टांत होतात.  लेखकाच्या विचारशक्तीचे पृथक्करण केले जाते आणि त्या लेखकाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवले जाते. 'फुटपाथवरील भिकार्‍याकडे बघून एका सिगारेटचा शेवटचा झुरका घेतला आणि तिच्यावर दुसरी सिगारेट पेटवली' ह्या वाक्याचा अर्थ 'लेखकाला भिकार्‍याला असे सुचवायचे आहे की ह्या सिगारेटच्या शेवटच्या झुरक्याप्रमाणे तुझीही शेवटची घटका जवळ आली आहे. लवकरच काही तरी कर आणि माझ्याप्रमाणे दुसरी सिगारेट शिलगाव अदरवाईज तुझं काही खरं नाही' असा लावला जातो तेव्हा प्रत्यक्ष लेखकही गोंधळात पडतो. तिच्यायला माझ्या लेखांचे मला न कळलेले अर्थ ह्याच्या डोक्यात कुठून येतात म्हणून हैराण होतो. पण दरवेळी ह्या बोळ्याकडून चांगले प्रतिसाद येतीलच असं नाही. कधी कधी टिकाही केली जाते. 'फुटपाथवरील भिकार्‍याकडे बघून एका सिगारेटचा शेवटचा झुरका घेतला आणि तिच्यावर दुसरी सिगारेट पेटवली' ह्या वाक्यावर 'इथे त्या भिकार्‍याला एकवेळच्या जेवणाची भ्रांत आणि तुम्ही मारे त्याच्या समोर एकावर एक सिगारेटी फुंकताय. त्या पैशात त्याच्यासाठी २ वडापाव आले असते. मन मेलं काय तुमचं' असेही प्रतिसाद येऊ शकतात. हा बोळा ओळखण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ही लोकं कधीही एकही नवी ओळ लिहीत नाहीत. लेखांवरच्या प्रतिसादांवर आपलं पांडित्य सिद्ध करण्याकडे ह्यांचा कल असतो. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, इतके मोठे प्रतिसाद देतोस पण स्वतः कधी तरी किमान एका ओळीचा धागा / पोस्ट टाक की रे'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग धागे आणि प्रतिसाद ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि प्रतिसाद बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.


विनम्र सूचना - आमच्या ह्या खटाटोपाला खाजवून खरूज काढण्याचे उद्योग न समजता आम्ही आमच्या परीने केलेला समाजाचं ऋण चुकवायचा एक छोटासा प्रयत्न समजावा ही नम्र विनंती.

क्रॉसवर्ड (अंतिम)

| Labels: | Posted On 9/15/09 at 11:25 AM

रवी कसाबसा त्याच्या रूमवर पोचला. घामाने अक्षरशः निथळत होता. आता उद्या दुपारपर्यंत न थांबता त्याने तडक शिरवाळकरांची भेट घ्यायचे ठरवले आणि लगेच निघून तो शिरवाळकरांच्या बंगल्यावर पोचला. त्याला आलेला बघून दोघांनाही आनंद झाला, पण त्याची अवस्था बघून त्यांना कळलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर शशी शिरवाळकरांची स्टडी होती, त्यांनी तिथेच बसून बोलायचे ठरवले. कुणीही आलं तरी वर न सोडण्याचे आणि कुणाचाही फोन न देण्याचे आदेश नोकरांना देण्यात आले. स्टडीमधे गेल्यावर रवीने त्यांना थोडक्यात गजानन शिरवाळकरांची हकीकत सांगितली, क्रॉसवर्ड दाखवले आणि मानेच्या मृत्यूपर्यंत सगळी कहाणी सविस्तर सांगितली. एक क्षण विचार करून शशी शिरवाळकरांनी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवायचे ठरवले. त्यांच्या पोलिसांत आणि राजकारण्यांत अर्थातच बर्‍याच ओळखी होत्या. पण रवीने त्यांना थांबवले 'आज शेवटचा दिवस आहे आणि मला नाही वाटत तो इथे यायचं धाडस करेल'. रवीचं वाक्य संपतंय न संपतंय तोच धाड् धाड् धाड् गोळ्या झाडण्याचा आवाज आला.

***

शशी शिरवाळकर - बिचारा रवी. दैवाने कुठल्या वळणावर आणून ठेवलंय त्याला. बाबांच्या चुकीमुळे गजानन काकाच्या कुटुंबाची वाताहात झाली. आता तीच चूक तिसर्‍या पिढीलाही भोवते आहे. पण ह्या निमित्ताने का होईना, त्याने माझ्याशी संपर्क साधला. गजानन काकाचा खून झाला नाही हे ऐकून मनावरून मणभराचे ओझे उतरल्यासारखे झाले. एकदा का तो घरी आला की त्याच्या जिवाला धोका नाही. मी आहे समर्थ सगळं बघून घ्यायला. पण इतक्यात यायचं नाही असं का म्हणाला हे मात्र कळलं नाही. घाईघाईत त्याचा नंबरही घेतला नाही. आता कधी भेट होईल देवच जाणे.

विजय शिरवाळकर - गजानन आजोबांचा नातू जिवंत आहे हे कळल्यावर बाबांना किती आनंद झाला. होणारच. मलाही झाला. आमच्या कपाळावरचा कलंक पुसला गेला. आता मी आणि रवी मिळून शिरवाळकर घराण्याची कीर्ती अजूनच वाढवू. आता वाट बघतोय रवीच्या येण्याची. आजोबांच्या पापाचं प्रायश्चित्त घेण्याची ही चांगली संधी आहे.

किलर - अरे असा कसा निसटला. साल्यांनो भांग पिऊन गेला होतात का पाठलागावर? एका माणसावर लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला? आणि दुसरा कोण होता त्याच्या सोबत? आत्ताच्या आत्ता निघा आणि पत्ता लावल्या शिवाय परत येऊ नका. सालं, नरसोबाला अभिषेकाची संधी अशी चालून येईल वाटलं नव्हतं. काही दिवसापूर्वी त्या रवीला स्वप्नातही वाटलं नसेल की कुणीतरी लवकरच त्याच्या जिवावर उठेल. मला तरी कुठे कल्पना होती की तो जिवंत आहे. एके दिवशी फोन आला आणि त्याची सुपारी देण्यात आली. की मला माझं ऋण चुकवायची संधी मिळणार आणि वर त्याचे पैसेही मिळणार. व्वा... देव भलं करो त्याचं.

***

रविवारी सगळ्या वर्तमानपत्रांत एकच बातमी होती:
"प्रसिद्ध व्यावसायिक, कारखानदार शशी शिरवाळकर आणि त्यांच्या मुलाची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या. शशी शिरवाळकरांचा पुतण्या जबर जखमी. खुन्याचा मृतदेहही तिथेच सापडला".

""काल रात्री शिरवाळचे प्रसिद्ध कारखानदार आणि समाजसेवक श्री. शशी शिरवाळकर आणि त्यांचे सुपुत्र श्री. विजय शिरवाळकर ह्यांची त्यांच्या बंगल्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी तिथे हजर असलेला त्यांचा पुतण्या रवी शिरवाळकर जबर जखमी झाला. शिरवाळकरांवर गोळ्या झाडणारा इसमही तिथेच मृतावस्थेत पोलिसांना आढळला. पूर्व-वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्री साधारण १२:३०-१ च्या सुमारास शिरवाळकरांच्या रूम मधून गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यावर सगळे नोकर तिकडे धावले. दार आतून बंद असल्याने काही करता आले नाही. एका नोकराने लगोलग पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस आल्यावर त्यांनी दार तोडून आत प्रवेश मिळवला, तेव्हा त्यांना हे धक्कादायक दृश्य दिसले. रवी शिरवाळकर ह्यांना तातडीने इस्पितळात हलवल्याने त्यांचा जीव वाचला असे सूत्रांचे म्हणणे आहे. रवी शिरवाळकरांच्या शरीरातून एकूण २ गोळ्या काढण्यात आल्या. मा. आमदार श्री. सदानंद मोहिते ह्यांनी प्रकरणाची कसून चौकशी करायचे आदेश पोलिस दलास दिले आहेत.""

***

इन्स्पेक्टर अमर - फोन आला तेव्हा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. शिरवाळकरांसारख्या देव माणसाची कुणी हत्या करेल स्वप्नातही आले नव्हते. आयुष्यभर लोकांसाठी काम करणार्‍या माणसाचा कोणी शत्रू कसा असू शकतो? रवीच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवरून ह्या प्रकरणाचा उलगडा झाला. तीन पिढ्यांनंतरही हे वैर चालू ठेवण्याची काय गरज होती. घेतलेले पैसे सव्याज परत देऊन प्रकरण मिटवता नसतं का आलं? म्हणे देवाचा कोप झाला. अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवल्याने एका देव माणसाला मात्र हकनाक जिवाला मुकावं लागलं. ह्या सगळ्या प्रकरणात त्या मानेला मात्र विनाकारण जीव गमवायला लागला. तसंही अशा माणसांचा शेवट असाच होणार म्हणा. आयुष्यभर अंडरवर्ल्डसाठी काम केलं ह्या माणसाने. आत्ताच काय गरज होती रवीच्या मदतीला धावायची? त्याचा ड्रायव्हर पण हेच म्हणाला. फुकट जीव गमावला त्याने. किती जणांचे पैसे घेऊन बसला होता देव जाणे. त्या बिचार्‍या रवीला पण कसलं अडकवलं होतं त्या रामोश्याने. चिठ्ठी, क्रॉसवर्ड, पाळतीवर माणसं... दुसरा कुणी असता तर भीतीने हार्ट अटॅकच आला असता. नशिबानेच वाचला तो. शुद्धीवर आल्यावर त्याला विचारलं पाहिजे तिथे नक्की काय झालं? बिचारा, इतक्या वर्षानंतर काकांना भेटला आणि हे असं घडलं. जाऊन सांत्वन करायला हवं.

***

दुसर्‍या दिवशी रवी शुद्धीवर आला. नशिबाने गोळ्या जिव्हारी लागल्या नव्हत्या. एक हाताला आणि एक पायाला. रक्तस्त्राव खूप झाला. थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर रवी खडखडीत बरा झाला. शिरवाळकर घराण्याचा एकमेव वारस म्हणून लोकांच्या त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण रवीला हा सगळा ताण असह्य झाला होता. बरा झाल्यावर त्याने शिरवाळकरांची शेती, फॅक्टरी इत्यादी सगळी इस्टेट विकून टाकली. राहता बंगला मात्र पूर्वजांची आठवण म्हणून ठेवला. आणि काकाने गजानन आजोबांच्या नावाने सुरू केलेला दवाखान्यासोबतच, गावात एक नवीन शाळाही काढली काकाच्या स्मॄती प्रित्यर्थ.

***

रवी शिरवाळकर - सुटलो एकदाचा. मला वाटलं ह्यातून सही सलामत निघतोय की नाही. च्यायला ह्या मानेच्या. साला फारच सीरियसली मदत करायला गेला. म्हणे ह्या सगळ्याच्या मागे वेगळंच कुणीतरी आहे. कुणी सांगितलं होतं नको तिथे नाक खुपसायला. मला त्याला फक्त साक्षीदार म्हणून वापरायचा होता. बेट्याची चांगलीच ओळख होती पोलिसांत. रहस्याच्या नको इतका जवळ पोचला आणि संपला. नशीब त्यावेळी त्याचा ड्रायव्हर कम बॉडीगार्ड राजा सोबत नव्हता.

सालं, भिकार्‍यासारखं जगून जगून कंटाळा आला होता. ठरवलं जे माझं आहे ते मिळवायचंच. बाबांनी गजानन आजोबा आणि श्रीधर आजोबांची गोष्ट सांगितली होतीच. त्याची उत्तरकथा लिहिली आणि वापरली. काँट्रॅक्ट किलर पकडला एक, नी रचला सगळा बनाव. सालं, स्वतःच्याच घरी चोरी करवण्यापासून ते स्वतःला गोळ्या मारून घेण्यापर्यंत सगळं कसं प्लॅन प्रमाणे सुरळीत पार पडलं. जागोजागी मला फसवल्याचे पुरावे पण सोडले. काकाचंच अकाउंट हॅक करून पैसे काढले ह्या प्लॅनसाठी. शेवटच्या दिवशी बोलावलं त्या किलरला काकाच्या घरी. त्याला वाटलं पैसे देतोय. आधी त्याच्या गनने काकाला नि मुलाला उडवला आणि मग माझ्या गनने त्या किलरला.

पूर्ण भरलेले क्रॉसवर्ड रवीने डस्टबीन मधे भिरकावले. चौथा शब्द होता "परतफेड"...


समाप्त

क्रॉसवर्ड ३

| Labels: | Posted On 9/14/09 at 12:37 AM

स्टेशनवर रवीशिवाय दुसरे कुणीच नव्हते. नाही म्हणायला एक भिकारी बाकाखाली झोपला होता. आणि दूर कुठे तरी गस्तीच्या पोलिसाने काठी आपटल्याचा आवाज येत होता. जसजशी गाडी जवळ येत होती तसतशी रवीच्या हृदयातील धडधड वाढत होती. रवीने पँटच्या खिशात हात घातला. सेफ्टीसाठी तो एक छोटासा बटन नाईफ कायम सोबत ठेवत असे. तो हाताला लागल्यावर त्याला जरा धीर आल्यासारखं झालं. तितक्यात इथून सुटणार्‍या गाडीने जोरात शिट्टी वाजवली. रवी बरोब्बर घड्याळाच्या खाली उभा होता. गाडी येऊन थांबली, काही तुरळक प्रवासी उतरले, पांगापांग झाली. गाडी गार्डात निघाली. काहीही घडलं नाही. तिथून सुटणार्‍या गाडीने पुन्हा एकदा शिट्टी वाजवली आणि गाडी हलली. गाडी हळूहळू पुढे जात असतानाच त्याचं लक्ष समोरच्या डब्याकडे गेलं. आणि त्यावर काही तरी लिहिलेलं त्याला दिसलं. नुकतंच लिहिलं होतं, कारण रंग ओघळत होता. गाडीसोबत धावत धावत त्याने वाचलं 'मला दिलंत तर वाढवून देईन, घेतलंत तर वाढवून घेईन. जे द्याल ते सुरक्षित ठेवीन'. च्यायला क्लू देण्यासाठी इथे बोलवायची काय गरज होती असा विचार करत असतानाच त्याला अक्षरांच्या बाजूला काहीतरी चिकटवलेलं आढळलं. थोडं पुढे जाऊन पाहिल्यावर लक्षात आलं की ते एक तिकीट होतं. गाडीने वेग वाढवला. रवीने घाईघाईत तिकीट खेचून काढलं आणि गाडीत उडी मारली. तिकीट दादर पर्यंतचं होतं.

गाडीत बसल्या बसल्या रवीने विचार करायला सुरुवात केली. गाडीत चढून आपण चूक तर नाही केली ना. त्याने मानेला फोन लावला. माने कधी पासून त्याला फोन लावायचा प्रयत्न करत होता पण फोन लागत नसल्याने तो तिकडे टेंशनमधे आला होता. 'मी चौकशी केली ह्या माणसाची. प्रोफेशनल किलर आहे. पिढीजात धंदा आहे हा त्याचा. तू प्लॅटफॉर्मवर येणार हे मला माझ्या माणसांकडून कळले होते. आता नीट ऐक. तुझ्या कंपार्टमेंटमधे पुढच्या दरवाज्यावळ त्याची दोन माणसं बसली आहेत. ' 'काय??? ' 'हो, पण टेंशन नको घेऊस. माझा एक हत्यारबंद माणूस काल पासूनच तुझ्या पाळतीवर मी ठेवला होता, कदाचित तू नोटीस केलं नसशील पण तू उभा होतास त्याच्या जरा पुढेच एका बाकाखाली तो भिकार्‍याच्या वेषात पडून होता. तो ही चढलाय डब्यात आणि पुढून चौथ्या बाकावर झोपलाय. टेंशन घेऊ नकोस. मला अंदाज आलाय पुढे काय होणार ह्याचा. मी आत्ता मुंबई सेंट्रलला आहे. तुला दादरला भेटतो. मी आल्याशिवाय गाडीतून उतरू नकोस. '

पुढचा तासभर रवी ठोकळ्यासारखा बसून होता. दरवाज्याजवळ जाऊन अथवा वाकून बघायचंही धैर्य त्याला झालं नाही. दादरला गाडी प्लॅटफॉर्ममधे शिरताच माने उडी मारून गाडीत चढला आणि क्षणार्धातच रवीला सोबत घेऊन चालत्या गाडीतून उतरला. स्टेशनबाहेर मानेची कार उभी होती. त्यात दोघे बसले.

- दुसरा क्लू सापडला?

- हो, गाडीच्या डब्यावर लिहिलं होतं 'मला दिलंत तर वाढवून देईन, घेतलंत तर वाढवून घेईन. जे द्याल ते सुरक्षित ठेवीन'

- ह्म्म्म्म... काय असू शकेल?

- कल्पना नाही...

- बरं, तू कर विचार. आता आज पासून आपल्याकडे चारच दिवस आहेत. शिरवाळकरांचा नंबर शोधलास का तू?
- नाही, वेळच मिळाला नाही.

- बरं, मी पण शोधतो. आता तू इथे उतर, आपला काँटॅक्ट आहे हे कुणालाही कळता कामा नये.

- हो

- तुझं कोणी जवळचं नातेवाईक आहे का?

- नाही का?

- गर्लफ्रेंड वगैरे?

- नही हो...

- गुड. नाही तर हा माणूस शेवटचा उपाय म्हणून त्यांचं अपहरण करायची शक्यता होती. असो. टच मधे राहा आणि कुठलंही पाऊल उचलायच्या आधी मला सांग...

- सापडलं...

- काय?

- दुसरा शब्द सापडला...

- काय, लवकर सांग...

- 'मला दिलंत तर वाढवून देईन, घेतलंत तर वाढवून घेईन' ह्याचा अर्थ बँक...

- म्हणजे???

- पैसे ठेवले तर वाढतील, घेतले तर व्याजासकट जास्त परत द्यावे लागतील...

- आणि 'जे द्याल ते सुरक्षित ठेवीन' म्हणजे काय?

- कदाचित लॉकर. जे द्याल ते सुरक्षित ठेवीन म्हणजे लॉकरच.

- शाब्बास... पण मुंबईत शेकडो बँका आहेत, नक्की कुठली...

- ज्या डब्यावर हे लिहिलं होतं तो अख्खा डबा फॉर्चून मेकर बँकेच्या जाहिरातींनी रंगवला होता. नक्कीच ही फॉर्चून मेकर बँक आहे, दुसरा शब्दही ६ अक्षरीच आहे... मी जातो बँकेत आत्ता...

- बरं, काही कळलं तर लगेच माझ्याशी काँटॅक्ट कर...

- नक्कीच...

- राजा गाडी थांबव...

दोघांचं बोलणं होईस्तोवर गाडी शिवाजी पार्कला फेर्‍या मारत होती. एका गल्लीत राजाने गाडी थांबवली. रवीने उतरण्याआधी आजूबाजूला बघितलं. गल्ली सुनसान होती. रवीला सोडून माने निघून गेला. चालत चालत रवी विचार करत होता 'ह्या कुठल्या लफड्यात अडकलो यार. ह्या गाढवाने क्रॉसवर्ड असं काय बनवलंय. १ उभा १ आडवा ऐवजी, १ उभा २ आडवा ३ उभा ४ आडवा. १ उभा प्लॅटफॉर्म, २ आडवा फॉर्चून मेकर. पुढचे शब्द कधी सापडणार, आणि मी कधी सुटणार ह्यातून? शिरवाळकरांशी काँटॅक्ट करायला हवा. पण त्यांनी ओळख नाही दाखवली तर? आणि त्या आधीच ४ दिवस संपले तर? शी:...

आत्ता कुठे ६ वाजत होते. बँक उघडायला अजून २ तास होते. तोवर रवीने शिरवाळकरांचा फोन नंबर शोधायचं ठरवलं. नशिबाने जवळच एक २४ तास सुरू असणारं कॉफी शॉप होतं.

***

शेवटी एकदाचा नंबर मिळाला.

- हॅलो... शशी शिरवाळकर आहेत का?

- मी त्यांचा मुलगा बोलतोय, विजय... आपण कोण?

- मी... मी... रवी शिरवाळकर, गजानन शिरवाळकरांचा नातू...

- काय??? गजानन आजोबांना नातू होणं कसा शक्य आहे? त्यांचा बायकोमुलासकट खून करण्यात आला होता...

- काका, माझ्यावर विश्वास ठेवा... मी खरंच तुमच्या चुलत भावाचा, निरंजन शिरवाळकरांचा मुलगा आहे. रवी शिरवाळकर...

- अरे पण तू बोलतोयस कुठून??? बाबा... बाबा...

- कोण बोलतंय?

- मी गजानन शिरवाळकरांचा नातू रवी शिरवाळकर

- काय??? कुठून बोलतोयस तू???

- मुंबईतून...

- पण हे कसं शक्य आहे???

- माझ्यावर विश्वास ठेवा काका...

- इतकी वर्ष कुठे होतास?

- सांगतो काका... पण मला अजून महत्त्वाचं काही तरी बोलायचंय...

- तू आत्ताच्या आत्ता इथे निघून ये... मी मुंबईतल्या आपल्या मॅनेजरला सांगतो, तो सगळी व्यवस्था करेल...

- नाही काका, आपला संपर्क झालाय हे सद्ध्या तरी कुणालाही कळता कामा नये... मी लवकरच तुम्हाला भेटीन...

- अरे झालंय तरी काय? इतका टेंशन मधे का वाटतोयस? नीट सांगशील का???

- सांगतो...

***

८:१५ झाले तसे रवी बिल देऊन बाहेर पडला. बँक उघडली होती. रवी सरळ आत शिरला. लॉकर विभागाची चौकशी केली. एक माणूस रवीला स्ट्राँग रूम कडे घेऊन गेला. वळला. दरवाज्यापाशीच एक इलेक्ट्रॉनिक लॉक होते. त्यावर एक कोड टाकायचा होता. रवीने क्षणभर विचार केला, दीर्घ श्वास घेतला आणि कोड दाबला ०३१०. code accepted असा मेसेज आला आणि स्ट्राँगरूमचे दार उघडले. आत बसलेल्या माणसाने काही न बोलता रवीला एक चावी दिले आणि स्वतः रूमच्या बाहेर गेला. चावीवर नंबर होता १००४. रवीने लॉकर उघडला. आत मधे केवळ प्लॅस्टिकचे एन्व्हलप आणि एक गन होती. रवीने शांतपणे एन्व्हलप खिशात टाकले, गन पँटमधे मागच्या बाजूला खोचली आणि बाहेर पडला. बाहेरच्या फुटपाथवर मगाशी प्लॅटफॉर्मवर झोपलेला भिकारी भीक मागत होता. रवी त्याच्याकडे बघून हसला आणि काही सुट्टे पैसे त्याच्या भांड्यात टाकले. रवीने मानेला फोन लावला...

- माने लॉकर मिळाला...

- गुड...

- आत एक एन्व्हलप आणि गन सापडली...

- काय? एन्व्हलप मधे काय आहे?

- उघडलं नाही अजून... दुसरं म्हणजे शशी शिरवाळकरांशी संपर्क झालाय...

- अरे वा...

- त्यांनी लगेच भेटायला बोलावलंय... मी इतक्यात नाही असं सांगितलं...

- गुड... पण आपणच लगेच शिरवाळला निघायला हवं... मी तुला १० मिनिटात सोडलं तिथून उचलतो...

- ओके...

चालता चालता रवीने एन्व्हलप उघडले. आत एक पासबुक होते. ते उघडताच रवी जागच्या जागी थिजला. पासबुकवर नाव होते 'रवी शिरवा़ळकर'.

***

बाजूला मानेची गाडी येऊन थांबल्याचंही त्याला कळलं नाही. मानेनी जवळ जवळ ओढूनच त्याला आत बसवला. काही न बोलता रवीने त्याला पासबुक दाखवले. पासबुकवर त्याने नाव बघून मानेही गडबडला. आतली रक्कम बघून तर उडालाच...

- तुझ्या अकाउंट मध्ये इतके पैसे आहेत?

- वेडा आहेस का? मुळात हे अकाउंट मी काढलंच नाहीये...

- अरे मग हे पैसे कुठून आले?

- हा तिसरा क्लू आहे...

- काय???

- आकडा नीट बघ

- ५,४३,२१०

- हा आकडा नाहीये, तिसरा क्लू आहे...

- म्हणजे...

- नीट बघ, हा काउंट डाउन आहे...

- अरे पण शब्द काय?

- शिरवाळ, उलटी गिनती सुरू झाली आहे. शिरवाळमधून आजोबा निघाले, मला तिथे परत जायचंय...

- मी पण येतो तुझ्या सोबत...

- नको आपण वेगवेगळे जाऊया...

- चालेल... मी तुला पुण्याला सोडतो, तिथून तू मजल दरमजल करत, गाड्या बदलत शिरवाळला पोच, मी ट्रेनने येतो...

- ओके..

- गाडीत बसलो की तुला डिटेल्स देतो...

- चालेल...

- रवी, अजून एक महत्त्वाचं. ह्या माणसाला ओळखणारा एक माणूस मला सापडलाय. सकाळीच बोललो त्याच्याशी...

- काय म्हणाला तो?

- बरंच काही सांगितलं, संध्याकाळी पुन्हा फोन करणार आहे. पण मला असं वाटतंय हे सगळं दिसतं तितकं सरळ नाहीये...

- अर्थातच नाहीये... माझा जीव जाणार आहे उद्या...

- तसं नव्हे रे... पण अजून बरंच काही आहे जे आपल्याला कळलं नाहीये... आता मी ट्रेन मध्ये हेच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. होपफुली - तू मला शिरवाळला भेटशील तेव्हा रहस्याचा उलगडा झालेला असेल...

- होप सो...

***

माने रवीला हायवेवर सोडून पुणे स्टेशनकडे गेला. रवी मजल दरमजल करत, गाड्या बदलत, कधी लिफ्ट घेऊन, बराच उलट सुलट प्रवास करत तिसर्‍या दिवशी शिरवाळला पोचला. मानेनी त्याला मध्ये

sms करून बोगी त्याचा नंबर कळवला होता. आणि स्टेशनवर भेटायला सांगितले होते. रवीला कधी एकदा हे संपतंय असं झालं होतं. स्टेशनबाहेरच एका फडतूस लॉज मध्ये त्याने रूम बुक केली. रात्री ११ ला गाडी येणार होती, तोवर रवीने सगळं विसरून छान पैकी झोप काढायचं ठरवलं.

१०:४५ वाजता रवी स्टेशनवर पोचला. बोगी नंबर १७ च्या थोडा मागेच उभा राहिला. गाडी वेळेवर आली. तुरळक प्रवासी उतरले. मानेचा पत्ता नव्हता. रवीने त्याला फोन लावला तर फोन स्विच्ड ऑफ आला. त्याला कदाचित झोप लागली असेल असा विचार करून रवी डब्यात चढला. सीट नं. ३६ पाशी आला तर सीट रिकामी, अख्खी बोगीच रिकामी होती. कदाचित काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असा विचार करून रवी मागे फिरला, तेव्हढ्यात वरच्या बर्थवर कुणीतरी पाठ करून झोपलेलं त्याला दिसलं. खालच्या सीटवर पाय देऊन रवी वर चढला. त्या माणसाचा चेहरा बघण्यासाठी त्याला आपल्याकडे वळवलं आणि शॉक बसल्यासारखा रवी मागे पडला...

मानेचे निर्जीव थंड डोळे त्याच्याकडे रोखून पहात होते...


क्रमशः

क्रॉसवर्ड २

| Labels: | Posted On 9/12/09 at 12:17 PM

बाल्कनीच्या त्याच्या आवडत्या कट्ट्यावर रवी उडी मारून बसला, सिगरेट पेटवली आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात केली.

रवी शिरवाळकर,

तुझं घर भर दिवसा साफ करण्यामागे चोरी हा उद्देश नाही. तुझं चोरलेलं सामान गोडाऊन मध्ये ठेवलंय आणि त्याचा पत्ता चिठ्ठीच्या मागे लिहिलेला आहे. भाडंही भरलंय. हे सगळं करण्यामागे तुला आमच्या ताकदीची एक झलक दाखवणं आणि प्रकरणाचं गांभिर्य तुझ्या मनावर बिंबवणं हा हेतू होता. आता मुद्द्याकडे वळूया.

तुला तुझं मूळ माहिती आहे का ह्याची मला कल्पना नाही. पण ते मला माहिती आहे. शिरवाळकरचे जमीनदार गजानन शिरवाळकर ह्यांचा तू नातू. गजाननचा भाऊ श्रीधर ह्याने वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीसाठी भावाला संपवण्याचा डाव रचला. ह्यासाठी त्याने माझ्या आजोबांना पैसेही दिले. पण तुझ्या अजोबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केल्याने, माझे आजोबा त्यांना फार मानत. आणि म्हणूनच त्यांनी गजाननला पळून जायला मदत केली आणि गजाननला मारल्याचा बनावही रचला. तो अर्थातच यशस्वी झाला. त्यानंतर गजाननचं कुटुंब इतकी वर्ष आपली ओळख लपवण्यात यशस्वी ठरलं होतं. माझे आजोबा शिरपा ह्यांनी त्यानंतर फासेपारध्याचा पिढीजात धंदा सोडून दिला.

इकडे तुमचं कुटुंब स्थिरस्थावर होत असताना तिथे आमची वाताहात होत होती. माझ्या आजोबांना गावकरी आपल्यात सामावून घ्यायला कचरत होते आणि आमच्या लोकांनी तर त्यांच्यावर बहिष्कारच टाकला. नाईलाजाने आजोबांच्या मृत्यूनंतर माझे बाबा पुन्हा ह्या व्यवसायात आले. त्यानंतर त्यांचा मुलगा, म्हणजे मी, ह्या व्यवसायात उतरलो. अर्थातच आता मी कोयते कुऱ्हाडी घेऊन लोकांना मारत नाही. काळाबरोबर मी माझ्या पद्धतीही बदलल्या आहेत. आधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञान वापरून मी लोकांचे खून करतो. पण आजोबांच्यावेळी असलेला आमचा दबदबा मला पुन्हा निर्माण करता आला नाही. काही वर्षापूर्वी बोलता बोलता आमच्या बाबांनी तुमची हकिकत मला सांगितली आणि मला लक्षात आलं की आमच्या ह्या परिस्थितीचं कारण हीच राहिलेली जबाबदारी आहे. घेतलेलं काम पूर्ण झाल्यावर आमच्यात नरसोबाला अभिषेक करायची रीत आहे. आजोबांनी पैसे घेऊनही काम न केल्याने नरसोबाचा अभिषेक राहून गेलाय आणि त्यामुळेच त्याचा आमच्यावर कोप झालाय.

म्हणून आता जर मला हे सगळं ठीक करायचं असेल तर तुझा खून करण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण गजानन शिरवाळकरांचा तू एकमेव वारस आहेस. तुला काही कल्पना न देता कुठल्याही क्षणी संपवणं मला सहज शक्य होतं. पण मला तसं करायचं नाही. जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नाही, असलाच तर माझ्या अजोबांचा आहे. त्यामुळे मी तुला एक संधी द्यायची ठरवलं आहे. ह्या चिठ्ठीसोबत एक क्रॉसवर्ड तुला सापडेल. त्यात २ उभे आणि २ आडवे शब्द आहेत. हे कोडं तू सोडवायचं. एक एक करून शब्द शोध. पहिल्या शब्दात दुसर्‍या शब्दाचा मार्ग सापडेल. प्रत्येक शब्दात एक गूढ संकेत दडलाय. तो शोधून योग्य मार्ग काढण्यात यशस्वी ठरलास तर जगशील. नाही तर माझ्या बंदुकीच्या एका गोळीवर तुझं नाव कोरून ठेवलं आहेच.

तुझ्याकडे उद्यापासून केवळ ४ दिवस आहेत. रविवारी आपल्या पैकी कुणी तरी एकजण नव्या आयुष्याला सुरुवात करणार.

भेटूच.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अंगातलं सगळं त्राण निघून गेल्यासारखा रवी एकदम गलितगात्र झाला. त्याचे आजोबा, बाबा आणि आता तो, ह्यांनी इतकी वर्ष प्राणापलीकडे जपून ठेवलेलं गुपित आता कुणालातरी कळलं होतं. आणि ते सुद्धा अशा माणसाला. चिठ्ठी वाचून क्षणभर रवीला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटलं, काहीच सुचत नव्हतं. अचानक काही तरी आठवल्यासारखं त्याने मोबाईल काढला आणि १०० नंबर डायल करून फिरवणार इतक्यात त्याच्या सेल वर unknown number वरून sms आला 'पोलिसांना सांगायचा विचारही करू नकोस, ज्याला त्याला जे हवं ते पोचवण्यात आलं आहे'. हा माणूस आत्ता ह्या क्षणी ही आपल्यावर लक्ष ठेवून आहे हे जाणवून भीतीची एक अनामिक शिरशिरी अंगातून गेल्याचं रवीला जाणवलं.

हताशपणे त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि क्रॉसवर्ड उघडलं. पहिला उभा शब्द होता ४ अक्षरी आणि क्लू होता - 'इथूनच सुरुवात, इथूनच शेवट, एकाच वेळी'. च्यायला, ह्याचा अर्थ काय?... जन्म-मृत्यू? नाही.... आई-बाबा? नाही... दवाखाना? शक्य आहे, पण सगळेच दवाखान्यात मरत नाहीत... मग काय असू शकेल??? विचार करून डोकं भणभणायला लागलं तसं रवीला एक स्ट्राँग पेग मारायची इच्छा अनावर झाली. पण शोकेसमध्ये ठेवलेल्या बाटल्या शोकेससकट गायब झाल्या असल्याने रवी उठला आणि किचनमध्ये गेला. ओट्याखालच्या कपाटात कायम इमर्जन्सी साठी स्टॉक ठेवलेला असे. मोठ्या आशेने त्याने कपाट उघडलं तर आतून फक्त एक झुरळ बाहेर पडलं. 'च्यायला काय वैताग आहे, बाटल्या तरी ठेवायच्या कमीतकमी' असं स्वतःशी पुटपुटून रवी घराबाहेर पडला. घरापासून जवळच एक बार होता, तिथे जाऊन डोकं हलकं करावं असा विचार त्याच्या मनात आला.

'एक लार्ज ओल्ड मंक'. एक मोठ्ठा घोट घसा जाळत पोटात गेल्यावर त्याला जरा तरतरी आली. अंधाराला डोळे सरावल्यावर त्याने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. २ टेबल सोडून त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला. पण नाव आठवेना. तेव्हढ्यात त्या माणसाचे लक्ष रवीकडे गेले आणि त्याने हसून हात हलवला. आपला ग्लास उचलून तो माणूस रवीच्या टेबलवर येऊन बसला. आणि अचानक रवीला आठवले 'अरे हा तर माने... ' हा माने म्हणजे एक पोचलेला माणूस होता. ह्याचा धंदा म्हणजे पैशाची घेवाण देवाण. हवाला रॅकेटवाले आणि सुपारी घेऊन खून करणारे गुंड ह्याचे क्लायंट्स. एरवी रवी त्याला शक्य तेव्हा टाळायचा प्रयत्न करत असे, पण त्याच्या सद्ध्याच्या परिस्थितीत त्याला मानेला बघून एकदम हायसं वाटलं, अचानक त्याचा आधार वाटू लागला. रवी काही बोलणार इतक्यात मानेचा प्रश्न आला 'काय रे इकडे काय करतोयस? ' अजून एक मोठ्ठा घोट घेऊन रवीने मानेला सगळं सांगायला सुरुवात केली.

त्याची कहाणी ऐकून घेतल्यावर माने शांतपणे म्हणाला 'तुझा मोठा गेम झालाय. तू आता घरी जा, मला थोडा विचार करू दे. माझ्या माहितीत अशी कुणी व्यक्ती आत्ता तरी नाही. पण मी चौकशी करतो, काही कळतंय का पाहतो. जर कळलं तर तो तुझ्यापर्यंत पोचायच्या आधीच आपण त्याला उडवू. हे कार्ड ठेव. ह्यावर माझे नि माझ्या असिस्टंटचे फोन नंबर्स आहे. कधी काही वाटलं तर कॉल कर. माझी फी मी नंतर वसूल करीनच, शिरवाळकर घराण्याच्या वारसाला १५-२० लाख म्हणजे किस झाड की पत्ती. ' रवी ने कार्ड बघितलं, नंबर्स फोन मध्ये सेव्ह करून घेतले. माने पुढे म्हणाला 'आता आपल्याला दोन कामं लवकरात लवकर करायची आहेत. पहिलं म्हणजे हे क्रॉसवर्ड सोडवणं आणि दुसरं म्हणजे शिरवाळकरांकडे जाऊन तुझी खरी ओळख देणं. त्यांचा पैसा आणि काँटॅक्ट्स आपल्याला ढाल म्हणून कदाचित वापरता येतील. बील देतो मी, तू नीघ'.

घरी पोचताच रवीने स्वतःला जमिनीवर झोकून दिलं. थंडगार जमिनीचा स्पर्श पाठीला झाल्यावर तो एक क्षण ताठरला. डोळे बंद करून विचार करायचा प्रयत्न करणार होता, पण दारूच्या अंमलामुळे त्याला लगेचच झोप लागली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

दूर कुठेतरी जोरात रेल्वेची शिट्टी वाजली आणि रवीला खडबडून जाग आली. एक क्षणानंतर भानावर आल्यावर अचानक डोक्यात ट्यूब पेटली 'च्यायला... इथूनच सुरुवात, इथूनच शेवट, एकाच वेळी... ह्याचा अर्थ प्लॅटफॉर्म... इतका कसा बावळट मी... ३:१० वाजता आपल्या स्टेशनमध्ये वरून निघालेली शेवटची लोकल येते आणि त्याच वेळी इथून सुटणारी पहिली लोकल निघते. अर्थातच... पहिला शब्द प्लॅटफॉर्म आहे... ' घाईघाईत रवी घराबाहेर पडला. 'शेवटची लोकल ३ नंबर प्लॅटफॉर्म वर येते आणि पहिली लोकल ४ नंबर वरून सुटते. मुख्य म्हणजे ह्या दोघांचा प्लॅटफॉर्म कॉमन होता. एका बाजूला ३ नंबर आणि दुसरीकडे ४ नंबर. म्हणजे दुसरा क्लू ह्याच प्लॅटफॉर्म वर सापडणार.' कसाबसा धावत पळत रवी प्लॅटफॉर्म वर पोचला तेव्हा ३:०५ झाले होते. उत्सुकता शिगेला पोचली होती. एक क्षण त्याला वाटले आपण असे एकटे उगाच आलो, मानेला सांगायला हवं होतं.

असो, आता होईल ते होईल असं मनाशी ठरवून तो लोकलची वाट बघत उभा राहिला. २-३ मिनिटातच त्याला समोरून येणाऱ्या ट्रेनचा लाइट दिसला. रवीने घड्याळात बघितलं ३:०७ झाले होते. आता ३ मिनिटातच त्याच्या समोर ह्या क्रॉसवर्डचा पहिला भाग उलगडणार होता.

क्रमशः

क्रॉसवर्ड

| Labels: | Posted On 9/11/09 at 12:48 AM

नेहेमीप्रमाणे नशिबाला शिव्या घालत, पायाखाली सिग्रेट चिरडून रवी अनिच्छेने पुन्हा कामाला लागला. एके काळी देशावरच्या मोठ्या जमीनदारांमधे मोजल्या जाणार्‍या शिरवाळकर घराण्याच्या एकमेव वारसाला मुंबईत एका फडतूस कंपनीत महिना दहा हजारावर खर्डेघाशी करायला लागावी ह्याचं त्याला आज पुन्हा एकदा वैषम्य वाटलं. पूर्वी शिरवाळकर घराणं मोठं मातब्बर समजलं जायचं. जमीनदारी, शेती-वाडी, व्यापार, पैसे व्याजी देणं इत्यादी अनेक व्यवसायांत त्याच्या पूर्वजांनी गडगंज संपत्ती कमावली होती. इतकी, की शिरवाळच्या संस्थानिकांना वेळ-प्रसंगी ह्यांनी आर्थीक मदत केली होती. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. शे-दीडशे दुभती जनावरं, हजार दीड हजार एकर बागायती जमीन असलेल्या ह्या कुटंबाचा रहाता वाडाही तसाच प्रशस्त होता. पण ह्या सगळ्या गोष्टी रवीने कधीच अनुभवल्या नव्हत्या. ही सगळी ऐकीव माहिती त्याला मिळाली त्याच्या आजोबांकडून.

रवीचे आजोबा गजानन आणि त्यांचे थोरले बंधू श्रीधर आपल्या वडिलांना, दत्तोपंतांना, कारभार सांभाळण्यास मदत करत. सोबत होते त्यांच्या वडिलांचे विश्वासू साथीदार देसाई. दोघांनी मेहेनतीने हा सगळा पसारा नुसता सांभाळलाच नाही तर वाढवलाही. काही वर्षानी दत्तोपंत एके दिवशी ताप आल्याचे निमीत्त होऊन गेले. देसाईंना हा धक्का सहन झाला नाही. गेली पन्नासहून अधीक वर्ष ज्या मित्राची सावली सारखी सोबत केली तो आता नाही ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्यांनीही अंथरूण पकडले. अगदी शेवटच्या दिवसात गजानन त्यांना भेटायला गेला होता. देसाई अप्पा काही बोलायच्या अवस्थेत नव्हते, पण त्यांनी गजाननला आशीर्वाद म्हणून एक श्री दत्ताची तसबीर दिली.

वडील आणि वडीलांसारखीच माया लावणारे देसाई अप्पा गेल्यावर मात्र गजानन शिरवाळकरांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. वडील वारल्यानंतर महिन्याभरातच श्रीधरने हळूकळू संपत्तीवर कब्जा करण्यास सुरुवात केली. गजाननने त्याला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला की दोन्ही हातांनी उधळली तरी पुढच्या पंधरा पिढ्या चैनीत राहतील इतकी संपत्ती आहे. त्यामुळे, ह्या वरून भावाभावांत वाद नकोत. पण संपत्तीच्या लोभाने आंधळा झालेल्या श्रीधरला त्यावेळी दुसरे काहिही सुचत नव्हते. आधी दमदाटी करून इस्टेटीच्या कागदावर सही करायला लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गजानन बधत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी श्रीधरने गजाननला कुटूंबासकट संपवण्याचा डाव रचला. फासेपारध्यांना पैसे देऊन स्वत: कामासाठी बाहेरगावी असताना गजाननला संपवण्याचा कट रचण्यात आला. फासेपारधी असले तरी गजाननसारख्या देवमाणसाच्या हत्येचे पाप नको म्हणून त्यांचा म्होरक्या, शिरपा, एके दिवशी येऊन हे सगळं गजाननला सांगून गेला. त्याच दिवशी गजाननने घर सोडायचा निर्णय घेतला.

श्रीधरच्या कटानुसार तो बाहेरगावी गेल्यावर गजाननने सोबत केवळ श्रीदत्ताची तसबीर घेऊन नेसत्या वस्त्रानिशी मुलाबाळांसकट घर सोडले. त्यानंतर गावोगाव भटकत, छोटी-मोठी कामं करत कुणाच्या नजरेत येणार नाही असं आयुष्य जगायला त्यांनी सुरुवात केली. असंच फिरता फिरता एका गावी धर्मशाळेत थांबले असता अचानक त्यांची गाठ शिरपाशी पडली. गाठ पडली म्हणण्यापेक्षा तो स्वतःहून त्यांच्या समोर आला. शिरपाने गजाननच्या कपड्यांना जनावराचे रक्त लाऊन श्रीधरला दाखवले होते. पण तरी श्रीधरला पूर्ण खातरजमा करायची असल्याने त्याने आपली माणसं गजाननचा शोध घ्यायला गावोगाव पाठवली होती. गजाननला त्या माणसांकडून काही त्रास होऊ नये म्हणून इतके महिने शिरपा त्यांच्या नकळत त्यांची सावली सारखी पाठराखण करत होता. बरेच महिने शोधाशोध केल्यावरही काही पत्ता लागेना म्हणून शेवटी श्रीधरने आपल्या माणसांना परत बोलावून घेतले. आज शिरपाने श्रीधरला भेटून ही सगळी हकिकत सांगितली आणि त्याचबरोबर आपण हे वाईट काम सोडून चांगल्या मार्गाला लागणार असल्याचेही सांगितले. शिरपाच्या ॠणाखाली दबलेल्या गजाननने त्याला काही दिवस आपल्याकडे रहायचा आग्रह केला. पण पुन्हा कुणास संशय यायला नको म्हणून शिरपा त्याच दिवशी निघाला. जाताना त्याला गजाननने भेट म्हणून श्रीदत्ताची तसबीर दिली आणि सुयश चिंतीले.

हळू हळू आपल्या नव्या आयुष्यात गजानन रमला. मुळातच शांत स्वभाव आणि समाधानी वॄती असलेल्या गजाननचे पैशाअभावी काही अडले नाही. इकडे श्रीधरने सुरुवातीला काही दिवस खूप ऐषोरामात घालवले. पण हळू हळू ह्या सगळ्याचा त्याला कंटाळा येऊ लागला. दारू, जुगार, बायका, सगळं काही करून झालं. मुलगा शहरात शिकायला गेला होता. तो मधून मधून येत असे, पण आपल्या बाबांचे प्रताप कळल्यावर त्याने वडिलांशी बोलणं सोडलं आणि शिक्षण झाल्यावर तिथेच कायमचा स्थाईक झाला. पुढे, साथीच्या रोगात बायको वारल्यावर मात्र श्रीधरला वेड लागायची पाळी आली. इतक्या मोठ्या वाड्यात तो आणि त्याचे २ नोकर इतकीच लोकं होती. भावाला मारून आपण काय साध्य केलं हा प्रश्न त्याला हळू हळू सताऊ लागला. रात्री अपरात्री विचित्र भास होऊ लागले. आणि एके सकाळी गळफास लाऊन घेतलेल्या अवस्थेत श्रीधर लोकांना सापडला.

वडिलोपार्जीत इस्टेट सांभाळण्यासाठी नाईलाजाने श्रीधरचा मुलगा शशी गावी परत आला. हळू हळू त्याने कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. शशीचा स्वभाव बाबांच्या अगदी विरूद्ध होता. मनमिळाऊ आणि लोकांना मदत करायला सदैव तत्पर असलेल्या शशीने शिरवाळकर घराण्याल गतवैभव प्राप्त करून द्यायचे ठरवले. त्याने आपल्या वडिलांच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून काकांच्या नावाने गावात धर्मदाय दवाखाना सुरु केला, वडिलांनी जबरदस्तीने ज्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या त्या त्यांना परत केल्या, मुद्दलापेक्षा कैकपटीने व्याज भरत रहाणार्‍यांची कर्जे पूर्णपणे माफ केली. आणि हळू हळू पुन्हा शिरवाळकर घराण्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

नेहेमीप्रमाणे ऑफीसमधून नाक्यावर आणि नाक्यावरून घरी आलेल्या रवीने दार उघडून हॉल मधला दिवा लावला आणि त्याला धक्काच बसला. ह्या मधल्या आठ-दहा तासात कुणीतरी त्याचं घर पार साफ केलं होतं. साफ म्हणजे दिवे, पडदे, ह्यांसकट सगळ सामान घरातून गायब झालेलं होतं. उरल्या होत्या नुस्त्या भिंती आणि खिडक्यांच्या चौकटी. एक क्षण त्याला आपण कुठे आलोय हेच कळेना. हॉलमधून कानोसा घेत सावधपणे रवी किचनमधे शिरला. तिथेही तोच प्रकार. एकूण एक वस्तू गायब. तेव्हढ्यात त्याला ओट्यावर एक भांडं पालथं करून ठेवलेलं आढळलं. भांडं उचलून बघताच त्याला आत लहानशी पिशवी आढळली. पिशवीत त्याच्यासाठी एक चिठ्ठी होती.
आणि सोबत होतं.......

.......एक क्रॉसवर्ड.

क्रमशः

चौकोनी त्रिकोण (भाग ३)

| Labels: | Posted On 8/28/09 at 2:07 AM

बायकोच्या गुणगुणण्याचा आवाज ऐकू येतोय. हळू हळू लाइट्स लागतात. नवरा घाई घाईत आत येतो. आवरा आवर करतोय.

नवरा - आणि काय गं, आज तू का इतकी खूश आहेस?
बायको - आज माझ्या मुलीला बघायला येणार आहेत...
नवरा - अगं तेच विचारतोय, मुलीला बघायला येणार आहेत... तू का खूश आहेस?
बायको - अहो तुम्हाला आपला बघण्याचा कार्यक्रम आठवतो... किती मजा आली होती ना...
नवरा - हो ना... खरंच गंमत झाली होती. चुकून तू नेहमी प्रमाणे साखरे ऐवजी मीठ टाकल्याने एका वेगळ्याच चवीचा चहा प्यावा लागला होता मला...
बायको - तरी एरवी पेक्षा खूप छान झाला होता असं माझी आई म्हणाली, माणसाच्या हाताला चव असली की सगळं छान बनतं...
नवरा - त्यावेळी अजून एक गंमत झाली होती, जी मी तुला सांगितली नाही... आज सांगतो...
बायको - तुम्ही पायरीवर पाय घसरून पडलात ते ना, माहिती आहे मला, मी वरून बघितलं...
नवरा - हो का?
बायको - हो ना, नंतर तुम्ही तुमच्या वडिलांना म्हणालात मला कुणी तरी हसल्याचा भास झाला...
नवरा - हो अगं, खरंच वाटलं होतं मला कुणी तरी हसल्यासारखं...
बायको - तो भास नव्हता... मीच हसले होते...
नवरा - छान... पण मला सांगायची आहे ती ही गंमत नव्हे...
बायको - मग हो?
नवरा - आम्ही आल्यावर तुझी आई गूळ पाणी घेऊन आली... तिला बघून मी पटकन बाबांच्या कानात सांगितलं 'मला मुलगी पसंत आहे...'
बायको - काय???
नवरा - अगं मला वाटलं तीच नवरी मुलगी आहे...
बायको - धन्य आहात...
नवरा - शेवटा पर्यंत तुझा चेहरा काही मला दिसला नाही... शेवटी मी आईवरून अंदाज बांधून तुला न बघताच होकार दिला...
बायको - आणि आयुष्याचं सोनं झालं तुमच्या... अहो मी म्हणून तुमच्याशी लग्न केलं... मला किती चांगली चांगली स्थळं सांगून आली होती...
नवरा - मग माझ्यातच काय पाहिलंस?
बायको - तुम्हाला बघून मला कळलं की तुम्हालाच माझी जास्त गरज आहे... इथे माझ्या कर्तृत्वाला वाव आहे...
(नवरा बायकोला कोपरापासून हात जोडून नमस्कार करतो.)
बायको - किती वाजता येणार आहेत हो मुलाकडचे?
नवरा - मुलाकडचे नाही, मुलगा एकटाच येतोय... येईलच इतक्यात...
बायको - कार्टी कुठाय? उठली तरी आहे का?
नवरा - पार्लर मध्ये गेली आहे...
बायको - आणि चहा पोह्यांचं काय? तुम्ही करणार?
नवरा - नाही गं, तिला विचारलं मी तर म्हणाली बाहेरूनच काही तरी आणीन... गिरीष तिला म्हणाला का उगाच त्रास???
बायको - शी... त्यात काय बाई त्रास...
नवरा - वा वा... असा कसा त्रास नाही??? त्याने कधी तरी खाल्लं असेल तिच्या हातचं...
बायको - काहीही बोलू नका... तिला जमतं बऱ्यापैकी... अगदी माझ्या इतकी सुगरण नसली तरी जमेल हळू हळू...
नवरा - तुझ्या इतकी सुगरण नाहीये तेच बरं आहे...
बायको - दुसरं काही नाही तरी सासूबाईंचा खवचट पणा घेतलाय हो तुम्ही...
नवरा - अगं मेलेल्या माणसाविषयी असं बोलू नये...
बायको - मेलेल्या माणसाविषयी मेलेल्या माणसाने बोललं तर चालतं...

(डोअर बेल वाजते)
बायको - आले वाटतं जावईबापू...
नवरा - होणारे जावईबापू... अजून निर्णय घ्यायचाय...
बायको - अहो पण पमी ने ठरवलंय ना???
नवरा - ती बरंच काही ठरवते, पण हा निर्णय तिला एकटीने घेऊ देणार नाही...

(डोअर बेल पुन्हा वाजते)

बायको - अहो... गप्पा काय मारत बसलात वेंधळ्यासारखे... दार उघडा बघू लवकर...
नवरा - हो हो...

(नवरा दार उघडतो आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. )

नवरा - अरे या या या... तुम्ही आलात ते फार बरं केलं गुरुजी. आमचे होणारे जावई येतीलच इतक्यात...
ज्योतीषी - तुम्ही इथे कसे???
नवरा - अहो मी इथेच राहतो...
ज्योतीषी - काय नाव तुमच्या मुलीचं?
नवरा - अहो सांगितलं की त्या दिवशी, कालिंदी...
ज्योतीषी - मग ठीक आहे... मी चुकीच्या पत्त्यावर आलोय बहुतेक...
नवरा - काही का असे ना, तुम्ही आता आला आहात तर थांबा थोडा वेळ...
ज्योतीषी - अहो मला दुसरीकडे जायचंय महत्त्वाच्या कामासाठी...
नवरा - फक्त थोडावेळ थांबा प्लीज...
ज्योतीषी - अहो मी व्हिझीटचा चार्ज वेगळा घेतो...
नवरा - किती???
ज्योतीषी - रुपये २००० फक्त...
नवरा - बरं, देतो. पण तुम्ही थांबाच.
ज्योतीषी - बरं थांबतो... (गिरीष पमीला कॉल करून सांगतो की तो महत्त्वाच्या कामात अडकल्याने त्याला उशीर होईल. )
बायको - अहो... ह्यांनीच पत्रिका बनवली का...
नवरा- हो... हेच ते...
बायको - त्यांना विचारा काही उपाय आहे का त्यावर... जास्त महाग असेल तर करू नका...
नवरा - अगं काय बोलतेयस?
ज्योतीषी - कुणाशी बोलताय हो???
नवरा - स्वतःशीच...
ज्योतीषी - मी त्या दिवशी तुम्हाला इतकं सांगूनही तुम्ही मुलीचं लग्न करायचं ठरवलंतच ना...
नवरा - अहो मी नाही ठरवलं, मुलीनेच ठरवलंय परस्पर...
ज्योतीषी - तुमच्या जावयाला कल्पना आहे ना?
नवरा - आमच्या जावई कोण आहे ह्याचीच आम्हाला कल्पना नाही अजून... द्या टाळी... हॅ हॅ हॅ...
ज्योतीषी - हॅ हॅ हॅ (गिरीष कपाळाला हात लावतो.) अहो कधी येणार जावई तुमचा? मला निघायचंय...
नवरा - अहो २००० फक्त रुपये घेतलेत ना? आता २० मिनिटं तरी थांबा...
ज्योतीषी - अहो तो व्हिझीटचा चार्ज, वेटींगचे पैसे वेगळे...
नवरा - बरं, हाफ मीटर करून ठेवा...
बायको - काय मेला हावरट आहे... नुसतं थांबायचे २००० घेतले, वर अजून पैसे मागतोय...
नवरा - हा कधी तावडीत आला की बघच कधी वाट लावतो ह्याची... खूप लुबाडलंय मला ह्याने... (गिरिषला) मी आलो चहा घेऊन...
ज्योतीषी - घेऊन येताय म्हणजे तुम्ही घेऊन येताय की आपल्यासाठी घेऊन येताय?
नवरा - आपल्यासाठी आणतोय... तुम्ही किती घेणार? अर्धा कप की फुल कप?
ज्योतीषी - मी...
नवरा - अर्ध्या कपाचे ५ रुपये, पूर्ण घेतलात तर ८...
ज्योतीषी - मी बाहेरून पिऊन येईन...

(नवरा चहा घेऊन येतो)

नवरा - घ्या... आणि सांगा कसा झालाय...
ज्योतीषी - (चहाचा घोट घेतो) ह्या चहाचे मी फार फार तर २ रुपये देईन...
बायको - अजून कसे नाही आले जावईबापू?
नवरा - होणारे जावईबापू...
बायको - तेच ते...
ज्योतीषी - कोण आहे तो माणूस ज्याने तुमच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंय?
नवरा - मलाही बघायचंय त्याला...
ज्योतीषी - त्याला जेव्हा कळेल की त्याच्या भविष्यात काय हे तेव्हा मला त्याचा चेहरा बघायचाय... मंडपातून त्याची वरात डायरेक्ट जेल मध्येच जाणार आहे... हॅ हॅ हॅ
नवरा - ह्या विनोदावर मी नाही हसू शकत...
ज्योतीषी - हसून घ्या हो... शेवटच्या दिवसात माणसाने आनंदी राहावं...
बायको - कार्टी काय करतेय पार्लर मध्ये इतका वेळ? इतक्या वेळात म्हशी धुऊन होतात...
नवरा - कालिंदी कशी नाही आली अजून???

(डोअर बेल वाजते)

नवरा - कुणी तरी आलं...
ज्योतीषी - बेल वाजली म्हणजे कुणी तरी आलंच असणार...
नवरा - हो ना... कारण नसताना आवाज करायला बेल म्हणजे काय माझी बायको आहे... हॅ हॅ हॅ...
बायको - अहो... गप्पा काय मारत बसलात वेंधळ्यासारखे... दार उघडा बघू लवकर...

(नवरा दार उघडतो.. )


नवरा - काय गं कार्टे इतका वेळ काय करत होतीस पार्लर मध्ये???
पमी - गिर्‍या??? तू कधी आलास? उशीरा येणार होतास ना???
नवरा - अगं ह्याच गुरुजींनी तुझी पत्रिका बनवली...
पमी - काय???
ज्योतीषी - अगं पण तू इथे कशी???
पमी - मी इथेच राहते... हे माझे बाबा...
ज्योतीषी - काय??? हा तुझा... हे तुझे बाबा???
पमी - हो...
नवरा - तू कशी ओळखतेस ह्यांना...
पमी - अहो ह्याच्याशीच मी लग्न करायचं ठरवलंय...
नवरा - काय??? हे माझे... हा माझा होणारा जावई???
पमी - हो... कसा आहे? सांगा ना...
बायको - नालायक आहे... हलकट आहे... लोभी आहे... तुझ्या बापाला लुबाडलंय ह्याने अडचणीत पकडून...
नवरा - अरे देवा... हे काय केलंस??? ह्या माणसाच्या हातून माझा खून होणार आहे??? हा मला मारायचेही पैसे घेईल माझ्याचकडून...
पमी - काहीही काय बोलताय बाबा?
नवरा - अगं तुझ्या पत्रिकेत लिहिलंय की तुझ्या नवर्‍याच्या हातून माझा खून होणार आहे?
पमी - काय??? हे खरं आहे का रे???
ज्योतीषी - (चाचरत) हो...
नवरा - अगं पण मला एक कळत नाहीये
बायको - तुम्हाला कुठे काही कळतं?
नवरा - मला एक कळत नाहीये अख्ख्या जगात हाच एक प्राणी सापडला का तुला लग्न करायला?
पमी - बाबा...
नवरा - काय?
पमी - बाबा...
नवरा - अगं काय???
पमी - सांगू...
बायको - सांग आता लवकर नाही तर थोतरवीन...
पमी - माझं जग किनई ह्याच्यापासूनच सुरू होतं नि ह्याच्यापाशीच संपतं...
नवरा - माझं पण...
ज्योतीषी - सासरे बुवा...
नवरा - मिस्टर आपटे म्हणा... जावई झाला नाहीत तुम्ही अजून... किती वर्ष ओळखताय एकमेकांना...
ज्योतीषी - ३-४ वर्ष...
नवरा - हिला भेटायला येताना हिच्याकडून पण गाडी भाड्याचे पैसे घेता का?
ज्योतीषी - अहो काहीही काय बोलताय... माझा खर्च मी गिर्‍हाईकांकडून भागवतो... बरेच बकरे भेटतात...
नवरा - काय???
बायको - अहो, ह्या खाटकाच्या हातात मला माझं कोकरू द्यायचं नाही... आधी ह्याला घरातून बाहेर काढा...
नवरा - तुझ्या सारख्या खाटकाच्या हातात मी माझी मुलगी देणार नाही...
बायको - अहो... नवीन डायलॉग मारा ना काही तरी...
नवरा - तुझ्या सारख्या नराधमाच्या हातात मी माझी मुलगी देणार नाही...
ज्योतीषी - अहो असं मी काय केलंय???
नवरा - आत्ताच्या आत्ता चालता हो माझ्या घरातून...
ज्योतीषी - अहो पण माझे २००० रुपये...
नवरा - बघितलंस... बघितलंस....
पमी - बाबा... असं काय पाप केलंय ह्याने...
नवरा - अगं हा म्हणजे माणूस नाही... जळू आहे... जी एकदा चिकटली की ज्याच्या अंगावर आहे त्याचंच रक्त शोषते...
ज्योतीषी - अहो जळू रक्त शोषण्यासाठीच चिकटते...
नवरा - हा लोकांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेतो... त्यांना लुबाडतो... खोटी आश्वासनं देतो... हा लोभी आहे... हा नीच आहे... हा हा आहे...
ज्योतीषी - मी मीच आहे...
नवरा - हे लग्न होणं कदापि शक्य नाही...
ज्योतीषी - अहो पण का???
नवरा - माझी मरायला ना नाहीये... पण मी ह्याच्या हातून मरणार नाही... ह्याने मला मारणं म्हणजे मुंगी ने हत्तीला मारणं, उंदराने सिंहाला मारणं, प्याद्याने वझीराला मारणं...
बायको - ओ.... बास झालं....
नवरा - मी ह्याच्या हातून मरणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही...
पमी - अहो पण का???
नवरा - कार्टे मी का मरणार नाही असं विचारतेस???
पमी - नाही हो... आमचं लग्न का होणार नाही...
नवरा - माझी परवानगी नाही...
ज्योतीषी - मी काय म्हणतो... आपण सेकंड ओपिनियन घेऊया का???
नवरा - त्याने काय होणार आहे???
ज्योतीषी - कदाचित काही तरी उपाय सापडेल...
बायको - अहो... हा तुम्हाला पुन्हा फसवतोय...
नवरा - गप्प बस गं... कुणाचं घ्यायचं सेकंड ओपिनियन...
ज्योतीषी - ओरिजिनल जोशी ज्योतीषी...
पमी - मग तू कोण आहेस...
ज्योतीषी - मी लेटेस्ट जोशी ज्योतीषी. वर्जन २.०...
नवरा - ओ २.०, बोलवा तुमच्या बाबांना आत्ताच्या आत्ता...
ज्योतीषी - त्यांचा चार्ज वेगळा आहे, आमचं पॅकेज डील नाहीये...
(नवरा ज्योतिष्याच्या अंगावर धावून जातो)
ज्योतीषी - बोलावतो... बोलावतो... (ज्योतीषी बाबांना मोबाईलवरून कॉल करतो)
ज्योतीषी - बाबा... पटकन मी सांगतो त्या पत्त्यावर या... एका पत्रिकेवर सेकंड ओपिनियन घ्यायचंय... अहो ते पैसे मी देईन… तुम्ही असाल तसे निघा... अहो हो, कपडे घालून निघा... येतायत बाबा...
नवरा - त्यांचे पैसे मी अजिबात देणार नाहीये... हा सगळा घोळ तुझ्यामुळे झालाय...
ज्योतीषी - बघितलंस... जावई झाल्यावर लगेच एकेरीवर आला तुझा, आले तुझे बाबा...
नवरा - ए जा जा... आलाय मोठा जावई होणारा...
पमी - असं काय करता बाबा... करू द्या ना लग्न आम्हाला...
नवरा - करा की
पमी - खरंच???
नवरा - हो करा की तुम्ही लग्न... पण एकमेकांशी नाही...

(डोअर बेल वाजते)
ज्योतीषी - या बाबा या... बरं झालं लवकर आलात...
जोशी - मी घरी यायचे ७५ रुपये घेतो, पत्रिका बनवायचे ५० आणि भविष्य सांगायचे अजून ५०...
नवरा - ओ ओरिजिनल जोशी... तुमच्या मुलाने घोळ करून ठेवलाय...
जोशी - नवीन सांगा काही तरी... काय झालं???
नवरा - अहो ह्याने माझ्या मुलीची पत्रिका बनवली...
जोशी - पैसे घेतलेस ना रे???
नवरा - दिले हो... त्या पत्रिकेनुसार माझा जावई माझा खून करणार आहे...
जोशी - मग प्रॉब्लेम काय आहे???
नवरा - अहो तुमचा मुलगाच माझा जावई होणार आहे...
जोशी - तुला ह्यांचा खून करायला काही प्रॉब्लेम आहे?
ज्योतीषी - नाही...
पमी - गिर्‍या...
जोशी - मग प्रॉब्लेम काय आहे???
नवरा - अहो काही तरी काय बोलताय... तुम्हाला माझी सुपारी द्यायला बोलावलं नाहीये... ह्या अशा मुलाच्या हातून मरायला माझी अजिबात तयारी नाही...
जोशी - मग आता मी काय करावं अशी इच्छा आहे? ह्या वयात मला खून करून फाशी जायचं नाहीये...
नवरा - तुम्ही पत्रिका पुन्हा बनवा नि पुन्हा भविष्य बघा...
जोशी - मी पत्रिका बनवायचे ५० रुपये घेईन आणि भविष्य सांगायचे अजून ५०...
नवरा - देतो हो... बनवा पटापट...
जोशी - मुलीचं नाव?
पमी - पमी...
नवरा - कालिंदी, जन्म १२ डिसेंबर, सकाळी १० वाजून ३५ मिनिटे...
बायको - ओ... हिचा जन्म ११ वाजून ३५ मिनिटांनी झालाय १०:३५ नाही...
नवरा - काहीही काय अगं... तुला काय माहिती???
बायको - मुलीचा जन्म कधी झाला हे मला माहिती नसेल तर काय तुम्हाला असणार... हिचा जन्म ११ वाजून ३५ मिनिटांनी म्हणजे ११ वाजून ३५ मिनिटांनीच झालाय...
नवरा - बरं बरं... जन्म वेळ ११ वाजून ३५ मिनिटे...
ज्योतीषी - अहो मला तर तुम्ही १०:३५ सांगितलंत...
नवरा - ते जुनं झालं... ही नवीन जन्म वेळ... नाव कालिंदी, जन्म १२ डिसेंबर १९८६, जन्म वेळ ११ वाजून ३५ मिनिटे, जन्म स्थळ पुणे ३०...
जोशी - हळू हळू सांगा, तुम्ही व्यास नाही आणि मी गणपती नाही...
नवरा - नाव कालिंदी, जन्म १२ डिसेंबर १९८६, जन्म वेळ ११ वाजून ३५ मिनिटे, जन्म स्थळ पुणे ३०...
जोशी - ह्म्म्म्म.... बनवतो पत्रिका...
पमी - बाबा... दोन प्रेमिकांच्या मध्ये नका येऊ... पाप लागतं...
नवरा - कोण म्हणालं?
पमी - मी म्हणतेय...
नवरा - बापाला पाप-पुण्याच्या गोष्टी शिकवतेस??? ह्या... ह्या... अशा माणसावर प्रेम करताना लाज नाही वाटली... अगं... भूतदया म्हणूनही कुणी ह्याला जवळ नाही घेणार गं... तू काय पाहिलंस ह्याच्यात??
पमी - माझ्या नजरेने बघा म्हणजे कळेल...
नवरा - मुस्काट फोडीन...
पमी - गिर्‍या हा सगळा घोळ तुझ्यामुळे झालाय... माझी पत्रिका अशी का बनवलीस???
ज्योतीषी - अगं तुझ्या बाबांनीच चुकीची वेळ सांगितली त्याला मी काय करणार...
पमी - अरे ते सांगतील काहीही म्हणून काय तू लगेच ऐकायलाच पाहिजे असं नाही... माझं ऐकतोस??? हजार वेळा सांगितलं केसांना ते घाणेरडं तेल लावू नकोस म्हणून...
ज्योतीषी - असं गं काय करतेस???
नवरा - (गिरीषला) ए... ए... लांब हो... लांब हो...

नवरा - अहो किती वेळ लागतोय??? इतक्या वेळात शिधा पत्रिका बनवून होते...
जोशी - शिधा पत्रिकेत भविष्य दिसतं???

जोशी - झाली... बापरे हे काय बघतोय मी...
नवरा - हा धक्का मला आधी बसलेला आहे... त्यामुळे आता मी घाबरणार नाही...
जोशी - कोणत्या अवलक्षणी मुलीची पत्रिका आहे ही???
पमी - माझी आहे...
नवरा - तोंड सांभाळून बोला, माझ्या मुलीची आहे...
जोशी - आणि कोणता गाढव हिच्याशी लग्न करणार आहे???
ज्योतीषी - बाबा मी...
जोशी - अरे गाढवा ह्या पत्रिकेत काय लिहिलंय माहिती आहे का?
ज्योतीषी - माहिती आहे... मी ह्यांचा खून करणार आणि मला त्यात काही प्रॉब्लेम नाही...
जोशी - अरे मूर्खा नव्या पत्रिकेत काय लिहिलंय माहिती आहे का???
कोरसः काय लिहिलंय...
जोशी - ह्या पत्रिकेनुसार जावयाच्या हातून सासर्‍याचा नाही... तर सासर्‍याच्या हातून जावयाचा खून होणार...
कोरसः काय???
(नवरा - मला चालेल)



-------------------------------------समाप्त-------------------------------------------------------

चौकोनी त्रिकोण (भाग २)

| Labels: | Posted On 8/26/09 at 12:44 AM

ज्योतिष्याचे घर. ज्योतीषी आपल्या खुर्चीवर राजा बसावा तसा ऐटीत बसला आहे. शेजारी एका गादीवर एक म्हातारा माणूस मान खाली घालून काही तरी खरडतोय. राजाराम गणपत आपटे दारात येतात.

आपटे - नमस्कार... मी आत येऊ का?... मी आत येऊ का? (उत्तर येत नाही म्हणून शेवटी आत येतो.) मी आत येऊ का?
म्हातारा - (एखाद्या क्षुद्र कीटकाकडे बघावं तसा बघत) हा प्रश्न बाहेरून विचारायचा असतो.
(आपटे बाहेर जातात. अपमानाने वैतागलेत.)
आपटे - (जरासा चिडून) येऊ का आत आता?
म्हातारा - या...
आपटे - जोशी ज्योतीषी इथेच राहतात का?
म्हातारा - हो... आपल्याला कोण हवंय...
आपटे - ऐश्वर्याला भेटण्यासाठी मी जोशांच्या घरी येईन का?
म्हातारा - नाही...
ज्योतीषी - ओ इकडे या... कोणाला भेटायचंय?
आपटे - मला जोशी ज्योतिष्यांना भेटायचंय...
ज्योतीषी - मीच तो... बोला... मुलीची पत्रिका बनवायची आहे की भविष्य बघायचंय?
आपटे - तुम्हाला कसं कळलं?
ज्योतीषी - रेशनचे तांदूळ घ्यायला कुणी ज्योतिष्याच्या घरी येईन का?
आपटे - ते आहेच... पण मी मुलीसंबंधी कामाने आलोय हे कसं कळलं?
ज्योतीषी - इतकी अजिजी निवडणूकीच्याआधी राजकारण्याच्या आणि उपवर मुलीच्या बापाच्याच चेहर्‍यावर असते. बोला काय काम आहे?
आपटे - मुलीची पत्रिका बनवायची आहे...
ज्योतीषी - उत्तम...
आपटे - तुम्ही दक्षिणा किती घेणार...
ज्योतीषी - मी दक्षिणा घेत नाही...
आपटे - (खूश होऊन) काय???
ज्योतीषी - मी दक्षिणा घेत नाही... मी मानधन घेतो... दक्षिणा किती द्यायची ते यजमान ठरवतो, माझं मानधन मीच ठरवतो...
आपटे - बरं... मानधन किती घेणार?
ज्योतीषी - रुपये १११... (म्हाताऱ्याला खोकल्याची उबळ येते) रुपये ११११ फक्त...
आपटे - बापरे... अहो ५०० त बनवा की...
ज्योतीषी - पैसे वाचवायचे असतील तर बँकेत सेविंग्स अकाउंट उघडा...
आपटे - बरं... हे घ्या आणि बनवा पत्रिका... चांगली बनवा हां...
ज्योतीषी - अहो मी ब्रम्हदेव नाहीये हवं तसं भविष्य लिहायला... जशी असेल तशी येईल पत्रिका...
आपटे - बरं...
ज्योतीषी - मुलीचं नाव?
आपटे - दोन आहेत... पाळण्यातलं सांगू की बोलण्यातलं?
ज्योतीषी - पाळण्यातलं सांगा हो...
आपटे - कालिंदी
ज्योतीषी - आडनाव एकच आहे ना?
आपटे - हो...
ज्योतीषी - मुलीची जन्मतारीख?
आपटे - १२ डिसेंबर
ज्योतीषी - वर्ष?
आपटे - १९८६
ज्योतीषी - जन्मवेळ?
आपटे - सकाळी १० वाजून ३५ मिनिटे
ज्योतीषी - जन्म स्थळ?
आपटे - कॉट नंबर १२, ब्राम्हणसभा दवाखाना, आडव्या रावणाच्या देवळामागे, पुणे ३०.
ज्योतीषी - पत्रिका ह्या पत्त्यावर पाठवायचेय?
आपटे - नाही...
ज्योतीषी - मग पुणे ४ पुरलं असतं...
(ज्योतीषी थाटात त्याचा लॅपटॉप उघडतो आणि काही तरी करू लागतो. थोडावेळ जातो. आपट्यांची चलबिचल सुरू होते.)
आपटे - अहो... तुम्ही गेम नंतर खेळाल का? आधी पत्रिकेचं बघा ना प्लीज...
ज्योतीषी - (चिडून) मी पत्रिकाच बनवतोय...
आपटे - काँप्यूटरवर???
ज्योतीषी - हो...
आपटे - अहो मला आपली जुन्या पद्धतीची साधीशी पत्रिका द्या की बनवून... कशाला उगाच तुमच्या काँप्यूटरला त्रास?
ज्योतीषी - तशी गुलाबी कागदावरची पन्नास रुपयातली पत्रिका बनवून हवी असेल तर ह्यांना भेटा (म्हातार्‍याकडे बोट दाखवतो)
आपटे - हे कोण?
ज्योतीषी - हे ओरिजिनल जोशी ज्योतीषी...
आपटे - मग तुम्ही कोण???
ज्योतीषी - मी लेटेस्ट जोशी ज्योतीषी... वर्जन २. ०
आपटे - म्हणजे काय?
ज्योतीषी - कळेल...
आपटे - अहो पण तुम्ही इतके लहान दिसता, अनुभव आहे ना?
ज्योतीषी - हा प्रश्न ज्ञानेश्वरांना नाही विचारलात... इतक्या लहानपणी ज्ञानेश्वरी लिहिलीत... अनुभव आहे ना?
आपटे - बरं...
ज्योतीषी - तुमच्या समाधानासाठी म्हणून सांगतो... माझं भविष्य मी जन्माला यायच्या आधीच सांगितलं होतं... आता बोला...
आपटे - पत्रिका बनवताय ना???
ज्योतीषी - हो हो...
(थोड्यावेळाने विजयी मुद्रेने ज्योतीषी लॅपटॉप मधून एक सिडी काढून आपट्यांना देतो.)
ज्योतीषी - ही घ्या पत्रिका...
आपटे - अहो ही बघणार कशी???
ज्योतीषी - काँप्यूटरवर...
आपटे - काँप्यूटर नाहीये घरी...
ज्योतीषी - मग प्रिंट आऊट काढा...
आपटे - अहो प्रिंटर पण नाहीये...
ज्योतीषी - मी देतो ना प्रिंट आऊट काढून
आपटे - थँक्यू हा...
ज्योतीषी - सात रुपये पर पेज...
आपटे - हे घ्या... आता सांगा बघू काय लिहिलंय भविष्यात...
ज्योतीषी - त्याचा चार्ज वेगळा आहे... रुपये ५०० फक्त...
आपटे - अहो आयुष्यभराची बेगमी आजच करणार आहात का तुम्ही...
ज्योतीषी - तुम्हाला कळतं पत्रिकेतलं काही?
आपटे - हे घ्या... बघा पटापट...
(ज्योतीषी पत्रिका पाहू लागतो. हळू हळू त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात. एकदम उठून उभा राहतो)
ज्योतीषी - बापरे...
आपटे - काय झालं हो?
ज्योतीषी - हे... हे... काय बघतोय मी???
आपटे - पत्रिका...
ज्योतीषी - ते माहिती आहे हो... पत्रिकेत काय बघतोय मी असं म्हणायचं होतं मला...
आपटे - बरं बरं
ज्योतीषी - करू सुरुवात पहिल्यापासून???
आपटे - हो...
ज्योतीषी - बापरे... हे काय बघतोय मी???
आपटे - काय झालं गुरुजी???
ज्योतीषी - अहो कोणत्या अवलक्षणी मुलीची पत्रिका आहे ही???
आपटे - तोंड सांभाळून बोला, माझ्या मुलीची आहे...
ज्योतीषी - (जीभ चावतो) अहो तुम्ही इतके वाईट नाही आहात हो... का स्वतःच्या जिवावर उठलायत?
आपटे - अहो नीट सांगाल का मला...
ज्योतीषी - तुम्ही मुलीसाठी स्थळं बघताय ना???
आपटे - हो...
ज्योतीषी - अहो हिच्या नवर्‍याच्या हातून तुमचा खून होणार आहे...
आपटे - काय???
ज्योतीषी - हिच्या पत्रिकेत साफ लिहिलंय... हिच्या नवर्‍याच्या हातून तुमचा खून होणार आहे... म्हणजे तुमचा जावई तुमचा खून करणार...
आपटे - पत्रिका बरोबर बनवली आहे ना?
ज्योतीषी - (ज्योतीषी काँप्यूटरला विचारतो) बरोबर बनवलीस ना रे??? हो म्हणतोय...
आपटे - आता हो काय करायचं???
ज्योतीषी - आता काही नाही करायचं...
आपटे - म्हणजे???
ज्योतीषी - आता मुलीचं लग्न नाही करायचं...
आपटे - अहो असं कसं करून चालेल... मुलीचं लग्न तर करायलाच हवं...
ज्योतीषी - मग अजून एक करता येईल...
आपटे - (उत्साहात) काय??? काय???
ज्योतीषी - चार माणसं जमवायला सुरुवात करता येईल...
आपटे - अहो असं नका म्हणू... हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे...
ज्योतीषी - बरं... तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी जा आणि मुलीशी बोला ह्या विषयावर...
आपटे - चालेल...

(ब्लॅक आऊट)

नवरा मान खाली घालून घरात येतो. खुर्चीवर मान मागे टाकून बसतो. चेहर्‍यावर टेंशन आहे.
बायको - या... आलात का?
नवरा - ह्म्म्म्म
बायको - काय हो, काय झालं? ज्योतिष्याने अपमान केला का?
नवरा - तो ज्योतीषी म्हणजे काय माझी बायको आहे पावलो पावली अपमान करायला?
बायको - मग रस्त्यात पोलिसाने पकडलं का?
नवरा - नाही...
बायको - मग सिगारेटचे भाव पुन्हा वाढले का?
नवरा - अग नाही गं माझे आई
बायको - अहो मग असा सुतक लागल्यासारखा चेहरा करून का बसलात?
नवरा - सुतक लागलं नाहीये पण लागणार आहे लवकरच...
बायको - अहो काय बोलताय? कळेल असं सांगाल का?
नवरा - ज्योतिष्याकडे गेलो होतो ना मी...
बायको - माहिती आहे, पुढे बोला...
नवरा - त्याने पमीची पत्रिका बनवली... त्यात असं लिहिलंय की...
बायको - की पमीच्या पत्रिकेत लग्नाचा योग नाही... हाय रे दैवा तू हे काय केलंस??? माझ्याच पोरीच्या वाट्याला का हे भोग...
नवरा - अगं गप्प बस जरा... पमीच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे...
बायको - नशीब... मला वाटलं आता त्या बिचारीला तुम्हाला आयुष्यभर झेलावं लागतंय की काय...
नवरा - बोलू का मी?
बायको - बोला...
नवरा - पमीच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे...
बायको - अहो पुढे बोला... पटापट बोला आणि... सारखं आपलं रेकॉर्ड अडकल्या सारखं फिरवून फिरवून तेच काय सांगताय...
नवरा - ए गप... जर पमीने लग्न केलं तर तिच्या नवर्‍याच्या हातून माझा खून होणार असं लिहिलंय पत्रिकेत...
बायको - हात्तिच्या इतकंच ना... मला वाटलं काय मोठं संकट आलंय...
नवरा - हे मोठं संकट नाहीये???
बायको - नाहीये...
नवरा - अगं माझा जीव जाणार ह्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं???
बायको - अहो तुमच्या जिवाचं काय घेऊन बसलात. नाही तरी पमीचं लग्न होऊन गेल्यावर तुम्हाला काही उद्योग आहे का?
नवरा - काहीही काय अगं...
बायको - दिवसभर एकटे घरात बिड्या फुंकत बसणार, फुकट्या मित्रांसोबत जय भारत मध्ये चहा ढोसणार, ते मिथूनचे आचरट सिनेमे पाहणार, टवाळ मित्र जमवून पत्ते कुटणार... त्यापेक्षा या इथे... मी तुमच्यासाठी एक फ्रेम घेऊन ठेवली आहे...
नवरा - झालं तुझं? मला माझ्या मरण्याचं जितकं टेंशन नाही तितकं पुन्हा तुला भेटण्याचं आहे...
पण म्हणा मी तुझ्या सारखा इथे लटकणार नाही कारण मला मुक्ती मिळणार आहे...
बायको - ती कशी काय?
नवरा - कारण माझा जीव कशातही अडकला नाहीये... तू मात्र तुझ्या आईने दिलेल्या पायपुसण्यापासून ते पायपुसणी छान वाटावीत अशा तुझ्या साड्यांपर्यंत सगळ्यात अडकून पडलेयस...
बायको - आपण मुद्द्याचं बोलुया का?
नवरा - बरं...
बायको - मी काय म्हणते... अहो तसंही पमी गेल्यावर तुम्ही एकटेच उरणार त्यामुळे जगण्या-मरण्याची काळजी कशाला... आणि जावयाशी कुजकटपणे वागू नका, मग तो कशाला करील तुमचा खून...
नवरा - मी पण बराच विचार केलाय ह्यावर... तसंही पमी गेल्यावर मी एकटाच उरणार त्यामुळे जगण्या-मरण्याची काळजी कशाला... आणि जावयाशी नीट वागलं, मग तो कशाला करील माझा खून...
बायको - ओ विद्वान... हा विचार मीच तुम्हाला ऐकवलाय आत्ता...
नवरा - मी ह्या पुढे विचार केलाय... आपण जगलो ५०-५५ वर्ष... आता आपल्या आयुष्याच्या मोहापायी मुलीचं आयुष्याची का वाट लावायची. करतो तिचं लग्न... जगू दे तिला तरी सुखाने...
बायको - आता कसं बोललात???
नवरा - मुलीच्या सुखासाठी हा बाप स्वतःच्या आयुष्याची आहुती द्यायला तयार आहे...
बायको - टाळ्या... टाळ्या... टाळ्या... बरं आता पमी यायची वेळ झाली... चेहरा हसरा ठेवा जरा...
नवरा - हो हो...

पमी - डॅडी... मी आले...

नवरा - ये ये ये बेटा कशी आहेस?
बायको - अरे अरे हे काय केसांचं टोपलं करून ठेवलंय??? अहो तिला वेणी घालायला सांगा बघू...
पमी - डॅडी... तुम्ही म्हणत होतात ना की आता माझं लग्नाचं वय झालंय... माझ्यासाठी तुम्ही स्थळं शोधायला सुरुवात करणार आहात...
नवरा - हो...
पमी - मी तुमचे कष्ट वाचवले...
नवरा - म्हणजे???
पमी - मी माझ्यासाठी मुलगा शोधलाय...
बायको - काय??? कार्टे लाज नाही वाटत बापाला सांगायला...
नवरा - काय?
बायको - अहो तिला विचारा कोण आहे तो ज्याने माझ्या भोळ्या भाबड्या मुलीला फूस लावली... विचारा विचारा...
नवरा - कोण आहे तो? काय करतो? कुठे राहतो? कुठली सिगारेट ओढतो?
पमी - सांगते सांगते...
बायको - कोण उपटसुंभ पकडलाय काय माहिती...
नवरा - घरची परिस्थिती कशी आहे...
पमी - उत्तम...
नवरा - नाव काय?
पमी – गिरिष जोशी...
नवरा - कुठे राहतो...
पमी - पुण्यातच...
नवरा - पुण्यात कुठे राहतो... घरात असं उत्तर दिलंस तर थोतरवीन...
पमी - नळ स्टॉप जवळ... स्वतःचा व्यवसाय आहे...
बायको - अहो तिला विचारा घरी कोण कोण असतं?
नवरा - घरी कोण कोण असतं?
पमी - तो आणि त्याचे बाबा...
नवरा - भाऊ बहीण?
पमी - एकुलता एक आहे...
नवरा - बरं... मग आता काय करायचंय?
पमी - काय करायचं म्हणजे लग्न करायचं...
नवरा - कुणाशी???
पमी - अहो ह्याच्याशी...
बायको - कार्टीने परस्पर लग्न करायचंही ठरवून टाकलंय... तिला विचारा हॉल पण बुक केलाय का...
पमी - मला असं वाटतं की तुम्ही त्याला एकदा भेटावं...
नवरा - अर्थातच भेटणार... पूर्वी नवरा बायको एकमेकांना डायरेक्ट हार घालतानाच बघत आता मी माझ्या जावयाला मुलीला हार घालतानाच बघू की काय?
पमी - नाही हो... तुम्ही कधी फ्री असाल ते सांगा मी त्याला घरी घेऊन येते...
बायको - हे दिवसभर फ्रीच असतात... कधीही आण... आजच आण...
नवरा - उद्या सांग त्याला यायला...आधी एकट्यानेच ये म्हणावं... मुलगा आवडला तर बाबांशी बोलीन मी..
पमी - बरं सांगते...

(मुलगी मोबाईलवरून फोन लावते. हॅलो म्हणते. ब्लॅक आऊट.)

क्रमशः

चौकोनी त्रिकोण - एकांकिका (भाग १)

| Labels: | Posted On 8/25/09 at 12:42 AM

सूचना - नुकतीच ही एकांकिका एका मित्रासाठी लिहिली. ह्यातील सगळी पात्रं आणि आणि घटना पूर्णपणे माझ्या मनाचे श्लोक आहेत. ह्यातील पात्रांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती कुठेही आढळल्यास तो योगायोग समजावा आणि त्यांच्यापासून कटाक्षाने दूर रहावे.

पात्र - नवरा, फोटोतून बोलणारी स्वर्गवासी बायको, मुलगी, ज्योतीषी पिता पुत्र.

----------------------------------------------------------------------------------------------




मी वैकुंठवासी राजाराम गणपत आपटे ह्यांची कैलासवासी पत्नी जगदंबा राजाराम आपटे. म्हणजे, आमचे हे अजून जिवंत आहेत, पण आमच्या बंगल्याचं नाव वैकुंठ असल्याने मी त्यांना प्रेमाने वैकुंठवासी म्हणते. आमचं लग्न चारचौघांसारखं बघण्याचा कार्यक्रम करून, पत्रिका जुळवून झालं. ह्यांचं घराणं पहिल्यापासून श्रीमंत. घरी गडगंज संपत्ती पण मुलगा एकच. लग्न मोठ्या धूमधडाक्यात झालं. गावजेवण घातलं होतं त्या दिवशी. एकुलते एक असल्याने हे अतिशय लाडावलेले होते. खरं सांगायचं तर आमचे हे म्हणजे लग्नाआधी एकदम बावळट्ट ध्यान होते. कसली म्हणून काळजी घ्यायची नाही, जरा म्हणून चटपटीतपणा नाही. पूर्वी आई जशी कामं करायची तशी आता बायको करणार ह्या भ्रामक समजुतीत हे सुरुवातीचे काही दिवस होते. पण हळू हळू मी त्यांना सुधरवायला सुरुवात केली. काही वर्षातच सुतासारखे सरळ झाले असते, पण दुर्दैवाने पहिल्याच बाळंतपणात मला देवाज्ञा झाली... आणि... ह्यांनी सोडलेली सिगारेट पुन्हा सुरू केली.
मुलीला सांभाळताना ह्यांची होणारी कसरत मी फोटोतून बघत होते. कार्टी पण इतकी वाह्यात की बापाला सळो की पळो करून सोडायची. पण एक मात्र आहे की ह्यांनी माझ्यानंतर दुसरं लग्न केलं नाही.
अरे अरे अरे अरे... काय पसारा करून ठेवलाय सगळीकडे..., आज चांगलंच फैलावर घेणार आहे ह्यांना.

(बापाची एंट्री होते.)

बायको- या... झालं का गाव उंडारून?
नवरा- घ्या, झाली कटकट सुरू... अगं तू आता आमच्यात नाहियेस बये... आता तरी त्रास देणं सोड मला...
बायको- अहो... हा काय घराचा उकिरडा करून ठेवलाय???
नवरा- गडी रजेवर आहे माहिती आहे ना तुला?
बायको- तुम्हाला हात दिलेत ना दैवाने? पत्ते कुटण्याशिवाय हातांनी अजूनही कामं करता येतात... मी होते तेव्हा कशी हो सगळी कामं करायचात गुपचुप?
नवरा- बाहेर गाड्यांचे भोंगे आणि आत हा भोंगा. कानाची भोकं होणारेत माझ्या...
बायको- तुमच्या कानाची तशीही भोकंच आहेत... तुम्हाला हजार वेळा सांगितलं आहे की बाहेर पडताना सगळे दिवे मालवू नका म्हणून, मला अंधारात एकटीला भीती वाटते.
नवरा- पहिली गोष्ट म्हणजे तुला... चक्क तुला एखाद्या गोष्टीची भीती वाटते ह्यावर माझा विश्वास नाही. तू घाबरणं म्हणजे जास्वंदाच्या फुलाला वास येणं, दाउदने सत्यनारायण घालणं आणि राजकारण्यांनी आश्वासनं पाळण्याइतकी अशक्य गोष्ट आहे. दुसरं म्हणजे विजेचं बिल माझं सासरा भरत नाही.
बायको- बाबांवर जायची काहीही गरज नाहीये. इतकी सुंदर, सुशील बायको मिळाली तुम्हाला... जरा म्हणून कौतुक नाही बायकोचं...
नवरा- कौतुक नाही?
बायको- हो नाही
नवरा- काय कमी करतो गं तुझं मी?
बायको- आधी माझं काय करता ते सांगा, कमी जास्त नंतर बघू
नवरा - रोज तुझा फोटो स्वच्छ करतो
बायको- गडी करतो
नवरा- रोज फोटोला हार घालतो
बायको- गडी घालतो
नवरा- दर सहा महिन्यांनी तुझ्या फोटोची फ्रेम बदलतो... लग्नाआधी साड्यांनी वीट आणला, आता फ्रेम मुळे वैताग येतोय. काठावरती मोराचं डिझाइन असलेली फ्रेम मिळत नाही गं जगात कुठेही...
बायको- फोटो फ्रेम पण गडीच बदलतो. काय ते मेलं कळकट दुकान... एकदा तर मेल्याने माझ्या फ्रेम मध्ये दुसर्‍याच कुणाच्या बायकोचा फोटो घालून तुम्हाला दिला
नवरा- हो ना
बायको- आणि तुम्हीही तो सरळ अडकवलात भिंतीवर, जरा म्हणून लाज नाही...
नवरा- अगं आधी माझ्या लक्षातच आलं नाही...
बायको- हेच तुमचं लक्ष बायकोकडे...
नवरा- पण ३-४ दिवस घर बरंच शांत-शांत वाटल्यावर लक्षात आलं... पण फोटोतली बाई दिसायला बर्‍यापैकी होती म्हणून ठेवला फोटो... तू काय, माझ्या मनात आहेसच गं...
बायको- २ दिवस त्या घाणेरड्या फडताळात पडून राहावं लागलं होतं... कसला तो मेला कुबट्ट वास. आणि मेल्याने बिपाशा बासू, सच्छींद्र महाराज आणि मी असं तिघांना एकावर एक ठेवलं होतं...
नवरा- हा हा हा हा.... बिचारे सच्छींद्र महाराज
बायको- अहो... एक गोष्ट बरेच दिवस मनात होती, विचारू का?
नवरा- माझी परवानगी मागतेयस? लग्नानंतर माझी सिगरेटची पाकिटं चुलीत टाकताना मागितली होतीस परवानगी? आईच्या साड्या परस्पर बोहारणीला देताना मागितली होतीस परवानगी? माझ्या सगळ्या दारूच्या बाटल्यांमध्ये चहाचं पाणी भरून ठेवताना मागितली होतीस परवानगी?
बायको- तेव्हाची गोष्ट वेगळी होती...
नवरा- काय वेगळी होती???
बायको- अहो तेव्हा मी जिवंत होते, माझं तुमच्यावाचून काही अडत नव्हतं... आता मेलं साधं फोटो पुसायचा म्हटलं तरी स्वत:चं स्वतः करता येत नाही... बरं ऐका...
नवरा- ऐकवा...
बायको- मी गेल्यावर तुम्ही दुसरं लग्न का नाही केलंत हो? खरं खरं सांगा हां... मनातलं अजिबात राखून ठेवू नका...
नवरा- खरं सांगू...
बायको- हो...
नवरा- आपलं लग्न झालं, सुरुवातीचे काही दिवस फार मजेत गेले... पण नंतर...
बायको- नंतर काय?
नवरा- नंतर... नंतर तुझ्या बापसाला तुझं लग्न उरकून टाकायची घाई का झाली होती ते मला कळलं...
बायको- काय?????????
नवरा- लग्नाच्यावेळी माझ्याकडे बघून जे डेंजर हसलाय तो, तेव्हाच मनात शंका आली होती... तुला माझ्या हवाली करून त्याने स्वत:ची सुटका करून घेतली...
बायको- तोंडाला येईल ते बोलू नका... पाठवणीच्या वेळी बाबा मला मिठी मारून किती रडले... पाहिलं नाहीत का?
नवरा- पाहिलं ना... नंतर त्यांनी मलाही मिठी मारली... आणि रडत रडत माझ्या कानात काय म्हणाले माहिती आहे?
बायको- काय?
नवरा- खो...
बायको- काय?
नवरा- अग खो... म्हणजे खो दिला त्यांनी मला. म्हणाले आता रडण्याची तुझी पाळी...
बायको- काहीही फेकू नका...
नवरा- विश्वास नसेल बसत तर विचार बापालाच तुझ्या...
बायको- बाबा असं म्हणणं शक्यच नाही...
नवरा- जाऊ दे झालं ते झालं... तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू माझा ४ वर्ष जो अनन्वित छळ केलास त्याला घाबरून मी दुसरं लग्न केलं नाही...
बायको- मी काय छळ केला हो तुमचा... सासू बाईंनीच लाडावून ठेवलं होतं तुम्हाला... माझा बाब्या माझा बाब्या करून डोक्यावर चढवून ठेवलं होतं...
नवरा- साफ खोटं आहे हे...
बायको- लग्नापूर्वी तुम्हाला साधा चहा तरी करता येत होता का?
नवरा- आपल्या घरात फार पूर्वी पासून गडी माणसं आहेत, मला काय गरज काही शिकायची???
बायको- ते काही असो, माणसाला यायलाच हवं. मी तुम्हाला स्वावलंबी बनवलं... एक कप चहा करायला किती कप पाणी ठेवायचं हे ही माहिती नव्हतं. उण्यापुर्‍या २ वर्षात तुम्हाला स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी ह्यात तरबेज केलं मी त्याबद्दल आभार मानायचे सोडून मलाच नावं ठेवताय... काय मेली पुरुषाची जात...
नवरा- तुझ्या बापानी पुढाकार घेऊन आपलं लग्न ठरवलं म्हणून मी कायम त्यांचा राग केला, पण एका गोष्टीसाठी मात्र मी त्यांना पूर्ण मार्क देतो...
बायको- कोणती हो?
नवरा- तुझं नाव कसलं फर्स्टक्लास ठेवलंय... जगदंबा... अगदी शोभून दिसतं हो तुला... एक गंमत माहिती आहे का तुला?
बायको- काय?
नवरा- जगातली तू एकमेव व्यक्ती आहेस जी "मी माझ्या नावाला जागले" असा दावा करू शकते...
बायको- हे अती होतंय... तुम्हाला एकदा चांगली अद्दल घडवणार आहे... एकदा मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली की आहातच तुम्ही आणि तुमचा समाचार घ्यायला मी...
नवरा- बापरे, हे लक्षातच आलं नाही माझ्या...
बायको- माहिती होतं तुमच्या लक्षात येणार नाही ते, उगाच नाही तुम्हाला ध्यान म्हणत मी... तुमचं सोडा आता, पमी कुठाय हो???
नवरा- कुठे तरी बाहेर गेलेय, येईलच इतक्यात...
बायको- कुठे गेली आहे ती?
नवरा- ती सांगून जाते का? कार्टी पार हाताबाहेर गेली आहे... जरा म्हणून बापाला धूप घालत नाही. आईचा नेमका तो एक गुण उचललाय...
बायको- माझ्यावर कसची जातेय, लहानपणापासून तुम्हीच वाढवलंय ना तिला...
नवरा- पण नऊ महिने तुझ्या पोटातून बापावर चाललेले अत्याचार ऐकत होती ना ती...
बायको- तुमची वायफळ बडबड झाली असेल तर आता आपण आपल्या मुलीविषयी बोलूया का?
नवरा- हो हो
बायको- मी काय म्हणते... बास झालं आता... पोरगी घोडनवरी व्हायच्या आत तिचं लग्न उरकून टाका...
नवरा- हो गं. किती वेळा सांगितलं तिला, पण ऐकेल तर शपथ...
बायको- अहो तेविसावं लागेल यंदा तिला... मी तिच्या वयाची असताना मला ती झाली होती...

(आतून जोरात हाक ऐकू येते)
डॅडी........
(मुलगी बॅग नाचवत आत येते)

पमी - हाय डॅड
नवरा- बाबा बोल...
पमी - हाय बाबा...
नवरा- कार्टे थोडी सुधार, जरा मुली सारखी वाग आता. बापाला नमस्कार करायचा सोडून हाय करतेस? तुझ्या अशा वागण्याने एक दिवस मीच हाय खाईन...
पमी - काही तरी बोलू नका हो बाबा... अजून थोडी वर्ष थांबा...
नवरा- असं म्हणतेस???? बरं थांबतो बुवा, मला तरी दुसरं काय काम आहे... नाहीतरी वर जाऊन पुन्हा तुझ्या आईच्या तावडीत सापडण्यापेक्षा हे बरंच बरं आहे...
बायको- काय गं घोडे, ह्या काय झिंज्या वाढवून ठेवल्यास?
नवरा- अगं तुझा आवाज तिला ऐकू येत नाही... ती शिक्षा मला एकट्यालाच आहे...
बायको- अहो... बघताय काय शुंभा सारखे... तेल लावून चांगली चापून चोपून वेणी घाला बघू तिची...
नवरा- असू दे गं...
पमी - कुणाशी बोलताय बाबा???
नवरा- स्वतःशीच बोलतोय गं... (फोटोकडे हात दाखवून) माणसाला वात झाला की होतं असं कधी कधी... तू कुठे गेली होतीस?
पमी -आपली कुंदा आहे ना...
नवरा- कोण कुंदा
बायको- अहो भिड्यांची मुलगी, अगदीच कसे हो वेंधळे तुम्ही... काही म्हणून काही लक्षात राहत नाही...
नवरा- हांहां... आठवलं आठवलं... तिची आई मिसेस कर्वे नगर स्पर्धेत पहिली आली होती तीच काही भिडे?
बायको- हे बरोबर लक्षात राहिलं तुमच्या...
पमी - यस्स... तीच ती कुंदा भिडे...
नवरा- काय झालं तिला?
पमी - तिला कुठे काय झालंय?
नवरा- अगं मग तिचं नाव का घेतलंस?
पमी - सांगते... तर मी आणि कुंदा आज तिच्यासाठी खरेदी करायला गेलो होतो तुळशी बागेत...
नवरा- बापरे...
पमी - बापरे काय त्याच्यात?
नवरा- अगं तुळशी बाग नावाचा तो एक असा चक्रव्यूह आहे की जिथे गेलेला माणूस परत कधी बाहेरच येत नाही...
पमी - काहीही काय हो...
नवरा- अगं हो... कित्येक नवर्‍यांच्या बायका पिशवी घेऊन आत शिरतात त्या आठवडेच्या आठवडे परतच येत नाहीत...
पमी - तुमचं आपलं अतीच असतं... हां थोडी गर्दी असते तिथे, पण ठीक आहे...
नवरा- बरं झालं तू आपली निघून आलीस ते...
पमी - तुम्ही काय केलंत बाबा सकाळ पासून? म्हणजे मॉर्निंग वॉक, त्या नंतर जय भारत मधला चहा प्लस कालचा पेपर (बायको: प्लस ह्यांची धुरांडी) वाचून घरी आल्यावर काय केलंत?


नवरा- आम्ही असा विचार करत होतो की...
पमी - आम्ही कोण?
नवरा- आम्ही म्हणजे मीच गं... आदरार्थी एकवचन म्हणतात त्याला. बरं, विषयांतर नको... तर, मी असा विचार करत होतो की...
पमी - की मी आता २ महिन्यात तेवीस वर्षाची होईन, माझं लग्नाचं वय उलटून चाललंय, आई माझ्या एव्हढी असताना तिला मी झाले होते त्यामुळे आता माझं लवकरात लवकर लग्न करायला हवं...
नवरा- बरोब्बर. मग कधी करायची सुरुवात मुलं बघायला?
पमी - करू हो बाबा, कसली घाई आहे?
बायको- त्या घोडीला म्हणावं तिला नसली तरी आम्हाला घाई आहे...
पमी - (आईच्या फोटोकडे बघत) आज आई असती तर तिने अजून ४-५ वर्ष तरी मला लग्न होऊन जाऊ दिलं नसतं...
बायको- मुस्काट फोडीन... शी: ह्या फोटो फ्रेम मध्ये गेल्यापासून मेलं काही म्हणजे काही करता येत नाही मला... अहो, धपाटा घाला बघू तिला एक.
नवरा- म्हणजे तशी तू मला जड झाली नाहियेस... पण तुझं लग्नाचं वय झालंय बाळा. आता उगाच थांबण्यात काय अर्थ आहे...
बायको- अहो असे मुळमुळीतपणे बोलू नका. चांगलं खडसावून सांगा... ३ महिन्यात लग्न आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
नवरा- ३ महिन्यात लग्न आणि १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी+ बायको - काय???
नवरा- ३ महिन्यात लग्न आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी - बाबा मला एक सांगा, तुम्ही लग्न केलं?
नवरा- हो केलं...
पमी - तुम्हाला लग्न करून काय मिळालं?
नवरा- काय मिळणार?
पमी - शाळेतल्या बाईंसारखी वागणारी एक बायको आणि माझ्यासारखी एक भन्नाट मुलगी...
नवरा - ह्म्म्म्म्म...
पमी - मी ही ह्याच सगळ्यातून जावं असं खरंच तुम्हाला वाटतं का?
नवरा- नाही...
पमी - नाही ना? मग का माझ्या लग्नाच्या मागे लागले आहात???
नवरा- कारण अशी बायको मिळायला तू मुलगा नाहियेस आणि मुलीचं लग्न २४ वर्षाच्या आत झालंच पाहिजे अशी आपल्या घराण्याची रीत आहे...
पमी - बाबा मी आयुष्यभर लग्न न करता रहायचं ठरवलंय...
नवरा- कार्टे... काहीही काय बोलतेस???
बायको- अहो कानाखाली वाजवा तिच्या आत्ताच्या आत्ता...
पमी - गंमत करतेय हो... द्या टाळी...
नवरा- अगं तुझ्या जिभेला काही हाड??? प्रत्यक्ष बापाची चेष्टा करतेस???
पमी - चेष्टा नाही हो बाबा, थोडी गंमत...
नवरा- तुझी गंमत जंमत झाली असेल तर आपण विषयाकडे वळूया का?
पमी - बोला...
नवरा- बोला काय? मी सत्यनारायणाची पूजा सांगतोय का? नीट लक्ष देऊन ऐक, येत्या तीन महिन्यात काहीही करून तुझं लग्न झालंच पाहिजे...
बायको- आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी - पण बाबा...
नवरा- पण बीण काही नाही...
पमी - ऐका तर माझं... अहो अजून मला किती तरी गोष्टी करायच्यात, कुठे कुठे फिरायचंय, बरंच काही काही बघायचंय...
नवरा- बघायचंय ना? मग मुलं बघ... वाटल्यास बरीच बघ... पण उद्यापासून तुझ्यासाठी वरसंशोधन सुरू
बायको- शाब्बास रे नवरया...इतक्या वर्षात पहिल्यांदाच माझ्या नवर्‍याला शोभेलंसं बोललास...
नवरा- गप्प बस माझे आई...
बायको- आता तुम्ही खुशाल माझ्या बाजूला लटका, मला जराही अपमान वाटणार नाही...
नवरा- मी उद्यापासूनच सुरुवात करतो... उद्याच गुरुजींकडे जाऊन पत्रिका टाकून येतो...
बायको- ऍहॅरे... आले मोठे पत्रिका टाकणारे... पत्रिका बनवली आहे का आधी... कानी कपाळी ओरडून सांगत होते तेव्हा ऐकलं नाही...
नवरा- अरे हो... पण आपण तुझी पत्रिकाच बनवली नाहीये... ठरलं तर, उद्या पत्रिका बनवण्यापासूनच सुरुवात करावी...
पमी - डॅड...
नवरा- काय गं?
पमी - बेस्ट ऑफ लक


बाप कपाळावर हात मारून घेतो. ब्लॅक आऊट)


क्रमशः

काकाचा कात्रज

| Labels: | Posted On 6/23/09 at 8:32 PM

तो काका मीच. आणि मला खिंडीत गाठणारा तो धाडसी बालवीर म्हणजे आमचे पुतणे चिमू / चिनू / चिम्या / चिन्या उर्फ चिन्मय. एके दिवशी एका अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त (लग्न होऊ घातलेल्या एका भावाची बॅचलर्स उकळणे) पुण्याला जाण्याचा योग आला. शुक्रवारची सुट्टी टाकली होती. शुक्रवारी सकाळी १२-१ पर्यंत झोपून, जेवून, दुपारची झोप झाल्यावर ४-५ च्या सुमारास निघायचे आणि उरलेली झोप वोल्वोत वसूल करत रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत पुण्यास पोचायचे असा माझा प्लॅन आमच्या पिताश्रींनी उधळून लावला. 'सुट्टी घेतली आहेस तर लवकर जाऊन वहिनी जरा मदत कर. ऐन वेळी पोचून नुसती पार्टी झोडून येऊ नकोस. तुम्हा सगळ्यांचं करता करता ती बिचारी एकटी दमून जाते'. आणि परस्पर त्यांनी मी १२ च्या आत काहीही करून पुण्यात पोचेनच असा फोन आमच्या बंधुराजांना करूनही टाकला. भावाने 'शेजारी चावी देऊन ठेवतो' असे सांगितले. १२ च्या सुमारास पुण्याला पोचलो. लंच टाइम मध्ये पोचल्याने भाऊ आणायला आला होता. त्याच्या सोबत जेवायचा आणि डिसेंबरच्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उतारा घ्यायचा प्लॅन ठरवला. उतारा घेता घेता लंच टाइम संपल्याने न जेवताच निघालो. साधारण २ च्या सुमारास घरापाशी पोचलो.

चिनू शेजारच्या इमारतीतल्या गोगटे आजींकडे खेळायला गेला होता. आजू बाजूची ६-७ मुलंही होती. भावाच्या आज्ञेनुसार तिथून चिनूला उचलला. त्यांचा ल्युडो रंगात आला असतानाच मी आल्याने 'ए काय रे काका, थोड्यावेळाने ये ना परत' असं त्याने मला सांगायचा प्रयत्न केला. पण मला घरी जाऊन ताणून द्यायची असल्याने पुन्हा येण्यास सवड होणार नव्हती. तो ऐकेना. शेवटी त्याला जबरदस्तीने उचलला, तेव्हढ्यात पायाला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं म्हणून खाली पाहिलं तर त्यांच्यातली एक चिमुरडी दात-ओठ खाऊन मला चिमटा काढायचा प्रयत्न करत होती. असो. शेवटी एकदाचा चिमू / चिनू / चिम्या / चिन्या ला काखोटीस मारून मी घरी आलो. घरी पोचतोय तोच श्वेता वहिनीचा फोन आला...

श्वेता वहिनी - आलास?
मी - कधीच... घरी येऊन जुना झालो...
श्वेता वहिनी - किती वाजता पोचलास?
मी - १२ च्या आसपास...
श्वेता वहिनी - रात्रीच स्टँडवर जाऊन बस मध्ये झोपला होतास की काय?
मी - काहीही काय अगं?
श्वेता वहिनी - मग इतक्या सकाळी कसा उठलास?
मी - तुझ्या नवऱ्याने नि त्याच्या काकाने मिळून गेम केलाय माझा...
श्वेता वहिनी - जेवणाचं काय?
मी - काय जेवणाचं?
श्वेता वहिनी - दादा बरोबर बाहेर जेवायला गेला होतास ना?
मी - तुला कसं कळलं?
श्वेता वहिनी - हो की नाही?
मी - हो...
श्वेता वहिनी - मग नेहमी प्रमाणे गप्पांच्या ओघात नुसतेच घसे ओले करून जेवायचं विसरला असाल...
मी - हो...
श्वेता वहिनी - फ्रीज मध्ये तुझ्यासाठी भाजी ठेवली आहे. मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घे.
मी - हो वहिनीसाहेब...कोणती भाजी केली आहेस?
श्वेता वहिनी - तुझ्या आवडीची मेथीची....
मी - अरे काय?????
श्वेता वहिनी - गंमत करतेय रे...
मी - माहिती आहे गं, जुनी झाली ही गंमत...
श्वेता वहिनी - गप्प बस. आणि ऐक, मायक्रोवेव्ह मध्येच गरम कर, मागच्या वेळेसारखी माझी कढई जाळू नकोस...
मी - हो गं, आणि ती कढई मी नाही तुझ्या नवर्‍याने जाळली होती...
श्वेता वहिनी - अशक्य आहे...
मी - का?
श्वेता वहिनी - तो इतके कष्ट घेणंच शक्य नाही...
मी - जाऊ दे, चल मी आता जेवणाची सोय बघतो. तू किती वाजता येतेयस?
श्वेता वहिनी - साधारण ७ वाजेपर्यंत येईन...
मी - आणि शलू?
श्वेता वहिनी - ती नाही यायची, आई सोबत बाहेर गेली आहे...
मी - बरं... टाटा
श्वेता वहिनी - बिर्ला

फोन ठेवल्यावर समोर चिन्मय साहेब हसत उभे असलेले दिसले.

मी - काय रे, हसतोयस का???
चिनू - आई ओरडली ना तुला?
मी - छे रे...
चिनू - मी ऐकलं...
मी - आई कडून ओरडा खायला मी काय तुझा बाबा आहे?
चिनू - पण मी ऐकलं...
मी - राँग नंबर होता रे...
चिनू - असा कसा असेल? काय नंबर लावलास?

(असं म्हणून माझ्या हातातला फोन काढून घेतला. ह्या ५-६ वर्षाच्या कार्ट्याला इतकी अक्कल कधी आली असा विचार करत असतानाच पठ्ठ्याने कॉलर लिस्ट मध्ये असलेला श्वेता भाई असा नंबर मला दाखवला. )

चिनू - काका तू आईला भाई म्हणतोस????
मी - प्रकटः नाही रे (स्वगतः अरे तुझ्या बाबानेच नाव ठेवलंय ते.)
चिनू - मग आईच्या नावापुढे भाई का लिहिलंयस?
मी - अरे चुकून लिहिल्या गेलं असेल?
चिनू - मी सांगणार आईला...
मी - नको................ थांब मी बदलतो लगेच....
चिनू - तरी मी सांगणार....
मी - मी तुझा लाडका काका आहे की नाही?
चिनू - छट... श्री काका माझा सगळ्यात लाडका आहे...
मी - का?
चिनू - त्याने मला २ मोठे डबे भरून गोट्या आणि ४ भवरे दिले... पण भवरे फिरवायला नाडी नाही दिली...
मी - घे तुझ्या बाबाच्या चड्डीची...
चिनू - घेतली होती...
मी - शाब्बास....
चिनू - पण आईने ती माझ्याकडून काढून घेतली आणि रद्दीच्या गठ्ठ्याला बांधली...
मी - मग तुझ्या चड्डीची घे...
चिनू - माझ्या चड्डीला नाडी नाहीये...
मी - बरं मग मी तुला नवी कोरी नाडी घेऊन देईन हां... पण तू आईला काही सांगू नकोस...
चिनू - चालेल... आपण संध्याकाळी बाहेर जाऊ तेव्हा घेऊ...
मी - चालेल...
चिनू - काका... इथे जवळच बाग आहे, तिथे पण जाऊया?
मी - हो...
चिनू - बागे समोर ना उंटावरून चक्कर मारून आणतात...
मी - बरं...
चिनू - आणि बागेच्या गेटपाशी म्हातारीचे केस पण मिळतात...
मी - बरं...
चिनू - आणि....
मी - चिनू मला भूक लागली आहे, मी जेवून घेऊ का आत जरा?
चिनू - ऐक ना... जेवता जेवता ऐक...

फ्रीज उघडला तर आत मध्ये कांदा-बटाटाच्या रस्सा आणि गुलाबजाम दिसले. पुन्हा वहिनीला फोन लावून किती वेळ टायमर लाऊ वगैरे विचारलं. ताट वाढून बाहेर आलो तर स्वारी कागद पेन्सिल घेऊन काही तरी चित्र काढत होती.

मी - कसलं चित्र काढतोय रे?
चिनू - हत्तीचं
मी - अरे वा, तुला हत्ती आवडतो वाटतं?
चिनू - नाही
मी - मग का काढतोयस?
चिनू - मला येत नाही म्हणून आईने काढायला सांगितलंय...
मी - अरे पण येत नाही तर काढणार कसा?
चिनू - ह्म्म्म्म... काका तू काढून दे ना मग...
मी - (स्वगतः बापरे) अरे मी जेवतोय... (डोळ्यासमोर चित्रकलेचा तास आणि मी भगव्या रंगाचं गुलाब काढलं म्हणून पट्टी मारणारे मास्तर उभे राहिले)
चिनू - जेवण झाल्यावर काढून दे मग...
मी - (स्वगतः गेली दुपारची झोप) अरे पण आईने तुला काढायला सांगितलंय ना?
चिनू - अरे पण मला कुठे येतं काढता...
मी - (आईडिया) जेवण झालं की मला थोडं काम आहे...
चिनू - पटकन काढून दे ना, मग मी तुला गोष्ट सांगीन...
मी - कसली गोष्ट?
चिनू - आमच्या वर्गात मी सांगितली एक गोष्ट
मी - तू शाळेत कधी पासून जायला लागलास?
चिनू - शाळेत नाही, आमच्या डे-केअर मध्ये...
मी - बरं बरं... कसली गोष्ट होती?
चिनू - तू आधी चित्र काढून दे मगच मी गोष्ट सांगीन
मी - पण मी चित्र काढल्यावर तू गोष्ट नाही सांगितलीस तर?
चिनू - सांगीन ना मी...
मी - बरं बाबा, ओरडू नकोस...

जेवण झाल्यावर चित्र काढायला बसलो. बऱ्याच मेहेनती नंतर, भरपूर खाडाखोड करून शेवटी एकदाचा हत्ती काढला. तोवर बाळराजे टिव्ही बघण्यात गुंग होते.

मी - चिनू... झालं बघ चित्र काढून...
चिनू - ये... ये...

थोडावेळ चिनूने चित्र निरखून बघितलं.

चिनू - काका, पुस्तकातला हत्ती असा दिसत नाही...
मी - अरे खरा हत्ती असाच असतो...
चिनू - पण हत्तीला सोंड असते...
मी - अरे ही काय सोंड (असं म्हणून मी एके ठिकाणी बोट टेकवलं, तर ती सोंड आहे की शेपटी हे मलाच ओळखता येईना)
चिनू - मग शेपटी कुठाय...
मी - अरे शेपटी नाहीये ह्या हत्तीला...
चिनू - मला पूर्ण हत्ती हवाय...
मी - अरे ह्याला अजून शेपटी उगवली नाहीये...
चिनू - नाही ना...
मी - अरे खरंच... हा लहान हत्ती आहे... हे बघ, तुझ्या शलू ताईचे केस आई इतके लांब आहेत का?
चिनू - नाही...
मी - तसंच ह्या हत्तीचं आहे...
चिनू - अरे पण शलू ताई मुलगी आहे हा हत्ती आहे, आणि तिला शेपटी कुठाय?
मी - ते ही आहेच, मग आता काय करायचं?
चिनू - मी तुला गोष्ट नाही सांगणार...
मी - बरं, मी तुला आता एकदम पुस्तकातल्या सारखा हत्ती काढून देतो. मला शाळेत चित्रकलेत १० पैकी १० मिळायचे.

ह्यावर चिनूचा विश्वास बसला नाही. काका आपल्याला गंडवतोय असा संशय त्याला आला. थोडा हिरमुसला होऊन तो सोफ्यावर जाऊन बसला.

मी - काय झालं रे?
चिनू - आता आई मला ओरडणार...
मी - का? बाबा येणार नाहियेत का घरी आज?
चिनू - म्हंजे?
मी - म्हंजे काही नाही... आई का ओरडणार?
चिनू - मी हत्तीचं चित्र काढलं नाही म्हणून...
मी - अरे पण आपण काढलाय की हत्ती...
चिनू - पण तो पुस्तकातल्या हत्ती सारखा दिसत नाही ना...
मी - मग कुणासारखा दिसतो?
चिनू - मला नाही माहिती...
मी - बरं तू मला गोष्ट सांग...
चिनू - नाही आधी तू हत्ती काढ...

हे हत्ती प्रकरण मला भलतंच जड जाणार असं वाटून मी चिनूला बागेत घेऊन जायचा विचार केला. त्याला कपडे घेऊन याला सांगितलं तर महाराज त्यांचं नाडीचं धोतर आणि छब्बा घेऊन आले.

मी - अरे हे घालून कसं बागेत जाणार?
चिनू - पण मला हे आवडतं ना...
मी - बागेत खेळताना खराब होईल बाळा धोतर...
चिनू - मग आपण ते वॉशिंग मशीन मध्ये धुऊया
मी - पण अरे ह्या कपड्यात खेळता नाही येणार...
चिनू - मला हेच कपडे हवेत ना पण...
मी - बरं बाबा घाल...
चिनू - तू घालून दे...

बर्‍याच कसरतीनंतर एकदाचं धोतर आणि छब्बा घालून साहेबांना तयार केलं आणि बिल्डिंगच्या बाहेर आलो.

चिनू - काका पाय दुखतायत...
मी - का रे? नको जाऊया का मग बागेत?
चिनू - आपण रिक्षाने जाऊया ना...
मी - बरं...

ह्या चित्र प्रकरणामुळे अजूनही चिनू थोडा हिरमुसलेलाच वाटत होता. ढेंगेवरच्या बागेत रिक्षाने पोचल्यावर सी-सॉ, झोपाळा, घसरगुंडी, मातीत किल्ला बनवायचा अयशस्वी प्रयत्न, उंटावरून चक्कर, घोड्यावरून चक्कर, कुल्फी, म्हातारीचे केस अशी साग्रसंगीत समजूत काढल्यावर स्वारी पुन्हा खिदळायला लागली. नशिबाने कपडे फार खराब झाले नव्हते. शेवटी जाता जाता एकदा शेवटचं म्हणून चिनू घसरगुंडीवर घसरायला गेला आणि येताना नुसता छब्बा आणि हातात फाटकं धोतर अशा अवतारात आला. त्याला असा बघून मला हसूच आलं.

मी - धोतर कसं फाटलं रे?
चिनू - माहिती नाही काका. खाली घसरगुंडीवरून घसरलो तर धोतर वरच राहिलं. खाली काढायला म्हणून धोतराला लटकलो तर फाटलं.
मी - धन्य आहेस, लागलं नाही ना कुठे?
चिनू - नाही...
मी - नशीब माझं, जाऊ दे, फाटलं तर फाटलं धोतर, आपण तुझ्यासाठी आत्ताच्या आत्ता नवीन घेऊ.
चिनू - ये... ये...
मी - हे धोतर कधी घेतलं रे?
चिनू - मागच्या महिन्यात आजीने आणलं.
मी - अरे वा, मज्जाय एका मुलाची...
चिनू - मज्जा नाही, २ महिन्यांनी माझी मुंज आहे ना तेव्हा घालण्यासाठी आणलं आज्जीने...
मी - काssssss य????????? अरे गधड्या मेलो मी...
चिनू - का?
मी - अरे मुंजीसाठी घेतलेलं धोतर आत्ता का घालून आलास?
चिनू - मला ते धोतर खूप आवडतं पण आई घालूच देत नाही...
मी - अरे लागली वाट, आता थांब इथे थोडावेळ मला विचार करू दे...

लगेच मी आमच्या बंधुराजांना फोन लावला आणि सगळी हकीकत त्याच्या कानावर घातली.

मी - दादा, आता वहिनी मला बदडणार...
दादा - हो ना...
मी - हो ना काय अरे... काही तरी सुचव ना...
दादा - अरे मलाच सुचत नाहीये. त्यात ते धोतर हिच्या आईने वाराणसीहून आणलं होतं चिनूच्या मुंजीसाठी... तुझ्या बरोबर आता माझी पण वाट
मी - मेलो आता...
दादा - हो ना...
मी - अरे हो ना काय? मी एक काम करतो, चिनूला तुझ्या ऑफिसमध्ये सोडून मुंबईला जातो परत...
दादा - गप्प बस रे... आईडिया... श्वेता अजून आली नसेल घरी, तू पटकन घरी पोच, चिनूला अंघोळ वगैरे घालून, कपडे बदलून गोगटे आजींकडे सोडून ये.
मी - ओक्के...

घाईघाईत चिनूला घेऊन रिक्षाने बिल्डिंगपाशी पोचलो. रिक्षावाल्याला पैसे देत होतो तितक्यात समोर एक रिक्षा येऊन थांबली आणि त्यातून आमच्या वहिनीसाहेब उतरल्या. चिनू माझ्या मागे लपला. मला बघून श्वेता हसली. पण जसजसा तिला चिनू आणि हातातलं फाटकं धोतर दिसलं तसे चेहऱ्यावरचे भाव बदलत बदलत अतिशय हिंस्र झाले. सगळ्यांसमोर माझ्यावर हल्ला केला तर साक्षीदार राहतील म्हणून असेल कदाचित पण तिने घेरी पोचेपर्यंत राग कसाबसा आवरला. घरी पोचताच रणकंदन माजले.

श्वेता वहिनी - चिनू... धोतर कसं फाटलं... तू आत्ताच्या आत्ता वाराणसीला जाऊन असंच्या असं धोतर घेऊन ये (हे वाक्य माझ्यासाठी होतं. अचानक मला त्या गुढघ्या एव्हढ्या पोराचा आधार वाटू लागला.)

श्वेता वहिनी - चिनू तुला हजारवेळा नको सांगूनही तू हे धोतर का घातलंस?
चिनू - मी नाही घातलं, काकानी घालून दिलं...
मी - अरे तूच घेऊन आलास ना हे धोतर कपाटातून...
श्वेता वहिनी - तो लाख घेऊन येईल, तू घालून का दिलंस, घरातल्या कपड्यांवरच घेऊन जायचं होतंस ना त्याला...
मी - अगं पण...
श्वेता वहिनी - आद्या एक शब्दही बोलू नकोस, आत्ताच्या आत्ता वाराणसीला जाऊन असंच्या असं धोतर घेऊन ये...
मी - अगं मी पुढल्या महिन्यात जाणार आहे वाराणसीला तेव्हा नक्की आणीन...
श्वेता वहिनी - मला टेपा लाऊ नकोस...
मी - अगं खरं सांगतोय...
श्वेता वहिनी - चिनू तू कोपऱ्यात भिंती कडे तोंड करून उभा राहा आणि १० वेळ १०० पर्यंत आकडे मोज.
मी - अगं त्या पेक्षा १००० मोजायला सांग ना सरळ
श्वेता वहिनी - त्याला १०० पर्यंतच आकडे येतात... आणि तू एक शब्दही बोलू नकोस नाहीतर तुलाही उभा करीन मी...
(चिनूला स्वत: वरचं राज्य घालवायची युक्ती सापडली)
चिनू - आई... काकानी तुला श्वेता भाई नाव ठेवलंय...
श्वेता वहिनी - काssssss य????
मी - नाही गं
चिनू - हो आई, मी काकाच्या फोन मध्ये पाहिलं...
श्वेता वहिनी - आद्या फोन बघू तुझा...
मी - गंमत गं जरा...
श्वेता वहिनी - तुला आणि तुझ्या भावाला धरून बदडलं पाहिजे, खूप लाडावून ठेवलंय तुम्हा सगळ्यांना... चिनू तू हसू नकोस, आकडे मोज...

(तेव्हढ्यात आमच्या सुदैवाने दादाची एंट्री झाली.)

दादा - काय गं काय झालं चिडायला इतकं?
श्वेता वहिनी - हे बघ, आईने वाराणसीहून आणलेलं धोतर चिनू ने घालून फाडलं...
दादा - अगं ठीक आहे, साधं धोतर आहे ते, तुझी पैठणी फाटल्यासारखी काय चिडतेयस?
मी - मी म्हणालो की पुढल्या महिन्यात वाराणसीला जाणारच आहे तिथून आणीन नवीन. दादासाठी पण आणीन...
श्वेता वहिनी - वाट बघतेय मी...
चिनू - काका मला दोन आण...
श्वेता वहिनी - चिनू आकडे झाले का मोजून?
दादा - जाऊ दे गं, ये रे चिनू बाबाकडे
श्वेता वहिनी - बिघडवा त्याला अजून, जरा म्हणून ओरडू देत नाहीत...
मी - अगं दादा आहे ना तुझ्यासाठी...
श्वेता वहिनी - नालायकपणा नकोय, थांब, तुझंही आता लग्न करायला सांगते काकांना... बास झालं एकट्याने उंडारणं आता...

(ही भयानक धमकी ऐकून मी ताडकन उठलो.)

मी - मी येतो...
श्वेता वहिनी + दादा - काय रे कुठे निघालास?
मी - वाराणसीला...

----------------------------------------समाप्त----------------------------------------

बंड्याची शाळा - धडा पाचवा

| Labels: | Posted On 5/18/09 at 11:44 PM

बंड्याची शाळा

(धडा पाचवा - दहावी)



'ह्या वर्षी काय उंडारायचं ते उंडारून घ्या, पुढल्या वर्षी दहावी आहे' ह्या वाक्याने नववीत असताना दहावी जवळ आल्याची नांदी झाली.

नववी पर्यंत सहामाही आणि वार्षिक परीक्षेला अर्ध अर्ध पुस्तक असायचं. दहावीला वार्षिक परीक्षेला प्रत्येक विषयाचं अख्खं पुस्तक असतं हे कळल्यावर मनात धडकी भरली, पाचावर धारण बसली, पोटात गोळा आला, हात पाय गारठले. सगळ्या विषयांचा इतका अभ्यास करायचा ह्या विचारानेच आपण कधीच दहावीला जाऊ नये असं वाटायचं.

दहावीच्या वर्षाला सुरुवात नववीची परीक्षा झाल्यावर लगेच झाली. नववीचा रिझल्ट लवकर लावून त्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच शाळेत दहावीचे स्पेशल क्लासेस सुरू झाले. त्या २ महिन्यात सगळा पोर्शन संपवणार हे कळल्यावर 'आता वर्षभर उसाटायला मोकळे, उगाच लोक दहावीचा बाऊ करतात', असं वाटलं होतं. पण ही माहिती अर्धवट होती. त्या २ महिन्यात सगळ्या विषयांचा ओव्हरव्ह्यू देऊन मग वर्षभर सगळे विषय चवीचवीने शिकवण्यात येणार असं कळलं. उन्हाळ्याची सुट्टी हिरावून घेण्याचं पातक करणार्‍या त्या दहावी विषयी वर्षाच्या सुरुवातीलाच मनात अढी बसली.

उन्हाळी वर्गांच्या पहिल्याच दिवशी सरांनी 'बघा, हा एप्रिल महिना संपत आलाय. पुढल्या मार्च मधे म्हणजे ११ महिन्यात तुमची दहावीची परीक्षा. दिवसातले ८ तास झोप धरली तर उरतात ७ महिने. त्यात शाळा आणि ट्यूशनचे रोजचे ८ तास धरले तर उरतात ३ महिने. १ महिना सुट्टी, पाहुणे, सणवार, घरची मंगल कार्य वगैरे साठी धरला तर तुमची २ महिन्यात दहावीची परीक्षा आहे' असं भन्नाट गणित मांडून सगळ्यांना घाबरवलं होतं. त्या दिवशी सगळे विमनस्क अवस्थेत वर्गातून बाहेर पडले होते. भल्या भल्यांची जिरली होती. मी मी म्हणणारे गळपटले होते. सार्वजनिक डिप्रेशन आलं होतं. आपल्याकडे इतका कमी वेळ आहे??? काहीही काय???

ह्या सगळ्यामुळे शाळेतली हुशार मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीपासूनच अभ्यासाला लागली. आमच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला दिवसाचं वेळापत्रक बनवून आणायला सांगितलं. मी बनवलं. ते टाईमटेबल पाहून सरांनी आधी स्वतः:च्या कपाळावर आणि नंतर माझ्या पाठीवर हात मारला.

सकाळी १०-११ - तयारी, न्याहारी.
सकाळी ११-१२ - जेवण, शतपावली.
दुपारी १२-५ - शाळा
संध्याकाळी ५-७ - न्याहारी, खेळ
संध्याकाळी - ७-९ जेवण, टीव्ही, शतपावली
रात्री ९-१० गृहपाठ, अभ्यास.
रात्री १० च्या पुढे झोप

अरे रोज १ तास अभ्यास करून तू परीक्षेत काय उजेड पाडणार???
पण रोज शाळेत येणार आहे की ५ तास
अरे शाळेत अभ्यास होतो का?
सर मग मी घरीच बसत जाऊ का?

पुन्हा एकदा माझ्या पाठीवर आणि गालावर हात मारून सरांनी मला नवीन टाइम टेबल बनवून दिलं. त्या वेळापत्रकानुसार माझा दिवस पहाटे ५ ला सुरू होऊन रात्री १२ ला संपणार होता. आणि इतके तास जागूनही दोन्ही वेळची न्याहारी, जेवण, खेळ ह्या साठी दिवसभरात फक्त एक तास दिला होता. हे भयानक वेळापत्रक मी आईच्या हाती लागू देणं शक्यच नव्हतं त्याची रवानगी तत्काळ आमच्या बिल्डिंगच्या इलेक्ट्रिक बॉक्स मधे करण्यात आली. तिथे माझं प्रगती पुस्तक, तपासून दिलेले पेपर, सरांनी बाबांसाठी दिलेल्या चिठ्ठ्या अशा हरवलेल्या सगळ्या गोष्टी सापडायच्या.

दहावीचा दुसरा त्रास म्हणजे, अमेरिकेहून आलेली लोकं जशी प्रत्येक वाक्याची सुरुवात अथवा शेवट 'अमेरिकेत ना...' ने करतात तसं आमच्या बाबतीत उच्चारल्या जाणार्‍या प्रत्येक वाक्याची सुरुवात अथवा शेवट 'यंदा दहावी ना?' ने व्हायचा. कुठेही जायची सोय नाही. प्रत्येक जण सल्ले द्यायला टपून बसलेला. चुकून गेलो तर 'अरे... दहावी आहे ना तुझी' असं ऐकावं लागायचं. मला काही फरक पडत नसे, पण शेवटी लोकलाजेस्तव आई-बाबांनीच मला बाहेर न्यायचं बंद केलं. बरं नाही गेलो तर 'आलाय मोठा दहावी वाला, आम्ही काय कधी शाळेत गेलो नाही की काय' असं ऐकावं लागे. जीव अगदी मेटाकुटीला आला होता. त्यात सहामाही नंतर तर मला घरूनच कर्फ्यू लागला होता.

घरी पाहुणे आले की माझी रवानगी आतल्या खोलीत होत असे. मला त्रास होऊ नये म्हणून सगळे हळू आवाजात बोलत. पाहुणेही एकदाच आतल्या खोलीत पेशंटला भेटायला आल्यासारखे तोंड दाखवून जात. मग बाहेर इतरांसोबत हास्य विनोद सुरू. आणि मी वाळीत टाकल्यासारखा एकटा आत. टीव्ही बंद कारण माझी दहावी आहे, खेळायला जायचं नाही कारण माझी दहावी आहे, उशीरापर्यंत लोळायचं नाही कारण माझी दहावी आहे, सुट्टीत कुठे बाहेर जायचं नाही कारण माझी दहावी आहे. एकदा तर दादाने मला चॉकलेट दिलं नाही कारण म्हणे माझी दहावी आहे. अरे काय????????? अशा वेळी ओरडून म्हणावंस वाटे 'अरे हो... आहे माझी दहावी, काही पाप केलंय का मग मी? असे नका वागू माझ्याशी... मला आपलं म्हणा...' झक मारली नी दहावीत गेलो असं वाटायचं त्या वेळी.

पण सांगणार कोणाला? बाबांना सांगितलं तर 'नऊ वर्ष उनाडक्याच केल्यात, ह्या वर्षी तरी अभ्यास करा...' असं ऐकायला मिळालं. घरी आलेले एक काका मला एकदा म्हणाले होते 'अरे आमच्या वेळी आम्हाला काही न करता सहज फर्स्ट क्लास मिळत असे...' मला त्यांच्या शाळेत का नाही घातलं म्हणून बाबांवर प्रचंड रागावलो होतो त्या दिवशी.

आमच्या शाळेने त्या वर्षी दर महिन्याला परीक्षा घ्यायचं ठरवलं. पूर्वी वर्षातून चारच वेळा खायला लागणारा रिझल्ट नंतरचा मार आता दर महिन्याला मिळणार म्हणून प्रचंड चिडचिड झाली. असो.

दहावी खरं तर इतका भयानक प्रकार नाहीये. पण त्याचा विद्यार्थ्यांपेक्षा इतर लोकंच इतका बाऊ करतात की मुलं बिचारी घाबरतात. मला घाबरवण्याचा प्रयत्न करताना एका सरांनी 'ह्या वर्षी अभ्यास नाही केलास नी कमी मार्क्स मिळाले
तर कुठे तरी गॅरेज काढावं लागेल' असं सांगितलं होतं. मुळात मला गाड्या आणि बाईक्सची प्रचंड क्रेझ असल्याने ती धमकी न वाटता आमंत्रणच वाटलं होतं. मी लगेच रात्री बाबा आल्यावर त्यांना विचारलं 'मी ह्या वर्षी कमी मार्क्स मिळवले तर मला गॅरेज काढून द्याल का?' बाबांनी उत्तर काय दिलं हे सांगायला नकोच.

असे दिवस सुखात जात असताना एकदाचं दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक आलं. पुन्हा त्यावरून काही मंडळी नाराज झाली. पण आता जे आहे ते आहे तसं स्वीकारण्या शिवाय पर्याय नसल्याने गपगुमान अभ्यासाला लागली. आम्ही आपले निवांतच होतो. पण जशी जशी परीक्षा जवळ येत होती तस तसं आई-बाबांचं टेन्शन अजूनच वाढत होतं. बुद्धी तल्लख व्हावी म्हणून रात्रभर भिजवलेले बदाम, च्यवनप्राश, वगैरेंचा मारा सुरू झाला. हे सगळं मी हसत मुखाने फस्त करत होतो. माझी अभ्यासातली गती आणि उत्साह बघून आई एखाद्या देवाला नवस करावा की काय ह्या विचारात पडली. जुन्या आणि नव्या २१ अपेक्षितचे ढीग घरी येऊन पडले.

एकदाचा परीक्षेचा दिवस उजाडला. पहिला पेपर शिरस्त्याप्रमाणे मराठीचा होता. घरून निघताना सगळं घेतलंय का अशी शंभरवेळा चौकशी झाली. हॉल तिकीट नावाचा एक प्रकार जो माझ्यासारखी बहुतेक मुलं परीक्षा येईपर्यंत एकतर हरवतात अथवा परीक्षेला न्यायचा विसरतात तो बाबांनी ताब्यात घेतल्यामुळे चिंता नव्हती. मी निघताना आई-बाबांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून दहावी ही वाटतं तितकं सोप्प प्रकरण नाहीये अशी शंका मनाला चाटून गेली.

परीक्षाकेंद्राला तर पार अवकळा आली होती. सगळीकडे टेन्शन मधे असलेले पालक. शेवटचं वाचून घेणारे विद्यार्थी आणि काही ठिकाणी त्यांच्या डो़क्यावर छत्री धरून, पाणी घेऊन उभे असलेले पालक हे सगळं बघून अंमळ मजा वाटली. पहिला पेपर झाल्यावर बाकीचे पेपर्स धडाधड संपले.

तर अशा प्रकारे आमचा आणि आमच्या बिचार्‍या पालकांचा जीव नकोसा करणारी दहावी एकदाची संपली आणि आमचं घोडं एकदाचं गंगेत न्हायलं.

----------------------------------------------समाप्त---------------------------------------------

बंड्याची शाळा - धडा चौथा

| Labels: | Posted On 5/17/09 at 8:47 PM

बंड्याची शाळा
(धडा चौथा - परीक्षा)



मी माझ्या आयुष्यात परीक्षेला कधीच घाबरलो नाही. मला फक्त रिझल्टची भीती वाटायची. पण कष्टाविण फळ नाही ह्या सुविचारानुसार सुट्टी हवी असेल तर परीक्षा द्यावीच लागायची. मास्तर एक एक धडा दोन दोन तासात उडवू लागले की कळायचं परीक्षा जवळ येतेय. पाचवी पर्यंत धड्याखाली दिलेल्या प्रश्नावलीतूनच पेपरसाठी प्रश्न निवडले जात. त्या नंतर त्रास सुरू झाला. मुलांना विषयाची जाण किती आहे हे समजून घेण्याचे वायफळ प्रयत्न सुरू झाले. रट्टा मारून पुस्तक पाठ होतं पण विषय समजत नाही हे कळायला मला फार उशीर झाला. परीक्षा येतेय येतेय म्हणता म्हणता एके दिवशी बोर्डावर परीक्षेचं वेळापत्रक लागायचं. वेळापत्रक लागलं की मुलं अभ्यासाचं प्लॅनिंग करायला सुरुवात करायचे. आम्ही शेवटचा पेपर कधी आहे हे पाहून सुट्टीत काय करायचं ह्याचं प्लॅनिंग करायचो.

इतक्या वर्षात हे वेळापत्रक पाहून खूश झालेला एकही विद्यार्थी मी पाहिला नाही. कुणाला मराठीचा पेपर पहिला हवा असायचा, कुणी गणित शेवटी म्हणून नाराज, कुणाला इतिहासापासून सुरुवात हवी असायची, एक ना दोन. मी आणि माझा कंपू मात्र 'वा, काय झकास टाइम टेबल आहे' असं म्हणून लोकांच्या दु:खावर डागण्या द्यायचो. कुणी तरी आश्चर्यचकित होऊन विचारायचं 'तुला मराठीचा पेपर पहिला चालेल?' उत्तर मिळायचं 'हो, माझा सगळा अभ्यास झालाय...' ह्या सगळ्या गडबडीत वेळापत्रक उतरवून घ्यायचं हमखास विसरायचो. आपण कितीही बोललो, निषेध व्यक्त केला तरी वेळापत्रक बदलणार नाही हे माहिती असल्याने 'आलिया भोगासी असावे सादर' ह्या सल्ल्याचं पालन करायचो.

नाही म्हणायला नववीत असताना सहामाही परीक्षेच्यावेळी वेळापत्रकात बदल होईल का असं मास्तरांना विचारायला गेलो होतो. पहिला पेपर भुगोलाचा होता, तो शेवटी असावा असं सगळ्यांचं मत पडलं. पण हे मास्तरांना सांगणार कोण? मुलांनी आप-आपसात बरीच चर्चा केली. ह्या चर्चेत आम्हाला अजिबात इंटरेस्ट नव्हता, तरी गंमत म्हणून तिथे बसलो होतो. शेवटी सगळ्यांनी परस्पर माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं. माझं नाव पुढे आलं ह्याची कारणं 'तू बिंधास्त आहेस' पासून 'तुला मार खायला काही वाटत नाही' इथपर्यंत अनेक होती. तर, हो नाही हो नाही करता करता तयार झालो. वर्गातून मोठ्या धीटपणे बाहेर पडलो, मनातून मात्र पार घाबरलो होतो. टिचर्स रूम मध्ये गेलो. टिचर्स रूम मला कायम एखाद्या डाकूच्या अड्ड्यासारखी वाटायची. डाकू कसे गावोगाव फिरून, गावकर्‍यांन लुटत, चोपत अड्ड्यावर परत येतात आणि सरदाराला सलामी देतात, तसंच काहीसं. सगळे शिक्षक आपापल्या वर्गातून विद्यार्थ्यांना बदडून, चोपून मुख्याध्यापकांना सलामी द्यायला इथे येतात असं वाटे. मग ते आपल्या पुढच्या हल्याविषयी इतर डाकूंशी सल्ला मसलत करत.

असो. तर, मी मोठा धीर करून टिचर्स रूमच्या दरवाज्यापाशी गेलो. सगळ्या शिक्षकांनी एकदम माझ्याकडे बघितलं.
आवंढा गिळून म्हणालो 'सर...'
तीन चार जणांनी 'काय रे???' म्हणून दरडावलं.
पुन्हा एक आवंढा 'सोनावणे सर...'
माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत सर म्हणाले 'काय रे???'
सर जरा बोलायचं होतं...
बोल की मग...
सर, भुगोलाचा पेपर शेवटी ठेवता येईल का?
का?
असं सगळे म्हणतायत...
कोण म्हणतंय असं???
सगळे...
नावं सांग...
सर, सगळ्यांची नावं कशी सांगू???
शहाणपणा करू नकोस. सतीश, जा रे नववीच्या वर्गातून ४-५ मुलांना घेऊन ये...
शेवटच्या बाकावरची का?...
कुठचीही आण रे...
नुसती मुलंच आणू की १-२ मुलींनाही घेऊन येऊ...
अरे जा आता नाही तर कानफटवीन...

सतीश आमच्या वर्गातून २ मुली, एक बरीच वर्ष नववीत असलेला मुलगा आणि एक हुशार मुलगा अशी व्हेरायटी घेऊन आला. मी तिथेच असल्याने अजून एक 'ढ' मुलगा आणायची त्याला गरज वाटली नसावी. सगळे हलाल व्हायला आल्यासारखे आले.

काय रे...
काय सर...
भुगोलाचा पेपर शेवटचा हवाय का?

हे वाक्य सरांनी अशा जरबेने विचारलं की सगळ्यांनी एकजात हात वर केले. मी अडकलो. नशिबाने मला मार खायला काही वाटायचं नाही म्हणून बरं. एकदा मी पिटीच्या सरांना विचारलं होत 'सर नेहमी नेहमी त्याच त्याच मुलांना मारून तुम्हाला कंटाळा नाही का हो येत?'

तर, परीक्षेचं वेळापत्रक लागलं की मुलांची धावपळ सुरू व्हायची. आम्ही निवांत असायचो. आमच्या शाळेतली बरीच मुलं माझ्याच सोसायटीत राहत असल्याने वेळापत्रक लागल्यानंतर मैदान ओस पडायचं. ह्या दिवसात अख्खं मैदान आम्हाला मिळायचं. पण घरच्यांना आमच्या परीक्षेची काळजी आमच्यापेक्षा जास्त असल्याने हे सुख फार काळ टिकायचं नाही. त्यानंतर सुरू व्हायचा अभ्यास नावाचा एक दिव्य प्रकार.

सर्वात आधी आमचं संध्याकाळचं खेळणं आणि टीव्ही बंद व्हायचा. त्यामुळे अभ्यास करावा लागतो ह्या पेक्षा दंगा करता येत नाही ह्याचं दु:ख फार असायचं. मला रात्री जागणं आणि भल्या पहाटे अभ्यासासाठी उठणं कधीही जमलं नाही. सतत डुलक्या यायच्या. 'ट्रीपला जाताना कसा रे उठतोस स्वतःहून' 'अगं ती ट्रीप असते...' ' मग आताही ट्रीपला जायचंय असं समजून ऊठ आणि ट्रीपला न जाता अभ्यासाला बस.'

मला मनात कुठे तरी आशा होती की आई वैतागून मला अभ्यास करायला लावण्याचा नाद सोडून देईल. पण तसं काही झालं नाही. मी कितीही प्रयत्न केले तरी त्याना न जुमानता आई दामटून अभ्यासाला बसवायची. शाळा आणि कॉलेज अशा १५ वर्षात अभ्यासावरून मी आईचं किमान १५,००० लीटर रक्त आटवलं असेल. माझ्याकडून अभ्यास करून घ्यायची आईची चिकाटी भन्नाट होती. मोठा भाऊ बिचारा साधा सरळ होता. पहिल्या हाकेला उठायचा. सगळं आवरून १५ मिनिटात अभ्यासाला सुरुवात. त्याची अभ्यासाला सुरुवात झाली तरी मी आपला तोंडात ब्रश धरून बेसिन समोर पेंगत उभा असे. हे बघून आई जोरात 'हं...' असं ओरडायची. मग कसा बसा रंधा मारून चूळ भरून चहा प्यायला बसायचो. चहा पिऊन तरतरी येते हा शोध ज्याने कुणी लावला त्याला धरून बदडायला हवं. कारण चहा पिऊनही झोप कशी येते असं ऐकवून मला बदडण्यात येत असे. मग कसा बसा डुलकत डुलकत अभ्यास सुरू व्हायचा. गालातल्या गालात हसत दादा गंमत बघत असायचा. मधून मला जाग येण्यासाठी मोठ्याने वाचायला सुरुवात करायचा. झोपमोड झाली की आपण अभ्यासाला बसलो असून त्या वेळी झोपत आहोत हे विसरून आमची मारामारी सुरू व्हायची. पुन्हा मार, पुन्हा अभ्यास.

पाढे, सनावळ्या, तहाची कलम ह्या सगळ्यांना त्रास देणार्‍या गोष्टींनी मलाही छळलं. सगळ्यात जास्त धडकी भरवणार विषय म्हणजे गणित. त्यात त्याला आठवी नंतर भूमितीची जोड मिळाली नी त्याची न्युसंस व्हॅल्यू अजूनच वाढली गणितं न सोडवता आल्याने वर्गात सरांचा प्रचंड मार खाल्लाय. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी तर वेगळीच गंमत असायची. मला गणिताचा (आणि इतर कुठलाही) पेपर लिहायला कधीही तासापेक्षा जास्त वेळ लागला नाही. मग त्यानंतर टिवल्या बावल्या सुरू व्हायच्या. मास्तर आपले डोळे मोठे करून धाकात ठेवू पाहायचे. त्यात मधूनच तहान, लघुशंका इत्यादी कारणांसाठी सतत वर्गाबाहेर पडायला बघायचो.

अनेक वर्ष मला परीक्षा का घेतात हेच कळत नव्हतं. ह्याच प्रमाणे परीक्षेच्या वेळी पाचवीला पुजलेली झोप, शेवटचा पेपर देऊन येताच कुठे गायब होते हे ही कळत नसे. तर, अनेक वर्ष मला परीक्षा का घेतात हेच कळत नव्हतं. कारण एक दोन अपवाद वगळता दर वर्षी वर्गात तीच मुलं दिसायची. मास्तरांनी शिकवावं आणि मुलांना विचारावं 'कळलं का रे मुलांनो?' हो असं उत्तर आलं तर पुढच्या वर्गात पाठवावं. सिंपल. कशाला मुलांना अभ्यास करायचे आणि मास्तरांना पेपर तपासायचे कष्ट द्यायचे? पण आयुष्य इतकं सरळ नसतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मास्तरांना काही तरी उद्योग हवा म्हणून पेपर तपासण्यासाठी परीक्षा घेतात असंही मत आमच्या वर्गात एकाने व्यक्त केलं होतं.

शाळेतल्या सगळ्या परीक्षा व्यवस्थित पार पडल्या, घरच्यांच्या (आणि शाळेच्याही) सुदैवाने कुठल्याही इयत्तेत मुक्काम न ठोकता वेळच्यावेळी शाळेतून बाहेर पडलो. पहिली ते नववी असे सुखाचे दिवस घालवल्यावर आयुष्यातलं सर्वात वाईट वर्ष माझ्या आयुष्यात आलं. दहावी.