नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

| | Posted On 12/17/08 at 2:14 PM









नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

-------

हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.

उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.

।। भारत माता की जय ।।

-- रा. स्व. संघाची प्रार्थना --

संभवामी युगे युगे?

| Labels: | Posted On 12/8/08 at 1:40 PM

सरत्या वर्षासोबतच हिशोब मांडले जातात गेल्या वर्षाने काय दिलं आणि काय घेतलं ह्याचे. यंदाच्या वर्षी घेतल्याची यादी फार मोठी आहे. आत्ता पर्यंत शांत शहर म्हणून ओळखल्या जाणारया बँगलोर मध्ये एका वेळी ९ बाँब स्फोट झाले, शेयर बाजाराने आणलेल्या मंदीने सगळ्यांचेच कंबरडे मोडले, बेकारीची तलवार बरयाच लोकांच्या डोक्यावर टांगली गेली, अतिरेक्यांचे असंख्य हल्ले पचवलेली मुंबई सुद्धा हादरली. इतकी, की बरयाच खुर्च्या डगमगल्या, बरीच सिंहासनं मोडीत निघाली. २६ जुलै नंतर मुंबईतले देवही ताम्हनातल्या पाण्याला जुमानेनासे झाल्याने ह्यावेळी लोकांनीच सूत्रं हाती घेतली. गेटवे वर जमलेली अभूतपूर्व गर्दीच सरकारला हलवायला कारणीभूत ठरली. जगण्याच्या केविलवाण्या संघर्षाला 'मुंबई चे स्पिरिट' म्हणून सलाम करण्याने आता लोकं शांत होणार नाहीत ह्याची कुठे तरी जाणीव झाली. हम करेंगे, मुंह तोड जवाब देंगे, आर पार की लढाई होगी इत्यादी हवेतली पोकळ विधानं आता लोकांना फसविनाशी झाल्याने खरंच हालचाली सुरू झाल्या. कधी नव्हे ते अमेरिकेने उघडपणे भारताची बाजू घेतली. आता तरी नेहमी प्रमाणे बुळबुळीत विधानं नं करता सरकार अतिरेक्यांचा बीमोड करेल अशी आशा निर्माण झाली.

पण परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईपर्यंत आपणही सगळेच झोपलेलो होतो ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मी, माझं घर, माझं कुटुंब, माझी नोकरी ह्या चाकोरीत राहणारी भारतातली बहुसंख्य जनताच ह्या सगळ्याला एका परीने जबाबदार आहे. 'आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून दिलेत, त्यांनी कामं करावी की' असं म्हणून आता जबाबदारीतून सुटता येणार नाही. घरी साधं रंगकाम काढल्यावर सतरा चौकश्या करून रंगारयाचा जीव खाणारे आपण देशाच्या बाबतीत इतके निरुत्साही कसे हे कोडं खरंच न सुटणारं आहे. सगळ्यांनीच निवडणुकीला उभं राहायची गरज नाहीये. पण आपण आपल्या परीने तरी ह्या झोपेचं सोंग घेतलेल्यांना हलवायचे प्रयत्न करूच शकतो. खड्यांतल्या रस्त्यावरून सरकारला शिव्या घालत प्रवास करतो, पण कॉर्पोरेटरला साधा एक फोन करून झापायचे कष्ट घेत नाही. 'माहितीचा हक्क' कायद्याने मिळूनही आपण तो वापरत नाही. 'बांबूच्या काठ्या घेतलेले आणि पोट सुटलेले पोलीस आमचं संरक्षण करण्यास असमर्थ आहेत' अशी जनहीतयाचीका दाखल करण्याची बुद्धी एकाही वकिलास होत नाही. मुंबई बुडल्यावर 'ते जे गटार आहे त्याचं नाव मिठी नदी आहे' हा साक्षात्कार लोकांना होतो ह्या पेक्षा मोठं दुर्दैव काय?

नवीन वर्षात गरज आहे ती आपण सगळ्यांनी जागं व्हायची. चिखल साफ करायला आत्ताच चिखलात उतरून पाय खराब नाही केले तर काही वर्षांनी ह्या चिखलातच राहायची पाळी येईल. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ह्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. आता आपणच आपल्या देशाला वाचवलं पाहिजे. निरुत्साही राजकारणी आणि कामचुकार सरकारी बाबूंच्या विरुद्ध आत्ताच आवाज उठवला पाहिजे. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना राहायला हा असा देश देणार आहोत का ह्याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. 'भारतात काय ठेवलंय? ' असं म्हणून परदेशी निघून गेल्याने हे प्रश्न सुटत नाहीत. म्हातारया आई-वडिलांना आपण प्राणापलीकडे जपतो तर जराजीर्ण झालेल्या देशासाठी साधी भूतदया म्हणूनही काही न करण्या इतके कृतघ्न आपण नक्कीच नाही.

मी कुठे बदल घडवू शकतो हा विचार करून तो अमलात आणायला हवा. जरा डोळे उघडे ठेवले तर अशा बरयाच जागा सापडतील. महिन्यातला एक तास तरी आपण सगळेच जण आपल्या देशासाठी नक्कीच देऊ शकतो. मला काही झालं नाही म्हणून अलिप्त राहणं आणि कुणी तरी येऊन वाचवेल ही अपेक्षा करणं आता सोडलं पाहिजे. अजून किती वर्ष आपण 'संभवामी युगे युगे' ह्या भाबड्या आशेवर जगणार?

मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त आघाडी

| Labels: | Posted On 11/17/08 at 6:21 PM

धम्याला माझ्या घरी घेऊन आलो. आत आल्यावर कपडे बदलण्यासाठी धम्या बेडरूम मधे गेला. बराच वेळ झाला तरी साहेब बाहेर आले नाहित म्हणून मी डोकावून बघितलं तर धम्या चक्क कपाट आवरत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो". असं म्हणून धम्या फ्रेश व्हायला बाथरूम मधे गेला.

यथेच्छ जेऊन वगरे आम्ही झोपलो. मधेच मला अचानक वारं लागल्यासारखं वाटून जाग आली. बघतो तर धम्या झोपेतल्या झोपेत शेजारी बसून मला पेपर हलवून वारा घालत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".

धम्याला सकाळी ७ ला उठायचं होतं. गजर लावला होता. मी उठलो पण साहेब उठले नाहीत. शेवटी मी जोरात ओरडलो, धम्या ऊठ अरे तास भर उशीर झाला. अचानक धम्या ताडकन उठला आणि अंगठे धरून कोपर्‍यात ओणवा उभा राहिला. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्‍यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".



असो असो. आता खरा व्रुत्तांत :-)



भाग १ - मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त ओसरी



धम्या बँगलोरला येतोय ह्याची चर्चा मागचे कितीतरी दिवस ख.व. मधून सुरु होती. शेवटी प्रत्यक्ष धम्याकडून खरड येऊन पडली आणि त्या बातमी वर शिक्का मोर्तब झालं. "बँगलोरला येतोयस तर माझ्याच घरी उतरायचंय. दुसरी कडे राहिल्याचं कळलं तर रात्री पोत्यात घालून अपहरण करण्यात येईल" ह्या माझ्या प्रेमळ आमंत्रणाचा मान ठेऊन धम्याने माझ्याकडे रहायचं ठरवलं.

दरम्यान बँगलोर मधल्या इतर मि.पा. कर्‍यांशी संपर्क साधणं सुरू होतं. धमाल साहेब फार कमी वेळ, म्हणजे रविवार रात्र ते सोमवार पहाट, इथे असल्याने प्लॅन एकदम काटेकोर पणे मिनीटाच्या हिशोबात बनवण्यात आला. यशो, धम्या, अभिरत आणि मी अशा चौघांनी भेटायचं ठरवलं. मोठ्या मनाने यशोने आम्हाला तिच्या घरी डिनरचं आमंत्रण दिलं. वर कुणाला काय आवडतं ह्याची शौकशीही केली. विमानतळावरून बस मधे नी बशीतून माझ्या घरी अशी स्वारी आल्यावर आम्ही यशोच्या घराकडे प्रयाण केलं. अभिरत तोवर येऊन पोचला होता. यशो तिच्याच घरी असल्याने तिला उशीर होण्याची शक्यता नव्हती.

तर, धम्या आणि मी यशोकडे पोचल्यापोचल्या आम्हाला जेवणाची जय्यत तयारी झाल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला बराच वेळ गप्पा टप्पा झाल्यावर शेवटी जेवणाकडे मोर्चा वळवला. ह्या दरम्यान सतत पि.जे. मारणं सुरुच होतं.

मेथीचे पराठे, दही, हरबर्‍याची उसळ, चिकन, श्रीखंड, मट्ठा, मसाले भात अशा फर्मास जेवणावर ताव मारता मारता आम्ही एकमेकांची यथेच्छ खेचत होतो. सोबत तोंडी लावायला अर्थातच मि.पा. वरच्या घडामोडी होत्याच.

मधेच मिपा बँगलोर कट्ट्याचे मुख्य आयोजक, मिपा बँगलोर ओसरी चे प्रचारक, मिपा बँगलोर ढोसरी चा खंदा "खंबा" आणि बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समितीचे संस्थापक व उरलेले एकमेव सभासद श्री श्री डॉन बाबा बंगाली (सद्ध्या वास्तव्य जर्मनी) ह्यांनी फोन करून आमच्याशी यथेच्छ गप्पा मारल्या.

अभिरत ने आपली विनोदबुद्धी काय जबराट आहे ह्याच्या पुरावा म्हणून "ऍड्याच्या हातात चक्क पाण्याचा ग्लास" असं म्हणून माझा फोटो काढला.

धम्याला दुसर्‍या दिवशी लवकर उठायचे असल्याने आम्ही शेवटी ११ वाजता यशोच्या घरून निघायचं ठरवलं. धम्या आणि अभिरत ला रिक्षा मधे घलून मी त्यांच्या मागून बाईक घेऊन माझ्या घरी पोचलो.


भाग २- मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त ढोसरी



घरी पोचल्या पोचल्या नेहेमी प्रमाणे तातडीने माझ्या बैठकीच्या खोलीचं "बैठकीच्या खोलीत" रुपांतर करण्यात आलं.
धम्याच्या आवडी प्रमाणे सिंगल मॉल्ट ची व्यवस्था करण्यात आली होती.(तात्यानूं, तुमची लय आठवण आली. तुम्हाला उचक्या लागल्या असतीलच)

किचन मधे ग्लास आणायला गेलेला अभिरत तिथे मांडून ठेवलेले काचेचे शो-पिस बघून भिरभिरला.

असो. सगळी व्यवस्था चोख झाल्याची पावती देत धमाल रावांनी आता होऊन जाऊ द्या सुरुवात अशी आज्ञा केली आणि आम्ही सुरुवात केली. मधेच धम्याने मी त्याच्या ग्लासात ओततोय असा फोटो काढून घेतला. म्हणजे 'तू आग्रह केलास म्हणून मला नाईलाजाने घ्यावी लगली' असं कारण देता येइल म्हणाला.

ह्या नंतर पुढचे बरेच तास आम्ही वसंतराव, अण्णा, बाबुजी ह्यांची एकाहून एक सरस गाणी ऐकत घालवले. नॉन-स्टॉप गप्पाही सुरू होत्या. माझ्या शोकेस मधली घड्याळं बघून अभिरत खूश झाला. त्यात लवकरच अजून एकाची भर पडणार असल्याचं सांगितलं. डॉण बाबा बँगलोरी जर्मनीहून येताना व्हाया लंडन येणारेत आणि माझ्यासाठी बिग बेन मधलं घड्याळ उचलून आणणार आहेत हे कळल्यावर त्याला अजूनच आनंद झाला.

मधेच धम्याने मला व्याकूळ होऊन "खरंच का रे तुझ्या नाटकातले साने काका काल्पनीक आहेत?" अशा प्रश्न विचारला. धम्याला इतका कमी वेळासाठी आल्याने दर १० मिनीटानी एक अशा शिव्या पडत होत्या. शेवटी पुढल्या वेळी जास्त वेळ काढून येइन असं आश्वासन त्याच्याकडून घेण्यात आलं.

असं करता करता किती तास कसे गेले ह्याचा हिशोबच राहिला नाही. प्रचंड एंजॉय केलं. शेवटी रात्री झोपायची वेळ आणि सकाळी उठायची वेळ ह्यात किमान १ तास असावा ह्यावर सर्वांचं एकमत झाल्याने आम्ही आमची ढोसरी थांबवायचं ठरवलं.

सकाळी अभिरत कधी तरी गायब झाला. धम्याही ८ च्या दरम्यान अंघोळ करून कामावर गेला. जाताना मला उठवलं "लय भारी मजा आली रे भावा" असं म्हणून माझा निरोप घेताला. मी दार लावलं आणि पुन्हा झोपलो.







फोटो - http://www.flickr.com/photos/24440094@N02/sets/72157609254815561/

माझं साक्षात्कारी एकटेपण

| Labels: | Posted On 11/11/08 at 5:00 PM

माझं साक्षात्कारी एकटेपण
म्हणजेच - घी देखा मगर बडगा नहीं देखा, दूरून डोंगर साजरे, करायला गेलो काय नि झाले उलटे पाय वगैरे वगैरे





फिटण्या आधी एकदा तरी एकटं राहून बॅचलर्स लाईफ मनसोक्त उपभोगायची ही माझी लहानपणापासूनची सुप्त इच्छा होती. ती मी घरच्यांसमोर प्रकटही केली. पण 'आधी स्वतःच्या चादरीची घडी घालायला शिका. आलेत मोठे एकटे राहणारे. ' ह्या शब्दात त्यावर बोळा फिरवला गेला. शेवटी एकदाचं नोकरी निमित्ताने बँगलोरला यावं लागलं आणि ती पूर्ण झाली. पूर्वी आई-बाबांनी परवानगी दिली नसती, पण आता हा अजून बिघडणे शक्य नाही हे त्यांना पटल्याने त्यांनी हसत हसत परवानगी दिली. झालंच तर एकटा राहून तरी थोडा जबाबदार होईल अशी त्यांची अपेक्षा असावी.

इथे यायचं ठरल्यावर मला पहिला प्रश्न पडला 'तिथे मराठी लोकं भेटतील का? ' पण भाऊ म्हणाला 'अरे माझे सगळे रूम-मेटस मराठीच आहेत. ' बँगलोरला जायचं म्हणून शॉपिंग झाली. मी सगळेच मळखाऊ रंगाचे कपडे आणल्याने आईच्या कपाळावर आठी उमटली. जाताना प्रचंड सूचना मिळाल्या. चादरी दर आठवड्याला धूत जा, रोज एकदा तरी केर काढत जा, दिवसातनं दोनदा दात घासत जा, रोज अंघोळ करत जा, गोड खाल्लंस की चूळ भरत जा, बोलणारं कुणी नाहीये म्हणून कसाही राहू नकोस, इत्यादी इत्यादी. मी जाणार म्हणून माझ्या सगळ्या मित्रांना फार वाईट वाटलं. मला माझ्याच पैशाने (पगार वाढला जोश्या, माज नकोय, बिल भर) ५-६ ठिकाणी सेंड ऑफ देण्यात आले. ह्या पार्ट्यांवर माझा वर्षभराचा वाढीव पगार खर्च झाला.

तर, एकदाचा बँगलोरला आलो. सुरुवातीला महिनाभर भावासोबत राहिलो. तो नि त्याचे रूम-मेट्स एकाच कॉलेज मधले नि आता एकाच कंपनीत. हा माझा (मामे असला तरी) भाऊ आहे ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. अगदीच साधा सरळ आहे राव. कसल्याही चांगल्या सवयी नाहीत. रोज पहाटे उठून योगासनं आणि व्यायाम करतो. शनिवार रविवार वेळ मिळेल तेव्हा अजगर व्हायचं सोडून क्रिकेट खेळतो. हे कमी होतं की काय म्हणून त्याला वर दुधाचं व्यसन ही आहे. ह्या सवयी त्याने मलाही लावायचा प्रयत्न केला. पण मला सुधारता सुधारता तोच बिघडेल अशी भीती वाटल्याने सोडून दिला.

त्याचे घर माझ्या ऑफिस पासून लांब असल्याने मी वेगळं घर घेण्याचं ठरवलं. आणि मला घी देखा मगर बडगा नहीं देखा, दूरून डोंगर साजरे, करायला गेलो काय नि झाले उलटे पाय, इत्यादी म्हणींचा अर्थ समजायला सुरुवात झाली.

पहिला धक्का बसला घर शोधणे ह्या प्रकाराने. एजंट हा माणूस किती टिपीकल असू शकतो ह्याचा अंदाज आला. मी सांगितलेल्या अटींपैकी एकही अट पूर्ण न करणारी घरं बघण्यात माझे सुरुवातीचे काही दिवस गेले. त्यात भाडं ही माझ्या बजेट पेक्षा जास्त. एकदा तर एकच घर मला तीन एजंट्स नि वेगवेगळ्या दिवशी दाखवलं. तशा माझ्या अटी फार नव्हत्या. चहावाला, पानवाला नि वाइन शॉप जवळ हवं, एरियात रिक्षा स्टँड हवा आणि मुख्य म्हणजे बेडरूम मध्ये अजिबात उजेड यायला नको. शेवटी २०-२५ घरं बघून झाल्यावर एक घर फायनल केलं. मी येताना कपड्यांशिवाय काहीच सामान न आणल्यामुळे सगळंच घ्यायचं होतं. पण मी मुळातच प्रचंड ऑर्गनाइज्ड माणूस असल्याने ते मला फार जड गेलं नाही. गॅस ते गादी अशी सगळी खरेदी एका शनीवारी ५ तासात संपवली. हाय काय अन नाय काय.

पण दुसरा धक्का इथे बसला. शाळेनंतर डायरेक्ट आत्ता बाजारहाट केल्याने मधल्या काळात सगळ्याच वस्तूंचे भाव इतके आचरटा सारखे वाढले असतील ह्याची मला कल्पनाच नव्हती. हळू हळू मला आटे दाल का भाव कळायला सुरुवात झाली. कपडे धुण्याचा साबण २० रुपये, अर्धा किलो मिल्क पावडर १०० रुपये, ५ किलोचा पोर्टेबल गॅस २५० रुपये, स्कॉच ब्राईट ची किंमत २२ रुपये ऐकल्यावर ह्या सोबत घासायला माणूस पण मिळतो का असं विचारलं दुकानदाराला. अक्षरशः डोकं फिरायची वेळ आली. च्यामारी ह्या रेट नि पगार कितीही वाढला तरी पुरणार नाही. बचत तर लांबच राहिली. प्रेम चोपडाचा 'नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या' हा डायलॉग तंतोतंत पटला. झक मारली नि इथे आलो असं झालं. पण आता आधीचा जॉब सोडल्याने दोर कापलेल्या मावळ्यासारखं लढायचं ठरवलं.

एकटं राहायला लागल्यावर तर रोज नवनवीन गंमती होऊ लागल्या. आपल्याला स्वच्छतेची नि टापटिपीची फार आवड आहे हा गैरसमज पहिल्याच आठवड्यात दूर झाला. च्यायला किती धूळ जमते यार हा डायलॉग वारंवार तोंडात येऊ लागला. सर्वात वाईट झालं म्हणजे पूर्वीची ऑटोमॅटिक लाईफ स्टाइल गेली. पूर्वी कसं, कपडे बादलीत टाकले की ते आपोआप इस्त्री होऊनच कपाटात सापडायचे. डबा सिंक मध्ये टाकला की तो आपोआप दुसऱ्या दिवशी भरलेल्या अवस्थेत बॅग मध्ये सापडायचा. हे सगळंच बंद झालं. खरं तर हे सगळं सुरू झालं. इतर वेळी इतकी हलकी वाटणारी चादर धुवायला घेतली की अचानक कशी जड होते हे मात्र कळलं नाही. अंघोळ ही गोष्ट 'आज करायची कामं' ह्या सदरात मोडू शकते ह्याचाही साक्षात्कार झाला.

पहिल्या दिवशी झोपलो तर काही केल्या झोपच येईन. ह्यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे. झोप न येण्याचं कारण होतं, आमच्या मुंबईच्या घरात दोन बिल्डिंग मधल्या ट्यूबचा प्रकाश यायचा. इथे मिट्ट काळोख. शेवटी किचन मधला दिवा लावल्यावर झोप आली.

ह्यानंतर सुरू झालं आमचं आवडतं 'एनर्जी कंजर्वेशन'. ह्याला काही जण आळशीपणाही म्हणतात. म्हणजे चहा झाल्यावर गाळणं धुवावं लागू नये आणि दिवसातून दोन वेळा दूध तापवावं लागू नये म्हणून मिल्क पावडर आणि टी बॅग्स आणल्या, घर झाडताना वाकावं लागू नये म्हणून लांब दांड्याचा झाडू घेतला, चादर दर आठवड्याला धुण्यापेक्षा २ आठवड्याने ड्राय क्लिनींगला टाकायला लागलो. ह्या सगळ्यामुळे आयुष्य जरा सुसह्य झालं. शनिवार रविवार हवं तेव्हढं झोपणं सुरू झालं. एका विकांताला फक्त १ चहाचा ब्रेक घेऊन सलग १७. ५ तास झोपायचा रेकॉर्डही करून झाला. शुक्रवारी रात्री जे झोपायचं ते डायरेक्ट शनिवारी दुपार नंतरच उठायचं. त्यामुळे मग दुपारच्या जेवणाची चिंता मिटते. संध्याकाळी जरा चकाट्या पिटल्या पुन्हा झोपायला मोकळे. मग हेच सायकल रविवारी कंटिन्यू करायचं.

पण नव्याची नवलाई संपल्यावर ह्याचाही कंटाळा आला. एकटेपण खायला उठू लागलं. मुंबईत वेळी अवेळी फोन करून चावणारे आणि इतर वेळी त्रास देणारे मित्र हवेहवेसे वाटू लागले. 'अरे मी देतो तुमचे चहा-सिगारेटचे पैसे, पण या इथे' असं मोठ्ठ्याने ओरडावंसं वाटू लागलं. साला एक मराठी शब्द कानावर पडेना. पार सरकलो होतो. मुंबईला मित्रांना फोन केल्यावर कानावर पडणाऱ्या शिव्या ओव्यांसारख्या वाटू लागल्या. कुठे कोणी 'अरे' म्हणाला की तो 'अरे' हिंदीचा आहे की मराठीचा म्हणून कान टवकारायचो. MH च्या गाड्या बघून (इंक्ल्यूडींग MH १२) उगाच मनातून बरं वाटायचं. १-२ वेळा मुंबईला गेल्यावर मुलींना माहेरी जाताना काय वाटत असेल ते कळलं.


सुदैवाने ह्यावरही उपाय सापडला. माझी एक मैत्रीण एके दिवशी मला एका मराठी नाटकाला घेऊन गेली. आणि इथले महाराष्ट्र मंडळ भलतंच कार्यरत आहे हे मला कळलं. पूर्वी तात्यांचं आहे म्हणून नाव नोंदवलेल्या 'मिसळ-पाव'ची पण चटक लागायला सुरुवात झाली. मग काय, मित्र जमायला सुरुवात झाली. 'जाऊ तिथे कट्टा करू' हा धर्म असल्याने इथेही कोब्रा कट्टा आणि आमच्या 'मिसळ-पाव'चा कट्टा सुरू केला. इथेही असंख्य मित्र जमले. धमाल सुरू झाली. आणि सहा महीन्या नंतर पहिल्यांदाच मला आपण एकटं राहतोय ह्याचा विसर पडला. बॅचलर लाईफ खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला सुरुवात झाली.

मागच्याच आठवड्यात एका मित्राचा फोन आला. त्याला इथे नोकरीची ऑफर आली होती. मला पडलेला प्रश्न त्यालाही पडला 'अरे पण तिकडे मराठी लोकं आहेत का? ' माझ्या तोंडून उत्तर बाहेर पडलं 'अरे नको तितकी आहेत, तू ये बिंदास... '

कट्टेबाज - भाग २

| Labels: | Posted On 11/10/08 at 6:19 PM

सकाळी कट्ट्यावर पोचलो तर अव्या आणि पाऱ्या, मारी ला शोधत होते. बरेच वैतागलेले दिसले. झालं असं, की आदल्या रात्री एका गाण्याच्या प्रोग्रॅम मध्ये मारी तंबोऱ्यावर साथ देणार होता. त्यांनी सगळ्यांना सांगून पाहिलं पण कुणीही यायला तयार झालं नाही. शेवटी तुम्ही तरी या म्हणून त्याने ह्या दोघांना गळ घातली. वर सांगितलं की तुमच्यासाठी २ तिकिटं खिडकीवर ठेवली आहेत. बिचारे भूत-दया म्हणून गेले. तिकिटं कलेक्ट केल्यावर कळलं की तिकिटाचे पैसे दिले नव्हते. नि वर दुसऱ्या रांगेतली २७५ रुपयाची तिकिटं होती. मनातल्या मनात पाऱ्याला शिव्या घालत आणि ५५० रुपयात काय काय करता आलं असतं ह्याचा हिशोब करत बिचारे गेले प्रोग्रॅमला. आत मध्ये जाऊन पाहिलं तर अर्ध्याहून अधिक हॉल रिकामा होता. कुठल्यातरी क्लासने आपल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम भरवला होता. त्यामुळे त्यांचे पालक आणि नाट्यगृहाचा कर्मचारी वर्ग सोडून बाकी जास्त जनता नव्हती. टॉर्च मारून सीट कुठे आहे ते दाखवणारा माणूस बाहेर गेल्यावर म्हणे हॉल रिकामा रिकामा वाटायला लागला.

सगळ्यांचे आभार मानून गाण्याचा भन्नाट कार्यक्रम सुरू झाला. साथीला असलेला तबला वादक आणि पेटी वादक ह्यांचा एक मेकांशीच नव्हे तर गाणाऱ्याशीही काही संबंध नव्हता. भरीस भर म्हणून मारी पण एका कानात इयरप्लग लावून मोबाईल वर गाणी ऐकत होता. मध्यांतरापूर्वी ज्यांची गाणी झाली आहेत ते गायक आणि त्यांचे पालक मध्यांतरात सटकले. अव्या नि पाऱ्याची गोची अशी झाली की ते समोरच बसले असल्याने त्यांना निघता येईन. हे सगळं असह्य होऊन पाऱ्याने जनरीत वगैरे गेली बाझवत असं म्हणून तिथेच ताणून दिली. ते बघून गायिकेची तान अंमळ जास्त खेचल्या गेल्याचा अव्याला भास झाला.

कुणाचीही भीड भाड न बाळगणाऱ्या अव्या लोकलाजेस्तव हे अत्याचार ३ तास सहन करत होता ह्यावर माझा मात्र विश्वास बसेना. खोदून खोदून विचारल्यावर कळलं की अव्या थांबण्यामागचं मुख्य कारण समोर स्टेज वर गात होतं. हा मान डोलाऊन दाद वगैरे देत होता. प्रोग्रॅम कितीही फडतूस असला तरी 'चोराच्या हातची लंगोटी' ह्या न्यायाचे हिच्याशी ओळख झाली तर २७५ सार्थकी लागतील असा विचार करून अव्या प्रोग्रॅम झाल्या झाल्या तिला भेटायला गेला. स्वागताच्या वेळी पाहुण्यांना दिलेल्या पुष्पगुच्छातलंच एक गुलाब घेतलं, काळ्या पडलेल्या बाहेरच्या पाकळ्या खुडल्या नि मनाच्या एका कोपऱ्यात वाक्यांची जुळवणी नि दुसऱ्या कोपऱ्यात धीर येण्यासाठी रामरक्षा असं करत अव्या ग्रीन रूमच्या बाहेर तिला शुभेच्छा द्यायला उभा राहिला. गार पडलेले हात-पाय नि कपाळावर घाम अशा विचित्र अवस्थेत ५ मिनिटं घालवल्यावर एकदाचा ग्रीन रूमचा दरवाजा उघडला. पण दैव म्हणून जे काही असतं ते आपल्या इच्छेनुसार कधीही चालत नाही हा भाई काकांना आलेला अनुभव अव्यालाही आला. अव्याला आवडलेला चेहरा ग्रीन-रूम मधून बाहेर पडताना कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र अशा अवतारात बाहेर आला नि ह्याच्याकडे ढुंकूनही न बघता सरळ लिफ्ट मध्ये शिरला.

ह्या सगळ्यामुळे अव्या जामच सरकला होता, ह्या मारी च्या मारी, भेटू दे हरामखोराला, मारतोच धरून. अरे गाण्याची आवड लागावी म्हणून प्रोग्रॅम करता की लोकांना गाण्यापासून पुट-ऑफ करण्यासाठी. आणि वर असल्या भुक्कड कार्यक्रमांची तिकिटं आपल्याच मित्रांना विकता?
त्याला शांत करण्यासाठी चहा मागवला. पैसे द्यायला गेलो तर मी यायच्या आधी २ प्लेट वडा-सांबार नि शिरा फस्त झाला होता. ह्याचे पैसे अव्या देईल असं म्हणालो तर अव्या म्हणाला तुझ्यासाठी थांबलो म्हणून हे पैसे तूच भरायचेस. वर 'स्वतःच तोंड बघितलंस ना सकाळी सकाळी' हा टोमणा ऐकावा लागला.
"जोश्या लेका दुःख तिचं लग्न झाल्याचं नाहीये... "
"माहिती आहे, दुःख तिचं लग्न तुझ्याशी न झाल्याचं आहे... "
"नाही रे... च्यायला आता ही गायला बसतानाच लायसंस घालून बसली असती तर काय झालं असतं? आपल्याला कॅटलॉग मध्ये आवडलेला शर्ट एक तर आपल्या साइज मध्ये नसतो अथवा स्टॉक संपलेला असतो असं एक संत वचन आहे. पण सालं हे मुलींच्या बाबतीतही का व्हावं? "
"मला काय माहीत? "
"ह्म्म्म्म... "
"जाऊ दे रे, ती जगातली शेवटची सुंदर मुलगी नव्हती रे... "
"नि असती तरी ती तुला पटली नसती" डायलॉग मारत मारत पाऱ्याने एंट्री घेतली. तो इथे अव्यावर वैतागला होता. हा भाई त्याला न उठवताच तिला भेटायला पळाला होता. त्यांची आप-आपसात जुंपली. पण अव्याने त्याला सिगरेट दिल्यावर त्याने सिगरेट पेटवून वाद विझवला.

एरवी सगळ्यात आधी कट्ट्यावर येणारा सोन्या अजून आला नव्हता. फोन करणार इतक्यात तो स्वतःच अवतरला. सोन्या नुकताच ताजा ताजा प्रेमात पडला होता. त्यामुळे त्याच्या अशा वेळी-अवेळी गायब होण्याची आता सवय झाली होती. चेहरा पाडून आलेल्या सोन्याला पाहून कुणालाच आश्चर्य वाटलं नाही. बिचारा स्त्री-हट्टाला बळी पडून कुठले कुठले टुकार सिनेमे बघून यायचा नि पुढचा तास दीड तास आम्हाला पकवायचा. पण ह्यावेळी कारण वेगळं होतं. पगार झाला म्हणून हा मुलगा मोठ्या रोमँटिक मूड मध्ये ग. फ. ला शॉपिंगला घेऊन गेला. तिच्याकडे नसलेल्या कलरचा ड्रेस ह्याने घ्यायला लावला. नि तिथेच फसला. आता तिच्याकडे ह्या कलरचा ड्रेस नसल्याने साहजिकच त्या ड्रेस वर मॅचिंग सँडल्स, पर्स, कानतली नि मोबाईल पाऊच तिच्याकडे नव्हताच. चार आण्याची कोंबडी नि बारा आण्याचा मसाला झाला. तिने ह्या सोन्याला बकऱ्यासारखा कापला (खाऊ-पिऊ तरी घातलं का रे... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ - अव्या) त्यामुळे मालक तात्पुरते दुखा:त होते. हळू हळू एक एक करून कोरम जमला. प्रत्येकाने एक-मेकाला डोळे मारून सोन्याची चौकशी केली नि त्याच्या दु:खावर यथेच्छ मीठ चोळलं.

रविवार असल्याने आज प्रजा निवांत होती. दुपार कशी घालवावी ह्यावर बराच काथ्याकूट करून झाल्यावर नेहमीप्रमाणे सोन्याच्या घरी जाऊन पत्ते खेळावेत ह्यावर सगळ्यांचं एकमत झालं. पण सोन्याने हा प्रस्ताव धुडकावून लावला 'साल्यांनो माझ्या घरी बसता आणि मी नोकर असल्यासारखे पाणी आण, चहा आण, उशी दे असे हुकूम सोडता. वर जाताना सगळा पसारा तसाच टाकून जाता. पत्ते पण नाही आवरत नालायकांनो तुम्ही. ' शेवटी त्याच्या सिगारेट्सचा खर्च सगळ्यांनी मिळून करायचा, लागतील त्या वस्तू स्वतः उठून घ्यायच्या आणि जाताना परत जागच्या जागी ठेवायच्या, चहाचे कप न फोडता धुवायचे नि ओट्यावर उलटे वाळत घालायचे ह्या अटींवर त्याने मान्यता दिली.

ह्यातली एकही अट आम्ही पूर्ण नाही केली. ह्या आधीही केली नव्हती नि ह्या पुढेही करणार नाही. 'असंच वागायचं तर तुझ्या घरी कशाला येऊ, स्वतःच्याच घरी जाऊ ना' इति अव्या. पत्ते खेळता खेळता अव्याने एक अफलातून किस्सा ऐकवला. खरा खोटा त्यालाच ठाऊक. त्याला पण ठाऊक असेल की नाही देव जाणे. कारण तो इतक्या ठामपणे टेपा लावतो की काही दिवसांनी त्या खऱ्याच वाटायला लागतात. म्हणे त्याच्या एका मित्राचं कॉलेजमध्ये एका मुली सोबत प्रकरण सुरू होतं. कॉलेजनंतर ते मोडलं. त्या नंतर त्या मुलीचं त्याच्या मित्राशी लग्न ठरलं. घरून परवानगी नव्हती, म्हणून पळून जायचं ठरलं. हिला पळवण्यासाठी अव्याचा मित्र म्हणे त्या मुलीच्या भावाचीच बाइक घेऊन गेला होता. सगळे हसले. पोट धरधरून हसले. आपल्या विनोदाला आलेला हा भव्य-दिव्य प्रतिसाद पाहून अव्याला कळलं की ये बात कुछ हजम नही हुई.

पाऱ्या - च्यायला हा अव्या पत्ते फिरवतो...
अव्या - अरे पत्ते म्हणजे काय मेरी-गो-राउंड आहे का हवा तसा फिरवायला...
मी - पण सोन्या... च्यायला तुला ग. फ. ला आपणहून शॉपिंगला घेऊन जायची दुर्बुद्धी कशी झाली???
अव्या - अरे जब गीदड की मौत आती है तब वो शहर की तरफ भागता है...
मी - ह्या म्हणीचा त्याचा इथे काय संबंध अरे...
अव्या - काही नाही, अशीच आठवली म्हणून सांगितली.
रवी - संबंध आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्याला मराठीत...
अव्या - म्हणजे चुकीची गणितं सोडवून हा जोश्या जसा मास्तरांना स्वतःहून वही तपासायला द्यायचा तसं का???
मी - च्यायला आज सोन्यावर राज्य आहे. माझ्यावर घसरू नका. हा इतिहास नंतर उगाळा...
सोन्या - त्याचं झालं असं की अरे... तुला आठवतं का मी पाऱ्याची बाइक घेऊन गेलो होतो मागच्या आठवड्यात? ते हिलाच भेटायला. मी सिनेमॅक्स पाशी तासभर उभा यार. ही आलीच नाही. शेवटी कंटाळून मी कट्ट्यावर परत आलो. तर नंतर हिच माझ्यावर चिडली. म्हणे तास भर थांबलास तर वारूळ जमलं का तुझ्या भोवती. भांड भांड भांडली. म्हणून मग तिची समजूत काढावी म्हणून तिला घेऊन गेलो शॉपिंगला.
रवी - अरे पण रागाचं कारण आणि शॉपिंग ह्या वेग-वेगळ्या गोष्टी आहेत. ड्रेस घेतल्याने राग कसा शांत होईल कुणाचा? रोज अनशा पोटी, सोवळ्याने हनुमान चालीसा वाचली तर मी पंतप्रधान होईन का?
सोन्या - अरे यार हे असंच असतं. सगळ्या प्रॉब्लेम्सचं उत्तर शॉपिंग असतं हा मला प्रेमात पडल्यावर झालेला साक्षात्कार आहे.

आता सोन्या अजून चावणार हे ध्यानात आल्याने आम्ही विषय बदलाला. सोन्या निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेल्यावर सगळा पसारा तसाच टाकून आम्ही कट्ट्यावर पळालो.



क्रमशः

कट्टेबाज

| Labels: | Posted On 11/7/08 at 5:04 PM

ओळख




चहाबाज, दारूबाज, सट्टेबाज असतात तसे आम्ही कट्टेबाज आहोत. तसे आम्ही चहाबाज आणि दारूबाजही आहोत. नि सद्ध्या शेअर मार्केट मध्ये सट्टाही चाललाय. तर, असे आम्ही सर्वगुणसंपन्न कट्टेकर आमच्या सर्वगुणसंपन्न कट्ट्यावर भेटतो. कट्टा सर्वगुणसंपन्न आहे म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तू कट्ट्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. चहा-विडी कट्ट्यावरच मिळते, वडापाव, चायनीजच्या गाड्या नि सायबर कॅफे समोरच आहे, मागे नाट्यगृह आणि लायब्ररी असल्याने २४X७ प्रेक्षणीय स्थळं आहेत, बाइक्स लावायला जागा आहे, समोरच फळांपासून कोंबडी पर्यंत सगळं मिळणारा बाजार आहे, तसंच, इथून स्टेशन चालत फक्त ५ मिनिटांवर आहे. अजून काय पाहिजे? म्हणजेच आमचा कट्टा घरासाठीची आयडीयल लोकेशन आहे. आणि इथे आम्ही राहतोही घरच्यासारखेच. घर दुसरीकडे पण राहतो कट्ट्यावर अशी परिस्थिती आहे.

कुठलाही कट्टा ही केवळ एक जागा नसून ती एक संस्था असते. तसंच ती पिढ्या न् पिढ्या चालत आलेली संस्क्रुतीही असते. इथे भांडणं सोडवली जातात, प्रकरणं जुळवली जातात, सल्ले मिळतात, गुद्देही मिळतात. वेगवेगळी भन्नाट व्यक्तीमत्व नि:स्वार्थी पणे केवळ कट्ट्यावरच एकत्र येतात. ह्या कट्ट्याबद्दल आम्हा सगळ्यांच्या मनात अपरंपार माया, प्रेम, लोभ इत्यादी आहे. ह्याचं पहिलं कारण म्हणजे ह्या कट्ट्यावर आम्ही मित्र एकमेकांना भेटलो. कुठेही जाता-येताना मध्ये एक स्टॉप कट्ट्यावर ठरलेला. कट्टा म्हणजे नुसती चहा प्यायची जागा न राहता निरोपांची देवाण घेवाण करण्याचं ठिकाण, आमचे जीवन विषयक अचाट तत्त्वज्ञान पाजळण्याची हक्काची जागा, कंटाळा आल्यास हमखास मित्र भेटण्याचे ठिकाण, सध्या कोण कुणासोबत आहे / कुठे कोण नवीन आलंय ही माहिती मिळण्याची जागा, प्रॉब्लेम्स डिस्कस करण्याची कॉंफरंस रूम, इत्यादी बनलाय. बाबांनी घरातून पुढे-मागे हाकललंच तर किमान डोक्यावर छप्पर आणि पाठ टेकायला बाकडी असतील हा आधारही कट्ट्यानेच दिला. कुणीही हाकलणार नाही अशी हक्काची जागा असावी हे ध्रुव बाळाने आणि आम्ही पाहिलेलं स्वप्न कट्ट्याने पूर्ण केलंय.

आता कट्टा प्रिय असण्याचे दुसरं कारण म्हणजे हा कट्टा आमच्या समोर बनलाय. माझे इतर सगळे कट्टे - के. सी. कॉलेज जवळचा चहावाला, सेंट्रल सिनेमाच्या समोरचा इराणी, कुलाब्यातला अश्रफ पानवाला, कॉलेज जवळचा धाबा, शिवाजी पार्कजवळचा इराणी, पार्ल्यातल्या हनुमान रोड वरचा चहावाला, आणि अजून बरेच, हे सगळे कट्टे आधी पासून होते. मी नंतर तिथे जाऊ लागलो. पण आमचा सद्ध्याचा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचा कट्टा हा अक्षरशः आमच्या डोळ्यादेखत उभा राहिलाय.

पूर्वी इथे एक मोकळं मैदान होतं आणि शेजारी उल्टी-पाल्टी ची शाळा. मैदानाच्या कडेने काही झाडं, तुरळक झोपड्या आणि चार-दोन खाऊच्या गाड्या होत्या. एका कोपऱ्यात डुकरं उकिरडा फुंकत असायची (हे बदललं नहिये अजून). मध्यभागी मैदानात ८-१० टीम्स वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळत असायच्या. एकाने दुसऱ्याचा बॉल अडवणे / कॅच पकडणे इत्यादी प्रकार प्रचंड चालायचे. आणि ह्या सगळ्याच्या मधोमध आजूबाजूच्या सोसायट्यांमधली कार्टी पतंग उडवायची.

एके दिवशी न्यूज आली की आता आपलं हे मैदान जाणार आणि ह्या जागी एक भव्य नाट्यसंकूल उभं राहणार. लवकरच मैदानाला कुंपण घालून आत खोदकाम नि बांधकाम सुरू झालं. नि बघता बघता हे भव्य-दिव्य नाट्यसंकूल उभं राहिलं. ह्या नाट्यसंकूलाच्या दोन्ही गेट्सच्या बाजूला दोन झुणकाभाकर केंद्रं आली. त्यातलंच एक म्हणजे आमचा कट्टा.

जसे इतर कट्ट्यावर ग्रुप जमतात तसाच आमचाही ग्रुप जमला. सदैव पडीक असणारे काही लोकं ओळखीचे झाले नि कट्ट्यावर रंगत वाढू लागली. एकाच तबेल्यात जसे वेगवेगळ्या रंगाचे नि स्वभावाचे घोडे असतात, तसेच आम्हीही आहोत. सगळ्याची एक झक्कास मिसळ तयार झाली आहे. गुढग्यात मेंदू असलेला अव्या, अभ्यासू रवी, सदैव प्रेमात पडणारा पाऱ्या, बाबांसोबत दुकानात बसणारा आर. जे., चहावाला बाबू, पानवाला मधू, नाट्यगृहात काम करणारा नि तंबोरा वाजवायचं वेड असणारा मारी, पैलवान सोन्या आणि मी, ही आमची नेहमीची जनता. इथे आम्ही बसल्या बसल्या काय करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. इथे आम्ही बसल्या बसल्या रोज नव नवे शोध लावतो, आपल्या नवीन थिअरीज बनवतो, बातम्यांची देवाण घेवाण करतो. थोडक्यात, एकमेकांची आयुष्य समृद्ध बनवतो.

गडकऱ्यांनी महाराष्ट्राला 'दगडांच्या देशा' असं संबोधायचं कारण आपले राजकारणी आहेत हा अमूल्य शोध अव्याने इथेच लावला. नवीन कुठलीही वस्तू, टेक्नॉलॉजी अथवा औषध कुणी शोधलं की 'हे वेदांमध्ये आधीच सांगितलं आहे' हे आमच्या गळ्यात उतरवण्याचा रवीचा प्रयत्न असतो. आठवड्याच्या दिवशी दुपारचे शो फुकटात बघण्याची सोय मारी करतो. सायकल पासून ते विमाना पर्यंत आणि पॉकेटमनी पासून ते सब-प्राईम क्रायसीस पर्यंत सगळ्यावर इथे अधिकारवाणीने भाष्य होत असतात. वयस्क लोकांना जवळच्या भाड्यामुळे घेऊन जायला नकार देणाऱ्या उर्मट रिक्षावाल्यांची कानशिलंही सोन्याच्या शुभहस्ते इथेच गरम होतात. तसंच, लग्न झालेले मित्र समोरच्या बाजारात जाताना त्यांची पोरं आमच्या पाळणाघरात सोडून जातात.

कट्ट्यावर आमचा ग्रुप जावई सासरी वावरावा तसा वावरत असतो. तसे सगळेच आजूबाजूच्या परिसरात राहत असल्याने एकमेकांना पाहून होतो. एकत्र येण्यास कारणीभूत ठरला कट्टा. नि त्यानंतर जी धमाल सुरू झाली ती आज पर्यंत सुरू आहे.





क्रमशः

आयुष्याचे नाटक - प्रवेश आठवा

| Labels: | Posted On 10/17/08 at 11:18 AM

प्रवेश आठवा - क्रमशः




मी - नारळ कसा दिला रे?
भैय्या - १० रुपया एक.
मी - ३ दे
तेव्हढ्यात बायकोने मला बाजूला खेचलं.
विद्या - अरे काय करतोयस???
मी - नारळ घेतोय...
विद्या - अरे पण त्याने सांगितलेल्या किमतीला?
मी - हो...
विद्या - बाजूला हो, दिवाळं काढशील अशानं...
मी - मग घेऊन कशाला आलीस मला?
विद्या - तुला सामान विकत घ्यायला आणलं नाहीये, इतक्या पिशव्या एकटीने उचलवणार नाहीत म्हणून आणलंय.
मी - हा अन्याय आहे...
विद्या - हा संसार आहे... हॅ हॅ हॅ हॅ... तू एक काम कर, त्या आरे च्या स्टॉल पाशी उभा राहा, मी करते खरेदी.

असं म्हणून माझं कुंकू पुन्हा त्या मार्केट च्या गर्दीत गुडुप झालं. मी आरे च्या टपरीवर जाऊन उभा राहिलो तर काउंटर वरचा माणूस माझ्याचकडे बघून हसताना दिसला.

थोड्या वेळाने विद्या २४ रुपयात ४ नारळ घेऊन विजयी मुद्रेने बाहेर आली. पिशवी माझ्या हातात देऊन पुन्हा आत गुडुप झाली. त्या नंतर पुढचा अर्धा तास पूर्वी लोकं कामावरून आली की पडवीतल्या खुंटी वर पगड्या अडकवत तशा वेगवेगळ्या पिशव्या ती मला अडकवत होती. माझ्या लस्सीच्या ३ बाटल्या संपल्या होत्या. शेवटी एकदाची खरेदी झाली. घरी जायला रिक्षा पकडली.

विद्या - संध्याकाळचा काही प्रोग्रॅम ठरवू नकोस.
मी - का?
विद्या - का म्हणजे काय?
मी - का म्हणजे व्हाय?
विद्या - फालतू विनोद नकोयत. आज संध्याकाळी सोसायटी मध्ये गेट टू गेदर आहे. त्या आधी पुजा आहे. आपण बसणार आहोत पूजेला.
मी - अरे बापरे.
विद्या - बापरे काय? १ तास स्वस्थ एका जागी बसायला त्रास होतो?
मी - त्यासाठी नाही गं, पुजेला बसेन मी २ तास सुद्धा. पण खरा छळ त्या नंतर आहे.
विद्या - म्हणजे काय?
मी - बघशीलच. पण मी पूर्णं वेळ थांबेन ह्याची गॅरंटी नाही.
विद्या - माहितीये मला...
मी - काय माहितीये?
विद्या - साठे आजींनी सांगितलंय, इथे गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले की तुम्ही सगळे गच्चीत जाऊन पाण्याच्या टाकी खाली झोपता ते.
मी - आयला...
विद्या - ह्या वेळी सगळ्या गच्च्यांना कुलुपं घालायला सांगितली आहेत.
मी - अरे काय???
विद्या - काय काय? काय होतं रे जरा ३-४ तास घालवले तिथे तर.
मी - अग प्रश्न वेळेचा नाहीये गं. पण त्या ३-४ तासात जे मानसिक अत्याचार होतात ते सहन नाही होत. गाण्याचे प्रयत्न, नाचाचे प्रयत्न, निवेदन करणार्‍या मेहता काकूंचे तेच तेच जुने विनोद ऐकून आत पकलोय मी. मागच्या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एका मुलीने क्रेझी किया रे वर डान्स केला. 'क्रेझी किया रे' सांस्कृतिक कार्यक्रम??? दुसर्‍या दिवशी सेक्रेटरींना विचारलं तर म्हणाले 'माहिती आहे रे, पण आपला जमाना राहिला नाही. काळ बदललाय'.
विद्या - हा हा हा हा हा
मी - हसायला काय झालं?
विद्या - अरे ते पाटील काका साठीचे नी तू तिशीत पण नाही. तरी तुला ते आपल्यात समजतात.
मी - अगं ते मला त्यांच्यात नाही, त्यांना आमच्यात समजतात. रिटायर झाल्यावर जीमला वगैरे जायला लागलेत.
विद्या - बघ...
मी - बघ काय? मी पण जाईन रिटायर झालो की. त्यांचा मुलगा बबन पण जायचा जीमला.
विद्या - बबन कोण? त्यांच्या मुलाचं नाव राजेश आहे ना?
मी - तेच गं, त्याला आम्ही बबन म्हणतो. तर, हा घरून निघायचा नी थोडा पुढे जाऊन पुन्हा मागच्या गेट नी सोसायटीत यायचा नी टाकीखाली तासभर मस्त गजर लावून झोपायचा. एक दिवशी काकांनी बघितलं नी बुकल बुकल बुकललं.
विद्या - धन्य आहे, तुमच्या पैकी एक पण सरळ नाहीये ना?
मी - मी आहे ना
विद्या - आहेस ना, जिलबी सारखा सरळ...
मी - ए आज जिलब्या कर ना जेवायला...
विद्या - जिलब्या म्हणजे काय दडपे पोहे वाटले तुला? तयारी लागते भरपूर त्यासाठी. पुढल्या रविवारी करीन. त्या आधी तुझा मूड बदलला तर वेळेवर कळव मला. कामात बिझी असशील तर स.म.स. करून सांगितलंस तरी चालेल.
मी - हो गं
विद्या - चिडू नको रे...
मी - चिडलोय कुठे?

घर आलं. पुन्हा रिक्षावाल्याशी २ रुपये जास्त कसे झाले म्हणून हिने धुमशान करून त्याला ३ रुपये कमी दिले. आपला वारसा पुढे चालवणार्‍या सुनेकडे आई मोठ्या कौतुकाने बघत होती. दोघींची बार्गेनींग पावर जबरदस्त आहे. बर्‍याच आधी एकदा मामे बहिणीच्या लग्नाच्या साडी खरेदी साठी आई बरोबर मी हमाल म्हणून गेलो होतो (जोशी घराण्यातल्या तमाम पुरुषांचा हा वारसा आता मी पुढे चालवतोय) साडीवाला किंमत सांगायचा आणि आई डायरेक्ट त्याच्या अर्ध्या पासूनच सुरुवात करायची. मग बराच वेळ ढील देणे, घसीटणे असे संक्रांतीतले प्रकार करून झाल्यावर आईने दुकानदाराला गुंडाळला. दुकानातून निघालो तेव्हा भर उन्हाळ्यात दिवाळं निघाल्याचा भाव दुकानदाराच्या चेहेर्‍यावर होता.

शनिवार असल्याने आज भरपूर झोपायला मिळणार ह्या आनंदावर विरजण पडलं. नशिबाने रविवार हाताशी होता. रविवारी दुपारी जेवण झाल्यावर विद्या बाहेर जायला निघाली.

मी - कुठे स्वारी?
विद्या - मैत्रिणीकडे चाललेय?
मी - किती वाजता येणारेस?
विद्या - उशीर होईल. खूप महत्त्वाचं काम आहे.
मी - बरं. जाताना लॅच लावून जा. गुड नाइट.
विद्या - गुड नाइट काय? रद्दी विकायचं कबूल केलंयस ना आज.
मी - पुढल्या रविवारी विकतो गं.
विद्या - मागचे ३ रविवार तुझा पुढला रविवार येतंच नाहीये.
मी - पुढला रविवार नक्की.
विद्या - पंखे पण पुसायचेत.
मी - पण पंखे स्वच्छ तर आहेत.
विद्या - अरे धूळ जमलेय. फिरतायत म्हणून दिसत नाहीये.
मी - मग फिरतेच राहू दे की. बंद कशाला करायचेत? तसंही मुंबई मध्ये १२ महिने उकडतंच. मुंबईत दोनच ऋतू उन्हाळा नी पावसाळा.
विद्या - पु.लं.चे डायलॉग ढापू नकोस. बरं चल मी निघते.
मी - टाटा.

बायको गेली नी अचानक मला साक्षात्कार झाला की लग्नानंतर पहिल्यांदाच मी इतके तास एकटा असणार आहे. म्हणून मध्याला फोन केला. तर तो पण घरी एकटाच होता. संध्या पण बाहेर गेली होती. एकत्रच गेल्या असणार. आहेच ती सीता-गीता ची जोडी. दहा मिनिटांत साने काकांचा रिकामा आहेस का म्हणून फोन आला. साने काकूंनी मैत्रिणी घरी येणारेत म्हणून ह्यांना ६-७ तास बाहेर कुठेतरी फिरून या असं सांगून कटवलं होतं. पुन्हा सगळे शबरी मध्ये जमलो. दुपार असल्याने उकाड्यावर मात करण्यासाठी बियर प्यावी असं सर्वानुमते ठरलं.

ग्लास भरून 'हर्षयती, आनंदयती, उल्हासयती' केलं. पहिल्या पावसाच्या गार धारा पडल्यावर तप्त धरणी जशी तृप्त होते तशीच आमची अवस्था झाली.

इथे आम्ही शबरी मध्ये कार्यमग्न असताना आमच्या अपरोक्ष मात्र वेगळंच राजकारण शिजत होतं ह्याची आम्हा अश्राप जिवांना कल्पना नव्हती.

सध्या नी विद्या कुणा मैत्रिणीकडे गेल्या नसून साने काकूंच्या घरे गेल्या होत्या. नी सोबत विज्या ची बायको नी विन्याची होणारी बायको ह्या सुद्धा होत्या. त्या दिवशी साने काकूंच्या घरी खं.बा. (खंबीर बायका) ची बैठक होती. अर्थात हे नाव आम्हीच त्यांना ठेवलं आणि बैठकी बद्दलही आम्हाला नंतरच कळलं. पण त्या दिवशी जरा म्हणून सुगावा लागू दिला नव्हता.

साने काकू - या या
विद्या - काय म्हणता काकू
साने काकू - मी मजेत गं, बोला काय काम काढलंत?
निता - मी चहा ठेवते
विद्या - आम्हाला तुमचा सल्ला हवाय.
साने काकू - कशाबद्दल? आणि तोही चौघींना एकदम.
संध्या - नवर्‍यांना कंट्रोल मध्ये कसं ठेवावं ह्या बद्दल.
साने काकू - साने काका माझ्या कंट्रोल मध्ये आहेत ही अफवा कुणी पसरवली.
विद्या - तसं नाही काकू पण आता इतक्या वर्षानंतर तुम्हाला नक्कीच आमच्या पेक्षा जास्त अनुभव आले असतील. त्यातून आम्हाला शिकायला मिळेल.
साने काकू - असं म्हणतेस? बरं. समस्या काय आहे?
निता - दूध उतू गेलं वाटतं...
संध्या - त्याचं असं आहे काकू की मध्या तसा चांगला आहे. पण खूप जास्त आळशी आहे. मला वाटलं होतं लग्नानंतर सुधारेल.
साने काकू - हे कुणी सांगितलं तुला??
संध्या - असं मला वाटलं होतं.
साने काकू - असं काही नसतं. नी तुमच्या लग्नाला अजून वर्षही झालं नाही, इतक्यात काय सुधारणा होणार?
कोरस - ह्म्म्म्म्म
साने काकू - हे बघ, आता मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. लग्ना नंतर मुलं लगेच सुधारत नाहीत. तशीही मुलं मुलीपेक्षा थोडी जास्त बालिश असतात. त्यामुळे पहिलं वर्ष तर आपलं आत लग्न झालंय ह्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. दुसरं असं असतं की त्यांचं बाहेरचं आयुष्य पूर्वी सारखंच सुरू असतं
विद्या - पण हे चुकीचं नाहीये का काकू?
साने काकू - चुकीचं आहे पण चूक त्यांची नाहीये.
संध्या - म्हणजे?
साने काकू - म्हणजे बघ. लग्नानंतर आपण मुली नवीन घरात येतो. घर नवीन, घरची लोकं नवीन , शेजारी नवीन, जुन्या मैत्रिणी नाहीत. त्यामुळे आपलं घर एके घर असंच काँसंट्रेशन होतं. पण मुलांच्या आयुष्यात एक बायको सोडली तर तसा काहीच फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच, सगळं सेमच. आपण माहेरी गेलो की कसं पुन्हा आठवडाभर पूर्वी सारखं लोळून काढतो की नाही. आई कशाला म्हणून हात लावू देत नाही. तशीच ही मुलं तर १२ महिने माहेरीच असतात.
संध्या - मग?
साने काकू - मग काय? पहिले प्रथम एक लक्षात घ्या. शिट्टी झाल्यावर भात जसा लगेच शिजत नाही तसे नवरेही लग्नानंतर लगेच बदलत नाहीत. आधी सांगितल्या प्रमाणे काही अपवाद वगळता मुलं मुलींच्या तुलनेत इम्मॅचुर असतात. त्यामुळे जसं आपण शिट्टी झाल्यावर वाफ जिरायला वेळ देतो तसंच मुलांमध्ये लग्न जिरायला जरा वरा वेळ द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे नवर्‍याच्या मागे सारखी हे कर - ते कर भुणभूण नाही करायची. आधिच लग्नानंतर आपलं स्वातंत्र्य संपणार ह्याची त्यांना भीती असते. त्यात आपण सारखं त्यांच्या मागे लागलं तर त्याची खात्रीच होते त्यांना.
विद्या - अहो मग काही करणारच नाहीत ते.

साने काकू - असं नाहीये. एक गंमत सांगते. थोडं डोकं चालवायचं. आमचं लग्न झालं तेव्हा हे पण असेच होते. बाहेरची कामं करायचं डिपार्टमेंट ह्यांच्याकडे होतं. एकदा पुढला रविवार, पुढला रविवार करता करता महिनाभराची रद्दी साठली घरात. मी ती एका पिशवीत भरली नी ह्यांच्या कपाटात ठेवली. लगेच पुढल्या रवीवारी घरातली रद्दी गायब.
निता - व्वा. काकू तुम्ही सॉलिड आहात.

साने काकू - अजून एक. टेलिफोनचं बील भरायला विसरायचे. मी एके राती जेवताना ह्यांना विचारलं 'अहो कुणाला काही निरोप द्यायचेत का?' हे गोंधळले. मी खुलासा केला 'अहो काल टेलिफोन वाले येऊन सांगून गेले आठवड्याभरात बिल भरा अथवा लाइन कापू. आता आपण कधी इतक्या लवकर बिल भरतो का? ह्या टेलिफोनवाल्यांना काहीच कळत नाही बाबा.' दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाण्याआधी बिल भरण्यात आलं.
संध्या - भारीच...

साने काकू - त्यामुळे थोडं डोकं चालवायचं. आता एक सांग, ऍडी अजिबातच बदलला नाहीये का?
विद्या - अगदीच तसं नाहीये. थोडा सुधारलाय. आजकाल कट्ट्यावर जास्त टाईमपास करत नाही. संध्याकाळी पण बर्‍याचदा घरी असतो. आणि मागच्या महिन्यात स्वतःहून बाबांच्या वाढदिवसाला हॉटेल मध्ये टेबल बुक करून ठेवलं होतं. डेंजर सासर्‍याला सरप्राइज पार्टी म्हणे.

संध्या - मध्याने पण सिगरेट कमी केल्यात म्हणत होता. नी आज काल मित्रांचे फोन आले तरी टाळतो काही तरी कारणं सांगून. काल स्वतःहून कट्ट्यावर जाताना 'काही आणायचंय का गं बाहेरून?' असं विचारून गेला.
विद्या - अगं आज सकाळी ऍडी नी बटाटे घेतले चिरायला. मी म्हणाले राहू दे, भाजी झाली आहे करून. आज काल रोज उशीर होतोय ऑफिस मध्ये. एक दिवस करू दे थोडा आराम. मी काय, ९ ते ६ फिक्स ड्यूटी. नी ६ ला सुटले की ६:१५ घरात असते.
साने काकू - वा. बरीच प्रगती आहे.
विद्या - मग आता?

साने काकू - आता काय? जरा सबुरीने घ्या. नवरे तुमचे आहेत, संसारही तुमचा आहे. लोणचं थोडं मुरू द्या नी मग बघा संसार कसा मस्त चटपटीत होतो ते. तेंव्हा, चिंता सोडा नी संसार मस्त एन्जॉय करा. चला, करा चहाने चियर्स.
कोरस - चियर्स.


------------------------------------- क्रमश -------------------------------------




मित्र हो, आयुष्याचं हे नाटक आता इथे एका महत्वाच्या वळणावर येऊन थांबवत आहे. आता सगळ्यांची गाडी रुळावर आली आहे. प्रत्येक पात्र आता आप-आपलं आयुष्य हवं तसं जगायला मोकळं आहे. त्यामुळे मजा येतेय तोवरच थांबावं असा विचार आहे.

डिस्क्लेमर - ह्या नाटकातली सगळी पात्र आणि घटना पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कुणाला काही साम्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्यातली विद्या मी, संध्या मी, साने काका मी, मध्या मी आणि ऍडी तर मी आहेच. आणि देवाच्या कृपेने मी अजून सुखी आणि एकटा जीव सदाशिव आहे.

चड्डी - एक रहाण्याची जागा

| Labels: | Posted On 10/13/08 at 7:51 PM

त्याचं असं झालंय की आज काल लोकांना आपला पसारा कुठवर पसरायचा हे कळेनासं झालंय. आता 'मी लय भारी' हे तर सगळीकडे ठणकावून मांडायलाच हवं. पण त्यासाठी बर्‍याच विषयात गती असावी लागते. पण स्वतःला प्रत्येक विषयात गती असतेच असं नाही. आणि आहे असं वाटलं तरी वाटणं आणि असणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच आमच्या गिरगावात असा कुणी नग फिरताना दिसला की त्याला 'चड्डीत र्‍हा नं भौ' असं म्हणायची पद्धत आहे.

हे असं चड्डीत न रहाणं सुरु झालं की लय प्रॉब्लेम्स सुरू व्हतात. आपण काय करतोय, कशासाठी करतोय हे विसरून जे करतोय ते करत रहायचं नी मधे बोलणार्‍यांना शिव्या देत रहायचं. शिव्यांना काही लोकांच्या भाषेत अपशब्द सुद्धा म्हणतात. असो. कातळ लागला तरी ह्यांची कुदळ चालतेच आहे असं होतं मग.

ह्याच प्रकारातला एक किस्सा पु.लं.च्या बिगरी मधे आहे. त्या मुलांच्या मुख्याध्यापकांनी फुटबॉल शाळेच्या कपाटात बंद करून ठेवला. कारण - 'मुलांनी पाय मारून मारून फुटबॉल मधली हवा काढली'. पण प्रश्न हा आहे की शुद्धलेखन गिरवायला लावायचं सोडून मुख्याध्यापकांनी मुलांना फुटबॉल खेळूच कसा दिला?

आता 'चड्डीत रहाणे' ह्या वाक्प्रचाराचा दुसरा उपयोग पाहू. ह्या लोकांनाही आपण लय भारी असा उगाच गैरसमज असतो. त्यामुळे अशी लोकं जिथे तिथे नाक खुपसत असतात. आपलं काम असो वा नसो, सल्ले देत रहायचं. लोकांची अक्कल काढत बसायची. निष्कारण लोकांना टोमणे मारत बसायचं. कारण - मी लय भारी. ह्यात गोची अशी होते की आपल्याला वाटतं आपण बोलतोय ते बरोबर आहे. लोकांना आपल्या सल्ल्याची गरज आहे. आपल्याहून कर्तूत्ववान व्यक्ती ह्या जगात झाली नाही. अमेरिकेची आर्थीक स्थिती सुधारण्याचा उपाय आपल्याच कडे आहे. पण च्यामारी, असं नसतं.

ह्या प्रकारातला एक किस्सा पु.लं.च्या असामी मधे आहे. त्यांचा एक मित्र, नानू सरंजामे, त्यांना एक कवीता वाचून दाखवतो 'मी झोपतो करून हिमालयाची उशी'. अरे... ह्या नानूला बुटाच्या तळव्या पासून मोजला तरी उंची पाच फुटाहून जास्त भरत नाही. ह्याला झोपायला ट्राम मधला बाक पण मोठा होतो. नी निघालाय हिमालयाची उशी करायला.

असे चड्डीत न रहाणारे, गरज नसताना बोलणारे आणि बोलावलं नसताना येणारे पाव्हणे बरेच असतात. त्यामुळेच आमच्या गिरगावात असा कुणी नग फिरताना दिसला की त्याला 'चड्डीत र्‍हा नं भौ' असं म्हणायची पद्धत आहे.

आता 'चड्डीत रहाणे' ह्या वाक्प्रचाराचा तिसरा उपयोग पाहू. आमचा शेजारचा बाब्या चित्र काढत होता. बराच वेळ खाडाखोड सुरू होती. चित्र काही मनासारखं जमत नव्हतं. तेव्हढ्यात दुसरा मित्र आला. त्यानी बराच वेळ बघितलं आणि म्हणाला 'व्वा, प्रयत्न सुत्य आहे, पण नारळाचं झाड असं काढत नाहीत.' असं म्हणून त्याने ३-४ तास कष्ट घेऊन एक नारळाचं झाड काढून दिलं. नी मोठ्या अभिमानाने ह्याच्याकडे बघितलं. ह्यावर बाब्या म्हणाला 'मी झाड काढत होतो हा दिव्य शोध कुणी लावला?' आता दुसरा गडबडला 'अरे पण तू हे नळी सारखं उंच काय काढत होतास?' ह्यावर बाब्या म्हणाला 'चड्डीत र्‍हा नं भौ. मी नारळाचं झाड नाही, जिराफाची मान काढत होतो.'

आता 'चड्डीत रहाणे' ह्या वाक्प्रचाराचा चौथा उपयोग पाहू. ह्या लोकांचा सुद्धा मी लय भारी असा गैरसमज असतो. त्याचा अनुभव आमच्या एका मित्राला आला. तो दापोली खुद्द हून सावंतवाडीला जायला निघाला होता. मधेच दुचाकी पंक्चर झाली. जवळच्या गावातल्या एका मित्राच्या घरी गाडी लावली नी लागला चालायला. थोड्यावेळानी एक सर्वीस गाडी आली. गाडीवाला ओरडायला लागला 'सांताडी... सांताडी...' मित्र गडबडला 'हे कोणतं गाव?' डायवरला विचारलं 'सावंवाडीला जाणार का?' डायवर फिस्कटला 'ह्ये कोंत गाव काडलंत? गाडी सांताडीला जातीया, येताय तर चला. उगाचा टायमाची खोटी नका करू.' नशीबाने त्या गाडीत मी बसलो होतो. मित्राला म्हणालो 'अरे सांताडी म्हणजेच सावंतवाडी, बस चटकन'.

ह्यावर माझा मित्र सरकलाच. 'जोश्या, अरे काय हे. गावाचं नाव सावंतवाडी आणि हा म्हणतोय सांताडी. तू चक्क मला त्याचं बरोबर आहे म्हणून सांगतोयस.' मग तो डायवर कडे वळला 'अहो मिस्टर, सांताडी काय म्हणताय. सावंतवाडी म्हणा की.' आता डायवर उचकटला 'चड्डीत र्‍हा नं भौ. सावंतवाडी म्हटल्याने गाडी दोन तास आधी पोचणार आहे का?'

आता मी रागावलो 'च्यामारी माझं आडनाव जोशी असून तू बोलता यायल्या लागल्या पासून एकदा तरी मला जोशी म्हणालायस का? जोशी चा जोश्या तू स्वतःच करतोस, मग सावंतवाडीचं सांताडी झालं तर तुझ्या तातांच काय जातं?

हे ऐकून माझ्या मित्रानी मान डोलावली, चड्डीत गेला नी गप गुमान गाडीत बसला.



विषेश सूचना - ह्या लेखात कुणाला शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या चुका आढळल्या तर त्या मुद्धाम केल्या आहेत. चुका सांगायचे कष्ट घेऊ नये. चड्डीत रहावे.

प्रेमाचे लोणचे

| Labels: | Posted On 9/12/08 at 5:06 PM

पाहताच तुज डोळे भरूनी, मन ओथंबूनी गेले,
चित्त राहिले न थार्‍यावर, मन निसटूनी गेले.

जसे दवबिंदू वेली फुलांवर, नेत्र तुझे भासले,
ध्यान धरीतो तुझे लोचनी, जीवन तुज वाहिले.

कांती तुझी मज टाकी मोहूनी, चंद्रासही लाजवे,
एक आगळी वीज अनामीक, केसांतुनी सळसळे.

लिहू किती मी तुजवर ओळी, भान न मज राहिले,
वाळली शाई ह्या बोटांवर, कागदही संपले.

(आता काव्यातून सत्यात येउया)

भाऊ तुझा गं देई धमक्या, पाहूनी मज गुरगुरे,
काय करावे आता आपण, काही मज न कळे.

रात्री तो भेटे गुत्त्यावर, देई धडे नितीचे,
दिसतो आणिक किती भयानक, सावट हे भितीचे.

परी न हरलो, नाही थांबलो, प्रेम केले मी खरे,
भाऊ तुझा का मधे कडमडे, प्रश्न एकची उरे.

धरले एका रम्य सकाळी, मला तुला बघताना,
दिवस कसा तो गेला निघूनी, भग्न हाडे मोजताना.

उतरली धुंदी तव प्रेमाची, शुद्ध ही आली मजसी,
पुन्हा प्रेम हे करणे नाही, भाऊ असणारीशी.

आम्ही सिगारेटी ओढून मेलो तर सरकारच्या बापाचं काय जातं?

| Labels: | Posted On 9/2/08 at 5:48 PM

.
.
.
नुकतीच इ-सकाळ वर ही भयानक बातमी वाचली - खासगी व शासकीय इमारतींमध्ये धुम्रपानाला आता बंदी


अधीक माहिती - http://www.esakal.com/esakal/09022008/AurangabadInternationalMaharashtraMumbaiNationalPuneTajyabatmya262795F2D3.htm.
.
.
.
सार्वजनीक ठिकाणी बंदी ठीक आहे. सरकारी कार्यालयांनधेही ठीक आहे. (तिथे तर काम करण्यावरही बंदी असल्याची शक्यता आहे) पण प्रायव्हेट कार्यालयांमधे स्मोकींग झोन्स करायला काय हरकत आहे? स्मोकींग झोन्स मुळे लोकं बाहेर येऊन धुम्रपान करणार नाहीत आणि बाकिच्यांनाही पॅसीव्ह स्मोकींगचा त्रास होणार नाही.

ही भयानक साथ देशाच्या इतर शहरांमधे पसरू नये म्हणून समस्त फुंक्यांच्या वतीने मी सरकारला एक आवाहन करत आहे.


सिगरेट जरी मायक्रो लेवल वर ओढणार्‍याची वाट लावत असली तरी मॅक्रो लेवल वर ती राज्यासाठी, देशासाठी, खंडासाठी आणि पर्यायाने अखंड विश्वासाठी अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे.

स्मोकींग मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा हातभार लागतो ते समजून घेऊ. त्यासाठी आपण केस-स्टडी म्हणून एका फुंक्याच्या आयुष्यात डोकावू आणि त्या अनुषंगाने स्मोकींगच्या काही फायद्यांचा अभ्यास करू. पण हे फायदे अगणीत असल्यामुळे आपण स्मोकींगचे महत्व जाणून घेण्यासाठी त्यांचे ढोबळ मानाने २ प्रकारात वर्गीकरण करू - १) देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारे फायदे २) फुंक्यांचे भावनीक / मानसीक फायदे.



देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारे फायदे:-

कॉलेज मधे सिगारेट ओढायला सुरुवात केली की पहिला प्रॉब्लेम असतो की कुणी बघणार नाही अशी जागा शोधाणे. पण ती घराजवळ नको. त्यामुळे मग लांब जाण्यासाठी बाईक / सार्वजनीक वहातूक व्यवस्थेचा वापर केला जातो. त्यामुळे पेट्रोल पंपावर काम करणारी लोकं, बेस्ट चा कर्मचारी वर्ग, रिक्षावाले अशा शेकडो लोकांच्या पोटाची सोय होते.

सिगारेट ओढून झाली की वास घालवण्यासाठी हॉल्स / विक्स / पोलो आणि तत्सम वासहारक पदार्थ खाल्ले जातात. त्या त्या कंपन्यांच्या कर्मचार्‍यांच्या हातालाही काम मिळते.

आपल्या गोळीमुळेच वास कसा उत्तम प्रकारे दडपला जातो ह्याची जाहीरात त्या कंपन्यांना करावी करावी लागत असल्याने जाहिरात कंपन्यांनाही काम मिळते. त्या अनुषंगाने जाहिराती बनवणारे डायरेक्टर्स, स्टुडीयो आर्टीस्ट, कलाकार इत्यादिंची ही ददात मिटते.

ह्या बनवलेल्या गोळ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी उत्तम डिस्ट्रीब्यूशन व्यवस्था लागते. त्यासाठी बरीच माणसं नेमावी लागतात. त्यामुळे त्यांच्याही पोटाची खळगी भरते.

ह्या गोळ्या खिशात भरून पोचवता येत नसल्याने टेंपो वा तत्सम गाड्या लागतात. त्यामुळे बजाज, टेंपो ट्रॅक्स, टाटा इत्यादी कंपन्यांमधल्या हजारो कामगारांच्या हाताला काम मिळते.

ह्या गाड्या पेट्रोल / डिझेल वर चालत असल्याने पेट्रोल / डिझेल निर्मीती करणार्‍या कंपन्यांना काम मिळते. पुन्हा ह्या गाड्यांची देखभाल वगरे करण्यासाठी बरेच मेकॅनीक लागतात. त्यांच्या पोटातही दोन घास पडतात.

दर वर्षी सरकार सिगारेटचे भाव वाढवत असल्याने आपसूकच सरकारच्या उत्पन्नातही भर पडते. म्हणजेच, सरकारचा जी. डी. पी. वाढवण्यामधे स्मोकींगचाही मोठ्या खारीचा वाटा आहे.

सिगारेट ओढणार्‍या बहुतेक मंडळींचे चहा मिळणारे कट्टे असतात. त्या कट्टेवाल्यालाही त्यामुळे सतत काम असते. तसंच, चहा प्यायला की सिगारेट ओढायची तलफ येत असल्याने पुन्हा सिगारेट ओढली जाते. सिगारेट ओढली की घशाला आराम म्हणून पुन्हा चहा प्यायला जातो.

असं म्हणतात की सिगारेट ओढल्याने भूक कमी होते. हे खरं मानलं तर ह्या मुळे अन्नाचा तुटवडा भरून निघण्यास मदतच होते आहे. सरकारच बहुमुल्य परकीय चलन धान्याची आयात करण्यात फुकट जाण्यापासून वाचते आहे.

पैसा जसा पैशाला ओढतो त्याच प्रमाणे एक सवय दुसर्‍या सवयीला ओढते. माझ्या माहितीतले बहुसंख्य फुंके फळांच्या जुन्या रसांचेही चाहते आहेत. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीचीही भरभराट होते. (त्याचे देशाला काय फायदे होतात ते जाणण्यासाठी वरचे पॉइंट्स वाचा)

त्यामुळेच, विकली गेलेली प्रत्येक सिगारेट भारतीय इकॉनॉमीच्या प्रचंड मोठ्या इंजीनातला एक्-एक पार्ट आहे, भल्या मोठ्या इमारतीतली एक्-एक वीट आहे, आकाशगंगेतला एक्-एक ग्रह आहे.




आता आपण फुक्यांना होणार्‍या मानसीक / भावनीक फायद्यांकडे वळूया:-

सिगारेट ओढणारा माणूस कधीही एकटा पडत नाही. दुपारी देवळात एकट्याने भजन करणारी अनेक लोकं दिसतात, पण कोणत्याही वेळी कट्ट्यावर कुणीतरी एकटाच सिगारेट ओढत बसलाय हे दिसत नाही. फुकट सिगारेट ओढायच्या निमित्ताने का होईना मित्र सोबत असतातच.

आपण सिगारेट ओढताना कुणी पाहू नये म्हणून फुंके सतत चहूकडे बघत असतात. आई-बाबा, शेजारचे काका, शालेतले गुर्जी इत्यादी गनीमांना लांबूनच हेरण्याची सराव झाल्याने त्यामुळे द्रुष्टी तिक्ष्ण ते. अशा लोकांनी ऑलींपीक मधे नेमबाजीत भाग घेतल्यास नक्कीच डझनावारी पदकं मिळतील. तसंच कुणी आल्यास क्षणार्धात पळून जावे लागत असल्याने अंगात चपळता येण्यास मदत होते.

ह्या त्यांच्या सतत इकडे तिकडे बघण्यामुळे रस्त्यावरून चालणार्‍या स्थळांना आपण उगाच प्रेक्षणीय आहोत असा भ्रम होतो नी त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि एकदा का माणसात आत्मविश्वास जाग्रूत झाला की त्याच्या आयुष्याचं भलं होतं. ह्याचाच परिणाम पुढे उत्तम मार्क मिळवण्यात, इंटरव्य्हूत यश मिळून उत्तम नोकरी मिळण्यात वगरे वगरे होतो.

कॉलेजच्या दिवसांत बहुतेकांच्या पानवाल्यांकडे उधारी चालते. इतक्या सगळ्यांच्या उधारीचा चोख हिशोब ठेवल्याने पानवाल्याचे गणित सुधारण्यास मदत होते.

सिगारेट ओढण्यामुळे विचारांना चालना मिळते.

अनोळखी व्यक्तीशी ओळख करून घेण्यासाठी सिगरेट मदत करते. एखाद्याचा नी आपला ब्रँड सेम निघाला तर त्याच्याशी घनिष्ठ मैत्रीही होते.

रात्री अपरात्री ऑफीसमधे काम करताना सिगारेट भवनीक सोबत करते.

वेळी अवेळी एकट्याने भटकताना सिगारेट ओढत असाल तर आगीला घाबरून भूतं जवळ येत नाहीत.

आपण सिगारेट ओढत नसू नी मुलगा सिगारेट ओढायला लागला तर फारच गोची होउ शकते. पॉकेटमनी पुरत नसल्याने बापाच्या खिशातली चिल्लर उडवायला सुरुवात होते. त्या ऐवजी जर बापच सिगारेट ओढत असेल तर मुलगा चिल्लर ऐवजी डायरेक्ट सिगारेटच ढापेल आणि दुसर्‍याचे धन ढापण्याच्या पापातून वाचेल.

असे अजून शेकड्याने फायदे आहेत. पण माझी सिगारेट ओढायची वेळ झाल्याने मी आता इथेच थांबत आहे.


जाता जाता सरकारला अजून एक विनंती - क्रुपया अशी बंदी घालून नका. आम्हाला मोकळा धूर सोडू द्या.

आयुष्याचे नाटक - प्रवेश सातवा

| Labels: | Posted On 8/26/08 at 3:05 PM

प्रवेश सातवा - हम होंगे कामयाब



कोंकणात फिरून आल्यावर एकदम फ्रेश वाटत होतं. काही न करता पंखा फुल्ल स्पीड वर टाकून एकात एक दोन पांघरुणं घेऊन झोपून राहावंस वाटतं होतं. पण कोंकणातल्या डोंगरांत फिरून सिमेंटच्या जंगलात परत आल्यावर आमच्या वनवास पुन्हा सुरू झाला.

फिटनेसचं पिल्लू आमच्या घरी अजून अंड्यातच असलं तरी मध्याच्या घरी मात्र त्याचा टमटमीत कोंबडा झाला होता. आणि आता तर तो भल्या पहाटे आरवायलाही लागला होता. मध्या दाद देत नव्हता आणि संध्या काही हार मानायला तयार नव्हती. मध्याने तिला "बॅंका कधी कधी कर्ज परत यायची आशा नसल्याने काही काही कर्ज राइट-ऑफ करून टाकतात, तसंच तूही माझ्या व्यायामाच्या बाबतीत कर" असं समजवायचा प्रयत्न केला. पण संध्या म्हणजे कर्ज राइट-ऑफ करणारी बँक नसून गुंड पाठवून कर्ज वसुली करणारी बँक होती ह्याचा प्रत्यय मध्याला लवकरच आला.

संध्या - मध्या ऊठ...
मध्या - अगं अजून ६ पण नाही वाजले.
संध्या - लवकर ऊठ, आपल्याला बागेत जायचंय.
मध्या - बागेत कशाला अगं? लग्न झालंय आता आपलं.
संध्या - आचरटपणा नकोय. "स्वस्थ भारत समाज" तर्फे आज पासून बागेत योगासनांचे क्लासेस भरणार आहेत. आपल्याला जायचंय.
मध्या - अगं त्यासाठी क्लास कशाला हवा? हे बघ, माझं शवासन चाललंय.
संध्या - आता तू पुढच्या पाच मिनिटांत उठला नाहीस ना तर तुला आज डब्यात शेपूची भाजी.

शेपू म्हटल्यावर मध्या ताडकन उठला. कसाबसा संध्याचा टेकू घेऊन योगासनं करायला गेला.


हे शेपूच्या भाजीचं प्रस्थ आजकाल आम्हा दोघांच्याही घरात जास्तच वाढलं होतं. व्यायाम नाही तर किमान हेल्थ फूड तरी खावंच लागणार अशी तडी आम्हाला मिळाल्याने तिन्ही त्रिकाळ बाहेर जेवणारे आम्ही आजकाल ऑफिसला गुपचुप डबा घेऊन जात होतो. त्यातच अजून आमचं बजेटींग सुरू असल्याने जिभेला लगाम लागला होता. चायनीजच्या गाड्या, भुर्जी-पावच्या टपऱ्या, वडा-पावचे कोपरे आता आम्हाला खिजवत होते. आणि हे सगळं बघत बघत घरी आलो की कसल्या कसल्या उकडलेल्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्यं, तेल तूप न लावलेले फुलके आणि दूध-साखर नसलेला चहाचा काढा प्यावा लागत होता. हे म्हणजे उर्मीलाचा फोटो बघून मुलगी पसंत करावी आणि ऐन वेळी बोहोल्यावर निरूपा रॉय दिसावी ह्यातला प्रकार होता. पुन्हा उ. न. क. ची बैठक भरवावी लागणार अशी लक्षणं दिसत होती.

दुपारी मध्याचा फोन आला.
मध्या - कुठायंस बे?
ऍडी - ऑफिस. तू?
मध्या - मी पण. संध्याकाळी कट्ट्यावर भेट.
ऍडी - यस सर.
मध्या - अरे आज आपल्या टाम्या चा वाढदिवस आहे. सगळ्यांना जेवायला घेऊन जाणार आहे. काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणाला.
ऍडी - अरे जेवणावरून आठवलं. च्यायला आज मी नेहमी प्रमाणे देवळाबाहेर गायवालीला डबा दिला. डबा उघडून ती म्हणाली "वो सायेब, गायीला काय करायचाय मलई-कोफ्ता? मी उडालोच. बघितलं तर खरंच डब्यात मलई कोफ्ता होता. मी डबा परत घेणार होतो पण तोवर माझ्या डब्यातला माल तिच्या डब्यात ट्रांस्फर झाला होता.
मध्या - हो का? म्हणजे हा आपल्या बायकांचा गेम दिसतोय. काल आमच्या प्यून मला म्हणाला "साहेब, वहिनींना सांगा भरली वांगी मस्त झाली होती. " मी बसल्या जागी ठार. पण नंतर वाटलं बरं झालं बायको सुधारली. कालचा अनुभव लक्षात घेऊन आज स्वतःच डबा खायचं ठरवून मेस मध्ये गेलो. मोठ्या अपेक्षेने डबा उघडला तर आज पुन्हा उकडलेले मूग.
ऍडी - आयला, आपल्या बायका आपल्या एक स्टेप पुढे आहेत म्हणजे.
मध्या - तुला खरं सांगतो ऍडी, ही उकडलेली कडधान्य खाऊन खाऊन मला आजकाल माझ्याच अंगावर मोड आल्या सारखं वाटतंय यार.
ऍडी - हाहाहा
मध्या - हसू नकोस. अरे परवा गंमतच झाली. आमचा पाट्या ऑफिसला येणार नव्हता. त्याने मला सांगितलं बॉसला सांग माझ्या पायाला लागलंय. मी काय सांगितलं माहिती आहे?
ऍडी - काय?
मध्या - मी बॉसला म्हणालो पाट्याच्या पायाला मोड आल्यामुळे तो आज येणार नाहीये.
ऍडी - खॅ खॅ खॅ खॅ
मध्या - असो. आज भेट तू कट्ट्यावर. थोडं डोकं चालवायला लागणार आहे आता आपल्याला.

संध्याकाळी भेटलो कट्ट्यावर. कट्ट्यावर गेलो तर जनता शबरी मध्ये कार्यमग्न आहे असा निरोप मिळाला म्हणून तिकडे कुच केली. गंट्या पण येणार होता, पण अजून आला नव्हता. विन्या, विज्या नि साने काका असे तीन पांडव बसल्या जागेला जागत होते.

ऍडी - गंट्या कुठाय रे?
विज्या - तो सूक्ष्मात गेलाय.
ऍडी - काय? म्हणजे नक्की कुठाय?
विज्या - अरे मला काय माहिती. मगाशी त्याला फोन केला तर म्हणाला "मी सूक्ष्मात आहे, प्रहर भरात बाहेर आलो तर भेटूच".
मध्या - हा गंट्या आजकाल जास्तच माजलाय असं नाही का वाटत तुला.
विज्या - हो ना. काल मी त्याला आजच्या पार्टी बद्दल मेसेज पाठवला तर त्याने मला "ब्रह्म सत्यं, जगन मिथ्या" असा रिप्लाय दिला यार.
ऍडी - ह्म्म्म्म्म. मला एक डाऊट आहे.
विज्या - काय?
ऍडी - हा गंट्या प्रेमात पडलाय?
विन्या - अरे काय सांगतोस? कुणाच्या?
ऍडी - तुला १०५, श्री निवास मधली भिड्यांची मंदा माहिती आहे का?
मध्या - ती अंबाडा? रुपारेल ला बि. ए. फायनल ला आहे ती?
(कॉलेज सुटून तपं लोटली असली तरी आजू-बाजूच्या तमाम प्रेक्षणीय स्थळांची इथ्यंभूत माहिती आम्ही अजून इमाने-इतबारे ठेवत असतो. )
ऍडी - तीच. हा गाढव तिच्या प्रेमात पडलाय असा मला डाऊट आहे.
मध्या - आयला... कशावरून?
ऍडी - अरे तिच्या घरी हा आजकाल तिची शिकवणी घेतो.
मध्या - काय सांगतोस काय? अरे पण गॅसवाल्याला सुद्धा गॅस दरवाज्याबाहेर ठेवायला सांगणाऱ्या भिडे काकांनी ह्याला कसा आत घेतला?
ऍडी - भिडे काका गंट्याच्या बाबांचे मित्र आहेत रे. असो. रोज दुपारी अडीच ते साडेचार हा तिची समाजशास्त्रावर शिकवणी घेतो. आणि ती सुद्धा फुकट.
मध्या - आयला, ह्याची चहा-सिगारेटची बिलं आपण भरायची आणि हा जगाला फुकट शिकवतोय.
ऍडी - अजून गंमत ऐक. हा मंदावर टप्पे टाकतोय अशी खबर मला मिळालीच होती. त्यात हा चांगला चान्स चालून आला. मंदाच्या वडिलांनीच ह्याला विचारलं शिकवशील का म्हणून. हा एका पायावर तयारच होता. फी विचारली तर म्हणाला "ज्ञानदाना सारखं पवित्र काम पैसे घेऊन करण्याचं पाप मी करणार नाही. " बुढ्ढा खूश. असो. तिथेच काहीतरी लोचा झाल्याने हा सूक्ष्मात गेल्याचा मला डाऊट आहे.

तेव्हढ्यात मान खाली घालून गंट्या अवतरला

मध्या - या या या गंटेश्वर... आलात का सूक्ष्मातून बाहेर?
गंट्या - सूक्ष्म गेलं सूक्ष्मात... लार्ज भर.
(ग्लासमधल्या द्रव्याचं आम्हा क्षुद्र जिवांवर प्रोक्षण करून एक मोठ्ठा घोट घेऊन गंट्या बोलता झाला. )

गंट्या - साला आयुष्य व्यर्थ आहे. जगात खऱ्या प्रेमाची किंमतच नाही हेच खरं.
ऍडी - मंदानी पण राखी बांधली वाटतं?
गंट्या - राखी नाही रे तसंच काहीतरी.
विन्या - हा तुझा कितवा प्रेमभंग रे?
गंट्या - सतरावा
ऍडी - व्वा... दर वेळी कसं जमतं रे तुला खरं प्रेम करायला?
मध्या - ते सोड. नक्की झालं काय? ही तुला... ही पण तुला नाही का म्हणाली?
गंट्या - अरे इतक्या वेळा प्रेमात पडल्याने मला आता मुलींच्या मानसिकतेचा चांगलाच अंदाज आलेला आहे. आत जी माझ्याशी लग्न करेल तिला ह्या अनुभवाचा फायदा होऊन ती नक्कीच सुखी होईल.
मध्या- मग?
गंट्या - अरे हेच मी तिला सांगितलं...
ऍडी - काय??? तू माझं सतरावं प्रेम आहेस हे तू तिला सांगितलंस? अरे बरा आहेस ना तू गंटुड्या???
गंट्या - हो रे. पण प्रॉब्लेम असा झाला की त्या सोळा मधल्या ३ जणी हिच्या मैत्रिणी निघाल्या. त्यामुळे मी अगदीच 'ह्यॅ... ' आहे असं ती म्हणाली.
ऍडी - 'ह्यॅ... ' म्हणजे? चमडी का?
गंट्या - जाता जाता ती अजून एक हृदयद्रावक वाक्य फेकून गेली. मी म्हणे... मी म्हणे प्रेमाच्या आकाशातली अमावस्या आहे...
मध्या - उगी उगी गंट्या...
गंट्या - माझं सोडा... तुमचं कसं चाललंय?
ऍडी - आमचं पण सोडा...
साने काका - चला रे आवरा पटापट.

काकांच्या आज्ञेवरून आम्ही पटापट आवरलं. आणि उद्या दुपारी पुन्हा उ. न. क. ची बैठक भरवायची असं ठरवून दबकत दबकत आप-आपल्या घरी परतलो.

गटारी स्पेशल

| Labels: | Posted On 8/3/08 at 12:10 PM




गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.

सोयरे खास, मित्रही जमले
संपती बाटल्या, हिंदकळती पेले.
पडू द्या त्यातच बर्फाचा गोटा,
गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.


आज घरी जाणे नाही, विश्वची घर मानू,
झाडाखाली बागेमधे, दिसेल तिथे ताणू.
प्रशस्त बारही वाटे आज छोटा,
गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.


हाणा कोंबड्या, चापा बकरे,
घोटां सोबतच, दुखःही विरे.
अम्रुताचा कुंभही वाटे मज थिटा,
गटारी सण मोठा, नाही आनंदा तोटा.


-
ऍडी म्हणे आता,
उरलो झिंगण्या पुरता.

आयुष्याचे नाटक - प्रवेश सहावा

| Labels: | Posted On 6/26/08 at 2:49 PM

प्रवेश सहावा - कोंकण यात्रा




सुना आत्या म्हणजे बाबांची सगळ्यात लहान बहीण. २०-२२ वर्ष आई-बाबा आणि भावंडांवर तलवारबाजी करून एके दिवशी सुना आत्या सासरी राज्य करायला निघून गेली. तिला नवराही अगदी म्हणजे अगदीच गरीब मिळाला. सासू नव्हती. सासरेही बिचारे एका कोपऱ्यात देव देव करत बसले असायचे. तशी सुना आत्या मूळची खूप प्रेमळ. आम्हा भाचरांवर तर अमर्याद प्रेम केलं. तिचं सासर कोंकणात असल्याने दर सुट्टीत आमचा मुक्काम तिच्याकडेच असायचा. आंबे उतरवले नि मुंबईला ३ भावांकडे पेट्या आल्या नाहीत असं कधीच झालं नाही. पण तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जरब होती. सासरी गेल्या गेल्या तिने घराची सगळी सूत्र हातात घेतली आणि त्या घराचा बघता बघता कायापालट झाला. काका मुळात स्वभावाने गरीब आणि भिडस्त. पण ह्याच स्वभावामुळे एकट्याने आंबे, शेती, नारळी, पोफळी हा सगळा व्याप सांभाळणं कठीण जायचं. भरवशाचा माणूस कुणी नव्हता. सुना आत्याने तिथेही हळू हळू त्यांना मदत करायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्याला साथ मिळाली तिच्या करारी स्वभावाची, तीक्ष्ण जिभेची आणि टिपीकल कोकणस्थी खवट पणाची.

तर अशी ही सुना आत्या एक दिवस आमच्या घरी आली. आल्या आल्या आमच्या गप्पा सुरू झाल्या.
मी - पप्या कसा आहे गं?
आत्या - सतरां पारांवरचां मुंजा तो, त्याला काय धाड भरतिये?
मी - आणि पप्या चे प. पू.?
आत्या - तोही त्याचाच बाप. व्याघ्रेश्वराजवळ बसलेला असतो दिवसभर.
पप्याचे वडील ही एक अजब आसामी होती. टिपीकल कोकणीपणच आयडियल सँपल होतं. हयात कोंकणात घालवलेली, त्यात कोकणस्थ आणि वरून एकारांती असं डेडली काँबिनेशन होतं. पप्याने इंजिनियरिंगला ऍडमिशन घ्यायची ठरवल्यावर ह्यांनी 'हे पाहा, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस हो. तुझी फी मी भरीन पण नंतर तू माझ्याकडे पाह्यलं नाहीस तर मी कुणाकडे पाहणार' असं म्हणून त्याची 'माझ्या वडिलांनी माझी इंजिनीयरींगची फी भरण्यासाठी स्वतःची हयातभराची कमाई घातली. पुढे मरेपर्यंत मी त्यांना सांभाळीन व यथासांग दिवस-कार्य करीन. अथवा माझ्यावर त्यांनी केलेला खर्च चालू व्याजदरासकट परत करीन. ' असं लिहिलेल्या कागदावर पंचांसमोर सही घेतली.

पण पप्या मुलगा गुणी निघाला. शिक्षण झाल्यावर गावातच बॉल-बेअरिंगची फॅक्टरी टाकली आणि बापालाही सांभाळतोय. एकदा बोलता बोलता हा विषय निघाल्यावर त्यांनी मला सांगितलं 'अरे एकुलता एक मुलगा तो. पैशापेक्षा का मोठा आहे? पण फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते हो... ' हो चा उच्चार टिपीकल हेल काढून.

आत्याने नेहमी प्रमाणे आमच्या घरीही सूत्र हातात घेतली. सुनेने मला वळण लावायचे प्रयत्न केलेले बघून ती माझ्या बायको वर भारीच खूश झाली. 'जोश्यांच्या सगळ्यात नाठाळ आणि वात्रट कार्ट्याशी लग्न केलंस, धीराची आहेस हो पोरी' अशी सुरुवात करून जी माझी लक्तरं टांगायला सुरुवात केली ते ऐकून 'काश ये धरती फटकर मुझे अपने में समा ले' असं वाटलं. जायला निघालो तर मला हात धरून थांबवलं 'जातांयस कुठे, थांब थांब... ' हिने वर आत्त्याला चावी मारली 'अजून सांगा ना ह्याच्या लहानपणीच्या गमती जमती... ' आत्त्याचा पतंग एकदम भरदोल मध्ये उडायला लागला...
आत्या - अगं हा लहानपणापासून असाच आळशी आणि वेंधळा आहे. लहान पणापासून गोडाची फार आवड, म्हणून मी ह्याला लाडाने गोड्या म्हणायचे.
विद्या - अय्या... हा बोलला नाही मला कधी... कित्ती क्युट नाव आहे... गोड्या...
आत्या - आम्ही गिरगावात चाळीत राहायचो तेव्हाची गंमत सांगते, सगळ्या भावंडांच्या मुलांना अंघोळ घालायची मी. आणि हा त्याची वेळ आली की खुर्ची खाली लप, फडताळात शीर असं करून टाळायला बघायचा. एकदा ह्याला पकडून अंघोळ घालताना हात सोडवून जो नागव्याने धावत सुटला चाळभर तो पार अर्ध्या तासाने हातात आला.
मी - अग आत्ते तेव्हा मी २ वर्षाचाही नव्हतो...
आत्या - मला सांगतंयस? मला सांगतंयस? कुले धुतलेत तुझे ह्या हातानी... झोप तर अशी अनावर की कित्येकदा ताटावरच पेंगायला लागायचा. आता तू आलियेस, सुधार त्याला जरा. आम्ही हात टेकले... काय रे, सूनबाईला कुठे घेऊन जातोस की नाही फिरायला? की अजून त्या मध्यासोबतच कट्टा एके कट्टा? मध्ये फोन केला होतान त्याने, म्हणाला... आत्ते ये वेळ काढून राहायला.
मी - वा वा... जातो तर...
विद्या - कोणत्या बायकोला नेतोस? मला तर नाही नेलंस कधी...
मी - अगं असं काय करतेस??? आपण 'रंग दे बसंती' ला नव्हतो का गेलो...
विद्या - ते लग्ना आधी...
मी - आणि परवा बाजारात नेलं होतं ते???
विद्या - बघा ओ आत्या, कसा अरसिक आहे ते, कुट्ठे म्हणून न्यायला नको ह्याला मला.
आत्या - महितिये... आज का ओळखतेय ह्याला... अगं आता बाजारात तरी येतो, लग्ना आधी तर घरातही फिरत नसे. सोफ्यावरच चिकटून असायचा. ते काही नाही गोड्या, बॅगा भरा नि चला माझ्याबरोबर चार दिवस दापोलीस.
विद्या - सहीच... खरंच येतो...
(मला मनापासून कोंकणात राहायला आवडतं, पण ऑफिसची बरीच कामं होती
मी - नको गं आत्या सुट्टी मिळणं शक्य नाही.
आत्या -अरे पुढल्या सोमवारी सुट्टीच आहे ना कसलीशी, चला की तीन दिवस. शुक्रवारच्या रातराणीत बसू. पहाटे दापोलीस. तिथून पुन्हा सोमवार रात्रीची रातराणी पकडलीस की मंगळवारी कामावर जायला हजर.
मी - ह्म्म्म्म्म...
आत्या - अरे ह्म्म ह्म्म काय करतोय शुंभा सारखा...
मी - येतो...


-----------------------------------------------------------------------------------------------

बॅगेत मी फक्त शॉर्टस घेतलेल्या पाहून बायको हैराण झाली 'अग तिथे काय करायचेत कपडे, तिथे गेल्यावर माझा शॉर्टस नि टी-शर्ट हाच गणवेश असतो. तरी बायकोने २ जीन्स टाकल्याच. माझी एक हँडबॅग आणि हिच्या २ सुटकेस असं सामान झालं. मी - अगं शालू नि पैठण्या काय करायच्यात तिथे?
विद्या - वा वा... कुठे कार्याला जावं लागलं तर...
मी - शालू घालून कोंकणातल्या लग्नाला गेलीस तर नवरा मुलगा तुलाच नवरी समजून हार घालेल... हा हा हा... आSSSSS
अंघोळ करून खोलीत कपडे बदलायला आलो तर आत्त्या आत बायकोशी गप्पा मारत होती. तिला म्हटलं जरा बाहेर जा कपडे बदलायचेत तर 'मला लाजतंयस, मला लाजतंयस' म्हणून फिस्कटली.

-----------------------------------------------------------------------------------------------

आपल्याला लहानपणापासून ओळखणारे मोठे आपला कधी, कुठे, कसा पोपट करतील सांगता येत नाही. माझ्या लग्नात बायको मला घास भरवत असताना एका मामाने खवचट पणे भर पंगतीत मोट्ठ्याने ओरडून 'अजून भरवावं लागतं का? ' असं विचारलं होतं. आणि वर स्वतःच ख्यॅ ख्यॅ ख्यॅ करून हसला होता.

-----------------------------------------------------------------------------------------------

गोरेगाव (कोंकणातले) ला बस थांबली तसा मी राष्ट्रकार्य करायला खाली उतरलो. उतरत असताना लवकर ये रे असं मला सांगून आत्याने एकदा मी कसा बाहेर गेलो नि येताना भलत्याच एस. टी. मध्ये कसा चढलो, कशी चुकामूक झाली इत्यादी कहाणी बायकोला ऐकवली.

५:३० ला एस. टी दापोली डेपो मधी शिरली आणि एकदम सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्या. ३-४ वर्षांनी येत असल्याने जुनी ओळखीची ठिकाणं शोधत शोधत घराकडे प्रवास सुरू झाला होता. पप्या गाडी घेऊन आम्हाला आणायला आला होता. दापोली-आसूद ८ किमी चा घाटातला वळणा-वळणाचा रस्ता. मागच्या काही वर्षात कोंकण बरंच बदललं होतं. आणि लोकंही. मातीचे रस्ते जाऊन आता डांबर आलं होतं. पूर्वी आड-वळणाला गल्लीत असणारा असणारा बार आता हमरस्त्यावर आला होता. आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा आसूद एक लहानसं गाव होतं. केशवराज आणि व्याघ्रेश्वर हे दोन देव आणि मुरुड अथवा हर्णेला जाताना तिठ्यावर लागणारा आसूद पुल हीच गावाची ओळख होती.

घरी आल्यावर दारातच आमचं स्वागत केलं आंब्याच्या जुन्या झाडानं. हे झाड आत्त्याच्या सासूबाईंनी लावलं होतं, पुढल्या पिढीला फळं मिळावीत म्हणून. लहानपणी आम्ही ४-५ भावंड आत्त्याकडे आलो की झाडावर दगड मारून आंबे पाडणं हा आमचा आवडता छंद असे. २०-२५ दगड मारले की एखादा आंबा पडायचा. कधी कधी झाडावर चढायचो. आत्या कायम ओरडायची 'अरे घरात पडलेत हवे तितके आंबे, वांदरांसारखे झाडावर काय चढताय? ' एकदा काकांनी समजावलं 'बाळांनो, झाडाला दगड मारू नका, त्यालाही लागतं. ' त्या नंतर आमचं दगड मारणं बंद झालं. झाडाला लागतंय म्हणून नव्हे, तर एके दिवशी झाडाने रागावून आपल्याला फांदी मारली तर पाठीचं काय होईल म्हणून.

आसूदच्या घरी कार्यक्रम ठरलेला असायचा. सकाळी म्हशींना घेऊन नदीवर जायचं, त्यांच्या सोबतच डुंबायचं, घरी आलं की मस्त पैकी मेतकूट भात, तूप, लोणचं आणि ताकातला पापड खाल्ला की अंगणात क्रिकेट खेळायला मोकळे. घरचा हरकाम्या बाबू आम्ही बॅट आपटून आपटून सारवलेल्या जमिनीला खड्डे पाडतो म्हणून आमच्यावर खेकसायचा. जेवणा आधी काकांसोबत वाडीला पाणी घालायचं. दुपारी आत्याने जेवायला काहीतरी खास केलेलं असायचं. तशी पानगी मी नंतर कुठेही खाल्ली नाही.

उन्हं कलली की मग आसूद पुलावर जाऊन जोश्यांच्या हॉटेलात यथेच्छ मिसळ चापायची. लहानपणी ती कायम तिखट लागायची. मग काका बरणीतले पेढे काढून देत. एकदा आमच्या ढकलाढकलीत एका खुर्चीचा हात मोडला. तो नोकराने उचलून एका कपाटामागे ठेवला. २ वर्षांनी पुन्हा गेलो तर खुर्चीही तशीच होती आणि कपाटा मागे ठेवलेला हातही तिथेच होता. रात्र झाली की भुतांचा गोष्टी ऐकता ऐकता झोप लागायची. मग काका एकेकाला उचलून गादीवर ठेवत. कधी कधी रात्र-रात्र भर पत्त्यांचे डावही चालत. पहाट झाली ही बर्वे बुवांचे दूरून ऐकू येणारे अभंग पार काळीज चिरत जात.

ह्या सगळ्या आठवणी क्षणार्धात डोळ्यासमोरून झर्रकन सरकल्या आणि मी अभावीतपणे हसलो. बायकोने बघितलं. ती ही माझ्याकडे बघून समजल्यासारखं हसली.

पहिली बायको

| Labels: | Posted On 6/25/08 at 5:32 PM



माणूस आपलं पहिलं प्रेम विसरत नाही असं म्हणतात. त्यावर माझा आता १००% विश्वास बसलेला आहे. माझंही माझ्या पहिल्या प्रेमाच्या बाबतीत असंच झालं. बाइक घेईन तर RX100 च असं मी बऱ्याच आधी ठरवलं होतं. पण मला सायकल चालवताना पाहूनच बाबांनी मला बाइक घेऊन द्यायची नाही असं ठरवलं होतं. 'सायकलला २ चाकं असतात हे विसरलात का चिरंजीव? ' पासून ते 'अरे आधी सांगितलं असतंस तर पुढचं चाक विकतच घेतलं नसतं' इथपर्यंत अनेक टोमणे मारले. त्या नंतर बरीच वर्ष कधी बाइक ची गरज भासली नाही. पण मला एका आडनिड्या ठिकाणी असलेल्या ऑफिस मध्ये नोकरी लागली आणि बाइक शोध सुरू झाला. पण RX100चं प्रोडक्शन बऱ्याच आधी बंद झाल्याने नवीन बाइक घेता येणार नव्हती. गॅरेज मध्ये गेलो तर 'आज काल RX100 कोण विकतं साहेब? ' असं ऐकायला मिळायचं. आशा मावळत चालली होती. बाजूने जाणाऱ्या दुसर्यांच्या RX कडे रोड रोमियो सारखं टक लावून बघणं सुरू झालं होतं. आणि अशातच एके दिवशी मित्राचा फोन आला 'एक बाइक आहे, पटकन ये बघायला.' बरं वाटत नाही अशी थाप मारून ऑफिस मधून पळालो. बाइक बघितली. आवडली. पण एक प्रॉब्लेम असा होता ही मला बाइक चालवता येत नव्हती. त्यामुळे मग दुसऱ्या मित्राला घेऊन पुन्हा बाइक दर्शन करून आलो. त्याने नीट तपासणी करून बाईकचं हृदय, आतडी वगैरे ठीक आहेत, घेऊन टाक, असा सल्ला दिला. घेऊन टाकली. पहिल्या रात्री जेव्हा बाइक घरासमोर उभी होती तेव्हा मला एक मिनिटही झोप लागली नाही. कधी एकदा सकाळ होतेय आणि कधी एकदा हिला चालवतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी पासून त्या मित्राने अनलिमिटेड चहा सिगरेटच्या बदल्यात मला बाइक शिकवायला सुरुवात केली.

मी जुनी बाइक घेतली हे बघून बऱ्याच अजाण लोकांनी नाकं मुरडली. पण आता मी आहेच 'मल्लीका सोडून रेखा आवडणाऱ्या कॅटेगरी'तला त्याला कोण काय करणार. ज्यांना ही काय चीज आहे हे माहिती होतं त्यांनी मात्र माझं कौतुकंच केलं. जॅपनीज इंजिनियरिंग म्हणजे काय ह्याचा ही बाइक अत्यंत योग्य नमुना होती. साऊंड, सुसाट पिक-उप, वजनाला हलकी असं सॉलिड काँबिनेशन होतं.

हळू हळू मी आणि माझ्या बाइक मध्ये एक इमोशनल बाँड तयार होत होता. व्यवस्थित चालवता यायला लागल्यावर मी जुन्या दिसणाऱ्या बाइकचा काया पालट करायचं ठरवलं आणि बाइक गॅरेज मध्ये नेऊन टाकली. १५ दिवसांनी बाइक जेव्हा चकाचक होऊन आली तेव्हा मला काय वाटलं हे शब्दात सांगणं शक्य नाही. त्यानंतर मात्र माझी बाइक कायम त्याच कंडिशन मध्ये राहिली. सदैव चकाचक.

ह्या बाइक वर मी प्रचंड भटकलो. तीन साडे तीन वर्षात १, ००, ००+ किमी ची भटकंती केली. कोंकण फिरून आलो. रात्री अपरत्री मुंबई लोणावळा दीड तासात असले आचरट प्रकारही केले. ह्या एवढ्या प्रवासात हिने मला एकदाही दगा दिला नाही. नियमाला अपवाद म्हणूनही नाही. आयुष्य बाइकमय झालं होतं.

आणि एके दिवशी दुधात मिठाचा खडा पडावा तशी माझी बाइक कुणीतरी चोरली. त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावरचा माज पहिल्यांदा उतरलेला पहिल्याचं लोकांनी सांगितलं. गणपतीचा धावा करणं सुरू झालं. कुठे तरी पडलेली, सोडलेली दिसेल अशी आशा करत होतो. पोलिसात कंप्लेंट नोंदवली होतीच. त्यांनाही रोज फोन करून पिडणं सुरू झालं. मला धीर द्यायचा सोडून एका पोलिसाने मला स्पष्टपणे सांगीतलं 'चोरीला गेलेली RX100 परत मिळाल्याचे अगदी हातावर मोजण्या इतके अनुभव आहेत. तेव्हा तू बाइक परत मिळण्याची आशा सोडून दे.' माझं बाइकवर असलेलं प्रेम माहिती असल्याने घरचेही हळहळले.

पण मनापासून प्रार्थना केली तर देव नक्की ऐकतो ह्याचा प्रत्यय आला आणि बरोब्बर ११व्या दिवशी मला 'बाइक मिळाली आहे' असा पोलीस स्टेशन मधून फोन आला. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये पोलीसांचं उत्तम सहकार्य मिळालं आणि एका आठवड्यात बाइकचा ताबा मिळाला. पण हे ११ दिवस मी अक्षरशः तळमळत काढले. रात्री मध्येच उठून गॅलरीतून डोकावून बघायचो स्वतःहून आली का घरी म्हणून. सुरुवातीचे २-३ दिवस झोपच आली नाही.

बाइक मिळाली आणि आयुष्य पुन्हा एकदा मार्गावर आलं. त्या नंतर थोड्या दिवसांनी मी अजून एक RX घेतली. आता जुन्या बाइक ला फारच जपत होतो. मित्रही २-२ RX आहेत म्हणून हेवा करत होते. फार थोडे अतिशय जवळचे मित्र सोडले तर मी दुसऱ्या कुणालाही कधीही बाइक चालवायला दिली नाही. लोकं वैतागायचे, जोशा माजलाय म्हणायचे.

मी बाइकशी गप्पा मारायचो. सकाळी सकाळी बाइक सुरू केली की फायरिंग ऐकून कळायचं की आज हिचा मूड कसा आहे. पण फार काळ एकत्र रहायचं आमच्या नशिबात नसावं बहुतेक.

मी बँगलोर ला यायच्या थोड्याच आधी माझा अंधेरी जवळ माझा एक मोट्ठा अपघात झाला. ७० च्या स्पीड नि सुमो मध्ये मागून घुसलो. नशिबाने मी कायम हेल्मेट, जॅकेट, ग्लोव्हज घालत असल्याने मला थोडंसंच खरचटलं. पण बाइक चालवण्या पलीकडे गेली होती. तात्पुरती डागडुजी करून बाइक घरी आणली आणि मनावर दगड ठेवून थोड्या दिवसांनी विकून टाकली. पुन्हा त्या नंतरचे २ दिवस मला झोप लागली नाही.











आयुष्याचे नाटक - प्रवेश पाचवा

| Labels: | Posted On 6/24/08 at 7:45 PM

प्रवेश पाचवा - खुळ्यांची खुळं





पु. लं. नि सांगितल्या प्रमाणे स्त्रियांची म्हणून पुरुषांनी चालवलेली जी मासिकं असतात त्यातलंच एक वाचून विद्याला तिचं वजन उंचीच्या प्रमाणात जास्त आहे असा साक्षात्कार झाला आणि घरात फिटनेसचं वारं वाहू लागलं. 'पण तुझं वजन रुंदीच्या प्रमाणात बरोबर आहे... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ... ' असं त्यावर मी म्हटल्याने बदला म्हणून हे फिटनेसचं झेंगट माझ्याही मागे लावण्यात आलं.

मी अगदीच हार्ड नट असल्याने जीम मध्ये नाव नोंदवण्यास सरळ नकार दिला. काही वर्षापूर्वी मी आणि मध्याने जीम मध्ये नाव नोंदवलं होतं. ३ महिन्याची फी भरली. पैसे भरले की झक मारत जाऊच हा आमचा विश्वास पार बुडीत निघाला आणि आठवड्या भरात आमची जीम बंद झाली. त्यानंतर काही महिन्यांनी आता वाट्टेल ते झालं तरी जायचंच असं ठरवून पुन्हा ३ महिन्यांचे पैसे भरून आलो. आणि पुन्हा आठवड्याभरात जीम बंद. तिसऱ्यावेळी गेलो तेव्हा शेवटी सर म्हणाले 'तुम्ही आधी आठवडाभर फुकट या. त्यानंतरही आलात तरच पैसे भरा. ' ती वेळ अर्थातच आमच्यावर कधी आली नाही.

हा अनुभव मी विद्याला ऐकवल्याने व्यायामाची सुरुवात चालण्यापासून करावी असे तिने आणि संध्या ने ठरवले. पहिल्या दिवशी सोडायला चल असं म्हणून हिने मला पहाटे उठवलं. 'बागेत चालायला जायचं तर तिथपर्यंत सोडायला गाडी कशाला हवी. चालतच जा की. ' हा सल्ला धुडकावून ती पंखा बंद करून निघून गेली. मध्याही संध्याला सोडायला आला होता. थोड्यावेळाने ह्या घामाघूम होऊन बाहेर आल्या तेव्हा आम्ही बागे समोरच्या हॉटेलात बसून जिलबीवर ताव मारत होतो. ते बघून संध्याने टोमणा मारला 'वा... बायका आत घाम गाळतायत आणि तुम्ही इथे जिलब्या हाणताय... ' त्यावर लगेच मी प्रती टोमणा दिला 'मॅडम रोज १२-१२ तास योगासनं करतो. शवासन आणि मकरासन आलटून पालटून... हा हा हा... ' उत्तरा दाखल मला अंगठा आणि मधलं बोट मुडपून पेरांच्या हाडांनी चिमटा काढण्यात आला.

संध्याकाळी येताना विद्या स्किपींग रोप्स घेऊन आली. आज पायांचा व्यायाम झाला आता उद्या खांदे आणि हातांचा व्यायाम होण्यासाठी दोरीच्या उड्या मारणार. दुसऱ्या दिवशी अचानक ६ वाजता धप्प... धप्प... धप्प... अशा आवाजांनी जाग आली. घाबरून जागा झालो तर बेडच्या बाजूला विद्या दोरीच्या उद्या मारत होती. 'अगं बिल्डिंग जुनी झाली आहे आपली' हे ओठांशी आलेलं वाक्य मी पुन्हा पंखा बंद होईल ह्या भीतीने मी गिळलं. पुढल्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा त्यांचा चालायचा व्यायाम आणि आमची जिलबी. दुकानदार जुन्या ओळखीचा असल्याने त्याने ऐकवलंच 'अरे बायको बरोबर येते त तुम्ही पन चालते का नाय? त्यावर मध्याने ऐकवलं 'आमी चालते त तुज्या जिलब्या कोन खाते??? ' देवाच्या कृपेने त्यांचं हे फिटनेसचं खूळ लवकरंच उतरलं आणि आमची सकाळची जिलबी बंद झाली. काही दिवस शांततेत गेले.

पण स्वस्थ म्हणून बसायचं नाही असा काही बायकांचा स्वभाव असतो. त्यानुसार फावल्या वेळात बिल्डिंग मधल्या मुलांना शिकवण्याचं खूळ हिच्या डोक्यात शिरलं. मुलांच्या आयांनी पण दुसरी कडे जाऊन काय हवा तो दंगा करू दे म्हणून आनंदाने परवानगी दिली. पण शिकवायचं काय हा प्रश्न होताच, कारण सगळी मुलं वेगवेगळ्या इयत्तेतली होती. त्यावर आपण संस्कारवर्ग सुरू करू असं ठरवण्यात आलं. मदतीला अर्थातच संध्या.

त्यानुसार रवीवारी सकाळी ७ वाजता ५-६ आयांनी आप-आपली कार्टी आमच्या घरी आणून सोडली आणि स्वतः झोपायला निघून गेल्या. आमच्या खालच्या साठे काकांचा अक्षय आला नि डायरेक्ट माझ्या शेजारी पांघरुणात शिरला. थोड्यावेळाने बायको त्याला शोधत शोधत बेडरूम मध्ये आली.

ऊठ ना रे सोन्या...

उं हूं...

शहाणी बाळं झोपतात का इतक्या वेळ...

ऍडी काका झोपलाय की...

अरे तो कुठे बाळ आहे... (तो कुठे शहाणा आहे हे शब्द तिने मुश्किलीने आवरले असावेत)

मी पण मोठा झालोय...

बघ बाहेर सगळे जण किती मजा करतायत...

(मी हळूच पांघरून वर करून बघितलं तर अक्षयची धाकटी बहीण खुर्चीवर पेंगत होती, नि एक मुलगा सूर्यनमस्काराच्या ६व्या आसनातच हात लांब करून झोपला होता)

काय करतायत???

तू बघ तर येऊन...

नंतर बघतो...

हा आता ऐकत नाही म्हणून बायकोने त्याला उचलून न्यायचे ठरवले. तिची थोडी गंमत करावी म्हणून मी पांघरुणाखालून हात घालून त्याला धरून ठेवला. ते बायकोला कळलं असावं म्हणून ती म्हणाली 'ऍडी काकाला घेऊन आलास तर तुला चॉकलेट देईन. ' लगेच सोडलं त्याला. त्यानंतर बाहेर अर्धा तास प्रचंड रडारड आणि कल्ला करून मुलं आप आपल्या घरी निघून गेली.

अक्षयचे बाबा अरविंद मला २ वर्षच सीनियर. तो पण माझ्या सारखाच निशाचर आणि सूर्यवंशी. ह्या बिल्डिंगच्या पाण्यातच काहीतरी आहे राव. दुपारी कट्ट्यावर जायला निघालो. बऱ्याच दिवसात गप्पा झाल्या नव्हत्या म्हणून त्यालाही सोबत न्यावे असा विचार करून बेल वाजवली तर साठे आजींनी दार उघडलं.

मला बघून मिष्किल पणे विचारलं 'काय रे??? खु खु खु खु... '

काय झालं आजी...

मला काय होणारे??? तुम्हाला काय झालंय???

मला कुठे काय झालंय...

नाही... मुलं सांभाळायचा सराव सुरू झालाय म्हणून विचारलं हो...

असं काही नाहीये हो आजी. अजून किमान वर्षभर तरी विचार नाही...

अजून वर्षभर??? अरे अजून थांबलास तर मुलाला घेऊन फिरताना मुला ऐवजी नातू समजतील हो लोकं त्याला... खु खु खु खु

ह्यांच्या नातवाच्या वेळी मध्याने मोट्ठा किस्सा केला होता. नातवाच्या बारशाला आम्ही जमलो असताना त्यांनी नातवाच्या जिभेवर मधाचा थेंब लावला. का लावला म्हणून विचारल्यावर म्हणाल्या 'ह्याने मूल हुशार आणि चटपटीत होतं' त्यावर आगाऊ मध्याने 'अरविंदला लावलं नव्हतं का? ' असं विचारलं. अरविंदला ओळखणारी लोकं, त्याचे बाबा, स्वतः अरविंद आणि खुद्द त्याची बायकोही मोट्ट्याने खो खो करून हसले होते. पण त्यानंतर साठे आजींनी 'माधव अतिशय आगाऊ कार्टा आहे, त्याची साथ सोड. ' असं मला हजार वेळा तरी ऐकवलं असेल.

बायकोचे हे संस्कार वर्गही लवकरच बंद पडले. आता पुढे काय होतंय ही धास्ती होतीच. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. थोडे दिवस घरात शांतता होती.

आणि एके दिवशी अचानक शांत समुद्रात वादळ यावं तसं आमच्या घरात सुना आत्त्याचं आगमन झालं.

आयुष्याचे नाटक - प्रवेश चौथा

| Labels: | Posted On 6/20/08 at 11:05 PM

प्रवेश चौथा - रियरव्ह्यू मिरर




लग्नाळूपणाला मी आता बऱ्यापैकी सरावलोय. पॉकेट मनी ५, ००० वरून ५, ५०० झालाय. बायकोच्या म्हणण्यानुसार शेपूट अजून पूर्णं सरळ झालेलं नाहीये. पण माझ्या आणि उरलेल्या ४ पांडवांच्या मते मी बराच सुधारलोय. शनिवार, रविवार ९ ला उठतो, स्वतःच्या पांघरुणाची घडी स्वतः घालतो, ऑफिसमधून आलो की मोजे बुटात आणि बूट शू-रॅक मध्ये ठेवतो, चहा पिऊन झाला की कप-बशी विसळून ठेवतो, एक दिवसा आड दाढी करतो (इथे मी भिंतीवर डोकं आपटतोय अशी कल्पना करा) आणि अशाच अजून तत्सम वाईट सवयी मलाही लागत आहेत. थोडक्यात, ऍड्याचा ऍडमीकी व्हायला सुरुवात झालेली आहे (बायको, दुसरं कोण? ).

एका शुक्रवार संध्याकाळी आम्ही कट्ट्यावर बसून आमच्या मौलिक विचारांची आदान प्रदान आणि आमचं जीवना विषयीचं भन्नाट तत्त्वज्ञान वाटत बसलो होतो. आज आमच्या सोबत मध्याचा मावसभाऊ गंट्या आपटे पण होता. गंट्याने मराठीत यम ये केलंय. आपण ह्या जगात थोडे उशीरा आल्याची त्याला खंत आहे. त्याला मनातून समाजवादी व्हायचं होतं. पण आज-काल समाजवाद्यांना कुणी विचारत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत त्याची शरीरयष्टी व खाण्या-पिण्याच्या सवयी बघता त्याने तो विचार तूर्तास बाजूला ठेवलाय. त्यामुळे आतून समाजवादी पण बाहेरून भोगवादी असं दुहेरी आयुष्य जगताना गंट्या दिसामासाने वाढतोय. त्या विषयावर छेडलं तर 'अरे वाढीचं वय आहे माझं' असं सांगून मोकळा होतो.

असो. तर असे आम्ही कट्ट्यावर बसलो असताना एकदम विंचू चावल्या सारखा अथवा झोपेतून अकाली उठवल्यासारखा गंट्या ओरडला.

गंट्या - माणूस लग्न का करतो.???

एक आवाज - अरे कामवाल्या बायकांचे भाव किती वाढलेत आज-काल...

आम्ही सगळे कोरस मध्ये चमकलो. हे आतलं गुपित भर दिवसा, सार्वजनिक ठिकाणी, चार लोकांसमोर मोट्ट्याने ओरडून सांगण्याची हिंमत असलेला हा थोर महापुरुष कोण हे पाहण्यासाठी आवाजाच्या दिशेने माना वळवल्या. पाहतो तर एक माणूस दुसऱ्या कुणाशीतरी फोन वर बोलत होता.

गंट्या - माणूस लग्न का करतो.???

आम्ही सगळे गप्प.

गंट्या - मी सांगतो.

मी - गंट्या, गंटुड्या, गंटोब्या, माझ्या सोन्या, माझ्या गोंडस गुलाबा... तुझं लग्न कुठे झालंय अजून.

गंट्या - म्हणूनच मी ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकतो. सोसायटीच्या टीम मध्येही क्रिकेट न खेळून सुद्धा तुम्ही गांगुलीने कसे शॉट्स मारावेत हे सांगता ना? तर फंडा असा आहे, श्री श्री डार्वीन महाराज इंग्लंडकर ह्यांच्या मते माणूस हा पूर्वी एप सदृश प्राणी होता.

विज्या (मध्याकडे बघत) - पूर्वी???

मध्या - चड्डीत राहा बे साल्या...

गंट्या - अजाण बालकांनो गप्प बसा. मध्ये मध्ये बोलू नका. तर सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात आळशी प्राणी माणूस आहे. आणि माणसांमधला सर्वात आळशी प्राणी म्हणजे पुरूष.

मध्या, विज्या, विन्या (माझ्याकडे बघत) - खरंय...

मी - चड्डीत राहा बे साल्यांनो... असं काही नाही गंट्याशेट. सगळे पुरूष असे नसतात.

गंट्या - बSSSSरं... आता आपण तुझंच उदाहरण घेऊया. तू हॉल मधल्या सोफ्यावर बसल्या बसल्या दात घासतोस, चहा पितोस, नाश्ता करतोस, पेपर वाचतोस, TV बघतोस, जेवतोस, Laptop घेऊन chatting करतोस (मी - अरे Laptop असतोच त्यासाठी) दुपारी TV सुरू ठेवून झोपतोस. म्हणजे तू फक्त झोपायला जाताना आणि अंघोळ करताना त्या सोफ्यावरून बूड उचलतोस.

मी - साल्यांनो तुम्हाला गेम करायला दर वेळी मीच भेटतो का? गंट्या उगाच काहीतरी फेकू नकोस.

गंट्या - मी फेकतोय? बSSSSरं. आता तू नि ह्या मध्याने प्रेमविवाह केलात. प्रेम केलंत ठीक आहे. समजू शकतो. घरातल्या मांजरांनाही प्रेम लागतं. पण विवाह का केलात?

मी - त्याचं असं आहे बाळा, तू अजून दुपट्यात आहेस. थोडा मोठा झालास की सांगीन नक्की.

विन्या - सांग रे. मलाही तुमच्या प्रेमप्रकरणात इंटरेस्ट आहे. ताईला विचारलं होतं. ती म्हणाली 'थोबाड फोडीन, CET चा अभ्यास झाला का? '. पण तू आपला माणूस आहेस बॉस. सांगून टाक तुमची प्रेमकहाणी.

मी - अबे ए साल्या, मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे. आदराने वाग.

विन्या - सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ ही म्हण ऐकली आहेस का?

मी - बSSSSरं. सांगतो. सांग रे मध्या.

मध्या - तू 'शान' पिक्चर पहिलायस का? त्यात एक डायलॉग आहे. फोन से आवाज सुननी हो तो पहले कॉईन डालना पडता है.

मी (एक नाणं काढत) - ये ले. घे टाकून नि कर भुंकायला सुरुवात.

मध्या - तर मित्रहो, आमच्या दोघांचा प्रेमविवाह.

गंट्या - पुढे बोल. आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की विद्या आणि संध्या सारख्या गुणवान मुलींनी तुमच्यात काय पहिलं.

विज्या - मला नाहीये. मी असं कधीही म्हणालो नाहीये.

गंट्या - अरे आम्ही म्हणजे आदरार्थी एकवचन रे सोन्या. बोल तू मध्या.

मध्या - आम्ही लास्ट इयरला असताना संध्या आणि विद्यानी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आमची पहिली भेट झाली कॉलेजच्या गेट वर.

पहिला दिवस असल्याने रॅगींग करण्यासाठी आम्ही ज्युनीयर्सना गेट वरच पकडत होतो. ह्या दोघींनी घाबरत घाबरत कॉलेज मध्ये एंट्री घेतली आणि बघता क्षणीच मला संध्या आणि ह्याला विद्या आवडली. आम्ही आमच्या कंपूला ह्यांना जाऊ दे अशी खूण केली. त्या दोघी दबकत दबकत आता अडवतील मग अडवतील अशी धाकधूक बाळगत निघून गेल्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांना तंबी दिली. ह्या दोघींकडे बघाल तर हात कलम केले जातील.

मग सुरू झाला एक जीवघेणा प्रवास. जीवघेणा अशासाठी की सुरुवातीला आम्हाला ह्या दिसायच्याच नाहीत. मग कळलं की ह्या पहिल्या लेक्चरच्या १० मिनिटं आधी येतात, सगळी लेक्चर्स अटेंड करतात आणि आम्ही कँटिन मध्ये पडीक असताना कॉलेज सुटलं की निघून जातात. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी पासून आम्हीही पहिल्या लेक्चरच्या वेळी कॉलेजला जाऊ लागलो. आई खूश झाली. बाबांना संशय आला.

ह्यांना बघण्यासाठी कॉमर्सला असून आम्ही आर्ट्सची लेक्चर्स अटेंड करू लागलो. पण गाडी पुढे सरकत नव्हती. आम्ही कितीही स्मार्ट, बिनधास्त असलो (इथे कोरस मध्ये हशा आला) तरी मुलींशी बोलायचं म्हणजे हात-पाय थरथरायला लागायचे. त्यामुळे ४ महिने झाले तरी आमची ओळख नव्हती झाली.

पण ती संधी लवकरच आली. आणि ह्या नालायक ऍडी नि त्या संधीची माती केली.

(इथे अचानक सगळ्यांचा इंटरेस्ट वाढला. सगळे कान टवकारून ऐकू लागले. )

मी कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता असल्याने (इथे पुन्हा कोरस मध्ये हशा आला) त्यांच्याशी आमची ओळख झाली. म्हणजे आधी माझी त्या दोघींशी झाली आणि मग मी मग ह्याची करून दिली. त्याबद्दल कबूल केलेली पार्टी ह्याने अजून मला दिलेली नाहीये. असो.

संध्या आणि विद्या दोघींना अभिनयाची आणि गाण्याची आवड. त्यामुळे त्यांनी नाटकात आणि वाद्यवृंदात भाग घेण्यासाठी इच्छुक म्हणून नाव नोंदवलं. त्यांचं दोन्ही कडे सिलेक्शन व्हावं म्हणून आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. कारण मग त्या नंतर आम्हाला आपसूकच तयारी साठी म्हणून त्यांच्या सोबत वेळ घालवता येणार होता.

एलीमीनेशन राउंडाला जे सर होते त्यांना जुनी गाणी आवडत असल्याने मी संध्या आणि विद्याला म्हणालो एखादं जुनं गाणं म्हणा. त्यावर संध्या नाक फेंदारून म्हणाली 'तुला काय करायचंय? ' तिने कुठलं तरी नवीन गाणं म्हटलं. पण आवाज चांगला असल्याने दोघी सिलेक्ट झाल्या. माझा जीव भांड्यात पडला. सरांनी सिलेक्ट झालेल्या लोकांची नावं वाचून दाखवताना तिचं नाव वाचल्यावर मी हसून तिच्याकडे बघितलं. तिने पुन्हा एकदा नाक फेंदारून 'हूं' केलं.

फायनल लिस्ट बोर्डावर लावण्यासाठी मी तयारी करत होतो. ह्या माठ ऍडीला सोबत घेतलं होतं. विद्याच्या ID कार्डची झेरॉक्स हातात आल्यावर आधी हा १० मिनिटं बघतच बसला आणि शेवटी ह्याने Vidya हे नाव मराठीत लिहिताना 'विड्या' असं लिहिलं आणि मी ती लिस्ट न बघता नोटीस बोर्डावर चिकटवली. आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जो ठणाणा झालाय त्याला तोड नाही. आम्ही कॉलेज मध्ये पाऊल ठेवायच्या आत आम्हाला खबर आली 'मराठीचे जोशी सर तुम्हाला शोधतायत'. आम्ही थोडे गोंधळात पडलो. कॉमर्सच्या पोरांना जोशी सरांनी का शोधावं? जोशी सर आमच्या कॉलेजचे उप-मुख्याध्यापकही होते. एकदा वाटलं आपण आर्ट्सच्या लेक्चर्सना बसतो हे त्यांना कळलं असेल. नंतर वाटलं कॉलेज-डे संबंधी काही बोलायचं असेल. शेवटी जे असेल ते असेल, देख लेंगे, असं म्हणून आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो.

इथे मी मध्याला थांबवला 'आता मी सांगतो'.

तर, आम्ही जोशी सरांच्या केबिन मध्ये गेलो. आणि आत जाऊन बघतो तर आत ह्या दोघी बसल्या होत्या. आम्हाला काही उलगडा होईना. सर म्हणाले 'बसा जोशी, बसा रानडे. ' आम्ही बसल्यावर त्यांनी मला आणि मध्याला एक कागद दिला. मी वाचलं तर त्यावर इंग्रजीत Vidya लिहिलं होतं. माझी टरकली. म्हटलं ह्यांना कसं कळलं. मध्याच्या कागदावर संध्या असेल असं वाटलं म्हणून बघितलं तर त्याच्यावरही Vidya च लिहिलेलं होतं. आत तर फुल्ल वेड लागायची पाळी. इथे ह्या दोघी आमच्या कडे आम्ही क्षुद्र जंतू असल्यासारख्या बघत होत्या. तेव्हढ्यात सरांनी दुसरा कागद दिला. तो कोरा होता. पेन दिलं नि म्हणाले लिहा तो शब्द मराठीत. मी ह्यावेळी बरोबर 'विद्या' लिहिला. मध्याने गोची केली. त्याने Vidya मराठीत तीन वेग वेगळ्या प्रकारे लिहिला.

सर - काल नोटीस बोर्डावरची लिस्ट कुणी बनवली?

मी - मी. म्हणजे मध्या... माधवनी मला झेरॉक्स दिल्या, मी नावं लिहीली.

सर - अरे काय हे. आज बरोबर लिहिलेलं हेच नाव काल तू 'विड्या' असं का लिहिलंस कळू शकेल काय?

मी उडालोच. अशी चूक माझ्या कडून होणं शक्यच नाही असं मनात आलं होतं, पण तेव्हढ्यात सरांनी लिस्टची कॉपी मला दाखवली. मनात म्हटलं 'चांगलाच पोपट झाला राव'.

मी - सर, चूक झाली. माफ करा.

सर - मला काय सांगताय? हिला सांगा.

मी - विद्या बाई, माझ्या हातून चूक झाली. मला माफ करा.

विद्या - पण तुझ्या मुळे मला सकाळ पासून सगळे चिडवतायत त्याचं काय?

मी - कोण चिडवतंय नाव सांग.

विद्या - तुला काय करायचंय?

मी - नाव तर सांग ना

विद्या - मग तू काय करशील. मारशील त्यांना जाऊन?

मी - ते काय करायचं हा माझा प्रश्न आहे. तू फक्त नाव सांग. (आता झालेल्या अपमानामुळे मी जरा वैतागलो होतो आणि त्यात ही आगाऊपणे उत्तरं देत होती. ) मी त्यांना मारीन नाही तर गोळा करून पार्टी देईन.

आता संध्या मध्ये पडली - बघ, मी म्हणाले नव्हते तुला. हा ह्यांचाच प्लॅन आहे. ते सगळे ह्यांचेच मित्र आहेत. ह्यांनी सांगितलेलं गाणं म्हणायला आपण नकार दिला म्हणून आपली जिरवतायत ते.

हे ऐकून मध्याही पेटला - वा वा वा... तुम्ही घशातून जे भीतिदायक आवाज काढता त्याला गाणं म्हणत असतील तर ऍडी टॉम क्रूज आहे.

चुकून मध्याने नको त्या शेपटावर पाय ठेवला. आता टॉम क्रूजची पोस्टर्स ह्यांच्या बेडरूम मध्ये आहेत नि तो ह्या दोघींचा मानलेला नवरा आहे हे आम्हाला कसं कळणार?

विद्या - तोंड बघितलंय का आरशात? उर्श्वमुखी कुठचा...

मी - काय कुठचा???

विद्या - तुला काय करायचंय? मी त्याला बोललेय.

जोशी सर - बाळांनो, तुम्ही कुठे आहात ह्याचं भान आहे का तुम्हाला?

आम्ही - सॉरी सर...

विद्या - सर ह्याला आत्ताच्या आत्ता कॉलेज मधून काढून टाका.

मी - हॅ हॅ हॅ... शुद्धलेखनाच्या चुका पेपर मध्ये केल्या तरी काढत नाहीत. आणि मॅडम मी कॉलेजचा G.S. आहे. असल्या फालतू गोष्टीवरून माझ्यावर ऍक्शन घेतली तर लय भारी पडेल.

विद्या - काय करशील??? मारशील मला?

मी - तू सारखी मारा-मारीच्या गोष्टी का करतेयस?

सर - जोशी... शांत व्हा...

संध्या - सर मी एक सुचवू? ह्यांना 'विद्या' हे नाव हजार वेळा लिहायची शिक्षा द्या.

मध्या - काहीही काय...

मी - चालेल... (आणि मध्याला डोळा मारला)

नंतर माझ्या वाटचं हजार वेळा आणि मध्याच्या वाटचं हजार वेळा असं ते नाव मी २ हजार वेळा लिहून काढलं.

तर अशी आमच्या चौघांची आप-आपसात पहिली ऑफिशियल ओळख झाली. त्यानंतर आम्ही कॉलेज-डे च्या तयारी साठी बऱ्याच वेळा भेटलो. पण गाडी काही पुढे जात नव्हती. हे शेवटचं वर्ष होतं. त्यानंतर आम्ही कॉलेजच्या बाहेर पडणार होतो. आता निदान रोज दर्शन तरी होत होतं. पण एकदा बाहेर पडलं की संपलं सगळं.

म्हणून मग आम्ही शेवटी ठरवलं 'बॉस, स्वतः जाऊन स्वतःसाठी प्रपोज करायचा आपल्यात दम नाही. म्हणून मग आपण आता एक मेकांच्या वतीने प्रपोज करायचं. ' त्या प्रमाणे मी संध्याकडे आणि मध्या विद्या कडे गेलो. थोड्यावेळाने मी आणि मध्या एकमेकांना येऊन भेटलो. कुणी काही बोलेचना.

शेवटी मीच धीर करून विचारलं - काय झालं रे?

मध्या - ती म्हणाली, तू तसा बरा आहेस पण जरा जास्त आगाऊ आहेस...

मी - आयला, संध्या पण असंच म्हणाली. पुढे?

मध्या - त्याला सांग, CA कंप्लीट झाल्या शिवाय काही नाही.

मी - आयला, संध्या पण असंच म्हणाली. ह्याचा अर्थ काय?

मध्या - ह्याचा अर्थ असा की आता अभ्यासाला लागायचं.

मग ह्या नंतर पुढची चार वर्षं आम्ही तारेवरची कसरत करत काढली. CA रिझल्ट घेऊन दोघींना भेटायला गेलो. मोठ्या आशेने रिझल्ट दाखवला.

चेहेऱ्या वरची सुरुकुतीही न हलवता विद्या म्हणाली - गुड. पण तू CA झालास म्हणजे मी तुला हो म्हणीन असा अर्थ होत नाही.

माझी नेहमीप्रमाणे सटकलीच - मग आता काय फायनान्स मिनिस्टर व्हायची वाट बघणारेस का?

विद्या - चिडू नको रे...

मी - चिडू नको तर काय तुझी पुजा करू?

विद्या - मला चालेल.

मी - हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. बाइक इतकं नसेल पण त्याच्या जवळपास आहे. आणि हे मी मनापासून बोलतोय. ह्या तीन वर्षात मी एकाही मुली कडे बघितलं नाहीये. म्हणजे, तसं बघितलं, पण तसं नाही बघितलं. तुला मी आवडत असेन, काही विचार केला असशील तर मला स्पष्टपणे सांग. नाहीतर...

विद्या - नाहीतर काय???

मी - नाहीतर... मी तुला विचार करायला अजून वेळ देईन...

ह्यावर विद्या जी काही गोड हसलेय की ते बघून काळजाचं पाणी होणं, सुटकेचा निःश्वास सोडणं, पोटात गार वाटणं, जीव भांड्यात पडणं हे सगळं मला एकदमच झालं. मी लगेच मध्याला हुश्श्श्श असा SMS केला आणि तेव्हढ्यात मध्याचा मला हुश्श्श्श असा SMS आला. ह्यापुढचं तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे.

कहाणी सांगून झाल्यावर भानावर आलो तर आजू बाजूला अजून जनता जमून टाळ्या वाजवत होती.

गंभीर भाव चेहऱ्यावर आणून गंट्या म्हणाला - हे सगळं ठीक आहे. पण माझा मूळ प्रश्न अजून अनुत्तरितच आहे...

मी - कोणता???

गंट्या - माणूस लग्न का करतो...???

देव

| Labels: | Posted On 6/13/08 at 2:38 PM



(चित्र नेट वरून घेतलंय. चित्रकार कोण हे माहिती नाही, पण त्याची हरकत असेल तर इथून कढण्यात येईल.)




वार गणेशाचा, रांगा ही लागल्या,
अशा लांब भल्या, दर्शनासी.

लांबुनी चालत, गाडीत बसून,
येती भक्त जन, देवळात.

लोक घालवीती, तास पाठी तास,
एका दर्शनास, देवाजीच्या.

आतल्या आत, चिडे गणराय,
म्हणे सांगू काय, निर्बुद्धांस.

वेळ हा वाचवा, सचोटीचा धंदा,
ठेवोनीया श्रद्धा, माझ्यावरी.

कर्म न करीता, येता देवळात,
विचार मनात, जगातले.

इथे फक्त माझी, मुर्ती रहातसे,
समजावे कैसे, अडाण्यांस.

देह इथे परी, मन फिरतसे,
लुबाडावे कैसे, दुसर्‍यास.

पाप करोनीया, देता मला लाच,
मनातली बोच, जात नसे.

घालविता वेळ, नासाडता अन्न,
पावेन मी कसा, हाची प्रश्न.

सत्य आचरणा, पुण्य ही होईल,
देवच येईल, पहाण्यांस.

करा दान धर्म, मला नको काही,
एक हाक खरी, मला खूप.

मनास विचारा, मला आत शोधा,
सपडेन खरा, तुमच्यात.

बंगलोर मिसळपाव (सात्विक) ओसरी अहवाल

| Labels: | Posted On 5/27/08 at 6:45 PM

मिपा च्या पहील्या सात्विक ओसरी चा अहवाल लिहीताना मला अत्यंत आनंद होत आहे. मागच्या दोन वादग्रस्त (?) ओसर्‍यांनंतर यंदाची ओसरी मद्यपानरहीत करायचे वचन आम्ही दिले होते. आणि ते पाळायचेही ठरवले होते.

ठरल्या दिवशी संध्याकाळी मला डॉनचा फोन आला. अबबला काँफरंस मधे घेतलं. बराच वेळ बोलूनही कुठे भेटायचे हे काही केल्या ठरत नव्हते. कारण मद्यपान करायचे नाही तर बँगलोर मधे नुस्ते जेऊ घालणारी साधी हॉटेल्स आहेत का हे तिघांपैकी कुणालाही माहित नव्हते. शेवटी माझ्या घरी या मग ठरवू काय ते असं सांगून मी फोन ठेवला. दारावची बेल वाजली. मी दार उघडायला दाराजवळ गेलो तेवढ्यात मला उदबत्तीचा वास आल्याचा भास झाला. ह्या सात्विक ओसरीला डॉन आणि अबब (अभिज्ञ) सोवळं नेसून आणि केळ्यात खोचलेली उदबत्ती घेऊन आलेत की काय असा मला वाटलं. पण तसं काही झालं नाही. शेजारच्या घरात कसली तरी पुजा होती.

सुरुवातीचा अर्धा तास खारेदाणे खात खात (नुस्ते) हॉटेल्स शोधण्यात गेला. आपल्या हातात असलेल्या मुबलक वेळाचं करायचं काय ह्याचं उत्तर कही मिळेना. त्यामुळे अबब (तोच तो अभिज्ञ) ने वेळ घालवण्यासाठी माझे कपडे घुवायचेत, घर झाडायचंय, बिलं भरायची आहेत हे उपाय सुचवून बघितले. पण अर्थातच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

फिरता फिरता अम्हाला एक रसपान ग्रुह सापडलं. तिथे उभे रहून बर्‍याच वेगवेगळ्या फळांचे (ताजे) रस पिण्यात थोडा वेळ घालवला. त्या रसवल्याने एकच ज्युस कालाखट्टा म्हणून डॉनला, कालाद्राक्ष म्हणून अबबला (अभिज्ञला) आणि मिक्स्ड फ्रुट म्हणून मला दिलं (असा मला संशय आहे).

त्या नंतर अचानक डॉनला कोरमंगला नावाच्या भागात एक सॅफ्रॉन नावचे हॉटेल आहे व तिथे बसून आपल्याला मोठ्या स्क्रीन वर मुंबईची मॅच बघण्यात वेळ घालवता येईल असा साक्षात्कार झाला. नी मुंबई जिंकली तर विजयाची धुंदीही चढेल असा एक पिजे त्याने मारून घेतला. हॉटेल जवळ पोचल्यावर मी 'सॅफ्रॉन - वा नावच किती सात्विक आहे' असं म्हणालो. त्यावर डॉन ने मला 'सॅफ्रॉन म्हणजे केशर बरं का जोश्या' असा डायलॉग चिकटवला.

आम्ही पोचेस्तोवर मुंबईची फलंदाजी सुरू झाली होती. आम्ही मोक्याची जागा पकडून बसताच वेटर बाजूला येऊन उभा राहीला. त्याला अबब ने ऑर्डर दिली 'मेतकूट भात, साजूक तुप, पोह्याचा भाजलेला पापड आणि सोलकढी'. डॉन म्हणाला 'मला साबुदाणा वडा'. माझी सटकली . 'अरे मेल्यांनो तुम्ही प्रकाश मधे असल्या सारखे वागू नका' असे मी ओरडल्यावर दोघांनी कोरस मधे 'अरे पण आज सात्विक ओसरी आहे ना' अशी प्रुच्छा केली.

वेटरने 'का माझा वेळ फुकट घालवताय राव' असे लुक्स दिल्यावर फायनली पंजाबी खायचे ठरले. सत्विक ओसरी वर अभक्ष भक्षण चालणार का ह्यावर थोडा वादविवाद झाला. मी अभक्ष भक्षण करत नसल्याने तुम्ही काय हवं ते खा असं सांगितलं.

खाता खाता 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' स्थापन करायची कल्पना डॉनने मांडली. कल्पना माझी असल्याने मी अध्यक्ष असेही घोषीत केले. त्यावर अबबने तो संचालक पद सांभाळेल असे कळवले. मी कोणते पद घ्यावे असा विचार करत असताना त्या दोघांनी 'सगळेच पदाधिकारी झाले तर आपण वट कोणाला दाखवणार?' असे ठरवून मला सभासद म्हणून नोंदवून घेतले. वर आजीवन नोंदणी शुल्क म्हणून रु. १००० (फक्त) दे असेही सांगितले. मी विचार करून सांगतो म्हणून विषय टाळला.

जेवण झाल्यावर करण्या सारखे काही नसल्याने थोडा वेळ शतपावली करायचे ठरवले. शतपावली करता करता अबब ने अम्हाला समग्र गीतरामायण म्हणून दाखवले. ते झाल्यावर डॉनने आम्हाला कुणी 'दाऊद चालिसा' ऐकली आहे का असे विचरताच आम्ही घरी जायचा निर्णय घेतला.

तर अशा प्रकरे पहिली बंगलोर मिसळपाव (सात्विक) पार पडली आणि लोकं पहिल्यांदाच सरळ पावलं टाकत आप-आपल्या घरी रवाना झाली.